शाळेने एक गोष्ट शिकवली परीक्षा कितीही छोटी असो, अगदी २० मार्कांची चाचणी परीक्षा असो किंवा १०० मार्कांची, परिक्षा महत्वाची. त्यामुळे चाचणी असली तरी थोडंसं का होईना टेन्शन असायचंच. आणि कॉलेजने शिकवलं, अगदी शेवटी नाईट मारून का होईना वेळ निभावायची. (अर्थात शिकवलं
नाही, मीच शिकले. वाईट गोष्टी शिकायला वेळ लागत नाही. ) पण रनिंगने, सराव किती महत्वाचा ते शिकवलं. कितीही नाईट मारली तरी दुसऱ्या दिवशी पेपर लिहिता येतो पण रेस पळता येत नाही. परीक्षा काय किंवा अंतर काय कितीही छोटं असलं तरी सराव पाहिजे. आता या तीन गोष्टींचा खालच्या पोस्टशी काहीही संबंध नसेल, पण हे एकदा लिहायची इच्छा होती, ती पूर्ण केली. :)
काल, या वर्षातली पहिली रेस पळालो. रेस फक्त म्हणायला, आम्ही काही पहिले वगैरे येण्याच्या नादाला लागत नाही किंवा अगदी 'पहिले कोण आले' हे विचारण्याच्या भानगडीतही पडत नाही. पण पळणे हे फक्त स्वत:साठी आणि आपलाच ठरवलेला वेळ मागे टाकून जाण्यासाठी ही रेस. यावेळी रेस फक्त ५ किलोमीटरची होती. आता तसा जरा अंदाज आला आहे पळायचा त्यामुळे पूर्ण होईल याची खात्री होती. तरीही जसे दिवस जवळ आले थोडी काळजी वाटू लागली होती. गेले तीनच आठवडे सराव करून रेस पार पडली. आनंदाची गोष्ट म्हणजे मी आणि
संदीप दोघांचीही ठरवलेल्या वेळेत किंवा त्याहून कमीच वेळेत पूर्ण झाली.
पण मला ना पळण्यापेक्षा त्यादिवशी तिथे पोहोचायची जायची जास्त काळजी असते. एकतर खूप पहाटे कधीतरी उठायचं असतं. मग तिथून कुठेतरी ड्राईव करून जायचं. त्यात रेसमुळे कुठले रस्ते बंद असतात. कधी ट्राफिक लागते किंवा पार्किंग कुठे करायचे याची चिंता असते. गाडी लांब लावली तर परत येताना तिथेपर्यंत चालत येत येईल का. आणि हे सर्व करण्यासाठी सकाळी अलार्म वेळेत वाजेल का आणि आपल्याल्या जाग येईल का असे हजारो प्रश्न माझ्या मनात असतात. तरीही सर्व ठीक होत आलं आहे आतापर्यंत तरी.
बाकी कशाचीही काळजी असली तरी एका गोष्टीची मात्र आम्हाला काळजी नसते. ती म्हणजे मुलांना ज्या मित्रांकडे सोडून जातो तिथे काय होईल. आता पर्यंत चार तरी रेसेस ना आम्ही दोघे गेलो आणि आमच्या मित्रांनी त्यांना घरी सांभाळले आहे. बर हे लोक नुसते मुलांना बघत नाहीत. रात्री आम्ही झोपायच्या आधी विचारतात सकाळी काही लागणार आहे का? काही हवं असेल तर त्यांच्या घरात सर्व सामान कुठे ठेवलं हे ते सांगून ठेवतात. सकाळीही जाग आली की आम्हाला 'All the best' देऊन परत झोपतात. आम्ही 'रेस संपली' म्हणून कॉल केला तर तोवर मुलं उठून बसलेली असतात. घरी आलं की आम्ही जग जिंकल्यासारखे आमचे अभिनंदन करतात. घरी पोहचेपर्यंत, मुलांचे ब्रश करून, दुध नास्ता झालेले असते. आम्हाला विचारतात चहा नास्ता करायला. जेवणही अगदी तयारच असतं. आम्ही फक्त आयतं जेवून दुपारची झोप काढायची. आमचे पाय-बिय दुखत असतील तर गोळ्याही देतात. हे सगळं बघून मला रेसपेक्षा आपल्याला असे मित्र आहेत याचाच जास्त आनंद होत असतो.
आता मुलांनाही आम्ही असे रेसला जाण्याची सवय झाली आहे. तेही आनंदाने त्या मित्रांकडे राहतात. घरी आले की
विचारतात, 'मेडल मिळालं का? '. मग ते गळ्यात घालून फिरत राहतात. भारी वाटतं
ते बघताना. रेस झाल्यावर सर्वांना आनंदाने सांगायला किंवा फेसबुक वर फोटो
टाकायलाही भारी वाटतं.पण त्या सगळ्याच्या मागे आमचे हे मित्र आणि त्यांच्या शुभेच्छा असतात त्या कधीच विसरणार नाही. मला वाटतं प्रत्येकाने एकदातरी हा अनुभव घेऊन पहावा. निदान त्यासाठी तरी एखादी रेस पळून पहायला हवी. :) यावेळचे आमचे मेडल्स त्या सर्व मित्र-मैत्रिणींसाठीच. :)
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
No comments:
Post a Comment