Monday, January 29, 2018

माझी पाठदुखी

      आज मी पोस्ट लिहिणार आहे, पाठदुखीबद्दल. त्याचं कारण असं की गेल्या काही दिवसांत मला याबद्दल काही अनुभव आले ते लिहायचे होते आणि हे लक्षात आले की डायबिटीस सारखे हेही दुखणे आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. पाठ दुखण्याची अनेक करणे असू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे पाठीचा मणका ज्या स्थितीत राहणे अपेक्षित आहे त्यात न राहता चुकीच्या बसण्याने, झोपण्याने हा त्रास वाढू शकतो. वजन वाढून एकूणच पाठीवरचा ताण वाढतो. गाडी चालवताना ज्या प्रकारे बसतो, खड्डे किती येतात. वजन उचलताना किंवा कामे करताना पाठीत वाकतो की गुढग्यात, हातात पिशव्या घेऊन जाताना वजन दंडावर येतं का पाठीवर? अशा अनेक गोष्टी. 
        पण सर्वांत जास्त ऐकलेले कारण की माझ्यासारख्याच अनेकजणींना पहिल्या बाळंतपणानंतर महिन्यांतच माझी पाठ दुखू लागली असेल आणि अनेकांना डॉक्टरांनी दाखवलेही असेल. त्यांनी फिजिओथेरपी सांगितली असेल, व्यायाम करायला सांगितलं असेल, वजन कमी करायला सांगितले असेल. पण त्यातले काय काय किती जणांनी प्रत्यक्षात केले आहे? आणि केवळ डिलिव्हरीच नाही, वय वाढत जातं तसेही पाठदुखी सुरु होऊ शकते. स्त्रियाच नाही पुरुषांनाही. पण हळूहळू सुरु झालेल्या या त्रासाबद्दल आपण फार कमी उपाय करतो, कारण ते दुखणं आपल्या कायमचं मागे लागलंय हे आपण स्वीकरलेलं असतं. आणि तीच माझी सर्वात मोठी चूक होती.
            एका मैत्रिणीने एका मराठी लेखाचे कात्रण मला पाठवले होते ते इथे देत आहे. पाठदुखी वाढत जाते तसा त्याचा आपल्या बाकी शरीरावर कसा परिणाम होतो ते यात दिले आहे. दोन मणक्यांमध्ये एकेक चकती(डिस्क) असते, डिस्क सस्पेन्शनचं काम करत असतात, म्हणजे मणक्यावर येणारा भार काही प्रमाणात शोषून घेतात. पण जसे जसे त्या डिस्कवरील प्रेशर वाढते त्या डिस्कचा आकार गोल न राहता त्याला पोक येऊ लागतो आणि त्यातून पाठदुखी सुरु होते. डिस्कवरील प्रेशर खूप वाढल्यावर त्याचे बाहेरील आवरण तुटून आतील द्रव बाहेर येऊ शकतो. आता बाहेर आलेली डिस्क किंवा तो डिस्क मधून बाहेर आलेला द्रव पायाकडे जाणाऱ्या शिरांवर दाबू लागतो, माझ्या बाबतीत तो दाब उजव्या पायाच्या शिरेवर पडत होता. ती आपल्या शरीरातील सर्वात मोठी नस आहे, सायटीक.  जर पाठीच्या वरच्या भागातील डिस्कला त्रास असेल तर हाताकडे जाणाऱ्या शिरांवर दाब येऊ शकतो. आणि जसे जसे या शिरांवरील दाब वाढेल, त्या शिरांमधील संवेदना जाऊ शकते आणि अतिशय वेदनाही होतात.
          अनेकांना प्रश्न पडतो की पाठ दुखतंय तर पायाचा काय संबंध? याबद्द्दल त्या कात्रणात जास्त माहिती आहेच. माझ्याबाबतीत उजव्या पायाच्या शिरेवर दाब पडून उजव्या पायाने चालणे  अशक्य झाले त्यासाठी सर्जरी करावी लागली. त्याबद्दलही त्या कात्रणात लिहिलेले आहे. मी या लेखासोबत अजून काही चित्रे जोडत आहेत. त्यात साधी डिस्क आणि बाक आलेली डिस्क दोन्ही दिसतील. तसेच कुठल्या डिस्कवर भार आल्यास कुठल्या शिऱ्या दुखतात किंवा कुठल्या भागावर परिणाम होऊ शकतो ते एका चित्रात दिलं आहे.






आता मी लिहीत आहे माझे जे अनुभव आले.

१. जाऊ दे ना: जसे मी पाठदुखी हे आपल्याला कायमचं लागलेलं दुखणं आहे असं स्विकारुन पुढे जात राहिले तसेच अजूनही बरेच लोक असतील. पण हे लक्षात येत नाही की आपलं शरीर दुखतंय म्हणजे काहीतरी कुठेतरी चुकतंय  आणि ते आपल्याला सांगायचा प्रयत्न करत आहे. जे काही चुकत असेल ते दुरुस्त केलेच पाहिजे. ते दुरुस्त होत नसेल तर ते कमी होण्याचे प्रयत्न तरी केले पाहिजेत. माझ्यासारखेच अनेकांना सुरुवातीला जे फिजिओथेरपीसाठी सांगितलेलं असतं त्यांनी अनेकदा ती केलेली नसते आणि त्याबद्दल ते विसरुन जातात. वजन वाढत आहे, ते कमी करा म्हणून सांगतात कुणाला तेही सोडून दिलं जातं. ते करणं टाळलं पाहिजे. मी चूक केली ज्याबद्दल आता मला जाणीव होत आहे. 

२. एव्हढं हातातलं काम: अनेकदा असं होतं की  आपल्या समोर एखादं काम असतं, पाठ दुखत असते. पण वाटतं एव्हढ्या चार पोळ्या करते आणि बसते. आजचा कार्यक्रम तेव्हढा होऊन जाऊ दे मग डॉक्टरकडे जाऊ. दिवाळी संपू दे, मग थोडा व्यायाम करु. पाठदुखीच्या बाबतीत मला असं सांगितलं की आपण ज्या अवस्थेत चुकीच्या प्रकारे किंवा खूप वेळ बसलेले आहोत त्यातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे उदा: एखादं प्रोजेक्टचं काम चालू आहे, सलग दोन तास बसलोय, माहित आहे की जरा उठलं पाहिजे पण नाही होत. मला या आजारपणात कळलं की मी सलग दोन तास बसले एकाच अवस्थेत तर किती त्रास होत होता. नाईलाजाने मला उठावंच लागत होतं. कारण तसं नाही केलं तर खूप दुखत होतं. तर ते दुखणं वाढायची का वाट बघायची? चालत असू, उभे असू तर मधेच ते सोडून थोडं बसायचं. बसलेले असू तर उठून चालून यायचं. कुणीही सलग चार तास एकाच ठिकाणी आपण बसावं अशी अपेक्षा करत नाही. 

