Tuesday, May 31, 2016

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता

काल घराजवळच्या फुलांचे फोटो पोस्ट केले होते. मस्त वाटत आहे फुले बघून. त्याला कारणही तसंच आहे. आम्ही पुण्यात असताना असेच ५-६ कुंड्या, गुलाबाची रोपं, कढीपत्ता, असं काही काही घेऊन आलो. पैसे देऊन थोडी मातीही विकत आणली होती. शनिवार-रविवार पाहून कुंड्यांमध्ये रोपं लावूनही टाकली. त्या रोपांना कळ्याही होत्याच आधीपासून. थोड्या दिवसांत कढीपत्ता वाढू लागला. गुलाबाची रोपं मात्र हवी तशी वाढत नव्हती. अगदी आलेल्या कळ्याही सुकून गेल्या. सानुला फुलांची खूप हौस. त्यामुळे आमच्या घरी न फुललेली रोपं पाहून तिला वाईट वाटायचं. आमच्या आजूबाजूंच्या काकूंकडे आलेली फुलं पाहून विचारायची, "आई बाकी सर्वांची फुले इतकी छान येतात. मग आपली का नाही? ". मला काही कळत नव्हतं की आपल्याच घरी का फुलत नाहीत. मी संदीपला गमतीने म्हणालेही की,"May be I am not giving them enough love." :) 
           कदाचित खरंच तसंच असेलही. पुण्यात रोजचा दिवस खूप धावपळीचा जायचा. त्यामुळे कधी सकाळी किंवा संध्याकाळी बाल्कनीत जाऊन किती फुलं आलीत, पाणी घालावं असं कधी जमलंच नाही. उलट बरेच वेळा आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशीच पाणी घालायच्या. तरीही मला वाटायचं की का आपल्याकडे झाडं फुलत नसतील? परत इकडे यायच्या वेळी मी समोरच्या काकूंकडे ती सर्व रोपे देऊन आले, त्यातली बरीच सुकलीत असं मला वाटत होतं. पण साधारण महिनाभरातच काकूंनी मला मेसेज मध्ये एक फोटो पाठवला. त्याच रोपांचा, एकाला एकदम सहा फुले आली होती. ती पाहून तर माझी खात्रीच पटली की नक्कीच आमच्याच घरी किंवा माझ्याकडेच काहीतरी प्रॉब्लेम आहे. 
         आम्ही परत अमेरिकेत आल्यावर निदान वर्षभर तरी घरी रोपे वगैरे आणली नव्हती. पण आता इथे थंडी कमी होऊ लागली तशी खूप नर्सरीत फुलांची सुंदर रोपे दिसू लागली आणि सानुचा हट्ट सुरु झाला. पण मला पुन्हा त्यात पैसे घालून उगाच निराश व्हायचे नव्हते. पण एक दिवस तिच्या हट्टापायी नर्सरी मध्ये गेले आणि मीही रमले. मग ५ गुलाबाची रोपटी, काही वाफे, काही फुलांची रोपे, माती सर्व घेऊन आलो. थोडी मेथी, बेसिल, टोमाटो यांची रोपे लावली. त्यात तिचा खूप काही हातभार नव्हता. पण मजा आली सर्व करायला. अजूनही शंका होतीच मनात की खरंच काही फुले येतील का? की गेले हेही पैसे वाया. 
        पण काही दिवसातच मेथीचे कोंब बाहेर आले. बेसिलची रोपे टिकली. नव्या बिया लावलेले बेसिलही डोके बाहेर काढू लागलेय. सर्वांत आनंदाची गोष्ट म्हणजे गुलाबाला कळ्या येऊ लागल्यात. मग काय आम्ही परवा अजून फुलांची रोपे घेऊन आलो. आणि लावलीही. आता फक्त वाट बघतोय कधी ते गुलाब फुलतात. बाकी अनेक झाडांनाही फुले येत आहेत. मेथी बरीच वाढली आहे. त्यामुळे दिवसातून एकदा तरी घराभोवती एक चक्कर मारून पाहिलं जातं की कुठे काय नवीन दिसतंय. गुलाबाला थोडी कीड दिसत होती तर संदीप स्प्रे घेऊन आलाय. टोमाटोलाही फुलं आलीत. आता ते कसे येतात ते बघू. एकूण काय तर बऱ्याच अपेक्षा आहेत आणि हुरूपही. :) 
         पण विचार केला हेच जर मी जमणार नाही किंवा आपल्याला ते जमतच नाही म्हणून सोडून दिलं असतं तर? आज ही अशी बाग दिसली नसती. कित्येक वेळा आपण एखादी गोष्ट एकाच प्रयत्नानंतर जमत नाही म्हणून सोडून देतो. यात अभ्य्यास, नोकरी आणि बरीच नातीही असतात. पण आपल्याबाबत अजून थोड्या गोष्टी आहेत ज्या खूप जणींमध्ये कॉमन दिसतात. त्यात, एखादा पदार्थ बनवणे, वगैरे तर असतेच. पण एखादी डाएट करणे, व्यायाम करणे किंवा एखादी चांगली सवय, जसे आपले जेवण वेळेत करणे किंवा नियमित फळे भाज्या खाणे या अशा गोष्टी थोडेच दिवस करतो. त्यात अपयश आलं की मला काही ते जमणार नाही म्हणून सोडून देतो. अनेकवेळा एखादा व्यवसाय किंवा जुनीच एखादी कला जोपासणे यासाठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करतो. कधी आधी प्रयत्न केले ती वेळ चुकीची असते किंवा काहीतरी कमी पडलेले असते. म्हणून सोडून का द्यायचे?
           केलेल्या प्रयत्नाने जो यशाचा आनंद मिळतो तो खरंच खूप काही देऊन जातो. आज मला तो आनंद मिळतोय तोही त्यातलाच. :) मी खूप काही ग्रेट करतेय असे नाही. पण या छोट्या गोष्टीच,'मला ते काही जमत नाही.' किंवा 'ते माझ्यासाठी नाहीच असे म्हणून सोडून दिलेल्या असतात. नाही का? यानंतर अजून कुठली गोष्ट ट्राय करावी विचार करतेय. तुम्हीही करा. :) आपल्याला प्रयत्ने, वाळूचे कण रगडायचे नाहीयेत ते एक बरे आहे. :)  

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, May 30, 2016

रानफूल


विद्या भुतकर.

Sunday, May 29, 2016

सल्ला फी आकारली जाईल !!

