Thursday, June 29, 2017

हुरहूर

       हुरहूर, किती खास शब्द आहे ना? इंग्रजी किंवा इतर कुठल्या भाषेत ती भावना व्यक्त करणारा असा शब्द असेल तरी का नाही अशी शंका वाटते. इतका योग्य शब्द आहे एका ठराविक मनस्थितीसाठी तो. तो नुसता लिहून चालत नाही, अनुभवायलाच हवा. आणि माझ्यासारखा सर्वांनाच त्याचा अनुभव येतंही असेल. 
      परवा पहाटे ४ वाजेपर्यंत जागून मित्राच्या घरी सर्वांसोबत गप्पा मारल्या, दंगा घातला आणि नाईलाजाने पहाटेच ड्राईव्ह करून घरी परतलो. अवघी दोनेक तासांची झोप घेऊन पुन्हा ऑफिसलाही गेले. तर झालं असं होतं, वीकेंडला जवळचे जुने मित्र सहकुटुंब शहरात आले होते आणि आमच्याच एका मित्राकडे राहात होते. त्यांच्यासोबत फिरायला जाणं, घरी बोलावणं, गप्पा, पॉट दुखेपर्यंत हसणं, सगळं केलं. जेवायचं काय, मुलांचं काय याच्या पलीकडे जाऊन मजा चालू होती. त्या सर्वांना सोडून जेव्हा घरी आलो तेव्हा जड मनाने दोघं गाडीत बसलो. गेले तीन दिवस कसे गेले होते कळलंच नाही. संध्याकाळी घरी परतूनही पहिले काही मिनिटं जरा शांततेतच गेले. We were already missing them.
     
       हळूहळू सर्वजण आपापल्या घरी सुखरूप पोचले. सर्वांची कामं पुन्हा सुरु झाली. आम्हीही, मी आणि संदीप घरातल्या मागे पडलेल्या कामांबद्दल, आराम करण्याबद्दल बोललो. दोन दिवसातले फोटोही पुन्हा पाहून झाले. त्यावर व्हाट्स अँप वर बोलून झालं. सगळं नेहमीसारखं असूनही पुढचे दोन दिवस अजून शांततेत गेले. तसं हे नेहमीचंच. एखाद्या चांगल्या मित्राची, मैत्रिणीची एक दिवसाची भेट असो की ४-५ दिवसांची ट्रीप. मित्र-मैत्रिणींना भेटल्यावर सर्व विसरून रमून गेलेले आम्ही परतीच्या प्रवासात जणू गेल्या दिवसांचा आढावा घेत राहतो. काहीतरी विषय काढून मन रमवण्याचा प्रयत्न करतो पण तोही व्यर्थ ठरतो. 
     
       एखाद्या ट्रीपला गेल्यावर विसरलेल्या घराचीही ओढ लागायला लागते. पण त्या ओढीतही कसली तरी हुरहूर असते. कदाचित 'परत तेच रुटीन' असा नकोसा वाटणारा विचार असेल किंवा आता त्याच लोकांना परत कधी भेटणार याची हुरहूर? की चला इतके दिवस धावपळ करून केलेली ही ट्रिप संपली, तीही सुरक्षितपणे आणि आता धावपळ नाही याचं समाधान? नक्की काय असतं माहीत नाही पण गाडीत बसल्यावर म्हणा किंवा परतीच्या प्रवासाला लागल्यावर म्हणा, ती पहिली पाच मिनिटं दोघंही शांत असतो. एकेक विचार मनातल्या मनात करत आणि गेलेले क्षण डॊक्यात बंद करत. आमच्या घरी तर आई-दादा दोघंच, ते किती गोष्टींचा असा विचार करत असतील नाही? असो.
   
     बरं हे ट्रिपचच असं नाही. इकडे असताना माझे आई-वडील, सासू सासरे राहून भारतात परत गेले की एअरपोर्टपासूनच एक प्रकारची उदासी मनावर यायला लागलेली असते. घरी येऊन सगळं आवरायचं पडलेलं असतं. ते मुकाट्याने करत राहतो, पण तेही यंत्रवत. किंवा भारतातून परत येताना अख्खा प्रवास आणि घरी येऊनही मनावर असलेलं उदासीचं सावट.

      तीच गोष्ट एखाद्या कार्यक्रमाचीही. एखादा मोठा साजरा केलेला वाढदिवस किंवा कार्यक्रम पार पडला की सर्व पाहुणे निघून गेलेले असतात. एखा-दुसरा जवळचा माणूस मागे थांबलेला असतो, मदतीसाठी.
घरातलं आवरत आवरत आम्ही बोलत राहतो,' तरी बरेच लोक आले, नाही? ५०-६० तरी असतील.'
मग कुणी म्हणतं,' बरं झालं सर्वांनी मदत केली ते, नाहीतर सफाई करून वेळेत हॉल परत देणं अवघड होतं'.
तर एकजण, 'सही झाला बरंका आजचा कार्यक्रम.'.

      तर कार्यक्रम संपल्यावर मागे राहिलेल्या लोकांच्या तोंडून बाहेर पडणारी ही नेहमीची वाक्य. त्यात सर्व नीट झालं याचं समाधान असतं पण एक प्रकारची हुरहूरही. 
      या सगळ्या तर अगदीच छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. विचार करा लग्न घरात कसं होतं ते. विशेषत: मुलीकडे. वर्र्हाड गेल्यावर एका कार्यालयच्या कुठल्यातरी एका खोलीत त्या पांढऱ्या गादय़ांवर पडलेल्या अक्षता, फुलांच्या पाकळ्या, आणि आहेराचं आलेलं सामान, त्यासर्वांच्या मधे सर्व मंडळी बसलेली असतात. त्यात जरा जास्त चांगली नटलेली पण रडण्याने डॊळे सुजलेली ती मुलीची आई कुणाशी तरी बोलत असते, 'बाळ ने काही खाल्लं की नाही?'
तर हा 'बाळ' त्या लग्नात अगदी सर्व कामे पार पाडणारा मुलीचा कष्टकरी भाऊ असतो. त्याला कुणीतरी ताट लावून देतं. मग जेवता-जेवताच तो लोकांना काय-काय कसं आवरायचं, कार्यालय कधी सोडायचं, फुलं वाल्याला किती पैसे द्यायचे हे सांगत असतो.आणि मधेच एखादी मामी/ काकू बोलते, 'तो सूट मधे आलेला माणूस कोणं होता ओ?, त्याची बायकॊ पण अगदी भारी साडी नेसून आली होती'.
कुणाला आहेर चांगला झाला की नाही यावर बोलायचं असतं तर कुणाला मुलाच्या खडूस, भांडखोर काकाबद्दल.
एखादा मामा मधेच बोलतो,'त्या मुलाचा काका जेवताना नाटकच करायला लागला होता. त्याला म्हणे जिलेबी हवी होती आणि कुणी पटकन आणली नाही. बरं झालं शेवटी शांतपणे निस्तरलं. माझं डॊकंच फिरलं होतं. कुणा-कुणाचं बघायचं इथे?'.
तर अशा शंभर गोष्टी. गप्पा मारत-मारत तास-दोन तास कधीच निघून जातात. आणि शे-पाचशे लोकांनी भरलेलं कार्यालय एकदम भकास झालेलं असतं. आता घरी जाऊन बरीच कामंही निस्तरायची असतात त्यांची आठवण यायला लागते. सगळ्या गोंधळात का होईना शेवटी लग्न छान झालं ना याचं, तर कधी, पोरगी चांगल्या घरात गेली हो! याचं समाधान मनात असतं.सगळं झाल्यावरही, पोरीचा घरी पोचल्यावर फोन येईल ना याची हुरहूर असतेच...

बऱ्याच दिवसांनी अशीच हुरहूर मनात दाटून आली सर्व जुन्या मित्रांना भेटून. कदाचित इथे लिहून तरी थोडी कमी होते का बघते. त्यासाठी एकच उपाय असतो पुन्हा एकदा रोजच्या कामात गुंतून जाणं. मग त्यात इथे लिहिणंही आलंच. :)

-विद्या भुतकर.

Tuesday, June 27, 2017

तुलना......स्वतःची स्वतःशी

       या वर्षीच्या ठरवलेल्या ३ रेसपैकी दुसरी रेस रविवारी झाली. १० किलोमीटरची रेस होती. बऱ्यापैकी सराव झाल्यामुळे तसे रेसचे टेन्शन नव्हते. मुलांचीही सोय घरीच झाल्याने सकाळी जास्त लवकरही उठायचे नव्हते. एकूण नेहमीपेक्षा थोडे निवांतच होतो. मला वाटते एखाद्या गोष्टीचा नीट सराव झाला किंवा ती अंगवळणी पडली की त्यांचं विशेष काही वाटत नाही. तसंच काहीसं झालं होतं. अशावेळी त्यात एकसुरेपणा येऊ शकतो. किंवा कधी कंटाळाही येऊ शकतो. 
       तर यावेळी रेसमध्ये मला माझ्या आधीच्या वेळेपेक्षा कमी वेळात ही रेस पूर्ण करायची होती. अगदी सराव करतानाही मी अनेकवेळा आधीच्या वेळेपेक्षा कमी वेळात ती पूर्ण केली होती. पण माझे १ तास १५ मिनिटांचे एक जुने पर्सनल रेकॉर्ड होते जे काही पार होते नव्हते. तर या रेसला जिद्दीने ते पूर्ण करायचं ठरवलं आणि झालंही. १० किमीची रेस १ तास ११ मिनिटांत पूर्ण केली. अर्थात ती १ तास १० मिनिटांत व्हायला हवी होती. :) पण सांगण्याचा मुद्दा असा की एखादे टार्गेट पूर्ण केले तरी त्याच कामात आपण नवीन ध्येय ठेवून ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि त्यानेच ते काम अजून जास्त आवडीचे होऊ शकते. 
       अनेकवेळा अनेक मैत्रिणींना मी आग्रह करत असते काहीतरी व्यायाम सुरु करण्याचा. पण काही ना काही कारण ऐकायला मिळतेच. 'तुझ्याइतके आम्हाला जमणार नाही' वगैरेही सांगितलं जातं. तर माझं म्हणणं असतं की प्रत्येक गोष्टीची सुरुवात कुठून तरी होते. जोवर आपण करत आहोत त्या कामात प्रगती आहे तोवर बाकी लोकांचा किंवा मोठ्या टार्गेटचा विचार करायची गरजच नाही. एखादं जवळचं टार्गेट ठेवायचं. म्हणजे उदा: दिवसातून फक्त १५ मिनिटंच काहीतरी व्यायाम करायचा. किंवा आठवड्यातून तीनच दिवस १५-२० मिनिट चालायचं. याने काय होतं की कारण सांगण्यापेक्षा कुठून तरी सुरुवात होते. सुरुवात झाली की मग टारगेट बदलायचं. माझीही सुरुवात अशीच छोट्या टारगेटने झाली होती जिथून आता बरेच पुढे आले आहे. 
       आज सकाळी ऑफिसमध्येअजून एका पळणाऱ्या मैत्रिणीशी बोलत होते. तर ती म्हणाली,"मला यावेळी अजून फास्ट पळायचे होते." म्हटले किती? तर म्हणाली,"४५ मिनिटांत पूर्ण केली मी रेस ! मला केव्हापासून करायची होती इतकया फास्ट, शेवटी झाली एकदाची. ". तेव्हा माझ्या लक्षात आले की हे एक न संपणारं काम आहे. माझ्यापेक्षा, संदीपपेक्षाही जोरात पळणाऱ्या तिलाही काहीतरी अजून जास्त करायचं होतंच. मी माझी तुलना तिच्याशी करू शकत नाही. पण स्वतःची स्वतःशी तरी करू शकते? तेच प्रत्येकाने करावं असं वाटतं. आज आपण शून्य मिनिट व्यायाम करत असू तर ५ मिनिटानी सुरुवात करावी आणि पुढे ते वाढवत न्यावं. पण 'मला तिच्यासारखं ४५ मिनिटांत जमणारच नाही' म्हणून सोडून देण्यात काही अर्थ नाही. तर तुम्हीही जरुर करून पहा हा प्रयोग. 