३. जर-तर: आता शेवटी आजारपण वाढलंच तर मग पहिली फेज असते ती म्हणजे, 'जर-तर' ची. म्हणजे काय ?तर माझी पाठ, पाय अतिशय दुखायला लागल्यावर मला पाच मिनिटेही उभे राहणं शकय होत नव्हतं. रोजची साधी साधी कामंही जमत नव्हती. तेव्हा रडू यायचं आणि विचार करायचे की खरंच मी आधी का नाही लक्ष दिलं? कदाचित सतत बसले नसते, पळाले नसते तर कदाचित इतकं झालं नसतं. किंवा अगदी साधी गोष्ट म्हणजे, ज्या ट्रीपमध्ये माझं दुखणं वाढलं तिथे गेलेही नसते तर आज मी वेगळी असते, नॉर्मल असते. असे अनेक विचार यायचे. पण नवरा समजावत राहिला, जे झालंय ते झालंय. आता काही करु शकत नाहीये. उगाच, काय करायला हवं होतं, काय झालं असतं असे विचार करुन काहीच उपयोग नसतो. जे समोर आहे त्याला तोंड देणं आणि पुढे काय करायचं हे ठरवणं इतकंच करु शकतो. 

४. गृहीत धरणं: या आजारपणात माझ्या लक्षात आलं की आपण आपल्या शरीराला किती गृहीत धरतो. मला अगदी साध्या गोष्टी करता येत नव्हत्या. उदा: फ्रिज किंवा मायक्रोवेव्हचा दरवाजा उघडणेही जमत नव्हते. पोळ्या करायला उभी राहिले तर दोन पोळ्या करुन बसावं लागत होतं. भाजी किंवा वरण असलेलं भांडंही माझ्यासाठी जड होत होतं. तेव्हा लक्षात आलं की या छोट्या गोष्टी एरवी आपण किती सहज करु शकतो पण त्याच्यासाठी शरीराचे निरनिराळे भाग किती कार्यरत असतात. ते बंद पडले तर किती त्रास होतो. माझा उजवा पाय अशक्त झाल्याने, डाव्या पायावर जास्त जोर येत होता आणि शरीराचा तोल मध्यावर न राहिल्याने खुब्यात दुखायला सुरुवात झाली होती. म्हणजे आपण दोन पायांवर स्वतः उठून चालू शकतो हे किती मोठं भाग्याचं लक्षण आहे आणि तरीही आपण आपल्या शरीराला इतकं गृहीत धरतो. 

५. व्यक्त होणं: अनेकदा लवकरच दुरुस्त होईल या विचारांनी आपण जास्त काही कुणाला सांगत बसत नाही. त्यात परगावच्या, परदेशात असताना घरच्यांना उगाच काळजी नको म्हणून तर अजून सांगत नाही. पण मग या गोष्टी स्वतःकडेच ठेवून अजून जास्त त्रास होतो. त्यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे कुणालातरी सांगणं जास्त गरजेचं आहे. केवळ बोलण्याने खूप फरक वाटतो, त्यातून आपण पुढे काय केले पाहिजे हे कळतेही.

६. सोशल मीडिया: मी नियमित लिहिते, फेसबुकवर पोस्ट असतात, फोटो असतात किंवा व्हाट्सएप्प वर ऍक्टिव्ह असते त्यामुळे अनेकांना सर्जरीबद्दल कळलं तर खूप आश्चर्य वाटलं. अरे असं कसं झालं? त्यात त्यांचा काही दोष नव्हता कारण त्यांना माहित नव्हतं, फक्त जवळ असणाऱ्या काही लोकांनाच माहित होतं. कितीही झालं तरी माणूस प्रत्येक गोष्ट प्रत्येकवेळी जगासमोर मांडेल असंच नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की जे दिसतं तेच खरं आहे असं समजू नका. आपला एखादा जवळचा मित्र किंवा मैत्रीण असेल, त्यांच्या केवळ सोशल मीडियावरुन ठरवू नका त्याचं कसं चालू आहे. समोरुन कसंही दिसत असलं तरी जवळच्या मित्र-मैत्रिणीला एखाद्या दिवशी मुद्दाम मेसेज करुन विचारा कसा आहेस, कशी आहेस. एखादा अचानक मेसेज पाठवायचा बंद झाला तर विचारा, बरंय ना सगळं म्हणून. कारण हे सोशल मीडियाचं विश्व खरंच अनेकदा आभासीच असतं. आपल्या जवळच्या लोकांच्या बाबत तरी त्याच्यावर विसंबून राहू नका. त्यांच्याशी संपर्क साधा आणि बोला. कदाचित तुमच्या फोनचीच त्याला किंवा तिला तेव्हा गरज असेल.

