Tuesday, June 29, 2021

एका माघाची गोष्ट

एक होता माणूसघाण्या. आता तुम्ही म्हणाल 'शी किती घाण वाटतं माणूसघाण्या म्हणायला.' हो पण मराठीने जरा प्रेमळ शब्द दिले तर मराठी कसली. प्रेमळ हा एकच शब्द प्रेमळ असावा मराठीत. असो. तर मी जरा शॉर्टकट मारून त्याला 'माघा' म्हणते. नाहीतर, सारखं माणूसघाण्या म्हणायलाही लै टाईप करायला लागतं. मी काय सांगत होते?  हां, माघाची गोष्ट. तर माघा जन्मला तेव्हा काही माघा नव्हता, किंवा त्याला माहित नव्हतं आपण माघा आहोत ते. त्यामुळे त्याचं शाळा, शिक्षण, कॉलेज वगैरे सर्वांसारखंच झालं. उलट शाळेत 'किती बोलतोस रे तू' म्हणून शिक्षकांच्या तक्रारीही यायच्या. हां कधीकधी भाऊ, बहीण, नातेवाईक, शेजारी पाजारी सोडून पुस्तकांत रमायचा, पण ते काय आपणही करतोच की? पुढे तोही आपल्यासारखाच इंजिनियर झाला आणि आपल्यासारखीच नोकरीही त्याने घेतली. तिथून पुढे मात्र त्याची माघागिरी सुरु झाली. 

             रूममेट्स, तेच तेच. सुरुवातीला वाटायचं एखादा ठीके म्हणून, लवकरच त्यांच्याही कंटाळा यायचा. रोज काय त्याच माणसाशी बोलायचं? तोंड बघायचं? माणसाचा कंटाळा किती लवकर येऊ शकतो नाही? सुरुवातीची नवीन ओळखीचे क्षण संपले की मग त्याच गप्पा, तेच स्वभाव, तीच भांडणं सुरु होतं. बरं एखादा घेतो जुळवूनही. पण माघाचं मनच उडून जायचं. समोरच्या माणसाकडे तो पारदर्शक दृष्टीने बघत राहायचा. परत नव्याने नव्याचा शोध. बरं मित्रं म्हणून जी काही चार टाळकी होती त्यांच्या गर्दीतही दोनेक तासांत अस्वस्थ व्हायला लागायचं. कधी एकदा घरी येऊन आपल्या कोशात जातो असं व्हायचं. चुकून एखादा बेडगी वागणारा दिसला तर मळमळून उलटी होईल की काय वाटायचं. समोरचा आवरण घेऊन बसला असेल तर यानेही सोडून द्यावं ना? नाही, त्याला त्या आवरणाच्या आत काय आहे ते शोधून बघायची इच्छा व्हायची आणि ते मिळाल्यावर अजून किळस यायची. 

            पुढे कधीतरी मग तो ऑनसाईट आला  चौघांसारखाच. इथे सुरुवातीला त्याला बरं वाटलं गर्दी कमी बघून. पण पुन्हा तीच गटबाजी, तेच चार लोकांचं छोटं वर्तुळ. त्याने प्रयत्न केला थोडा त्या वर्तुळातून बाहेर पडून नवीन काही करण्याचा, नवीन माणसांची संगत करण्याचा, पण शेवटी माघाच तो. माणसं शोधायची काय गरज आहे म्हणून त्याने तो नाद सोडून दिला. हे सर्व होत असताना त्याला एक त्याच्यासारखीच माघा मैत्रीण मिळाली. मग ते दोघे मिळून माणूसवेड्या लोकांवर हसत. हे माणूसवेडे लोक, आपल्याच बायको-नवऱ्याला सरप्राईज देण्यासाठी लोकांना कसं जमवतात आणि कसं सरप्राईज दिलं यावर गोष्टी रंगवून सांगतात. लोक पिकनिक वगैरे करतात, गेम्सही खेळतात. अंताक्षरीमध्ये त्यांना किती आनंद मिळतो यावर बोलण्यात त्यांच्या अनेक संध्याकाळी जायच्या. माघाला आपला जोडीदार मिळाला असंच वाटलं. त्याने तिचा वाढदिवसही एकट्यानेच तिच्यासोबत अजिबात सरप्राईज न देता साजरा केला. पुढे काय झालं माहित नाही पण त्याची ती मैत्रीण सोडून गेली. शेवटी ती त्याच्यापेक्षाही माघा निघाली असं वाटलं त्याला. 

        मैत्रिणीच्या दुःखात माघा वेडा झाला. त्याला तिच्या जाण्याचं दुःखं होतं की आपण एका माणसाच्या नसण्याबद्दल इतकी खंत करतोय याचं हे त्याला कळेना. त्या दुःखात तो चक्क मित्रांसोबत(?) न्यू ईयर पार्ट्या, वगैरेंनाही गेला. आपल्याला माणसांची गरज कशी भासू लागली म्हणून तो चक्रावला. त्याने काहीतरी केलेच पाहिजे म्हणून एका थेरपिस्टची मदत घेतली. पण शेवटी माणूसच ती. तिच्या असण्याचाही त्याला वैताग येऊ लागला. किती वेळ बोलत बसणार तिच्यासोबत? मग नाईलाजाने त्याने घरी फोन लावला. त्याचे वैतागलेले आई वडील म्हणाले,'चल तुझं लग्न लावून टाकू, तुला बरं वाटेल.' तो 'हो' म्हणाला. ही आपल्या आयुष्यातली किती मोठी चूक आहे हे त्याला साखरपुड्यादिवशीच कळले. आजूबाजूच्या दुप्पट झालेल्या नातेवाईकांना पाहून त्याचं मन अजून छोटं झालं आणि दुःखं मोठं. आता कुणी म्हणेल याला काय दुःखं आहे, डोंबल? असतात एकेकाची.  

         बायको बरी होती त्याची. माणूसवेडी होती पण निदान एक भिंत तिने उभी केली त्याच्याभोवती. सगळे सामाजिक सोपस्कार पार पाडण्याची जबाबदारी घेतली बिचारीने. नाही करून करते काय? माघा तिच्यासोबत पॉटलक, मुलांचे वाढदिवस, शाळांचे कार्यक्रम वगैरेंना जाऊ लागला. सर्वाना खूषठेवायचं, गॉड बोलायचं त्याचं काम बायकोने थोडं कमी केलेलं. बायकोसोबत मदत झाली ती सोशल मीडियाची. आता त्याला लोकांसमोर प्रत्यक्ष न उभे राहता लोकांमध्ये असल्याचा भास निर्माण करता येऊ लागला. शिवाय फोन, इंटरनेट वगैरे मुळे अगदी बस, ट्रेन, प्लेनमधेही त्याला बोलायचे सोपस्कार पार पाडायची गरज राहिली नाही. उभ्या उभ्या तो समोरच्या जगातून गायब होऊ शकत होता. अजून काय हवं होतं? 