विद्या भुतकर.  

Thursday, June 22, 2017

मनाचे खेळ- भाग २

आरती घरी आली तरी डोक्यातून विचार जातंच नव्हते. 
आल्या आल्या अमितने विचारलंच,"काय गं इतका उशीर झाला आज?". 

"अरे ते क्वार्टरली रिपोर्ट रिव्ह्यू चालू आहे ना म्हणून. अमु कुठेय?" तिने स्वतःला सावरत विचारलं. 

"झोपली ती मघाशी. "

"काय अरे शी. इतका उशीर झाला. सॉरी."

"इट्स ओके. झालंय तिचं नीट जेवण, होमवर्क. चल जेवून घेऊ.", म्हणत त्याने दोघांचं ताट वाढून घेतलं. 
तिचं जेवणात लक्षही नव्हतंच. कसंबसं जेवण उरकून तिने पुन्हा लॅपटॉप सुरु केला. 
अमितच्या चेहऱ्यावर जरा आठ्या पडल्याच. 

"इतक्या उशिरा येऊनही अजून काम आहेच?", त्याने विचारलं. 

"ह्म्म्म अरे जरा चेक करायचे आहे. थोडा वेळ बसते. तू काय करणार आहेस? जागा आहेस का झोपतोयस?" तिने विचारलं. 

"आहे मी जागा, बैस जरा वेळ." म्हणत त्याने टीव्ही सुरु केला. 

टीव्हीच्या आवाजात लक्ष लागेना म्हणून बेडरूममध्ये जाऊन बसली. घोळ छोटा नव्हता. लाखो रुपयांचा होता. आणि तोही फक्त ३ महिन्यातला. म्हणजे याच्या आधी किती असेल काय माहित? तिने तीही माहिती काढायचा प्रयत्न केला. पण मागच्या क्वार्टरची माहित तिला मिळत नव्हती. अमित आत येऊन तिच्याकडे पाहून तिच्याशेजारी बसला. 

"काय झालं सांगशील का? किती टेन्शन मध्ये आहेस? सगळं ठीक आहे ना?" त्याने काळजीने विचारलं. 

"अरे मी हे मनोजचे रिपोर्ट चेक करत होते."....मनोज म्हटल्यावर त्याचा चेहरा थोडा उरतलाच होता. ती पुढे बोलू लागली. 

".....तर त्यात काहीतरी घोळ वाटतोय. तू बसतोस का जरा शेजारी? एकदा टॅली करून बघू." 
त्याने मग तिला मदत केली बराच वेळ आणि नक्की किती रुपयांचा घोळ आहे तेही दोघांनी लिहून काढलं. 
त्याने कॉफी बनवली. बाहेर कॉफी घेत दोघेही विचार करत बसले होते. 

"मी तुला सांगतो मला हा मनोज कधी पटलाच नाही. एकतर नको इतका आगाऊ वाटतो मला तो." अमितने विषय काढला. तिला बोलायचे त्राण नव्हतेच. तो बोलत राहिला. 

"तू इतकी मारामारी करतेस रेव्हेन्यू साठी, नवीन क्लाएंट मिळवण्यासाठी हे मी पाहिलंय. हा बाबा आपला नेहमी पुढे असतोच, शिवाय बाकी ऐश चालूच असते त्याची. काहीतरी घोळ घालतच असणार आहे. नाहीतर तू सांग एकट्याच्या पगारात इतकं भागतं का?", त्याच्या या प्रश्नावर तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. तिने कधी विचारच केला नव्हता मनोज असं करू शकतो. एखाद्या गोष्टीत कामचुकारपणा करणे वेगळं आणि हे असे घोटाळे वेगळे. आपला मित्र, एकेकाळी आवडणारा व्यक्ती असा असू शकतो? ती विचार करत होती. 

"तुला सांगतो आरती, मला तर शंका आहे त्याच्या मनातून तू अजूनही गेली नाहीयेस. मी पाहतो ना कसा तुझ्याकडे पाहतो तो." त्याने पुढे बोलणं चालूच ठेवलं. 

"हे बघ आता या विषयावर बोलायलाच हवं का? आमच्यात काही नाहीये हे तुला सांगायची मला गरज वाटत नाही. उगाच कशाला तिकडे जायचं परत?", तिने वैतागून विचारलं. 

"तसं नाही ग. माझं म्हणणंय की त्याला वाटत असेल तुही त्याची मैत्रीण आहेस तर या अशा चुका कुणाला सांगणार नाहीस. नाहीतर त्याने तुला हे असं एकटं सोडलंच नसतं. तुला सांगतोय तू आपलं रिपोर्ट करून टाक. उद्या काही बाहेर आलं तर त्याला मदत केली म्हणून तुही आत जाशील." हे मात्र त्याचं म्हणणं बरोबर होतं. 

आपण आताही विचार करतच आहे की त्याला रिपोर्ट कसं करणार याचा? उद्या त्याला साथ दिली म्हणून मलाही बाहेर काढतीलच की. झोपायला गेलं तरी विचार कमी होत नव्हते. ती तशीच बेडवर पडून राहिली. कधीतरी तिची झोप लागून गेली. 
----------------------------------------

सकाळी ती लवकर आवरून निघाली. गेल्या गेल्याच तिने मनोजला कॉन्फरन्स रूममध्ये बोलावून घेतलं. त्याच्यासमोर तिने सर्व हिशोब मांडला आणि जाबही विचारला. 

"असं कसं करू शकतोस मनोज तू? तुला माहित आहे कंपनी पॉलिसी. जेल होईल तुला क्लाएंटला असं खोटं बिल केल्याबद्दल. तुझ्याकडून अशी अजिबात अपेक्षा नव्हती. एखादी चूक समजू शकतो पण हा तर घोटाळा आहे मोठा.", आरती. 

मनोजला काय बोलायचं कळत नव्हतं. चोरी पकडली गेली होती. ती त्याच्याकडे आली म्हणजे अजून बॉसकडे गेली नाहीये इतकं नक्की होतं. 

"आरती सॉरी चूक झाली."

"चूक?सॉरी? हे या सगळ्याच्या पलीकडे आहे. चूक म्हणजे एखादी एंट्री तू विसरून गेलास तर. पण हे तरी फसवणूक आहे क्लाएंटची. उद्या त्यांना आणि बाकी क्लाएंटला कळलं तर कंपनी बुडीत जाईल. मला तर कळत नाहीये काय करायचं?"

"म्हणजे? हे बघ मी तुला माझा शब्द देतो यापुढे नाही असं होणार. हा क्वार्टर माफ कर प्लिज."

"हा क्वार्टर म्हणजे? या आधी केलं असशील तर? आज केलं म्हणजे कालही केलं असणारच ना? तू हे सॉरी कशाला म्हणतोयस? तुला माहित आहे तुला रिपोर्ट केलं नाही तर माझी नोकरीही जाऊ शकते."

"हो मान्य आहे मला. मी कुठे म्हणतोय उद्या हे असं होईल. प्लिज यावेळी सोडून दे, पुढच्या वेळी असं होणार नाही, मी शब्द देतो तुला."

"हे बघ मी आता काहीच सांगू शकत नाहीये. तू सुटलास असं तर अजिबात समजू नकोस. मला मिटिंग आहेत आता, दुपारी बोलते." असं म्हणून आरती पुन्हा डेस्कवर गेली. 
दुपारी जेवायच्या वेळी मनोज स्वतःच तिला घेऊन कॅंटीनमध्ये गेला. कितीतरी वेळ ती गप्पच होती. शेवटी तिने न राहवून विचारलं,"का असं केलंस? काय गरज काय होती?"

"आता तू गरज म्हणतेस पण त्या क्षणाला फ्रस्टेटेड होतो. वेगवेगळ्या नव्या क्लाएंटशी बोलूनही नवीन बिझनेस येत नव्हता. आता नवीन नाही आला तर निदान जुन्या क्लाएंटचं बिलिंग तरी तेव्हढं राहायला पाहिजे ना? तेही कमीच होत आहे. म्हटलं असतो एखादा  क्वार्टर. पुढच्या क्वार्टरला करू काहीतरी. आता हे क्वार्टर प्रमोशन्स पण आहेत. सगळंच एकदम आलंय. पुढच्या क्वार्टरमध्ये करतो ना काहीतरी. नाही मिळालं काही तर नाही दाखवणार. मला वाटलं नव्हतं इतकं वाढेल प्रकरण. आता मला काही तुला अडकवायचं नव्हतं. बॉसने तुला करायला दिलं रिव्ह्यू तर मी काय करू? तुला योग्य वाटेल ते कर. पण उगाच तुला त्रास नको माझ्यामुळे. " त्याचं बोलणं ऐकून ती जरा शांत झाली. 

