Friday, December 30, 2016

शेवटची पोस्ट

         या वर्षीची शेवटची पोस्ट. गेले काही दिवस सुट्टी चालू होती, सगळ्याच गोष्टींना. जवळच्या लोकांसोबत राहायचे, खायचे आणि आराम करायचा. ज्यांच्याकडे राहात होतो त्या आम्हाला काडीचेही काम करून देत नव्हत्या. आणि त्यांचे साऊथ इंडियन जेवण तर काय बोलायलाच नको. इडली, डोसा, टॅमरिंड राईस, बिर्याणी, लेमन राईस आणि जे काही त्या बनवतील ते सर्व माझे आणि संदीपचे आवडते पदार्थ आहेत. एरवी ऑफिसच्या कामासाठी होणारी दगदग नाही, पोरांची शाळेची गडबड नाही. एकूण मजा चालू होती. तरीही सारखे काही ना काही काम करायची इच्छा व्हायची. मग कधी पाणीपुरी केली, छोले बनवले, कधी पोळ्या केल्या. त्यात माझे पोट बिघडले. संदीपला म्हटले," बघ कुणी आयते खायला करून घालत आहे तर खाणे माझ्या नशिबात नाही. " :) मला वाटते रोज इतके धावपळ करायची सवय झाली आहे की कुणी जबरदस्ती आराम करायला लावला तरी जमणार नाही अशी परिस्थिती आहे. काही ना काही चाळा लागतोच.
         तेच झाले माझ्या ब्लॉग बद्दलही. मी अगदी ठरवून ब्रेक घेतला होता. बाकी सर्व कामांना सुट्टी आहे तर लिहायलाही सुट्टी म्हणून. पण रोज लिहायची इतकी सवय झाली आहे की सारखे वाटायचे थोडावेळ बसून एखादी पोस्ट लिहावी. लिहिले नाही तरीही पेजवर कुणाचे मेसेज, लाईक्स इ. बघत होतेच. शेवटी काय करायचे म्हणून पेन आणि पेपर घेऊन काहीतरी रेखाटत बसले. तेव्हा माझ्या लक्षात आले की या वर्षात हा ब्लॉग माझ्या रोजच्या आयुष्याचा किती मोठा भाग झाले आहे. त्यात ब्रेक घेणे म्हणजे स्वतःला त्रास देणेच आहे. 
         नेहमीप्रमाणे सर्वच जण या सरत्या वर्षाचा आढावा घेत असतीलच. तसाच माझाही म्हटलं तरी चालेल. :) माझे पोस्ट किती लोक वाचतात माहित नाही. पण पेजवरचे लाईक्स मोजायचे तर निदान १८०० च्या वर लोकांनी एकदा तरी चक्कर मारली आहे. कुणाचे मेसेज किंवा कमेंट आले की छान वाटते, काहीतरी चांगले करत आहे असे वाटते. अनेक पोस्टवर नियमित काही लोकांचे लाईक्स दिसतात त्यावरून ते नियमित माझे पोस्ट वाचतात हेही लक्षात येते. आपण कधीतरी कुणाच्या आयुष्याचा असेही एक भाग होऊ शकतो ही कल्पनाच किती छान वाटते. उत्साहात अनेक गोष्टी मी सुरु करते पण त्यांना नेटाने पुढे नेणे आणि नियमित करत राहणे प्रत्येकवेळी होतेच असे नाही. पण या बाबतीत मात्र ते झाले. अनेकवेळा आग्रहाने छोटी का होईना पोस्ट लिहिली. कधी एखादी कथा लिहिताना रात्री जागलेही, पण नियमित लिहीत राहिले. आणि यासर्वात महत्वाचा भाग होता सर्व वाचकांचा. त्याशिवाय लिहिण्यात मजा नाही. :) 
        पुढच्या वर्षातही सर्वांचे प्रेम, वाचन आणि प्रोत्साहन असेच मिळावे ही अपेक्षा. आणि असेच नियमित लेखन मला करता यावे हा अजून एक संकल्प नवीन वर्षाच्या यादीत मांडला गेला आहे. तुमचेही असेच काही संकल्प असतीलच, त्याबद्दल जरूर सांगा. ते संकल्प पूर्ण करण्यासाठी काय काय करणार आहे हेही सांगा. ते सर्व संकल्प नवीन वर्षात नेटाने पूर्ण होवोत त्यासाठी सर्वांना शुभेच्छा.

Wish you all a very happy new year !! 
         
विद्या भुतकर.

Sunday, December 25, 2016

तुलना

सध्या ख्रिस्तमसच्या सुट्टीसाठी एका जवळच्या मित्रांकडे आलो आहे. ख्रिस्तमसला पोरांसाठी काही गिफ्ट घेण्यासाठी बाहेर पडलो होतो. मग काय ! मीही हात धुवून घेतला. :) मला घड्याळे आवडतात. आता हे म्हणजे फक्त बोलायला. मला काय? साड्या, जीन्स, पॅन्ट, खरे दागिने, खोटे दागिने, चपला सर्व घ्यायला आवडतं. :) पण म्हणायचं म्हणून,"मला घड्याळे घ्यायला आवडतात", आणि २ घेतलीही. एकदम खूष झाले. घरी परत आलो तर मैत्रीण म्हणाली,"अगं माझ्याकडे कूपन्स आहेत. संध्याकाळी जाऊन त्या घड्याळ्यांवर वापरू." मूळ किमतीच्या २०% कमी झाले असते, मग मी अजून खूष.
         संध्याकाळी दुकानात जाऊन ते कूपन वापरलं, तर ती रजिस्टर वरची बाई म्हणाली,"हे चालणार नाहीत घड्याळावर." तिने स्वतःच एका घडाळ्यावर १०% कमी करून दिले आणि आम्ही परत आलो. आता सकाळी मी जितकी खूष होते तितका आनंद मला संध्याकाळी होत नव्हता. उगाच गेले त्या १०% साठी असे वाटले. त्या १०% नी माझा १००% आनंद काढून घेतला.
       मध्ये एकदा एकांनी मला सांगितले,"उन्हाळ्यात कोथिंबीर, काकडी, दोडका अशा भाज्या लावणे एकदम सोपे आहे. "
 मी म्हंटले,"मला ना भाज्यांपेक्षा फुलेच लावायला आवडते."
        बरोबर आहे ना? होतं काय, भाजी लावायची, वाढवायची. मग त्यात कीड लागली की वाईट वाटणार. औषध मारले तरी चालणार नाही. आणि त्याची तुलना बाहेरून विकत आणलेल्या भाज्यांशी होतेच. कुठे ते १ डॉलरचे एक पौंड टोमॅटो आणि कुठे बारीक-मोठे दोन चार टोमॅटो तेही महिनाभर वाट पाहून आलेले. त्यापेक्षा फुले बरी ना? ती येण्याची उत्सुकता तर असतेच. एखादं आलं तरी चालतं आणि बाहेर कितीला मिळेल याची तुलना होत नाही. त्यामुळे या भाज्यांच्या नादाला लागायचेच नाही. फुलणाऱ्या फुलांचा आनंद घ्यायचा.
         असे अनेक अनुभव येतात. प्रत्येकवेळी कशाशी तरी तुलना केली की आपला आनंद कमी होतोच. नवीन गाडी घेतलीय, घर आहे, मुलं आहेत किंवा अजून काही. दुसऱ्यांशी तुलना झाली की दुःख येणारंच. होय ना? वाटणे कदाचित स्वाभाविक असेलही, मनुष्यस्वभावच तो. पण ते वाटतंय याची जाणीव होऊन ते मनातून काढून टाकणं मात्र जमायला हवं. आज ते घड्याळ घेतल्यावरही थोडं वाटलं होतं, थोडा वेळ लागेल डोक्यातून जायला ते २०%. पण एकदा ते हातात घातले की सर्व विसरून जाईल हे नक्की. :)

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, December 19, 2016

खास दोस्त

           वीकेण्डला मित्राकडे गेलो होतो. नोकरीच्या पहिल्या दोन तीन वर्षातले मित्र मैत्रिणी म्हणजे आपल्या कॉलेजच्या मैत्रीसारखेच जवळचे, त्यातलाच हा एक. गेले १०-१२ वर्षं तरी एकमेकांना ओळखत आहोत. शाळा-कॉलेज आणि हे थोडे असे नोकरीत जोडलेले मित्र-मैत्रिणी वेगळेच. त्या त्या काळातले प्रत्येकाचे नाद वेगळे, स्वभाव आणि हट्ट वेगळे. पण सर्व कसं जुळवून घेतलं जातं. कधी एखाद्याची मस्करीही केली जाते. आणि मुख्य म्हणजे आपल्या आयुष्यात मोठ्या उलाढाली होत असतानाचा तो काळ असतो, ज्यात आपला चांगल्या आणि वाईट दोन्हीही काळ त्यांनी पाहिलेला असतो. तर अशाच एका मित्राकडे गेलो होतो. एक दिवस राहिलोही. नुसती 'मजा आली' म्हणण्यापेक्षा अजूनही काहीतरी जाणवलं. त्यावरच ही पोस्ट. 
        एखादी शाळेतली किंवा कॉलेजमधली बिनधास्त मैत्रीण, तिच्या घरी जावं आणि तिला आपल्या छोट्या बाळासाठी जीवापाड काळजी करताना बघावं. कॉलेजात चार वर्षं निर्धास्त वागलेली एखादी, 'चार वाजले गं, निघते मी' म्हणत घाईघाईने वेळेत मुलाला आणायला जाणारी एखादी मैत्रीण.  कधी एखादा मित्र, एकदम प्रेमळ काळजी घेणारा आणि तसेच तितक्याच काळजीने बायकोला आणि मुलाला सांभाळणारा, तर एखादा एकदम धाडशी, मॅनेजर म्हणून रुबाब दाखवणारा आणि घरी येऊन आपल्या इवल्याशा पोराच्या हट्टासाठी 'घोडा घोडा' खेळणारा. किती वेगळी रूपं असतात, आपल्याच मित्र मैत्रिणींची, कधी असे दिसतील अशी अपॆक्षाही नसलेली. 
       तेच उलटही असतं. त्यांच्या छोट्या मुलीत किंवा मुलातही आपल्या मैत्रिणीचं किंवा मित्राचं रूप बघतो. लहानपणापासून नीटनेटक्या असलेल्या मैत्रिणीचा मुलगा तितकंच सुंदर अक्षर काढतो, तर कुणाची कलाकुसर तिच्या मुलीत दिसते. एखाद्याचं खेळाचं वेड दिसतं. एखादा आपल्या मुलाच्या वागण्यावर चिडलेला असताना,  'त्याला काय बोलणार? तुझ्यावरच गेलाय' असं म्हणायलाही किती छान वाटतं. अशावेळी जाणवतं की किती काळ लोटलाय मध्ये आणि सगळंच किती वेगानं बदलत आहे आणि तरीही आपण त्या छोट्या मुलांमध्ये आपल्या अजूनही लहान वाटणाऱ्या मित्राला किंवा मैत्रिणीला शोधत असतो. त्यांची अजूनही तशीच मस्करी करत असतो. असे खास मित्र-मैत्रिणी थोडेच असतात पण ते 'खास' असतात. :) 

विद्या भुतकर.  
 https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
       
       