           सर्जरीबद्दल सांगायचं तर: तिचं नाव आहे, मायक्रोडिस्केक्टोमी. भारतात किती वेळ लागतो माहित नाही इथे, दीड- दोन तासात सर्जरी झाली. पूर्ण भूल दिली होती. भूल उतरुन मला बाथरुमला जाता आलं की त्यांनी लगेच मला डिस्चार्ज दिला. भारतात इतक्यात मला घरी सोडलं नसतं असं मला सांगितलंही काही ओळखीच्यांनी. एकूण ७ तासात मी घरी आले होते. दोन आठवडे झाले त्यानंतर पायात बऱ्यापैकी सुधारणा आहे. चालताना पायाचे मागचे स्नायू अजूनही दुखतात कारण गेले दोन तीन महिने ते नीट वापरले गेले नाहीयेत आणि आखडून आलेत. नस जिथे दाबली गेली होती तिथे अजूनही दुखते, पायातही जिथे संवेदना नव्हती तिथे परत आली असे वाटत आहे. 
         नस पूर्ववत होण्यासाठी २-३ महिन्यांचा कालावधी लागतो आणि त्यावर वाट पाहणे इतकेच करु शकतो असंही मला नर्सने सांगितलं. जिथे आधी संवेदना नव्हती पायाला तिथे आता दुखत आहे, जे हळूहळू कमी होईल किंवा व्हायला हवे. सर्जरीची सुरुवातीची रिकव्हरी साधारण ४-६ आठवड्याची असते. मी पाचेक आठवड्यात परत ऑफिसला जाऊ शकते म्हणून सांगितलं आहे. सर्जरीनंतर पहिला आठवडा प्रचंड औषधं होती त्यामुळे डोळ्यांवर सतत झापड होती आणि दुखतही होती. आता जिथे इन्सिजन केले तिथे जास्त दुखत नाहीये पण मूळ पाठदुखी अजूनही आहेच. त्यावर फिजिओथेरपि हाच उपाय आहे असं सांगितलं आहे. ती मला सर्जरीपासून ६ आठवडयांनी सुरु करता येणार आहे. पायात शक्ती येण्यासाठीही PT घेणार आहे. एकूण सर्जरीनंतर PT ने पूर्ण बरे होण्यासाठी कदाचित ६ महिने तरी लागतील असं वाटत आहे. कमी की जास्त माहित नाही. 

तर हे असं आहे एकूण. माझ्या अनुभवातून कुणाला फायदा झाला तर चांगलेच आहे म्हणून सर्व लिहिण्याचा प्रपंच. मी डॉक्टर नाही त्यामुळे काही चुकले असल्यास क्षमस्व. या निमित्ताने निदान पाठदुखीचा आणि त्यावर काय केले पाहिजे याचा विचार केला जाईल. आपण योग्य उपाय केले नाहीत तर तो वाढू शकतो हेही सांगायचे होते. वेळीच उपाय केल्याने नक्कीच फरक पडू शकतो, त्यामुळे कुणाची पाठ दुखत असेल तर विलंब करु नका. 

विद्या भुतकर. 

Sunday, January 28, 2018

आई म्हणजे ....डेंजर असते

   परवा आईचा आणि माझा व्हाट्सएप्प कॉल झाला. आमची आई फेसबुक, व्हाट्सएप वगैरे व्यवस्थित वापरते. माझ्या फेसबुक पेजवरचे पोस्टही नियमित वाचून लाईक वगैरे करते. सकाळी उठल्यावर चेक करायच्या सर्व गोष्टींमध्ये माझ्या पोस्ट वाचणे हे काम नियमित असतंच. त्यामुळे मी काहीही लिहिलं तरी ते तिने पाहिलेलं असतं. तर झालं असं, आमच्या त्या कॉलवर तिने मला सांगितलं, काही दिवसांपासून आमच्या गावातील महिलांच्या एका व्हाट्सएप्प ग्रुपवर तिला माझ्या काही पोस्ट फॉरवर्ड येत होत्या आणि तेही निनावी. ती अक्षयपात्र, मॅगीची पोस्ट वगैरे. 
         खरं सांगायचं तर गेले दोन वर्षे झाली मी हे पाहतेय. मी पोस्ट लिहिते, पब्लिश करते, कुणी नावासहित शेअर करते, कुणी निनावी. काही जण विचारतातही 'मी शेअर करु का नावासहित', मी 'हो' म्हणून टाकते. आता माझी पोस्ट कुणाला तरी आवडली आणि ती अजून कुणाला दाखवावीशी वाटली हे चांगलंच आहे ना? पण एकदा ती व्हाट्सएप्प वर पोचली की त्याच्या लेखकाचं नाव कधी पुसलं जातं माहित नाही. अनेकजण ते तसेच निनावी पाठवत राहतात. आधी मला खूप चिडचिड व्हायची. पण आता सोडून देते. वाटतं जाऊ दे, आपण आपलं लिहायचं काम करायचं. कारण, पोस्ट वाचून पुढे पाठवताना त्याच्या लेखकाचं नाव डिलीट करावंसं का वाटत असेल माहित नाही. 
       मी सोडून देते पण आमची आई? ज्यांनी पोस्ट फॉरवर्ड केल्या होत्या त्या बाईंना आईने कॉल लावला आणि विचारलं, "तुम्हाला माहित आहे का याची लेखिका". त्यांना माहित नव्हतंच.
आईने लगेच सांगितलंही माझं नाव आणि म्हणाली,"मी तिची आई बोलतेय". 
त्या बाईं बोलल्या,"मलाही अशाच फॉरवर्ड आल्या होत्या, मी पुढे लोकांना पाठवल्या. सॉरी हां.". 
आईचं म्हणणं, आपल्याला नाव माहित नसेल तर नाही पाठवायच्या ना मग? 
म्हटलं,"अगं जाऊ दे. उलट मी इथे अमेरिकेत बसून लिहिलेलं काहीतरी आणि आठवड्याच्या आत आपल्या गावात लोकांपर्यंत पोहोचतंय तर भारीच आहे ना? त्यांना सांगितलंस की मी त्यांच्याच गावातील आहे तर त्यांना अजून आनंद होईल ना? तू कशाला एव्हढा त्रास करुन घेतेस?". 
मी असं बोलल्यावर जरा शांत झाली.
मनात विचार आला, "मी सोडून दिला आपला हक्क, तरी आईला त्रास झालाच."
एकूण काय तर, एखादी आई आपल्या मुलाच्या हक्कासाठी कुठे, कधी आणि कशी भांडेल सांगता येत नाही. म्हणून म्हटलं, आई म्हणजे....डेंजर असते. :) 

विद्या भुतकर. 

