Wednesday, December 13, 2017

विरूष्का आणि मी

डिस्क्लेमर: 
हे आपलं लिखाण आपणच 'विनोदी'  म्हणवून घ्यायचं म्हणजे भीतीच वाटते. त्यातही संसाराचं रडगाणं लिहिताना, हसावं की रडावं हे कन्फ्युजन असतंच. मी तर म्हणते 'अवघाचि संसार' नावाची अजून एक कॅटेगरी केली पाहिजे हे असल्या पोस्ट लिहायला. असो. तर डिस्क्लेमर हा की, यातील सर्व पात्रे काल्पनिक नसली तरी त्यातील घटनां पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा स्वभावाशी कुठलाही सुतराम संबंध लावू नये. शिवाय, घरची भांडणे अशी पब्लिकमध्ये मांडण्यावरुन आधीच भांडणे झाल्यामुळे, त्यावर लिहिणे हा अजूनही घरी वादाचाच मुद्दा आहे. 
-------------------------------------------------------------------------------------------------
     तर तुम्हांला सांगते त्या तिकडे विराट आणि अनुष्काचं लग्न तिकडे लागलं आणि आमच्या घरात महायुद्ध पेटलं. एक तर या असल्या बातम्यां बाहेर पडल्या की लगेचच  दिसेल त्या पोर्टल, सोशल मीडिया आणि वेबसाईटवर नको इतकी माहिती येऊलागतात. ढिगाने फोटो, मग त्याचं एकदम भारी लोकेशन, हसणारं जोडपं, त्यांचे पर्फेक्ट ड्रेसेस सगळं आलंच. आणि हो, फॉरवर्ड होणारे तेच तेच जोक्स. 

       मी काही अजून बातमी वाचली नव्हती, त्यात अमेरिकेत रात्र. त्यामुळे अगदी झोपायच्या वेळीच माझ्या एका शाळेतल्या मैत्रिणीने सर्वात पहिले व्हाट्स ऍपवर पाठवलेले व्हिडीओ पाहिले. इतके घरगुती होते ते व्हिडीओ की पहिलं तिला झापलंच. म्हटलं, "युरोप, भूतान वगैरे फिरुन आली होतीस ते ठीक आहे, यांच्या लग्नाला पण? तेही आम्हाला न सांगता ? आमच्या मैत्रीत मेजर ब्रेक अप येणार हे नक्की होतं. इतक्यात तेच व्हिडीओ दुसऱ्या ग्रुपवरही आले आणि ती वाचली. मी आता रात्री १२ वाजता भांडण न करता मुकाट्याने झोपून जाईन  हे पाहून नवऱ्यानेही सुटकेचा श्वास घेतला. हो ना, नाहीतर अनेकवेळा अशा ग्रुपवर एथिक्स  वरून वाद घातल्यावर तर कधी जवळच्या मैत्रिणीसोबत सासरच्या गॉसिपनंतर अनेकवेळा त्याला उठवलं आहे. मग काय? नणंदेनं माझ्याशी कसं वागावं हे मला त्याला त्याचवेळी सांगणं आवश्यकच आहे. असो. त्यावर पुन्हा कधीतरी.

        दुसऱ्या दिवशी उठेपर्यंत सगळीकडे बातमीने वेग धरला होता. लगेचच पुढचे हनीमून फोटो, रिसेप्शनचे इन्व्हिटेशन कार्ड आले होते.  नवऱ्याने लगेच त्यावर,"मी बिझी आहे, तू जाऊन ये" असा फालतू जोक मारुन घेतलाच. पुढचा व्हिडीओ होता, तो म्हणजे,"विराटने अनुष्कासाठी अंगठी शोधायला तीन महिने कसे लावले आणि कशी भारी अंगठी घेतली" यावर. आता हे म्हणजे आमच्या घरी चालू असलेल्या आगीत तेल, तूप आणि बटर सर्व घालण्यासारखं होतं. लग्नातली अंगठी वगैरे ठीक आहे पण गेले दोनेक वर्षं झाली मी नवऱ्याला म्हणतेय, "ते हिऱ्याच्या जाहिरातीत दाखवतात ना? तशी 'हीरा है सदा के लिये' टाईप्स अंगठी घे की!". आता दरवेळी याला 'काय गिफ्ट घ्यायचे' असा मोठा प्रश्न असतो. मी काय हवंय हे स्पष्ट सांगूनही दोन वर्षात काहीही हालचाल झालेली नाहीये. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून सकाळ-सकाळी आमचं भांडण जुंपलं. दोन वाढदिवस, दोन ऍनिव्हर्सरी आणि दोन ख्रिसमस संपले तरी अंगठी काही मिळाली नाहीये. तुम्ही म्हणाल 'ख्रिसमस का'?  तर? इथे याच वेळेत अशा अंगठ्याच्या जाहिरातींचा भडीमार होतो आणि त्यात हा व्हिडीओ. पोरांना डब्यांत देण्यासाठी गरम गरम पराठे करुन रागारागाने  मी ते डबे आपटले. मग काय ना? इतकी कर्तव्यदक्ष, कष्टाळू बायकोची काही किंमतच नाही!!

          आमचं भांडण झाल्याने दिवसभर बोलणं तर होत नव्हतंच. त्यात पुढे माहिती येतच होती. मीही ऑफिसमध्ये दुसरं काही काम नसल्याने सर्व एकदम फॉलो करत होते. अगदी त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंग प्लँनर पासून. आता हिच्या नवऱ्याचं नाव काय, तो काय करतो आणि त्यांची स्टोरी पण आम्ही वाचायची. तर त्यांच्या प्लॅनरने म्हणे स्वतःच्याआई-वडिलांनाही सांगितलं नव्हतं ती इटलीला जाऊन आली तरी, की ती कशावर काम करत आहे? म्हटलं, "नसतं कौतुक. आम्ही इथे अमेरिकेत येऊन ढिगाने प्रोजेक्ट केले, आले कधी आणि गेले कधी. आमच्या आई-बाबांनी 'बरे आहात ना?' आणि 'काम कसंय' या पलीकडे एक प्रश्न विचारला नाही.".जाऊ दे. 

        तर त्या दुपारी नवीन आलेल्या फोटोच्या लॉटमध्ये इटलीच्या डेस्टिनेशनचे सुंदर फोटो होते. इतकी चिडचिड झाली सांगू. आजतागायत प्रत्येक वेळी ट्रीपला जायचं म्हणजे नुसता वैताग येतो. एकतर कधी वेळेत ठरवत नाहीच आम्ही, कुठे जायचं ते. वेळेत उठणं, सामान बांधून जिथे जायचं तिथे वेळेत पोहोचणं म्हणजे जीव अर्धमेला झालेला असतो. त्यात पोरांचे खाणे-शी-शू- झोप वगैरे पाहणे आलेच. मग अगदी शेवटी ठरवल्याने अख्खा गाव पोहोचल्याने भयंकर गर्दी झालेली असतेच, ट्राफिक वाढलेली असतेच. एखाद्या ठिकाणी जाऊन खूप मजा केलीय असं नाहीच मुळी. भारतात असताना अगदी त्या मॅप्रो गार्डनला वेळेत गेलो तरी मिळवलं. त्यातही  आम्ही जातो तेंव्हाच ढगफुटी व्हावी तसा पाऊस पडत असतो. वाटलं, मला पण दिवसभर असं एक माणूस पाहिजे हाताशी, प्लॅनर! सर्व कसं टापटीप, वेळेत आणि हो,एकही वस्तू न विसरता जाऊन परत घेऊन येणारा. लै धावपळ होते हो. विचार चालूच होते, इतक्यात जोडप्याचे हनीमूनचे फोटोही आलेच लगेच. मी आपलं दुकान(लॅपटॉप) बंद करुन घरी आले.

         कितीही म्हटलं तरी असली फिल्मी भांडणं विसरुन आपल्या कामाला लागलेलंच बरं असतं, हे मला दीपिका आणि रणबीर, कतरीना आणि रणबीरच्या प्रकरणानंतर कळलं होतंच. तरीही मधेच रणवीर आणि दीपिकाचे फोटो आले की माझे टॉन्ट येत असतातच. ते झेलून नवराही मुकाट्याने सोडून देतो. आता त्यांच्या इतक्या जोड्या बदलल्या तरी आम्ही कसे 'गोइंग स्ट्रॉंग' आहोत यावर नवऱ्याने काही कमेंट केली नाहीये हे माझं नशीबच म्हणायचं. तरीही कधी बोलला तर,"मलाही काही कमी ऑप्शन नव्हते" असा डायलॉग मी तयार ठेवला आहेच. संध्याकाळी आम्ही नेहमीसारखं आवरलं. कांदाही त्यालाच कापायचा असल्याने रडू लपवणे वगैरे प्रकार मला करता आले नसतेच. भांडण करायचं नाहीच असं ठरवून एकदम गप्प बसले. रात्री सर्व काम उकरुन आम्ही आपापले फोन समोर बसलो होतो. तेव्हा मधेच नवरा 'फनी व्हिडीओ' आणि फॉरवर्डेड जोक्स वाचून जोरजोरात हसत होता. सकाळी झालेल्या भांडणाने त्याच्यावर काडीचाही परिणाम झालेला नाहीये हे बघून इतका संताप झाला त्याच्यावर. 

      तेव्हढ्यात 'विराट गिव्हींग बॉयफ्रेंड गोल्स' नावाचा का काहीतरी व्हिडीओ माझ्या फेबुवर सुरु झाला. त्या व्हिडीओ मध्ये विराटने ब्रेकअप झाल्यावरही कसा अनुष्काला सपोर्ट करण्यासाठी जाहीरपणे ट्विट केलं यावर, तर 'वुमन्स डे' ला पोस्ट केलेल्या आई आणि अनुष्काच्या सोबतच्या पोस्टवर छान कमेंट लिहिली होती हे सर्व सर्व काही दिलं होतं. तुम्हाला सांगते, असा राग आला होता माझ्या नवऱ्याचा. इथे बायको भांडून, स्वतःच स्वतःला समजावून पुन्हा नॉर्मल वागायला लागली तरी या नवऱ्याला काहीही फरक पडला नव्हता. त्याचं जोक्स वाचून हसणं चालूच होतं. पुढे जाऊन शिवाय फॅमिली, फास्ट फ्रेंड्स, फ्रेंड्स फॉरेव्हर वगैरे सर्व ग्रुपवर तेच जोक्स फॉरवर्ड करायलाही कमी ठेवली नव्हती. 

आणि जोक तरी काय हो? "फक्त ५० लोक लग्नाला? इतके तर आमच्याकडे लग्नाला रुसतात". 
बरोबर, यांच्या घरचे लोक ना? असणारच तसले. 
इतका झापला त्याला. म्हटलं, "इथं साधं तुझ्या आईसोबत भांडण झालं तरी माझी बाजू घ्यायला नको तुला. कधी कुणी मला काही बोललं म्हणून सांगितलं तर लगेच म्हणतोस, जाऊ दे ना?  कधी बायकोची बाजू घेऊन माहीतच नाही. मग अख्ख्या ट्विटरवर ट्रोलर्सशी भांडण तर जाऊच दे. मेलं, नशीबच फुटकं."

तर म्हणतो कसा? "हुशार आहे तो. तिची बाजू घेऊन बोलला ट्विटरवर म्हणून परत मिळाली त्याला. आणि बायकोचा एकटीचा फोटो पोस्ट नाही केला त्याने, आईचाही केलाच ना?".

"हो बरोबर तू तेव्हढेच बघणार?", मी.  
त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. अजून आमच्या लग्नातली अर्धवट राहिलेली भांडणं सुरु झाली असती. बरंच काही होतं बोलण्यासारखं पण दमले होते. मी आपली पुन्हा फोनमध्ये घुसले. पुन्हा अजून काही पोस्ट दिसायला लागल्यावर मात्र माझी चिडचिड झाली. च्या मारी, यांची मजा आणि आमचं भांडण. त्यातही त्रास फक्त मलाच. रागाने फोन आपटून बंद करुन टाकला आणि लवकर झोपायला गेले. रात्री कधीतरी येऊन त्याने माझ्या पोटावर हात घेऊन जवळ ओढून घेतलं, मीही सवयीने त्याच्या हातावर हात ठेवला आणि झोपून गेले. 

         लवकर झोपल्यामुळे निदान झोप तरी पूर्ण झाली. सकाळी शांतपणे आवरत विचार केला, म्हटलं जाऊ दे, नव्या लग्नाचे नऊ दिवस झाले की त्यांच्या भांडणांचे गॉसिप वाटायला परत येईनच. आधी १० वर्षं लग्न टिकवून तरी ठेवा म्हणावं. ऑफिसमध्ये, सकाळच्या मेल चेक करुन झाल्यावर, बॉलीवूड मॉर्निंग अपडेट मध्ये शाहिद आणि मीराच्या मॅचिंग ड्रेसचा फोटो आला होता. ऍनिव्हर्सरीला असाच एखादा मॅचिंग ड्रेसमध्ये फोटो काढायची खूप इच्छा होती. त्याची प्लॅनिंग मी आतापासूनच सुरु केली आहे. :)

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, December 10, 2017

लेट इट स्नो

         या वर्षातला पहिला स्नो पडला आणि पुन्हा एकदा चेहऱ्यावर हसू उमटलं. कधी कधी आपण पाहतोय ते खरंच घडतंय याच्यावर विश्वास बसत नाही. वर आकाशाकडे बघत आहे आणि छोटे छोटे कण एकदम अलगद जमिनीकडे येत आहेत. सुरुवातीचे काही मिनिट ते कण जमिनीवर पडताच विरघळून जातात आणि त्यांचं अस्तित्व राहातच नाही. पण हळूहळू सलग १-२ तास ते येत राहतात. त्यांना पावसासारखा आवाज नसतो की कधी जोरात येणाऱ्या गारांची तीव्रता. अगदी कापसाचे बारीक कण अलगद तरंगत जमिनीवर हळुवार टेकावेत असे ते शांतपणे साचत राहतात. आणि लवकरच एक पांढरा शुभ्र थर गवतावर किंवा रस्त्यावर दिसू लागतो. गेल्या दहा वर्षात माझ्या अमेरीकेतील वास्तव्यात हे असे अनेक 'स्नो फॉल' मी पाहिले असतील पण त्यातील नावीन्य अजूनही जात नाही.

           माझ्या कुतुहलात कदाचित माझ्या मराठीपणाचा त्यात मोठा हात असेल. मी हे बोलतेय ते 'प्रत्येक गोष्टीत मराठीपणा कसा आणावा' या सवयीमुळे नाही. विचार करा, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त थंड हवेचे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर किंवा पाचगणी यांच्या पलीकडे कधीही काही पाहिले नव्हते. त्यामुळे थंडी थंडी म्हणजे किती असू शकते याचा कधी अनुभवच घेतला नव्हता. हिंदी सिनेमात पाहायचे तेव्हा मला नेहमी प्रश्न पडायचा, हे इतकं छान ऊन असताना तो बर्फ वितळत का नाही? इतका साचून कसा काय राहू शकतो? त्यात भरीला म्हणून हिरोईनचे कपडेही छोटेच त्यामुळे तिथे थंडी असेल अशी कणभरही शंका वाटायची नाही. तेव्हापासून असलेले हे अनेक प्रश्न आणि आकर्षण यामुळे आजही स्नो पडायला लागला की त्याच्याकडे बघत बसावेसे वाटते.

         निदान आज माझ्यासारख्या अनेक लोकांची एक शंका तरी दूर करते. स्नो पडतो तेव्हा आणि विशेषतः त्याच्यानंतर खूप थंडी असतेच. हिरोईन च्या कपड्याकडे बघून थंडीचा अंदाज लावू नये. उन्हांबद्दल बोलायचे तर, ते केवळ दिखाव्याचे असते असे म्हणायला हरकत नाही. तापमान शून्याच्या खाली असल्याने ऊन असूनही तो बर्फ वितळत नाही. तापमान शून्याच्या वर जाऊ लागते आणि उन्हाची तीव्रता वाढते तसे तो बर्फ वितळू लागतो. असो. हे झाले प्रश्नांचे उत्तर. पण खरी मजा येते ती स्नो पडताना बघायला आणि त्यानंतरचे बर्फाच्छादित निसर्गसौन्दर्य बघायला. अनेकवेळा सलग दिवसभरही हिमवर्षाव झालेला मी अनुभवला आहे. त्यामध्ये जमिनीवरचा थर वाढत जातो.आणि आक्खे शहर सफेद होऊन जाते. आपल्या घराच्या खिडकीतून जितके दूरपर्यंत पाहता येईल तितके पाहत घरातल्या उबीत बसून राहते. पण कधी ना कधी बाहेर पडायला लागणारच असतं......