"जाऊ दे अमु काय म्हणतेय? कशी आहे?" त्याने विषय  बदलला. 

"ठीक आहे. काल रात्री उशीर झाला तर झोपून गेली होती." तिने सांगितलं. 

"हां जरा जास्तच उशीर झाला माझ्यामुळे. सॉरी. ",मनोज. 

"इट्स ओके. अमितने केलं होतं सर्व. ती झोपली होती. जेवणही त्यानेच वाढलं काल मलाही.", तिने अमितचं कौतुक केलं तसा त्याचा चेहरा थोडा मावळला. 

"चांगलं आहे तुला मदत आहे घरी. मला काही जमत नाही बाबा यातलं." त्याने प्रकरण स्वतःवर ओढवून घेतलं. 

थोडा विचार करून त्याने पुढे तिला विचारलं,"आरती मला एक सांग, काल माझ्या प्रोजेक्टबद्दल काही बोललीस का त्याला तू?"

"हो आधी सांगितलं नव्हतं. पण त्याला माहित होतं तुझा रिव्ह्यू करतेय ते. मी बराच वेळ बसले तेव्हा काय झालं म्हणून विचारलं. त्यामुळे सांगितलं." आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण आपण त्याला का देतोय हे तिला कळत नव्हतं आणि चोरी तिने थोडीच केली होती?

"कशाला सांगितलंस उगाच? तू पण ना?", त्याने विचारलं. 

"अरे पण त्याला सांगणारच ना? रात्री १-२ वाजेपर्यंत बसून काम करत होते तेही टेन्शनमध्ये." ती बोलली. 

"तसं नाही. तुला सांगू का? मला वाटतं तो अजूनही माझ्याकडे शंकेनेच बघतो.", मनोज बोलला. 

"कसली शंका?", ती. 

"कसली म्हणजे? हेच की आपलं अफेअर आहे की काय अशी?",त्याने अडखळत सांगितलं. 
"अरे असं काही नाहीये. उगाच फालतू शंका आणू नकोस." ती बोलली. 

"हे बघ मला माहितेय तो माझ्याकडे कसा पाहतो ते. त्यात तू रात्री माझ्यासोबत इतका उशीर थांब्लीस. "

"हे बघ उगाच फालतू शंका मनात आणू नकोस. मनाने खूप चांगला आहे तो. त्याच्यामुळेच मी आज इतक्या पुढे जाऊ शकलेय." 

"ते असेल गं. पण एका पुरुषाचा स्वभाव तू बदलू शकत नाहीस. निदान या बाबतीत तरी. जाऊ दे तुला नाही कळणार. पण एक सांगू. आपल्या दोघांचं नातं अमित किंवा रुचापेक्षा कितीतरी जुनं आहे. त्यामुळे तो किंवा ती काय म्हणते याने आपल्या नात्यात फरक पडू देत नाही. तूही तो पडू देऊ नकोस. किती वर्ष झाली आपण ओळखतोय एकमेकांना?"

तिने पुन्हा गणित केलं. 

"किती बावळट होतो ना आपण जॉईन झालो तेंव्हा?"तिला आठवून हसू आलं. 

"आता ही नवीन पोरं नोकरीला लागली की मला आपलीच आठवण होते. किती सुखाचे दिवस होते ते...." आरती पुन्हा एकदा भूतकाळात रमली होती. 
फोनवरच्या रिमांईंडरने तिची तंद्री भंगली. 

"चल जाते मी मिटिंग आहे बॉसबरोबर", तिने घाईने जेवण उरकलं आणि मीटिंगला गेली. 
मनोजशी बोलताना पुन्हा एकदा तिला हलकं वाटू लागलं होतं. अर्थात काय करायचं हा प्रश्न अजूनही होताच. 
----------------------------------

बॉससोबत बाकी चर्चा झाल्या पण हा विषय कसा काढायचा तिला कळत नव्हतं. 
शेवटी तिने विचारलं, "सर ते रिव्ह्यू चं काम कधी करू कळत नाहीये. बराच बॅकलॉग राहिलाय माझाच. यावेळी दुसऱ्या कुणाला जमणार नाही का?"

"ओह मला वाटलं तुला असेल वेळ. सॉरी. उलट मागच्या वेळी भेटलो तर मनोजच म्हणाला, बाकी सर्व बिझी आहेत आरतीला आहे थोडा वेळ म्हणून........" 

कितीतरी वेळ मनात अडकलेल्या तिच्या प्रश्नाचं उत्तर बॉसने दिलं होतं. संध्याकाळी ती पुन्हा बॉसकडे जाऊन आली होती, रिपोर्ट करायला. 

मनोजशी ती एकच वाक्य बोलली होती,"तू मला गृहीत धरायला नको होतंस". 

समाप्त. 

विद्या भुतकर. 

Wednesday, June 21, 2017

मनाचे खेळ - भाग १

कॉन्फरन्स रूममधून जोरजोरात हसण्याचा आवाज येत होता. आरती आणि मनोज सध्या तिच्या टीमसाठी काही जणांचे इंटरव्यू घेत होते.

ती बोलत होती,"'अरे मॅगी करता येतं का?' हा काय प्रश्न आहे का कॅन्डीडेटला विचारायचा?".

"अगं पण तो बघ की? म्हणे माझा व्हिसा आहे तर ऑनसाईट कधी जायला मिळेल? इथे नोकरीचा पत्ता नाही अजून आणि डायरेकट ऑनसाईट? मग म्हटलं विचारावं तिथे जाऊन जेवण बनवता येईल की नाही ते. बरोबर ना? निदान सर्व्हायव्हल स्किल्स तरी पाहिजेत का नको?", मनोज. 

"बिचारा किती विचार करत होता काय सांगायचं म्हणून. मग एनीवे हा पण नको का?", आरतीने विचारलं. 

"हो कटाप. बघू पुढचं कोण आहे?", मनोजचा निर्णय झाला होता. 

"नेहा नाव आहे. ७-८ वर्षाच्या अनुभव आहे असं लिहिलंय.",आरती. 

"वा चला. नेहा म्हणजे कशी एकदम सिन्सियर वाटते.", मनोज नाव ऐकून खुश झाला होता. 

"हो का? मुली म्हटलं की म्हणणारच तू. त्या पोराला इतका पिडलास. आता या मुलीला न विचारताच घेशील. बरोबर ना?", तिने विचारलं. 

"हे बघ आरती, तुला खरं सांगतो. तुम्ही सगळ्या मुली ना खरंच सिन्सियर असता कामामध्ये. आता तूच बघ ना? किती सिरियसली काम करतेस? म्हणजे निदान माझ्यापेक्षा तरी जास्तच.", मनोजने हे मात्र याच्या आधीही तिला अनेकदा सांगितलं होतं. आणि खरंच त्याच्या प्रोजेक्टमध्ये बाकीच्या तुलनेत मुली जास्त होत्याही. 

"काय करणार? करावं लागतं बाबा. आम्हाला रात्री बॉस बरोबर पार्ट्याना जाणं जमत नाही ना? मग त्याची भरपाई अशी करावी लागते.", तिची दुखरी नस होती ती. 

"हे बघ आता तू टोमणे मारू नकोस हां.",मनोज बोलला. 

"टोमणा काय? खरंच आहे की नाही? मीच नाही, मॅनेजमेंट मध्ये यायचं म्हटलं की आम्हाला जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतात.",ती. 

"ह्म्म्म मी काय करू सांग मग? उलट मी तर तयार असतो मुलींना प्रोजेक्ट मध्ये घ्यायला. एकदम व्यवस्थित काम करतात. उलट ती पोरं माझ्यासारखी कामचुकार असतात.", त्याने हार मानली. 

"जाऊ दे. चल नेहा बघू कशी आहे ते." म्हणत आरतीने तिला फोन लावला.

इंटरव्यू संपले. दोन चार कँडिडेट निवडून त्यांनी आजचं काम उरकलं होतं. ते बाहेर पडताना पाहून आजूबाजूच्या दोन-चार लोकांनी खुसपूस केली होतीच.

     आरती आणि मनोज याच कंपनीत गेले १७-१८ वर्षे काम करत होते. दोघे एकाच वेळी कंपनीत  नोकरीला लागले होते. इतक्या वर्षात दोघेही वेगवेगळ्या नात्यातून, अनुभवातून आणि भावनिक गुंतवणुकीतून गेले होते. सुरुवातीला मैत्री, मग प्रेम, ब्रेक-अप, राग, द्वेष आणि दोघांची लग्नं (आपापल्या पार्टनरशी) अशा अनेक तुकड्यातून ते फिरून आले होते. आता आयुष्याच्या या टप्प्यावर झालं ते सर्व मागे टाकून जवळचे मित्र आणि ऑफिसमध्ये सिनियर म्हणून वागू शकत होते. अर्थात या सगळ्याचा इतिहास लोकांना सांगायची, स्पष्टीकरण द्यायची गरजही त्यांना वाटत नव्हती. नोकरीत ठराविक एका पदावर पोचल्यावर त्यांना एकटेपण जाणवत होतं. त्यात एकमेकांची सोबत कामी येत होती. अगदी दुपारी जेवायलाही दोघेच सोबत असत.
       त्यादिवशी दुपारीही दोघे जेवायला बसले अन त्यांचं बोलणं सुरु झालं.

"काय गं डबा कुठे आहे? " त्याने विचारलं.

"रात्री खूप वेळ गेला कामात मग बाहेरच जेवलो आम्ही. त्यामुळे आजचा सकाळचा डबाही नाहीच. तुझं बरंय रे. बायको अगदी चार कप्प्यांचा डबा भरून देते."

"ह्म्म्म म्हणूनच हे पोट असं सुटलंय."

"पण काय रे? जरा मदत करत जा की बायकोला? किती वर्ष असा लहान पोरासारखा सांभाळणार बायको तुला?"

"हे बघ आता उगाच परत तेच लेक्चर नको देऊस. माहितेय तुझा नवरा खूप मदत करतो ते."

"हो, करतो बिचारा. म्हणून तर आज इतकं सगळं करू शकतेय. नाहीतर बसले असते घरी....."
त्याने वर बघून वाक्य पूर्ण केलं,"माझ्या बायकोसारखी. बरोबर ना?"