Monday, January 22, 2018

मेरी मॅगी

       आज घरी एकटीने राहण्याचा पहिला दिवस. सकाळपासून नेटवर टाईमपास करुन झाला, थोडं लिहून झालं. हात पाय चालवून झाले. आता जेवायची वेळ झाली. मुलं-नवरा नसल्याने एकटीला जेवायला काय करायचं हा प्रश्न पडला होता. अर्थातच मग सर्वात सोप्पा उपाय होता तो म्हणजे 'मॅगी'. आता 'मॅगी' बद्दल हजारो लोकांनी लिहिलं असेल आजवर, खासकरून सध्याच्या त्यांच्यावरील आरोपांमुळे बातम्या तरी प्रत्येक ठिकाणी असतील. तरीही माझ्या आयुष्यात मॅगी वेगवेगळ्या काळात आली आणि त्या त्या दिवसांच्या आठवणींमध्ये तिने स्वतःचं वेगळं स्थानही बनवलं. तसं पाहिलं तर एरवी उगाच घरात 'हेल्दी' जेवण बनवण्याचा हट्ट करणारी मी, मॅगीबाबत मात्र त्या सर्व विचारांना पूर्ण कल्टी देते आणि गरम गरम खाऊन घेते. 
        मी शाळेत असताना कधीतरी पुण्याहून आलेल्या आत्याने आम्हाला मॅगी करुन खायला दिली होती. अर्थातच त्यावेळी त्या 'बेचव' मॅगीमध्ये आवडण्यासारखं काय आहे असं वाटून पुन्हा त्याच्या वाटेला मी कित्येक वर्ष गेले नाही. कॉलेजमध्येही कधी मॅगी खाल्ली नाही. खरी सुरुवात किंवा ओळख झाली ती पहिल्या नोकरीत असताना मैत्रिणीच्या रुमवर GRE चा अभ्यास करताना केलेली आणि खाल्लेली मॅगी. तेव्हा पहिल्यांदा मला कळलं की त्यात हवं ते घालून, मला हव्या त्या चवीची मॅगी मी बनवून खाऊ शकते. अभ्यास आणि मॅगीचं गणित तेव्हा पहिल्यांदा जमलं. 
      पुण्यात ते जितकं सोईस्कर होतं तितकंच अवघड गेलं केरळमध्ये गेल्यावर. केरळमधल्या जेवणाची चव तर आवडायची नाहीच. त्यात हॉटेलमध्येही खोबरेल तेलातील डोसा, इडली आणि सांबारही. मग ट्रेनिंग सेंटरच्या शेजारीच टपरी असलेल्या माणसाकडे तो बनवेल तशी मॅगी खाल्ली. तिथल्या त्या बेचव जेवणात साधी मॅगीची चविष्ट वाटायची. नवीन मित्र-मैत्रीण, केरळचं सौंदर्य, तिथे केलेली मजा आणि त्यासोबत चवीला मॅगी. हे समीकरण आजही लक्षात आहे. 
       केरळमधून मी आले मुंबईला, जिथे जेवण बरंच चांगलं असायचं. ऑफिसच्या जवळच राहायची रुम असल्याने शनिवार-रविवारीही तिथे ऑफिसच्या कँटीनलाच जेवायचे. नंतर बोरिवली ते अंधेरी प्रवास सुरु झाला, बसने. तोही दुपारी ३ ते रात्री १२ च्या शिफ्टचा. रात्री बारा वाजता रुमवर जायच्या आधी अनेकदा कँटीनला जाऊन मॅगी खाऊन यायचे आणि झोपायचे. जेवण असं काही नाहीच. एकदा तर माझ्या वाढदिवशीही रात्री बारा वाजता ऑफिस कँटीनमध्ये मॅगी खाल्ल्याचं आठवतंय. तिथला माणूस सुरुवातीला फक्त पाणी , मसाला आणि नूडल्स इतकंच टाकून आणून द्यायचा. मी हळूहळू ओळख वाढली तशी, त्यात टोमॅटो-हिरवी मिरची घालून द्यायला सांगायचे. तेव्हा त्या टोमॅटो-मिरचीची सवय लागली ती आजही आहे. कधी स्वतः रुमवर मॅगी करायची असेल तर आम्ही बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरुन तळमजल्याला असलेल्या दुकानात दोन करुन मॅगी मागवून घायची होम डिलिव्हरी. आजही त्या अळशीपणाचं हसू येतं. आजही मुंबईच्या दमट हवेत, कंटाळून कॅंटीनमध्ये जाऊन खाल्लेल्या मॅगीची, त्या दिवसांची एक ठराविक आठवण मनात आहे. 
       पुढचा प्रवास झाला तो मुंबई ते अमेरीका आणि अमेरीका ते कॅनडा. कँटीनचं जेवण्याचे दिवस संपले होते.  जिथे स्वतः करुन खायची सवय लागली. पण झालं काय की इथे मी रुमवर एकटीच राहायचे, तेही एका घराच्या बेसमेंट मध्ये. कॅनडाच्या थंडीत तळघरात एका हीटरवर दिवस काढायचे. शुक्रवार आला की मग रात्री मॅगी करायची, गरम-तिखट, लॅपटॉप वर एखादा पिक्चर लावायचा, अंगावर पांघरून घेऊन उबीत, मॅगी खात पिक्चर बघायचे, एकटीच. थंडीतील ती गरम मॅगी आणि तेव्हा पाहिलेले चित्रपट अजूनही डोक्यात येतात कधी कधी. तिथल्या थंडीत निभाव लागला तो मॅगीमुळेच. एकटीच असल्याने पिक्चर संपला की तसेच वाटी बाजूला ठेवून, लॅपटॉप बंद करुन, गुरफटून तशीच झोपी जायचे. :) 
     लवकरच एकटे राहण्याचे दिवस संपले. लग्नानंतर एक महत्वाचा शोध लागला तो म्हणजे मला माझ्यापेक्षा नवऱ्याच्या हातची मॅगी जास्त आवडते. अर्थात ती आवड होती की आळस माहित नाही, पण शुक्रवारी घरी आलं की आयती हातात गरम -तिखट मॅगी आणि पुन्हा एखादा पिक्चर, हे नवीन सुरु झालं. एकदम विकेंडचा फील यायचा. आजही कधी बरं नसलं, विशेष करुन सर्दी वगैरे झाली असेल तर हमखास तिखट-गरम मॅगी खायची इच्छा होतेच. एकदा तर त्याच्या हातची मॅगी सासू-सासऱ्यानाही खाऊ घातली. (किती कौतुक झालं लेकाचं तेव्हा !! असो. ) 
       मध्ये जेव्हा मॅगीच्या मसाल्याबाबत बातम्या येऊ लागल्या आणि घरात ते आणणं बंदच झालं, जवळ-जवळ दोनेक वर्ष. असेही मुलांना ते द्यायला नको म्हणून करायचं बंदच केलं होतं. पण त्यांनी भारतात असताना कधीतरी खाल्ली आणि त्यांनाही ती आवडली. तेव्हापासून महिन्यातून एखादे वेळी त्यांचीही होऊन जाते एखादी मॅगी. कधी वाटतं, योग्य करतो की नाही. पण तसं पाहिलं तर प्रत्येक गोष्टीत शंका येते मला, अगदी ढीगभर औषध फवारलेल्या गहू-तांदळाचीही. शेवटी एक उपाय सुरु केला. नूडल्स पूर्वी एकदम पाण्यात टाकायचो, आता उकळून त्यातील पहिलं पाणी काढून टाकून मग शिजवतो. निदान वरचं वॅक्स की काय ते तरी जाईल निघून म्हणून. बाकी अजूनही बातम्या येतच राहतात, योग्य अयोग्य कळत नाही, पण जोवर त्याचं प्रमाण मर्यादित आहे तोवर योग्य असावं असं मला तरी वाटतं. 
        प्रत्येकाची मॅगी खाण्याची, बनवण्याची पद्धत निराळी आणि एकाची दुसरयाला अजिबात न आवडणारी. हे फक्त मॅगीबद्दलच होऊ शकतं. कुणाची खरंच दोन मिनिटांत बनणारी तर कुणाची साग्रसंगीत. कुणाला त्यात पाणी असलेलं आवडतं, कुणाला एकदम कोरडी, कुणाला भाजी घातलेली तर कुणाला काहीच नसलेली. जितक्या करू तितक्या तऱ्हा. शिवाय, काहीही स्वयंपाक येत नसला तरी 'मॅगी बनवता येते' असं क्वालिफिकेशन अनेकांचं असतंच. माझा एकटी-दुकटी ते चौकटी असा प्रवास निरनिराळया देशातून झाला. त्यात कुठे ना कुठे मॅगी होतीच त्या त्या ठिकाणी. आणि त्याच्याशी निगडित आठवणी. त्यामुळे आज घरी एकटीसाठी  बरेच दिवसांनी करताना त्या सर्वांची पुन्हा आठवण झाली आणि म्हटलं लिहावंच. कारण मला ठाऊक आहे, प्रत्येकाच्या त्याच्याशी वेगवेगळ्या आठवणी जोडलेल्या असणार. होय ना? 