              बाहेर पडायचं तर ट्रेन, बसने जाण्याचे वेगळे अनुभव तर गाडीने जाण्याचे वेगळे. बाहेर पडताना गाडी असेल तर गाडीच्या वरचा स्नो काढणे, आजूबाजूचा काढणे हे सर्व प्रकार करावे लागतात. हातात खोऱ्यासारखे स्नो-स्क्रॅपर घेऊन गाडीवरचा स्नो ढकलून काढावा लागतो. त्यासाठी हातात कितीही जाड मोजे घातलेले असले तरी हात गारठून जातातच. कधी कधी फुटभरापेक्षा जास्त बर्फ जमलेला असतो. अशावेळी गाडीवरचा काढून भागत नाही, आजूबाजूचाही काढावा लागतो. एकदा एका मोठ्या स्टॉर्म मध्ये ऑफिसमधून बाहेर पडताना कळतंच नव्हतं की माझी गाडी कुठली आहे. एव्हढ्या मोठ्या पार्किंगमध्ये सर्वच गाड्या पांढऱ्याशुभ्र झाल्या होत्या. बराच वेळ साफ केल्यावर कळलं ती माझ्या शेजारची गाडी होती. चिडचिड नुसती. 

           गाडीत बसणे, ती गरम करून सुरु करणे यासारखी कामे करून एकदाची सुरु झाली की पुढे गाडी चालवणे हेही संकट असतेच. रस्ते तसे भराभर साफ केले जातात तरीही वादळ असेल तर स्नो सलग पडतच राहतो आणि गाडी चालवणे (कार) अतिशय अवघड होऊन जाते. अशाच वेळी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. कदाचित आमच्या हवामान खात्याचे अंदाज दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळेही असेल, आम्ही अशाच वादळात बाहेर पडलो आणि दोन-तीन वेळा आमची गाडीही चालवताना घसरलीही आहे. समोरून सरळ जाणारी गाडी अचानक सरकून दुसऱ्या बाजूच्या लेनमध्ये गेल्याने झालेले अपघातही पाहिले आहेत. आता शक्यतो स्नो पडला की घरी बसतो. गप्प घरात बसतो. :) एकूण काय तर सुंदर दिसणाऱ्या या बर्फाची अनेक भयानक रूपेही आहेत. 

          हायवे वर गाड्या बंद पडून गारठलेले लोक, अपघात, लाईट गेल्यावर हीटिंग बंद पडून लोकांचे होणारे हाल. मी एका प्रोजेक्ट्साठी २ महिने न्यू जर्सीला होते. बसने येऊन जाऊन करायचे. एक बस चुकली की अर्धा तास अशा थंडीत काढायचा म्हणजे नको वाटायचं. त्यात असेच एका वादळानंतर घरातून बाहेर पडले. बसस्टॉपला येईपर्यंत बर्फ बुटात जाऊन त्यांचं पाणी झालं होतं. दिवसभर तसेच ओले झालेले थंड पाय घेऊन ऑफिसात बसावं लागलं होतं. प्रेग्नंट असताना बर्फात घसरून पडायची खूप भीती वाटायची. नवऱ्याचा हात धरून अलगद चालत राहायचे. अर्थात हे सर्व झाल्याला ७-८ वर्षे उलटली. पण प्रत्येक हिवाळ्याच्या अशा अनेक आठवणी आहेत. आणि प्रत्येक वर्षी पावसात जसे आपल्याकडे कवींची भरती येते तशी प्रत्येक स्नो-फॉल मध्ये माझ्या या आठवणींची गर्दी होते. गेल्यावर्षी अनुभवात स्कीईंगची भर पडली होती आणि घरातून दिसणाऱ्या ऊंच ऊंच झाडांवर साचलेल्या बर्फाच्या अविस्मरणीय दृश्यांची. 

        निसर्गसौन्दर्य म्हणजे तरी काय? आणि तेही किती अविस्मरणीय !! झाडांची सर्व पाने झडून गेलेली असतात त्यामुळे केवळ सुकलेल्या फांद्या राहतात. हळूहळू करत त्या काळ्या फांद्यांवर सफेद बर्फ जमा होतो. थंडीने त्याला काचेसारखी पारदर्शकताही येते. गवत असलेली सर्व जमीन पांढरीशुभ्र झालेली असते आणि त्यात कुठेही असमानता दिसत नाही. इतका एकसलग बर्फ कसा काय साठू शकतो? त्यात चुकून बोटही घालायची इच्छा होत नाही इतके ते पर्फेक्ट असते. चालताना त्यात उठणारी पावलं समुद्राची आठवण करून देतात रेतीसारखे ठसे पाहून. इतके सुंदर दृष्य आणि त्यात डिसेंबर मध्ये येणारा ख्रिस्तमस अजून भर घालतो. ठिकठिकाणी केलेली रोषणाई, दुकानातून लावलेले डेकोरेशन्स, सजलेले डाऊनटाऊन, जिंगल करणाऱ्या बेल्स, टीव्हीवर येणारे ख्रिस्तमसचे चित्रपट, हॉट चॉकलेट, वेगवेगळे कुकीज-केक्स.... अशा अनेक गोष्टी हा ऋतू उजळून टाकतात. 

      आजपर्यंत अनेकवेळा मी आवडता ऋतू कोणता यावर शाळेत निबंध लिहिलाय. भारतात उन्हाळा, पावसाळा आणि उन्हाळ्याचे आपआपले आवडते-नावडते रूपही पाहिले आहे. पण इथला हिवाळा वेगळाच, स्वतःची वेगळी ओळख दाखवणारा. मुलांना त्यात खेळायला खूप छान वाटते. कधी एकदा बर्फ पडतोय असं झालेलं असतं त्यांना. इतके वर्षे आणि इतक्या आठवणी असूनही बर्फ पडल्यावर बाहेर जाऊन त्याच्यात खेळण्याची उत्स्फूर्त इच्छा उफाळून येत नाही. मुलं हट्ट करतात, त्यांना ढीगभर कपडे घालून बाहेर जाऊ देते. दर थोड्या वेळाने आत बोलावत राहते. बाहेर पडावंच लागलं तर स्वतःही जमेल तितके गरम कपडे घालून जाते. किंवा खूपच सुंदर दिसतंय म्हणून घरातूनच किंवा दारातून फोटो काढून घेते. मुलं समोर आहे त्याचा आनंद घेत असतात. मी मात्र समोर असूनही त्या बर्फाला, चोप्रांच्या चित्रपटांसारखी दुरूनच एन्जॉय करते. :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Thursday, November 30, 2017

रुंबा

    काल आमच्या घरी एक नवीन मशीन आलं, iROBOT Roomba. गेल्या दोनेक वर्षांपासून ऐकलं होतं आणि लोकांकडे पाहिलंही होतं. खरं सांगायचं तर कॉलेजपासून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हा माझा आवडता विषय. माणसाचा मेंदू एका सेकंदात किती विचार करतो आणि किती निर्णय घेतो याचा अंदाज AI शिकताना येतो. समजा, तुम्ही गाडी घेऊन एका चौकात उभे आहात, आता तुमचा ग्रीन सिग्नल लागणार पुढच्या पाच सेकंदांत, समोरच्या बाजूचे लोक अजूनही जात आहेतच, शेजारी उभा राहिलेला गाडीवाला नुसता पेटलाय कधी एकदा रस्ता पार करतोय यासाठी, तुम्ही त्याच्याकडे, त्याच्या मागे असलेल्या मुलीकडे, समोर उभ्या असलेल्या काकूंकडे बघता. आता सिग्नल ग्रीन झाल्यावर आपण गाडी दामटेपर्यंत अनेक निरीक्षणं करुन, गाडी किती वेगात सुरु करायची आणि कुठून काढायची, तिथून निघून पुढे जिथे जायचं आहे तिथे पोहोचायला किती वेळ लागेल इथंपर्यंत सर्व विचार एका सेकंदात होऊ शकतात. 
        आता हेच सर्व एका मशीनला करायचं असेल तर? प्रत्येक शक्यता पडताळून, आजूबाजूचं अंतर मोजून, बाजूच्या लोकांच्या वेगाचा अंदाज घेत एक सिग्नल पार करण्यासाठी एक मशीन बनवायचं झालं तर त्यात लाखो, करोडो शक्यता त्या मशीनला फीड कराव्या लागतील आणि त्यासर्वांतून त्याने योग्य ती सिलेक्ट करुन पुढे जावं लागेल. हे मशीन बनवण्यासाठी किती वेळ लागेल माहित नाही(गूगलला विचारावं लागेल त्यांच्या 'मॅनफ्री' कार बद्दल. तर एकूण काय की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खायचं काम नाहीये. 
       आता गोल गोल फिरणारं चक्रासारखं जमिनीवरचा कचरा साफ करण्यासाठी असलेलं हे मशीन जे आमच्याकडे फायनली घेतलं त्याचंही असंच आहे. त्याला घरातल्या पसाऱ्याचा, वस्तूंचा आणि खुर्ची वगैरेचा अंदाज घेऊन साफ करायला एक तासभर लागतो, त्यातही मधेच तो आपली लाईन सोडून वाकडा चालत जाऊन दुसऱ्या खोलीत घुसतो आणि माझ्यातल्या थोड्याफार 'शिस्तप्रिय' व्यक्तीला त्याचा त्रास होतोच. एक रूम आधी कर ना ! सारखे माझे विचार गप गिळावे लागतात. आज माझी एक काळी मेटलची क्लिप गिळून अडकून बसल्यावर तक्रार केलीच. चार वेळा रीसेट करुनही का चालत नाही म्हटल्यावर ती चेक केलं तर क्लिप मिळाली. ती क्लिप मीच उचलायची तर मग हे मशीन कशाला ना? या असल्याचं कारणांनी आजवर तो घेतला नव्हता. असो. 
       शेवटी आणलाच आहे. आता तो आल्यापासून आमच्या घरात मी सोडून तीन वक्ती जरा जास्तच उत्साहात आहेत, कोण ते सांगायला नकोच. नवऱ्याने त्याचा लगेच फोनवर, वायफाय वर सेटअप केला तर मुलं स्वतःच तो उचलून उचलून त्यांना हव्या त्या ठिकाणी तो ठेवत आहेत. आपणच त्याच्या मागे फिरत कचरा उचलतो की नाही बघत आहेत. या सर्वात माझी चिडचिड एका गोष्टीवर होत आहे ती म्हणजे मुलांची त्या मशिनप्रती वागणूक. ते जणू आपल्या घरातील पाळीव प्राणीच आहे असं वागत आहेत. तेच कशाला काल मीही नवऱ्याला म्हणाले की,"त्याला आता तिकडच्या खोलीत नेऊन सोड'. आज मुलीने शाळेत सांगितलंही, आमच्याकडे नवीन 'पेट' आणलं आहे रुंबा नावाचं.

       नजीकच्या काळात रोबॉट, किंवा उत्तर देणारी मशिन्स, प्रोग्रॅम्स वाढलेत आणि ते वाढतच राहतील. हळूहळू त्यांची 'इंटरऍक्टिव्ह' असण्याची शक्ती वाढेल तसे लोकांशी बोलणं, वगैरे वाढत जाईल. आजवर काही बेसिक गोष्टी होत्या, उदा: पूर्वी अलार्म क्लॉक होतं, आता फोन किंवा मायक्रोवेव्ह सारखी उपकरणं असतात. त्यांच्याशी बोलणारे लोक पाहिलेत मी. आमचा मायक्रोवेव्ह किंवा वॊशिंग मशीन एकदा काम झालं की दर मिनिटाला ओरडत राहतो, मीही वैतागून 'गप रे !' म्हणते. हे बघून माझी मुलगीही एकदा अशीच सकाळी ओरडली होती मायक्रोवेव्ह वाजला तेव्हा. पुढे एका मित्रांकडे गेलो तर तिथे 'ऍलेक्सा' होती.ती म्हणजे, अमेझॉनचं तुमच्याशी बोलणारं मशीन. 'ऍलेक्सा, किती वाजलेत?' म्हटलं की ते सांगणार. मुलांनां सुरुवातीला त्याचं कौतुक वाटलं पण नंतर त्यांनी, 'अलेक्सा' म्हणून खेकसून बोलायला सुरुवात केली. खूप चिडले होते मी ते पाहून. 

      पुढे अशाच काही ठिकाणी अनुभव आले जिथे मशीनवर खेकसून बोललं जाताना पाहिलं. त्यामुळे ते घरात नकोच असं वाटलं. एकदा मुलाने मला विचारलं होतं,'आई व्हाय डू यु हेट सीरी? ती तुझ्यापेक्षा स्मार्ट आहे म्हणून का?" त्याला काय उत्तर द्यावं कळलं नाही. :) कारण माझ्यापेक्षा हुशार लोक मला आवडत नाहीत हे त्याने कुठून जाणलं असेल याचा विचार मी करत होते. :) असो. तर एकूणच आपल्याला उलट उत्तर न देणाऱ्या वस्तूवर, व्यक्तीवर वाढलेला उद्धटपणा मला अजिबातच आवडला नव्हता आणि नाहीये. हेच त्यांचं मी प्राण्यांच्या बाबतीतही पाहिलं आहे, बरीच मुलं पाळीव प्राणी हवाय म्हणतात पण घरी असल्यावर त्याला त्रासही देतात. किंवा ऑर्डर सोडल्यासारखे बोलतात,"डॉगी सिट!" वगैरे. हा उद्धटपणा वाढतच जातो कारण ते प्राणी उलटून उत्तर देत नाहीत. पुढे जाऊन सांगायचं तर घरात कामाला येणाऱ्या मावशी किंवा घरकामासाठी कायमस्वरुपी ज्यांच्याकडे लोक असतात त्यांची मुलं त्या लोकांशीही अशीच वागताना पाहिलीत. आम्हालाही मुलांना मावशींशी नीट बोलण्यासाठी रागवावे लागले आहे. आई-वडील घरातील एकाद्या मोठ्या व्यक्तीला मान देत नसतील तर मुलंही तशीच वागतात हेही पाहिलं आहे. 