          सल्ला फी आकारली जाईल !! अनेक वकिलांच्या आणि मोठ्या लोकांच्या दारात ही पाटी नक्की पाहिली असेल. पण जगाच्या लोकसंखेच्या मानाने या अशा लोकांची संख्या नगण्यच म्हणावी लागेल.  कारण बाकी उरलेले आपण सर्व न विचारताच, फुकटचे  सल्ले देत असतो आयुष्यभर. बरोबर ना? :) पैसा, वेळ, दान वगैरे या सर्वांपेक्षा जास्त दिली जाणारी गोष्ट आणि तीही न मागता म्हणजे, सल्ले. सल्ला म्हणजे तरी काय? एखाद्या बाबतीत एखाद्याने कसं वागावं, काय करावं याबाबत दिलेलं आपलं मत. बरं हे मत नुसतं ऐकून सोडून द्यावं अशा पद्धतीचं मत नसतं. ते ऐकणाऱ्याने ऐकावं असं त्यांना मनापासून वाटत असतं आणि त्यांचं ऐकून कुणी यशस्वी झाला तर, 'मीच दिला होता त्याला सल्ला' असं कौतूकानं सांगतातही. हा सल्ला म्हणजे काय आपले आई बाबा ऐकवतात तसा फायनल निर्णयही नसतो. कधी कधी 'तुम्ही कोण मला सांगणारे' असं उलट ऐकून घ्यायची शक्यता असते. त्यामुळे तो अगदी जपूनच द्यावा लागतो. तर असा हा निर्णय आणि मत या दोन्हीच्या मध्ये येतो तो, 'सल्ला'.
          आयुष्याची प्रत्येक पायरी पार पडली की त्याबाबत आपल्याला सल्ला देण्याची पूर्ण सूट आहे असं आपल्याला वाटतं आणि बाकी लोकांनाही. त्यामुळेच बारावी झालेल्या मुलांकडे १०-११ वीच्या मुलांना त्यांचे आई बाबा पाठवतात. म्हणतात,"अरे याला पण जरा सांग थोडं. काय काय तयारी करायची? कधी, किती अभ्यास करायचा? कुठला क्लास लावायचा. सर्व नीट सांग." आपणही मग खूप तीर मारल्यासारखे सांगतो. त्यात मग आपण अभ्यास करताना झोपा काढल्या असल्या तरी चालतं. पुढे मग कॉलेज, नोकरी जसे पुढचे टप्पे तसे अजून सल्ले. :) कधी कधी आपल्या मुलांना कुणी योग्य सल्ले देणारे मिळालेच नाहीत याची खंतही असते पालकांना. तर कधी कुणाचा सल्ला न ऐकून चांगलंच केलं असा अभिमानही. म्हणजे जसं,"माझे काका तर म्हणतच होते की डॉक्टर हो म्हणून, मी मात्र त्यांचं अजिबात ऐकलं नाही. " यात आपण मोठा गड जिंकल्याचा आनंद असतो. 
           प्रेम, लग्न वगैरे मध्ये सल्ले देणारे तर बोलायलाच नको. परजातीय, परप्रांतीय, परदेशीय किंवा लॉंग डिस्टन्स नाती या सर्वात सर्व लोकांचे ऐकून घ्यावे लागते. किंवा एखादी मुलगी किंवा मुलगा योग्य आहे किंवा नाहीये हेही सुनावले जाते. कधी निराश झालेल्या देवादासाला तर कधी प्रेमात लई गमजा मारणाऱ्याला काय केलं पाहिजे, नोकरी, घर, आई बाप, समाज या अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे असे अनेक सल्ले मिळत असतातच. अर्थात या फेज मध्ये कुणी हे असले सल्ले ऐकून घेत नाहीत. पण मुलीला पटवण्यासाठी सांगाल तर नक्की ऐकतील. :) लग्न का केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, कुणाशी केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे अशा अनेक विषयांवर तुम्हाला सल्ले मिळू शकतात, तेही  मो      फ      त !!  असो. 
           याच्या पुढच्या पायरीचे तर बोलायलाच नको. एकदा का लग्न झालं की मग, तुम्हाला सल्ले देणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट होते. आणि ते टाळणे तितकेच अवघड. लग्नानंतर कसे वागले पाहिजे, मुले कधी आणि किती असली पाहिजेत, घर कुठे, कधी घेतलं पाहिजे, भविष्यासाठी कशी गुंतवणूक केली पाहिजे हे सर्व आलेच. पण सर्वात जास्त सल्ले देण्याची फेज असते ती म्हणजे प्रेग्नंट असताना आणि मुले झाल्यावर. कसं वागावं, काय खावं-प्यावं पासून मुलांना कसं वाढवावं आणि कसं नको याचे हजारो-लाखो सल्ले तुम्हाला मिळतील. खरंतर ही पोस्ट लिहायला सुरुवात केली तेव्हा ती मला माझ्या सवयी विषयी लिहायची होती. कारण माझ्यासारखे आई-बाबा झालेले लोक खूप उत्साही असतात. आणि मग जरा कुणाचं पोर आजारी पडलं की मी डॉक्टर असल्यासारखीच सल्ले द्यायला लागते. आणि मला ते थांबवायचं आहे. पण जमतच नाही. जित्याची खोड ! असो. तर आपण बोलत होतो सल्ल्यांबद्दल. 
          मुलं झाल्यावर  आणि विशेषत: पहिल्या वेळी एकतर मोठ्ठ टेन्शन असतं. अगदी आपल्या आई-बाबानाही. कारण तेही पहिल्यांदाच आजी आजोबा होणार असतात. त्यामुळे समोरचा जे सांगतोय ते ऐकून मी मुलं आजारी वगैरे असताना अनेक उपाय करून पाहिलेत. आणि तसेच सल्ले मी देत राहते सर्वाना. प्रत्येकाचं मुल वेगळं, आई-बाप वेगळे, त्यामुळे प्रत्येक सांगितलेला उपाय सर्वाना चालेलच असं नाही. पण द्यायला काय? फुकट आहे, द्या सल्ला. आधी नवीन आई-बाप होणाऱ्यांना सल्ला द्यायचा. मग एकाची दोन मुले झाल्यावर आपलं आयुष्य कसं सुधारायचं याचा सल्ला द्यायचा. :) आणि हो, त्यातही दुसरं मुल हवं की नको आणि ते किती वर्षांनी करावं हाही एक मुद्दा असतोच. :) मला नेहमी वाटतं की सल्ले देणं कमी केलं पाहिजे. आणि ते करण्यसाठी आधी आपला तो प्रॉब्लेम आहे हे मान्य केलं पाहिजे. आणि दुसरे म्हणजे सांगितलेच काही कुणाला तर त्याने ते ऐकलेच पाहिजे असा हट्टही धरला नाही पाहिजे. 
           आता ती सवय का मोडायची आहे मला ते सांगते. होतं काय की, जेव्हा समोरचा सांगत असतो तेव्हा त्याला कदाचित केवळ आपलं गाऱ्हाणं सांगायचं असतं. पण जरा कुणी तोंड उघडलं की सल्ले सुरु. त्यामुळे बरेचदा समोरची व्यक्ती मग काही सांगतच नाही. किंवा सांगितले तरी त्यात मन मोकळं केल्याचं समाधान मिळत नाही. त्यामुळे सल्ले देण्यापेक्षा, I want to try to be a good listener. आणि हो, कधी कधी असेही होते की अनेकदा सांगून आपणच आपली किंमत कमी करून घेत आहोत असेही वाटते. ही काय सांगतच राहणार किंवा हिला काय कळतंय असे उत्तर ऐकायला लागण्याची भीती असतेच. त्यामुळे वेळेतच थांबलेलं बरं, नाही का? अजून एक कारण म्हणजे, मी अनेकदा ब्लॉग लिहिताना ते 'सल्ल्यान्सारखे' वाटू शकतात. उदा: मध्ये मी मुलांच्या वाचण्यावर किंवा डब्यातील जेवणावर पोस्ट लिहिल्या होत्या. त्या लिहिताना मला अनेक ठिकाणी, 'असं करा, असं करू नका' असं लिहिणं मुद्दाम टाळावं लागलं. त्यापेक्षा मी काय काय करते यावर लिहिण्याचा प्रयत्न केला. 
           आजकाल आजू बाजूचे लोक कमी होते म्हणून की काय, आपण कसे वागावे यावर सोशल मिडिया किंवा वृत्तपत्रे किंवा टीव्ही वरही ऐकायला मिळतेच. त्यात माझी भर नको, असा प्रयत्न करत आहे. :) त्यामुळे मी तर म्हणते उलट सल्ला फी आकारली पाहिजे. दिला सल्ला की घ्या फी. म्हणजे माझ्यासारखे फुकट सल्ले देणारे कमी होतील. पण, दुसऱ्या बाजूला मला असंही वाटत की आपल्याला एखादी गोष्ट माहित आहे तर ती लोकांना का नको सांगायला? उलट ज्याची काही काळजी असते त्यांनाच तर सल्ला द्यायचा प्रयत्न करतो. नाहीतर कोण कशाला सांगत बसेल? त्यामुळे कुणी दिलाच असा सल्ला तर नक्की ऐकून घ्या. बघा दिला ना मी सल्ला परत? :) I told you, I need to work on it. :D

विद्या भुतकर.

Friday, May 27, 2016

तू आणि मी

तू आणि मी 
इतके सारखे कसे रे? 

वेडे नव्या प्रेमात
दोघेही मागे होतो 
सिद्ध करण्याच्या,
कसे राहू शकत नाही
क्षणभरही एकमेकांशिवाय. 

आजही चालू आहे 
अशीच चढाओढ
केवळ दाखवायला,
कसा फरक पडत नाही 
आपण सोबत नसल्याने.

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/ 

सूचना- ही कविता कवीच्या संमतीशिवाय कुठेही फेसबुक वर पोस्ट करू नका. कृपया Whats App वर निनावी पाठवू नये. संमतीने नावासहीत पाठवावी. नाव आणि पेज लिंक खाली दिलेली आहे. 

Tuesday, May 24, 2016

Have we stopped trying?

        काल आमच्या पुण्यातल्या शेजारच्या काकू आम्हाला इथे भेटल्या, अमेरिकेत मुलाकडे आलेल्या. अगदी जायच्या एक दिवस आधी का होईना त्या आल्या. अगदी थोडा वेळ का होईना आमच्याकडे थांबल्या आणि साधं का होईना जेवण आम्ही एकत्र केलं. :) त्यांचे आम्हाला भेटण्याचे प्रयत्न पाहून मला छान वाटलं. जुन्या काळची आठवण झाली जेव्हा लोक केवळ 'या गावावरून जात होतो' म्हणून आठवणीने भेटायला यायचे. त्यांच्यासाठी घाईने केलेलं जेवण, त्या छोट्या भेटी, या गोष्टींची किंमत आता कळते, नाही का? रोज फेसबुकवर दिसणारे मित्र एकाच गावात असले तरी भेट होत नाही. परगावाहून किंवा परदेशातून येऊनही लोकांच्या एका गावात भेटी होत नाहीत.अजूनही कित्येकदा आपण आपल्या आई-बाबांना म्हणतो की नाही की,"तुम्ही कशाला आता हे मधेच काढताय? " . हेच ते, जे ते लोक अजूनही करत राहतात आणि आपण मात्र 'कशाला?' म्हणून प्रयत्न सोडून देतो. 
           अनेकदा कुणी असं गावात आलं असेल तर त्यांना वेळ नाही असं तरी कारण असतं किंवा आपल्याला त्यांना भेटायला जायचा वेळ नसतो. या अशा भेटी रोज होत नसतात. मग एखाद्या दिवशी आपल्या रोजच्या कामातून जरा वेळ काढायलाही आपल्याला का जमत नाही? बरं भेटायचं जाऊ दे, फोन करणे, मेसेज करणे याही गोष्टी शक्य का होत नाहीत ? खरंच आपण इतके बिझी झालोय का? की आपण प्रयत्न करायचे बंद केले आहे? Have we stopped trying?   मी पुण्यात असताना अनेक वेळा मैत्रिणींशी भांडले आहे की, उद्या आपण सगळे एकाच गावात असू याची खात्री नाही. त्यामुळे आता वेळ आहे तोवर खूप वेळा भेटून घेऊ. आज त्या भेटी आठवल्या की त्यासाठी केलेली सर्व भांडणं योग्य होती असं वाटतं. खरंच जर उद्या आपल्याला अशी भेटायची संधी कदाचित मिळणार नाही किंवा आता अशी संधी मिळत आहे तर आपण आपले पूर्ण प्रयत्न केलेच पाहिजेत असं आपल्याला का वाटत नाही? आपण खरंच खूप काही गृहीत धरतो का?
           हीच गोष्ट आता एखाद्यासाठी काही विशेष करण्याची आहे. आपले आई-वडील किंवा मामा -मावशी वगैरे अजूनही आपल्या लहानपणीच्या आवडी काय होत्या त्या लक्षात ठेवून तसं काही करण्याचा प्रयत्न करतात. पण माझ्याकडून तितके मात्र होत नाही. होत नाही म्हणजे काय ? तर त्या ठराविक गोष्टीसाठी केले पाहिजे तितके प्रयत्न करत नाही. माझ्या ग्रुपवरच्या काही मैत्रिणी आहेत. कितीही सांगितले तरी दोन शब्द बोलत नाहीत ग्रुप वर. आणि सोशल मिडिया, फोन यांची सवय काही खूप चांगली आहे असं नाही.  पण जवळच्या मैत्रिणी म्हणून आठवड्यातून एकदा तरी मेसेज करूच शकतो ना? आणि त्यानंतर मग कारणे सांगण्यात वेळ जातो. आणि हो हे सर्व मी दुसऱ्या कुणाला असे उद्देशून बोलत नाहीये. यात माझा स्वत:चाही दोष आणि सहभाग आहे. मीही अनेकवेळा आळस केला आहे किंवा अजून थोडे प्रयत्न केले असते तर चालले असते असे वाटते. 
        कालच्या भेटीमुळे अनेक विचार मनात आले त्यावरून हे लिहिलेलं. :) आता या सुट्टीत माझे पूर्ण प्रयत्न करायचं ठरवलं आहे. बघू काही फरक पडतो का? 

विद्या भुतकर.

सॉक्स, सिरीयसली?