        सोन्याहूनही पिवळं म्हणजे लवकरच मग तो आयटी मॅनेजर झाला. त्यामुळे तर त्याची लॉटरीच लागली म्हणा ना? आता प्रोजेक्ट बदलले तसे लोक बदलता येऊ लागले. कितीही बोललं तरी त्याला अर्थ असण्याची गरज नव्हती. उलट तो नाही बोलला तर प्रोजेक्टमधले लोक अजूनच आनंदी राहू लागले. त्याला मीटिंगमध्ये हजर असूनही नसल्यासारखे करता येऊ लागले. टीमसोबत जेवण-बिवण सारख्या औपचारिकता करायची गरज उरली नाही, कारण लोक स्वतःच त्याला टाळू लागले. घरीही कामाचं निमित्त सांगून लॅपटॉप समोर बसता येऊ लागलं. पोरांनाही बापाला काम असतं हे कळून गेलं. कुठल्याही कार्यक्रमांत, वीकेंडात त्याच्या हजेरीची, इतकंच काय दिवस रात्रीचं भान ठेवायचीही गरज नाहीशी झाली. गेले पाच वर्षं झाले तो मॅनेजर होऊन. आयुष्यभराचा सगळा संघर्ष या पायरीपाशी येऊन थांबला असं त्याला वाटलं आणि तो सुखाने नांदू लागला. 

अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. 

विद्या भुतकर. 

Saturday, June 26, 2021

आप्पा

आज संध्याकाळी चालायला बाहेर पडल्यावर कोपऱ्यावर एक ओळखीचा वास आला. खरंतर मी एका नवीन बांधकाम चालू असलेल्या घरासमोरून जात होते. तिथे तो वास येण्याचं काय कारण असेल? तरीही तो वास माझा माग सोडेना. म्हणून थांबले दोन क्षण तिथेच. किराणामालाच्या दुकानातल्या रद्दीच्या कागदांच्या थप्पीचा वास तो. रद्दीच्या दुकानातला नाही हां. तो वेगळाच असतो. हा वास जरासा ओलसर, जरासा तेलकट,मीठ-साखर आणि त्यात मिसळलेला कागदाच्या थप्पीचा. त्या वासाने मला आप्पाची आठवण आली. आता वयानुसार आप्पाला 'अहो आप्पा' म्हणणं गरजेचं, पण सवय. मला तर वाटतं आजवर आईने, रात्री उशिरा घरात काही संपलंय म्हणून 'जा आप्पा उघडा आहे का बघ' म्हटल्याचा परिणाम असेल. असो. 

       घर आणि शाळेच्या रस्त्याच्या मधोमध अंतरावर आप्पाचं किराणामालाचं दुकान होतं. मी जन्मायच्या किती आधीपासून होतं माहित नाहीत. माझ्या पहिलीपासून तरी होतं. १२ बाय १५ चं ते दुकान असेल. दुकानाच्या बाहेरच लटकलेल्या छोट्यामोठ्या गोष्टींपासून आत प्रत्येक कोपऱ्यात वरपर्यंत खचखचून भरलेलं.  दारात दोन चार सायकली ठेवलेल्या, भाड्याने देण्यासाठी.२ बाय ४ चा काउंटर, दिवसभरात १०० वेळा पुसलेला. त्याच्यामागे मांडी घालून बसलेला आप्पा ! त्याच्या मागे भिंतीवर लक्ष्मीचा फोटो, मोत्याची माळ घातलेला. ती माळही किती जुनी ते त्या लक्ष्मीलाच माहित. दुकान आठपर्यंत उघडं असलं तरी आप्पा उघडा नसायचा. आप्पाच्या अंगात नेहमी ढगळी सफेद रंगाची बंडी, पायात सफेद पायजमा. शाळेतून जात येताना मान वळवली तर त्या काऊंटरवर हमखास आप्पा दिसणार याची खात्री असायची. किंवा कधी दुपारी पाहिलं तर त्याच्या चेहऱ्याच्या जागी त्याच्या हातातला पेपर दिसेल याची. 

         पहिलीपासून त्याच्या दुकानातल्या निरनिराळ्या वस्तूंचं मला आकर्षण. कधी कागदाच्या बॉक्समधल्या पाटीवरच्या पेन्सिली, कधी रंगीत शिसपेन्सिली तर कधी रेनॉल्डच्या पेनचं. शनिवारी दुपारी लवकर शाळा सुटली की आईने हातात दिलेले २५ पैसे घेऊन दुकानात जायचे.  २५ पैशात, काचेच्या बरणीतल्या लेमनच्या ४ गोळ्या घ्याव्या, नवीन पेन्सिल घ्यावी की आवळा सुपारी यांवर कितीतरी वेळ जायचा. माझा निर्णय होईपर्यंत माझ्यावर लक्ष ठेवत आप्पा अजून चार पोराचं शंकानिरसन करायचा. एखाद्या गिऱ्हाईकाचं सामान बांधून द्यायचा. काहीही मागितलं की डाव्या हाताचं मधलं बोट तोंडात घालून, त्या काउंटरच्या खालीही न बघतात्या बोटाने रद्दीच्या ढिगातून एक कागद न चुकता काढून घ्यायचा आणि समोरच्या परड्यात ठेवायचा. उजव्या हातानं जे काही धान्य असेल ते त्या कागदात टाकून आपला वजनाचा अंदाज किती बरोबर आहे यावर खुश व्हायचा. गुंडीला लावलेल्या दोऱ्याचा एक तुकडा दातात अडकवत तोडून सराईतपणे पुडा बांधून द्यायचा.  त्या त्याच्या कलेचं कौतुक करत मी आपली आवळासुपारीची छोटी पुडी घेऊन निघायचे. कधी वाटतं की मी तितकी लहान असताना आप्पा तरुण असेल का? डोक्यावरचे केस काळे असतील का? आठवत नाही. मी पाहिलं तेव्हापासून आप्पा वयस्करच होता. त्याच्या डोक्यावरच्या विरळ होणाऱ्या, बंडीतून दिसणाऱ्या छातीवरच्या, हातावरच्या केसांसहित. 