विद्या भुतकर. 

Sunday, January 21, 2018

अक्षयपात्र

        मी कॉलेजमध्ये असताना मावशीचं घरंही जवळच होतं. महिना-पंधरा दिवसांतून मावशीकडे जायचे. एकतर एरवी मेसमधलं जेवण असायचं  आणि मावशीचं जेवण असंही खासच. त्यामुळे तिथे गेलं की मेजवानीच व्हायची. खरं सांगायचं तर अनेकवेळा असंही व्हायचं की मी दुपार मावशीकडे पोचले आहे. तोवर त्यांचं सर्व जेवण उरकून, भांडी आवरून झालीत आणि आता वामकुक्षीची वेळ झालीय. मी पोचले की मावशी दुपारच्या जेवणातलं छोट्या छोट्या वाट्यात काढून ठेवलेलं वाढून द्यायची. नेहमी वाटायचं, इतकंसं कसं पुरेल मला, पोट भरेल का? पण असं कधीच झालं नाही की मी गेलेय आणि अर्धवट पोट भरलंय. उलट चार घास जास्तच जायचे. काही नसलं तरी पटकन एक भाकरी, पिठलं का होईना करुन द्यायचीच. भाकरी करुन झाल्यावर त्याच तव्यात तिने परतलेल्या, मीठ लावलेल्या हिरव्या मिरच्याही भारी लागायच्या. चहा, साबुदाण्याची खिचडी तर खासच. 
          नंतर कधी त्या दिवसांचा विचार केला की वाटतं मावशीकडे 'अक्षयपात्रच' असावं, येणाऱ्या माणसाचं मनसोक्त पोट भरवणारं. आणि असंच काही लोकांकडे गेल्यावरही वाटलं आहे. सहज म्हणून जावं आणि भरभरुन गप्पा आणि साधी खिचडी का होईना त्यांनी करुन खाऊ घालावी आणि पॉट, मन दोन्ही भरुन जावं. अक्षयपात्रच ते, नाही का? महाभारतातली ती अक्षयपात्राची गोष्ट काही कारणामुळे मनात राहिली नेहमीच. घरी आई नेहमी म्हणायची रिकामं भांडं ठेवू नकोस, चपातीच्या डब्यात एक कणभर का होईना भाकरीचा, चपातीचा तुकडा अजूनही ठेवतेच. भाताचा डबा तसाच ठेवत नाही, चमचाभर का होईना खाऊन ठेवते, का तर अख्खा डबा तसाच ठेवायचा नाही. मला ते जमत नाही. मुळात पोळ्यांचा डब्याच नाही आणि शिल्लक राहतील इतक्या पोळ्या करतही नाही. भात केला तरी कमी. तरीही त्या वेळच्या रीती डोक्यात इतक्या बसलेल्या असतात की आपण पाळल्या नाहीत तरी मनात येतातच.
        अमेरिकेतल्या थंडीमुळे किंवा राहणीमानामुळे हळूहळू हेही शिकले की  सर्व सामान एकत्रच आणलं जातं, दररोज कुणी 'खाली जाऊन हे घेऊन ये रे' असं करु शकत नाही. किंवा शेजारी जाऊन मीठ-साखर घेऊन येऊ शकतो असा शेजारी नेहमीच मिळतो असंही नाही. अशा वेळी महत्वाच्या वस्तू जरा जास्तच ठेवायच्या घरात. उदा: कांदे, लसूण, बटाटे, डाळ, कणिक इ. घरात कुठलीही भाजी नसली तरी निदान बटाट्याची भाजी किंवा, उसळ किंवा वरण तरी करताच येतं. जिरे-मोहरीही संपत आलं तरी मोठया डब्यात चार दाणे ठेवूनच मग उरलेलं संपवायचं. कारण ऐनवेळी ते मागे राहिलेले चार दाणेच कामात येतात. अशा छोट्या छोट्या वस्तू, त्या पुन्हा भरल्या जाईपर्यंत पुरवून वापरण्याची वृत्ती हे सर्व शिकले, हळूहळू. हे सर्व करणं म्हणजे माझ्यापरीने ते 'अक्षयपात्रात' कणभर शिल्लक ठेवणंच असतं, असं मला वाटतं.
                मुलं झाल्यावर मात्र अजून एक गोष्ट शिकले. कणिक मळली तरी दोन गोळे जास्तच मळायची, भात थोडा राहिला तर संपवून न टाकता फ्रिजमध्ये ठेवायचा, तीच गोस्ट वरणाचीही. का हा बदल, तर अनेकदा असं व्हायचं की बाहेरुन आलेय आणि मुलांना प्रचंड भूक लागली आहे. पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत त्यांना धीर धरवत नाही आणि तोवर त्यांनी काहीतरी चरावं असं मला आवडत नाही. म्हणून मग हे असे छोटे छोटे डबे फ्रिजमध्ये असतात. पटकन एक पोळी लाटून दिली, वरण-भात दिला तर ती वेळ निभावून जाते. शिल्लक असेल तर कधी कुणी आलं तरी पटकन वाढता येतं. अनेकदा सासूबाई म्हणायच्या,"भांडं रिकामं करुन टाका, उगाच ठेवू नका". आणि मी मात्र,"असू दे, लागेल" म्हणून मुद्दाम ठेवून घ्यायचे. अगदी पोळ्या करायला येणाऱ्या मावशींनाही एखादी जास्तच करायला सांगायचे, म्हणजे पटकन पोळी-जॅम सारखं काहीतरी देता येतं.
        याच नाण्याची दुसरी बाजू अशी की उगाच दोन घास ठेवले की वाया जातात, त्यापेक्षा संपवून टाकायचं, उगाच ठेवायचं नाही. कुणी आलं तर पटकन करता येईल. उगाच जास्त आणायचं नाही, लागेल तसं आणता येईल. करतानाही जेव्हढं लागेल तितकं, मोजकंच करायचं, म्हणजे पुढच्या जेवणात ताजं बनवता येतं, शिळं खायची गरज नाही. ती बाजू चूक आहे असं मी म्हणत नाही पण मला जमत नाही. भारतात आजकाल घरी कामाला मावशी येतात, मोजकंच करुन घेतलं जातं.  इथे तर स्वतःच करावं लागतं. कुणी आल्यावर किंवा येणार असतील तर ते आधीच माहित असावं लागतं. तेव्हा वाटलं, खरंच या अक्षयपात्राची गरज आहे. पाहुणा आल्यावर पटकन 'चहा का होईना घ्याच' असा आग्रह करण्याची, 'जेवूनच जा' म्हणून आग्रह करण्याची, कुणी जेवायला आलंच असेल तर पोटभर जेवण जेवल्याचं समाधान त्या पाहुण्याच्या चेहऱ्यावर असण्याची गरज वाटू लागली आहे. ते समाधान, तेच आपलं अक्षयपात्र नाही का? 