       सॉक्स, सिरीयसली? तुम्ही म्हणाल ही सिरीयसली सॉक्सवर लिहितेय? मी म्हणते का नको लिहू? इतकं पिडलाय त्या सॉक्सनी मला सध्या. आज सकाळीच लोण्ड्री झाल्यावर कपडे घडी घालत बसले होते. एकेक करत सर्व घड्या झाल्यावर, पोपकॉर्न खाल्ल्यावर खाली कसे फक्त न उडालेले कॉर्न राहतात तसे सॉक्स बाकी राहिले होते. एक-दोन नाही २५-३० तुकडे होते. तीन लोकांचे मिळून. त्यातून मग जोड्या जुळवा चे काम केले. त्यानंतरही पाचेक सॉक्स बाकी होते ज्यांना जोडी सापडली नाही. मग एका ठिकाणी आम्ही मागच्या वेळी एकटे राहिलेल्या सॉक्सना जमा करून ठेवलेलं असतं. तिथे जाऊन ते घेऊन आले. त्यातूने मला अजून तीन जोड्या मिळाल्या. तरीही अजून मागचे आणि यावेळचे मिळून ५-६ एकेकटे ते सॉक्स तसेच पडून आहेत.
         गेल्या १०-१२ धुतलेल्या कपड्यांच्याकडे पाहता मला एक कळलंय की आमच्याकडे निदान असे दोनेक तरी सॉक्स आहेत जे धुताना टाकलेले असतात पण त्यांची जोडी कधीच जुळत नाहीये. पण ते शूजच्या कपाटात अजूनही असतातच. मग सगळे धुवायचे टाकताना तेही उचलून आणतो आणि पुन्हा एकदा एकटे आहेत म्हणून तसेच ठेवतो.  मुलांच्या शाळेत अक्खा दिवस शूज घालून बसायचे म्हणजे निदान दिवसाला एक तरी जोडी हवीच. अगदी ६ जोड्या आणल्या तरीही वेळेत सापडत नव्हते म्हणून मी अजून ४ आणले. तेही पुरवून पुरवून वापरले म्हणजे अगदीच नाईलाज असेल तरच नवीन काढले. असे असूनही प्रत्येक वेळी सकाळी घाईत मला एक जोडी सापडत नाही. 
         कोणे एके काळी माझ्या एका मैत्रिणीने मला सॉक्सची गुंडाळी करायला शिकवले होते. म्हणजे काय तर, दोन्ही सॉक्स एकत्र करून गोल गुंडाळायचे आणि सर्वात शेवटी एका सॉक्सच्या आत सगळी गुंडाळी टाकून द्यायची. त्यामुळे जोडी एकत्र राहते. तर मी अजूनही मनोभावे या सर्व सॉक्सच्या जोड्या गुंडाळ्या करून ठेवते. म्हणजे ऐनवेळी पटकन सापडतात. आता इतके पद्धतशीर ठेवूनही, माझी ही अशी अवस्था का? तर आठवड्याच्या शेवटी शेवटी खराब झालेले सॉक्स एकेकच मिळतात, जे दिसेल ते धुवायला टाकायचे या नियमाने संदीप ते सर्व धुवायला टाकून देतो आणि मग बरेचदा, सोफ्याच्या मागे, कपड्यांच्या कपाटात असे एकेक तुकडा असतो आणि दुसरा लोण्ड्री मध्ये. घरातून कुठलीही गोष्ट बाहेर जात नाही, मुले घरात येऊनच सॉक्स काढतात. तरीही नेहमी या जोडीतील दुसरा सॉक्स कसा आणि कुठे जात असेल याचा मला जर डिटेल मध्ये शोध लावावा लागेल असं दिसतंय. 
       सगळ्यात वाईट काम म्हणजे सकाळी सकाळी  ड्रायर मध्ये असलेल्या किंवा घडी न केलेल्या कपड्यांच्या ढिगातून एक जोडी शोधणे. पटकन सापडले नाहीत म्हटल्यावर नाईलाज म्हणून मी गोल ड्रायर मध्ये हात घालते. कुठेतरी एक सॉक्स मला दिसतो. अजून थोडा ढीग उकरल्यावर तसाच दिसणारा सॉक्स मिळाला म्हणून पाहते तर आधीच दिसलेला तो सॉक्स असतो. मग मी दुसरी जोडी मिळते का बघायला लागते. यात २-४ मिनिट गेलेले असतात. मग मी फ़्रस्ट्रेशन मध्ये दिसला सॉक्स की जमिनीवर टाक असे करत १०-१२ तुकडे जमिनीवर पडतात. आणि त्या १०-१२ मध्ये एकतरी जोडी मिळेल अशी माझी अपेक्षा असते. कधी कधी काय होतं की सान्वीच्या दोन सारखे वाटतील असे तुकडे मिळाल्यावर कळतं की एकावर मध्येच थोडी पिंक डिझाईन आहे जी दुसर्यावर नाहीये. आणि बरोबर तेव्हढाच भाग शूज मधून बाहेर दिसू शकतो. मग परत मी अजून दोन-चार तुकडे जमिनीवर टाकते. त्यातून कधी सान्वीचे मिळाले तर स्वनिकचे मिळत नाहीत. तर कधी मी संदीपच्या एखाद्या सॉक्सला स्वनिकच्या सोबत जोडते. 
          कुणाला वाटेल की मी किती बेशिस्त बाई आहे. पण खरंच त्यावेळेस खूप चिडचिड होते. कसेतरी एक जोडी मिळाली की मी स्वनिकला देते आणि सांगते अरे घाल मी डबे, पाण्याच्या बाटल्या भरत असते. हा आपला असाच बसून राहतो जिन्यात. आधीचे दोन वेळा ओरडून झाल्यावर त्याची काहीच हालचाल नसते. मग मी अजून जोरात ओरडते.  त्यावर त्याचं उत्तर येतं,'Why do you always have to yell at me?'. झक मारत मी त्याच्या पायात ते सॉक्स आणि शूज चढवते आणि एक लढाई संपवून दुसरी लढायला घरातून बाहेर पडते. :) आणि हो या तिघांच्या सॉक्सचाच इतका गोंधळ असतो की मी बापडी ज्यात सॉक्स लागणार नाही असेच शूज घालते. ते आणि कोण बघणार? :)
त. टी. : विकी हाऊ वर एक लिंक सापडली सॉक्स कसे घडी करायचे यावर मला. त्यावरून घेतलेले एक चित्र. मी अशी गुंडाळी करते. :)

विद्या भुतकर.
 https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Saturday, May 21, 2016

डब्यात काय द्यायचे?

         'जेवायला काय बनवू ही राष्ट्रीय समस्या घोषित केली पाहिजे' अशी पोस्ट कुठेतरी वाचली नुकतीच. तसेच 'रोज मुलांना डब्यात जेवायला काय द्यायचे?' ही जागतिक समस्या असली पाहीजे. :) मी एकटी राहायचे किंवा लग्न झाल्यावरही नेहमी म्हणायचे की 'सकाळी सकाळी उठून जेवण बनवणे मला जमणार नाही." त्यामुळे अजूनही मी रात्रीच जास्त जेवण बनवून ठेवते आणि आम्हा दोघांचे डबेही भरून ठेवते. मुलं लहान होती तोवर दे-केअर लाच जेवण व्हायचे. पण आता मात्र मुलं शाळेत जायला लागल्यापासून 'डब्याला काय?' हा प्रश्न रोज उद्भवतो. आणि माझा इतक्या दिवसांचा नियम त्यांच्यासाठी मोडला आहे. रोज सकाळी आम्ही त्यांचे डब्यासाठी काहीतरी बनवून देतो.
सान्वी डे-केअर ला असताना तिथे तिला जेवणाला, भाजी, फळ, कार्ब आणि प्रोटीन असे सर्व असलेला आहार मिळायचा. त्यामुळे आम्हालाही ती पद्धत आवडली. आणि बरेच प्रयोग केल्यानंतर सध्या एक साचा तयार झाला आहे. त्यामुळे सकाळी घाईत बरेच प्रश्न सुटतात.मुलानाही त्या साच्याची सवय झाली आहे.
१. रोज मुलांना शक्यतो एक तरी भाजी किंवा सलाड देतोच. त्यात मग काकडी, टोमाटो (छोटे चेरी टोमाटो मिळतात इथे ) किंवा उकडलेले बीन्स, उकडलेली ब्रोकोली, गाजर, उकडलेले स्वीट कॉर्न यापैकी एक भाजी छोट्या डब्यात देतो.

२. रोज डब्यात एक तरी फळ देतो. त्यात द्राक्षे, सफरचंद, संत्री, कापलेल्या आंब्याच्या फोडी, स्ट्रोबेरी, पेअर, आख्खे केळ यातील जे त्या सिझनला मिळेल किंवा घरी असेल ते फळ देतो. 

फळे आणि भाजी हे दोन्हीही सकाळी करतो पण रात्रीही भरून ठेवता येतात.

३. आता उरतो प्रश्न काहीतरी पोट भरण्यासाठी देण्याचा. त्यातही ते दोघे लहान असल्याने अजून भाजी-पोळी लावून खाता येत नाही. किंवा आमटी-भात किंवा पातळ कुठलीही भाजी डब्यात देता येत नाही. दोघांनाही उपमा, पोहे, शिरा आवडत नाही. त्यात दोघांच्या आवडी थोड्या थोड्या वेगळ्या आहेत. त्यांच्या शाळेत कुठलेही नट्स(शेंगदाणेही) चालत नाहीत. हे सर्व निर्बंध पाळून जेवण बनवणे म्हणजे कसरतच असते. शिवाय आपण सकाळी दिलेले जेवण दुपारी थंड झाल्यावर कसे लागेल याचाही विचार करावा लागतो. त्यामुळे बरेच पदार्थ शक्यतो सुके आहेत. काही पदार्थ इथे देत आहे:
  • मेथी, पालक किंवा आलू पराठा( आलू शकयतो कमी होतो कारण डब्यात तो मऊ पडतो. ) याला एकाला लोणचे आणि दुसऱ्याला छुंदा आवडतो. तसे ते लावून रोल करून देते. खायला सोपे पडते आणि हात जास्त खराब होत नाहीत.
  • डोसा, पंधरा दिवसातून एक- दोन वेळा होतो. डोशाला तूप, चटणी आणि थोडे चीज घालून रोल करून देते.
  • पास्ता, कमी चीज आणि पेस्तो सॉस घालून मोकळा करते. जास्त सॉस असलेला गोळा होतो.
  •  भात लावून त्याला भाज्या घालून फ्राईड राईस सारखा मोकळा बनवून देते. त्यामुळे चमच्याने खात येतो आणि थंड असला भाताला अजून चांगला रिस्पॉन्स मिळाला नाहीये. पण प्रयत्न चालू आहेत.
  • चीज सॅन्डविच, हे म्हणजे कधी उशीर झाला असेल किंवा बदल म्हणून बनवते. ब्रेड ला बटर, थोडे लोणचे आणि चीज घालून बंद करते. चीज वितळले की थोडे थंड करून डब्यात भरते. भाज्या घातल्या की ब्रेड मऊ पडतो त्यामुळे दुपारपर्यंत खाण्यासारखा राहत नाही. 
  • कधी कधी इडलीही दिली आहे पण प्रमाण कमी. 
  • कधी कधी पोळीला लोणचे किंवा जाम लावून देते. 
४. नास्ता: मुलीला अजून एका डब्यात थोडे स्नाक्स द्यावे लागतात. तिला खरंतर त्यातही फळेच दिली तरी चालतात. पण आम्हीच बदल म्हणून चिवडा, चकली, खाकरा, मसाल्याची डाळ, बिस्किटे असे काही देतो. हेही कोरडेच आहे सर्व. चिप्स आणि गोळ्या-बिस्किटे अगदी कमी प्रमाणात दिली जातात.
            