       ५-६ वीत गेल्यावर सायकल भाड्याने घ्यायला गेलं की आप्पाचं ऐकून घ्यायला लागायचं. 'एक रुपयात अर्धाच तास मिळणारे, किती वाजले बघितलंस का?'. मी त्याच्या दुकानातल्या पेन्डूलम असलेल्या घडाळ्याकडे बघत हिशोब करायचे. ५.३२ पासून अर्धा तास कसा मोजणार? मी उत्तर देऊन, सायकल घेऊन निघाले की कधी स्वतःच थांबवून म्हणायचा, 'थांब हवा नाहीये त्यात'. माझी चिडचिड सायकल मिळायला वेळ लागला म्हणून. एकदा सायकल चालवत  शेतात गेले  आणि बांधावरच्या  बाभळीच्या काट्यानी सायकल पंक्चर झाली. ती परत आप्पाकडे न्यायची या विचारानं मला रडू फुटलं होतं. आप्पा सायकलचं पंक्चर काढताना मी तिथे जाऊन बसले, तर त्याने विचारलं,  'रडतीयस का? पायात गेलाय का काटा?'. मी रडतच 'नाही' म्हणत मान हलवली. मग हसला आणि म्हणाला, 'मग जा की घरी!'. सातवीत आजोबांनी नवीन शाईचं पेन घेऊन दिलं. त्याचा प्रॉब्लेम एकच. शाईची बाटली विकत कोण घेऊन देणार? मग दर दोन चार दिवसांनी आप्पाकडे जाऊन शाई भरून आणायची, २५ पैसे. निब तुटली,५० पैसे. आपल्या बंडीवर, बोटांवर थेंबही न लागू देता आप्पा वेळ घेऊन सर्व करून द्यायचा. माझ्या त्या २५,५० पैसे, एक रुपयांनी आप्पाचं असं काय भलं झालं असेल? 

        कधी संध्याकाळी सामान आणायला आईसोबत गेलं की आप्पाची बायकोही दिसायची. डोक्यावरून पदर घेतलेली. 'काय म्हणताय भाभी?' आई विचारायची. बाकी बायका 'वहिनी' आणि ही 'भाभी' का ते मला कळायचं नाही. आमच्या या छोट्या गावांत आप्पा कुठून आला असेल? काय माहित. आई बोलत असताना, मी तिथं समोर ठेवलेल्या धान्याचे कप्पे बघत बसायचे. मला तांदळाचे चार दाणे का होईना गव्हात टाकायची खूप इच्छा व्हायची, पण मागे असलेली आप्पाची नजर जाणवायची. त्याच्या बायकोशी आम्ही कितीही गप्पा मारल्या तरी आप्पा काही बोलायच्या भानगडीत पडायचा नाही. त्याची रस्त्यावरची नजर आणि काऊंटर सुटायचा नाही. आम्ही रात्री उशिरा गेलं की हमखास खेड्यात जाणारा एखादा माणूस तर असायचाच, आम्ही जायची वाट बघणारा. त्यांच्याकडे पाहून कळायचं नाही की हे असे थांबलेत का? मोठी झाल्यावर कधीतरी मला कळलं की उधारीवर घेऊन जाणारा असायचा एखादा. हिशोब कागदावर लिहून ठेवायला लावणारा.  आम्ही निघालो की आप्पा त्यांचं सामान मांडायला सुरु करायचा. 

         आठवीत स्वतःची सायकल आल्यावर सायकलवरूनच किराणा सामान आणायला जाणं व्हायचं. तोवर रेनॉल्डच्या पेनचं आकर्षण वाढलं होतं. आणि नव्या वह्यांचंही. आप्पाच्या पोराच्या कोऱ्या करकरीत वह्या, पुस्तकं आणि नवीन दप्तर पाहून मला त्याच्याशी लग्न झालं तर आपण किती श्रीमंत होऊ असं वाटलेलंही आठवतंय. ते डोक्यावर पदर घ्यायचं काही जमायचं नाही हे मात्र आधीच ठरलेलं. शाळा संपली आणि रोजचं रस्त्यावरून होणारं आप्पाचं दर्शन बंद झालं. कधी कधी आईने सांगितलंय म्हणून जायचे तितकंच. ज्युनियर कॉलेजच्या रस्त्यावरच्या नवीन दुकानातल्या ग्रीटिंग कार्ड्स, चंद्रशेखर गोखल्यांच्या 'मी माझा' ने भुरळ घातली. मग आप्पाचं दुकान लहान वाटू लागलं, आणि जुनंही. आता आठवायचा प्रयत्न करतेय तर आप्पाचा आवाजही आठवत नाहीये नीट. कदाचित त्याच्या कमी बोलण्यामुळे असेल. एका वाक्याच्या पुढे आप्पा बोलल्याचं आठवत नाहीये. बारावीच्या सुट्टीत त्याच्या मोठ्या पोरीचं लग्न लावून दिलं त्याने. माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठी. त्यावेळी पहिल्यांदा मी आप्पाला ग्रे कलरच्या सफारी ड्रेसमध्ये पाहिलं. वेगळाच वाटत होता. शाळेच्या ग्राऊंडवर मोठा तंबू लावून जोरात लग्न लावून दिलं.पहिल्यांदाच आप्पाला मी हसताना आणि पोरगी गाडीत बसल्यावर रडतांनाही पाहिलं. चष्मा हातात घेऊन डोळे पुसणारा बाप जास्तच वयस्कर वाटलेला. 

         कॉलेज मग नोकरी आणि परदेशवारी यांत घरच्या फेऱ्या कमी होत गेल्या. त्यातही आप्पाकडे जाणं अजूनच कमी. पाचेक वर्षांपूर्वी पोरांना माझी शाळा दाखवायला गेले. त्यादिवशी माझ्या मनात शाळेसोबत आप्पाचं अस्तित्व किती जोडलेलं होतं हे लक्षात आलं. दुकानावरून जाताना पोराना घेऊन आत गेले. दुकान तेव्हढंच, १५ बाय १२. आप्पाची बैठकीची जागा आता खुर्चीने घेतलेली आणि आप्पाची जागा त्याच्या पोराने. पोटावर घट्ट बसलेला शर्ट सरळ करत तो खुर्चीतून उठला आणि त्यानं पोरांकडे बघत विचारलं 'काय पायजे?.त्याच्या तोंडातला गुटख्याचा वास आल्यावर जाणवलं, आप्पा हे असलं कुठलंच व्यसन नव्हतं. वरचा फोटो मात्र तोच होता. मीही फोटोतल्या लक्ष्मीकडे बघून ओळखीचं हसले. पोरं कुठलं चॉकलेट घ्यायचं हे ठरवत असताना मी दुकानावर नजर फिरवली आणि वाटलं आप्पाला आयुष्यात काही Goal नसतील का? या दुकानाच्या मागे त्याचं घर होत. मी तिथे कधीच पाय ठेवला नव्हता. त्या दोन खोल्यांच्या चार झाल्या असतील का? या पोराची सून तिच्या सासूसारखाच पदर घेत असेल का डोक्यावर? पोरांनी एकेक चॉकलेट निवडलं आणि ते विकत घेऊन निघणार इतक्यात आप्पा आला. १० वर्षांत त्याचे केस अजून विरळ आणि सफेद झाले असतील इतकाच काय तो फरक. त्याने एका बरणीतली छोटी आवळा सुपारीची पुडी काढून माझ्या हातात दिली आणि बहुतेक हसला. पोरांची नाव काय, तू काय करतेस, कुठे असतेस वगैरे विचारण्याच्या भानगडीत तो पडला नाही. मीही पुडीतला एक तुकडा तोंडात टाकून गेल्या ३०-३५ वर्षाच्या आठवणी चघळत चालत राहिले. तेव्हाच काय ते मी आप्पाला शेवटचं पाहिलेलं. 