Thursday, December 15, 2016

थंडीसाठी गरम गरम सूप रेसिपी - ५

          आज सूप आठवड्याची शेवटची पोस्ट. आजचे सूप आहे 'वरण' ! कुणाला वाटेल मी उगाच काहीतरी लिहायचे म्हणून हि पोस्ट टाकत आहे. आणि तसे वाटत असेल तर हीच मानसिकता आपल्याला 'वरण' ची किमंत जाणवू देत नाही. मी थोड्य वर्षांपूर्वी वजन कमी करण्यासाठी वेगवेगळॆ प्रकारचे मेनू ट्राय करत होते ज्या मध्ये जास्त प्रोटीन आणि कमी carb हवे होते. चिकन, अंडी हे सर्व मी खाते पण तरीही ते इतके पुरेसे नसते कारण रोजच्या रोज ते खाण्याची सवय नाहीये. मग उसळी, डाळीचे डोसे हेही करून झालं आणि अजूनही करते. त्यानंतर नंबर होता वरण/आमटी/ सांबर यांचा. त्या डाएटच्या काळात एक गोष्ट चांगली झाली, वरण खायची/प्यायची सवय लागली. आणि ती इतकी चांगली सवय होती की आजही आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी रात्री वरण बनवले जाते. आपल्या रोजच्या जेवणात हे 'सूप' म्हणून इतके छान 'फिट' होते, विशेषतः पंजाबी डाळ तडक्यापेक्षा पातळसर असलेले गरम गरम वरण प्यायची मजा थंडीत जास्त येते. 
         आज वेगळी रेसिपी अशी देणार नाहीये, फक्त मी कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे वरण बनवते ते पर्याय देणार आहे. केवळ एखादा पदार्थ कमी किंवा जास्त घालून त्याच डाळीची चव किती वेगळी होते आणि प्रत्येकवेळी त्या वेगळ्या चवीचा आनंद घ्यायला मला आवडते. मुलांनाही थोडे कमी तिखट असल्यावर ते प्यायला आवडते. केवळ नुसता तूप-मीठ-भात आणि साईडला वरण नुसते प्यायला असा केवळ मुलाना आवडणारा मेनूही कधीतरी होतो. 
साहित्य: तूर डाळीचा त्रास होतो त्यामुळे मी मूग आणि तूर डाळ निम्मी निम्मी घेते. शिवाय मूग डाळीमुळे थोडे एकसारखेही होते. साधारण एक वाटी डाळीत ४ लोकांचे वरण होते. डाळ कुकरला शिजवून घेतल्यावर फक्त फोडणीमध्ये वेगवेगळे पर्याय करून बघते.
पर्याय: 
१. एकदम साधे, मुलांना आवडणारे: तुपात हळद, हिंग मीठ आणि चिमूटभर साखर घालून डाळ आणि पाणी घालणे. आजारी असताना खास करून मुलांना हे नक्की देते. कारण यात मसाले अजिबात नाहीत, कसलेही उग्र वास नाहीत. 
२. फोडणीसाठी तूप घालून ते तापल्यावर, जिरे मोहरी, आले, लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचे तुकडे, हळद, हिंग घालावे. फोडणीत हे सर्व घालून, डाळ घालून जितके पातळ हवे त्याप्रमाणे पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे. वरून कोथिंबीर. 
३. फोडणीसाठी तूप घालून ते तापल्यानंतर त्यात लाल सुक्या मिरच्या, जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता घालावा. लसूण भाजल्यानंतर त्यात एक टोमॅटो घालून तो थोडा शिजू द्यावा. टोमॅटो शिजल्यावर छोटा चमचा लाल तिखट घालावे. त्यात डाळ घालून, हवे तितके पाणी आणि चवीनुसार मीठ घालावे. उकळी आल्यावर गॅस बंद करावा. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. 
४. डाळ-पालक : डाळ शिजवतानाच त्यात मूठभर आक्खे शेंगदाणे घालावेत. फोडणीत तूप, लाल सुक्या मिरच्या, जिरे, भरपूर लसूण घालावा. लसूण भाजल्यानंतर त्यात दोन टोमॅटो घालावे आणि शिजू द्यावे. टोमॅटो शिजल्यावर
त्यात हळद आणि काळा मसाला (किंवा लाल तिखट ) घालून मिक्स करावे. डाळ घालून गरजेप्रमाणे पाणी घालावे. मीठ चवीनुसार. उकळी आल्यावर भात किंवा भाकरीसोबत सर्व्ह करावे. 
५. डाळ-तडका: शिजलेली डाळ एका भांड्यात काढून गॅसवर ठेवावी. त्यात कापलेले टोमॅटो, हळद, मीठ आणि पाणी उकळू द्यावी. छोट्या भांड्यात, तेलात जिरे, मोहरी, लाल मिरच्या, हळद, हिंग, लाल तिखट, कढीपत्ता फोडणी कुरकुरीत होऊ द्यावी. आणि ती फोडणी उकळणाऱ्या डाळीत वरून घालावी. एक उकळी येऊन डाळ बंद करावी.वरून कोथिंबीर घालावी. 
६. सांबार: हे खरेतर वरणच करते फक्त सांबर मसाला घालून आणि चिंचेचा कोळ घालून. त्यात तेलात जिरे,मोहरी, हळद, हिंग, भरपूर कढीपत्ता, लाल मिरच्या फोडणीत घालाव्यात. लसूण घालून खरपूस भाजू द्यावा. दोन टोमॅटो घालून शिजवून घ्यावेत. त्यात सांबर मसाला(कुठलाही ब्रँड) आणि चिंचेचा कोळ घालावा. डाळ घालून, लागेल तितके पाणी व मीठ चवीनुसार. उकळी आल्यावर भातासोबत खावे. 
७. नेहमीची आमटी: फोडणीत जिरे मोहरी कढीपत्ता आणि लसूण घालावा. लसूण भाजल्यावर यात आले-लसूण-खोबरे-कोथिंबीर याची एकत्र बारीक केलेली पेस्ट घालावी. थोडे परतून खोबऱ्याचा खमंग वास येतो. त्यात काळा मसाला एक/दोन चमचे, एक टोमॅटो भाजून घ्यावा. या मिश्रणात डाळ, पाणी व चवीनुसार मीठ घालावे. उकळी आल्यावर कोथिंबीर घालून सर्व करावी. 

         हे सर्व प्रकार कितीही एकसारखे वाटले तरी त्यात थोडा फार फरक आहे. आणि चवीने खाणाऱ्याला तो नक्की कळतो. आणि डाळ-तडका सोडला तर बाकी सर्व प्रकार थोडेसे पातळ आणि तिखट केले तर गरम गरम पिता येतात. डायट करायचा असेल तर, जेवणात सर्वात आधी दोन वाट्या हे वरण प्यावं, म्हणजे बरेच पोट भरते आणि चपाती किंवा भात खाण्याचे प्रमाण कमी होते. 
मी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे केलेले हे डाळीचे प्रकार त्यांच्या बाकी कॉम्बिनेशन सोबत देत आहे. नथिंग बीट्स 'वरण'. :) 




विद्या भुतकर.

Wednesday, December 14, 2016

थंडीसाठी गरम गरम सूप रेसिपी - ४

गेले तीन दिवसांत थोडे 'अंग्रेजी' वाटणारे सूप दिले होते. आज माझे एक आवडते आणि एकदम भारतीय सूपची माहिती देतेय. हे म्हणजे 'डंप इट ऑल' सूप म्हणता येईल किंवा 'रसम' सूप म्हणता येईल. मला कधी तिखट झणझणीत सूप प्यायचे असेल तेव्हा मी हे बनवते.

साहित्य: ३ टोमॅटो
              १ छोटा कांदा
              १ छोटा बटाटा
              २ मोठे गाजर
               ३-४ पाकळ्या लसूण
               १ इंच आले
               फोडणीसाठी तूप, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हळद, हिंग, ४-५ सुक्या लाल मिरच्या
               चवीनुसार मीठ, मिरेपूड
               MTR ब्रँडची रसम पावडर             
               आणि वरून ठेवण्यासाठी कोथिंबीर.
 हवे असल्यास ग्रीन बीन्स, थोडा पालक, सिमला मिर्च किंवा फ्लॉवर सुद्धा वापरता येतो. पण या भाज्यांची चव थोडी उग्र लागते. त्यामुळे हव्या असतील तरी या सर्व भाज्या थोड्याच प्रमाणात घ्यायच्या.

कृती:
            कुकरमध्ये कांदा(साल काढून), बटाटा(साल काढून), टोमॅटो, गाजर सर्व आख्खे घालून(बाकी कुठल्या भाज्या असतील तर त्याही ), साधारण दोन तीन कप पाणी आणि थोडेसे मीठ घालून उकडायला ठेवायच्या. दोनच शिट्ट्या झाल्यावर कुकर बंद करून थोडा वेळ थंड होऊ द्यावा.

भाज्या लवकर शिजतात. कुकर थंड झाल्यावर टोमॅटोचे साल काढून टाकावे. आता सर्व भाज्या कुकरमधीलच थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये प्युरी करून घ्याव्यात.

गॅसवर एक भांडे ठेवून थोडे गरम होऊ द्यावे.
त्यात तूप (किंवा तेल) घालून गरम होऊ द्यावे.
फोडणी घालतो त्याप्रमाणे आधी जिरे मोहरी उडू द्यावी.
४-५ लाल मिरच्या, कढीपत्ता, बारीक केलेलं आलं लसूण पटापट फोडणीत टाकावे.
फोडणी जळत असेल तर गॅस बंद करून हे सर्व घालावे. लसूण आणि आले खरपूस झाल्यावर त्यात हळद, थोडे लाल तिखट आणि १ चमचा रसम पावडर घालावी.

लगेचच प्युरी भांड्यात घालावी. त्यात उरलेले कुकरमधले पाणी घालून, हवे असल्यास अजून पाणी घालावे. हे सूप रसमसारखे पातळ छान लागते. त्यामुळे पाणी थोडे जास्त चालते. सूप उकळी येऊ लागल्यावर त्यात चवीनुसार मीठ आणि मिरेपूड घालावी. मला थोडे आंबट आवडते हे सार सारखे. त्यामुळे थोडा चिंचेचा कोळही घालते. साखर शक्यतो घालत नाही. पण हवी असल्यास दोन चिमट घालू शकता.

उकळी आल्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून सूप सर्व्ह करावे. यात ब्रेड क्रम्स मस्त लागतात. खरेतर मी हे सर्दी झाल्यावर करते. भरपूर मिरेपूड टाकून गरम गरम प्यायचे. सर्दीत मस्त वाटते. हे भारतीय पद्धतीने केल्याने कुठल्याही रोजच्या जेवणासोबत हे बनवू शकतो.या सूपच्या स्टेप्सचे फोटो नाहीयेत त्यामुळे एक फायनल फोटो टाकत आहे फक्त. त्यातही सोबतीला सलाड आणि ब्रेड आहे. पण एरवी भातासोबतही मस्त लागते.

आज हे चौथे सूप आणि उद्या सूप-सिरीज संपेल. :) एन्जॉय !
आजच्या फोटोमध्ये जो ब्रेड आहे आणि सलाड त्याबद्दल पुन्हा कधीतरी. :)

विद्या भुतकर.

Tuesday, December 13, 2016

थंडीसाठी गरम गरम सूप रेसिपी - ३

आज लिहायला थोडा उशीर झाला. ठेचा बनवायचं  काम चालू होतं ना. :) असो. आजचं सूप आहे 'क्रीम ऑफ मश्रूम सूप'. मला स्वतःला मश्रूम आवडत नाहीत त्यामुळे हे सूप अगदी हल्ली हल्ली बनवू लागले तेही मुलांसाठी म्हणून. पण आता आम्हालाही ते आवडतं. मुख्य म्हणजे प्रोसेस एकदम सोपी आहे. अर्थातच यात 'क्रीम' नाही घातले तरी चालते. निदान मला तरी. मी थोडं फार दूध घालते. नको असेल तर नाही घातलं तरी चालतं. यामध्ये मश्रूममुळे प्रोटिन्स भरपूर मिळतात. थोडंसं प्यालं तरी पोट खूप भरतं.

साहित्य:
         २-३ कप पातळ काप केलेले छोट्या आकाराचे मश्रूम. (इथे खूप मोठेही मिळतात, मला ते आवडले नाहीत. )
         १ बटाटा
         १ गोल्डन रंगाचा कांदा
         ४ मोठ्या पाकळ्या लसूण
          १ टे.स्पू. बटर
          ऑलिव्ह ऑइल
           थाईम (या herb मुळे सूपला खास चव येते. त्यामुळे जवळपास मिळत असल्यास नक्की वापरा. नाहीतर इटालियन सिझनिंग चालेल.)
           मीठ, मिरेपूड
           १ चमचा मैदा किंवा गव्हाचे पीठ
           
कृती:
मश्रूम पुसून, कापून घ्यावेत. मी जास्त जाड काप करत नाही. बटाटा आणि कांद्याचे अर्धा इंच आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. लसणाचेही बारीक काप करून घ्यावे. 

कापलेल्या कांदा, बटाटा, लसूण आणि मश्रूम एका भांड्या मध्ये घालून त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल, थाईम (हे नसेल तर इटालियन सिझनिंग), मिरेपूड आणि मीठ घालून घ्यावे.

सर्व मिश्रणाला तेल, मीठ नीट लागल्या नंतर ते एका ट्रे मध्ये घालून ओव्हनमध्ये १८०-२०० डि. सें. तापमानाला अर्धा तास ठेवावे. (ओव्हन नसेल तर हेच मिश्रण थोडे बटर घालून भांड्यात शिजेपर्यंत परतता येते. ) पण ओव्हनमध्ये लसूण खरपूस होतो आणि मश्रूमही. कांद्याचेही पापुद्रे मस्त ब्राऊन होतात.