          दोघेही सलाड आणि फळे संपवतात. कधीतरी एखादा किंवा अर्धा पराठा शिल्लक राहतो. पण शक्यतो बरेचसे संपवून येतात. मुले मोठी झाल्यावर हे सर्व कदाचित बदलेलही. ते भाजी-पोळीला लावून खाऊ शकतील. पण सध्यातरी हे सर्व चालू आहेत. त्यात फळे, भाज्या आणि कार्ब असे तिन्हीही दिले जाते. आणि होते काय की एकापेक्षा जास्त डबे असल्याने सर्वातले मिळून थोडे थोडे खाल्ले तरी मुलांचे पोट भरते. निदान अगदीच उपाशी रहात नाहीत. प्रोटीन साठी अंडी उकडून डब्यात देत होतो पण सध्या दोघेही नेत नाहीत त्यामुळे ते किंवा वरण, उसळी, डाळी हे घरी असतानाच द्यावे लागते.
          आपण मुलांना रोजच्या आहारात काय देतो यावर सर्वांचे लक्ष असतेच. पण शक्यतो कचरा(जंक), कोल्ड्रींक  देणे टाळते. अशा गोष्टी शक्यतो घरी आणतच नाही म्हणजे खाल्ल्या जात नाहीत. सकाळी घरातून निघताना दोघांनाही ५-५ बदाम देते. कधी जेवायच्या आधी भूक लागली असेल तर काजू, बदाम किंवा अजून काही ड्रायफ्रुट खायला देते. कधी ते स्वत:हून ड्रायफ्रुट खायला मागतात. मध्ये धाकटा चिप्स हवेत म्हणून मागे लागला तेव्हा आणले होते, पण तेही संपेपर्यंत डब्यात १५ दिवसातून एकदाच असे दिले होते. असे पाकिटे किंवा बिस्किटाचे पुडे मुलांच्या हातात देत नाही, वाटीत थोडे काढून देते. असो. अशा अनेक गोष्टी आहेत. अगदी रात्रीच्या किंवा घरी असताना जेवणात काय असते यावर मोठा लेख लिहू शकते. पण आजचा मुद्दा केवळ डब्याचा होता त्यामुळे इथेच थांबते. :) बाकी पुन्हा कधीतरी. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Friday, May 20, 2016

Thursday, May 19, 2016

कसं हसायचं?

         आज आणि उद्या एक कॉन्फरन्स आहे ऑफिसची. आता या अशा ठिकाणी २०० च्या वर अनोळखी आणि दहा बारा ओळखीचे लोक येतात. आणि दिवसभर मग मला माझं ते नेहमीचं ठराविक स्टाईलचं हसू चेहऱ्यावर घेऊन फिरावं लागतं. ते हसू रिसेप्शनिस्ट इतकं खोटं नसतं आणि आपल्या बॉयफ्रेंडला बघून येतं तितकं मोठंही नसतं. तुम्हाला पण याचा अनुभव आला असेल. अनेक अनोळखी लोकांत वावरायचं आहे. उगाच उदास तोंड घेऊन फिरता येत नाही, जे काही चालू आहे त्यात खूप काही रस घेता येत नाही पण अगदीच निष्काळजी आहोत असंही वागता येत नाही. ओळख नसल्याने जास्त वेळ बोलताही येत नाही. मग मी माझं ते हसू धारण करते.
           काय करायचं? ओठ मिटलेलेच असतात, फक्त मिटलेल्या ओठांनी ती जी एक रेष बनते ती थोडीशी वक्र करायची दोन्ही बाजूनी. डोळे एकदम उत्सुक नाहीत पण नक्की एकाच गोष्टीवर टिकवूनही ठेवलेले नाहीत. नजर थोडी इकडे तिकडे फिरवत ठेवायची. त्यामुळे होतं काय की तुमच्याकडे कुणी अचानक पाहिलं तरी चेहऱ्यावर हसू असतंच, त्यामुळे 'बोअर होतंय का?', 'काही प्रश्न आहे का?', 'बरं वाटत नाहीये का?' अशा अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत नाहीत. या माझ्या स्माईल मुळे मी अनेक कार्यक्रम पार पाडले आहे.
त्यातले काही:
१. तोंडओळख असलेल्या लोकांच्या घरी तीर्थ प्रसादाला गेलो आहोत आणि थोडा वेळ थांबावे लागले आहे.
२. मुलांच्या मित्रांच्या वाढदिवसाला गेलोय, आई- बाबा ओळखीचे नाहीत पण मुलांसाठी जावं लागतंय.
३. २५ तेलगु लोकांच्या पार्टीमध्ये एकटेच मराठी आहात. त्याचं बोलणं एका शब्दानेही कळत नाही आणि पार्टी संपेपर्यंत उठूनही जाता येत नाही.
४. सासरी कुणाच्या तरी घरी हळदी-कुंकू वगैरे कार्यक्रमाला गेलो आहोत जिथे तुम्ही कुणालाही ओळखत नाही पण ते सर्व तुम्हाला ओळखतात.
५. मुलं-बाळ असणाऱ्या अनेक बायकांमध्ये तुम्ही एकटेच लग्न झालेले किंवा मुलं नसलेले आहात .
६. अनेक स्टोक ब्रोकर्स च्या मध्ये एकटेच सोफ्टवेअर इंजिनियर आहात.
७. मी हे हसू एका अमेरिकन जोडप्याच्या चेहऱ्यावरही पाहिलं आहे, एका भारतीय डोहाळे जेवणात. त्यामुळे ते युनिव्हर्सल आहे असं म्हणायला हरकत नाही.
८. कुणाच्या तरी लग्न किंवा रिसेप्शनला गेल्यावर खूप जवळचं लग्न नसल्याने सहभाग घेता येत नाही पण कुणी दुसरे ओळखीचेही नाही.
असो. तर आज दिवसभर हे हसू घेऊन फिरत होते. आजचा दिवस पार पडला, आता अजून एक. :) तुमचेही असे अनुभव असतील तर नक्की सांगा. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, May 17, 2016

स्वप्ना आणि सत्या

गादीवरची चादर बदलत बदलत दोघे बोलत होते.
ती: अरे माहित्येय का त्या प्रज्ञाच्या नवऱ्याने तिला बड्डे गिफ्ट दिलंय, सरप्राईझ. काय असेल गेस कर?
तो: (खोट्या उत्साहाने) काय गं?
ती: अरे नेकलेस आहे डायमंडचा, तीनेक लाखाचा असेल तरी. भारी आहे ना? मला आवडतात असे सरप्राईझ. थांब तुला दाखवते.
गादीवर बसून मग तिने Whats App वरून तो फोटो दाखवला.
ती: छान आहे ना?
तो: हो पण इतका महाग असेल असं वाटत नाही.
ती: अरे डायमंड आहेत ते, चमकत होते एकदम.
तो: मला असले महागडे गिफ्ट देणे म्हणजे वेडेपणा वाटतो.
ती: हो, तुझं आपलं नेहमीचंच. मी कुठे मागितलाय?
तो: मागू पण नकोस.
ती: पण, तुला कधी इच्छा होईल का? असा वेडेपणा माझ्यासाठी करायची?
तो: आपली ऐपत आहे का असले गिफ्ट घ्यायची?
ती: अरे मी कुठे म्हणत्येय घे म्हणून. मी म्हणत्येय की तुला माझ्यासाठी असा वेडेपणा करावासा वाटेल का?
तो: माझं प्रेम दाखवण्यासाठी इतके पैसे खर्च करायची गरज नाहीये.
ती: (आता चढलेल्या आवाजात) मी काय म्हणतेय ते कळतंय का तुला? समज आपल्याकडे खूप पैसे आहेत किंवा नसतीलही, पण माझ्या प्रेमासाठी किंवा हट्टासाठी काहीतरी असे करायची तुझी इच्छा होईल का?
तो: (वैतागून) समज आपल्याकडे पैसे असले तरी ते असे खर्च करणे म्हणजे वेडेपणाच आहे. तुला नाही का वाटत असं?
ती: आहेच तो वेडेपणा. पण करायचा ना कधीतरी वेडेपणा.आणि मी म्हणतेय की केवळ काल्पनिक वेडेपणा.
तो: पण तो तरी कशाला हवा न? माणसानं अंथरूण पाहून पाय पसरावेत.
ती: जाऊ दे तुला नाहीच कळणार मी काय म्हणतेय ते.
तो: हो मला कळतच नाही तुला काय म्हणायचं असतं ते.
ती: (मनातल्या मनात) माझ्या मनाच्या समाधानासाठी तरी हो म्हणायचं होतंस ना. तू घेतलं तरी मी परत केलं असतं.
तो: (मनातल्या मनात) खरंच तुला देता येईल तेव्हां आणेनच ना. कशाला उगाच खोट स्वप्न दाखवावं माणसानं?

आज पुन्हा एकदा स्वप्न आणि सत्य यांची वादावादी झाली होती. आज पुन्हा एकदा दोघे एकमेकांकडे पाठ करून झोपले होते.

विद्या भुतकर.

कधी?

सूचना- ही कविता कवीच्या संमतीशिवाय कुठेही फेसबुक वर पोस्ट करू नका. कृपया Whats App वर निनावी पाठवू नये. संमतीने नावासहीत पाठवावी. नाव आणि पेज लिंक खाली दिलेली आहे. 
 
तो काळा, ती गोरी
पैशासाठी केलं असेल !

ती काळी, तो गोरा??
कशासाठी केलं असेल??

तो गोरा, ती गोरी
कशासाठी तुटलं असेल?

तो काळा, ती काळी
कसं बरं शोधलं असेल?