       मुलं मोठी होईपर्यंत हे मशीन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेली उपकरणं वाढतच जाणार आहे.  लहान असताना, मोठ्यांशी आदराने वागायचं, उलट उत्तर द्यायचं नाही हे शिकवलं जायचं.आजच्या पिढीतल्या मुलांना या गोष्टी शिकवणं अजूनच अवघड जाणार आहे. व्यक्तीचा आदर, पाळीव प्राण्यांना योग्य वागणूक वगैरे तर शिकवावं लागेलच . शिवाय आता ही मशीन्सही. टेक्नॉलॉजि वापरु नये असं मी म्हणणार नाहीच, पण त्यातून मुलांवर होणारे संस्कार बदलत नाहीयेत ना हे नक्कीच पाहायला हवं. हे मीच नाही तर इथे अनेक लोकांचं निरीक्षण आहे. आपल्या घरात अशा गोष्टी आणतांना या सर्व गोष्टींची जाणीव आपण ठेवावी लागेल. मुलांच्या वागण्यात थोडाफार जरी फरक जाणवला तर योग्य तेंव्हा त्यांनाही त्या गोष्टींची जाणीव करुन दिली पाहिजे. असो. त्यासाठी मलाही आमच्या घरातल्या मायक्रोवेव्हवर ओरडणं बंद करायला लागेल. :) आणि तुम्हालाही 'प्लिज होल्ड द लाईन' म्हणणाऱ्या ऑटोमेटेड आवाजाला "नाही करणारा जा" म्हणणं बंद करावं लागेल. 

https://media.tenor.com/images/4f6c04229c827878f82c3b786ca31e9e/tenor.gif

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, November 28, 2017

जिव्हाळ्याच्या गोष्टी

       आज पिठलं बनवत होते, गाठीचं, म्हणजे ज्यात बारीक बारीक गाठी दिसतात असं. मला ते घोटलेलं आवडत नाही. असो. तर ते बनवताना त्यात मी भरडलेले शेंगदाणे टाकते. ते माझ्याकडे असलेल्या कुटामधून निवडून टाकत होते. त्यावरून पुढे मग बरंच काही आठवलं. आणि वाटलं 'शेंगदाणे' या जिव्हाळ्याच्या विषयावर आपण अजून लिहिलं कसं नाहीये? म्हणून सुरुवातीपासून सुरवात करतेय. 
       तर शेंगदाणे सासरी आणि माहेरीही जिवाभावाचा विषय. आम्ही शाळेत असताना आमच्या शेतात भुईमूग लावला जायचा. त्यात पावसाळ्यात निघणाऱ्या भुईमुगाच्या विशेष आठवणी आहेत. काढलेल्या शेंगा घरी आल्यावर सुकवणे म्हणजे कठीण काम. कधी बायकांकडून शेंगा काढून आणलेल्या असायच्या तर कधी डहाळ्यांच्या शेंगा तोडून काढलेलंही आठवतं. दारात सुकायला टाकायच्या म्हटलं तरी पावसाकडे सारखं लक्ष ठेवायला लागायचं. पाऊस आला की ती ताडपद्री, पोती पटापट आत उचलून न्यायला लागायची. आणि मग ओल्या झाल्या शेंगा तर कधी भुरा आला की अजून चिडचिड. एकूणच ते चिखल असलेल्या शेंगा म्हटलं की नको वाटायचं. तरीही पावसाळ्यात भाजलेल्या शेंगा खाल्ल्या जायच्याच. :) 
        एकदा शेंगा सुकल्या की मग वर्षभर त्याच वापरात यायच्या. शनिवार- रविवारी, आई शेंगा घेऊन बसायची, आम्हाला खूप राग यायचा, पिक्चर बघताना शेंगा सोलायला लागतात म्हणून. पण पिक्चर संपेपर्यंत भांडंभर दाणे होऊन जायचे. शिवाय त्यात शनिवार असेल तर उपवासाच्या खिचडीसाठी कूटही करून व्हायचा. कूट बनवतानाही मला तेव्हाची आठवण येते. दादांना खिचडीत दाण्याचे कण आलेले आवडत नाहीत त्यामुळे त्याच्या खिचडीचा कूट बारीक असतो एकदम. तर सोमवारी आईच्या उपवासाच्या खिचडीत भरडलेला कूट असायचा जो मला आवडतो. असो. ओल्या शेंगा घरी आल्यावर त्या मोठ्या भांड्यामधे मीठ घालून शिजवून, सुकवल्या जायच्या. अशा सुकलेल्या शेंगांचे दाणे इतके भारी लागायचे. दादा नेहमी खायचे आणि अर्थातच आम्हीही. कोरेगांव मध्ये तेलाच्या गिरणही आहेत. एकदा तर दिवाळीला घरच्या शेंगदाण्याचे तेलही बनवून आणले होते. अर्थातच आता घरी शेंगतेल वापरले जात नाहीच, तब्येतीच्या कारणांनीं. पण अशा काही लहानपणीच्या आठवणी शेंगदाण्याचा. 
        सासरीही जवळजवळ सर्वच भाज्यांत शेंगदाणे किंवा कूट वापरला जातो. बाय द वे, आमच्याकडे 'दाणे' म्हणत नाहीत, 'शेंगदाणे'च म्हणतात. :) असो. तर नवऱ्यालाही कशातही शेंगदाणे घातलेले चालतात. मला वाटतं जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक पोह्यांमधले शेंगदाणे आवडीने खाणारे आणि दुसरे न खाणारे. :) मला वाटतं की सतत दाणे तोंडात येत असल्याने पोह्यांची चव जाते, तर नवऱ्याला वाटतं की प्रत्येक घासात दोन-चार दाणे तरी आलेच पाहिजे. त्याचा एक साऊथ इंडियन मित्र म्हणतो की, 'तू काय चहातही शेंगदाणे घालून खाशील'. तर कुठल्या भाज्या किंवा पदार्थांत किती प्रमाणात शेंगदाणे किंवा कूट घातला पाहिजे या गोष्टीवर अनेकवेळा काथ्याकूट होतोच. उदा: उपिटात शेंगदाणे घालायचे की नाही? वाटाणा-बटाटा-फ्लॉवर भाजीत कूट घालायचा की नाही, वगैरे. एकदा एका मैत्रिणीकडे त्याला भेंडीची भाजी आवडली होती. घरी आल्यावर म्हणाला, 'छान झाली होती'. का? तर अर्थातच त्यात कूट घातला होता. :) सासर जळगावचं असल्याने एक गोष्ट मात्र नक्की सवयीची झाली ती म्हणजे वांग्याच्या भरतात घातले जाणारे शेंगदाणे. आमच्याकडे घालत नाहीत. पण खानदेशी भरीत आवडीने खाते आणि बनवले तरी तसेच बनवते. 
         इथे माझ्याकडे शेंगदाणे एकदा भाजले की त्याचा लगेचच कूट करावा लागतो, नाहीतर नंतर कूट करायला काहीही शिल्लक राहात नाही. कारण पॅन्ट्री मध्ये त्या डब्याशेजारीच गुळाची ढेपही असते. :) त्यामुळे भाजतानाच जे काही मिळतील ते. मुलंही शेंगदाणे भाजायला घेतले की एकदम धावत येतात, अर्थातच बाबावर गेलेत हे सांगायची संधी मी सोडत नाही. कूट करण्यातही ठराविक आवडीनिवडी असतात. वर म्हणाले तसे, आईला भरडलेला आवडतो, तर वडिलांना बारीक, सासूबाई दाणे कमी तावावर भाजतात, त्यांना जास्त काळपट रंगाचा कूट आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या दाण्यांचा कूट एकदम सफेद आणि एकसारखा बारीक केलेला असतो. काही लोकांना मायक्रोवेव्ह मध्ये भाजतानाही पाहिले आहे. मला मात्र भांड्यात आणि थोडे जास्त भाजलेले दाणे आवडतात. त्यांच्या कुटामुळे वांग्याची भाजी किंवा सिमला मिरचीची सुकी भाजी वगैरेला छान रंग येतो. नाहीतर कूट सफेद असेल तर भाजीचा रंग ही फिका होतो असे मला वाटते. त्यात, नवऱ्याचं म्हणणं असतं की कशाला ती टरफलं सोलायची, मला मात्र तसाच कूट करणं जमत नाही. अगदीच घाई असेल तरच केला जातो. 
       अर्थात आमच्या घरात शेंगदाणे किंवा कूट नाही म्हणजे 'आणीबाणी' च  आहे असं मानलं जातं हे वेगळं सांगायला नको. काही वर्षांपूर्वी शेंगदाणे खूप महाग झाले होते. अगदी बदाम आणि शेंगदाण्याची किंमत एकच झाली होती. सोळा डॉलरचे ४ पौंड(म्हणजे दोन किलोही नाही). फार वाईट दिवस होते, त्याने घरात शेंगदाणे आणणं कमी झालं नव्हतंच, तरीही झळ लागली होतीच. भारतात गेले की सासूबाई हमखास विचारतात, 'तुला न्यायला कूट करुन देऊ का?'. मी त्यांना सांगत राहते की असतो माझ्याकडे, तुम्ही काळजी करु नका. :) वडील महाबळेश्वरला गेले की तिथं जे मीठ लावून भाजलेले शेंगदाणे मिळतात ते खास जावयासाठी घेऊन येतात. आणि हो, शेंगदाण्याची सर्व प्रकारची चिक्की. (किती ते लाड त्याचे, वगैरे डोळे फिरवणारा स्मायली टाकला पाहिजे इथे. असो.) 
        वर सुरुवात करताना म्हटलं होतं ना, माझ्या पिठल्यात भरडलेले शेंगदाणे टाकत होते. तर तुम्हीही टाकून बघा. माझ्या आजोळी सांगलीला जे पिठलं करतात ना त्यात असायचे, तर आईकडे पिठलं भाकरीसोबत बाजूला घेऊन खायचे. मी मात्र त्यातच घालते. तर त्या पिठल्यावरुन इतकं सगळं रामायण लिहिलं. पण असतात अशा जिव्हाळ्याच्या गोष्टी, ज्याच्या त्याच्या. :) तुमच्याही असतीलच. 

विद्या भुतकर. 

Sunday, November 26, 2017

स्वप्नपूर्ती

       हा वीकेंड मध्ये अमेरिकेतील खरेदीचा मोठा इव्हेन्ट म्हणजे 'ब्लॅक फ्रायडे' होता. तो खरंतर इथल्या 'थँक्स गिव्हिंग' या सणाच्या (गुरुवारच्या) दुसऱ्या दिवशी असतो(अर्थातच फ्रायडे कम्स आफ्टर थर्सडे !). पण झालंय काय, इथल्या मोठं मोठ्या रीटेल दुकानांच्या सेलच्या जाहिरातींमुळे मुळात खास घरातील जवळच्या माणसांबद्दल असलेला हा सण गर्दी, पैसे आणि खरेदीसाठी असलेल्या लांबलचक रांगांमध्ये हरवून गेलाय. गुरुवारी खरंतर अनेक लोक आपल्या घरी/गावी परत जातात, मोठाली पंगत होते, जे कोणी आदरातिथ्य करत आहे ती व्यक्ती सर्व जेवण बनवते, वगैरे. 
        आता हा गुरुवारचा दिवस संपला की शुक्रवारी खरेदी असेल तर समजूही शकतो. पण लोकांनी आजकाल गुरुवारी संध्याकाळपासूनच दुकानं उघडी ठेवायला सुरुवात केलीय. त्यात बंपर सेल्स लावलेत. त्यामुळे, यातील अनेक मध्यमवर्गीय लोक समजा मॉल मध्ये काम करत असतील तर त्यांना बिचाऱ्यांना घरातील लोकांसोबत जेवण करुन लगेच कामावर जावे लागणार किंवा जो घरी राहण्याचा आनंद आहे तो घ्यायचा असेल तर खरेदीला मुकावं लागणार. एकूण काय तर १५ ऑगस्टला पावसाळी सेलसाठी गर्दी करण्यासारखा हा प्रकार. असो. 
          आम्ही अमेरिकन नसल्याने कुठलेही बंधन नसून, अगदी गुरवारपासूनच खरेदीला जायचो पूर्वी. त्यात मग एखादी वस्तू स्वस्तात मिळाली की खूप आनंद मिळायचा. हे सगळं हळूहळू कमी होत गेलं. याला दोन कारणं, बरेचसे सेल खरेतर लोकांना फसवणारे असतात. त्यापेक्षा कमी किमतीत तीच वस्तू आधी किंवा नंतर मिळू शकते. उदा: थंडी संपल्यावर स्वेटर्सचा असणारा सेल. आणि दुसरे म्हणजे केवळ सेल आहे म्हणून उगाचच नको आहेत त्या गोष्टीही खरेदी केल्या जातात. मग उगाच सोमवारी पैसे खर्च केल्याचा पश्चाताप होतो. त्यामुळे अगदी खरेच हवे असेल काही आणि खरेच त्याची किंमत एरवीपेक्षा कमी असेल तरच ते घ्यायचं असं अगदी ठरवून, ठराविकच गोष्टी घेतल्या. 
         आता हे सर्व पारायण ऐकवण्याचं कारण म्हणजे, अनेकवेळा मागे वळून बघते तेव्हा 'लहानपणापासून पाहिलेली स्वप्नं' हा आयुष्याचा एक मोठा भाग दिसतो. पुढे जाऊन त्यातील काही स्वप्नं खरंच पूर्ण झाली हा विचार केला तर अजून आनंद वाटतो. त्यामध्ये इतक्या ठराविक गोष्टी होत्या. उदा: शाळेत असताना शेजारच्या मुलीचं आहे तसलंच दप्तर आपलंही असावं किंवा एखादा तेंव्हा मिळणारा कंपास बॉक्स किंवा ठराविक ब्रँडची सायकल. तेंव्हा माझ्या मैत्रिणीकडे एक सोन्याची अंगठी होती. मला खूप आवडायची. पुढे कॉलेजला गेल्यावर आईने अंगठी घेऊन दिली तेंव्हा मी अगदी त्याच टाईपची अंगठी घेतली आणि गेले वीस वर्षं ती घालत आहे. ती अंगठी माझं एक स्वप्नं पूर्ण झाल्याची निशाणी आहे. :) 
        कॉलेजमध्ये असताना एक मॅडम बायॉलॉजि शिकवायच्या. प्रत्येकवेळी त्या एखादी नवीन साडी नेसून यायच्या. अगदी चापून चोपून नेसलेली असायची ती. एकदा असंच गंमत म्हणून त्या एखादी साडी परत केव्हा नेसतात हे पाहिलं होतं. कमीत कमी एक महिनाभर तरी त्यांची साडी परत नेसली जायची नाही. मोजून ५-६ ड्रेस असण्याचे दिवस ते.  वाटायचं मी मोठी झाले की अशाच खूप साड्या घेणार विकत आणि अजिबात रिपिट करणार नाही महिनाभर तरी. आता ते आठवलं तर हसू येतं कारण आता इथे साड्या नेसणं होत नाही त्यामुळे वर्षातून मोजून २-३ साड्या घेतल्या जातात आणि अगदी तितक्याच वेळा नेसल्या जातात. आणि भारतात असताना नेसल्या तरी त्यासाठी लागणार वेळ, मुलांचं आवरायचं, कुठेही पोहोचायला झालेला उशीर हे पाहून सोपा मार्ग अवलंबला जातो, ड्रेस घालण्याचा. :) 
       पूर्वी ड्रेससाठीही वेगवेगळ्या दुकानांत फिरणे, मटेरियल आवडलं तरी ओढणी न आवडणे किंवा व्हाईस वर्सा प्रकार झाले आहेत. त्यात सर्वात हौसेचा ड्रेस होता तो म्हणजे, 'हं दिल दे चुके सनम' च्या स्टार वाल्या ओढणीचा. स्वप्न पुरं झालं खरं पण एका धुण्यातच त्या ओढणीचं लक्तर झालं होतं.पुढे कुणाचे तरी बघून मला कॉटनचे ड्रेसेस घालण्याची फार आवड निर्माण झाली. नुकतीच नोकरी लागली होती तेंव्हा. त्यामुळे ड्रेस बाहेरुन इस्त्री करूनही घ्यायचे. भारी वाटायचं स्टार्च वाली ओढणी घेऊन कडक ड्रेस घालून जायला. त्यात मग लखनवी ड्रेसची हौस झाली. सलग वेगवेगळ्या रंगाचे लखनवी ड्रेसेस घेऊन झाले. तरीही एक मात्र स्वप्न आहे जे अजून पूर्ण झालं नाहीये किंवा त्याला मुहूर्त लागला नाहीये. एक लाईट पिंक कलरची कॉटनची लखनवी साडी घ्यायची आहे. ते या भारतवारी मधेही पूर्ण नाही झालं. आता पुढच्या वेळीच. 
         अमेरिकेत आल्यावर वेगळीच वेडी स्वप्नं होती. उदा: एका कॉफी शॉपमध्ये एकटंच बसून कॉफी प्यायची. :) आता विचार केला तरी हसू येतं.  कदाचित 'दिल चाहता है' च्या तन्हाई गाण्याच्या इफेक्ट असेल. पण कॅनडा मध्ये असतांना जवळजवळ महिनाभर अशी एकटी बसून कॉफी प्यायचे. (कॉफी कुठली, हॉट चॉकलेट, इथली कडू कॉफी झेपायला १२ वर्षं गेली.) अजूनही डाऊनटाऊन मध्ये बाहेर बघत एकटक कॉफी प्यायला मिळाली तर भारी वाटतं.
       दुसरं स्वप्न म्हणजे, एअरपोर्ट वर लॅपटॉप घेऊन बसायचं. आता स्मार्ट फोन आल्यामुळे हे अगदीच येड्यागत वाटत असेल. पण एकटं स्टाईलमध्ये एअरपोर्ट लॅपटॉप घेऊन बसायचं होतं एकदा मला. ते पहिल्यांदा जेव्हा केलं ना? खूप भारी वाटलं होतं. एकूणच भारतात जाताना मोठ्या विमानप्रवासात झालेले आईवडिलांचे, मुलांचे हाल यामुळे त्यातली मजा आता गेली आहे. :) आता कदाचित 'बिझनेस क्लास' मध्ये बसायला मिळणे हे फारतर लिस्टवर टाकू शकते. आणि हो, एखाद्या सेलेब्रिटीला भेटणे. म्हणजे, आपण बसलोय आणि शेजारच्या सीटवर अमिताभ बच्चन येऊन बसलाय वगैरे. :) 
        अमेरिकेत आल्या आल्या तिसरं स्वप्न होतं ते म्हणजे लाल रंगाची कन्व्हर्टिबल स्पोर्ट्स कार घेणे. तेंव्हा बजेट मध्ये बसेल अशी साधी 'बेज' रंगाची कार घेतली. अर्थातच तिच्यासमोरही उभे राहून मोठ्या अभिमानाने फोटो काढला होता. कारण आयुष्यातील पहिली कार होती ती. पुढे इथे राहायला लागल्यावर बजेट आणि उपयुक्तता हे सर्व विचार करूनच कार घेतली गेली. पण आल्या आल्या एका मुलीचा वेडेपणा म्हणून वाटणारं जे स्वप्न होतं ते अजूनही अपूर्णच आहे. 
        कॉलेजमध्ये माझ्या रूममध्ये स्टीव्ह आणि मार्क वॉ असलेलं एक पोस्टर लावून ठेवलं होतं. टाईम्स ऑफ इंडियाच्या रंगीत पुरवणीत पीटर इंग्लंड च्या जाहिरातीचं होतं बहुतेक ते. त्यात ते दोघे उभे आहेत आणि मध्ये एक भारी वॉर्डरोब आहे ज्यात निरनिराळ्या रंगाचे सूट, टाय, वगैरे ठेवले आहेत. मी म्हणायचे असा वॉर्डरोब नवऱ्याचा असेल तर माझा किती भारी असेल. :) अर्थात तसा तो कधी मिळेल की नाही माहित नाही. कारण त्यासाठी तेव्हढे कपडे, आणि ते ठेवण्यासाठी लागणारं कपाट असणारं घर अजूनतरी केवळ स्वप्नांतच आहे. आणि हो, पूर्वी वाटायचं, खूप भारी उंच टाचेचे चप्पल घ्यावेत वगैरे. आता पाठदुखते म्हणून मुकाट्याने एकच सूट होईल अशी सपाट चप्पल घातली जाते.  त्यामुळे कदाचित तिथंपर्यंत जाऊ की नाही हेही माहित नाही. 
       तर ही अशी अनेक स्वप्नं. अगदी खूप  प्रकारच्या रंगाचं कलेक्शन (रंगपेटी, ब्रश), हँडमेड पेपर्स, एखादी घरात असावीशी लायब्ररी आणि हो तिथे बसून वाचण्यासाठी एक आरामखुर्ची, बाहेर पडणारा पाऊस, हातात पुस्तक आणि कॉफीही. कुणाचं काय तर कुणाचं काय.  एखाद्याला मित्रासारखी बाईक हवी असते, कुणाला साडी तर कुणाला अभिमानाने मान ताठ करता यावी अशी मुलं. आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर वेगवेगळी स्वप्नं पाहिली. त्यातली काही खरी झाली, मागे वळून पाहताना काहींवर हसू आलं तर कधी डोळ्यांत पाणी, कधी पैसे हाती आल्यावर गरजेचं वाटेनासं झालं आणि कधी जे हवं होतं ते मिळाल्याचं समाधानही मिळालं. अर्थात प्रत्येक स्वप्न भौतिक गोष्टींबद्दल असतंच असंही नाही. 
         वर त्या शॉपिंगबद्दल लिहिलं होतं ना? त्यात ही अशी स्वप्नं बसत नाहीत. त्यामुळे कदाचित खरेदी करुनही तो आनंद मिळत नाही. वीकेंडला खरेदीसाठी समोर अनेक गोष्टी येऊनही टाळल्यामुळे जुन्या काही स्वप्नांची पुन्हा आठवण झाली. आता पुढची काय आहेत ते एकदा विचार करुन, लिहून ठेवली पाहिजेत, कारण स्वप्नपूर्तीची मजा बाकी कशातच नाही. :) 