अर्धा तास ओव्हनमध्ये राहिल्यानंतर हा ट्रे बाहेर काढून घ्यावा. मश्रूम एकदम आकसून आलेले असतील. बटाटे शिजले आहेत की नाही हे तपासून पाहावे.
मिश्रण मिक्क्सरमध्ये प्युरी करून घ्यावे.

एका भांड्यात ऑलिव्ह ऑइल आणि थोडे बटर घालून त्यात चमचाभर मैदा किंवा गव्हाचे पीठ घालावे.
पीठ थोडे भाजून त्यात हवे असल्यास दूध किंवा क्रीम घालू शकतो. मी अर्धा कप दूध घालते. दूध एकसारखे पिठात मिक्स होऊन थोडे घट्ट होते.

या मिश्रणात आता केलेली प्युरी घालावी.

साधारण एक उभा पेला तरी पाणी लागते. तरीही सूप किती घट्ट किंवा पातळ हवे आहे यावर ठरवून पाणी घालावे.
सूप उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

थोडी मिरेपूड आणि मीठ घालून ब्रेकक्रम सोबत सूप सर्व्ह करावे. आम्ही यात वरून भाजलेल्या सूर्यफुलाच्या बिया टाकतो. छान कुरकुरीत लागतात.



विद्या भुतकर.

Monday, December 12, 2016

थंडीसाठी गरम गरम सूप रेसिपी - २

स्वनिकच्या भाषेत आज 'पास्ता सूप' ची रेसिपी देणार आहे. भरपूर भाज्या असलेले हे सूप मस्त लागते. एकदम भारी! त्यात मुख्य म्हणजे एक कुठलेही बीन्स घातल्याने प्रोटिन्सही भरपूर मिळते. नेहमीच्या टोमॅटो सूप पेक्षा वेगळी चव मिळते. इटालियन सूप आहे 'मिनेस्ट्रोन' नावाचे. ते एकच शाकाहारी(?) सूप इथल्या इटालियन रेस्टॉरंट मध्ये मिळायचं जे बऱ्यापैकी भारतीय चवीचं आहे असं आम्हाला वाटायचं. हे सूप बरंचसं त्याच्यासारखं बनतं.. मी भाज्या थोड्या घरात शिल्लक आहे त्याप्रमाणे टाकते आणि तयार पिझ्झा किंवा पास्ता सॉस घालते त्यामुळे जरा त्याला रंग आणि चव चांगली येते.

आणि माझे बरीचशी सूप आम्ही गार्लिक ब्रेड किंवा सॅन्डविच सोबत खातो, त्यामुळे फोटोतही ते तशीच दिसतील. पण थंडीत सूप काय कधीही पिऊ (खाऊ ?) शकतो. :)
    
आज जास्त न बोलता या सूपबद्दल लिहिते:

साहित्य:
२/३ टोमॅटो
१ मध्यम आकाराचा कांदा
१ झुकिनी
लसणाच्या मोठा ३ पाकळ्या
१०-१५ ऑलिव्ह
१-२ गाजर
१ कप राजमा किंवा काळा घेवडा किंवा छोले या पैकी कुठलेही एक बीन्स शिजलेले.
चिकन सूप करायचे असल्यास शिजलेल्या चिकनचे छोटे तुकडे  (चिकन किंवा व्हेजिटेबल स्टॉक हवा असल्यास. मी तो घालत नाही घरी केलेला नसेल तर. )
४ चमचे पिझ्झा किंवा पास्ता सॉस (नसल्यास नुसते इटालियन सिझनिंग आणि एक ज्यादा टोमॅटो चालतो)
ताजे बेसिल असल्यास काही पाने
ऑलिव्ह ऑईल २/३ चमचे (नसल्यास नेहमीचे जेवणाचे तेलही चालते. पण याने चव छान येते. )
मीठ चवीनुसार
लाल मिरच्या ३-४ (मला आवडतात घालायला म्हणून. )
लाल तिखट (तिखट करायचे असल्यास. नाहीतर सॉसचा तिखटपणा पुरेसा असतो. )
काली मिरपूड
कुठल्याही आकाराच्या पास्त्याचे मूठभर तुकडे.

कृती: सर्व भाज्या, कांदा किंवा टोमॅटो कापतो त्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या कापून घ्याव्यात. म्हणजे खाताना तोंडात त्याचे तुकडे येतात. ऑलिव्हच्या चकत्या कापून घ्याव्या. लसूण एकदम बारीक कापून घ्यावा.

एका भांड्यात गरम झल्यावर, ऑलिव्ह ऑइल मध्ये आधी मिरच्या, इटालियन सिझनिंग, बारीक कापलेला लसूण घालावा.
तो लालसर झाला की कांदा परतून घ्यावा. कांदा थोडासा शिजला की टोमॅटो घालून परतावे.
मी यावेळीच मीठ घालते म्हणजे पुढच्या स्टेपला घातलेल्या भाज्याना मिठाची चव लागते.
टोमॅटो पूर्ण शिजायच्या आधी बाकी सर्व भाज्या (गाजर, झुकिनी, ऑलिव्ह) भांड्यात घालावे. थोडे परतून शिजायला झाकून ठेवावे.
पाचच मिनिटात, झाकण काढून त्यात ४ मोठे चमचे पास्ता/पिझ्झा सॉस घालावा. त्या सॉसमध्ये भाज्या परताव्यात. पाच मिनीटात त्यात पाणी घालून उकळी येऊ द्यावी. साधारण दोन कप पाणी घालते. हे सूप पातळ छान लागते त्यामुळे मी जास्त घट्ट करत नाही.
सूप उकळत असतानाच जे कुठले बीन्स शिजवून ठेवले आहेत ते घालावे. मी कधी कॅन मधले राजमा किंवा छोले घालते कपभर. ते नसतील तर काळा घेवडा कुकरमध्ये ४-५ शिट्या घेऊन शिजवून घेते. ते बीन्स घालून सूपला उकळी येऊ द्यावी.
जो कुठला पास्ता घरी असेल त्याचे थोडे तुकडे सूप मध्ये घालावेत. आणि साधारण २-३ मिनिटात सूपचा गॅस बंद करावा. मी गरम सूप मधेच पास्ता शिजू देते.
थोड्या वेळाने कापलेले बेसिल घालून सूप सर्व्ह करावे. आम्ही यात सूर्यफुलाच्या भाजलेल्या खाऱ्या बियाही घालतो, कुरकुरीत लागतात. ब्रेडक्रम ही छान लागतात.


विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, December 11, 2016

थंडीसाठी गरम गरम सूप रेसिपी - १

      मागच्या आठवड्यात 'गोष्ट' लिहायला खूप मजा आली आणि लोकांच्या कमेंट पाहून त्यांना वाचायलाही असं वाटलं. कधी खरंच वाटलं तर त्याचा पुढचाही भाग नक्की लिहीन. पण मागच्या आठवड्याच्या प्रतिसाद आणि प्रोत्साहनासाठी सर्वांचे मनापासून आभार. थँक यू ऑल ! 
       या आठवड्यात फक्त सूपच्या पोस्ट लिहायचा विचार आहे. बाकी, विचार काय चालूच असतात डोक्यात आणि बदलतही. पण गेल्या काही दिवसांत थंडी वाढली आहेच. मागच्या आठवड्यात तर आजारीच पडले होते. त्यामुळे गरम गरम सूप बद्दल लिहितेच एकदाचं म्हणून ठरवून बसले आहे. तरीही ना, हे म्हणजे 'आम्ही सारे खवय्ये' मध्ये ऋतूनुसार, सणानुसार रेसिपी येतात तसे वाटत आहे किंवा बाकी सिरीयल मधल्या फेस्टिव्हल फॅड सारखं. असं अगदी वाटत असूनही 'सूप' हा विषय एकदा निकाली काढते म्हणजे बाकी लिहायला मोकळी. 
       तर गेल्या वर्षभरात जरा दोन चार सूप बनवायला लागले आहे. मुलांनाही ते आवडत आहे प्यायला. सर्दी झाली कि हमखास देते आणि तेही दोघे पितात मस्त. इथे 'पनेरा ब्रेड' नावाच्या एका रेस्टॉरंट मध्ये 'autumn squash soup' मिळतं. तेही फक्त सप्टेंबर पासून फेब्रुवारी-मार्च पर्यंत. मला खूप आवडलं होतं. म्हणून बराच शोध घेतला. अर्थात माझी रेसिपी त्यांच्या पेक्षा वेगळीच होते चवीला आणि त्यातले घटकही, परंतु त्या सूप पासून प्रेरणा मिळाली होती. मुलं याला 'ऑरेंज/येलो सूप' म्हणतात. हे सूप थोडं गोडसर लागतं आणि क्रीमही घालते मी थोडं त्यात. त्यामुळे मुलांना आवडतं. पण तिखट करायचं असेल तर मी त्यात मस्त लाल तिखट आणि गरम मसाला घालते. बाकी रेसिपी मला अगदी तंतोतंत देता येत नाही त्यामुळे अंदाजे घ्यालच. :)

तर माझ्या या सूपची रेसिपी पहा:
साहित्य: butternut squash (मराठी मध्ये काशीफळ म्हणे) १/४ तुकडा. आकाराने छोटे असेल तर अर्धे ( काशीफळ नसेल तर लाल भोपळ्याचा तितकाच एक तुकडा.
           १ yam ( एक रताळे) 
          १  छोटा बटाटा. 
           लसूण पाकळ्या कमी जास्त आवडीनुसार. मला आवडतो त्यामुळे मोठ्या पाकळ्या ५-६ बारीक तुकडे कापून. 
           इटालियन सिझनिंग (फक्त बेसिल, ओरेगनो, काली मिरीही चालेल) 
           ऑलिव्ह ऑईल 
           मीठ, मिरेपूड
           आक्ख्या सुक्या लाल मिरच्या ३-४ 
           भोपळ्याच्या भाजलेल्या खाऱ्या बिया (roasted, salted pumkin seeds)
कृती : सर्व भाज्यांचे साल काढून, धुवून घ्यायचे. काशीफळ/लाल भोपळा जे काही असेल त्याचे अर्ध्या इंच आकाराचे तुकडे, त्याच आकाराचे रताळे (yam ) चे तुकडे, बटाट्याचे थोडे छोटे तुकडे कापून घ्यावे. 
सर्व भाज्या एका भांड्यात घालून त्यात २-३ चमचे ऑलिव्ह ऑइल, इटालियन सिझनिंग, मिरेपूड, मीठ आणि लसणाचे तुकडे घालावेत. सर्व एकत्र हलवून मी ते मिश्रण ओव्हन मध्ये २०० डिग्री सें. ला अर्धा तास ठेवते. माझ्या ओव्हनमध्ये ते लवकर होते. पण ते पुण्यात मायक्रोवेव्ह ओव्हनच्या convection मोड ला ४५मिनिट ठेवून पण  आतून शिजले नाहीत. अशा वेळी मुळात त्याला 'बेक्ड ' किंवा बर्न्ट गार्लिक म्हणजे खरपूस लसूण आणि भाज्यांना जो खरपूस वास येणे पुरेसे आहे. ते झाले असल्यास थोडा वेळ कुकरमध्ये टाकूनही शिजवता येतात. भाज्या शिजल्या कि बाहेर काढून मिक्सर मधून त्याची प्युरी करून घेते. हवे असल्यास मिक्सरमध्ये प्युरी करताना हेव्ही क्रीम घालू शकतो. 
फोडणीसाठी फक्त मी ऑलिव्ह ऑइल मध्ये थोडे इटालियन सिझनिंग, चिली फ्लेक्स (बारीक लाल कुटलेली मिरची?)  मिरेपूड टाकते आणि प्युरी ओतते. हवे तितके पातळ किंवा घट्ट ठेवण्यासाठी तसे पाणी घालते.उकळी आली की गॅस बंद करते. मीठ लागले तर वरून घेते. भाज्या शिजताना ओव्हनमध्ये टाकतानाच मीठ घालते तितके पुरेसे होते. 
हे सूप आम्ही सलाड आणि गार्लिक ब्रेड बरोबर खातो. सूप सर्व्ह करताना वरून भोपळ्याच्या भाजलेल्या खाऱ्या बिया घालते.