"हे बघ आता उगाच तू माझ्या बोलण्याचा अर्थ काढत बसू नकोस. पण तुलाही माहितेय की एकट्याच्या जीवावर सर्व जमत नाही. दोघांनी केलं तरच होतं करियर, निदान बायकांचं तरी. जाऊ दे ना. तू जेव. बघ उलट नशीब समज मी तुला नाही म्हटलं. नाहीतर आयुष्यभर ऐकावं लागलं असतं माझं आणि हे कँटीनचं जेवण. "
त्यावर मनोज कसंबसं हसला. कितीतरी वेळा बोलणं या मुद्द्यावर येऊन बंद पडायचं. 

पुढचे पाच मिनिट शांतता होती. एकदम आठवून मनोज म्हणाला,"ते राजीवने क्वार्टरली रिपोर्ट रिव्ह्यू करायला सांगितले आहेत. संध्याकाळी बसशील का जरा वेळ?"

"हां माझे त्यांनी त्या रेड्डीला दिले आहेत. तो अजून चुका काढत बसेल. बरंय तुझं, तू सुटतोस नेहमीच."

"म्हणजे? मी काय चुका करतो का? तुला सांभाळाव्या लागतात ते?"

"तसं नाही, पण फरक पडतो ना? नाहीतर एक काम कर तू माझा तपास, तुझा रेड्डीला दे." आरतीने आयडिया दिली. 

"नको बाबा तो रेड्डी. नुसते व्याप लावतो मागे. माणसानं किती चिकट असावं? जरा स्पेलिंग चुकलं तरी बदल म्हणतो. आकडेवारी चार पैशानी चुकली तर फाशीच चढवेल तो.", मनोजला रेड्डी नको होता. 

संध्याकाळी दोघेही मग कामं उरकून रिपोर्ट बघायला बसले. अगदी कॅल्क्युलेटर घेऊन गहन चर्चा सुरु झाली. नेहमीप्रमाणे लोकांनी 'यांचं चालू दे' म्हणून निरोप घेतलाच. मनोज बराच वेळ तिला समजावत होता काय प्रोजेक्ट होते, किती लोक, त्यांचे कामाचे तास, इ सर्व.  पण काहीतरी गडबड वाटत होती. तो कितीही समजावून सांगत असला तरी ताळमेळ लागत नव्हता. 

"अरे तो नवीन आलेला मुलगा, रवी, तो सुट्टीवर होता ना दोन महिने? आणि ती प्रेग्नन्ट बाई पण? काय यांची नावं मला आठवत नाहीयेत पटकन. पण त्यांच्या सुट्ट्या दिसत नाहीयेत यात?" आरतीने विचारलं. 

मनोजने अशीच टोलवाटोलवीची उत्तरं दिली. तिने मग नाद सोडून दिला. 

ती म्हणाली,"एक काम करूया का? मी घरी जाऊन बघू का? उशीर पण झालाय."

"नंतर कशाला? आताच बघ ना? जाऊ उरकून. मला पण उद्या सकाळी मेल करावा लागेल. तू आताच अप्रूव्ह करून टाक ना?", मनोजला जरा जास्तच घाई होती. पण जास्त बोललो तर आरती अजूनच चिडेल हे त्याला माहित होतं. तिच्या कामात कणभरही चूक चालायची नाही तिला. 

तिने सर्व फाईल्स मेल करून घेतल्या आणि त्याला 'बाय' म्हणून ती घरी निघाली होती. कितीतरी वेळ गाडी चालवण्याकडे तिचं लक्षच नव्हतं. मनोजच्या रिपोर्टमध्ये तिला काहीतरी मोठ्ठा घोळ दिसत होता. आता हे कसं, कुणाला सांगायचं ते तिला कळत नव्हतं. 

क्रमश: 

विद्या भुतकर. 


Sunday, June 18, 2017

ऑप्शन्स

मध्ये मी एक लेख वाचला होता 'ऑप्शन्स' असण्याच्या परिणामांवर. त्यात असा एक प्रयोग केला होता की एका दुकानात ३ च प्रकारची आईस्क्रीम मिळतात आणि दुसऱ्या दुकानात खूप, समजा २० वगैरे. तर ३ प्रकार असणाऱ्या दुकानातून बाहेर आलेल्या लोकांना त्यांनी जे काही निवडलं होतं ते ते आईस्क्रीम त्यांना आवडलं होतं. मात्र जिथे जास्त प्रकार होते तिथल्या दुकानातून बाहेर आलेल्या लोकांपैकी अनेक जणांना आपण निवडलेलं आईस्क्रीम तितकं आवडलं नाही किंवा आपण दुसरा कुठला तरी प्रकार घ्यायला हवा होता असं त्यांना वाटलं. एकूण निष्कर्ष काय तर जितके ऑप्शन्स जास्त तितकं समाधान कमी. 
       इथे मुलांच्या शाळेत युनिफॉर्म नसतो. त्यामुळे रोज सकाळी उठून 'काय कपडे घालायचे हा प्रश्न असतो. लहानपणी कसं चारच कपड्यातला त्यातल्या त्यात चांगला ड्रेस घातला की झालं. आता मात्र मुलांना इतके पर्याय असतात आणि त्यातून होणारे वादही जास्त. त्यासाठी भारतात सर्व शाळांना असणाऱ्या युनिफॉर्मचा मला खूप आदर वाटतो. इथल्या भरमसाठ कपडे असणाऱ्या मुलांपेक्षा ती मुलं आणि त्यांचे आई-वडील बरेच आनंदात असतील. आम्ही तरी होतो. 
    तीच गोष्ट घरातल्या वस्तूंचीही. आजकाल जितक्या बेडरूम्स, रूम्स असतील तितक्या कमीच पडतात. प्रत्येकाला ज्याची त्याची प्रायव्हसी आणि शांतता हवी असते. अगदी आईवडिलांनाही. मग मुलांना त्यांचे आयपॅड आणि आपले लॅपटॉप किंवा फोन्स असं वाटून घेतलं जातं. पुढे जाऊन मुलांना प्रत्येकाला एकेक आयपॅड किंवा एकाला ते तर दुसऱ्याला टीव्ही असेही वाटून घेतलं जातं. का? तर प्रत्येकाला आपल्या आवडीचं बघायचं असतं किंवा गेम्स हवे असतात. आता हे सगळं होतं कारण 'पर्याय' किंवा 'ऑप्शन्स' असतात म्हणून. आणि वादही होतात कारण प्रत्येकाला निवडण्यासाठी पर्याय असतात म्हणून. नाहीतर घरातल्या एकाच टीव्ही वर एकाच चॅनेल वर येणारा एकच कार्यक्रम बघूनही आख्ख घर खुश होतंच की? 
       तर सध्या आमच्याकडे असाच एक गहन प्रश्न पडलेला आहे. सध्या उन्हाळा सुरु झाला आहे आणि त्याचसोबत आईस्क्रीम खाणंही वाढलं आहे. पूर्वी दोन्ही मुलं एकच आईस्क्रीम घेतलं की अर्धं अर्धं खात. आणि आम्हा दोघांचं एक. पण आजकाल दोघेही आपल्या आवडीनुसारच आईस्क्रीम घ्यायचा हट्ट करतात. एकतर प्रत्येक मुलाचं वेगळं घेतलं की हे भरमसाठ येतं कितीही लहान कप घेतला तरी. शिवाय त्यातून इतकी साखर पोटात जाते ते वेगळेच. शिवाय नुसत्या आईस्क्रीमसाठी इतके पैसे घालवायचे नको वाटते. यासर्वांवर काय उपाय करायचा हा प्रश्न मला पडलेला. 
      शनिवारी रात्री मुलांनी हट्ट केला तेंव्हा माझी तरी इच्छा नव्हतीच इतक्या उशिरा त्यांनी गॉड खावं अशी. शेवटी एका अटीवर मी हो म्हणाले. म्हटलं, तुम्ही दोघांनी मिळून एक फ्लेवर घ्यायचा आणि शेअर करायचा तरच मी नेईन. सुरुवातीला आरडाओरडा झालाच. मीही ऐकत नव्हते. शेवटी गाडीतच चर्चा सुरु झाली. कुठला फ्लेव्हर घेतला पाहिजे. दोघेही आपल्याच आवडत्या आईस्क्रीमचा हट्ट करत होते. मधेच त्यांनी गॉड बोलून एकमेकांना दुसरा फ्लेव्हर कसा चांगला आहे हे समजावलं. पण मार्ग काही निघत नव्हता. शेवटी सान्वीने सांगितलं तिथे जाऊन आपण बघू आणि ठरवू. 
       दुकानात जाऊन बरीच चर्चा करून मुलाच्या आवडीचं आईस्क्रीम आणि मुलीच्या आवडीचे टॉपिंग त्यावर घेतले. हे तिला आवडलं नाहीच. आम्हा दोघांसाठी मी एक निवडलं होतं. ती नाराज होऊन बसली होती. पण एकदा विकत घेतल्यावर तिच्यासमोर दोनच पर्याय होते. एकतर आमचं किंवा स्वनिकचं. तिने दोनीही चव घेऊन पाहिले आणि शेवटी माझ्यातलं अर्ध घेण्याचं ठरवलं. अर्थात तिला ते आवडलंच. पुढच्या वेळी तिच्या आवडीचं आईस्क्रीम घ्यायचं हेही आमचं ठरलं. एकूण काय शेवट गोड झाला. पण त्या इतक्याशा आईस्क्रीम साठी इतकं मोठं नाटक. संदीप म्हणालाही,"किती जीव घेतेस पोरांचा.". पण त्यालाही दिसत होतं दोघे कशी चर्चा करत आहेत आणि अर्थात बिल कमी आलं हेही. :) 
        कधी वाटतं करू द्यावं त्यांना मनासारखं. अगदी माझाही त्रास कमीच होईल. पण या अशा छोट्या गोष्टीतूनही ते शिकत असतातच. आणि त्या केल्याचं पाहिजेत असं मला वाटतं. अनेकदा टीव्ही पाहतानाही दोघांना न भांडता एकच गोष्ट बघायला लावतो, अगदी बाकी पर्याय असतानाही. कारण समोर पर्याय असले तरी थोडं समजून घेऊन, वाटून घ्यायला शिकण जास्त महत्वाचं आहे. नाही का? नाहीतर उद्या त्यांना एकमेकांसाठीही पर्याय मिळून जातील. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, June 11, 2017

गप्पा, न संपणाऱ्या.....