विद्या भुतकर. 

Monday, November 20, 2017

छोटेसे बहीण भाऊ

        गेले काही दिवस झाले घरात जोरदार वाद चालू आहेत. आमचे धाकटे चिरंजीव त्यांच्या दीदीच्या शाळेत जायला लागल्यापासून. शाळा सुटली की आम्ही जाईपर्यंत शाळेतच असतात. जिथे मग ते दोघे दोन वेगवेगळ्या रुममधे असतात पण एकमेकांना भेटू शकतात किंवा खेळूही शकतात. आता पहिला आठवडाभर दीदीने समजून घेतलं की भाऊ लहान आहे आणि त्याला आपण सोबत खेळू देऊ. पुढे दोन महिने झाले तरीही तेच चालू राहिल्याने दीदीने आता असहकार पुकारला आहे. मग अर्थातच आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत खेळायला येऊन न देणे, रागावणे, आमच्याकडे तक्रार करणे असे प्रकार चालू आहेत. तर चिरंजिवांचे दीदीबद्दल गाऱ्हाणे चालू आहेत. दीदी खेळायला घेत नाही, नीट बोलत नाही, मित्रमैत्रिणींनाहि खेळू देत नाही वगैरे. आता आई-बाबा म्हणून कुणाची बाजू घ्यायची हा मोठा प्रश्न पडला आहे. 
        खरं सांगायचं तर आमच्या घरात मी सर्वात मोठी असल्याने या सर्व प्रसंगातून मी गेले आहे. बहीण-भाऊ मधल्या सुट्टीत सोबत असणे, किंवा त्यांना शाळेत जाताना-येताना सोबत घेऊन येणे हे केलं आहे. आणि त्याबद्दल राग येऊन अनेकदा आईकडे तक्रार केली आहे. भाऊ लहान असताना आजोबा म्हणायचे की त्याला सायकल बसव पण तू सायकल चालवू नकोस, हातात धरून चालत जा. म्हणजे डबलसीट बसून चुकून तो पडायला वगैरे नको. हे असले प्रकार करताना खूप चिडचिड व्हायची. त्यात भर पावसात, छत्री धरायची, सायकल धरायची की स्वतःला सांभाळायचे की भावाला. अशी तारांबळ व्हायची. हे सर्व आजही सांगताना डोळ्यासमोर येतं. इतकं डोक्यात पक्कं बसलंय. 
         आता एक आई म्हणून याचा विचार करताना वाटतं, मुलगा लहान आहे, त्याला तेव्हढीच दीदीची सोबत होईल तर किती बरं आहे. अजून नवीन मित्र-मैत्रिणीही नाहीत. बिचारा एकटा बोअर होतो. मग मुलीला सांगायला जावं तर ती म्हणते पण वेगवेगळ्या तुकड्यातील मुलामुलींना एकत्र खेळणं अलाऊड नाहीये. आणि तिचंही बरोबर आहे, त्याने मोठ्या मुलांसोबत न खेळता स्वतः नवीन मित्र बनवले पाहिजेत, नवीन लोकांत कसं वावरायचं शिकलं पाहिजे. शेवटी आम्ही तोडगा काढला, तीन पैकी एकच दिवस त्याने तिच्याकडे जायचं आणि बाकी दिवस नवीन फ्रेंड्स बनवायचे. दोघांनीही 'डील' म्हणून अटी मान्य केल्या. म्हटलं, सुटलो. 
       मागच्या आठवड्यात एकदा स्वनिक बोलला, "आई आज दीदी माझ्याशी खूप छान वागली.". म्हटलं,"काय केलं?". तर म्हणाला,"मी एकटा बसलो होतो बसमध्ये तर ती येऊन माझ्याशेजारी बसली.". ते ऐकलं आणि एकदम पाणीच आलं डोळ्यांत. कितीही चिडली तरी दीदीने भावाची काळजी केलीच होती. आणि त्यालाही ते जाणवलं होतं. किती छोट्या गोष्टींनी फरक पडतो या वयात. वाटलं, याच पुढे जाऊन आठवणी बनणार आहेत.

      कसं असतं ना? मी लहान असताना कितीही चिडले, तरी आता त्याच आठवणी सोबत आहेत. आणि आता कितीही इच्छा असली तरी तीन वेगवेगळ्या देशातून आम्ही वर्षातून एकदा एकत्र भेटूही शकत नाही. 

विद्या भुतकर. 

Sunday, November 19, 2017

हनम्या

      हनम्या उठला तर तांबडं फुटलं हुतं. दारात दोन कुत्री अंगावर चढून सकाळच्या पारीच सुरु झाल्याली. त्यांच्या केकाटन्यानंच जाग आल्याली. 'आरं हाड !' म्हणत त्यानं एक दगड हनला. पर त्यान्ला लईच जोर आल्याला. ती काय जाईनात. हनम्यानं त्यांचा नाद सोडला आन कांबरून उचलाय सुरुवात केली. घोंगड्याची वळकटी बांधून कोपऱ्यात लावली. गोधडीची शिस्तीत घडी केली. त्यावर उशी ठिवून दोन्ही एका कोनाड्यात ठेवलं. झोपेतच तंबाकूचा तोबरा भरून त्यानं लोटा हातात घेतला. परसाकडला जाऊन यीस्तवर उजाडलं हुतं. 
परतीच्या रस्त्यावरच त्याला मामा दिसला. मामा म्हंजी त्याचाच मामा गावाच्या वेशीकडं जाताना दिसला.

"काय मामा, कुटं चाल्लासा इतक्या सकाळच्याला?", हनम्यानं इचारलं.

"लेकीकडं जातुया, लै दिस झालं नातवंडांना बघून बी.",मामा म्हनला.

"बरं या घरी सावकाश, परत आला की", हनम्या.

"व्हय येतु की, आता बस चा टायम झालाय.", मामा म्हनला आणि तडक चालाय लागला.

हनम्या कितीतरी येळ मामाकड बगत हुभा राह्यला. 'वय झालं मामाचं' त्यानं इचार केला. काळं पडल्या धोतराचा सोगा हातात धरून चाल्ला हुता. वयानं पाटीला कुबड आल्यालं. 

किती येळा सांगितलं हनम्यानं,"मामा काटी घ्याची हातात, आता काय सोळावं लागलं न्हाय तुला.". पन ऐकल त्यो मामा कसला.
मामाचा इचार करताना त्याला त्याची लेक बी आटवली. आई झाली दोन पोरांची. अल्कीला करून घ्यायची हुती हनम्याला. पर त्याच्या आयला लै माज आपल्या पोराचा.

भावाला म्हनली, "घरातला तुझा हिस्सा बी दे तर तुझी पोरगी कर्तू."

मामा बी काय कमी चेंगट नव्हता. एका इधुराला करून दिली आपली लेक कमी पैशात पर 'भनीला हिस्सा देनार न्हाय' म्हनला.
         
       मागनं हिरो होंडाचा मोटा हॉर्न पडला आन हनम्या जाग्याव आला. घरापाशी आला तर निस्ता पसारा पडल्याला. त्यानं खराटा घिऊन दारासमूरचा कचरा लोटला. कालची भांडी बी तशीच भाईर पडल्याली. ती इसळून घेतली घमेल्यातल्या पान्यानं आणि भांड्यांची टोपली घिऊन तो घरात शिरला. खोलीच्या मोजून दोन खिडक्या त्यानं उगडल्या.  डिचकीभर पानी गरम करून घेतलं, बादलीत घालून मोरीत अंगावर पानी वतून घेतलं. माय पडलेलीच हुती. म्हातारीला उजेडानं तिला जाग आली. 

"च्या कर्तुस का जरा?" तिनं झोपेतंच इचारलं.

"ठिवतू की, तू उठ तरी. दूध घिऊन येतो. ", हनम्या म्हनला. कालचा धुतलेला पायजमा सुकलाच नव्हता. त्यानं हाप पॅन्ट घातली. 

म्हातारीनं जीव खाऊन हात खाली टेकला आन धडपडत उठली. तिच्या पातळाचा सोगा निगालेला. कसाबसा तो धरत तिनं मोरी गाटली. म्हातारीला चालवत नव्हतं मग तशीच बसून राह्यली हनम्याला हाक मारत. हनम्यानं घरी यिऊन म्हातारीला बगितलं तसा घाबरलाच.

"काय झालं गं. ", त्यानं इचारलं.

"काय हुनार? त्यो बोलवत न्हाय तंवर बसायचं हितंच. ", म्हातारीला जीव नकुसा झालेला.

तिला हाताला धरून आनला अन तिच्या हातरुणात ठेवत, 'गप पड' म्हनला.

       धुतलेल्या भांड्यातनं त्यानं च्याचं भांडं काडलं. त्याचा बुडाशी राह्यलेला साबन बगून पुन्हा धुतलं. त्या भांडयावरचा काळा थर बगून त्याला लै वैताग यायचा पर किती बी घासलं तरी काय निगत नव्हता. त्यानं स्टो पेटिवला. च्या ठिवून  त्यानं भाजीची निवडाय घेतली. टोपलीतला लसून सोलून टेचला, मिरच्या तोडल्या, म्हातारीला च्या दिऊन कसंतरी भाजीचं काम पन उरकलं. पावसानं वैताग आनलेला हनम्याला. लौकर उरकून मेंढरं घिऊन शेतात जायचं हुतं त्याला. त्यानं चार भाकरी थापल्या. म्हातारीचं ताट तिच्या शेजारी ठिवलं, पान्याचा तांब्या बी ठिवला. एका कागदात आपल्या भाकरी भाजी घालून गुंडाळून घेतल्या. डोक्यावर गोनपाट टाकलं आन निघाला. 

"येतो गं म्हातारे" म्हनत त्यानं पायतान चढवली.
      भायीर येताच शेजारच्या गाडीनं त्याच्या पॅंटीवर चिकल उडिवला. हनम्यान चार शिव्या हानल्या. चिक्लाचा लागलेला डाग बगून त्याचा संताप झाला. परत घरात जाऊन त्यानं वल्ला पायजमा घातला. त्याला लै राग त्या पायजम्याच्या. म्हाताऱ्याचा हुता ना. परत भाईर जाऊन म्हशीला सोडलं, मेंढरं बरुबर घितली आन हाकाय लागला. शाळीला चाल्याली पोरं हुंदडत हुती. मधीच एकानं म्हशीला हात लावला, तसा हनम्या चिडला.

"आरं जा की मुकाट्यानं. लाथ बसली की कळल मग.", हनम्या वराडला तशी पोरं खिदळत पळून गेली.

रस्ता पावसानं वल्ला झाल्येला. बगल तिकडं चिकुल निस्ता. हनम्याला पाऊस नकुसा व्हायचा.  चिकचिक, भरलेली कापडं , डास, माशा, सगळीकडं घान निस्ती. हनम्यानं मेंढरं शेताकडं वळवली. एकरभर जागा त्याची. बापानं तेव्ढंच काय ते मागं सोडलेलं. मेंढरं बांधावर सोडून कडंकडंनं शेतात घुसला. चिकलानं भरल्यालं पायतान हातात घिऊन मऊ मातीतनं कोपऱ्याव आला. पाटाच्या पान्यात पायतान साफ केलं. बायका भुईमुगातलं तण काढत बसल्या हुत्या. त्यानं नजर फिरवली आन तिथंच दगडाव बस्तान टिकवलं.

"काय म्हणतेंय मावशे? लेकीला नाय आनलं आज? ",हनम्यानं बाजूला नजर टाकत इचारलं.

"तिला घरीच ठिवून आलोय. कंबर दुखतीया म्हनं तिची. तिच्यासारक्या तर्न्यानी असं म्हनल्याव आम्ही म्हाताऱ्यांनी कुटं जायचं?", मावशी दमली खुरपं चालवून. 

हनम्याला तिच्या पोरीची गोरी, नाजूक कम्बर आठवली. खुरप्यानं गवत काडता काडता चार वेळा ती पदर सारका करायची. तरी पोट, कंबर दिसायचीच.

"सविताबाई बी नाय का आज?", हनम्या.

"तिला बी ताप आलाय म्हनं. कसलं डोंबलाचं ताप? हिचं काय वय झालं व्हय? तुमच्याइतकी तर आसल की? ", मावशी म्हनली.

"तुमचं किती झालं म्हनायचं?", मावशी.

"झालं की चाळीसच्या वर दोन-चार झाली असतील.",हनम्यानं हिसाब केला.