टिप्स: सूप हवं तसं गोड किंवा तिखट करण्यासाठी लाल तिखट किंवा गरम मसाला थोडा चालतो. 
 घट्ट किंवा पातळ कसे हवे हा आवडीचा प्रश्न आहे. मला थोडे पातळ आवडते.
 convection ओव्हन मध्ये भाज्या शिजत नसतील पटकन तर त्यांना फक्त वरून भाजून घ्यावे आणि मग कुकरला एक शिटी काढावी. लवकर होतात आणि त्याचा खरपूस खमंग सुवास जात नाही. 

मी काढलेली काही चित्रं देतेय.. कुणाला करायचे असेल आणि प्रश्न असतील तर नक्की विचारा. 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/






Tuesday, December 06, 2016

इष्क मुबारक, दर्द मुबारक .......मस्त मगन

      "सामान सर्व आले नीट. हो ! हो ! आहे सगळं ठीक. श्वेता आहे घरीच. हो तिनेच जेवण बनवलं होतं. तुम्ही काही काळजी करू नका.मी उद्या करते कॉल परत. हो हा फोन नाही चालणार इकडे. तोवर श्वेताचा नंबर लिहून घ्या. हो, जेवून झोपणार आता. बाय, गुड नाईट. " रितू फोनवरून आईला सांगत होती. भारतातून निघतानाच प्रोजेक्टमधल्या मैत्रिणीशी बोलून सर्व ठरवले होते. तिलाही नवीन रूममेट हवी होतीच. हिलाही स्वतःची रूम आणि बाकीही सर्व सेट अप आयताच मिळाल्याने सर्व सोपं झालं होतं. सामान घेऊन घरी आले. घरी फोन केला, आनंदला फोन केला, इथे असणाऱ्या मॅनेजर ला कॉल केला. श्वेताने बनवलेलं जेवण करून ती झोपून गेली. इतक्या प्रवासाने बरीच दमणूक झाली होती.
        दुसऱ्या दिवशी उठली तर रितूला एक प्रकारची शांतता जाणवत होती. भारतात असताना, रोज सकाळी उठलं की रस्त्यावरचे आवाज, दूधवाला, काम करायला येणाऱ्या मावशी, ऑफिसला जायची गडबड, सगळं कसं वेगळंच आणि धावपळीचं असायचं. पण इथे सर्व कसं शांत होतं. चुकून बोलायला गेलं तरी ती शांतता भंग पावेल असं वाटत होतं. आणि त्यात गेल्या काही दिवसांपासून चाललेली गडबड, दमणूक सगळं एकदम थांबलं होतं. तिचा एका पायरीपर्यंतचा प्रवास आतापुरता तरी संपला होता. त्या प्रवासातल्या अनेक गोष्टी मागे सोडून आपण इतक्या दूर आलोय याची जाणीव तिला पहिल्यांदाच होत होती.
         'आनंद' ! किती दिवस झाले त्याच्याशी बोलून, भेटून, त्याला पाहून असं एकदम वाटू लागलं. तसं पाहिलं तर मोजून एक दिवस संपला होता. तिने आपला फोन चालू केला. असाही तो चालू नसल्याने, उगाचच फोटो चाळले. एअरपोर्टवरचे फोटो तिने नीट पाहिलेच नव्हते. आता जाणवलं, त्याने तिने गिफ्ट दिलेला शर्ट घातला होता. छान दिसत होता. 'साधं छान आहे बोलायचंही लक्षात आलं नाही आपल्या' असा विचार करून घड्याळात पाहिले. भारतात रात्रीचे नऊ वाजले होते.तिने श्वेताकडून फोन घेऊन त्याला फोन लावला. कॉल लागला आणि मागून एकदम जोर जोरात आवाज, गोंधळ, हसण्याचे आवाज येत होते.
"हॅलो ! हां बोल गं. नाही नाही सर्व ठीक आहे. आशिषचा बर्थडे होता ना आज. त्याच्यासोबत बाहेर आलोय सगळे. हां, थोड्या वेळाने कर परत कॉल. ऐकू येत नाहीये काही. तू ठीक आहेस ना? हो चालेल, थोड्या वेळाने कर कॉल. पण कर नक्की, मी वाट पाहतोय."
तिने नाईलाजाने फोन ठेवून टाकला. तो मस्त पार्टीत बिझी आहे आणि आपण त्याची उगाच आठवण काढतोय असं तिला वाटून गेलं. पण जाऊ दे ! म्हणत तिने ते विचार झटकले आणि आपलं सामान आवरायला सुरुवात केली. कपडे वगैरे कपाटात लावले. घरातलं सामान लावून घेतलं. श्वेतासोबत गप्पा मारत जेवण बनवलं. रूमवर कित्येक वर्षात जेवण बनवायची वेळच आली नव्हती. त्यामुळे हे असं स्वतः करायला मजा वाटली तिला. जेवताना तिने विचारलं, काय करायचं आज? कुठे बाहेर जायचं का?
श्वेता," अगं हो. प्लॅन होताच जायचा आमचाही. पण तू दमली असशील तर नको म्हणून काही बोलले नाही. तू तयार असशील तर जाऊ मग. "
"जाऊ या ना" म्हणत रितूने तयारी करायला सुरुवात केली.
          गावातच एका ठिकाणी ice sculptures बनवले होते. ते पाहून आठवड्याचे सामान घायचे, बाहेर जेवून घरी परत यायचा बेत होता. थंडीतही छान आवरून रितू बाहेर पडली. श्वेताचे बाकी मित्र-मैत्रिणीही होते. सर्वांसोबत तिने मस्त फोटोही काढून घेतले. श्वेताने तिला भाज्या कुठून घेतो, इंडियन स्टोअर कुठे आहे हे सर्व दाखवलं. रविवार असल्याने सर्व लवकर बंद होणार होतं. त्यामुळे ते जेवायला जाऊन लवकरच घरी परतले. सर्व करताना नव्याची नवलाई तर वाटत होतीच. पण काहीतरी चुकत होतं. जे पाहतोय त्या गमती सांगायला कुणी नाहीये असं वाटत होतं. कदाचित पहिलाच दिवस आहे इथे म्हणून वाटत असेल असा विचार करून तिने ते सर्व मागे सारलं. जेटलॅग मुळे तिला अशीही जाम झोप येत होती. घरी येऊन क्षणभरात रितूची झोप लागली होती.

 ..... 

         सोमवारी सकाळी आनंद उठला तेव्हा त्याला पुन्हा एकदा आठवण झाली. रितुने रात्री कॉल केलाच नाही. आपलंच चुकलं. उगाच बाहेर गेलो. तिच्याशी बोलणं झालं असतं ना? त्याने स्वतःवर चिडचिड करत सकाळची तयारी केली.ऑफिसला पोचून तिला एकदा कॉल करावा का असं सारखं त्याला वाटत होतं .पण  जेटलॅग मुळे ती लवकर झोपली असेल हेही माहित होतं. कसाबसा तो ऑफिसला गेला. तिथे जणू प्रत्येकजण डोळ्यांनी त्याची चौकशी करत होता. त्याच्या उदास असण्याच्या खाणाखुणा शोधत होता. त्यानेही मग लपवण्याचा प्रयत्न सोडून दिला. सकाळची सुरुवातीची कामं झाल्यावर त्याने फेसबुक चेक केलं तर त्याला तिथे रितूला टॅग केलेले २-४ फोटो दिसले. किती गोड दिसत होती ती त्या कपड्यांमध्ये. तिला हे घे म्हणत असताना किती काचकूच केली होती तिने. फोटोना लाईक केलं तरी तिला असे फिरताना बघून त्याला थोडंसं वाईट नक्कीच वाटलं होतं.
        दिवसभर ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, अनेक कारणांनी त्याला तिची आठवण येत राहिलीच. संध्याकाळी कॉल संपवून तो थोडा वेळ तिची ऑनलाईन येण्याची वाट बघत होता. तिने ऑनलाईन आल्यावर लगेच त्याला मेसेज केलाच,"हाय". त्यानेही उत्तर दिले. तिने मग त्याला फोन केला आणि सकाळपर्यंत घडलेल्या सर्व गोष्टींचा एक ओझरता आढावा दिलाच. तिलाही थोडं हायसं वाटलं आणि त्यालाही. आपण उगाच तिच्यावर थोडं का होईना खट्टू झालो याचं त्याला वाईट वाटलं आणि मनोमन तिलाही. तिच्याशी बोलून आपला दिवसाचा शेवट तरी चांगला झाला असं वाटलं. तर तिला आपली सुरुवात छान झाली असं. एकमेकांपासून दूर असल्याची जी भावना होती तीही बरीचशी कमी झाली.
     हळूहळू रितूचे ऑफिस, रूम सर्व सेट अप झाले. फोनही ऑफिसकडून मिळाला. पुढे पुढे मग हे रोजचं रुटीनच झालं होतं. दोघेही आपापल्या सकाळी एकदा बोलत आणि रात्री एकदा. एकमेकांच्या वेळा, जागा,रुटीन चांगलंच माहित झालं होतं त्यांना. कधी ऑफिसच्या कामाबद्दल, कधी मित्रांबद्दल, कधी कुठे फिरून आलेल्या जागांबद्दल. पण एक होतं, रितूंचे ऑफिस तसे नियमित ८-५ असायचे. संध्याकाळी घरी आले की जेवण बनवणे, टीव्ही बघणे फारतर मैत्रिणीशी गप्पा इतकेच काय ते व्हायचे. कित्येक वर्षात संध्याकाळी तिला असा मोकळा वेळ मिळाला नव्हता आणि एकांतही. कातरवेळ म्हणतात ना? ती हीच ! थोड्या दिवसांनी तिला एकटं एकटं वाटू लागलं होतं. आणि अशा वेळी कितीही फोनवर बोललं ना तरी समोर माणूस हवं असतं. अशाच एका संध्याकाळी तिने आनंदला फोन केला.
"काय करतोयस?" जवळ जवळ रडतंच ती बोलली.
तिचा आवाज ऐकून तो उठूनच बसला.
"काय गं? काय झालं? रडतेयस की काय?", त्याने काळजीने विचारलं.
"नाही काही असंच. ", ती पुढे बोलली.
कितीतरी वेळ मग ते दोघे फोन कानाला लावून एकही शब्द न बोलता बसून राहिले. बिचारा आनंद, त्याच्याकडे पहाटेचे ४ वाजले होते. त्याने तिला मग आग्रहाने व्हिडियो चॅट करायला सांगितलं.
तिला समजावलं,"तुला हा अनुभव घ्यायचा होता ना? मग अशी दुःखी होऊन का बसतेस? जा ना फिरायला? गाडी नाहीये, तर ड्राइव्हिंग शिक, गाडी घे, एकटी फिरवयाला शिक. इच्छा खूप असतात आपल्या पण त्या पूर्ण व्हायला लागल्या की अजून हरवल्यासारखं होतं. उगाच एकटं वाटून ज्यासाठी गेलीयेस ते कारणंही विसरलीस?"
ती डोळे पुसत त्याला बोलली,"मला ना तुझ्या परत तिकडे येण्याचं कारण कळायचं नाही. इथे सर्व किती चांगलं आहे तरी तू उगाच परत गेलास असं वाटायचं. आता कळतंय किती एकटं वाटतं इथे."
"असंच काही नाहीये गं. मला माहित होतंच मला काय हवंय. मला कधी ना कधी परत यायचंच होतं त्यामुळे काही वर्षं झाल्यावर मी परत आलो. पण तू तर आताच गेलीयेस तिकडे. उगाच काहीतरी विचार करू नकोस. जा आवर आणि ड्रायव्हिंगची माहिती काढ. ", त्याने तिला हक्काने सांगितले.
पुढचे काही दिवस मग त्यानेच तिला सर्व नियम समजावले. ड्रायव्हिंगसाठी टिप्स दिल्या. तिनेही मग श्वेतासोबत जाऊन गाडीचे लर्निग लायसेन्स, पर्मनंट लायसेन्स घेतले. मोठा सोहळाच होता तो. तिला पुन्हा एकदा नवी दिशा मिळाली होती. कुठलेही स्वप्नं पूर्ण होऊन भागत नाहीच. त्याच्या पुढच्या स्वप्नाकडे जावंच लागतं, नाहीतर मग आयुष्य आहे तिथेच थांबून जातं. लायसेन्स मिळाल्यावर तिला मग अजून नव्या गोष्टींचा, नवं काही जाणून घ्यायचा, शिकायचा नादच लागला.
              आनंदचे आयुष्य मात्र अजूनही तिथेच होते जिथे ती सोडून गेली होती. तिला कितीही प्रोत्साहन दिले तरी त्यालाही एकटं असल्याची जाणीव होतीच. कधीतरी प्रोजेक्ट मध्ये एखादे चांगले काम केल्यावर कौतुकाचे चार शब्द मिळायचे तितकेच काय ते. बाकी सर्व मात्र आहे तिथेच होतं. आणि त्यात घरूनही लग्नाचा आग्रह चालू होताच. आणि होतं काय? तुम्ही एका नात्यात असला ना? त्याला एक नाव असलं की त्याच्यात असलेल्या अपेक्षाही ठरलेल्या असतात. पण त्यांच्या नात्याला नावंही नव्हतं आणि अपेक्षांची ना व्याख्या होती ना मर्यादा होती. बरं आताशी वर्ष होत आलं होतं रितूला परदेशी जाऊन. आता कुठे ती सर्व काम नीट शिकत होती, नव्या गोष्टी करत होती. अशा वेळी तिला परत बोलवायचा स्वार्थीपणा तरी कसा करणार होता तो? तिला योग्य त्या संधी मिळणं हा तिचा हक्कच होता. आपण तो कसा हिरावून घेणार? कितीतरी वेळा त्याने प्रयत्न केला तरीही तिला विचारण्याचा.
           एक दिवस त्याने सहज म्हणून विषय काढून तिला विचारलंही,"काय स्टेटस आहे सध्या प्रोजेक्टचं?".
ती,"हा चालू आहे रे. तो काही अजून ५-१० वर्षं तरी संपत नाहीये. बघू काय म्हणतो मॅनेजर. त्याला वाटत होतं मी अजून १-२ वर्ष इथे राहावं असं. "
तिने असं बोलल्यावर त्याने मग विषयच सोडून दिला.रितू आता तिच्या नव्या विश्वात रमली होती.
    ....... 