       शुक्रवारी कॉलेजमधल्या एका मैत्रिणीचा मेसेज आलेला होता व्हाट्स ऍपवर,"ओळखलंस का म्हणून?". इतक्या वर्षांनी फायनली तिचा मेसेज आला आणि संपर्क झाला म्हणून एकदम खूष होते. म्हणाली,"ओळखशील की नाही शंका होती.". म्हटलं,"बावळट, तुला किती शोधलं, म्हणजे ऑनलाईनच, पण शोधलं ना? कुठे होतीस?". शेवटी फोन करायचा ठरलं तर माझ्याकडचे पाहुणे, तिचे कार्यक्रम असं करत शनिवारी फोन लागला आणि बोलणं सुरु झालं. आता जवळची मैत्रीण म्हटल्यावर पोरं-सोरं बाजूला ठेवून बोलत बसलो बराच वेळ. म्हणजे दोनेक तास तरी. शेवटी मागे पडलेली कामं होतीच. जायला तर लागलंच. पण खूप वर्षांनी बोलून मन मोकळं झालं. विषय एकच असं नाही, विषय पाहिजेच असं नाही. फक्त 'पुढे काय बोलायचं?' किंवा  'मग काय विशेष?' असे प्रश्न पडले नाहीत. 
       तर या अशाच गप्पा, न संपणाऱ्या कितीतरी व्यक्तींसोबत केलेल्या, झालेल्या, न संपलेल्या सगळ्या आठवल्या. खूप दिवस झाले असं बोलून. त्या त्या व्यक्ती, गप्पा सगळं वेगळं पण नातं मात्र खासच. ती नाती कधीच विसरली जात नाहीत, कदाचित भेटी होत नाहीत, पण मनात नक्कीच राहतात. शाळेत असताना, जवळच्या मैत्रिणींसोबतच्या गप्पा. ११-१२ ला दिवसभर सोबत असून परत कोपऱ्यावरून वेगळं होताना तिथेच चौकात उभे राहून मारलेल्या गप्पा. परत दुसऱ्या दिवशी भेटणार आहे हे माहित असूनही. आणि मधेच एखादं कारण काढून लँडलाईन वरून केलेला फोन. पुढे कॉलेजमध्ये रात्री रूममेट्स सोबत गप्पा मारून परत भूक लागली म्हणून दोन वाजता चिवडा खात अजून मारलेल्या गप्पा. मित्रांसोबत रस्त्यावरून फिरत आणि नंतर बिल्डिंगच्या खाली उभे राहून मारलेल्या गप्पा. यातली एकूण एक व्यक्ती खास होऊन जाते. 
           नुसते मित्र-मैत्रिणीच असं नाही लग्नाला, माहेरी किंवा आजोळी गेल्यावर रात्री सगळ्या बायका आडव्या झाल्या की आळस देत मारलेल्या गप्पा, त्याला थोडं 'गॉसिप' वळणही असतं बरं का ! :) अगदी झोप ग, उशीर झालाय म्हणत पुन्हा एखादीने विषय काढायचा आणि सगळे परत सुरु. मधेच कुणी ऐकू नये म्हणून आपोआप बारीक होणारा आवाजही असतोच एखाद्या खास विषयावर बोलताना. सगळ्यात जास्त मजा असते ती एखादा कार्यक्रम संपला की त्यानंतर सगळं आवरण्यासाठी मागे राहिलेली मंडळी, शेवटच्या पंगतीत बसलेली खास लोकं आणि त्यांच्या गप्पा या वेगळ्याच असतात. कार्यक्रम चांगला झाला, एखादा घोळ झाला किंवा एखादया पाहुण्याला कसा सांभाळला यावर चर्चा घडत राहते. समोरचं ताट रिकामं होतं, हात सुकून जातात आणि मनही थोडं उदास झालेलं असतं आतून. तरीही या गप्पानी एक वेगळीच ऊर्जा मिळते. 
         एखादं असं जोडपंही असतं, नवरा-बायको आपले अगदी खास दोस्त. दिवस-रात्र तिथे राहूनही घरातून निघतानाही दारातच तासभर गप्पा होतात. दोघांनाही माहित असतं निघायचं आहे, उशीर झालाय तरीही दारातल्या गप्पा संपत नाहीत. 'चल बाय म्हणत बोलतच राहतो'. 'आता उशीर झालाय तर राहूनच जा' असंही होऊन जातं मग. दारातल्या गप्पांवरुन आठवलं, आमच्या शेजाऱ्यांशी मारलेल्या गप्पा. दोघीही 'खूप काम पडलंय' म्हणत दारातच उभं राहून बोलत राहायचं. यासारखी मजा नाही आणि शेजारही नाही. यातही गम्मत तीच. रोजच भेटायचं, तेच रुटीन, तेच लोक तरीही गप्पा मात्र संपत नाहीत. अशात गरम गरम चहाही मिळाला की मंग काय बासच. शेवटचं म्हणजे हे प्रेमातल्या गप्पा. रस्त्याने चालत, तर कधी बाईकवरून मारलेल्या, फोनवरून, पत्रातून आणि पुन्हा एकदा चार तासातच भेटून मारलेल्या गप्पा. किती वेगळ्या असतात ना? 
        या सगळ्यात काय असतं माहितेय का? तिथे तुम्ही मनातलं सगळं मोकळेपणाने बोलू शकता, उद्या एखादं गुपित बाहेर फुटेल या भीतीने काही राखून ठेवलं जात नाही. उलट कधी मनातलं साचलेलंही बाहेर पडून जातं.  कुणी माझ्याबद्दल काय विचार करेल, असं मनातही आणायची गरज वाटत नाही. जे आहे ते आहे, असं स्पष्ट बोललं जातं. मघाशी म्हटलं तसं, प्रत्येकाचे विषय वेगळे, काळाचे संदर्भ निराळे, तरीही या सर्व प्रकारातील एखादी तरी खास व्यक्ती आठवेलच तुम्हालाही, ज्यांच्यासोबत तुम्हीही अशा मनमोकळ्या गप्पा मारल्यात किंवा अजूनही होतात, अशाच कधी फोनवरून, कधी खूप वर्षांनी भेटल्यावर तर कधी कुणाच्या कार्यक्रमात. बरोबर ना? 

विद्या भुतकर. 
          
         

Thursday, June 08, 2017

कळलेच नाही.... तुझ्या प्रेमात.... -भाग ५(अंतिम )

मनात एकदा शंका आली की मग त्या शंकेच्या दिशेनेच ते जायला लागतं.  लग्न जवळ येत होतं तशी ती अजूनच अस्वस्थ होऊ लागली. त्याचं वागणं, बोलणं यातून आधी न दिसलेल्या अनेक गोष्टी तिला दिसू लागल्या. छोट्या कारणांवरून वाद झाला तरी ते मोठं वाटू लागलं. कितीतरी वेळा तिने स्वतःला समजावलं होतं,"फक्त लग्नापर्यंत धीर धर. मग आहोतच आपणच दोघे."

अशातच एक दिवस चिरागच्या वडिलांचा फोन आला. फोन ठेवल्यावर ते काळजीने बसले. चारदा विचारल्यावर शेवटी बोलायला लागले.

"ते याद्यांमध्ये आपलं ठरलं होतं ना, आपापले पाहुणे आपण सांभाळायचे म्हणून?" त्यांनी खात्रीसाठी आईला विचारलं.

"हो, का हो?", आई.

"ते पाहुणे म्हणत होते की आपण हॉल बुक केलाय ना लग्नाचा, मग तिथेच रात्री त्यांना पण झोपू देत ना.", बाबांनी सांगितलं.

"मग?",आई.

"अगं पण आपल्याला कसं शक्य आहे? आपण फक्त आपल्याच लोकांसाठी तयारी, गाद्या, जेवण हे सगळं सांगितलं आहे. तिथे झोपण्याची व्यवस्था होण्याइतका मोठा नाही हॉल.",बाबा काळजीने म्हणाले.

"आता काय करायचं?",आईलाही काळजी पडली.

"काय म्हणजे? नुसतं झोपायचं नाहीये ना? त्यांची राहायची व्यवस्था, गाद्या, सकाळचा चहा नास्ता, सगळाच खर्च येतो. त्यांचे शंभर लोक आहेत म्हणे. इतक्या लोकांचा रात्रीचा जेवणाचा, सकाळचा, राहायचा खर्च हे सगळं म्हंटलं तर चांगले ५०-६० हजार जास्त जातील. शिवाय दोन्हीकडच्या पाहुण्याना तिथली सोय पुरणार नाही.",बाबांच्या डोक्यात गणित चाललं होतं.

"पण या लोकांनी आपला आपला बुक केलाच असेल ना?", आईने विचारलं.

"म्हणाले मिळत नाहीये. काय माहित?", बाबा.

दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांनी खर्चाचा हिशोब काढला, हॉलला चौकशी केली. सगळं करून हे प्रकरण जमणार नाही त्यांना समजलं. त्यांनी तसं मध्यस्त काकांना सांगितलंही. काकांनी तसं तिकडे कळवलं. बऱ्याच चर्चा झाल्यावर 'तुमचं तुम्ही बघून घ्या' असं त्यांना सांगायला लागलं.
दीपूला यातलं काहीच माहीत नव्हतं. चिरागला भेटायला ती गेली तेंव्हा तो जरा चिडलेलाच दिसला.

तिने त्याला विचारलं तसं म्हणालाही तो,"थोडं ऍडजस्ट करून घ्यायचं ना गं काकांनी पण. आता बाबांनी पण शोधले हॉल नाही मिळतंय तर काय करणार?"

"अरे पण हे असं अचानक सांगितल्यावर आम्ही तरी काय करणार?", दीपू.

"मला तर वाटतंय त्यांना हे करायचंच नाहीये, आधीही त्यांनी पाहुण्यांच्या खर्चाला नकारच दिला होता.",चिराग.

"मग बरोबर आहे ना. त्यांना जमत नाहीये म्हणून त्यांनी आधीच सांगितलं आहे. तुम्ही परत कशाला त्यांना विचारून त्रास देताय?",दीपू चिडली होती.

"आता आम्ही त्रास देतोय ?"चिरागने उपहासाने विचारलं.

"मग काय, त्यांना जे जमतंय त्यापेक्षा जास्तच करत आहेत ते.",दीपू.

"किती टेन्शन आलंय माहितेय घरी?",चिराग.