        आज त्या कोपऱ्यावरच्या वासाने त्याची आठवण करून दिली. फोन केला की आईला विचारायला हवं कसा आहे आप्पा. 

विद्या भुतकर. 

(काल्पनिक व्यक्तिचित्रण) 

Sunday, February 14, 2021

कोविड डायरीज

      चार खोल्या, चार माणसं. किती अवघड असू शकतं हे? बरंच. गुरुवार सकाळी अकराची वेळ, कॉल महत्वाचा. मी बोलणं गरजेचं, फोन म्यूट ठेवणं हा ऑप्शन नाहीच. मागून "दिल चाहता है" मधल्या ऑपेरा सिंगर सारखा जोरजोरात, एकतारेतला आवाज घरच्या दुसऱ्या कोपऱ्यातून येतो. सान्वीचा 'कोरस' चा क्लास! मागच्या तीन वर्षातल्या अनुभवातून मला हे कळलंय की माझ्यासारखाच लेकीकडेही संगीत आणि वाद्याचा कान/ गुण नाहीच. त्यामुळे कुठल्याही वाद्यात न पडता सरळ "कोरस घे" असं सांगितलं होतं. काय गळा फाडायचा ते होऊन जाऊ दे. पण मला काय माहित हे माझ्याच अंगलट येणार होतं? बरं, क्लास चालू आहे म्हणून हेडफोन लावलेत असंही नाही. तिच्यासोबत बाकी १५ पोरं कोकलत असतांना हा माझा महत्वाचा कॉल चालू असतो. तिचा क्लास संपला म्हणून जरा हुश्श करावं तर , शेजारच्या रूममधून स्वनिकचा 'रेकॉर्डर' म्हणजे 'बासरी' सारख्या वाद्याचा आवाज. तिथे त्या बासरीतून फुंकलेल्या हवेचा आवाज. :) शेवटी मी मिटिंग मध्ये म्हटलंच,"माझ्या आवाजाला बॅकग्राऊंड देताहेत पोरं". मग माझ्यासोबत बाकीचे चार लोकंही हसले. :) ती वेळ टळून गेली. 
        
        तर हे असं सोमवार ते शुक्रवार, सकाळी ८ ते संध्याकाळी ५. ३० च्या दरम्यान घरात नुसता गोंधळ चालू असतो. एकाच मजल्यावर चार निरनिराळ्या खोल्यात असूनही कामाच्या वेळेत होणारे गोंधळ अटळ झालेत सध्या. :) नवरा त्याच्या ऑफिसमध्ये कुणाशीतरी जोरजोरात हसत बोलत असतो, तर कधी सिम्बा(आमचा कुत्रा) बोअर झालं म्हणून वर येऊन आमच्यावर भुंकत राहतो. अर्थात मागून भूंकण्याचा आवाज येणारी मी एकटीच नाही त्यामुळे ते बरंय. मी परवा फोनवर बोलत असताना लेक चहा देऊन गेली. (असे सुखाचे क्षणही येतात कधी कधी). पण जाताना माझ्या प्लेटमधला शेवटचा चिप्सचा तुकडा घेत होती. मी समोरच्या माणसाशी बोलत तिच्या हातातून तो शेवटचा तुकडा काढून घेण्यासाठी मारामारी करत होते. :) (हो, असा माझ्या ताटातून घास घेणं हे पाप आहे !) :) कधी स्वनिक येऊन तोंडासमोर फोन धरुन पासवर्ड टाक म्हणून मागे लागलेला असतो. कधी जेवायच्या वेळी पटकन भाजी परतून जागेवर येऊन मेसेंजरवर कुणाला तरी उत्तर द्यायचं असतं. नुसती तारांबळ. 

         गेल्या वर्षी जुलै मध्ये सिम्बा घरी आला. तेव्हा तो तीन महिन्यांचाही नव्हता. पुढच्या दोन महिन्यांत त्याला आमचा इतका लळा लागलेला. आजही नवरा, पोरं बाहेर गेली कुठे की हा घरात बसून रडायला लागतो. असंच एक दिवस नवरा पोरांना डेंटिस्टकडे घेऊन गेला होता. तो बाहेर पडला की माझ्या एका महत्वाचा कॉल चालू असतानाच सिम्बाची रडारड होणार हे माहित होतं. मी आपली गप्प माझ्या रुममधे कॉल सुरु केला. १५ मिनिटं झाली तरी सिम्बाचं रडणं थांबेना. शेवटी मी लॅपटॉप हातात घेतला,कॉल म्यूट करुन सिम्बाला वर बोलावलं, तो काही येईना. खाली गेले, म्हटलं याला शु करायचीय का. म्हणून एका हातात लॅपटॉप घेऊन, दुसऱ्या हातात त्याची दोरी पकडून, त्याला बाहेर घेऊन गेले. त्याला शु वगैरे काही करायची नव्हतीच. मी लॅपटॉप वर कानाला हेडफोन लावलेलेच. त्याला परत घरात आणलं, कॉल स्पीकर वर लावला. एका हातात लॅपटॉप, एका हातात त्याला उचलून घेऊन माझ्या डेस्कजवळ गेले. पण त्याला खालीच बसायचं होतं पोरांची वाट बघत. शेवटी मी त्याचा नाद सोडून दिला, आणि दार लावून कॉल पूर्ण केला. 
         एकदा भारतातून एक टीममेट रात्रीच्या वेळी मीटिंगमध्ये बोलत होती. मागून तिच्या मुलीचा रडण्याचा आवाज येत होता. मलाही अस्वस्थ वाटत होतं ते ऐकून. थोडा वेळ तिचा कॉल म्यूट झाला. तिची वाट बघत असताना आमची प्रॉडक्ट मॅनेजर म्हणाली,"बहुतेक तिला तिच्या बाळाला घ्यायची गरज आहे. आपण तिच्याशिवायच सुरु ठेवू जरा वेळ." तिचं हे बोलणं ऐकून मला बरं वाटलं. तिच्या मानाने माझं बरंच म्हणायचं. 