           वर्षभर झालंही या सगळ्या गोष्टींना. एक दिवशी रितूची रूममेट श्वेता थोडी टेन्शनमध्येच घरी आली. तिच्या प्रोजेक्टचे काम अचानक संपले आहे म्हणून सांगितले होते. खरंतर तिला अजूनही तिथेच राहायचं होतं. तिचा होणार नवराही जवळपासच असल्याने तिची खरंच वाईट अवस्था झाली होती. नोकरी सोडावी आणि त्याच्याशी लगेच लग्न करून इथेच राहावं की परत भारतात जाऊन व्यवस्थित नोकरी सांभाळूनच थोड्या दिवसांनी लग्न करावं हे तिला कळत नव्हतं. अनेकवेळा तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन येऊन गेला. रितूने तिला समजावलंही,"इतकं करियर चांगलं आहे तर उगाच का सोडतेस? थोडा धीर धर. इतके वर्ष या कंपनीत आहेस. असं सगळं सोडून देऊ नकोस. " तिकडे नवरा म्हणत होता,"तू सोडून दे आता नोकरी. आपण बघू पुढे. नवीन नोकऱ्या मिळतंच राहतील."
शेवटी हो-नाही करत मोठ्या जड मनाने श्वेताने परत भारतात जायचा निर्णय घेतला.. अजून थोडे दिवस नवीन प्रोजेक्ट मिळाला तर परत इकडे येऊ असे तिने ठरवले होते. समजा नाहीच मिळाला प्रोजेक्ट वर्षभरात तर येऊ मग 'डिपेंडेंट व्हिसा'वर अशी मनाची समजूतही काढली.
            श्वेता परत गेली. घर रिकामं झालं. रितूला खायला उठलं. अनेकवेळा तिने आनंदला विचारलंही,"तू का नाही बघत प्रोजेक्ट इकडे एखादा? आपण पण ट्रिप काढू मस्तपैकी इकडे. किती दिवस राहणार आहे तिथे? शिवाय तुझा व्हिसा आहेच. ". तो मात्र तिकडे यायला नकोच म्हणत होता. एकूण काय गाडं अडकलेलंच होतं. तीही मग कामात व्यस्त झाली. एकटी राहिली तरी त्याचीही तिला सवय झाली. रोजची ऑफिसची कामे, बाहेरची थोडीफार करमणूक यातच व्यस्त झाली.
          नाती थांबली ना मग त्याच्यासारखी वाईट नाहीत. रोज तोच 'हाय', तोच 'बाय', तोच 'जेवण झालं  का' चा मेसेज आणि तेच गुड नाईट. कधी कधी मग आपण त्या व्यक्तीत का अडकलोय हेच कळत नाही. पूर्वी वाटणारी गंमत केव्हांच निघून गेलेली असते. मग केवळ तेच जुने क्षण आठवायचे आणि उदास हसून घ्यायचं. पण पुढे काय? नवीन काय? ते मग सर्वच कृत्रिम होऊ लागतं आणि एखाद्या दिवशी नाही केलं तरी काही फरक पडत नाही. नाही केला फोन त्यानेही आणि तिनेही. पुढच्या वेळी केला तेंव्हा थोडेसे भांडलेही. पण त्या भांडणात पण हक्क राहत नाही आणि अर्थही. असेच कित्येक महिने गेलेही.
          श्वेता पुन्हा नोकरी सोडून नवऱ्याकडे आलीही. रितूला तिने हक्काने घरी बोलावलं. एका वीकेण्डला तिला भेटली. तिच्या लग्नातले आनंदचे फोटोही तिने पाहिले. रितूला एकदम त्याची आठवण झाली. तिला भेटल्यावर रितूला आपल्यात असलेल्या कमतरतेची जाणीव झाली. कितीतरी दिवसांत ती अशी मोकळेपणाने हसली नव्हती, बोलली नव्हती. ऑफिसच्या कामात गुंतून गेली होती. इतकी की, तिला श्वेताचा परत यायचा निर्णय फारसा पटलाही नव्हता.
श्वेताला तिने विचारलेही एकटी असताना,"तू कसं काय ठरवलंस परत यायचं? पुढे काय करणार आहेस?".
श्वेता म्हणाली,"अगं, मला कुठलाही निर्णय घाईत घ्यायचा नव्हता. त्यामुळे मी परत गेले. तिथे गेल्यावर जाणवलं की धनूशिवाय  मी राहू शकत नाही. मी मॅनेजरशी बोलले तेव्हा लक्षात आलं की सर्व सहजासहजी होणार नव्हतं. बरीच वाट पाहावी लागली असती. धनू माझ्यासाठी परत आलाही असता, पण मला इकडेच राहायचं होतं. मग म्हटलं नोकरीच्या भरवश्यावर माझं आयुष्य होल्ड वर ठेवू शकत नाही ना? आणि त्याच्यावरच सर्व निर्णय घेऊ शकत नाही. शिवाय माझे करियर काही इथेच संपत नाही. मी काही घरी बसणारी नाहीये त्यामुळे पुढे जे असेल ते बघूच. पण सध्या तरी मला हे हवं होतं आणि मी ते केलं. "

         श्वेताशी बोलल्यावर रितूला लक्षात आलं की आपण विचारही केला नाहीये आपल्याला नक्की काय हवंय. जे चालू आहे तेच करत आहोत. रोज जे क्षण आपण आनंदसोबत घालवायचो ते आपण रुटीन म्हणून गृहीत धरलं ते कधी निसटूनही गेलंते कळलंही नाही. ते थांबवण्याचा काही प्रयत्नही केला नाही. छोट्या छोट्या गोष्टीत खूष होणारे आपण, छोट्या दुःखासाठी रडणारे आपण, इतके कसे निर्जीव झालो? ती किती बदलली आहे याची जाणीव तिला इतक्या दिवसांनी झाली. आपल्याला एखादी व्यक्ती इतकी प्रिय असते, तिच्याशिवाय आपण एकेकाळी क्षणभरही राहू शकत नसतो. पण तीच रुटीन होते आणि मग निसटून गेली तरी पत्ताही लागत नाही. आपण जर प्रयत्नच केले नाहीत थांबवायचे, भांडायचे, हक्काने मागायचे तर मग मिळणार तरी कसे आणि देणार तरी कोण? ज्या नात्याला कधी नाव दिलंच नाही ते तिला आता हवं होतं, अगदी आत्ताच्या आता हवं होतं.
        ज्या प्रेमामुळे ती आनंदच्या इतकी जवळ होती ते तिला आठवत होतं. त्याचं तिच्या कामासाठी भारतातून रात्री जागणं, तिला सोबत देणं, कधी कुठे एकटी असेल तर तिच्याशी फोनवर बोलत राहणं, अगदी कधी नुसता फोन धरून बसून राहणं सर्व आठवत होतं. पण आता उशीर झाला होता का? काय माहित? ती बोललीच कुठे होती ती त्याच्याशी? आणि बोलायचं तरी कसं? हक्काने मध्यरात्री फोन करण्याची तिची हिम्मतही झाली नाही. तिने सकाळ झाल्यावर त्याला फोन लावला. पण त्याचा फोन लागत नव्हता. त्याच्या नवीन रूममेटचा नंबरही तिने घेतला नव्हता. सोमवारी सकाळी ऑफिसला गेले की त्याच्या मॅनेजर कडून त्याचा नंबर घ्यायचा आणि त्याच्याशी बोलायचे, हक्काने रागवायचे आणि सॉरीही म्हणायचे होते तिला. कितीतरी दिवसांनी तिच्यात अशी अधीरता आली होती. प्रेम म्हणजे केवळ रुटीन मध्ये सोबत देणे नसून दोघांनी एकमेकांना घेऊन पुढं जाणं असतं. कुणी थांबला तर त्याला हट्टाने सोबत ठेवायचं असतं. रागावला तर मनवायचं असतं. अर्थात हे सर्व करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला गृहीत धरायचं नसतं. कितीतरी वेळ ती स्वतःवर चिडत राहिली, त्याला असंच गृहीत धरल्याबद्दल.
         कशीतरी सोमवारची सकाळ उजाडली आणि आज पुन्हा तिला काय हवंय हे स्पष्ट झालं होतं. तिने सकाळीच मॅनेजर सोबत मिटिंग घेऊन त्यांना सांगितलं," सर मला येऊन आता जवळ जवळ दोन वर्षं झाली. I think my work is done here. तुम्ही माझी रिप्लेसमेंट शोधाल का? मला परत जायचं आहे.अर्थात लगेच हे सर्व शक्य होत नाही मलाही माहित आहे. पण माझी रिक्वेस्ट आहे शक्य तितक्या लवकर मला परत जायचं आहे. " सरांनीही तिला 'ठरवू लवकरच' असं सांगितलं. आता हे कधी ठरवणार आणि कधी मी परत जाणार असं तिला झालं होतं. त्यात आनंदचा नंबर अजून लागत नव्हता. एकूण दिवसच कंटाळवाणा होता.

       दुपारी एकटीच ती कॅन्टीन मध्ये जेवत असताना तिला मागून आवाज ऐकू आला,"हाय!".  हाच तो 'हाय' होता जो रोजच ऐकताना गृहीत धरला होता. रोज फोन ठेवताना उद्या येईलच म्हणून निष्काळजीपणे ठेवून टाकला होता. तोच आनंद प्रत्यक्षात तिच्यासमोर उभा होता. तिला विश्वास बसत नव्हता की तो तिच्यासमोर आहे.  तिला एकदम रडू येऊ लागलं आणि तो वेडा नेहमीसारखाच हसत होता. आपण ऑफिसमध्ये आहे हे विसरून तिने त्याला मिठी मारली होती. कितीतरी वेळ रडून झाल्यावर तिने त्याला विचारलं,"कधी आलास? मला सांगितलंही नाहीस? इतकी परकी झाले का मी? " आणि पुन्हा रडू लागली.
        त्याने तिला शांत केले आणि समजावले. "तू मला विचारत होतीस ना मी परत का आलो भारतात? हे असे श्वेता सारखे आणि अजून बरेच मित्र मैत्रिणी पाहिलेत मी. लग्न करायचे आहे म्हणून भारतात जातात, तिथेही ३ आठवड्यात परत येतात. प्रेम तर हवं असतं पण त्यासाठी काही सोडायची इच्छा नसते. जेव्हा सगळंच हवं असतं ना तेव्हा काहीतरी राहतंच. पैसे हवेत म्हणून मुले आणि बायको भारतात आणि नवरा इकडे, तर कधी बायको करियर साठी परदेशात आणि नवरा एकटा. बरं अमेरिकेत असलेलेही चांगली नोकरी हवी म्हणून वेगवेगळ्या शहरात किंवा कधी वेगळ्या राज्यांत. मग त्यात भेटायची खटपट, नाती सांभाळण्यासाठी धावपळ, त्यात होणारी भांडणे, सर्व सर्व पाहिलंय मी अगदी त्यात आपल्या आईवडिलांचे होणारे हालही. बरं लोकांना हेही कळत नाही की थोडे दिवस गेल्यावर परत काहीतरी वेगळे करता येईल. कधी नोकरी बदलली, पैसे थोडे कमी मिळाले किंवा भारतात राहिले किंवा नंतर जाऊ कधी परत म्हणून इथेच राहिले यांनी इतका फरक पडत नाही जितका जवळचं माणूस हरवल्यावर पडतो. प्रत्येकाच्या प्रायॉरीटीज असतात आणि गरजाही. पण गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही कितीही पश्चाताप झाला तरी.
           हे सर्व जवळून पाहिलं होतं मी. त्यामुळे मला माहित होतं मला भारतात राहायचे आहे. पण तू इथे आलीस, रमलीस आणि आपलं नातंही या बाकी लोकांसारखं होऊ लागलं. थोडे दिवस मीही हट्ट केला मला तिकडेच राहायचं आहे म्हणून. पण मग वाटलं मी तरी काय वेगळा होतो? म्हणून मग गेल्या काही दिवसांत प्रोजेक्ट बदलून घेतला. सहाच महिन्यांचा प्रोजेक्ट आहे. म्हटलं बघू तरी सहा महिन्यांत तू परत भेटतेस की नाही? प्रयत्न करणं माझ्या हातात होतं आणि ते करायचं मी ठरवलं. बस्स! बाकी काही नाही. " किती वेळ बोलत होता तो. तिच्या डोळ्यासमोरून अश्रू वाहत राहिले. ज्या आनंदला तिने इतक्या जवळून पाहिले होते तो पुन्हा तिला भेटला होता. आणि त्याच्यासोबत थोडीशी तीही तिला पुन्हा गवसली होती. लवकरच सर्व उरकून त्याच्यासोबत घरी जायचं मनोमन पक्कं केलं होतं तिने.

