कधी द्राक्ष किंवा शेंगदाणे खाताना असं झालंय का, शेवटचे दोनच दाणे उरलेत, कुठला खावा म्हणून विचार करून एक निवडावा आणि नेमका शेवटचा दाणा आंबट किंवा खवट निघावा? माझं होतं बरेच वेळा असं. कधी बरोबर बाहेर पडताना पाऊस सुरु होतो तर आपण जाऊ तेंव्हाच दुकान बंद असतं, काही न काही कारणानं. तेव्हा मग 'नशीबच वाईट' किंवा 'दिवसच खराब' असे मोठे मोठे दोष त्या एका छोट्या गोष्टीमुळे देऊ लागतो. असो. आजची पोस्ट अशा छोट्या छोट्या गोष्टींवरच.
सकाळी मी ऑफिसला येण्यासाठी स्टेशनवर पोचते तेव्हा बरेच वेळा ट्रेन अगदी समोरून निघून जाते. पण कधी कधी मात्र अगदी दार बंद होता होता मला ट्रेन मिळून जाते. कधी बसायला निवांत जागाही मिळते. मी मिटींगच्या आधी कॉफी घ्यायला जाते तोवर बरेच वेळा पाणी, साखर किंवा दूध यातलं काही ना काही संपलेलं असतं. पण कधीतरी जाते तर सर्व मिलन जातंच. अगदी कॉफीचा कुठला फ्लेवर घ्यावा असा विचार करत बॉक्समध्ये हात घालते तर पहिलाच माझा फ्लेवर मिळून जातो. आता जगात इतकी दु:खं असताना मला कशाचा आनंद व्हावा असंही म्हणेल कुणी. पण खरंच भारी वाटतं. असो.
अजून काही अगदी हमखास घडणाऱ्या गोष्टी म्हणजे अशा, एखाद्या सेल मध्ये जाऊन आपल्याला एखादा कपडा आवडावा, किंमत अगदी कमी आणि राहिलेल्या दोनच कपड्यात आपल्या मापाचा एक असावा. सोनं मिळाल्याचा आनंद होतो किनई? :) रेडिओ लावावा आणि अगदी आवडीचं गाणं लागावं. एखाद्या रविवारी भाजी आणायला जावं आणि मटार अगदी ताजे ताजे, १५-२० रु किलोने मिळावेत यासारखा रविवार नाही. पोरांनी, बनवलेलं जेवण आवडीने पटापट संपवून टाकावं आणि लवकर झोपूनही. आणि नेमका त्याच दिवशी आपल्या आवडीची सिरियल बरोबर दोन मिनिटात सुरु होणार असावी. दिवस कसा एकदम सुखात जातोय असं वाटतं, नाही का? या सर्व गोष्टींमध्ये कुठलीही लाईफ चेंजिंग वगैरे नाहीये. पण आनंद मिळायला छोटं कारणही पुरतं. हो ना? :)

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
No comments:
Post a Comment