विद्या भुतकर.         
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, January 17, 2018

अंघोळ

दोन महिन्यांपासून चाललेलं आजारपण, त्यातून ठरलेली सर्जरी, ती झाल्यावर औषधांच्या अंमलात असलेली गुंगी, मधूनच येणारं डिप्रेशन आणि इतक्या सर्वातून जाऊनही 'पुढे सर्व ठीक होईल की नाही' हा मोठा प्रश्न!!सर्जरीच्या आधी धुतलेले केस आणि त्यानंतर एकदोन वेळा जमेल तसं अंगावर घेतलेलं पाणी. औषधं, आजारपण यातून उतरलेला चेहरा. आज सकाळी उठल्यावर पाहिलं तर गळत असलेले केस, ओढून आलेला चेहरा,सगळं कसं नको वाटू लागलं. अजून किती दिवस, महिने, वर्षं हे असं चालणार या विचारांनी अजूनच वाईट वाटू लागलं. नवीन दिवस उजाडला, थोडं खाऊन घेतलं, औषध घेतलं तरी मन काही 'उंच भरारी' घेण्याच्या मूड मध्ये नव्हतंच. मध्ये तर नवऱ्याने टीव्ही बघ, फोन देऊ का वगैरे लहान मुलांना दाखवतात तशी खेळणीही दाखवून झाली होती. 
      शेवटी आज दुपारी हिम्मत केली, केसांना छान तेल लावलं, तेही आग्रहाने लिंबू, अंडं वगैरे लावून. केस धुतले. अंघोळ झाली, केस सुकवून अगदी छान सेटही केले. या सर्वात दोन तास आणि एरवी लागते त्यापेक्षा दहापट तरी शक्ती खर्च झाली. तोवर संध्याकाळ झाली. अंगातील त्राण संपल्याने पुन्हा एकदा औषध घेतलं. आता हे सर्व वाचून काडीचंही काही कुणाला कळणार नाही. पण खरं सांगू, गेल्या कित्येक दिवसांत इतकं छान वाटलं नव्हतं जे एका अंघोळीने वाटलं. अगदी असंच मुलांच्या बाळंतपणातही अनेकदा वाटलं होतं. सर्व शीण, थकवा, विचार, दुःख सर्व कसं पाण्यासोबत जणू वाहून जातं. आणि उरतो ते फक्त आपण. 
        ही आजचीच गोष्ट नाही. कॉलेजमध्ये असताना, अनेक दिवसांचा कंटाळवाळा अभ्यास, परिक्षेचं टेन्शन या सर्वानंतर संध्याकाळी घरी आल्यावर गरम पाण्य़ाने आंघोळ केली की कसं वाटायचं ना ते त्या परीक्षेच्या दिवसांतच लक्षात येतं. थकवा, मनातले विचार , होणारा त्रास सगळे पाण्याबरोबर जणू वाहून जातात. बरेचदा मला असा अनुभव आला आहे, रडून एखादी रात्र घालवावी आणि सकाळी आंघोळ झाल्यावर वाटावं जणू गेली रात्र गेली, आज नवा दिवस उगवलाय. एखाद्या मस्त ट्रेकवरून आल्यावर, निसर्गसौदर्याची, प्रवासाची, पावसाची आठवण काढत आलेला शीण एकदम पळून जातो. तर कधी आठवडाभर बाहेर हॉटेलवर राहून केवळ आपल्या घरी आलो म्हणूनही असंच वाटतं.  
        तर असे अंघोळीचे अनेक अनुभव मन प्रसन्न करणारे. आपल्याकडे मात्र त्याची कशाकशाशी सांगड घातली आहे हे सांगायला नकोच.भारतात 'अंघोळ' या प्रकारावरूनही लोकांचे अनेक प्रकार पडू शकतात आणि त्यावर हजारो चर्चा होऊ शकतात हे मला कळलं आहे. थंड पाणी, कोमट, उन्हाळा असूनही कढत पाणी असे पाण्याचे प्रकार. उठून डायरेकट बाथरूममध्ये घुसणारे, चहा वगैरे घेऊन जाणारे, अंघोळ करूनच पाणीही घेणारे, अंघोळ-पूजा करुन मग पाणी-अन्न घेणारे असे अनेक प्रकार. घराचा नियम अंगवळणी पडला म्हणून आयुष्यभर तेच करणारे, तर आधी हे सर्व सहन करावं लागलं म्हणून मोकळीक मिळाल्यावर एकदम उलट करणारे, फक्त ऑफिसला जायच्या दिवशीच अंघोळ करणारे, सुट्टीत/थंडीत, दांडी मारणारे, घरच्यांनी धक्के मारुन पाठवल्यावर करणारे तर फक्त गर्लफ्रेंडला भेटायला जाताना अंघोळ करणारे असे हजारो प्रकार-जाती-पोटजाती असू शकतात. 