तिच्या डोक्यात एकच गाणं रेंगाळत होतं.. तिच्या आवडत्या अरिजीतचं......

ओढ़ के धानी रीत कि चादर
आया तेरे शहर में राँझा तेरा
दुनिया ज़माना, झूठा फ़साना
जीने मरने का वादा सांचा मेरा

हो शीश-महल ना मुझको सुहाए
तुझ संग सुखी रोटी भाए
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

चाहे भी तो भूल ना पाए
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

विद्या भुतकर.

Sunday, December 04, 2016

इष्क मुबारक, दर्द मुबारक

             सकाळ सकाळी रितू मस्त आवरून ऑफिसला निघाली होती.  आज तिच्या आवरण्यात एक वेगळाच उत्साह दिसून येत होता.खूप दिवसांपासून अडकलेलं एक काम होईल असं वाटत होतं. या सध्याच्या कंपनीत नोकरीला लागून पाच वर्षं झाली होती. मन लावून काम करणारीच ती, पहिल्यापासूनच. कितीही साधं काम दिलं तरी ते जमेल तितकं उत्तमपणे पार पाडायचं, अगदी मन लावून काम करायचं. त्यामुळे आहे तिथे चांगले प्रमोशन मिळतही गेले तिला. पण आपण कशात चांगले असलो ना की मग लोक दुसरा पर्याय शोधत बसत नाहीत. चालू आहे ना काम? मग राहू दे तिला तिथेच असे म्हणून प्रमोशन देत एकाच प्रोजेक्टमध्ये ठेवून घेतले. इतके दिवस कंपनीत नोकरीला असूनही तिला अजून 'ऑनसाईट' कुठेही परदेशात जायला मिळालं नव्हतं. सुरुवातीची काही वर्षं तिने दुर्लक्ष केलं पण तिला आता राग येऊ लागला होता आणि कितीही मन लावून काम केले तरी घरी गेल्यावर स्वतःवर चिडचिड होत होती एकाच ठिकाणी अडकून पडल्याबद्दल.
           गेले दोन वर्षे मात्र तिने हा हट्ट सोडला नाही. प्रत्येकवेळी ती एखाद्या ऑनसाईट प्रोजेक्टबद्दल बोलायला गेली की मॅनेजरचा एकच प्रश्न, "तुझी रिप्लेसमेंट आणून दे, मग करतो". तिने तसे सुरूही केले लोकांचे इंटरव्हूय घ्यायला. पण एखादे काम चांगले करत असू ना तर त्यासाठी कितीही मारामारी करावी लागली तरी ते करत राहतो, दुसऱ्या कुणी केलेलंही आवडत नाही तसेच तिलाही ज्या कुणाचे इंटरव्हू घेतले त्यांचे आधीचे काम पसंत पडले नाही तर कुणाचा 'अटीट्युड'. आता असेल एखादा कमी जास्त, तर चालवून घ्यायचे ना? पण तसे करेल तर रितू कुठली? गेल्या दोन दिवसांत एका कॅन्डीडेटचे २ राऊंड झाले होते. आता जवळजवळ फायनलच होणार होतं. त्याला एकदा का आपल्या जागी बसवला की तिचा प्रोजेक्ट, व्हिसा सर्व लवकरच पूर्ण करायचं होतं. तिकडे अमेरीकेत, इंग्लंड, जर्मनी सर्व ठिकाणी तिचे मित्र-मैत्रिणी होतेच. कुठेही गेली तरी तिला काही प्रॉब्लेम नव्हता. फिरायला मिळेल याचाच तिला जास्त आनंद होत होता.
         आनंद वरून आठवलं, आज येणाऱ्या त्या मुलाचं नावंही आंनदच होतं. मुलगा कुठला? झाले की आता २८ वर्षाचा तरी असेल? ७-८ वर्षाचा अनुभव म्हणजे निदान तितका तरी असेलच. पण तो इथे का म्हणून राहायचं म्हणत असेल? त्याच्या जुन्या कंपनीत तर तो बाहेर गेलाही होता. परत इकडे का आला काय माहित? मी तर त्याच्या जागी असते तर नसते आले. त्याचा व्हिसाही आहे म्हणे. मग तर काय राहिला असता तरी चाललं असतं. लग्नासाठी आला असेल, आता घरचे मागे लागले असतील. इथे लोक तिथून परत यायला नको म्हणतात आणि याला परत तिकडे जायचं नाहीये म्हणून नोकरी सोडतोय? कुणाचं काय तर कुणाचं काय......... एका पाठोपाठ एक असे अनेक प्रश्न आणि विचार रितूच्या डोक्यात येतंच होते. त्या 'आनंद' ला नवीन नोकरीचाही इतका 'आनंद' होणार नाही इतका तिला होत होता. कॅबमधून ऑफिसला पोचेपर्यंत तिला दम धरवत नव्हता. पोचल्या पोचल्या रितुने सामान जागेवर ठेवून मॅनेजर च्या ऑफिसकडे धाव घेतली.
"काय झाले सर? ", रितू.
"कशाचे?", मॅनेजर.
"कशाचे काय? त्या कॅन्डीडेटचे? आनंद?", रितू.
"हां हां, झाला सकाळी त्याचा इंटरव्ह्यू. "
"कसा वाटला तुम्हाला?", जणू तिला स्वतःलाच नवीन नोकरी मिळत होती.
" हां चांगला आहे. एच आर शी बोलणं झालं की येईल परत. उद्या ऑफर देऊन टाकू. त्यालाही जॉईन व्हायला महिना लागेल पण. "
"हो ते तर आहेच सर. महिन्यानेच जॉईन करता येईल त्याला. पण बाकी चांगला आहे. ", रितू थोडा संयम ठेवत बोलली आणि बाहेर निघूनही आली.
दिवसभर तो आनंद एच आर कडे जाताना किंवा परत सरांकडे जाताना तिचं लक्ष होतंच. दुपारी जेवताना मैत्रिणीलाही तिने सांगितलं त्याच्याबद्दल. आता पुढचा महिनाभर कशी वाट बघायची असा मोठा प्रश्न तिला पडला होता. पण इतके वर्षं वाट पाहिली आता अजून १ महिना तो काय?
         तर महिन्याभराने आनंद आला, तो येणार होताच. त्या महिन्याभरात तिचाही अमेरिकेतली एक प्रोजेक्ट फायनल झाला होता. आता आनंद आला की काम त्याच्या ताब्यात द्यायला महिना दोन महिने लागणार होते आणि तिकडे व्हिसालाही. त्यामुळे एकूण सगळं कसं जुळून आलं होतं.  त्याला सर्व टीमची ओळख करून द्यायची, आपले काम समजावयाचे, थोडे दिवस त्याला पुढे होऊन एकट्याला काम करता आले की मग लगेच हिची रवानगी अमेरिकेला. कध्धी होणार सगळं ????? तिला आता फिरायची, परदेशात जायची मोठी उत्सुकता लागून राहिली होती. त्यामुळे त्याच्या येण्याची हिलाच जास्त उत्सुकता होती. एरवी १०-११ वाजता येणारी रितू आज सकाळीच येऊन बसली होती. पहिलाच दिवस असल्याने आनंदही वेळेत आला, तोही एकदम फॉर्मल मध्ये.

         आनंद येणार म्हणून तिने आधीच सर्व पेपरवर्क तयार ठेवले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिने त्याला ऑफिसातल्या सर्व लोकांची ओळख करून दिली, कॅन्टीन मध्ये त्याला सोबत म्हणून जेवायला गेली, कुठे राहतो, कसा येतो, ऑफिसच्या नियमित वेळा, मिटींगच्या वेळा हे सर्व समजावून झालं. एरवीचे ९च तास आज खूप वेळ झाल्यासारखे वाटत होते. दोघेही दमून गेले होते. इतका वेळ बोलणे आणि इतका वेळ ऐकणे दोनीही बोअरिंग कामे होती. संध्याकाळच्या फोन कॉल मध्ये ऑनसाईटच्या टीमशी ओळख करून देऊन निघायचे असे त्यांनी ठरवले. कॉल तसा उशिरा असल्याने तो संपेपर्यंत कुणीही जास्त कुणी ऑफिसमध्ये नसेही. निघताना त्याला 'बाय' करून तिने कॅब बोलावून घेतली आणि तोही निघाला. पहिला दिवस संपल्याचे समाधान दोघांनाही वाटत होतेच.
      
        दुसऱ्या दिवसापासून मात्र रितुने त्याला आल्या आल्या कामाला लावले. काय काय करायचे याचा प्लॅन त्याला दिला. वाचण्यासाठीचे सर्व डॉक्युमेंट, रोज शिकवण्यासाठी भेटायचं एक तास, मीटिंग आणि संध्याकाळचा कॉल. आख्ख वेळापत्रक देऊन टाकलं. तोही बिचारा नवीनच असल्याने 'हो' म्हणून कामाला लागला. पहिल्या दोन आठवड्यात त्यालाही तिच्या जबरदस्त कामाचा अंदाज आला होता. एक व्यक्ती म्हणूनच नव्हे तर एक ग्रेट टीम लीड म्हणूनही ती योग्यप्रकारे सर्व काम करते हे तो पहात होता. अर्थात तिचा स्वभावच तो, जे असेल ते काम मनापासून करायचे, त्यामुळे त्याला सर्व काम समजणे इतकेच नव्हे तर त्याला दुपारी जेवायला सोबत देणे इ. सुद्धा आपलीच जबाबदारी असल्यासारखे ती ते बरोबर पार पाडत होती. हळूहळू दोघांची एकमेकांची ओळखही होत होतीच. पण तीही केवळ या दोनेक महिन्यांपुरतीच आहे हे दोघांनाही माहित होते. त्यामुळे समोरच्याचे नाही पटले तरी पुढे कुठे आपल्याला भेटायचे आहे? असा विचार करून दोघेही गप्प बसत. काम योग्य चालू असणे दोघांसाठीही महत्वाचे होते.
  