         या सगळ्यांपेक्षा मोठा किस्सा झाला तो म्हणजे माझा नवीन जॉब सुरु झाला तेंव्हा. मी या नोकरीत कधी कंपनीत गेलेच नाही. रिमोट जॉइनिंग होतं. सर्व वस्तू, लॅपटॉप वगैरे घरीच आल्या होत्या. सोमवारी सकाळी मी आवरुन पहिला दिवस सुरु केला. नवरा, पोरं सर्वांना सांगितलं होतं की गोंधळ करु नका. पण हे सांगायला विसरले की मी व्हिडीओ कॉल करणार होते. तर मॅनेजर सोबत कॉल चालू असताना, नवरा रुममधे आला. त्याला सिम्बाला बाहेर न्यायचं होतं. त्यासाठी टीशर्ट हवा होता. मी नवीन बॉसशी बोलतेय आणि मागे दारात बनियन, शॉर्ट घातलेला नवरा. काय बोलावं कळेना. नवराही थांबून गेला. बरं शर्ट तर हवा होता. कपाट उघडणार कसं? माझ्या मागे व्हिडीओ मध्ये कपाट दिसत होतं. नवरा तसाच बाजूने रूमच्या कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. तिथे गादीवर एक शर्ट दिसत होता पण तो घालणार कसा? शेवटी यांत काही करता येणार नाही म्हणून तो आल्या रस्त्याने तसाच परत गेला. तेव्हापासून व्हिडीओ कॉल म्हटलं की शॉर्ट आणि बनियन घातलेला नवरा आणि समोर लॅपटॉपवरचा मॅनेजरच आठवतो. :) आता तर व्हिडीओ सुरु करायचा म्हटलं की मी दाराला कडीच लावून टाकते. :) 

          बाकी छोटे मोठे किस्से तर होतंच असतात. पोरांचे क्लास चालू असताना मी मोठ्याने ओरडतेय म्हणून त्यांचे शिक्षक त्यांना म्यूट करतात, नवऱ्याचा महत्वाचा फोन चालू असताना त्याचा फोन सान्वीच्या हेडफोनला कनेक्ट होणं, मी घरी आईशी बोलत असताना मागे काय गोंधळ चाललाय म्हणून स्वनिकला त्याच्या शिक्षकांनी म्यूट करणं, घर साफ करताना व्याकयूम क्लिनरचा आवाज, मी कामाचं बोलत असताना इलेकट्रीशियनने सरळ फ्यूज बंद करुन नेट बंद करणे या सगळ्या गोंधळातूनही चाललोय. 
        कधी वाटतं हे सगळं कधी संपणार? सगळे आपापल्या जागेवर कधी परतणार? पण तोवर हे दिवस कायमचे लक्षात राहतील. तुमच्याकडेही होतात का हे असे किस्से?

विद्या भुतकर. 
         

Tuesday, November 24, 2020

कोथिंबीर चिरणे: एक कला

         दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला. म्हणजे तसे दुपारीच जेवणानंतर दोन लाडू, तीन वाजता तिखट शंकरपाळी आणि लोणचं , चहानंतर तिखट हवं म्हणून चकली वगैरे झाली. मग कंटाळा आला. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणाला तिखट जाळ चिकन रस्सा बनवायचं ठरवलं. चिकन बनवून झालं. म्हटलं नवऱ्याने ताजी कोथिंबीर आणलीय ती चिरून टाकावी वरुन. कोथिंम्बीर चिरायला घेतली आणि नेहमीचा विचार परत डोक्यात आला. तर प्रश्न असा की, 'तुम्हाला छान कोथिंबीर चिरता येते का?'. बरं, कोथिंबीर चिरतात, कापत नाहीत. गळा कापतात. :) असं नवऱ्याला ऐकवूनही झालंय. तर तुम्हाला छान कोथिंबीर चिरता येते का? मला येत नाही. कितीही ताजी, कोवळी जुडी आणली तरी ती पटकन धुवून चिरेपर्यंत ती ओली असल्याने त्यावर काळे वण उठतात.  नवऱ्याला चीर म्हणावं तर त्याच्या हातून तर तिचा खूनच बाकी असतो. 
         पण अनेकांकडे मी छान धुवून, सुकलेली, एकसारखी चिरलेली पानं भाजीवर पाहते तेंव्हा मला फार मत्सर वाटतो. खिचडीवर, ढोकळ्याच्या फोडणीतली, सुरळीच्या वडीवरची, मसालेभातावरची कोथिंबीर पाहिली की किती छान वाटतं. पण कदाचित इंग्लिश मध्ये म्हणतात तसं, I am not a कोथिंबीर person. मुळात ती कला माझ्यात नसावीच. कारण अनेक वर्षं तर आणलेली कोथिंबीर वाया जाईपर्यंत फ्रिजमध्ये तशीच राहायची. मी कधीकधी वाया जाऊ नये म्हणून खोबरं- कोथिंबीरचं वाटण करुन ठेवायचे. तरीही कधी वेळेला पोह्यांवर पेरायला कोथिंबीर आहे असं झालं नाही. आणि असली तरी ते खाल्ल्यानंतर माझं लक्षात येई की अरे कोथिंबीर राहिलीच. अगदी काल कढीवरही राहूनच गेली. 
        एकूणच माझ्या आवड आणि आळस या दोन्ही मध्ये तडजोड म्हणून मी मागच्या वर्षी, नवीन वर्षाचा संकल्प केला की यावर्षी कमीत कमी कोथिंबीर वाया घालवायची. माझ्या संकल्पासाठी नवऱ्यानेच जुडी आणली की त्यातलं पाणी उडेपर्यंत कागदावर पसरुन ठेवायला सुरुवात केली. मग त्यानेच तिचे देठही खुडून छान डब्यातही ठेवली. माझं काम फक्त वेळेत वापरायचं. :) (असो आईही म्हणतेच की फार लाडावलेय मी.) तर एकूण या संकल्पाचा या वर्षी कोविड मध्ये फायदा झाला. जवळजवळ तीन आठवडे वाया न घालवता कोथिंबीर वापरली मी!! आहे कुठं? त्याची पुढची पायरी म्हणजे ही कोथिंबीर चिरण्याची कला. ती कधी शिकणार काय माहित? कदाचित त्यासाठी सुगरणच असायला हवं. तुमच्याकडे टिप्स असतील तर त्याही सांगा. 
         तर प्रत्येकवेळी कोथिंबीर चिरताना हे विचार डोक्यात येत राहतात. आज लिहूनच टाकले. कधी कधी वाटतं आयुष्य असल्या फुटकळ विचारातच जायचं. असो. :) आज चिकनवर मस्त पेरलीय कोथिंबीर. खाऊन घेते. :) 

विद्या भुतकर. 


Wednesday, July 08, 2020

ऑनलाईन शाळा आणि मी

आज पहाटे जाग आली आणि परत झोप लागेना. असे दिवस माझ्या आयुष्यात विरळच. :) बरेच दिवस झाले लिहायचं होतं पण जमलं नाही. म्हटलं आता लिहीत बसावं. सकाळच्या शांततेत लिहीत बसण्यात एक वेगळाच आनंद आहे. 