रंग आणि पैसा याच्यापलीकडे
कधी जाणार आपण?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Friday, May 13, 2016

बिल्डींग रीडर्स

       माझी एक इच्छा आहे, की मी शाळेत असेपर्यंत जसे वेड्यासारखी पुस्तके वाचलीत, दिवस रात्र वाचलीत तशी वाचनाची सवय माझ्या मुलांना लागावी. परीक्षा चालू असताना शेजारी पडलेले पुस्तक केंव्हा एकदा हातात घेईन असे व्हायचे. सुट्ट्या लागल्या की पुस्तकं एका मागे एक केवळ वाचत सुटायचे, हावऱ्यासारखे. बाकी मुलं बाहेर खेळत आहेत किंवा कधी टीव्ही बघत आहेत किंवा विडिओ गेम खेळत आहे असे चालू असले तरी मला काही फरक पडायचा नाही. गेल्या कित्येक वर्षात असं वाचन झालं नाहीये आणि ते पुन्हा सुरु करायलाही जमत नाहीये. पण आजही माझ्या विचारांवर, लिखाणावर नक्कीच माझ्या तेव्हांच्या वाचनाचा प्रभाव आहे. एखादी गोष्ट सुसंगत कशी सांगावी किंवा आपले मुद्दे ओळीने कसे मांडावेत आणि प्रत्येकाची डावी उजवी बाजू याची तुलना, किंवा एखादं व्यक्तिचित्र अशा अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या माझ्या वाचनातून. नवीन शब्द, त्यांचे अर्थ, त्यांचा वाक्यातला उपयोग हे ही आलंच. असं बरंच काही शिकले पुस्तकातून. असो.     
           आता जरा मूळ मुद्द्यावर येते. आज काल उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे बऱ्याच पोस्ट वाचल्यात लोकांच्या आठवणीतल्या सुट्ट्यांच्या. काही कविता आणि काही चित्रही, त्यात चिंचेच्या गोळ्या, बर्फाचा गोळा किंवा रावळगावच्या गोळ्या असलेला. एकूण काय नोस्टल्जिया प्रत्येकाचा. आणि तो येतोच कधी तरी मलाही. पण म्हणून सध्याच्या मुलांच्या आयुष्यात किती काहीच मजा नाही असं वाटणं चुकीचं आहे. आजही सुट्टी मिळाली की मुलांच्या चेहरा खुलतोच. अजूनही मुले आजी आबा, मामा मावशी, काका काकू यांना पाहून खुश होतातच. पाण्यात खेळायला किंवा बिल्डींगच्या खाली घोळका करून खेळायलाही मागतातच. यासर्व गोष्टी आपण मोठे झालो तरी बदलल्या नाहीयेत. शिवाय मुले ही मुलेच असणार कुठेही असो कुठल्याही पिढीची असोत. पण एकूण पुस्तके वाचन मात्र कमी वाटले मला. 
            फोन, tablet आणि टीव्ही या माध्यमांमुळे मुलांना वाचनाचा वेळ कमी नक्कीच झाला आहे. शिवाय त्यात बाकी सर्व शिकवण्या, क्लासेस इत्यादी असतेच. त्यामुळे मुलांना फक्त पुस्तके किंवा पेपर वाचायला मिळणारा वेळ कमी झाला आहे असे मला वाटते. मी ज्या सुट्ट्या पहिल्या त्यात बालमित्र वाचणे, गोष्टींची पुस्तके, लायब्ररी मधून जुने दिवाळी अंक आणून वाचणे हे सर्व केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमच्या मुलानाही वाचनाची आवड कशी लागावी किंवा ती लागण्यासाठी आपण प्रयत्न करावेत हे सर्व आमचे चालूच आहे. त्याबाबत बाकी सर्वांशी ही बोलावे अशी इच्छा होती. 

सान्वी लहान असल्यापासून आम्ही घरी करत असलेल्या गोष्टी: 
१. आधी लायब्ररीची गाडी आमच्या बिल्डींग मध्ये येत असे, तिथून तिच्या वयाला योग्य पुस्तके घेऊन यायचो. रात्री काहीही झाले तरी निदान एक का होईना पुस्तक वाचायचो. 
२. मुलं लहान असताना आम्ही पुस्तकं वाचायचो आता त्यांना वाचायला लावतो. 
३. रात्री झोपायच्या आधी एक तरी पुस्तकं त्यांनी वाचावं असा आग्रह करतो. आमची भांडी धुवून, आवरून होईपर्यंत त्यांचे पुस्तक वाचून होते. आणि आमच्या सोबतही थोडे वाचले जाते. 
४. सध्या लायब्ररी पुन्हा सुरु केली आहे. अमेरिकेत विविध वयोगटातील मुलांच्या आवडीची अनेक पुस्तके मिळतात. त्यामुळे सध्या काय वाचावे हा प्रश्न पडत नाहीये. त्यामुळे घरात कायम काही ना काही पुस्तके आहेतच. 
५. बरेचदा मुलं कंटाळा करतात वाचायला घ्यायचा, आणि टीव्हीच बघायचा हट्ट करतात. अशा वेळी आधी वाचन पूर्ण करूनच टीव्ही सुरु करण्याचा नियम सांगतो. 
६. लांबच्या प्रवासाला जाताना पुस्तके घेऊनच जातो. त्यामुळे थोडासा का होईना प्रवास पुस्तके वाचून होतो. कुणाकडे राहायला जातानाही एखादे पुस्तक सोबत ठेवतो. तिथे त्यांची करमणूक होते जरा वेळ. 
७. वाढदिवसाला घेतलेल्या खेळण्यासोबत एक का होईना पुस्तक नक्की गिफ्ट म्हणून घेतो.

            हे सर्व करणे सोपे नाहीये तेही सध्याच्या जगात जिथे त्यांना अनेक साधने आहेत मन रमवण्यासाठी. गेल्या वर्षभरात यातील बऱ्याच गोष्टी नियमित केल्यामुळे मुलांच्या वागण्यात बराच फरक पडलेला दिसतो. बरेचदा स्वनिक सकाळी उठून पुस्तक घेऊन बसतो किंवा दुपारी झोपायच्या वेळेला वाचाण्यसाठी एखादे पुस्तक घेऊन जातो. कधी आम्ही वाचताना त्यात एखादा शब्द गाळला तर सांगतो. सान्वी शाळेत जातानाही गाडीत पुस्तक वाचत बसते. कधी तीच स्वनिकला पुस्तक वाचून दाखवते. तिला सध्या एक पुस्तक आवडत आहे जे तिने शाळेतल्या लायब्ररी मध्ये शोधले. तिथेही मिळाले नाही म्हणून वाईट वाटून घेत होती. नुकतेच ते पुस्तक मी विकत घेतले. आता त्याची पारायणे चालू आहेत. 
           खरंतर दोघेही अजून लहान आहेत(४ आणि ७ वर्षे) पण मला वाटते की त्यांच्या वाचनाची ही केवळ सुरुवात आहे. अजून खूप पायऱ्या ओलांडायच्या आहेत. त्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही पण माझ्या अनेक मित्र मैत्रीणीना मी सांगू शकते की याच वयात मुलांना वाचनाची सवय लावण्याचा प्रयत्न नक्की करा. त्यांना गिफ्ट म्हणून पुस्तके द्या. मी सध्या बाकी लोकांच्या मुलानाही पुस्तकेच गिफ्ट म्हणून देत आहे. या वर्षीच्या सुट्टीत मुलांना लायब्ररी लावा, नवीन गोष्टींची पुस्तके आणून द्या. कधी जबरदस्ती का होईना त्यांना वाचायला बसवा. ती वाचली की त्यात काय आहे यावर बोला. रात्री झोपायच्या आधी एखादे पुस्तक नक्की वाचायला बसवा. आणि हो तुमच्याकडे काही अजून टीप्स असतील तर इथे नक्की शेअर करा. :) We want to build readers for sure. :) 
 
विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Thursday, May 12, 2016

इतकी जवळीक नाही चांगली

गझल वगैरे लिहिता येत नाहीत. वाचायला आवडतात. वेगवेगळ्या वेळेला लिहिलेल्या या ओळी एकत्र करून लिहिल्या आहेत इथे.

जो तो धावला जिथे आग होती लागली
पाहण्या कुठे तिथे काडी नाही आपली.

आपल्या फळांनी त्याची फांदी होती वाकली
ऊन वाऱ्यात ज्याने मान नाही टाकली.

सरणावर त्यांनी तिच्या पोळी होती शेकली
सोडून ज्यांना गळ्याला दोरी तिने लावली.

दु:खं ज्यांनी दिले सगळीच होती आपली
दूर हो वेड्या, इतकी जवळीक नाही चांगली.

-विद्या भुतकर.

Sunday, May 08, 2016

शाश्वत

आज नवऱ्याच्या वाढदिवसा साठी खास :)


विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/ 

सूचना- ही कविता कवीच्या संमतीशिवाय कुठेही फेसबुक वर पोस्ट करू नका. कृपया Whats App वर निनावी पाठवू नये. संमतीने नावासहीत पाठवावी. नाव आणि पेज लिंक खाली दिलेली आहे. 

Saturday, May 07, 2016

साहित्यचोर कसा पकडायचा?