            आता रोजचे रुटीनच झाले होते. रोज सकाळी ऑफिसला पोचायचे, चहा सोबत करायचा, मग काम, जेवण सोबत, संध्याकाळचे कॉल्स. कधी उशीर झाला तर तो विचारायचा, "कशी जाणार?". आता दोघेही 'तुम्ही' वरून 'तू' वर आले होतेच. तीही 'कॅब' म्हणून निघून जायची. तिला आनंदचा स्वभाव आवडला होता. एकदम मनमोकळा, गमतीदार पण तरीही मर्यादेत वागणारा, बोलणारा, कामात तितकाच सिन्सियर. चेष्टा मस्करीही करायचा पण कधी उगाच त्याने तिला पर्सनल प्रश्न विचारले नव्हते ना त्याने. त्यांना कुठे सोबत राहायचं होतं म्हणा. पण तरी रितू रूममेटशी बोलताना त्याचा उल्लेख वाढला होता.
तिच्या रूममेटने तिला गंमत म्हणून विचारलंही होतं,"काय गं? काय विचार आहे?".
तिनेही अगदी सिरियसली सांगितलं होतं,"हे बघ आता इतक्या वर्षांनी मला कुठे फिरायला जायला मिळतंय त्यामुळे मी असला काही वेडेपणा करणार नाहीये. आणि आनंदचं काय? ठीक आहे? पण मला कुठे त्याच्यासोबत राहायचे आहे?".
         महिना होत आला, आनंद तसा रुळलाही. थोडा निवांत झाला. आता नवेपणाचं ओझं घेऊन फिरत नव्हता. कपड्यांमध्येही थोडा सुटसुटीतपणा आला आणि वागण्यातही. नवीन टीममध्ये सराईतपणे वावरू लागला, कधी बाकी लोकांसोबत रितूची चेष्टाही करू लागला. रितूची व्हिसाची गडबड सुरु झाली. अनेकवेळा तर स्वतः आनंदने तिला डॉक्युमेंट भरायला मदतही केली. तिच्या व्हिसा इंटरव्ह्यूसाठी त्याने तिला थोडी तयारीही करून घेतली. ठरल्याप्रमाणे व्हिसाच्या दिवशी मुंबईला जाऊन यायचे होतेच. सर्वांना माहित होते तिला किती ओढ लागली आहे परदेशात जायची. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ती परत आली तेव्हा सगळेच उत्सुक होते विचारायला. पण रितू आली आणि तिच्या चेहऱ्यावरूनच कळले की काय झालं होतं. तिचा व्हिसा रिजेकट झाला होता. का? कसा? यापेक्षा पुढे काय हा प्रश्न तिला पडला होता. इकडे जुन्या प्रोजेकट मध्ये तिची रिप्लेसमेंट आली होतीच आणि नविनही हातात नाही. सर्वच तिचे सांत्वन करायला लागले होते.
         आनंद मात्र दिवसभरात जास्त काही बोलला नव्हता. संध्याकाळपर्यंत कसंबसं काम करून घरी जाताना तो म्हणाला,"कशी जाणार आहेस?". तिने नेहमीचं उत्तर दिलं,'कॅब ने".
पुढे तो म्हणाला,"मी सोडतो चालत असेल तर?".
तिने मान डोलावली. उशीर झालेला होताच, त्याने विचारलं,"जेवण करून जायचं? कॅन्टीन मधे जाऊ".
तिने पुन्हा मान डोलावली. आज तिला एकटं राहावंसं वाटत नव्हतं आणि जास्त काही बोलायची शक्तीही नव्हती.
त्यानेच नेहमीचं जेवण मागवलं आणि टेबलवर घेऊन आला. आता दोघांना एकमेकांचे जेवण, नाश्त्याच्या आवडी निवडीची माहित झाल्या होत्या.
जेवताना त्याने विचारलं,"इतका का मूड ऑफ करून घेतेस? एकदाच रिजेकट झालाय ना व्हिसा परत मिळेल की?".
ती,"ह्म्म्म".
तो,"मी दिवसभर काही बोललो नाही, पण आपल्याकडे लोकांना खूप क्रेझ असते अमेरिकेची. मी कितीतरी लोकांना अगदी जीव तोडून त्या व्हिसाच्या मागे लागलेले पाहिलंय. तिकडे राहण्यासाठी काय काय करतात हेही पाहिलंय आणि त्यात घरच्या सर्वांची, कधी बायका पोरांची होणार ओढाताण हेही पाहिलंय. तुला का इतकी क्रेझ आहे जायची?" .
आज पहिल्यांदाच तो कमेंट करत होता काहीतरी अशा महत्वाच्या विषयावर. तिला थोडं आश्चर्य वाटलं आणि एरवी फक्त कामापुरती मर्यादा राखणारा, आज स्वतःहून थांबवून बोलणारा आनंद वेगळाच वाटत होता.
ती बोलू लागली," आजपर्यंत लहानपणापासून खूप अभ्यास केला, नोकरीतही मन लावून काम केलं. पण हे सर्व एका छोट्या गावात, या पुढे छोट्या शहरात राहून. एक मुलगी म्हणून कधी आई वडिलांनी काही नाही म्हटलं नाही, तरीही मर्यादा होत्याच. कधीतरी त्यातुन बाहेर पडून बघायचं आहे. परदेशात नोकरी करायची, एकटीला फिरायचं आहे.
"पण मी तर वेगळंच ऐकलं होतं?", तो बोलला.
त्याला काय म्हणायचं आहे हे लक्षात आल्यावर मात्र ती थोडी चिडली. ऑफिसमध्ये असणारा तिचा जुना मॅनेजर आता अमेरिकेत असतो आणि तिला त्याच्याकडे जायचे आहे असं सर्वांचं म्हणणं होतं, अर्थात ते कुणी बोलून कधीच दाखवलं नाही. पण ते बोलतात हे तिलाही माहित होतं. आज त्याने हे असं विचारावं हे तिला पटलं नाही. पण आता विचारलं आहेच तर सांगणं भाग होतं.
"संदीप तसा मला  आवडायचा आणि तो इथे असताना आम्ही बरेच वेळा सोबत असायचो. तो ऑनसाईट गेल्यावर मात्र थोड्याच दिवसांत त्याच्या वागण्यात बदल जाणवला मला. त्याला जणू माझ्या मैत्रीचं आणि कदाचित पुढे येणाऱ्या नात्याचं ओझं वाटत होतं. त्यामुळे मी वेळीच त्याच्याशी बोलणं कमी केलं होतं. आता अशा गोष्टी एकदा पसरल्या की थांबणं अवघड असतं. एक मुलगी लीड वगैरे झाली की अजून बंधनं येतात. नुसतं कामात चांगलं असून चालत नाही, वागण्यातही परफेक्ट असावं लागतं. मुलगा मॅनेजर झाला तरी तो टीमसोबत जाऊन दारू पिऊ शकतो. मुलगी ते करू शकत नाही. त्यामुळे मी वेळीच माझे संबंध कमी केले होते. पण अफवा पसरल्या की त्या क्लिअर करायला कुणी समोर येत नाही. तू विचारलंस म्हणून सांगते. तो भाग आता माझ्या व्हिसाचं कारण नाहीयेच. मला एकटीला स्वच्छन्दपणे राहून बघायचं आहे, माझे इतके मित्र-मैत्रिणी गेलेत, त्यांच्यासारखाच मलाही तो अनुभव घ्यायचा आहे.", ती बोलत होती आणि तो ऐकत होता. तिच्या डोळ्यांत नकळत पाणी येत होतं.
तो विचार करून बोलला,"अगं काही विशेष नसतं. नुसता बाऊ करून ठेवलाय लोकांनी. उलट मला तर बोअर झालं तिकडे."
ती,"बरोबर तू जाऊन आला आहेस ना? म्हणून तुला काही वाटत नाही त्याचं कौतुक. बाय द वे, तू का परत आलास? "
तो,"माझंही तुझ्यासारखंच झालं होतं, फिरायची इच्छा होतीच. पण नोकरी लागल्यावर घरी बोललो होतो, काही वर्षं फिरून घेतो मग परत येईन आणि मग तुम्ही लग्नाचं काय ते बघा. "
ती,"तुम्ही बघा म्हणजे? अच्छा म्हणजे कुणी गर्लफ्रेंड नाहीये होय अजून? कसं शक्य आहे?"
खरंतर गाडी तिच्यावरून त्याच्याकडे वळत होती. पण तिला आज चिडवण्यात मजा नव्हती. त्यामुळे त्यानेही तिला बोलू दिलं.
तो,"मला उगाच प्रेमात वगैरे पडायचं नाहीये हे आधीच ठरवलं होतं मी. एकतर खूप मित्रांचे हाल पाहिलेत. उगाच बिचारे पोरींच्या नादात दुःखी होऊन फिरतात. एक तर पोरी मिळाल्या की त्यांना जुन्या मित्रांची आठवणही राहत नाही. आणि मग प्रेमभंग झाला की मित्र सोडून दुसरं कुणी बघत नाही. मुलंच कशाला, माझी एक मैत्रीणही होती,  माझ्यावरच प्रेम झालं तिला. 'नाही' म्हणालो तर आता मैत्रीणही नाही आणि गर्लफ्रेंडही. शिवाय घरून विरोध असला तर मग घरच्यांचेही हाल, भांडणं, रुसवे फुगवे, नकोच ते. आणि मला असं स्वतःला दुःखापासून मोकळं ठेवायला आवडतं, नावाप्रमाणे आनंदी राहायचं. I am happy as I am. No complaints with life. "
ती," तुझ्याकडे बघून वाटलं नव्हतं असा विचार करत असशील ते."
तो,"म्हणजे काय? मी काय २-४ गर्लफ्रेंड वाला माणूस वाटतो की काय? आपला पगार नाही बाबा इतका."
ती हसली. सकाळपासून उदास असलेले डोळे थोडे चकाकले.
तो पुढे बोलला,"आता आई बाबा म्हणत आहेत मुली बघायचं. चालू आहे एकेक प्रोग्रॅम. बघू कधी जमतं. "
महिनाभरातुन पहिल्यांदाच तो आपल्याबद्दल इतके बोलला होता. जेवण झालं होतं. त्याने आग्रह करून तिला तिच्या रूमवर सोडलं होतं. तिनेही त्याला 'थँक्स' म्हणून हसून 'बाय' केलं.

        अश्रू दोन लोकांना किती पटकन जवळ आणतात ना? गेल्या महिन्याभरातील थोडीफार जी काही फॉर्मॅलिटी होती ती किती पटकन नाहीशी झाली. जेवायला जाताना, चहाला जाताना थांबलं जाऊ लागलं, जेवताना ऑर्डर देताना दुसऱ्याच्याही दिली जाऊ लागली. कॉल चालू असताना 'mute' करून गप्पा चालू झाल्या. सुट्टीच्या दिवशीच्या कामाला विनातक्रार येऊ लागले. सकाळी पोचायला उशीर झाला तर कॉल करणं सुरु झाले होते. त्यांच्या नकळत हे सर्व बदल होत होते. त्याचे तिच्या प्रोजेक्टवरचे ट्रेनिंग जवळ जवळ संपत आले होते. आता पुढे काय हा प्रश्न दोघांनाही होताच.
एक दिवशी संध्याकाळी कॉल च्या आधी रितू गाणे ऐकत बसली होती. त्याने येऊन एक हेडफोन स्वतःच्या कानाला लावला. अरिजित सिंगचं गाणं चालू होतं.
गाणं संपवून तिने हेडफोन बाजूला करत विचारलं, "तुला आवडतो का रे अरिजित?".
त्याने खांदे उडवले.
"म्हणजे काय? हो की नाही?" तिने खोदून विचारलं.
"म्हणजे मी जास्त लक्ष देत नाही गाण्यांकडे. मला सिनेमा पाहायला आवडतो. दोन तीन तासाची करमणूक होते. पण जास्त त्याचा विचार करत बसत नाही. गाणं चांगलं वाटलं तर ऐकतो, पण म्हणून रिपीट वर लावून बसत नाही. ", त्याने स्पष्ट उत्तर दिले.
"मला तर त्याची सर्वच गाणी आवडतात. कसला आतपर्यंत पोचतो त्याचा आवाज.", ती स्वप्नाळू डोळ्यांनी बोलली.

त्यांचं बोलणं चालूच होतं इतक्यात मॅनेजरने रितूला केबिनमध्ये बोलावले.

ती आत गेल्यावर त्यांनी सांगितले,"रितू दुसऱ्या एका प्रोजेक्टसाठी तुला ऑनसाईट पाठवायचा विचार आहे. अमेरिकेतच आहे, आपण यावेळी दुसरा व्हिसा अप्लाय करू. अजून ६ आठवड्यात काम होऊन जाईल. लोकेशन मागच्यापेक्षा वेगळे आहे. तुला चालेल ना? "
तिला हे असं अचानक विचारल्यामुळे काही कळेना. इतकी तीव्र इच्छा असणारी रितू आज दुसरी ऑफर आल्यावर एक सेकंद का होईना विचार करत होती.
तिने विचारले,"मी उद्या सांगते सर, चालेल ना?".
सरांनी 'हो' म्हणून मान हलवली.