"लै वाईट झालं बाईचं. पन्नाशीचा बी नसंल पाव्हना? असा हुब्या हुब्या गचकला.",  मावशी इचारच करत हुती. हनम्याला कवापासनं वाटत हुतं तिला इचारावं रातीचं पन हिम्मत झाली नाही. त्यात रात्रीचं म्हातारीला सोडून कसं जानार? 

"म्हातारी काय म्हनती?", मावशीनं इचारलं.

"हाय जित्ती, त्यो कधी बोलवतुय याची वाट बघत.", हनम्या.

"व्हय, लै वय झालं तिचं. एकंद नातवंड बघावं अशी लै इच्छा म्हातारीची....", मावशी म्हनली.

"आता नावंच 'हनमंत' ठिवल्यावर काय व्हायचं?", हनम्या हसत बोल्ला. त्याचं पिवळं दात एकदम भायीर आलं. 

"या जन्मात काय लगीन जमायचं न्हाय आता.  मागील त्ये समदच मिळतंय व्हय मानसाला? मला बी लई काय काय पाहिज्ये हुतं. ", हनम्या म्हनला. 

"पन तुमी लई काळजी करता म्हातारीची. इतकं कोन करत न्हाय आजच्या कलीयुगात.", मावशी. 

"काय करनार? तिनं जनम दिलाय तर कराय लागनारच. दुसरं कोन हाय तिला तरी?", हनम्या म्हनला. 
     मग त्यानं तंबाकू हातात चुरली, चुन्याचा टवका लावला. चिमूटभर मावशीला दिली आन उरलेला तोबरा भरून बसून राह्यला. मावशीबी कामाला लागली. भुईमूग तरारला हुता. यंदाला पाऊस बी बरा झालाय. 'चार पैसं आलं तर दोन नवी कापडं घ्यायची' हनम्यानं ठरवलं. दुपार झाली तसं हनम्या उटला.

"चल मावश्ये जरा मेंढरं फिरवून आंतु. उद्याच्याला येतु पैसं घिऊन. जरा हात हालवा बिगीबिगी. ", म्हनत चालाय लागला.

       बांधाकडनं शेत वलांडत मेंढरं घिऊन फिरत राह्यला. रस्त्यात कुनी कुनी भेटलं त्याची चवकशी करत राह्यला. आबाच्या शेताव आबा दिसल्यावं हनम्याला बरं वाटलं.  आबाची पोरं शेतात हुंदडत हुती. त्यातलं एक 'काका' करत पळत आलं.
"काय रं शाळा न्हाय का तुम्हास्नी?", हनम्यानं इचारलं.

"न्हाय, आज दांडी. ", पोरगं नाकातला शिंबुड हातानं पुसत बोललं.  हनम्यानं दोन बोटांत पोराचं नाक पकडून जोरात शिंकारलं, शिंबुड शेतात फेकून हात आपल्या सदऱ्याला  पुसला. पोरगं परत चिकलात पाय तुडवाय गेलं. हनम्यानं परत तोंड वाकडं केलं. आबा डोक्यावर गवताची थप्पी घेऊन आला.

"काय रं, कुटं निगाला?", आबा.

"असाच आलु भेटाय. गळती थांबली का घराची?", हनम्या.

"व्हय, रातच्याला वरनं ताडपत्री टाकली तवा कुटं थांबलं पानी.", आबा बोलला.

"बरं झालं निदान झोपशील तर गप.", हनम्या.

"व्हय, तुजं बराय बग, बायका पोरं नाय कोन तरास द्याय. हिथं बायकोनं जीव नकुसा केला छत दुरुस्त करंस्तवर.", आबा बोलला.

हनम्यानं फकस्त मान हलवली.

        बोलत बोलत दोगांनी एका ठिकानी बसून डबा खाल्ला. त्यानं आबाच्या शेतातनं पावटा, मिरच्या  निवडून टोपलीत भरून घेतल्या आन घरच्या रस्त्याला निगाला. मधीच एका लोंढ्याजवळ तर्नी पोरं-पोरी दिसली. धबधब्यात भिजून निगल्याली. चालून हनम्याच्या पायाचं तुकडं पडल्यालं. त्यानं म्हशीला खुटीला बांधलं आन शिरप्याच्या टपरीचा दगड पकडला. 'च्या दे रं जरा', म्हनत हनम्या त्या भिजल्याला पोरींकडं बगाय लागला.

"काय म्हून भिजत असतील रं?", त्यानं शिरप्याला इचारलं.

"कुनास ठावं. पर आपलं पोट चालतंय न्हवं. गप आपला च्या द्यायचा, कनीस द्यायचं, पैकं घ्यायचं.", शिरप्या त्या पोरांकडं बगत बोलला.
        मेंढराकडं डोळा ठेवत हनम्यानं च्या घितला आन तिथंच बसून राह्यला. ढग भरून आलं तसं हनम्या उटला. मेंढरं, म्हशीला हाकत घराकडं चाल्ला. घरात घुसून त्यानं पयला बलब लावला, हात पाय घासून धुतलं, देवाला दिवा पेटिवला. म्हातारी पडूनच हुती. तिच्याकर्ता च्या केला. तिचं दुपारलं ताट धुतलं आन पुना सैपाकाला लागला. म्हातारीला ताट केलं. कसंबसं उटून तिनं चार घास खाल्लं.

"मामा भेट्ल्याला सकाळी.", हणम्यानं म्हातारीला वरडून सांगितलं.

"काय म्हनला?", म्हातारी.

"अल्कीकड निगालेला. नातवांना भेटाया. ", हनम्या.

"लेकीची लय वड त्याला. पन पैका ज्यादा प्यारा त्याला. न्हाईच दिला त्येनं शेवटी हिस्सा. मग म्या पन त्येचीच भन हाय. ", म्हातारी.

"आता परत बोलाय लाव नगंस मला. समद्या जगाची पोरं झाली. पर तुज्या हट्टापाई मी असा बसलूया. तुज्यामुळंच झालंय समदं. आता एकटाच मरायचो मी.", हनम्या चिडला. म्हातारी गप बसली.  

        हनम्यानं  बी मुकाट जेवन उरकलं. भांडी टोपल्यात घालून भाईर ठिवली आन बारक्या रेडिओवर बातम्या ऐकत बसला. रात झाली तसा हनम्यान दिवा ईजवला. डोळं मिटलं पर झोप लागंना. मावशीची पोरगी, सविता, त्या भिजलल्या पोरी सगळ्या डोक्यात यायल्या. त्यानं कूस बदलली पर झोप लागंना.

तवर म्हातारीनं हाक मारली, "हनम्या, हनम्या  ".

हनम्याला लै राग आल्येला म्हातारीचा. ती हाका मारतच राह्यली.

हनम्या उठला रागानं,'मरत बी न्हाय एकदाची. काय सुक म्हनून न्हायच नशिबात.'. 

"आलो आलो वरडू नगंस आता" बोलत तिच्याकडं गेला. 

       म्हातारी वरडतंच हुती. हनम्याचा राग डोस्क्यात गेला आन त्यानं तिचं नरडंच धरलं. 
"गप बस की." म्हनत हात गल्यावर पकडला. म्हातारीचा जीव घाबरला. तिनं त्याच्या हातावर हात धरला पन जोर लागंना. तिचं पाय लटपटलं. 'हनम्या' म्हातारीनं परत बारीक हाक मारली. तिच्या डोळ्यांत पानी आल्यालं. हनम्या जाग्याव आला, त्यानं हात मोकळा केला. म्हातारीनं जोराचा शवास घितला.

"पानी दे रं मला. यम आला हुता वाटतं. सुटलोच असतो आज.", म्हातारी म्हनली. 
हनम्याचं डोस्क जरा थंड झालं. त्यानं तिला पानी दिलं. तिचं डोळं पुसलं. तिला कांबरून घातलं आन परत जाग्याव जाऊन पडला. 
'वाचली आज म्हातारी' म्हनत हनम्यानं  पुना मुश्किलीनं डोळं मिटलं. हळूहळू डोळ्यावं झापड याय लागली. 
पुना अल्की समोर आली, तिचं हासनं दिसलं , तिचं बोलनं आटवलं, आन पुना त्याचा हात पायजम्यात गेला. 
हनम्याचा आजचा दीस तरी संपला हुता. 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Monday, November 06, 2017

तो, ती आणि किशोर

गुलाबी थंडीची ती रात्र. तो गाडी चालवत होता. ती बराच वेळ शेजारी बाहेर बघत बसली होती. मध्येच तिने सीडींचा बॉक्स काढला. शोधत शोधत ती 'किशोर कुमार' लिहिलेल्या सीडीवर थांबली. तिने सीडी टाकली आणि पहिलंच गाणं ..... 'मेरे मेहबूब इनायत होगी...... '  लागलं. 
'वाह ....!' ती उद्गारली. तिच्या 'वाह' वरच त्याला कळलं ती आता नॉर्मल होत आहे. 

       एकेक गाणं येऊ लागलं तशी ती त्या गाण्यांसोबत आपल्या भसाड्या आवाजात गाऊ लागली. तो हळूच हसलाही. तिने ते पाहिलं होतं. पण समोरच्या गाण्याचे बोल सोडून त्याच्याशी बोलायला ब्रेक घ्यायची तिची इच्छा नव्हती. 
'.......तुम जो केह दो तो आज की रात चाँद डूबेगा नहीं ईईईई ' . गाडी गर्दीतून वाट काढत घरी चालली होती. 
'इस मोड से जाते है...... ' तिने तान घेताना हातांनाही वळण दिलं होतं. 'इन रेशमी राहों में एक राह तो वो होगी.......  तुम तक जो पहुँचती है........ उस मोड़ से जाते  है एएए ....... '. एकापाठोपाठ एक गाणं चालू होतं. 

ती अशी गाण्यांत गुंतली की तो नेहमी हसायचा. इतकं काय त्या गाण्यात अडकायचं? आहे आवाज सुंदर आणि शब्दही... पण इतकं काय असतं त्या गाण्यात, मला नाही कळत', तो म्हणायचा. 

'जाऊ दे तुला कळणार पण नाही. असते एखाद्याची आवड. आणि तुला सांगू, नाहीच आवडलं प्रत्येक गाणं तरीही एखादं गाणं असतंच असं, ते स्वतःला लागतं ना तेव्हाच त्यातला भाव जाणवतो, दुखतो, मनात राहतो. पण तुला काय?' म्हणत ती पुन्हा गुणगुणायला लागायची. 

तोही तिचा वेडेपणा आहे म्हणून सोडून द्यायचा. 

आज मात्र तिचा आनंद पाहून त्यानेही तिला साथ दिली होती, 'आज रपट जाये तो हमें ना उठइयो            आ हा..ओ हो...... " स्टिअरिंग वरचा एकेक हात उचलत त्याचा डान्स पाहून ती हसली. शेवटी घर आलं. तिला गाणी सोडून घरात जायची इच्छा होत नव्हती. एरवी तिने गाणं पूर्ण होईपर्यंत थांबायचं म्हटलं की त्याला चिडचिड व्हायची. घराजवळ येऊनही गाडी चालू ठेवून उगाच काय बसायचं. घराजवळ आल्यावर आज पुन्हा तेच होणार तिला वाटलं. गाणं चालू असतानाही त्याने गाडी बंद केलीच. ती गप्प बसली. पण निघताना त्याने ती सीडी काढून घेतली. घरात येऊन तिने चप्पल कपाटात ठेवले, हातातलं सामान फ्रिजमध्ये ठेवायला गेली तेव्हढ्यात म्युझिक सिस्टीम अर्धवट राहिलेलं गाणं सुरु झालं होतं. ती खूष होऊन हॉलमध्ये आली. तोही हसला. 

'आपकी आँखो में कुछ.... ' सुरु झालं होतं. ती त्याला म्हणाली,'मला ना खूप इच्छा होती माझ्यासाठी कुणीतरी हे गाणं म्हणावं."

'अच्छा?', त्याने विचारलं. 

तेव्हढ्यात गाणं पुढे सरकलं होतं. 'लब हिले तो मोगरे के फूल खिलतें कही....' पर्यंत आल्यावर आपल्या भसाड्या आवाजातून मोगऱ्याची नाही, तर झेंडूची फुले पडतील असं तिला वाटून हसू आलं. तोही तिचा विचार ओळखून तिच्याकडे बघून हसला. पुढे मग प्रत्येक गाण्यांत गमती सुरु झाल्या.

         त्यांचा पायांवर पाय ठेवून डान्स सुरु असतानाच 'अभिमान' मधलं गाणं सुरु झालं. 
'ओ ...... आ ....... तेरे मेरे मिलन की ये रैना..... ' आणि तो थबकला. 
तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं..... 
          
          आज तिच्या डॉक्टरकडे जाऊन आले होते ते. गेल्या ८-१० वर्षांतल्या अनेक व्हिझिट्स पैकी अजून एक. अनेक उपचार, औषधं, आय व्ही एफ, आणि अनेक वेळा झालेलं मिस-कॅरेज. त्यातून होणारे अनेक प्रश्न आणि प्रॉब्लेम्स. तिचा प्रत्येक वेळी होणारा हार्मोनल इम्बॅलन्स. प्रेग्नन्ट असताना उंचावलेल्या अपेक्षा आणि होणारा अपेक्षाभंग. त्यातून होणारी तिची चिडचिड, मग भांडणं. तिला आलेलं एकाकीपण, घरातली सुन्नता. सगळं गेल्या काही वर्षांपासून चालू होतं. शेवटचा एक प्रयत्न करायचा आणि त्यातून काही अपेक्षा नाही ठेवायची हेही ठरवून यावेळी आय व्ही एफ साठी ते गेले होते. दरवेळी तीन महिन्यांतच मिस-कॅरेज व्हायचं. आज चार महिने उलटून गेले होते आणि आज तपासून आल्यावर सर्व काही ठीक आहे म्हणून डॉक्टरनी सांगितलं होतं. 
आज खूप दिवसांनी त्यांच्या घरातली ती भयाण शांतता भंग पावली होती. 

मागे गाणं चालूच होतं आणि त्याचा आवाज दाटला होता,'जैसे चन्दा खेले बादल में... '. 

ते गाणं त्याच्या मनाला भिडलं होतं. 

विद्या भुतकर. 

Sunday, November 05, 2017

तरीही ......रांधा वाढा .....

लग्नाच्या आधी एक दोनदा संदीपकडे त्याच्या एका मित्राचा डबा राहिला होता आणि त्याच्या बायकोने वारंवार त्याची आठवण करून दिली होती. तेव्हा वाटलं, इतके डबे असतात लोकांकडे, एका डब्याने लगेच काय होणारेय? पुढे लग्नानंतरही आईने काही स्टीलच्या वाट्या वगैरे दिले होते आणि त्यावर आवर्जून माझं नाव टाकलं होतं, तर काही ठिकाणी फक्त नवऱ्याचंच. त्या नावात किती शुद्धलेखनाच्या चुका होत्या ते सांगायला नकोच. पण मी आईला म्हटलं होतं, अगं नाव कशाला टाकायला पाहिजे भांड्यांवर? मी तर त्यावर चारोळी पण केली होती: 

"आयुष्यभर संसाराचं गाडं 
दोघांनी मिळून रेटलेलं 
तरी मुलांपासून भांड्यांपर्यत 
सगळीकडे, त्याचंच नाव टाकलेलं." :) 
भारी आहे ना? :) असो. 

        जशी संसारात रुळले, या सर्व गोष्टींचा अनुभव येत राहिला आणि भांडी हा जरा जास्तच जिव्हाळ्याचा विषय आहे हे कळलं. शिकागो सोडून पुण्याला येताना अनेक भांडी सोडून द्यावी लागली किंवा मित्र-मैत्रिणींना दिली. तेव्हा अगदी वाईट वाटत होतं, आपलं म्हणून असलेलं एखादं भांडं किती जीव लावतं वगैरे वाटून. कितीही सामान जास्त झालं तरी मुलांची आवडीची वाटी, किंवा ताट हे मात्र आवर्जून घेतलं होतं. पुण्यात राहिल्यावर अनेकदा अनेक लोकांकडे पदार्थांची देवाण घेवाण झाल्यावर त्यावर टाकलेली नावंच उपयोगी पडली. आजही अनेक भांडी मी जपून ठेवली आहेत. त्यात एखादं माहेरहून आलेलं असेल तर बासच ! माझं जाऊ दे, मी लहानपणी ज्या छोट्या ताटलीत जेवायचे ती ताटलीही आईकडे अजून आहे. म्हणजे बघा. 