"मग आधीपासून करायचं ना?तुम्ही कशाला इतकी वाट बघत बसला होता? आम्ही केलंच ना? आणि काय रे, इतके दिवस बाकी गोष्टीत तू अजिबात बोलत नव्हतास आणि आता मला का हे सांगत आहेस?",दोघांच्या आवाजात चढाओढ लागली होती.

"हे बघ हेच ते. असं वागणं. तू आजकाल जरा चिडूनच वागतेयस. ",चिराग.

"मग काय चुकीचं बोलले सांग ना, जिथे गरज होती तिथे तू सोयीने गप्प बसलास. त्यांना बघू दे ना मग आता? नको पडायला आपण मध्ये.", दीपू म्हणाली.
पुढे भेटून बोलण्यासारखं काही नव्हतंच त्यामुळे ती भेट संपलीच.

------------------------------------------
चिराग घरी आला तर घरातही तंग वातावरण होतं.

"बघा आला भेटून तिला. तिनेच जादू केलीय याच्यावर. त्यांचं ऐकतो आपलं सगळं."त्याची आईनं तावातावाने म्हणाली.

"मी काय केलं आता?",चिरागने विचारलं.

"काही नाही ना? म्हणूनच तर ते लोक असं उर्मटपणे वागत आहेत. इतकं जमत नाही त्यांना? एकुलती एक मुलगी आहे म्हणे ना? मग काय फरक पडतो त्यांना?", आईने विचारलं.

"अगं पण आपणच बघायला पाहिजे होता हॉल. कशाला त्यांचे उपकार घ्यायचे?" चिरागने विचारलं.

"आहाहा उपकार म्हणे? कर्तव्यच आहे ते त्यांचं. इतकं जमत नाहीत तर कशाला हवा असा मुलगा तरी?", आई अतिशय रागाने बोलली.

"अगं पण बाकी सर्व करतायत ना ते? बघू आपण काहीतरी", बाबांनी तिला समजावलं.

"अहो, १०० लोक आपले, कुठे डोक्यावर बसवणार का? मी तर म्हणते नकोच आम्हाला अशा घरात सोयरीक.", आईच्या या वाक्यावर मात्र चिराग घाबरला होता. असंही होऊ शकतं याचा त्याने विचारच केला नव्हता.

"आई तू उगाच टोकाची भूमिका घेऊ नकोस हा. उगाच आपलं काहीतरी काढू नकोस.",चिराग पटकन बोलला.

"का रे? काय झालं?",आईने खोचून विचारलं.

"काय म्हणजे इतकं ठरवून मोडणार आहेस का?", चिराग.

"का? न मोडायला काय झालं? नंतर होण्यापेक्षा आधीच झालेलं बरं  ना? अशा लोकांशी आयुष्यभराची सोयरीक करायची? किती ताप होईल विचार कर.", आईने सांगितलं.

"बाबा तुम्ही सांगा की आईला. काय बरळतेय.", चिरागने विनवणी केली.

"मी काय बोलणार? ती बरोबरच सांगतेय. या लोकांशी जुळवून नंतर त्रास झाला तर? त्यात मुलीनं आताच तुला फूस लावलीय. उद्या तर आम्हाला सोडूनच जाशील.",आई.

"हे बघ मी काही तुम्हाला हे असं करू देणार नाहीये.",चिरागने मोठ्या आवाजात सांगितलं.

"का रे? काही झालं-बिलंय का काय तुमचं? बघा म्हणजे पोरगी किती पुढची आहे ते." आई.

"आई ...काय बोलतेयस काही कळतंय का?",चिरागला ओरडला.
 त्याला आता पुढे काय या काळजीने घेरलं होतं. तिकडे रागाने दीपूही फोन उचलत नव्हती.
------------------------------------------
तो पुन्हा रात्री तिच्या घरीच गेला.

"दीपू अगं ते असं तोडायचं बोलणी करत आहेत. मी पैसे देतो लागतील ते, तेव्हढं जमवून घ्या हॉलचं . " चिराग काळजीने म्हणाला.

"ठीकाय पैसे देशील आज, उद्या अजून काय काय असं लपवणार? सरळ सांग ना त्यांना काहीच नकोय यातलं म्हणून. करून येऊ रजिस्टर लग्न. चालेल का?",तिने त्याला विचारलं.

"आता इतकं सगळं झाल्यावर ते काय पुन्हा?" त्यानं विचारलं.

"मला ना चिराग आता बाकी कशाचीही काळजी नाहीये. भीती आहे. फक्त तुझी. उद्या ज्याच्या प्रेमासाठी मी तिथे येणार तोच इतका पळपुटा असेल तर माझं काय आहे त्या घरात?",दीपूने विचारलं.

"तुला हवी आहे ना मी? मग चल करू आपण रजिस्टर लग्न आणि मग काहीच प्रश्न नाहीये." तिने विचारलं.

"हे बघ, हे काही जमणार नाही. मी अजूनही सांगतोय मी जे काही पैसे लागतील ते देतो, आपण हे इथेच मिटवू.",चिरागने फायनल सांगितलं.

"मिटवायचं? हा काय व्यवहार आहे का? किती वेळा सांगतेय विचार कर काय हवं आहे नक्की. इतकं सगळं होऊनही या छोट्या कारणावरून तुझे आई-वडील लग्न मोडायला तयार आहेत. उद्या अजून काय झालं तर डिवोर्स घ्या म्हणतील. तू नको विरोध करायला?", तिने त्याला विचारलं.

त्याच्याकडे यावर उत्तर नव्हतं. बराच वेळ न बोलता ते बसून राहिले. थोड्या वेळाने तिचे वडील तिकडे आले आणि म्हणाले,"चिराग, तुझ्या घरच्यांनी फोन केला होता, आमच्या मुलाला पाठवून द्या म्हणून. उगाच आम्ही तुला फूस लावतोय हा आरोप आमच्यावर नको. जे काही होईल ते तुम्हाला कळवूच. या आता."

चिराग नाईलाजाने निघून गेला.
--------------------------------------------

पुढच्या दोन दिवसांत अनेक फोन झाले. रडारड-चिडचिड, मध्यस्त, सगळ्या वादानंतर लग्न मोडलं होतं.
त्या दोघांनीही एकमेकांशी बोलायचा प्रयत्न केला नव्हता. एखादं नातं इतकं बदलू शकतं? केवळ दोन-चार महिन्यांत? त्यात प्रेम राहातच नाही मग. त्यांनाही आता ती ओढ, इच्छा राहिली नव्हती. होतं ते राग, द्वेष, दुःख आणि 'तो/ती असं कसं करू शकते?'  हा अविश्वास.

महिन्याभरानंतर तिने त्याला एक मेसेज केला,"तुझ्या प्रेमात कळलंच नाही  कधी वाहवत गेले. तू म्हणालास म्हणून 'बघून घ्यायचा' कार्यक्रम केला, मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अगदी तुझ्या नातेवाईकांना समजून-जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. पण जितकी पुढे जात होते, स्वतःला मारत होते. माझ्यातल्या प्रेयसीलाही. तुझ्याकडून जो आधार मिळावा अशी अपेक्षा होती तो मिळत नव्हता. कदाचित तुलाही माझ्याकडून मिळाला नसेल. एक चूक झाली, प्रेम दोघांत होतं. ते तसंच ठेवायला हवं होतं. त्यात व्यवहार मध्ये आला आणि शेवटी प्रेम संपून केवळ व्यवहारच उरला. कितीतरी वेळा विचार करते झालं ते योग्य की अयोग्य. फक्त एक सांगू शकते फक्त थोडी हिम्मत दाखवायला हवी होती त्या वेळी. पण आता खूप पुढे गेलोय आपण. पुन्हा तसे प्रेमाने जवळ येणं शक्य होईल असं वाटत नाही. मी जे काही बोलले रागाने, द्वेषाने त्याबद्दल माफ कर. प्रेम नसलं तरी मनात एकमेकांबद्दल राग तरी राहायला नको असं मला वाटतं. तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. टेक केअर. दीपा."

त्या दोघांमधला तो शेवटचा संवाद होता.

-------------------------------------------------

माणूस कितीही दुःख असलं तरी विसरून जातोच.कदाचित तो तसाच राहत नाही पण जगायला शिकतोच. दीपू शिकली...चिरागही शिकला. वर्ष उलटून गेलं होतं. कधीतरी विचार मनात यायचा, खरंच चूक नक्की कुणाची होती? पण नुसता विचार करण्यापलीकडे कुणीच काही करत नव्हतं. दोघं अधून मधून त्या मॅट्रिमोनी वेबसाईट वर एकमेकांचा प्रोफाईल बघत होते. बाकी लोकांमध्ये असंही स्वारस्य उरलं नव्हतं. त्या साईटवर स्टेट्स बदलत तर नाहीये हे बघून घेत होते. 
एक दिवस चेक केलं तरीही त्याला तिचा प्रोफाईल काही दिसला नव्हता. त्याला खूप अस्वस्थ झालं. दिवसभरात अनेक वेळा त्याने ते चेक करून पाहिलं. कॉमन मित्राला फोन करून आडूनही विचारलं. पण कुठूनच काहीच उत्तर मिळालं नाही. तो दिवस कसाबसा काढला त्याने. पुन्हा सकाळी तिच्या नावाने पेजवर सर्च केलं, काहीच नाही. 
मनात एकच विचार येत राहिला,"तिचं लग्न ठरलं असेल का?'. 'असणारच ना? इतकी तर छान आहे ती', 'माझ्यासारख्या मुलाला तिने होकार दिला हे नशीबच होतं माझं', 'मी किती मूर्ख आहे?', 'मला इतक्या सहज विसरू शकली ती?', 'असणारच ना? मी वागलोच तसा होतो?', 'तिच्या मेसेजला उत्तर देण्याचं धाडसही नव्हतं माझ्यात', 'खूप उशीर झालाय का?', एक ना अनेक विचार ते. 
खूप हिम्मत करून त्याने तिला मेसेज केला,"कॅफे प्लीज?". 
खूप वेळाने उत्तर आलं होतं,"ओके". 

त्याचा चेहरा अपेक्षेने खुलला पण मनात एक शंकाही आली,"लग्न ठरलं असणार, म्हणून तर शेवटचं भेटायला हो म्हणाली असेल.". 