         चारेक महिन्यापूर्वी मला माझीच एक कविता कुणीतरी फोरवर्ड केली. तीही २००७ मध्ये लिहिलेली. अजूनही त्या पोस्टवर २८००० पेक्षा जास्त लाईक्स, ४००० कमेंट्स आणि हजारो शेअर्स होत आहेत. ज्यांनी ती फेसबुक वर पोस्ट केली त्यांनाही ती अशीच कुणीतरी पाठवलेली Whats App वरून. लोकांचे असे प्रतिसाद पाहून, दोन वर्षं बंद असलेलं माझं लिखाण पुन्हा सुरु झालं. पहिल्या पंधरा दिवसात मी अजून एक कविता लिहिली, 'संसार म्हणजे चालायचंच' ! ती  माझ्या ब्लॉग, फेसबुक पेज आणि माझ्या Whats App वरील मित्र मैत्रीणीना पाठवली माझ्या नावासकट. पण तरीही तीन दिवसांच्या आत तीच कविता निनावी फिरायला सुरुवात झाली होती. मध्ये फेसबुक वर ती कविता 'माझे पान' नावाच्या पेज वर निनावी दिसली ज्याला ८००० पेक्षा जास्त लाईक्स होते. त्यानंतर मी माझ्या कविता फेसबुक वर टाकताना एका इमेज वर पब्लिश करू लागले. पण माझ्या ब्लॉग  वर अजूनही टेक्स्ट च होते.
          हे सगळं सांगायचं कारण म्हणजे माझी नवीन कविता 'मिडलक्लास' पुन्हा एकदा सगळीकडे निनावी फिरताना दिसत आहे. ती मी मागच्या आठवड्यात लिहिली आणि चार दिवसात ती Whats App वर आली. आता कुणी म्हणेल की हीला स्वत:चे कौतुक सांगायचे असेल. पण पुढे मला बरेच मुद्दे बोलायचे आहेत आणि कदाचित नक्की काय केले की हा त्रास सुटेल हा पण प्रश्न विचारायचा आहे. कवितेचे टेक्स्ट फक्त आता माझ्या ब्लॉग आणि मायबोली वरच टाकले होते. मला माझा ब्लोग फीड जिथे जातो, 'ब्लोग कट्टा' सारख्या साईट वरून अशा कुणाच्या तरी हातात जात आहे जिथे लोक जनरिक कविता दिसल्या की कॉपी करून पुढे पाठवतात. बरं, चोरी करता ठीक, पण पुढे जाऊन ते माझं नाव काढून टाकूनच पुढे पाठवत आहेत. खरं सांगू का, मला माझ्या कविता अजिबात भारी वाटत नाहीत. उलट चोरी करणाऱ्या लोकांवर किती वाईट दिवस आले आहेत याचे मला वाईट वाटते. असो, माझे काही मुद्दे जे गेल्या चार महिन्यापासून डोक्यात आहेत, ते इथे मांडतेय: 
१. तुम्हाला अशा रोज अनेक कविता येत असतील, त्या खाली कुणाचे नाव आहे हे कधी कुणी पाहिलंय? बहुतेक वेळा ते नसतंच. या लोकांना नाव काढून टाकण्यात काय मिळत असेल? मला स्वत:ला अशा अनेक कविता आल्या आहेत ज्यात कवीचे नाव नाहीये. म्हणजे मी सोडून अनेक लोकांच्या साहित्याची चोरी होत आहे. मध्ये 'रसप' ची 'हि कविता तर माझीच होती' कविता वाचली आणि त्याचं दु:खं जाणवलं.
 २. मला शंका आहे की इण्टरनेट प्रोव्हायडर लोकांना कंटेंट तयार करण्यासाठी पैसे देतात का ? कधी विचार केलाय, क्रिकेटची match संपायच्या आत एक जोक भराभर सगळीकडे पोचलेला असतो. कशामुळे? कुणीतरी हे करत असणार ना? असे कंटेंट पाठवून कुणाचाही फायदा होत नाही फक्त डेटा खर्च होतो. 
३. हे लोक सहसा टेक्स्ट च पाठवतात. मी अनेक वेळा माझ्या कवितांची इमेज पाठवली आहे पण ती पुढे जात नाही, कदाचित लोकांना जास्त देत खर्च करायचा नसतो त्यामुळे बहुतांशी फक्त टेक्स्ट पुढे पाठवतात. त्यामुळे जोक वगैरेही त्याच स्वरुपात असतात. आणि हो ते तुमच्या चुका अजिबात दुरुस्त करत नाहीत. फक्त नाव काढून आहे तसे पुढे पाठवतात. 
४. सामान्य लोकांना चांगले वाटले तर ते पुढे पाठवतात. त्यामुळे त्यांचा यात दोष मला वाटत नाही. उलट मला अनेक लोकांनी मेसेज करून सांगितले की अगं तुझी कविता मला आली होती फोरवर्ड, मी तुझे नाव टाकून पुढे पाठवली. (त्या सर्वांचे आभार. :) ) 
५. बरं हे फक्त Whats App वर राहत नाही. 'माझे पान', 'एक तर लाईक बनतोच' अशा अनेक फेसबुक पेजला कंटेंट हवा असतो. त्या पेजेस वर स्वत:चे असे काहीही नसते. नुसते लोकांचे साहित्य, चित्र तिथे चिकटवलेले असते. हळूहळू ते पसरले की यांची प्रसिद्धी होतेच. मी मध्ये 'माझे पान' वर पहात होते, अनेक दागिन्यांचे फोटो आहेत तिथे. बायका रोज लाईक करतात. कुणी किंमत विचारते. पण उत्तर मिळत नाही. कारण ते फक्त फोटो आहेत, बरेचदा ढापलेले. 
६. या फेसबुक पेजना अजून एक असते, त्यांना दुसऱ्याच्या गोष्टी शेअर करायच्या नसतात. माझी एक कविता मध्ये एका पेज वर मला दिसली. मी म्हणाले तुम्ही शेअर करा ना मूळ सोर्स कडून, तर त्यावर नकार आला. का तर आम्ही इमेज शेअर करत नाही. म्हणजे टेक्स्ट अजून कुणी कॉपी करून अजून पुढे पाठवायला तयार. 
७. या सगळ्यात ज्यांचे साहित्य आहे त्यांना अजिबात किंमत नसते. मी अनेक लेखही पाहिले आहेत. त्यांना कुणीही विचारत नाही की अरे याचा लेखक कोण आहे. 

एकूण काय, की तुम्ही एकतर लिहू नये, लिहिले तर कुठेही पोस्ट करू नये. अन केलेत तर त्याचे श्रेय तुम्हाला मिळेल अशी अजिबात अपेक्षा करू नये. शिवाय यात तुम्ही स्वत:ला खूप भारी समजता का असे लोकांना वाटायची शक्यता आहेच. पण आज तरीही हिम्मत करून हा लेख लिहितेय. कदाचित मला समदु:खी लोक मिळतील किंवा काही उत्तर मिळेल आणि काहीच नाही तर त्या चोरांपैकी कुणाला हा लेख मिळाला तर तेही तो पुढे पाठवतीलच निनावी. देव त्यांचं भलं करो. लवकरच एक कविता पोस्ट करणार आहे पण फक्त इमेज. :) बघू काय होते.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Friday, May 06, 2016

काय धरावं, काय सोडावं ?

सूचना- ही कविता कवीच्या संमतीशिवाय कुठेही फेसबुक वर पोस्ट करू नका. कृपया Whats App वर निनावी पाठवू नये. संमतीने नावासहीत पाठवावी. नाव आणि पेज लिंक खाली दिलेली आहे. विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Thursday, May 05, 2016

Important thing is.....

         काल सानूच्या शाळेत मिस्टरी रीडर म्हणून गेले होते. आता ते काय असतं? तिच्या वर्गात पालकांनी जाऊन अर्धा तास कुठलेही २-३ पुस्तके वाचायला जायचे. त्या मुलाला माहित नसणार की आज आपले कुणी शाळेत येणार आहे. त्यामुळे समोर आपल्या आई-बाबा किंवा आजी आजोबाना पाहून त्या त्या मुलांना नक्कीच आंनद होत असणार. शाळा सुरु होऊन आता वर्ष होत आलं तरी आम्ही काही गेलो नव्हतो. एक तर सोमवार ते शुक्रवार मध्ये कधीतरी दुपारी १-२ वाजता काम सोडून कसे जाणार? त्यामुळे काही होत नव्हतं. आणि गेल्या काही महिन्यापासून सानूने विचारायला सुरुवात केली होती अर्थात तिचे तरी काय चुकीचे होते? प्रत्येकवेळी तिला वाटायचे की आपले आई बाबा कुणीतरी येतील आणि प्रत्येकवेळी निराशा झाली असणार. आपली मुलं कितीतरी अशा निराशा असूनही इतकी आनंदात राहतात नाही का? 
        शेवटी यावेळी ठरवून गेले शाळेत. दुपारी पोचले तर मुले वर्गात नव्हती. ती आल्यावर सर्व एकदम माझ्याशी बोलायला लागले. सान्वी खुश होतीच. एका मुलाने तिला एक खुर्ची आणून दिली. म्हटले या छोट्या खुर्चीत बसायचे मी? तर माझ्यासाठी मोठी आणि सानूसाठी छोटी अशा दोन खुर्च्या होत्या. आम्ही दोघींनी मिळून वाचायचे होते. तिला नक्कीच खास वाटत असणार. मी आपली घरातली त्यातल्या त्यात छोटी दोन तीन पुस्तकं घेऊन गेले. आम्ही वाचायला सुरु केले पण मधेच एकाने बोलायला सुरुवात केली,'आम्ही एकदा माझ्या काकांकडे जेवायला गेलो तर तिथेही मी जादू पहिली आहे.' म्हटले, बरं. आम्ही वाचत होतो, त्यात एकाने विचारले आम्हाला चित्र दिसत नाहीये. मग मी पुस्तक तिरकं करून वाचू लागले. चुकून एक जरी पान राहिलं तर ते मला चित्र दाखवायला सांगत होते. सानुचे काही शब्द चुकत होते. मी ठीक करून पुढे सांगत होते. 
        थोडा वेळ झाला आणि मुलांनी वळवळ करायला सुरुवात केली. म्हटलं यांना बोअर होतंय वाटतं म्हणून आम्ही एक chapter नंतर दुसरे पुस्तक सुरु केले. त्यातही बडबड चालूच होती. सानुने त्यांना मध्ये शुक शुक केले, टीचरने शांत बसायला सांगितले. कसेतरी एकेक पान पालटत आम्ही शेवटच्या पानावर आलो आणि बेल वाजली. घाईतच ते पान वाचून आम्ही संपविले. आमची वेळ संपली होती, सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि सुट्टी झाली. घरी येताना सानू म्हणाली,'आई तू पुस्तक का बदललेस?'. मी म्हटलं,'अगं तुझ्या चुका होत होत्या. ती मुलंही हालचाल करत होती. मला वाटलं सर्वांना बोअर होतंय. म्हणून बदललं.' तर म्हणाली,' अगं ते सर्व असंच करतात. तू कशाला बदललेस? मध्ये मध्ये उठतात किंवा पाणी पितात. बरं असू दे, Important thing is you came. And thats what matters. I am very happy." तेंव्हा मला जाणवलं, त्या मुलांना किंवा टीचरला काय वाटलं याने मला काहीच फरक पडायला नको होता. महत्वाचं होतं की सानूची इतक्या दिवसाची इच्छा पूर्ण झाली होती. :)
         कधीकधी आपणही नको त्या गोष्टींवर इतका विचार करतो की त्याच्याहून महत्वाचं काय होतं हे लक्षातच येत नाही. होय न? :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, May 04, 2016

मोठं असणंच छान आहेसूचना- ही कविता कवीच्या संमतीशिवाय कुठेही फेसबुक वर पोस्ट करू नका. कृपया Whats App वर निनावी पाठवू नये. संमतीने नावासहीत पाठवावी. नाव आणि पेज लिंक खाली दिलेली आहे. 


विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Tuesday, May 03, 2016

घरची बाई

           गेले दोन दिवस जरा बरं नव्हतं. विशेष काही नाही, हेच थंडी ताप पिरियड्स वगैरे. पण त्यामुळे घरात काय चाललं आहे यात माझं लक्ष अजिबात नव्हतं. मुलं मध्ये कधीतरी येऊन kiss देऊन जात होती. कधी पांघरूण घालत होती किंवा 'तुला आता बरं वाटतंय का' असं कधीतरी विचारलंही. पण बाकी, संदीप त्यांना बाहेर घेऊन गेला, घरी आले, त्याने जेवण काहीतरी दिलं त्यांना. मी झोपले तेंव्हा त्यांनी काय केलं माहित नाही. पण काही ना काही चालू होतं. सांगायचं कारण म्हणजे, कधीतरी एकदा मुलं लहान असताना असाच विषय चालू होता की कसे मुलं रात्री रडत उठली की मला जाग येत नाही त्यामुळे ते आपोआप बाबाकडे जातात. आमचा मित्र तेंव्हा म्हणाला,'अगं तो घरची बाई आहे.' आता खरंतर आधीही घरात कर्ती असलेली स्त्री आणि तिचं घरातलं वास्तव्य यावर विचार आला असेल मनात पण ते वाक्य माझ्या डोक्यात चांगलं बसलं. कदाचित तेंव्हा मी आमच्या घरातील कर्ती बाई होत होते म्हणून असेल. पण मला कन्सेप्ट आवडला.
          प्रत्येक घरात त्या घराचं घरपण टिकविणारी व्यक्ती. मग ते घरात येणाऱ्या जाण्याऱ्या व्यक्तींचं काही करायचं असू दे किंवा प्रत्येकाच्या वेळा पाळून सर्वांच्या आवडी निवडी जपणे असू दे. त्यात मग छोट्या छोट्या गोष्टी येतात, रोजच्या जसे कपडे धुतले जाणे, भांडी, रोज जेवायला काय करायचं ठरवणे किंवा मुलांचं हवं ते नको बघणे. आणि बाकी असतातच, जसे आठवड्याचं सामान आहे ना हे पाहणे, फ्रीजमधल्या सर्व वस्तू लावून ठेवणे, महिन्याची बिलं भरणे, मुलांच्या शाळेतून काही नोटीसा आल्या तर ते तपासणे, बाकी पाहुणे किंवा कुणाकडे कधी जायचे हे ठरवणे. खरेदीला गेल्यावर काय घ्यावे काय नाही, अगदी कुणाला काय गिफ्ट द्यावे हे ठरविणे, अशा अनेक भानगडी. कधी एखाद्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे, तर मुलं फायनल शब्द कुणाचा ऐकतील हे ज्या त्या घरात ठरलेले असते. आणि पुढे जाऊन महत्वाच्या काही निर्णयातही या व्यक्तीचा सहभाग हवाच, जसे नोकरी सोडणे, बदलणे किंवा घर घेणे, सोडणे, इ.
          वर म्हणाले त्या सर्व गोष्टी हे ढोबळ मानाने केलेले वर्णन. सर्वांनाच माहित आहे की घरची कर्ती बाई हे खास व्यक्तिमत्व असतं प्रत्येकाच्या घरात आणि माझ्या पिढीपर्यंत तरी ते आईनेच पार पाडलं आहे. पण माझ्या घरात मात्र ही व्याख्या सध्यातरी कुणाला लागू होते हे कळत नाही. अर्थात स्त्रीच म्हणायचं तर मलाच व्हायला पाहिजे. पण आजकाल अर्थार्जन हे नवरा बायको दोघांकडे असल्याने बाकीची कामेही वाटून घेतली जात आहेत. एकावेळी मी मुलाचं करते तर दुसऱ्या वेळी तो. कधी मी शाळेच्या नोटीसा पाहते तर कधी तो. कधी मी नसेन तर जेवायलाही अगदीच अडत नाही. मी कामासाठी परगावी मुक्कामी गेल्यावर, त्याने मुलांना सांभाळलेही आहे. उलट ते अवघड काम माझ्यावर आलं नाहीये अजून तरी. :) त्यामुळे मला कळत नाही की खरंच 'घरची बाई' असा कन्सेप्ट आमच्या घराला कसा लागू होईल? अशा वेळी, 'घरातील बाई' ही एक स्त्री न राहता, केवळ व्यक्ती होते, मग ती स्त्री असो की पुरुष. आणि दोघांच्या मधल्या लिंगसापेक्ष रेषा हळूहळू पुसट होऊ लागतात. जशा आमच्या घरी होत आहेत. 
          आता त्या व्यक्तीचे गुण पाहू. त्या व्यक्तीकडे तत्परता, मनकवडेपणा तर असतोच शिवाय एकेकाळी, त्या व्यक्तीकडून घरासाठी एखाद्या वस्तूचा किंवा आवडत्या कामाचा त्यागही गृहीत धरला होता किंवा अजूनही केला जातो. उदा: मुलं आजारी आहेत, रजा कुणी घ्यावी?  घरात पाहुणे आलेत, रजा कुणी घ्यावी? दोन लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी लागलीय, कुठे राहायला जावं? मुलांसोबत घरी काही वर्षं राहायचे आहे, कुणी राहायचे? या सर्व बाबतीत आजही स्त्रीकडेच पाहिले जाते. 
           मुलगा लग्न करताना, मला नोकरी करणारी मुलगीच हवी असा हट्ट करतो. तिला शिक्षण, जेवण वगैरे सर्व कला तर यायलाच हव्या. पण जेव्हा घरात मुल येतं आणि बरेच निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा मात्र तिला नोकरी सोडली तरी काय होतंय असं विचारलं जातं किंवा बरेचदा तीच स्वत: नोकरी सोडायला तयार होते. आणि तिथेच त्या धुसर झालेल्या रेषा पुन्हा ठळक होऊ लागतात. मला वाटतं की, बरेचदा दोघेही नोकरी करत असताना असा भास नक्कीच होतो की दोघेही समान आहेतच. पण अनेक छोट्या मोठ्या गोष्टीतून ही असमानता दिसत राहते. असमानता कमी व्हायची असेल तर ती घरापासूनच सुरु व्हायला हवी.  आणि ती दोघांनी मिळून केली पाहीजे. त्यासाठी मंदिराच्या पायऱ्या चढल्याच पाहीजे असे नाही.
          घराचं घरपण हे दोघांमुळेच असलं पाहीजे, नाही का? जसं घरी आल्यावर आपण विचारतो, 'आई कुठे आहे?', तसं, मुलांनी, 'बाबा कुठे आहेत? ' हे विचारलंच पाहीजे ना? त्यामुळे ते सर्व बाबाही नक्कीच सहमत असतील याला. आणि हो, आपल्यालाही खरंतर, आपल्या घराचा हक्क हवा असतो, एक स्त्री म्हणून. मीही म्हणते बरेचदा,' मी केलं नाही तर या घरात्त काही होत नाही.' म्हणायला काय? पण तो हक्क घेणाच्या नादात आपण बाकीही बरंच काही गमवत नाहीये ना हे पाहायला हवं ना ! 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, May 02, 2016

रविवार संध्याकाळ ते सोमवार

           रविवार संध्याकाळ म्हणजे कातरवेळेची कातरवेळ. जाम बोर होतं. मला वाटतं त्याचं बीज माझ्या शालेय वर्षांत आहे. शनिवारी दुपारी शाळा सुटली की जे टीव्ही किंवा भटकणे चालू व्हायचे ते रविवारी रात्री दूरदर्शन चा एकमेव चित्रपट संपला की संपून जायचे. सर्व न्यूज पेपर इ वाचून झालेले असायचे त्यामुळे रविवारी रात्रीच सर्व साक्षात्कार व्हायचे. 'अरे, गृहपाठ पूर्ण नाहीये.' 'उद्या चाचणी परीक्षा आहे'. किंवा महत्वाच्या रिपोर्टकार्डवर सही घ्यायची आहे त्यामुळे जे काही बोलून घ्यायचंय ते आत्त्ताच होणार आहे. किंवा कॉलेज सुरु झाल्यावर, उद्या सकाळी उठून पुन्हा ट्रेनला बसायचे आहे. त्यामुळे आयुष्यातील सर्व निराशा रविवारी संध्याकाळी दाटून यायची. ती अजूनही येतेच. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा लढाईला चालल्यासारखे आवरून सर्व सामान घेऊन धावपळ करत ऑफिसला पोहोचायचे. शुक्रवारी दांडी मारलेले काम आठवते. किंवा दोन दिवस घरी मुलांना पहायची सवय झाली की सोमवारी त्यांना सोडणं अवघड झालेलं असतं. एकूणच काय अतिशय डिप्रेसिंग संध्याकाळ. 
             नाऊ कम्स सोमवार सकाळ. सोमवार सकाळी उठायला नको नकोसे वाटते, पण काम तर असतंच. स्वनिकच्या शाळेतल्या बाई म्हणाल्या होत्या, साधारण सोमवारी दुपारी बहुतेक मुलं झोपतातच दुपारी. तोही झोपतो. मलाही असं झोपायला मिळालं तर किती बरं होईल सोमवारी दुपारी? ऑफिस, शाळा, कॉलेज जिथे कुठे जायचे आहे तिथे पोचलो की मात्र कंटाळा जरा कमी होतो. बाकी लोकांना बघून समदु:खी भेटल्याचा आनंद होतो. दुपारपर्यंत माणूस जरा सरावला जातो. आणि संध्याकाळी घरी येईपर्यंत अख्खा आठवडा काय काय करायचं या विचारात रविवारची हुरहूर हरवून जाते. मला कधी कधी वाटतं की आपण केवळ विकेंड साठीच जगत असतो की काय किंवा विकेंडलाच. कारण, कित्येक महत्वाच्या गोष्टी जसं मुलांचे वाढदिवस किंवा एखाद्याला भेटणे हे सर्व त्या दोन दिवसांसाठी राखून ठेवतो. म्हणजे एखाद्याला बाळ झालेय, त्याचा आनंद आज न साजरा करता रविवारसाठी राखून ठेवायचा. किंवा कुठेतरी जाऊन आवडीचे काही खायचे आहे, तेही शुक्रवार वर जाते. मग मधले पाच दिवस आपण काय करतोय? असो. त्याबद्दल बोलून सोमवार अजून डिप्रेसिंग होईल.
          पण काही काही रविवार असेही येऊन गेलेत जिथे सोमवार ही एक नवीन सुरुवात असते. आणि असे रविवार कधी एकदा संपतील असे वाटते. उदा. : शाळेचा पहिला दिवस. जूनच्या पहिल्या आठवड्यात आणून वह्या पुस्तकांना लावलेली नवीन कोरी कवर, त्यावर लिहिलेलं नाव, नवीन गणवेश, नवीन वर्ग, सर्व कसं असणार याची उत्सुकता त्या रविवारी रात्री ताणली जायची. झोप लागली तर नशीबच. कॉलेजला जाण्याचा पहिला दिवस. प्रत्येक वेळी नवीन नोकरीचा पहिला दिवस. त्यातलं नवेपण कधीही जुनं झालं नाही. अजूनही ती उत्सुकता, कसं असणार सर्व याचे विचार, कसं बोलायचं, काय घालायचं हे सर्व कितीतरी वेळा उजळणी केलेलं असतं. ते रविवार कधीच बोचले नाहीत. तयारी तर जाम. दप्तर भरून ठेवणे किंवा ड्रेसला इस्त्री करून ठेवणे. आता अगदी मुलांच्या शाळा सुरु झाल्यावरही हे सर्व पुन्हा नव्याने अनुभवत आहे. :) 
         अशा खास दिवसांच्या सोमवार सकाळी एकदम खासच असतात. शाळेला खास नवीन डब्यातून नवीन जेवण मिळतं. कोलेजच्या नवीन वर्गात नवीन मैत्रीण मिळते, जिच्या बहिणीचं नावही विद्याच असतं. :) नवीन नोकरीत आयुष्यभरासाठी मिळणारा नवरा भेटतो आणि मुलांच्या पहिल्या शाळेच्या दिवशी, ते हसत बाय करताना, आपण किती हळवे आहोत हेही कळतं. अशा सोमवारी दिवसभर मन बागडत असतं आतल्या आत किंवा झुरतही असतं जे मागे सोडून आलोय त्याबद्दल. तर कधी ती एक सुरुवात असते रडून घालवलेल्या रविवारी रात्रीला निग्रहाने मागे टाकून पुढे जाण्याच्या निर्णयाची. कधी व्यायाम करण्याच्या कंटाळ्याला पुन्हा आव्हान देण्याची संधी तर कधी अर्धे राहिलेल्या कामाला निर्धाराने पूर्ण करण्याची शक्ती. पण एक नक्की असतं, कितीही कंटाळवाणा असला तरी सोमवार तुम्हाला एक सुरुवात देतो. एक नवीन संधी पुन्हा नव्याने काहीतरी सुरु करण्याची. :) होय ना? 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, May 01, 2016