         भांडी कितीही जवळची असली तरी ती घासणे हा मात्र राष्ट्रीय पातळीवरचा विषय होऊ शकतो. भांड्याला मावशी ३ दिवस आल्या नाहीत तर ...... ?? ऐन पाहुणे यायच्या दिवशीच तिने कलटी दिली तर? असे गहन प्रश्न मी इथे काढणार नाही. माझे प्रश्न साधे आहेत? पाहुणे म्हणून एखाद्याकडे गेलेले असताना तुम्हाला भांडी घासायला लागली तर? सुनबाई घरात असताना सासूने भांडी घासली तर? बायको घरात असताना नवऱ्याला भांडी घासायला लागली तर? एकूण काय तर भांडी घासणे हे कमीपणाचे काम आहे. अगदी हिंदी पिक्चर मधेही निरुपा रायला गरीबीची पराकाष्ठा म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या घरची भांडी घासायला लागणे. आजकाल इतका त्यावेळी मावशींना भाव नसल्याने तसे सीन्स घेतले असावेत. 

       जोक्स अपार्ट, बायकांनीच भांडी घासली पाहिजेत असा अलिखित नियम कधी बनला? पूर्वी त्या घराबाहेर पडत नसत, किंवा कामाची विभागणी घरची स्त्रीनं आणि बाहेरची पुरुषांनी अशी केल्यामुळे त्या करत असतील. पण आज, नोकरी करून घरी आल्यावरही मावशी आल्या नसतील तर भांडी कोण घासतं? बाई आली नाहीये याचा त्रास स्त्रीला होतो का पुरुषाला? पुरुषांसाठी हा मानाचा विषय का आहे? 

         आमच्या घरी डिशवॉशर आहे, ज्यात भांडी खरकटं काढून, विसळून लावावी लागतात. जेवणं झाली की मुलं पुस्तकं वाचत बसतात. मी भांडी विसळून देते आणि तो मशीनमध्ये व्यवस्थित रचून ठेवतो. त्याने विसळलेली मला आवडत नाही तर मी रचलेली भांडी त्याला आवडत नाहीत. एकूण काय, तर आम्ही आमच्या रोलमध्ये खूष आहोत. तरीही नवरा भांडी घासतो, किंवा मदत करतो यात ग्रेट काय आहे? अनेकदा, तीन तास उभे राहून केलेल्या स्वयंपाकासाठी मला मिळणाऱ्या कौतुकापेक्षा तो भांडी आवरतो किंवा मदत करतो याचंच कौतुक लोकांना जास्त असतं? एकदा तर एका ठिकाणी, 'मी मदत करते म्हटलं' तर 'राहू दे, तुला सवय नाहीये' असंही ऐकायला लागलं आहे.   नवरा म्हणतो,'सोडून दे'. मी म्हणते, का सोडून द्यायचं? असं काय आहे भांडी घासण्यात की जे मी केलं नाही म्हणून मला ऐकून घ्यावं लागतं आणि तू करतोस म्हणून तुझं कौतुक होतं? 

         घरात कुठली भांडी कुठे आहेत, हे नवऱ्याला माहित आहे यावरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे? म्हटलं, १० बाय १२ च्या किचनमध्ये मोजून ८-१० कपाटं, त्यात कुठलं भांडं कुठे आहे हे घरात राहून माहित नसावं एखाद्याला? असं असेल तर घरात राहता की हॉटेलात असा प्रश्न विचारला पाहिजे. मी म्हणतच नाही की भांडी घासणे हे काही महान कार्य आहे. जेवण करतो तर मग भांडीही घासावीच लागणार? नाईलाज म्हणून का होईना ते करावंच लागतं. उलट जेवण झाल्यावर तितकीच हालचालही होते म्हणून अनेकदा आम्ही कितीही कंटाळा आला तर उरकून घेतो. शिवाय सकाळी पसरलेला कट्टा पाहून चिडचिड होते ते वेगळंच. नाईलाजाने का होईना करावं तर लागतंच. पण ते बायकांनीच करावं असं कुठे म्हटलंय? 

        आजही आपल्याकडे हे कमीपणाचं काम म्हणून घरच्या बाईला करावं लागतं. अनेकदा पुरुष स्वतःचं ताट उचलूनही सिंकमध्ये टाकत नाहीत. भारतात ही असमानता तर मी पाहिलीच आहे. पण अमेरिकेत राहूनही अनेक लोकांनी जे प्रश्न विचारलेत किंवा आश्चर्य व्यक्त केलं आहे त्यावरून वाटतं की कितीही शिका, बाहेर पडा, नोकरी करा नाहीतर अजून काही, लोकांचे विचार मात्र बदलत नाहीत. ही असमानता मात्र कधी कमी होणार नाही. ती अशा छोट्या छोट्या गोष्टींतून दिसतंच राहते. गेल्या काही दिवसांपासून यावर जास्तच अनुभव आले म्हणून शेवटी लिहिलंच. 

विद्या भुतकर. 

Wednesday, October 25, 2017

दोन टोकं

सकाळी ९ ची वेळ. कॅफे एकदम रिकामं होतं. संध्याकाळी तरुणाईच्या गर्दीनं फुलून जाणारं ठिकाण ते. सकाळी मात्र साफ सफाई करणारा मुलगा आणि तयारी करणारी मुलगी सोडलं तर सामसूम होतं. ती एका कोपऱ्यात आपलं पुस्तक घेऊन बसली होती. एका हातात कॉफीचा मग घेऊन मन लावून पुस्तक वाचत होती. 'Excuse me'! तिने आवाजाच्या दिशेनं आपल्या चष्म्यातून तिरप्या नजरेनं वर पाहिलं. एकदम फॉर्मल कपड्यात, चकाचक यावरून आलेला तो उभा होता. तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्याला त्याने उत्तर दिलं,"सॉरी इथे तुमच्या टेबलवर बसलो तर चालेल का?" . 
तिने त्याच चेहऱ्याने पूर्ण कॅफेवर नजर फेकली. 
"मला माहितेय आक्ख्खा कॅफे रिकामा असताना तुम्हाला त्रास देतोय. माझा इंटरव्ह्यू आहे थोड्या वेळाने."
ती,"मग?". 
"खूप टेन्शन आहे. दोन तास लवकर येऊन बसलोय, ट्रॅफिकमध्ये अडकायला नको म्हणून. तुमच्यासमोर बसलो तर जरा विचार कमी होतील डोक्यातले.", त्याने स्पष्टीकरण दिलं. 
"बसा", ती नाईलाजाने म्हणाली आणि पुन्हा डोकं पुस्तकात खुपसलं. 
"कुठलं पुस्तक वाचताय?",त्याने विचारलं. 
तिने पुस्तकाचं कव्हर दाखवलं आणि पुस्तक वाचत राहिली. त्याने पुन्हा एकदा 'Excuse me'! केलं. तिने पुन्हा रागाने वर पाहिलं. 
"मी कॉफी मागवणार होतो, तुम्ही घेणार का?", त्याने विचारलं. तिने मान हलवली आणि त्याने 'दोन कॉफी' असं त्या पोराला सांगितलं. 
कॉफी येईपर्यंत तो पुन्हा इकडे तिकडे पाहात राहिला. कॉफी आली आणि तिने नाईलाजाने पुस्तक बाजूला ठेवलं. त्याने आपलं नाव सांगितलं,"मी चैतन्य, तुमचं नाव?"
"इरा", तिने सांगितलं. 
"एकदम जुन्या स्टाइलचं नाव वाटतंय नाही, इरावती वगैरे?", त्याने गमतीनं विचारलं. ती अजून वैतागली. 
"असू दे तुम्हाला काय? कॉफी प्या तुमची.", ती चिडली. 
"चिडताय काय, असंच टेन्शन मध्ये आहे ना? म्हणून काहीतरी बोलत आहे. जाऊ दे,मी गप्प बसतो.", तो बोलला. 
"इट्स ओके. कुठल्या कंपनीत आहे इंटरव्यू?", तिने शांत होत विचारलं. 
"जवळच प्रायव्हेट कंपनी आहे एक, मार्केटिंग चा जॉब आहे.", तो बोलला. 
"मग हे असं घाबरून बोलून कसं चालेल?", ती म्हणाली,"जरा कॉन्फिडन्सने बोललं पाहिजे ना?". 
त्याने मान हलवली. ते बोलत राहिले. बऱ्याच वेळाने ती म्हणाली, "तुम्हाला जायचं होतं ना?". 
"अरे हो, वेळेचं भानच नाही राहिलं. निघतो मी. थँक्स हा !", तो बोलला. 
"थँक्स फॉर द कॉफी. ऑल द बेस्ट." ,ती म्हणाली. 
तो हसून 'बाय' करून  निघून गेला. ती अजूनही त्याच्या परफ्यूमच्या आणि गोड हसण्याच्या अमलात होती. त्याची पाठमोरी आकृती कितीतरी वेळ बघत राहिली, तो दूर जाईपर्यंत. 
-------------------------------------------------------
दुपारी मॉलमध्ये कपडे बघत ती उगाचच फिरत होती. त्याने मागून येऊन 'हाय' केलं. 
"ओळखलं का मला?", त्याने विचारलं. 
ती दोन क्षण उगाचच आठवल्यासारखं करून 'हो ना' म्हणाली. 
"मला एक ड्रेस घ्यायला मदत करा ना?", त्याने विनवलं. 
"मला.... जायचं होतं..", ती. 
"मला हे ड्रेसचं माप कळत नाही.",तो. 
ती 'बरं' म्हणाली. 
'किती उंची', ती. 
"तुमच्या इतकीच असेल", तो म्हणाला तिच्याकडे बघत. 
"रुंदी, जाडी?", तिने पुढे विचारलं. 
"तुमच्याइतकीच असेल", तो. 
"बरं रंग, आवड काहीतरी सांगा ना. नाहीतर घेणार कसा ड्रेस?", सर्व ती विचारत राहिली आणि तो सांगत राहिला. त्याच्या प्रत्येक उत्तरासोबत तिचं मन उगाचच जड होत राहिलं. त्याच्यासोबत जाऊन तिने चार-पाच ड्रेसेस काढले. 
आता प्रत्येक ड्रेस ती त्याला घालून दाखवू लागली. त्यानेही प्रत्येकवेळी तिच्याकडे तितक्याच मन लावून पाहत ड्रेस कसा दिसतोय ते सांगितलं. पुढे मग त्याने स्वतःसाठीही दोन टीशर्ट घेतले. अर्थात तिचं मत तो विचारत होताच. 
दोन ड्रेस आणि टीशर्ट घेऊन निघताना त्याने तिला विचारलं,"सोबत कॉफी घेणार?". 
तिने घड्याळाकडे पाहिलं उगाचच. जायचं तर तिलाही होतं. 
"आता तुम्ही इतकी मदत केलीत तर निदान मला तुमच्यासाठी कॉफी तर घेऊ दे", तो म्हणाला. 
तिने 'बरं' म्हणत त्याच्यासोबत गेली कॉफी शॉपमध्ये. 
कॉफी घेत बोलत असतानाच तिचा फोन वाजला आणि त्याचा चेहरा थोडा दुःखी झाला. ती पुढे काही बोलणार तेव्हढ्यात तो 'इट्स ओके' म्हणाला. 
तिने कॉफी पटकन संपवली आणि त्याला 'बाय' केलं. 
तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो कितीतरी वेळ बघत राहिला, उदास मनाने. 
-------------------------------------
थिएटरच्या बाहेर ती कितीतरी वेळ एकटी उभी होती. तो समोर दिसला आणि तिचा राग मावळला. 
"अरे कुणाची वाट बघताय?", त्याने विचारलं. 
"फ्रेंड येणार होता एक. आलाच नाहीये. तिकिटं पण काढून ठेवली मी उगाच. " ती वैतागून बोलली. 
"हा त्यादिवशी आपण सोबत गेलो तेंव्हाचा ड्रेस आहे ना?" , त्याने विचारलं. 
"हो, मला खूप आवडला होता, मग नंतर जाऊन घेऊन आले.", ती लाजून म्हणाली. 
"बरं झालं घेतला, मी सांगणारच होतो तुम्हाला खूप छान दिसतोय म्हणून तो ड्रेस.",तो. 
"हा टीशर्ट पण त्यादिवशीचाच आहे ना?",ती. 
"हो ना, ते दोन टीशर्ट एकदम भारी आहेत, खूप आवडले मला. आजकाल तेच घालतोय.",तो हसून म्हणाला. 
"चला मी निघते. जाऊ दे मुव्ही. ",ती निघू लागली. 
"का? आमच्यासोबत चला ना? एक तिकीट गेलं आहेच, दुसरं कशाला? तुमचं ते दुसरं तिकीट मी विकत घेतो. माझ्यासोबत पाहिला मुव्ही तर चालेल ना?", त्याने विचारलं. 
ती हसली. 
इंटरव्हल मध्ये त्याने तिने समोशाची ऑर्डर दिली. ते गरम गरम सामोसे तोंडात भरत असताना तो तिच्याकडे पहात राहिला. 
"तुम्ही किती मन लावून खाता?",तो. 
"मग? नाहीतर कसं खायचं?",ती. 
"जाऊ दे तुम्ही बोलू नका, खात राहा",तो. 
ती खात राहिली आणि तो बघत राहिला. 
मुव्ही संपल्यावर तिला हळूच डोळे पुसताना पाहून तो हसला जोरजोरात. तिने त्याला पाठीत एक बुक्का मारला, रागाने. 
"कुठे जायचं आहे तुम्हाला?",थिएटर मधून पार्किंग मध्ये येताना त्याने विचारलं. 
"नाही नको, मी जाते.",ती. 
"अच्छा म्हणजे माझ्यासोबत मुव्ही पाहिलेला चालतो, पण गाडीवरून लिफ्ट नको का?" तो. 
"हे अहो जाओ बंद करा हो?", ती वैतागली. 
"बरं", तो म्हणाला. 
ती तशीच उभी राहिली. 
"चल मी सोडतोय  गाडीवर बैस", तो हक्काने बोलला आणि तिचा हात धरून तिला मागे बसायला लावलं. 
ती मुकाट्याने बसली. त्याने तिला घराजवळ सोडलं आणि तिला बोलायची संधी न देता 'बाय' करून गाडी परत फिरवली. 
ती त्याला गाडीवरून जाताना बघत राहिली, बराच वेळ. 

--------------------------
मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या लॉबीमध्ये तो तिची वाट बघत उभा होता. ती आली, साडी नेसून, केस मोकळे सोडून, छान आवरून. आज चष्माही काढून लेन्स घालून आली होती. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिचा हात धरून तो तिला लिफ्टमधून टेरेसवर घेऊन गेला. त्यानेही तिने गिफ्ट दिलेला सूट घातला होता. टेरेसवर फक्त एकच टेबल होतं त्यांचं. त्याने तिला तिच्या खुर्चीत बसवलं आणि स्वतःही बसला, तिचा हात हातात धरून बराच वेळ. दोघेही काहीही न बोलता मागे लागलेलं गाणं ऐकत शांत बसून राहिले. 
"किती छान गाणं आहे ना?",ती. 
"कितीही ऐकलं तरी समाधान होत नाही",तो. 
टेबलवरची गुलाबाची दोनच फुलं ती निरखत राहिली. आणि तो तिच्याकडे बघत राहिला. 
"हे असं तयार होऊन आलीस की किती सुंदर दिसतेस तू",तो. 
"ह्म्म्म पण हे असं नटायला तासनतास जातात, शिवाय पैसे वेगळेच",ती. 
"तू कधी ना खूप प्रॅक्टिकल बोलतेस",तो वैतागला. 
"बरं बाबा, सॉरी. होईन तयार अशीच छान नेहमी, बास?",ती. 
"बास म्हणजे काय? तुला नाही का वाटत माझ्यासाठी काहीतरी करावंसं? मी नेहमी विचार करतो तुझ्या आवडीचा. ",तो चिडला. 
 "अरे पण आता आलेय ना तुझ्याचसाठी? चिडतोस काय? शांत हो बरं", तिने समजावलं. 
तो गप्प बसला. दोघे मुकाट्यानेच जेवले. वेटरला काहीही न सांगताही तिच्या आणि त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ एकेक करत येत राहिले होते. थोडं पोट भरल्यावर ती हसली. आणि तिला असं खूष बघून तोही. 
डिझर्ट येईपर्यंत दोघे उठले आणि टेरेसवर फिरत राहिले. त्याने तिचा हात हातात धरला. तिने सोडवायचा केलेला प्रयत्न व्यर्थ होता. 
थंडी वाटू लागली तसे त्याने त्याचे दोन्ही हात तिच्याभोवती टाकले. ती काही बोलणार इतक्यात त्याने तिचा किस घेण्यासाठी ओठ पुढे केले आणि ती चिडली. 
"जरा स्थळ काळ बघत  जा ना?", ती ओरडली. 
"मला कळत नाही या ठिकाणी आपण दोघेच असताना तुला काय प्रॉब्लेम आहे?",तो. 
"आपण घरी आहोत का? ",ती. 
"नसू दे ना. पण एकमेकांचे तर आहोत ना?",तो. 
"मला हे असं पब्लिकमध्ये नाही आवडत कितीवेळा सांगितलं मी?",ती. 
"तू ना कधी बदलणार नाहीस, कितीही प्रेम तुझ्यावर उधळलं ना तरीही?",तो. 
"हे बघ हे असंच प्रेमाचं प्रदर्शन असतं तुझं, कायम. करायचंय ना प्रेम मग नाही अपेक्षा ठेवायची, आपल्याला जे जमेल तेव्हढंच करायचं. मी करतो म्हणून तूही कर का म्हणायचं?", ती बोलत राहिली. 
तो तुटत राहिला. 
"चल निघू आपण",तो म्हणाला. 
"चल.",म्हणत तिने पर्स उचलली. 
लिफ्टमध्ये तो तिच्याकडे बघत राहिला काहीही न बोलता. हॉटेलच्या खाली आल्यावर 'टॅक्सी' ला हात केला. 
दार उघडून तिला बसवून,"बाय इरा" इतकंच बोलला. तिला घेऊन टॅक्सी निघाली आणि तो तिथेच उभा राहिला कितीतरी वेळ. 