तर भारतात आता शाळा सुरु झाल्या आणि आमच्या संपल्या. सर्वांकडून त्यांचे ऑनलाईन शाळेचे अनुभव ऐकत होते. म्हटलं आपलेही लिहावे. मी एक त्रासदायक आई आहे असं मला वाटतं. पोरांची शाळेत असताना थोडीफार सुटका व्हायची तीही आता नाही. :) काही महिन्यांपूर्वी मी एक पोस्ट लिहिली होती की लॉकडाऊन मध्ये सुरुवातीलाच मी एक वेळापत्रक तयार केलं होतं पोरांसाठी. अगदी शाळेत असतं ना तसंच. पण ते फार काळ टिकलं नाही. आमच्या इथे ऑनलाईन शाळा अशी नव्हतीच. फक्त आठवड्यातून वर्गांची दोन किंवा तीनदा मीटिंग. बाकी सर्व असाईनमेंट होत्या. दोन पोरांच्या बाबतीत निरनिराळे अनुभव आले. सान्वीची पाचवी होती आणि स्वनिक दुसरीला. 

सान्वीला बऱ्यापैकी अभ्यास दिलेला होता पण ती मोठी असल्याने तिला सांगून तिने ऐकलंय असं होत नव्हतं. मग मी ठरवलं की मागे लागायचं नाही. पहिल्या आठवड्यात तिने टाळाटाळ केली. मग शेवटचे तीन दिवस संध्याकाळी उशिरा अभ्यास करत बसली. त्यामुळे तिला आपण खूप काम करतोय असं वाटत होतं. ( हे मोठ्यांच्या बाबतीतही होतं , घरुन काम करत असल्याने दुपारी जरा रखडलं की रात्री उगाच जागरण होतं आणि दिवसभर आपण ऑफिसचं कामच करतोय असं वाटू लागतं. )

मग दुसऱ्या आठवड्यात मी तिला सांगितलं की दुपारी ४ नंतर शाळा नसते त्यामुळे जो काही अभ्यास आहे तो ४ च्या आधी करायचा. ४ नंतर लॅपटॉप मिळणार नाही. आता मी इतकंच सांगून सोडून दिलं. आई मागे लागत नाहीये म्हटल्यावर तीही निवांत. असे चार दिवस गेले आणि तिला एकदम जाणवलं की खूप काम बाकी आहे. तिने मागूनही मग चार नंतर लॅपटॉप दिला नाही. शेवटचे दोन दिवस फार घाई झाली तिची. 

तिसऱ्या आठवड्यात तिला कळलं की सुरुवातीपासूनच कामाला लागलं पाहिजे. म्हणून तिने स्वतःच यादी करुन वेळेत होमवर्क करायला सुरुवात केली. पण अर्थात त्यातही थोडं बाकी राहिलंच. आणि आता दुपारी चार नंतर लॅपटॉप मिळणार नाही असं सांगितलं होतं. त्यामुळे शुक्रवारी २-३ असाइनमेंट बाकी असतानाही तिने सोडून दिलं. म्हटलं, "असं चालणार नाही. जे काही बाकी आहे ते शुक्रवारी उशिरापर्यंत बसून करावं लागेल. शुक्रवारी movie night होणार नाही."

एकूण चौथ्या आठवड्यापासून सर्व रांगेला लागलं. सोमवार आला की ती स्वतःच कामाची यादी करू लागली आणि शुक्रवारी दुपारच्या आत काम कसं संपेल याचं स्वतःच प्लांनिंग करु लागली. मोठ्या मुलांना त्यांच्या कामाची जबाबदारी आली की ऑनलाईन शाळा जरा सोपी जाते. 

स्वनिकच्या बाबतीत मात्र हे पाळणं अवघड होतं. एरवी शाळेत स्वतःहून सहभाग घेणारा मुलगा पण इथे त्याला काही मोवीवेशन नाहीये असं वाटत होतं. असाइनमेंट पूर्ण झाल्यावर टीचर कडून एखादी ओळ कमेंट यायची तितकीच. त्यामुळे बरेचदा मीच त्याच्या मागे लागून ऍक्टिव्हिटी पूर्ण करुन घेतल्या. त्यात निदान २० मिनिटं वाचन २० मिनिटं गणित आणि २० मिनिट लिखाण इतकं होतं. बाकी टाईमपास असाइनमेंट होत्या ज्या करायला मी मध्ये मध्ये मदत केली. फक्त एक नियम पाळला की त्यालाही ४ नंतर लॅपटॉप नाही. कधी कधी मी उगाच सर्व अभ्यास पूर्ण झाला पाहिजे असा हट्टही सोडून दिला. दुसरी तर आहे. एखादी असाइनमेंट राहिली तर जाऊ दे. नाही का? (त्यावरुन शाळेतून मेल आली ही गोष्ट निराळी, पण चालतंय की कधीतरी. ) तर हे असं अभ्यासाचं. 

दुसरी गोष्ट म्हणजे मुलांचा स्क्रीन टाईम वाढलाय यावर बाकी लोकांशी चर्चा होत होती. मला स्क्रीन टाईम पेक्षा त्यांचं posture कसं आहे याची जास्त काळजी वाटते. शाळेत टेबलची उंची कमी असते. मुलांसाठी योग्य असते. आणि ते बसतानाही ताठ बसलं जातं . घरात प्रत्येकवेळी ते टेबलपाशी बसतातच असं नाही. मुलं लॅपटॉप घेऊन गादीवर बसली की मी अनेकदा त्यांना पाठीच्या मागे उशी लावून दिलीय किंवा मांडीवर उशी दिलीय लॅपटॉप ठेवायला. म्हणजे मान जास्त वाकली जात नाही. स्वनिक डाईनिंग टेबल बसत असेल तर त्याची उंची कमी पडते. त्यामुळे खांदे उंच करुन टाईप करावं लागतं. तर त्याला बसायला सीटखाली अजून एक उशी दिलीय. सोफ्यावर वाकून बसले की 'सरळ बस' म्हणून आठवण करुन देते. लॅपटॉप नसेल आणि फोनवर असाइनमेंट बघत असाल तर फोनकडे फार वेळ वाकून बघायला लागत नाहीये ना याकडे लक्ष द्यायला लागत. अनेकदा टेबलची उंची जास्त असते. तेंव्हा पाव बराच वेळ लटकत राहतात. तेव्हा त्यांच्या पायाखाली स्टूल किंवा काहीतरी देणं आवश्यक आहे. मला वाटतं या गोष्टींकडे सतत लक्ष देणंराहणं गरजेचं आहे. 

दिवसा शाळेच्या वेळात टीव्ही नाही हे सांगितलं होतं. त्यामुळे टीव्हीवरून वाद जरा कमी झाले. या सगळ्यांपेक्षा महत्वाचं म्हणजे दुपारी जेवण झाल्यावर आणि संध्याकाळी जरावेळ हालचाल करायला सांगत होते. बरेचदा ते दारातच सायकल चालवत बसायचे. काही ना काही व्यायाम झालाच पाहिजे ना. :) असो. पुढचे काही महिने हे असंच राहणार आहे. त्यामुळे शक्यतो एक रुटीन राहिलेलं चांगलं. कधी कधी फार वैताग येतो, थकायला होतं, पण सध्या काही पर्याय नाही. आमच्याकडे  सुट्टी असल्याने निवांत आहे. बाकी भारतात सर्व आई-बाबांना ऑल द बेस्ट. :) 

विद्या भुतकर. 