संध्याकाळी तो कॅफे मध्ये गेला तर ती आधीच आलेली होती. किती वर्षांनी पहात होता तो तिला. ती कशी दिसते याची त्याने मनात हजार वेळा उजळणी केली होती तरीही तिला पाहिल्यावर चुकून डोळे भरून येतील की काय,अशी भीती त्याला वाटली. 
ती हसली, छान, कितीतरी वर्षांनी. तोही मग बसला, अवघडलं हसून. 

"बारीक झालीस.", त्याने विचारलं. 
"हां डाएट करत होते गेले काही दिवस.", तिच्या आवाजात मोकळेपणा होता. 
कितीतरी दिवसांनी मग ते मोकळेपणाने बोलले. 
त्याने विचारू की नको म्हणत विचारलंच,"लग्न ठरलं असेल ना?"
"कशावरून?",ती. 
"नाही ते डाएटचं म्हणालीस म्हणून म्हटलं.", चिराग. 
"लग्नासाठी डाएट? बाकी सर्व करून झालं, तेव्हढंच राहिलं होतं बघ. नाही का?", तिने चिडवण्याच्या स्वरात विचारलं. 
"तुझा प्रोफाईल दिसला नाही, मग मला वाटलं...ठरलं असेल." त्याने विचारलं. 
"नाही, असंच काढून टाकला. काय करणार ठेवून तरी? उगाच नजर नको तिकडेच जाते. जे बघायचं, करायचं ते सर्व पाहून झालं. शेवटी काढून टाकला.", तिने खरं सांगितलं. 
तिचं उत्तर ऐकून वाईट वाटलं खरं, पण अजून लग्न ठरलं नाही याचा आनंदही. 
"सॉरी दीपू.", चिराग. 
"कशाबद्दल?", ती. 
"सर्वच गोष्टींबद्दल. तुला इतका त्रास झाला, दिला त्याबद्दल. त्यावेळी आपण कसे वागतोय याची शुद्धही नव्हती त्याबद्दल. आपलं लग्न मोडलं, तेंव्हा काहीच न केल्याबद्दल. अगदी तुझा लास्ट मेसेज आला त्याला उत्तरही न दिल्याबद्दल. खूप वेळ लागला जे झालं ते नक्की काय होतं हे समजायला. तू म्हणत होतीस ना, नक्की काय हवंय याचा विचार कर. ते कळायलाही इतका उशीर झाला.", चिरागने सांगितलं.
"आज तुझ्याशी बोलताना कळतंय जवळच्या मैत्रिणीशी बोलताना काय वाटत असतं. तू गेलीस आणि प्रेमासोबत मैत्रीणही गेली. मग समजवणार कोण आणि आधार तरी कोण देणार? सगळं आपणच केलं. काल तू तो प्रोफाईल काढून टाकलास आणि लक्षात आलं की खरंच असं झालं असेल तर काय....? इतके दिवस नव्हती ती हिम्मत आली, तुला मेसेज केला. खरंच प्रेम गमावण्याची भीती मनात आली तर हिम्मत येतेच बहुतेक. तेंव्हा तू माझीच होणार हे गृहीतच धरलं होतं. त्यामुळे काही करायचे प्रयत्नही केले नाहीत. त्या प्रत्येक गोष्टीबद्दल सॉरी.", तो पुढे बोलला.

"किती वेळ गेला रे हे सगळं कळायला? तुलाच नाही मलाही. प्रेम होतं म्हणे आपलं. एका वादळात कोलमडून पडलो आपण. इतके की गोळा करायला तुकडेही शिल्लक राहिले नाहीत. म्हणे खरं प्रेम आपलं. आपल्या माणसासाठी म्हणून दोघेही कणभर बदलू शकलो नाही. काय याचा फायदा? ", तिने विचारलं. 

"खरंय, आता वाटतंय, बाकी काहीही महत्वाचं नाहीये तू सोडून. इतके दिवस सर्व सोबत असूनही एकटाच पडलो होतो. आता आज तू आहेस तर काहीच महत्वाचं वाटत नाहीये, तू सोडून. कसं सांगू तुला दीपू? मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. " तो जोशात बोलला.
"चिराग, या एका वाक्यासाठी आसुसलेले मी. गेलं वर्षभर वाट पाहिली त्याची. पण ना तू आलास ना तुझं हे बोलणं. एकमेकांची गरज असताना, एकेकटे जगलो आपण. आणि मुख्य म्हणजे तुझ्या प्रेमात कळलंच नाही मला, मी स्वतःचं 'मी' पण कधी हरवत गेले. तुझ्यासोबत राहायचं म्हणून स्वतःत छोटे छोटे बदल करत गेले, स्वतःला समजावत राहिले. पण ते पटलं नाही त्या क्षणी हे सगळं तुटलं. मला नाही वाटत रे आता परत ते सगळं जुळेल. तो प्रोफाईल काढून टाकला कारण पुन्हा तिथंपर्यंत पोहोचण्याइतकी शक्ती आता तरी नाहीये. तू विचारलंस म्हणून भेटले. पण ते इतकंच.", दीपू बोलली. तिला बोलतानाही वाईट वाटलं होतं. पण स्पष्ट बोलणं गरजेचं होतं.

"दीपू, माझ्याशी लग्न करशील?", चिरागने जमेल तितक्या गंभीरपणे विचारलं.

"नाही चिराग. नाही जमणार मला ते. आपलं मैत्रीचं नातंही हरवलं या सगळ्यात. आपली व्यक्तिमत्व, विचार, सगळंच. तेही इतक्या झटक्यात. आयुष्यात अनेक वादळं येतील. ती कशी पार पाडणार आपण? पुढे मला काय हवंय हे मला माहित नाही, पण प्रेमात व्यवहार नको हे नक्की कळलं. ती चूक आपण केली आता परत फिरणं नाही जमणार. त्या सगळ्यात आपल्या नात्यात एक कडवटपणा आला. तो असा अचानक नाहीसा होईल असं वाटत नाही. आपलं लग्न होऊ शकत नाही. I am sorry dear. ", ती बोलली. दीपूने आपली बॅग घेतली आणि ती निघून गेली, चिरागला बोलण्याची संधीही न देता. 


समाप्त. 

विद्या भुतकर.

Wednesday, June 07, 2017

कळलेच नाही.... तुझ्या प्रेमात.... -भाग ४

       साखरपुडा झाला, सर्व पाहुणे आपापल्या घरी गेले. बाकी सगळ्यांच्या गप्पा झाल्या पण दोघेही आपापल्या घरी गप्प होते. त्या रात्री कुणीच कुणाला फोन केला नाही. ज्या रात्री त्यांना गप्पा मारायला कुणाच्या परवानगीची आवश्यकता नव्हती, ज्या रात्री पुढच्या आयुष्याची स्वप्नं पाहायची त्या रात्री दीपू रागाने फणफणत होती आणि तिकडे चिराग तिला काय उत्तर द्यायचं या काळजीने.

रात्री तिने आईला विचारलंही होतं,"काय गरज होती सगळं करायला हो म्हणायची?".

"अगं एकुलती एक मुलगी तू आमची. घरातलं सगळं तुझंच तर आहे. मग ते दिलं तुलाच तर काय बिघडलं?", बाबांनी विचारलं.

"करावं लागतं बाळ, तुला वेळ आहे कळायला. तू नको विचार करुस, आम्ही आहे ना?", आईने समजावलं.

"मला काही हे पटत नाहीये. कुठल्या जगात वावरतो आपण? मी पण करते ना नोकरी?", दीपू ऐकत नव्हती.

"अगं तसं नसतं ते. ही लग्नपध्द्ती म्हणजे एक व्यवहारच असतो म्हण ना. आता पूर्वीसारखं सगळंच पाळत नाही पण काही गोष्टी नाही टाळता येत. शिवाय आपली मुलगी त्या घरात द्यायची असते. या सगळ्या व्यवहाराचा तिला त्रास नको म्हणून जितका संघर्ष टाळू तितकं चांगलंच." बाबा तिला समजावत होते. 

आणि त्यांच्या या सगळ्या बोलण्याने तिला चिरागवर अजूनच जास्त चीड येत होती. माणसानं किती नेभळट असावं? स्वतःच्या आई-वडिलांना सांगता येत नाही का? मुळात त्याला या सगळ्या प्रकाराला मी 'र्हा म्हणायलाच नको होतं.

चिरागही घरी गप्पच होता. रात्रभर विचार करून दुसऱ्या दिवशी त्याने तिला मेसेज पाठवला, 'कॅफे ७ वाजता?".
सकाळी पाठवलेल्या मेसेजला दुपारी चारला उत्तर आलं,"ओके".

                  --------------------------------------------------------------

नेहमीच्या जागी ती आली तर तो होताच तिथे आधी. कितीतरी वेळ नको इतकी शांतता होती.

"सॉरी दीपू. काय बोलू खरंच कळत नाहीये. मला वाटलंच नव्हतं हे प्रकरण इतकं पुढे जाईल. आई-बाबा मामांशी काय बोलले काहीच माहीत नव्हतं. प्लीज चिडू नकोस ना.", चिराग.

"मग काय करू? तुला आधी माहीत नव्हतं, तेंव्हा तरी कळालं ना? मग का नाही बोललास? सांग ना?", तिने रागाने विचारलं.

"मी काय वस्तू आहे? आणि मी काय ओझं म्हणून येतेय तुझ्या घरी? सोबत इतकं सोनं द्यायला? काय कमी आहे म्हणून त्यांनी हे सर्व मागितलं? सांग ना?", ती जवळजवळ ओरडतच होती.
तिला शांत करण्याचा प्रयत्न सफल होत नव्हता.

"अगं पण आमच्याकडेही आहेच खर्च, रिसेप्शनचं. त्यालाही हॉल, हे सर्व खर्च आहेतच की? आणि ते सोनं काय मला थोडीच वापरायचं आहे?", त्याने युक्तिवाद लढवला.

"मग?का विचारलंत? मी बघेन ना घालायचं की नाही? तू उगाच फालतू कारणं देऊ नकोस", दीपू.

"खरं सांगू? मला सगळ्यात जास्त भीती वाटत होती की उगाच तिथे वाद घालून सगळंच रद्द झालं तर? इतक्या जवळ आलेल्या आपल्या भेटीला असं वेडेपणा करून दूर करायचं नव्हतं. इतक्या नातेवाइकांसमोर वाद घालून अगदी तुझ्या बाबांचे सर्व खर्चाचे पैसे मी परत फेडू शकतो पण बस आधी तू माझी हो." चिराग बोलला.