----------------------------------------------
सकाळी डोळे चोळत त्याने फोन उघडला. रात्री कधीतरी झोप लागून गेली होती. मेल बॉक्समध्ये तिची मेल आलेली होती. 
"तू आणि मी... किती वेगळे. म्हणजे दोन टोकं म्हणण्यासाठीही मध्ये काहीतरी हवं ना? मला नेहमी आश्चर्य वाटत राहिलं की काय म्हणून आपण जवळ आलो असू? काहीतरी असायलाच हवं ना? त्याशिवाय का आपण भेटत राहिलो दर थोड्या दिवसांनतर, ते ही परत तोंडही पहायचं नाही असं ठरवून. हां, नाही म्हणायला मला एक वाटायचं, आपण दोघेही जरा वेडे होतोच. सुरुवातीला एकमेकांसाठी आणि नंतर..... 
       ते सुरुवातीचे स्वप्नातले दिवस सोडले तर बाकी काय होतं सांग ना? आपल्या आवडी-निवडी, स्वभाव सगळंच वेगवेगळं होतं. तरीही किती विचित्र असतं ना माणसाचं मन? दरवेळी त्या मंतरलेल्या दिवसांच्या मागे मागे धावून पुन्हा तुझ्याकडे यायचे आणि तूही माझ्याकडे. मग थोडे दिवस पुन्हा तो खेळ, जुने क्षण पुन्हा पुन्हा जगण्याचा. एका हव्या असलेल्या, हरवलेल्या स्वप्नाला नवीन जोमाने एकमेकांत शोधायचा. साहजिकच तीच भांडणं, तोच अपेक्षाभंग आणि तेच अजूनच दुखावलेलं मन. पुन्हा एकदा वेगळं होणं, थोड्या दिवसांनी हरवलेल्या स्वप्नांचा शोध घेत परत येण्यासाठी.
      मला तुझ्या आधीच कळला हा खेळ. तेव्हापासून तर तुझी चिडचिड अजूनच वाढली माझा तटस्थपणा बघून.तुला काय त्रास होत असेल चांगलंच कळत होतं मला, पण मी तरी काय करणार होते? तुला समजावणं अवघड होतं रे, हे असं धावणं किती व्यर्थ आहे. पण काल रात्री निघाले तेव्हा, तुझ्या डोळ्यांत तो शोध थांबलेला दिसला आणि किती बरं वाटलं, माझ्यासाठी नव्हे, तुझा त्रास, छळ अखेर संपला म्हणून.
पण खरं सांगू? काल रात्री झोप लागली नाही मला. शेवटी दोन टोकं जोडणारा धागा तुटला होता. बाय चैतू.
इरा."


विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, October 24, 2017

पोस्ट दिवाळी डीटॉक्स

डिस्क्लेमर: या पोस्टमध्ये 'पोस्ट दिवाळी डीटॉक्स' बद्दल कुठलेही शॉर्टकट मिळणार नाहीत. पण दिवाळीनंतर एकदम हॉट टॉपिक असल्याने त्याचं नाव हे दिलंय. तितकेच कुणी वाचेल तर चांगलेच आहे. :) 

तर सांगायचं कारण काय तर दिवाळी रविवारी संपली. यावेळी तर जास्तच धावपळ झाली होती. फराळ बनवणे, खाणे, छान कपडे घालून पार्टीला जाणे, फोटोशोषण करणे(माझे फोटो अन पोरांचे व नवऱ्याचे शोषण) आणि लगेच दिवाळी संपायच्या आत ते फोटो लगेच पोस्ट करणे वगैरे महत्वाची कामे तत्परतेने केल्याने सोमवारी खूपच दमायला झालं होतं. जरा कुठे ऑफिसमध्ये बसून आराम करायला मिळेल म्हटलं तर लोकांचे भराभरा प्रश्न आणि पोस्ट्स, शेयर्स दिसू लागले होते. कशाचे तर, या पोस्ट दिवाळी डीटॉक्सचे. हो त्यात आपल्या ऋजुता दिवेकरचे पोस्टही एकदम ढिगाने फॉलो आणि शेयर झाले होते. मीही दोन चार वाचून घेतले. असो. 

       मला पडलेला प्रश्न हा आहे की दरवेळी दिवाळी संपली किंवा न्यू इयर पार्टी झाली की लगेचच लोकांना हे असे प्रश्न का पडतात? इथेही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच सर्व दुकानांत स्पोर्टच्या कपड्यांवर सूट असते, जिम मेम्बरशिप वर डिस्काऊंट असतो आणि जानेवारीत जिममध्येही खच्चून गर्दी असते. या सगळ्यांतून एकच गोष्ट दिसते ती म्हणजे सणांमध्ये खाणे, पिणे याकडे केलेलं दुर्लक्ष आणि त्यातून येणारा अपराधीपणा. त्या अपराधी भावनेतूनच बरेचसे लोक असे तत्परतेने वजन कमी करायच्या मागे लागतात. दिवाळीच्या आधी किंवा बाकी वर्षभरात का या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही? वजन कमी करणे हे दरवेळी शॉर्ट टर्म गोल का असते? 

         प्रत्येकाला अचानक जाणवतं की माझं वजन वाढलंय. आपण वर्षभर आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतोय हे का कळत नाही कुणाला? बरं, या वागण्यातही एकच ध्येयअसते, वजन कमी करणे. किंवा बारीक होणे. कुणीच असं म्हणत नाही की मला 'फिट' किंवा 'सशक्त' व्हायचं आहे. एखादं काम करण्यासाठी माझी शारीरिक क्षमता वाढवायची आहे. मला जरा चालताना दम  लागतो, ते कमी करायचं आहे किंवा मुलांसोबत खेळता यायला हवं इतकं फिट व्हायचं आहे? का ते सर्व सोडून आपण एका नंबरच्या आणि वजन काट्याच्या मागे लागतो. वजन कमी करणे हे ध्येय असू शकतं पण केवळ तेव्हढेच ध्येय ठेवल्याने आणि तेही थोड्याच काळापुरते ठेवल्याने, पुढच्या दिवाळीतही पुन्हा आपण तिथेच असतो. 

         बरं या खाण्यात किंवा झटकन वजन कमी करून घेण्याच्या प्लॅनमधेही लोकांचे इतके गैरसमज असतात. मी तर इतक्या वेळा इतक्या लोकांकडून ऐकलं आहे आणि तेही कुत्सितपणे,"मला नाही बाबा ते भाजीपाला खायला जमत" किंवा "मला अजिबात उपाशी राहायला जमत नाही". म्हणजे वजन कमी करण्यासाठी सॅलड खावं लागतं किंवा उपाशी राहावं लागतं हा अगदी सर्वसामान्य गैरसमज आहे. उलट जर आपण झटकन वजन कमी करण्याच्या नादाला लागलो नाही आणि रोजच्या जेवणात सर्व पदार्थांचा आणि योग्य प्रमाणात समावेश केला तर ते जास्त योग्य आहे. किती लोक Carb, Protein, fiber या सर्व बाबींचा जेवणात समावेश आहे की नाही पाहतात? आपल्याला दिवसांत किती protein लागतं आणि त्यातील किती आपल्या जेवणातून मिळतं हे किती लोकांनी पाहिलेलं असतं? उपाशी राहणे किंवा सॅलड खाणे या पेक्षा नीट विचार करून असा चौफेर आहार ठरवणे आणि तो बनवणे हे अधिक कष्टाचं काम आहे. आणि ते फक्त स्वतःसाठीच नाही तर आपल्या पूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त आहे. 

         आपलं शरीर जितकं काम करतं त्यापेक्षा जास्त खाल्लं की वजन वाढणारच हे नक्की. तात्पुरत्या डाएट प्लॅनने ते बदलणार नाहीये. रोज शरीराला थोडा का होईना व्यायाम पाहिजेच. साधं जिना चढून जाणे किंवा एखादी गोष्ट घ्यायला पटकन उठणे किंवा निदान अर्धा तास तरी व्यायाम करणे या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. आळसावलेलं शरीर असेल तर ते या छोट्या गोष्टींतही त्रास देतं. त्या आळसातून बाहेर पडून स्वतःला वळण लावणे हे जास्त महत्वाचं आहे. चार दिवस व्यायाम केला नाही तर अस्वस्थ वाटलं की समजायचं की कुठल्याही डाएटची गरज नाहीये. :) अनेकदा माझ्या सासूबाई किंवा सासरे जरा जास्त जेवण झालं सकाळी की रात्री सरळ जेवण टाळतात. का तर सवय नाही. रोजच्या ठराविक आहाराची सवय पडली की थोडं जास्त खाल्लं तर शरीरच आपल्याला सांगेल थांबायला. दिनचर्येत असा बदल होणं जास्त योग्य आहे. नाहीतर कधी ना कधी आपलं शरीर साथ देणं सोडणारच आहे. 

         मी अनेकवेळा अनेक लोकांना विचारते किंवा म्हणते की व्यायाम करा, सुरुवात करा आणि नियमित करा. तेव्हा मला अनेक कारणं ऐकायला मिळतात. कारण 'व्यायाम करणे म्हणजे केवळ जिममध्ये जाणे' हाही गैरसमज आहे. रोज घरातच योगासने करणे, पोटाचे, पाठीचे, पायाचे व्यायाम करणे हे सहजपणे होऊ शकते. त्याचबरोबर बाहेर निदान ३० मिनिटे जास्त वेगाने चालणेही चांगला व्यायाम आहे. तसाच जिना चढणेही. या सर्व वेगवेगळ्या व्यायामाचा एकत्र परिणाम पाहिला तर नक्कीच फरक जाणवेल. आणि मुख्य म्हणजे 'जिममध्ये जायलाच जमत नाही' हे कारण दिलं जाणार नाही. 
       
        अजून एक गैरसमज म्हणजे 'मी घरची इतकी कामे करते वजन कमी होत नाही'. मी नेहमी पाहिलं आहे की मी जेंव्हा घरून ऑफिसचं काम करते तेव्हा माझं चालणं अतिशय कमी होतं  आणि ऑफिसमध्ये जाते तेंव्हा नाही म्हटलं तरी १-२ किमी सहज चाललं जातं. तात्पर्य काय की घरात राहून स्वयंपाक करणे किंवा अजून काही कामं केली तरी तेव्हढा व्यायाम शरीराला पुरेसा नाहीये. त्यात अतिशय मर्यादित हालचाल होते आणि तीही शरीराच्या सर्व अवयवांची होत नाही. त्यामुळे घरातली कितीही कामे केली तरी जरा चार पावलं धावलं तर तुम्हाला दम लागणारच कारण हृदयाला तेव्हढ्या वेगाची सवयच राहात नाही. त्यामुळे बाकीची कामे असली तरी आवर्जून वेळ काढून पूर्ण शरीराचे व्यायाम केलेच पाहिजेत. असो. 

         एकूण काय, अनेक गैरसमजुतीतून बाहेर येऊन आपल्याला नक्की काय करायला हवं याचा विचार केला पाहिजे . माझं म्हणणं इतकंच की हे असे दिवाळी किंवा न्यू इयर नंतर येणाऱ्या अपराधीपणापेक्षा, आपल्या दिनचर्येत किंवा रोजच्या खाण्याच्या सवयीत बदल करून घेणे आवश्यक आहे. आणि तो केला तर दोन चार दिवस जरासं जास्त खाल्लं तर काही फरक पडणार नाहीये. जोवर हे लक्षात येत नाही तोवर पोस्ट दिवाळी डीटॉक्स चालूच राहणार. आता दिवाळीच्या निमित्ताने सुरुवात करणार असेल कुणी तर काहीच हरकत नाही, पण ती सुरुवात असावी, पुढच्या कायमस्वरूपी सकारात्मक बदलांची.  

विद्या भुतकर. 

Wednesday, October 18, 2017

रांगोळी

      गेल्या आठवड्याभरात भरपूर कामे होती. एकेक करत फराळ बनवायचा होता, त्यात पणत्या रंगवणे वगैरे चालूच होते. त्यामुळे दिवाळी सुरु झाली तरी घर अजून सजलं नव्हतं. उद्या लक्ष्मीपूजनाची मुलांना शाळेलाही सुट्टी आहे तर संध्याकाळीच सुरुवात करावी म्हटलं, रांगोळी आणि दिव्यांच्या माळा लावून. 
        रांगोळी म्हटलं की दिवाळीची पहाटच आठवते. आमच्या घराच्या पुढच्या आणि मागच्या अंगणात रांगोळी काढायची असायची. त्यात आम्ही कधी लवकर उठणारे नव्हतोच. तरीही दारात रांगोळी काढायला मिळेल या आमिषाने उठायचेच. आमची आई सुंदर रांगोळ्या काढते. त्यामुळे दिवाळीला पुढच्या अंगणात तिचीच रांगोळी असायची, असते. पण मला ते अजिबात पटायचं नाही. मोठी होऊ लागले तशी आईशी वाद घालायचे की मला तू मागच्या अंगणात रांगोळी काढायला लावतेस आणि स्वतः पुढे काढतेस म्हणून. कारण काय तर अर्थातच माझी रांगोळी पाहायला मागच्या अंगणात कुणी येणार नसायचं. आता वाटतं थंडीत लवकर उठून रांगोळी काढायचा मला तरी किती अट्टाहास. 
          कितीही कुडकुडत असले तरी सकाळी उठून रांगोळी काढायचेच. कधी ठिपक्यांची तर कधी फुलांची नक्षी. तेव्हा कॅमेरा असता तर फोटोही काढले असते. आता फक्त त्याच्या पुसत आठवणी आहेत. ठिपक्यांच्या रांगोळीत अनेकवेळा ठिपके कधी तिरके जायचे तर कधी रेषा जोडताना काहीतरी चूक व्हायची. मग त्यात खाडाखोड झाली की ते छान वाटायचं नाही. नक्षी काढताना रेषा तितक्या सुबक यायच्या नाहीत. तरीही ती पूर्ण करण्याचा आग्रह असायचा. तासभर बसून रांगोळी पूर्ण करेपर्यंत उजाडलेलं असायचं आणि सर्वांचे फटाके वाजले तरी आमच्या आंघोळी अजून बाकीच असायच्या. पण ती पूर्ण झालेली रांगोळी बघताना जे समाधान असायचं ते आजही मिळालं. 
          आज संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर सुरुवात केली. अंधार आणि थंडी अगदी घरी असायची तशीच, तिकडे पहाट असायची तो भाग वेगळा. पण मी सुरुवात केल्या केल्या मुलं हट्ट करू लागली. त्यात सान्वीला बाजूला कुठे रांगोळी काढायची नव्हती. वाटलं, माझीच लेक ती, माझ्यावरच गेलीय. :) मग तिला माझ्या शेजारीच खडूने फुले काढून दिली आणि रंग भरायला सांगितले. मुलांनी दोघांनी मिळून ते पूर्ण केलं. माझी मात्र रांगोळी बराच वेळ चालली. पूर्ण होईपर्यंत थंडीने बोटे वाकडी झाली होती आणि पाठ मोडलेली. पण उभे राहून पुन्हा पुन्हा पूर्ण झालेल्या रांगोळीकडे पाहायचे समाधान मात्र खूप दिवसांनी मिळालं. आणि हो, रंग आणि रांगोळी यावेळी भारतातून येताना आईचेच ढापून आणले होते. :) तिला आता यावेळी नवे घ्यावे लागले असणार. :) 
        इथे पहाटे उठणे, उटणं लावून अंघोळी, फटाके वगैरे काही करणं जमत नाही. पण मुलांना आमच्यासारख्या काही आठवणी मिळाव्यात म्हणून जमेल तेव्हा, जमेल तितकं करत राहतो, इतकंच. :) 
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!