            त्यामुळे मी सुरुवातीला जी कारणं सांगितली ती, 'आमच्याकडे आंघोळीशिवाय चहापाणी सुध्दा चालत नाही' अशा लोकांसाठी नव्हेच.  उठलं की दारात सडा-रांगोळी, प्रातःविधी आणि आंघोळ, अशा लोकांशी माझं जमणं जरा अवघडंच. सोवळं वगैरे तर विसराच. अगदी सासरीही, लवकरच कळून गेलं की ही बाई काही ऐकणाऱ्यातली  नाही. जेवायच्या आधी आंघोळ करा, आज पूजा आहे घरी म्हणून आंघोळ करा, पाहूणे येणार आहेत म्हणून आवरून घ्या ही अशी अनेक कारणं ऐकवली जातात. सुट्टी, विषेशत: रविवार हा या असल्या कामांसाठी नसतोच मुळी. अरे?? आंघोळीची स्वछता हा भाग सोडून बाकीची सगळी कारणं फक्त Logical च आहेत ना?: -) आता यावर मला अनेक कारणं ऐकवली जाऊ शकतात. पण  खरं सांगायचं तर उलट अमेरिकेत आल्यापासून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे सकाळी स्वयंपाक करून जायचा असेल तर नंतर अंघोळ केली पाहिजे, नाहीतर लोकांना मसाल्यांच्याच वास येत राहतो. असो. 
      जशी रोजची अंघोळ तशाच अनेक स्पेशलही. दिवाळीचं 'अभ्यंगस्नान'. पहाटे-पहाटे,कडक थंडीत, कुडकुडत, उटणं लावून घेवून गरम्म्म्म पाण्याने आंघोळ करणं म्हणजे दिवाळीची खरी सुरुवात. पूर्वी साधारण वर्षाच्या या काळात शेतकरी आपले धान्य घरी आणत त्यामुळे कष्टाने थकलेलं शरीर साफ करून मग आलेल्या धान्याचा, संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी हा सण साजरा करत.हे झालं तेंव्हाचे कारण. परंतु आजही दिवाळीची पहाट अभ्यंगस्नानाशिवाय अधुरी वाटते. सोहळाच तो एक. तसेच अजून एक म्हणजे, गंगास्नान. मी आजपर्यंत गंगा नदी पाहीलेली नाहिये, तिथे जाऊन म्हणे आजपर्यंत केलेली सगळी पापं धुवून निघतात. केवळ त्या एका श्रद्धेमुळे अनेक वर्षांत दूषित झालेली गंगा साफ करण्यासाठी करोडो रुपये खर्च होऊनही अजूनही काही फरक दिसत नाहीये. आता तो वादाचा मुद्दा वेगळाच. पण खरंच अशी पापं धुवून निघाली तर? 
       आपल्याकडे एखादया मॄत व्यक्तीला अग्नी देऊन आल्यानंतर कशालाही न शिवता लोक आंघोळ करतात. मला कुणीतरी याचं शास्त्रीय कारण सांगितलं होतं. मॄतव्यक्ती एखाद्या आजारपणाने गेली असेल तर त्या व्यक्तीभोवती असलेल्या विषाणूची बाधा बाकी लोकांना होऊ नये म्हणून ही खबरदारी. पूर्वी ते योग्य असेलही, अजूनही योग्य आहे का? मुख्य म्हणजे, आपली प्रिय व्यक्ती कायमची दुरावल्यावर तिचे अंतिमसंस्कार करून झाल्यावर, त्या आंघोळीने तिच्या आठवणीही, ती गेल्याचं दु:ख, सगळं धुवून जात असेल काय?
       आमच्या मुलांना लहानपणी मस्त मालिश करुन अंघोळी घातल्या. पहिल्याला तर जरा जास्तच. ते सर्व करणं म्हणजे एक सोहळाच असायचा. आजी-आजोबा, आई-बाबा सर्व त्यात गुंतलेले, मुलाचं हसणं, कधी पेंगण, कधी रडणं, भोकाड पसरुन रडणं, पुढे जरा मोठी झाल्यावर बाथटब मध्ये मजा करत अंघोळ करणं सर्व एंजॉय केलं. अगदी सुट्टीत भारतात आजीकडून आग्रहाने अंघोळ करुन घेतात. तेव्हाचं ते त्यांचं अंघोळीच्या वेळी मस्ती करणं, दोन्ही हातानी पाणी उडवण्य़ाचा त्याचा खेळ, तो निरागस चेहरा किती सुखकारक असतं ना? वाटतं, रोज आंघोळ करताना आपलं निरागसपण, तो आनंद आणि ते सुखद बालपण या पाण्याबरोबर हळूहळू धुवून जात असेल काय?  
       आज केवळ आंघोळीमुळे लिहिण्याची इच्छा झाली इतक्या दिवसांनी. पुन्हा कधी लिहिणं होईल माहित नाही, निदान तोवर हे तरी. :) 

-विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, January 07, 2018

कॅलेंडर

         पंधरा दिवसांपूर्वी एक मैत्रीण भारतात चालली होती,म्हणाली काही हवं असेल तर सांग आणते. खरंतर पूर्वी अशी खूप मोठी यादी असे आणायची, पण हळूहळू ती यादी छोटी होत गेली. आता फक्त गरजेची वस्तू असेल तरच आणायला सांगते कुणाला. आधी म्हणाले, नाहीये काही विशेष. दुसऱ्या दिवशी आठवण झाली, म्हटलं, "अगं, कॅलेंडर घेऊन येशील का? तेही कालनिर्णय, मराठीच हां!". ती जाणार होती बँगलोरला, त्यामुळे उगाच हिंदी वगैरे काही नको होतं. नव्या वर्षाच्या ऑफिसच्या पहिल्याच दिवशी ती घेऊन आली होती. 
           मी आजकाल अशा जास्त अपेक्षा ठेवत नाही. उगाच कुणी विसरलं, किंवा नाही मिळालं, नाही वेळ झाला, अशी अनेक कारणं असू शकतात. पण, तिने एका दिवसाच्या मुंबई ट्रीपमध्ये ते आठवणीने घेतलं आणि घेऊनही आली. खूप मस्त वाटलं, तिने आठवणीने आणलं याबद्दल. संध्याकाळी नवऱ्याला सांगितलं,"बरं झालं ना वेळेत मिळालं.". तो म्हणे,"मिळतं इथे पण." म्हटलं,"मला मराठी कालनिर्णयच हवं होतं.". त्यावर त्याने पुढे युक्तिवाद केला, की प्रिंटआउट काढली असती. ऑनलाईन मिळतं सर्व.". 
           या अशा कारणांनी अजिबात काही फरक पडत नव्हता मला. मला, मूळ प्रतीचं छापील कॅलेंडरच हवं होतं. आता याला हट्ट म्हणा किंवा आणि काही. पण त्या कॅलेंडरने घराला एक शोभा येते असं मला वाटतं. किचनच्या त्या कोपऱ्यातल्या भिंतीवर तेव्हढ्याच तुकड्यात ते बरोबर बसतं. ते तिथं असण्याची इतकी सवय झालेली आहे की तिथे दुसरं काही आवडलंही नसतं. घरी ती सुरळी आली की नवऱ्याने आवर्जून लावून त्याला खाली पेपर क्लिप लावल्या, म्हणजे सरळ होईल ना. :) किती बारीक सारीक गोष्टी असतात ना? 
          पूर्वी नवीन कॅलेंडर आलं की त्याचंही अप्रूप असायचं. कॅलेंडरची कुणी जाहिरात करु शकतं? यावर आता विश्वास बसणार नाही, पण दूरदूर्शन वर रेणुका शहाणेची तीन-चार भाषांमध्ये कालनिर्णयची जाहिरात यायची, ती आजही पाठ आहे. :) जाहिरात ती पाहिली तरीही, प्रत्येक घरात वेगळं कॅलेंडर असतं, म्हणजे आईकडे नेहमी भाग्योदय असतं तर सासरी दुसरं.ते त्यांचं पूर्वीपासून चालत आलेलं. आईकडे तर अनेक वर्षांची जुनी कॅलेंडर ठेवलेली आहेत. आता ती पाहायला कसं वाटेल? एकदा बघायला लागतील. मलाही माझ्याकडची सर्व मराठी कॅलेंडर अशीच जपून ठेवायची खूप इच्छा आहे, अशीच, आठवण म्हणून. :) 
        मी लहानपणी अगदी कॉलेजपर्यंत, कॅलेंडर आलं की,आपला वाढदिवस, दिवाळी, सर्व सुट्ट्या कधी येतात ये बघून घ्यायचे. महिना पालटला की त्या महिन्यातल्या शुभ-अशुभ दिवसांची यादीही पाहिली जायची. मागच्या पानावर आपल्या राशीसाठी हा महिना कसा जाणार हे पाहायचे. परीक्षा असेल तर अजूनच काळजी त्या भविष्याची. :) एखादी रेसिपी, एखादा लेख किंवा सणासुदिच्या दिवसांत एखादी पुराणातली कथा असेल तर ती वाचायचे. आई दादा अजूनहीकॅलेंडर घेऊन बसतात एखादं काम पार पाडायचं असेल तर, कुठे जायचं असेल, काही काम असेल तर. दुधाचं बिल, पेपर बिल, फोन नंबर अशा अनेक गोष्टी त्या कॅलेंडरवर यायच्या किंवा अजूनही येतात. 
        आमचा सध्याचा भारतीय कॅलेंडरचा वापर त्यामानाने कमीच. एकतर अमेरिकेतल्या सुट्ट्या निराळ्या, त्यात उपवास नाहीत त्यामुळे तसं फार काही पाहिलं जात नाही. शिवाय आजकाल वर्ष सुरु व्हायच्या आधीच व्हॅट्सऍपवर पुढच्या वर्षी कुठल्या सुट्ट्या कधी येत आहेत आणि मोठा वीकेंड कधी मिळेल याची मिळून जाते. ऑफिसचं कॅलेंडर तर बोलायलाच नको. रोज सकाळी किंवा आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशीच्या मिटिंग कोणत्या हे पाहून घेतलं जातं. वाढदिवस, ट्रिप, भारतवारी प्लॅन करण्यासाठी महिनोंमहिने सर्व आधी ठरवलं जातं. मुलांची कॅलेंडर अजून वेगळी. रोज कुणाचा कुठला किती वाजता क्लास, कुणाची पार्टी कधी किती वाजता कुठे हे सर्व कुठे ना कुठे ठेवावं लागतं, त्यामुळे त्यांचं कॅलेंडर वेगळं. 
         या सगळ्या भरगच्च कार्यक्रमांसाठी, धावत्या जगासाठी आपलं ते छापील मराठी कॅलेंडर कुठे पुरणार? तरीही ते घरात असणं एक घराचा भाग झालेला आहे. मोठे सण, त्यांची तारिख वार, मुहूर्त अजूनही पाहिलं जातंच. थोड्या दिवसांपूर्वी मुलाने त्यातले मराठी अंक बघून ते कसे म्हणायचे हे विचारलं, इतकं मस्त वाटलं. निदान मराठी अंक आणि अक्षरं शिकवण्यासाठी त्याचा उपयोग नक्की होईल असं वाटलं. दरवर्षी कुणी ना कुणी आठवणीने कॅलेंडर आणून द्यायचं. या वेळी विसरले म्हणून हुरहूर वाटत होती. यावर्षीही ते वेळेत मिळालं आणि त्याच्या ठरलेल्या जागेवर लावता आलं हाही आनंद नसे थोडका. 

      तुमचंही असेलच असं एखादं ठराविक कॅलेंडर, तुमच्याही असतील अश्याच काही भावना अजूनही गुंतलेल्या, होय ना? 

विद्या भुतकर.