       रितू बाहेर आली आणि शेजारी असणाऱ्या आनंदने मानेनेच 'काय?' ची खूण केली. तिने त्याला हातानेच 'नंतर बोलू' असं खुणावलं. एकतर मोजून महिना-दीड महिन्याची त्यांची ओळख. त्यातही त्याचे हे असे प्रेमाबद्दलचे विचार. आणि आपणच कुठे काय बोलणार आणि त्यासाठी इतक्या वर्षांची इच्छा सोडून देणार? तिला कळत नव्हतं काय करायचं? त्याला सांगावं की नको करत तिने कॉल नंतर त्याला सांगितलं तिचं सरांशी झालेलं बोलणं.
त्याने एका सेकंदाचाही विचार न करता सांगितलं,"अरे उद्या कशाला म्हणालीस? हो म्हणायचं ना? इतक्या वर्षांची इच्छा आहे ना तुझी? मग विचार कसला करतेस?".
त्यानेच असे म्हटल्यावर मग प्रश्नच मिटला. तिला वाटलं,"बरं झालं त्याला सांगितलं ते. "
आता मोजून ६ आठवडे होते तिच्या तयारीला. यावेळी व्हिसाचे डॉक्युमेंट दोघांनी मिळून भरले. व्हिसाची तारीखही आली, त्याने तिची तयारी करून घेतली होतीच. व्हिसासाठी जाताना अगदी निघण्यापासून, पोहोचेपर्यंत त्यांचे कॉल चालू होतेच. इंटरव्ह्यू झाल्यावर पहिला कॉल तिने त्यालाच केला होता. तिला व्हिसा मिळाला होता आणि अजून दोन तीन आठवड्यात जायचं ठरलं होतं.
          सगळं कसं पटापट होत होतं. कुणाला काही विचार करायला वेळच नव्हता. दिवसा ऑफिसचं काम असायचं आणि संध्याकाळी तिची काही खरेदी, गप्पा, एकत्र जेवण हेच चालू होतं. त्याने तिला पार्टी मागितलीच होती. तीही मग सर्वाना घेऊन पार्टीला गेली होती. पुढे काही होणार नाही हे माहित असूनही पार्टीच्या तिच्या ड्रेसवर त्याच्या कौतुकाची तिला अपेक्षा होती आणि त्याने कौतुक केल्यावर एक समाधानही. आपल्याला एक वेगळं आयुष्य जगायची इतक्या वर्षाची जी इच्छा होती ती पूर्ण होत आहे आणि त्यात हे असे छोटे छोटे प्रसंग उगाच अडकवून ठेवत आहेत असं तिला वाटत होतं. त्यामुळे त्याच्यासोबत राहण्याचं जे आकर्षण होतं त्याचा तिला वेळोवेळी रागही येत होता. तरीही त्याची सोबत ती टाळतही नव्हती. उलट खरेदीला, प्रत्यके निर्णयात तो तिच्यासोबत होताच. बॅग खरेदी केल्या, वेस्टर्न कपडे घेतले, थंडीचे कपडे घेतले, बाकी गोष्टींचीही यादी होतीच. वेळ मिळेल तेव्हा तिचाही फोन यायचा आणि मग जमेल तशी ते दोघे मिळून तिची कामे पूर्ण करत होते. 'अजून १०-१५ दिवस तर आहेत' असे म्हणून ती मनाचे समाधान करत होती.
     
       आता १-२ दिवसच बाकी होते. ती जायच्या आधी भेटायला म्हणून तिचे आई बाबाही तिच्याकडे आले होते. ती कितीही व्यस्त असली तरी त्याच्यासोबत जमेल तो वेळ ती घालवतंच होती. त्यांच्यासोबत बसून त्यानेही तिची पॅकिंग करून दिली. तिच्यासोबत एअरपोर्टवरही तो गेला. जाताना एक छोटंसं गिफ्ट त्याने खिशातून काढलं. छोटा डिजिटल कॅमेरा होता तो.
तो बोलला,"मला माहितेय तिकडे अजून भारी कॅमेरा मिळेल तुला. पण तोवर हा माझ्याकडून. काही लागलं तर सांगच, माझे मित्र मैत्रिणी आहेत तिकडे, मदत करतील तुला ते नक्की. ही कॅश सुद्धा सोबत ठेव लागली तर. मला माहितेय पहिल्यांदा जाताना टेन्शन येतं. "
तिने 'थँक्यू' म्हणून त्याला एक अलगद मिठी मारली. तो पुन्हा कधी भेटला तरी आधी तोडलेल्या 'संदीप' सारखाच भेटेल का असं सारखं तिला वाटत होतं. न बोललेल्या अनेक गोष्टी डोळ्यातून वाहत होत्या. त्याला 'take care' म्हणून तिने बाकी सगळ्यांचाही निरोप घेतला.
ती आत गेल्यावर बाहेर तिचे आई बाबा आणि तो थांबलेही, काही लागलं तर म्हणून. ते बिचारे दमलेले आणि तोही औपचारिक गप्पांमध्ये अडकलेला.
"पुढचा एक दिवस प्रवासात जाईल तिचा, तेव्हा काही संपर्क करता नाही येणार. पण  तिकडे असतात कंपनीचे लोक, त्यांच्या फोनवरून करेल फोन पोचली की. तुम्ही काही काळजी करू नका. " तो बोलतच होता.
'सर्व ठीक झाले, आता फोन बंद करावा लागेल" असे म्हणून फोन आल्यावर तिघेही एरपोर्टवरून आपापल्या मार्गाने निघाले. पुढच्या पाच मिनिटांत त्याला मेसेज आला होता,"I'll miss you.".
त्याने मेसेज पाहिल्यावर त्याच्यावर उत्तर द्यायला कॉल लावला पण फोन बंद झाला होता. प्लेन उडाले होते......
         
        आनंद रितूला सोडून घरी पोचला तेंव्हा पहाटेचे तीनेक वाजले असतील. रविवार सुरु झाला होता. दमल्यामुळे अंग गादीवर टाकून क्षणात त्याला झोप लागली होती. दुसऱ्या दिवशी कधीतरी सकाळी उशिरा त्याला जाग आली. डोळे उघडतानाच त्याच्या मनात पहिला विचार आला,"आज रितू या शहरात नाहीये."
त्याने 'उगाच रोमियो टाईप विचार करतोय' म्हणत तो झटकला आणि ब्रश करायला लागला. तो ब्रश करतानाच त्याला दोघेही रूममेट तयार होताना दिसले. त्याने खुणेनेच विचारलं,"कुठे?". दोघेही नाश्ता करायला निघाले होते. त्याने त्यांना थांबायला सांगून पटकन आवरून त्यांच्यासोबत बाहेर निघाला. टपरीवर गेल्यावर त्याला जाणवलं गेल्या दोनेक महिन्यात तो त्यांच्यासोबत नाश्ता करायलाही आला नव्हता. ते दोघे जे बोलत होते त्याचा संदर्भ लागायलाही थोडा वेळ लागलाच. आता दिवसभर काय करायचं हा प्रश्न होताच.

           रूमवर परत येऊन त्याने अजून दोघा मित्रांना फोन लावला आणि सिनेमाला जायचा प्लॅन केला. उगाच पिक्चर पाहताना सेंटी गाणी ऐकून रितूला आठवण्याचा वेडेपणा करणाऱ्यातले आपण नाही हे त्याने आधीच ठरवून ठेवले होते. त्यामुळे तीन तास तरी ठीक गेले. त्याचं मित्रमंडळ तसं मोठं होतं. त्यामुळे गेल्या दोनेक महिन्यांनी त्याला असा काही फरक पडणार नव्हता. नेहमीप्रमाणे टाईमपास सिनेमा बघून जेवण करून तो संध्याकाळी रूमवर परत आला. पण दिवसभर टाळलेला एकांत पुन्हा जवळ येतोय असं त्याला जाणवलं. पण त्याने स्वतःला सकाळीच समजावलं होतं, हे असले प्रेम वगैरे, तेही दोनेक महिन्यात? अगदीच फिल्मी वाटतं. इतक्या वर्षात झालं नाही ते दोन महिन्यात होणार आहे का? काय करावं विचार करत त्याने घरी फोन लावला. 

आईने त्याला विचारलंही,"काय रे कुठे होतास? दोन आठवडे तुझा फोन नाही? आम्ही लावला तर उचलला नाहीस? सगळं ठीक आहे ना?".
त्याने नेहमीच्या सुरात,"अगं हो काम होतं. ती रितू जाणार होती ऑनसाईट त्यामुळे सर्व काम माझ्याकडेच होतं." असं काहीसं कारण सांगितलं. 
       'कितीही झालं तरी आपण परत आपल्या आई बाबांना कॉल करू शकतो आणि ते नेहमीच आपली इतकी काळजी करतात' या विचाराने त्याला थोडं बरं वाटलं. आणि गेल्या काही दिवसांत त्यांना साधा फोनही केला नाही याचं त्याला वाईटही वाटलं. बराच वेळ घरी बोलून त्याने फोन ठेवला. रात्र झाली होती. त्याने पुन्हा एकदा फोन चाळवला. कुठल्याही क्षणी तिचा फोन येईल असं त्याला वाटत होतं. गेल्या काही दिवसांत तर तिच्या सतत येणाऱ्या फोनची त्याला सवयच झाली होती. तरीही उगाच आपण सेंटी होतोय असं त्याला राहून राहून वाटत होतं.
    
       त्याने लॅपटॉप उघडला आणि काहीतरी काम करायला सुरुवात केली. पण लक्ष असेल तर ना? रितू दिवसभर प्रवासात होती त्यामुळे तिच्याशी संपर्क होणेही शक्य नव्हते. 'कदाचित तिच्याशी नुसतं बोलल्यावरसुद्धा बरं वाटेल असं त्याला वाटलं. फक्त आपण तिच्याशी बोलू शकत नाहीये म्हणून अस्वस्थ वाटत असेल' त्याने स्वतःला अजून समजावलं. ती नसताना रोज आपण काय करायचो हेही त्याला आता आठवावं लागत होतं. दोन महिन्यात इतका बदल कसा काय झाला हेच त्याला कळत नव्हतं. उगाच त्याने फेसबुक उघडलं, लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, फोटो लाईक केले. पण मन लागत नव्हतं. जितका तो टाळत होता तितका अजून तिला आठवत होता. उशीर झाला तरी चालेल पण तिच्याशी बोलूनच झोपायचं असं त्याने मनोमन ठरवलं. ती ठीक आहे कळल्यावर आपल्याला इतके काही वाटणार नाही असं त्याला वाटत होतं. त्याने ऑनसाईटच्या माणसाचा नंबर शोधून काढला आणि त्याला फोनही केला. त्याने सांगितले अजून दोन तासात ती पोहोचेल. पुढचे दोन तास कसेबसे त्याने काढले.
       
      बरोबर दोन तासांनी त्याने पुन्हा इंटरनॅशनल कॉल लावला. यावेळी आवाज रितूचाच होता. तिचा आवाज ऐकून जणू त्याला 'धस्स' झालं. एका दिवसांत आपण तिला इतकं मिस केलं हे त्याला तिच्या एकदा कानावर पडलेल्या आवाजावरून कळलं होतं. दिवसभरात वेगवेगळ्या क्षणी ती कशी त्याला आठवली ते सारं झरझर डोळ्यांसमोरून गेलं. पुढे ती जे काही बोलली त्याकडे त्याचं लक्ष होतंच कुठे? आता तिच्याशिवाय आपण कसे जगणार हा विचार करून त्याला काहीच सुचत नव्हतं. निदान अजून एक वर्षभर तरी ती तिकडेच राहणार होती. आणि असेही नुकत्याच तिकडे पोचलेल्या रितूला 'परत ये' म्हणून तरी कसं सांगणारहोता तो? आपण एकटे असताना खरंच किती निवांत होतो हे त्याला आठवत होतं, पण आता उशीर झाला होता. तो प्रेमात अडकला होता आणि पडलेल्या पेचातून बाहेर पडणं सोपं जाणार नाही हेही त्याला कळलं होतं. तो तिला फक्त इतकंच बोलला, 'I miss you!' आणि त्याने फोन कट केला. त्याचे डोळे भरून आले होते. त्यात तिचा आवाज ऐकला याचा आनंद किती आणि ती नसण्याचं दुःख किती हे सांगणं अवघड होतं. 
कधीही लक्ष न देणाऱ्या आनंदला आज गाणं ऐकू येत होते. मागे टीव्ही वर गाणं चालू होतं,"इष्क मुबारक, दर्द मुबारक"....... 

विद्या भुतकर.

Thursday, December 01, 2016