आशा... ओSS ....आशा...

           अनेक वेळा माझ्या भारतातील मैत्रिणींकडून ऐकते की तुमचे बरे आहे गं, डिश वॉशर आहे किंवा कपडे धुवायला मशिन आहे. तर कधी हे ही ऐकले की,' भारतात बरे असते लोकांना घरी काम करायला मदत असते. तुम्ही पैसे देऊन हे काम करून घेऊ शकता. एकूण काय, 'ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन अदर साईड'. माझ्या सुदैवाने मला दोन्ही अनुभव मिळाले. आणि एक नक्की आहे, कुठेही रहा, घरी रहा किंवा नोकरी करा, एकूण घर, मुलं, पाहुणे सर्व करणे हे सोप्पं काम नाही. अर्थात त्यासाठी म्हणून पुन्हा एकटे रहायची माझी इच्छा नाही. :)
             मध्ये एक लेख वाचला होता की कसे जेवण बनवण्यासाठी कुणी तरी मदतनीस ठेवली आणि उरलेल्या वेळेचा सदुपयोग करू शकतो यावर. मला अजूनही कळत नाही की जेवण बनविणे, इ अचानक मोठे काम का झाले आहे? खरं सांगू का, कुणीतरी  अचानक भेटायला यावं आणि त्यांच्यासाठी घाईने का होईना चार चपाती आणि भाजी करावी आणि चांगली व्हावी यासारखी मजा नाही. आणि तो आनंद मला अनेक दिवसात मिळाला नाहीये कारण कुणाला यायचे असेल तर त्यांना वाटते अरे अचानक जाऊन उगाच का त्रास द्यावा. किंवा मलाही असे कुणाकडे जायची हिम्मत झाली नाहीये. असो. 
           शिकागोमधून परत भारतात जायचं ठरलं तेव्हा मुलं लहान होती. वाटलं, चला बरं आहे आता तिकडे गेल्यावर घरकामाला कुणी बाई मिळेल तर तेव्हढीच मदत होईल. त्यामुळे आम्ही गेल्यावर महिन्याच्या आतच केर, फरशी, भांडी यासाठी एक मावशी मिळाल्या कामाला. दुसरी गरज होती पोळ्या करण्यासाठी आणि जेवण बनवायला मदत करायला. मी आणि संदीप दोघे मिळून जेवणाची तयारी करायचो. इतक्या वर्षात सोबत काम केल्याने आम्हाला आता सवय झाली होती ठराविक प्रकारे करण्याची. भाजी किंवा कांदा, लसूण जरी कापायचा असेल तर तो एकदम मस्त कापून देतो. माझ्या पोळ्या करून होईपर्यंत मुलांचे तो आवरून घेतो. अशी अनेक कामे चालायची. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हाच काय तो आमचा सर्वांचा मिळून एकत्र वेळ असायचा. पुण्यात आल्यावर संदीप रात्री ८-९ वाजता यायचा कारण त्याचे ऑफिस उशिरा सुरु व्हायचे.
            आता एकतर या सर्व बदलांची सवय करून घ्यायची आणि त्यात मदतीला जे कुणी मिळेल त्याच्याशी जुळवून घ्यायचे. खूप कठीण होते. अनेक लोकांना वाटते की,'अरे तुम्हाला काय सर्व काम करायला बाई मिळते भारतात असताना. ' पण तो बदल माझ्यासाठी अवघड गेला. कारण पहिले दोन दिवस एक जण स्वैपाकाला आली तिने घाई घाईत एक भाजी केली, त्यात तेल जास्त, तिखटाचा अंदाज नाही. पोळ्या माझ्यापेक्षा चांगल्या होत्या. पण मला लवकरच कळले की मला हे जमणार नाही. म्हणून अशा कुणाला शोधू लागले की जे फक्त मला पोळ्या करून देईल आणि भाज्या चिरून, सर्व तयारी करून देईल. माझे काम फक्त फोडणी टाकायचे. नशिबाने लवकरच मला अशी एक व्यक्ती मिळालीही, आशा तिचे नाव.
           सुरुवातीला जरा त्रास झाला दोघीनाही, पण दोन वर्षात ती शेवटपर्यंत आमच्याकडे कामाला येत राहिली आणि जाताना सांगून गेली पुन्हा भारतात याल तेंव्हा मला सांगा मी नक्की येईन. आमच्याकडे भांड्यासाठी येणाऱ्या मावशीही मला हेच सांगून गेल्या. एकूण काय मी एक चांगली एम्प्लोयर आहे असे सांगायला मला वाव मिळाला. :) असो. आता आशाबद्दल, ती सर्व तयारी करून द्यायची त्यामुळे कधी मला उशीर झाला तरी निदान कुकर लावलेला असे, पोळ्या तयार असत, पटकन नुसते वरण केले तरी मुलांचे जेवण सुरु व्हायचे. मी कधी आजारी असेन तर ती सर्व करून जायची. एकूण चांगली गेली ती दोन वर्षं.
          इतके लिहूनही मी माझ्या मूळ मुद्द्याला आले नाहीये. (प्लीज डोक्याला हात लावू नका. :) ) माझं नशीब चांगलं म्हणून मला असे मदत करणारे लोक मिळाले. पण त्यामध्ये एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे कुटुंबाचा एकत्र वेळ. जेवण बनवण्याच्या निर्णयात अनेक विचार असतात, सर्वाना काय आवडतं, काही खास कधीतरी करावं किंवा कधीतरी नुसता उपमाच करावा. पण आशा असल्यामुळे, तिचे काम करून ती जाईपर्यंत सर्वांचे काही ना काही वेगळे चालू असायचे. त्यामुळे मुलांना कधीही शेंगा सोलाव्या किंवा लसुन सोलावा अशा छोट्या कामात मदत करायची वेळ आली नाही. शिवाय मुलाला(वय ३ वर्षं) असा भ्रम झाला की जेवण बनवणे हे केवळ आईचेच काम आहे.
          आता सध्या अमेरिकेत आल्यापासून पुन्हा जुने रुटीन चालू आहे आणि मला फरक जाणवतो. संध्याकाळी मुलं विचारतात आई आज काय करणार आहेस? मग कधी मी त्यांना मदत करायला सांगते. संदीप भाज्या चिरून देतो. कधी पोळ्या खायचा कंटाळा आला की पिझ्झा बनवायला मुलं मदत करतात. आशाची मदत कितीही चांगली असली तरी स्वत:च्या घरात सर्वांनी मिळून काम करण्याचा आनंद वेगळाच. मुलांना आता कळते की आपण चिरलेली भाजी केलीय किंवा आपण केलेला पिझ्झा कसा बनलाय किंवा पोळ्यांना तूप लावलंय. अशा छोट्या गोष्टी. पण त्यातून ते खूप शिकत आहेत. मुख्य म्हणजे आम्हाला त्यांच्या सोबत थोडा वेळ घालवता येतो. हे सर्व खूप दिवस मिस करत होते.
          मला पुण्यात असताना असेही अनुभव आले की ज्या घरात बाई जेवण बनवून गेली आहे, त्यामुळे पाहुणे आले की आता काय करायचे असा लोकांना प्रश्न पडलाय. किंवा स्वत: सुगरण असूनही जे मावशींनी बनवले आहे ते जेवण लोकांना वाढले आहे. त्यात आपलेपणा किंवा प्रेम दिसलं नाही. घरी जेवण बनवण्यासाठी कुणीतरी असणं ही अनेक लोकांची गरज बनली आहे. अर्थात त्यात काही गैर नाही, मदत लागतेच. पण त्यामुळे आपल्या हातचे बनवून खायला घालण्यातली मजा मात्र मिळत नाहीये. अनेक वेळा चार लोक येणार म्हणून बाहेरून मागवून घेतले जाते, त्यात घरच्या लोकांचे कष्ट वाचतात नक्कीच, पण एकत्र गप्पा मारत सर्वांनी मिळून जेवण बनवणे किंवा काही चुकलं तर 'आहे ते छान आहे' म्हणून आवडीने खाणे ही मजा येत नाही. किंवा, 'अगं तुझ्या त्या वडीची रेसिपी दे ना, मस्त झाली होती' अशी खास आठवणही नाही. मला तर आजकाल वाटत आहे की मी इथे परदेशात राहून जास्त 'देशी' झाले आहे. असो. :) स्वत:  जेवण बनवून आग्रहाने खावू घालणे हा आपुलकी दाखवण्याचा एक खास प्रकार आहे, जे आपल्या आई वगैरे नेहमी दाखवतात. आपणही ती कला विसरायला नको इतकंच.
          आणि हो, आशाची आठवण येतेच मला अजूनही, प्रत्येक वेळी पोळ्या करताना. :)

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/