Sunday, May 03, 2020

नक्षी

आज दुपारी छान ऊन पडलेलं म्हणून आम्ही दोघं चकरा मारत होतो. घराजवळ काही रंगीत रानफुलं दिसतात. दगडांवर उगवलेली. त्यांचे रंग फार आवडतात मला. आज त्यांच्याकडे पाहताना मला आठवलं मी शाळेत असताना निरनिराळी फुलं, पाकळ्या, पानं वही-पुस्तकांत ठेवायचे. निरनिराळ्या गुलाबांच्या पाकळ्या, झेनियाची फुलं, वगैरे. अनेकदा त्या सगळ्यांची पुस्तकांत इतकी गर्दी व्हायची की दर चार पानांआड काही ना काही असायचंच. त्यामुळे एक पुस्तक फुगून जाड झालेलं आठवतंय. बरेचदा मग मैत्रिणीसोबत काही पाकळ्यांची, फुलांची अदलाबदल करायचो. 
नवऱ्याला त्याबद्दल सांगताना तो म्हणे,"त्यांचं करायचा काय?". 
मलाही तोच प्रश्न पडला आणि एकदम आठवलं, त्याची ग्रीटिंग्ज बनवायची होती मला. एखादं केल्याचं आठवतंय. पण छान पाकळ्या एकमेकांवर नीट डिंकाने जोडून त्यांचं फूल, मग पानं वगैरे लावून बनवलेलं ग्रीटिंग. त्यालाही मग आठवलं,"हो, आम्ही पिंपळाचं पान ठेवायचो. वडाचं वगैरे मोठं पान असलं की मस्त जाळी तयार होते थोड्या दिवसांनी." 
म्हटलं,"हो मग त्या जाळीवरुन वॉटर कलरने रंग लावून हलकेच ते जाळीदार पान उचललं की सुंदर चित्र तयार होतं कागदावर." 
हे कविता, गाण्यांमध्ये वगैरे म्हणतात ना 'पुस्तकात जपलेलं फूल', वगैरे. प्रेमात ते काही केलं नाही पण त्यापेक्षा शाळेतल्या त्या फुलं, पाकळ्या जपण्याच्या आठवणी जास्त प्रिय वाटल्या. आजकाल करतं का कुणी असं? माझ्या पोरांना तरी नाही माहित हे सर्व. म्हणून मग घराजवळची काही रंगीत फुलं आणली आणि एका जाड, जड पुस्तकात ठेवली. कधी त्याची गुळगुळीत, नाजूक, सुंदर नक्षी बनते बघू. :) सान्वीला कळत नव्हतं आई काय करतेय. तिला ती थोड्या दिवसांनी दाखवायची आहेत. 

विद्या भुतकर. 