विद्या भुतकर. 

Sunday, October 08, 2017

पण सुरुवात करायला हवी....

     आज सकाळी बॉस्टन हाफ मॅरेथॉन झाली. या वर्षातील शेवटची रेस. मागच्यावर्षी प्रमाणे, यावेळीही ३ रेस केल्या, ५ कि.मी., १० कि.मी. आणि २१ कि. मी. आजची ! या वर्षीची ही शेवटची रेस खास होती एका कारणासाठी. ते म्हणजे ही माझी पाचवी हाफ मॅरेथॉन होती. २०१२ मध्ये स्वनिक चार महिन्यांचा असताना या प्रवासाला सुरुवात केली होती. तेंव्हा केवळ पुन्हा मूळच्या वजनाला यायचं हे एक ध्येय होतंच पण सर्व सर्वात जास्त मला स्वतःला वेळ देण्याची गरज वाटत होती. नोकरी, मुलं, घर आणि बाकी सर्व जे काही चालू होतं त्यातून स्वतःला वेळ काढायचा होता, कितीही अवघड असलं तरी. त्या रेसच्या निमित्ताने हे झालं होतं. 
      त्यानंतर रनिंग हे माझ्याच नाही तर आमच्या घरात नियमित झालं. पुण्यात असताना ५ किमी, १० किमी रेस पळाले मैत्रिणींसोबत. आणि सोबत नवऱ्याचीही पळण्याची सुरुवात झाली होती. तिथून पुढे आम्ही जवळजवळ सर्वच रेस सोबत गेलो आहे. अशा वेळी मुलांचं कुणीतरी बघणं आवश्यक असतंच. प्रत्येकवेळी घरातलं कुणीतरी किंवा मित्र-मैत्रिणी यांच्याकडे मुले आनंदाने राहतात. अशा वेळी आपण किती नशीबवान आहोत हे जाणवत राहतं. आमच्या दिनचर्येत पळणं अविभाज्य घटक झाल्याने मुलांनीही ते आता स्वीकारलं आहे. आणि आम्हाला त्यांच्याकडून प्रोत्साहन देत राहतात. कधी आम्ही मेडल्स घेऊन घरी आल्यावर ते गळ्यात घालून मिरवूनही. 
    मी सुरुवात केली होती तेंव्हा एकटीच पळत होते. मग हळूहळू नवरा, मित्र-मैत्रिणी सोबत आले. आवडीनुसार त्यातील अनेकांनी कधी रेसमध्ये सहभाग घेतला, काहींनी जिममध्ये. इथे बॉस्टनमध्येही दर रविवारी पळायला जाताना एकेक करत मित्र-मैत्रिणी सोबत येऊ लागले आहेत आणि हा सहभाग असाच वाढावा ही इच्छाही आहेच.  एकेक करत पाच मोठ्या रेस झाल्यावर जाणवत आहे की हे इथंच थांबणार नाहीये. 
     पहिल्या रेसच्या वेळी खूप काळजीत होते, आजूबाजूच्या लोकांना बघून आपण किती नवखे आहोत हे जाणवत राहायचं. ते अजूनही वाटतंच. पण तेव्हा एक पुस्तक वाचलं होतं. त्यात लिहिलं होतं की तुम्ही दिवसातून १५ मिनिट पळत असाल किंवा चालत असाल, तुम्ही ते करताय ते पुरेसं आहे स्वतःला 'रनर' म्हणवून घेण्यासाठी. तोच युक्तिवाद मी माझ्या ब्लॉग साठीही वापरला पुढे मग. अगदी नसेल मी मोठी लेखिका, पण नियमित लिहितेय ना? मग आहे मी लेखक. :) 
     तेच मी सर्वांनाही इथे सांगू इच्छिते, ज्यांना खरंच काहीतरी प्रयत्न करायचे आहेत किंवा ज्यांना कुठूनतरी सुरुवात करायची आहे. आपण एखादी गोष्ट जी नियमित करतो ती तेव्हा कितीही लहान वाटू दे, पण ती नियमित केल्याने त्यातूनच एक कारकीर्द बनते. मग ते रोजचा व्यायाम असो, एखादा आहारातील बदल असो किंवा एखादी लावलेली चांगली सवय असो. :) पण सुरुवात करायला हवी आजच!
पाच वर्षांच्या निमित्ताने सर्व मेडल्स सोबत घेतलेला एक फोटो. :)

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, September 27, 2017

Tuesday, September 26, 2017

चिंता

     काल रात्री झोपताना, पडल्यावर स्वनिकची चुळबुळ चालू होती. म्हटलं,"झोप आता सकाळी उठत नाहीस". काही वेळाने म्हणाला,"मी ते शाळेच्या लायब्ररीचं पुस्तक परत दिलं नाही तर मला दुसरं घेता येणार नाही. ". म्हटलं,"मग?". म्हणे,"मग फक्त तिथेच वाचून परत यावं लागतं. घरी आणायला मिळत नाही." त्याला विचारलं,"तू घरी आणलं होतंस का?". आम्हाला तर माहीतही नव्हतं. आम्ही दोघेही त्याला सांगू लागलो की शाळेचं पुस्तक घरी आणायचं नाही, तिथेच वाचून परत करायचं. आता त्याला कारण म्हणजे आमचे आधीचे अनुभव. मुलीने मागच्या वर्षी असंच एक पुस्तक आणलं होतं, सहा महिन्यांनी ने घरात सापडलं. एकतर बाकीचे व्याप कमी असतात म्हणून या सर्व गोष्टींचेही लक्षात ठेवायचे? 
        त्यात कालच आम्ही गावातल्या लायब्ररीची पुस्तके परत करून आलो होतो, तीही २४ होती. अचानक नवऱ्याला आठवलं की परत देताना २५ दिली आहेत. आता तो तरी किती लक्षात ठेवणार? एकूण काय की आम्ही हे अशी पुस्तके सांभाळणे आणि वेळेत परत देणे यात बरेच घोळ करतो त्यामुळे शाळेतून अजून घेऊन न येणे हेच उत्तम असं मुलीला सांगितलं आहे. पण स्वनिकचा शाळेतील पहिलाच महिना आहे त्यामुळे त्याला हे सर्व नवीनच. आता त्याला अजूनच चिंता पडली की ते पुस्तक गावातल्या लायब्ररीत गेलंय. आता तेही नाही मिळालं तर पुढे काय? बिचारा चांगलाच काळजीत होता. शेवटी मी त्याला समजावलं, आपण उद्या जाऊन घेऊन येऊ आणि मग तू शाळेत दे. त्याला हे लगेच पटलं नाहीच. दोन चार वेळा समजावून सांगितल्यावर झोपून गेला. 
      आज पुस्तक आणून दिलं आणि ते त्यानं लगेच बॅगमध्येही टाकलं. झोपताना त्याला म्हटलंही,"आता नाही वाटत ना काळजी? झोप निवांत.". "हो झोपतो, आता मी काळजी नाही करतेय", असंही म्हणाला. 
       किस्सा छोटाच आणि त्यात झालेला घोळही लहान. उलट आज गावातल्या लायब्ररीतून ते पुस्तक आणायला गेल्यावर नवऱ्याला कळलं की हे असं नेहमी होतं आणि ते लोक दार महिन्याला अशी जमा झालेली पुस्तकं शाळेला परत नेऊन देतातही. आता हे सर्व पाहिलं तर किती सोप्प वाटतं. पण काळ रात्री स्वनिकच्या जीवाला किती घोर लागला होता. मला अजूनही आठवतं शाळेचं किंवा लायब्ररीचं पुस्तक मिळत नाहीये म्हणून चिंतेत कितीतरी रात्री मी अशा घालवल्या आहेत. एका बाईंचं,'शामची आई' सापडत नव्हतं मला. कितीतरी महिने मला त्याची चिंता पडली होती. आता हे सर्व खूप वेडं वाटतं, पण त्या वयात ती किती मोठी काळजी होती. 
      चप्पल हरवली, शाळेला उशीर झाला, गृहपाठ झाला नाहीये, डबा शाळेतच राहिला, डबा घरी राहिला, पेपरला अभ्यास झाला नाहीये, केसांना काळ्या रिबिन्स हव्या होत्या-लालच लावल्या आहेत, अशा कितीतरी चिंता घेऊन जगले. निदान त्यांनी तरी तसं राहू नये असं वाटतं. पोरांना या वयात खरंच अशा छोट्या गोष्टींची चिंता करावी लागली की वाईट वाटतं. ते जुने दिवस आठवतात. अशावेळी आपण केवळ त्यांना शांतपणे समजावून तो प्रश्न सोडवून दिला तरी किती दिलासा मिळतो बिचाऱ्यांना, नाही का? 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, September 25, 2017

कसं काय जमतं?

    सकाळी शेवटी डॉकटरकडे जाऊन आले. तीन दिवस बिघडलेल्या पोटावर सर्व प्रयोग करून झाल्यावर, नाईलाजाने. अर्थात सर्व शहाण्या भारतीय नागरिकांप्रमाणे मीही दुकानातून औषध आणलं होतं आणि ज्या लोकांना मला बरं वाटत नाहीये माहित होतं त्या सर्वांनी सांगितलेले सर्व घरगुती उपचारही करून झाले होते. डॉक्टरकडे जाणे म्हणजे जणू तुमच्या या सर्व उपचारांची हारच! त्याच हरलेल्या, पडलेल्या मानेने आम्ही गेलो. सुरुवातीचे पैसे वगैरे घेण्यासारखी महत्वाची कामे झाल्यावर तपासण्यासारखी मामुली कामे करायची वाट बघत बसलो. समोर टीव्हीवर ढिगाने चौकोनी बॉक्स दिसत होते. त्यात इतके सगळे ऑप्शन होते की आजारी पडावं तर इथेच असा विचारही मनात येऊनगेला.

      थोड्या वेळाने छान आवरलेली नर्स आली आणि गोड हसून चेकिंग रूममध्ये घेऊन गेली. निदान आज तिच्यासमोर माझ्या गबाळेपणाचं स्पष्टीकरण द्यायला 'मी आजारी आहे' हे कारण तरी  होतं. ते मी स्वतःला पुन्हा एकदा समजावलं आणि चेकिंग रूममध्ये गेले. तिथे तिने मला प्रेमाने प्रश्न विचारले. कधीपासून पोट बिघडले आहे, किती वेळा जाऊन आला, कळ येऊन होतेय का, पातळ-चिकट, लाल काळी वगैरे टेक्शर वाले प्रश्नही तिने विचारले. ताप आहे का पाहिलं आणि बीपीही तपासलं. हे सर्व वर्णन मी सविस्तरपणे सांगताना नवऱ्याचा चेहरा कडू होऊन वाकडा झाला होता. 
तर त्या नर्सने त्याला विचारलंही,"तुम्ही ठीक आहे ना?". मग कुठे जरासा तो हसला आणि म्हणाला,"हो हो". 

     सर्व चौकशा झाल्यावर डॉकटर येतीलच लवकर असे सांगून ती निघून गेली आणि आम्हाला जाणवलं,"बिघडलेलं पोट" या विषयावर बोलतानाही कुणी इतकं हसून आणि प्रेमानं कसं बोलू शकतं?

       खरं सांगते, अशा गोष्टींची सवय नाहीये हो? हॉस्पिटल मध्ये जाऊन आजारी माणसापेक्षा बाकी लोकांची तोंड पाहून आजारी पडू असं वातावरण पाहिजे. त्याची सवय आहे. नर्सने केवळ रक्त काढताना नीट शीर तपासून जास्त त्रास न देता रक्त घेतलं तरी आनंद वाटावा याचीही आहे. पण एकतर आजारी माणूस त्यात त्याला हसायला सांगायचं आणि स्वतःही हसतमुख राहायचं? शक्यच नाही.  पुढे डॉक्टरही असाच हसमुख ! मग त्याने मी जे काही करत आहे तेच सर्व करत राहा असा 'विकतचा' सल्ला दिला. शिवाय जाताना दोन-चार पाने प्रिंटआऊटही वाचायला. (मी ते वाचणार नव्हते हे सांगायला नकोच !) 

      तर हे असे अनेक अनुभव आजवर आले. पोरांच्या डिलिव्हरी पासून हातपाय मोडून घेईपर्यंत. प्रत्येकवेळी, समोरचा माणूस रडत असो, टेन्शन मध्ये असो किंवा झोपेत, आपण हसत राहायचं, मुलं असतील तर त्यांच्याशी अजून.... गोड बोलायचं आणि आपलं काम करायचं. कसं करत असतील हे या नर्सेस? दोन्ही पोरांच्या डिलिव्हरी मध्ये सर्वात मोठा त्रास यांचा होता. का? तर इथे समोर आलेल्या पोराचं काय करायचं, झोपायचं कधी, जेवायचं काय असे महत्वाचे प्रश्न समोर असताना मध्यरात्री तीन वाजता आलेली नर्सही छान बोलत राहते. असं वाटायचं की जरा ब्रेक द्याना माझ्या तोंडालाही. किती वेळ हसणार मी हे असं तोंड वासून? त्यातल्या काहीजणी इतक्या पेशन्स वाल्या होत्या. बाळाला फीड कसं करायचं पासून डायपर पर्यंत छान समजावून सांगणाऱ्या. 

     हे असे अनुभव आले की भारतातल्या सर्व डॉकटर व्हिजिट्स आठवतात आणि त्यात आठवते ती म्हणजे 'लक्षात राहणारी नर्स' नसणं !! शक्य होईल तितका निर्विकार, रुक्ष चेहरा, हातात दिलेलं काम चुकूनही तोंडातून ब्र न काढता करून रुममधून निघून जाणं. चुकून काही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर न देणं किंवा एका शब्दात देणं, वगैरे पाहिलं आहे. समोर माणूस २० तास उभा असला तरी त्याच्याबद्दल कणभर दया न येणाऱ्या अनेक नर्स पाहिल्या. वाटतं, त्यांना कसं जमत असेल असं निर्विकार राहणं, किंवा कणभर रागीटपणाकडेच झुकणारं वागणं? अर्थात त्यात त्यांचे शैक्षिणक, आर्थिक स्तर त्याला कारणीभूत असेल का? त्यात त्यांच्याशी अजूनच तुसडेपणाने बोलणारे डॉक्टरही पाहिलेत. त्यांच्या वागण्याने या अशा शांत राहात असतील का? माहित नाही. 
     अजून या कामासाठी अयोग्य असूनही नोकरी करणाऱ्या आणि चक्क रुग्णाकडे दुर्लक्ष करणारे महाभाग निराळेच. त्यांना नोकरीवर ठेवणारे बेजबाबदार डॉक्टर तर अजून डेंजर. तो जरा जास्तच गंभीर विषय आहे. असो. 
     मुलाच्या जन्माच्यावेळी हॅलोविन होता. तेंव्हा रात्री १२ वाजता घाबरवणारा मेकअप करुनही तितक्याच उत्साहाने मदत करणाऱ्या नर्स मी पाहिल्या आहेत. अशा वेळी कितीही नाही म्हटलं तरी तुलना होणं साहजिकच आहे. रोज तेच काम करावं लागणं हा ज्याच्या त्याच्या नोकरीचा अनिवार्य भाग आहे. पण ते आपण कशारितीने करतो यालाच महत्व आहे. नाही का? 

विद्या भुतकर.