Wednesday, April 29, 2020

डिप्लोमे From युट्यूब युनिव्हर्सिटी

      मागच्याच आठवड्यात आमचं पावपुराण ऐकवलं. पण निरनिराळे पदार्थ बनवण्यात फेल होणे सोडून बाकीचीही कामं होतीच की. त्यात सुडोकु शिकणे आणि ते सोडवताना झोप लागल्यावर दोन तासापेक्षा जास्त न झोपणे, कॅरम खेळताना पोरांसमोर शायनींग मारणे, टिव्हीवर एकेका सिरियलीचा फडशा पाडणे अशी महत्वाची कामेही होतीच. पण या सगळ्या गोष्टीही किती करणार ना? त्यातल्या त्यात शनिवार, रविवारी अजूनच बोअर व्हायला होतं. 
थोड्या दिवसांपूर्वी एक दिवस स्वनिक म्हणाला,"मला सारखं काहीतरी कानात आहे असं वाटतंय. आणि प्रत्येक वेळी हात लावला की कळतं की माझे केसच आहेत ते." 
त्याचे कल्ले ८० च्या दशकातल्या हिरोसारखे झाले होते. मग म्हटलं, चला कात्रीने तेव्हढेच कापून टाकू. मागे एकदा बाबाने घरी केस कापण्याचा प्रकार केला होता, त्याचा त्याने धसका घेतला होता. त्यामुळे मीच ते काम पार पाडलं. 
         पण इतक्यातच थांबलो तर कसं चालेल ना? युट्यूब युनिव्हर्सिटीतून एकेक डिप्लोमे मिळवायचं ठरवलं. रोज नवीन काहीतरी शिकायला हवंच ना? पूर्वी कधीतरी नवऱ्याने घरी आणलेलं केस कापायचं किट होतंच.
स्वनिकला म्हटलं, "चल की तुझे केस कापू घरी. तितकेच दोन तास टाईमपास होईल." नवरा तर काय तयारच होता.
आम्ही दोघेही मागे लागलोय म्हटल्यावर तो बिचारा पळून बेडखाली लपून बसला. 
मी जरा प्रेमाने त्याला म्हटलं, "हे बघ किती दिवस दुकानं बंद असतील माहित नाही. परत अजून वाढले तर नीट कापताही येणार नाहीत. त्यापेक्षा आताच करु." शेवटी तो कसाबसा तयार झाला.
        मी आणि नवरा लगेच टीव्ही वरच युट्यूब लावून नीट सर्व व्हिडीओ बघायला लागलो. एका क्षणाला नवऱ्याचा जोश इतका अनावर झाला की त्याने व्हिडीओ पूर्ण व्हायच्या आतच बाथरुममध्ये सेटअप लावायला सुरुवात केली. मी मात्र तग धरुन पूर्ण व्हिडीओ पाहिला. आपलं असंच असतं. तोवर नवऱ्याने बाथरुममध्ये पूर्ण सेटअप  करुन ठेवला. पोरगं बिचारं घाबरुन स्टुलावर बसलं. 
        (तर प्रोसेस अशी की प्रत्येक कटरला वेगवेगळे नंबर. जितका छोटा नंबर तितके बारीक केस कापले जाणार. अर्थात हे कदाचित सर्वांना माहित असेल. मला पहिल्यांदाच कळलं.) यामध्ये दोन अप्रोच होते. एक बॉटम -अप म्हणजे, मागचे केस मशीनच्या नंबर १,२,५ ने कापत जायचं, बाजूचे ही त्या त्या लेव्हलच्या नुसार कापायचे आणि वरचे कात्रीने थोडे मोठे ठेवून कापायचे. कानाच्या बाजूचे वगैरे वेगळ्या नंबरच्या मशीनने. दुसरा अप्रोच म्हणजे टॉप-डाऊन. वरुन मोठ्या नंबरचे मशीन फिरवून खाली बारीक करत आणायचं. आणि मग खालचे बारीक करायचे. आम्ही पाहिलेल्या व्हिडीओ मध्ये मुळातच अप्रोच वेगवेगळे होते. त्यामुळे बराच वेळ कुठून सुरुवात करायची यावरच वाद झाला. 
आता याच्यामध्ये मी आयुष्यात पहिल्यांदाच असं मशीन हातात धरत होते त्यामुळे पोराच्या जीवाची काळजी होतीच. म्हणून मी जरा नमतं घेतलं. (नवऱ्याने हे आधी केलेलं पण त्या भयानक कट बद्दल न बोललेलं बरं.) तर शेवटी आम्ही दोघांनी एकेक बाजू निवडली. नवरा मागचे छोटे छोटे करत वरपर्यंत सरकत होता. दुसऱ्या बाजूने मी. पहिल्या पाच मिनिटांतच स्वनिकने विचारलं,"झालं का?". त्याला दटावून गप्प बसवलं.
           जिथे दोन नंबरचे केस एकत्र येतात तिथले नीट कसे मिक्स करायचे यावर आमचे थोडे वाद झाले. पण अजून वाद झाले तर अंगावरचे केस घेऊन स्वनिक बाहेर पळून गेला असता. म्हणून जसे जमतील तसे कापले. वरचे केस नीट भांग पाडता येतील असे हवे होते. पण नवरा म्हणाला," हे बघ १६ नंबरने कापून घेऊ आणि मग बघू. ". आता मला काय माहित १६ नंबर काय ते? मी आपला फिरवला. तर हे... भराभर सगळे केस छोटे झाले. आता ते पाहून कळलं की यात कात्रीने कापायला काही राहिलं नाहीये. केस कापले गेल्यावर काय बोलणार? दोन तास मारामाऱ्या करुन शेवटी ठीकठाक केस कापले होते. बाथरुमभर बारीक बारीक पडलेले केस. ते गोळा करुन, सर्व साफ होईपर्यंत पुरे झालं. पोराची अंघोळ झाल्यावर चिडचिड करुन झाली की किती बारीक कापलेत वगैरे. टाईमपास झाला आणि शिवाय अजून दोनेक महिने तरी परत केस वाढणार नव्हते. 
         पोरावर प्रयोग झाल्यावर मी जरा कॉन्फिडन्ट झाले होते. त्यामुळे पुढच्याच आठवड्यात परत बोअर झालं.  आणि नवऱ्याचे केस कापू असं ठरवलं. म्हणून परत व्हिडीओ पाहिले. एक दोनदा मी मशीन सुरु केल्यावर नवरा घाबरत होता. 
म्हटलं, नक्की काय प्रॉब्लेम आहे?'. 
तर म्हणे, ' तू चुकून माझ्या भुवया उडवल्यास तर?'. 
मी म्हटलं, 'अरे डोकं कुठे, कपाळ कुठे आणि भुवया कुठे?'. 
        पण तरी त्याला टेन्शन होतंच. माझ्या ओव्हर कॉन्फिडन्सची त्याला जास्त भीती वाटते. मी उत्साहाच्या भरात पाच नंबरने एका बाजूला खालून केस कापायला सुरुवात करुन  कानाच्या वरपर्यंत कापून टाकले आणि एकदम टेन्शन आलं. वर तो पाच नंबर खूपच बारीक वाटत होता. मग परत वादावादी. शेवटी नऊ नंबरने कानापासून वरचे केस कापले. त्यामुळे एका बाजूचे थोडे पाच, बाकी नऊ, मग खाली सात असे करत कापत राहिले. पण तो तेव्हढाच एक बारीक केसांचा पॅच राहिला होता ना? वरचे केस भांग पडल्यावर तो लपतोय ना याची खात्री करुन घेतली आणि मग जरा जिवात जीव आला. पुढच्या महिन्यात त्याचा वाढदिवस आहे. उगाच नेमका तेव्हा असे भयानक कापलेले केस बरे दिसले नसते ना? म्हणून इतकी चिंता. पण सुटलो. बऱ्यापैकी चांगला कट झाला होता. तेही रक्त न सांडता वगैरे. 
          तर असं हे आमचं केशपुराण. माझं एक बरं होतं. भारतातून येतानाच पतंजलीची मेहंदी वगैरे आणलेली असल्याने तशी मी निवांतच होते. काय एकेक गोष्टीचा विचार करायला लागतोय सध्या. नाही का? पण पहिल्या थोड्या दिवसांतच मला कळलं की बाकी काही झालं नाही तरी माझ्या भुवया मात्र लवकरच करिष्मा कपूर आणि मग क्रूरसिंग सारख्या होणार होत्या. मग फोटोंचं काय ना? वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस... आता काय करायचं म्हणून मी घरात सर्वात पहिला तो केस उपटायचा चिमटा शोधून काढला. म्हटलं, फक्त नवीन आलेलेच उपटून काढायचे आहेत ना? सोप्पंय ! 
         मी एक दिवस आरशासमोर उभी राहून एकेक केस उपटायला लागले सुरुवात केली. च्यायला ! पहिल्याच केसाला डोळ्यांत टचकन पाणी आलं. शिवाय कुठला डोळा बंद करुन कुठला उघडायचा हेही पटकन कळत नव्हतं. म्हटलं हे काय खरं नाय. पण हिंमत करुन चार पाच केस काढले. मग ठरवलं रोज इतकंच करायचं. फक्त ४-५ केस. असंही काम काय होतं? एकदा तर एकेक करुन केस काढून माझ्या भुवयांना मधेच टक्कल पडल्याचं स्वप्नही पडलं होतं. तेव्हापासून जरा हाताला आवर घातलाय. बाकी डाव्या डोळ्याला जरा अवघड जातं डाव्या हाताने चिमटा धरुन ओढणे वगैरे. पण जमतंय. सर्वात गंमत म्हणजे, ते उभे राहिलेले, वाढलेले केस कात्रीने कापतात ना, ते आरशात बघून कसं करायचं हे कळत नाही. त्यात डाव्या हाताने कात्री चालतही नाही. आता कधीतरी डाव्या हाताची कात्रीही आणावी म्हणतेय. रोज मी आरशासमोर उभी राहिले की नवरा विचारतो, "झालं का कोरीवकाम?".  त्याला काय माहित, आमच्या शाळेच्या मैत्रिणींच्या ग्रुपचॅट वर किती कौतुक झालं माझ्या भुवयांचं? या सगळ्या आयडिया मी त्या मैत्रिणींनाही दिल्या पण त्या काय ऐकत नाय. म्हटलं तुम्हांला तरी सांगाव्यात. 
         तर हे असं ! पुढच्या दोन महिन्यांत अजून कुठकुठले डिप्लोमे मिळतील सांगेनच तुम्हांला. तुमचेही चालूच असतील की !

विद्या भुतकर.