या बोलण्यावर मात्र ती थोडी शांत झाली. तिला निवळलेलं पाहून तोही थोडं हसला.

"दीपू प्लीज तू चिडू नकोस. हे सगळं करण्यात मलाही त्रास होतंच आहे. कधी काय टुम निघेल याची भीती वाटत राहते. बाबांनी ३ तारखा निवडल्या होत्या मुहूर्ताच्या, सगळ्यात पहिली घ्यायला सांगितली आहे. तरी म्हणे, गुढघ्याला बाशिंग बांधलंय साहेबानी. आता काय बोलणार?", चिराग बोलला.

 दीपू थोडी शांत झाली. तिलाही पटलं की सर्वजण समोर असताना वाद घालून प्रकरण चिघळलं असतं. आपले आई-वडीलही त्याचंच समर्थन करत आहेत तर उगाच आपण त्रास नको घ्यायला असं तिला वाटलं. कालपासून पहिल्यांदा तिला थोडं बरं वाटलं होतं. त्याने तिच्या बोटाकडे पाहिलं, अंगठी नव्हतीच. तिने मग हळूच पर्समधून काढली. ती बोटांत घालणार तर त्याने अंगठी हातात घेतली, तिचा हात हातात घेऊन ती तिच्या बोटात घातली. तिने पुन्हा एकदा अंगठीकडे पाहिलं.

"ठीक आहे तशी", ती म्हणाली.

"ठीक? प्लॅटिनम आहे, फॉर लाईफ.", चिराग.

"फॉर लाईफ म्हणे, आधी लग्न कर मग लाईफचं बघू", तिने त्याला चिडवलं. 
त्याच्यासोबत बसल्यावर तिला बरं वाटू लागलं. 

जाताना ती म्हणालीही,"इतक्या लोकांच्या मध्ये हरवलेला तू आणि फक्त माझाच तू, किती वेगळे वाटतात. वाटतं, त्यांच्यात हरवून जाशील तू. आणि उद्या मी एकटीच राहिले तर?". 

"वेडाबाई, लग्न झाल्यावर संसार फक्त आपलाच आहे ना? तेंव्हा कुठे कोण येणार आहेत हे नातेवाईक? घरच्यांचे हे हट्ट करू दे त्यांना पूर्ण. मग आहोतच की आपण.", त्याने तिला समजावलं. 
                                        
                              ------------------------------

      आता लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली होती. लग्नाचा बस्ता, लग्नाच्या साड्या, कपडे, खरेदी सुरु झाली. रोज नवीन वस्तूंचे फोटो व्हाट्सअँप शेअर होऊ लागले. एक दिवस महत्वाच्या खरेदीसाठी चिराग, दीपू आणि त्याचे आई-बाबा बाहेर पडले होते. सोनाराकडे जाऊन तिचं मंगळसूत्र निवडायचं होतं. त्यांच्या पूर्वापार सोनाराकडेच ते घ्यायचं होतं. दुकानात गेले आणि मालकांनी त्यांचं स्वागत केलं. 

"ही दीपा, आमची होणारी सून बरं का काका?", त्याच्या आईने ओळख करून दिली. तिने 'नमस्कार' म्हणून हात जोडले. अजूनही कुणासमोर असं पटकन पाया पडायला वाकायची सवय होत नव्हती तिला. 

"नवीन डिझाईन दाखवा हां. आता यांचा जमाना आला.", आई पुढे बोलली. 

"हो, हो आहेत ना आज-काल त्या नवीन पिक्चरच्या सारखे डिझाईन आलेत. ते अँटिक मंगळसूत्र सेट काढ रे", मालकांनी एका पोराला पिटाळलं. तो एका कप्प्यातून एकेक काढेपर्यंत मालकांनी विचारलं,"काय मग कितीपर्यंतचे दाखवू?". 

हा मुद्दा मात्र एकदम महत्वाचा होता. तिकडे नेकलेसचे समोर ठेवलेले सेट बघता बघता दीपूनेही कान टवकारले होते. 

"तीनेक तोळ्यांचं दाखवा.",आई म्हणाली. 

"बरं, अरे तो दुसरा मंगळसूत्र सेट काढ त्याच्या शेजारचा", काकांनी ऑर्डर बदलली होती. 

        दोन्ही प्रकारची पाकिटं समोर ठेवली गेली. आता प्रत्येक डिझाईन बघताना आधी त्याचे दर बघूनच आई घेत होती तर दीपूला एखादा आवडला असूनही तो 'घ्या' असं सांगता येत नव्हतं. शेवटी दर आणि त्यातल्या त्यात ठीकठाक वाटणारं मंगळसूत्र घेऊन ते बाहेर पडले. 

तिने रात्री चिरागला फोनवर झापलंही. 

"काय रे? इकडे आम्ही इतका खर्च करतोय, तुला कळत नव्हतं का मला कुठलं आवडतंय ते?". 

"अगं मला कुठे त्यातलं काय कळतंय इतकं? ", चिराग. 

"हो का? इतका बावळट आहेस का तू?", यावर मात्र चिराग चिडला. 

"काय फरक पडणार आहे? हजारो डिझाईन मिळतील नंतर.", असं बोलला. 

"म्हणजे लग्नात घायच्या मंगळसूत्राला काहीच किंमत नाही का? असंच बदलून टाकायचं?", तीही चिडली. 

"जाऊ दे ना आता यावरही वाद घालायचा आहे का?", चिरागने विचारलं. 

तिने 'बाय' म्हणून फोन ठेवून टाकला. 

आता असंही लग्न होणारच असल्याने कुणीही एकमेकांचा रुसवा-फुगवा काढत नव्हतं. फक्त लग्न उरकून टाकायचं इतकंच ध्येय होतं. 

                                                 ---------------------------------

        आता दिवस सरतील तसं त्याच्या घरीही तिचं येणं जाणं वाढलं होतं. त्याची आईही हक्काने 'चहा बघू गं तुझ्या हातचा कसा होतो?' वगैरे बघत होती. एकदा चिरागच्या घरी त्याचे मावशी-काका घरी आले असताना दीपूने कौतुकाने चायनीज जेवण बनवले. 

बोलताना तिने चिरागला हाक मारली तशी मावशी म्हणाली,"काय गं नावाने हाक मारतेस का?". 

ती नुसतीच हसली. कुणीच काहीच बोललं नाही. तो एक अवघडलेला क्षण तिने पार पाडला होता. 

मनात आलं होतं अगदी बोलावं,"तुमच्या समोर चिराग तरी म्हणतेय. इतके वर्षं ओळखतीय त्याला. चिऱ्या म्हणत नाही नशीब." पण ती गप्प बसली आणि चिरागही. 

सर्व जेवण झाल्यावर अगदी साफ-सफाई करून दीपू रात्री उशिरा घरी आली. 

घरी आई म्हणालीही,"असं लग्न ठरलेल्या मुलीनं इतक्या उशिरा फिरणं बरं नव्हे."

"तुझं काही पण असतं आई. चिराग आला होता मला सोडायला. मस्त झालं होतं जेवण सर्वांना इतकं आवडलं. मावशी-काकांना पण. आपण करू विकेंडला." दीपू बोलली. 

इतक्यात फोन वाजला. आईने फोन घेतला. बराच वेळ ती ऐकत होती. दीपूला कळत नव्हतं इतका वेळ काय चालू आहे. तिने फोन ठेवल्यावर विचारलं. 

"तुझ्या सासूबाईंचा फोन होता. खास काही नाही म्हणाल्या. निघताना तू काका-काकूंना नमस्कार केला नाहीस का?" आईने विचारलं. 

"त्यांना काय नमस्कार करायचा? येत-जाता उगाचच? आता कधीतरी आल्या तर ठीक आहे. नेहमीच असतात ते तिथे ना?" तिने विचारलं. 

"असं नाही गं. पण लोकांना फार हौस असते नवीन सुनेकडून मान-पान करून घ्यायची.",आई. 

"ते म्हणाले का तसं त्याच्या आईला?", दीपूने विचारलं. 

"नाही तसं काही बोलले नाही ते म्हणाल्या. पण त्यांना म्हणे वाईट वाटलं इतका पण मान दिला नाही म्हणून.
करत जा ना. जरा नवीन आहे तोवर. नंतर काय आहेच मग रुटीन.", आईनं समजावलं. 

"तुझं ना उगाचच आई. मी काय सारखी हाता-पाया पडायला जाणार नाहीये हम्म." दीपूने बजावलं. 
तिला आता फारच राग येत होता. त्या सगळ्याच लोकांचा. 

"आणि ते तुला का सांगत होते हे? तू काय करणार होतीस? इतकं वाटतं तर मला बोलायचं ना समोर?",दीपू. 

"म्हणत होत्या 'सॉरी' म्हणून एक फोन कर मावशीला.",आई. 

"काय? सॉरी? मी कशाला फोन करू? मी काही फोन नाही करणार.",तिने सरळ सांगितलं. 

"जाऊ दे ना. आता हे असंच असतं बघ. म्हणतात ना, मुलीला वळण लावायचं, हेच ते बघ. काही झालं तरी ते आमच्याकडे येतंच." आईने सांगितलं. 

यावर मात्र तिने चिरागलाच फोन लावला. 

"हॅलो चिराग? काय प्रॉब्लेम झाला नक्की?", ती बोलत असतानाच आईने फोन हातातून घेऊन कट करून टाकला. 

आता आईसमोर बोलून काही फायदा नाही हे तिला कळलं होतं. 

रात्री त्याच्याशी बोलताना तिने विचारलं,"इतकं काय रे त्यांना झालं माझ्या घरी फोन करायला? बाकी जेवण बनवून खायला घातलं, आवरलं ते नाही दिसलं त्यांना? ती काय माझीच कामं आहेत का? का सून म्हणून मी ती करायची हे आतापासूनच तुम्ही गृहीत धरलंय?". 

"अगं आईची एकुलती एक बहीण आहे. दोघी एकदमच जवळच्या आहेत. त्यामुळे तुही तिला सुनेसारखीच आहेस. वाटलं तिला. मलाही सासूसारखं मान द्यावा म्हणून." चिराग बोलला. 

"मग तू पण आमच्या घरी उठ-सूट सर्वांच्या पाया पडशील का? का तू मात्र जावई आणि मी सून म्हणून हे असे वेगळे नियम?",तिच्या रागाला पारावार नव्हता आता. डोकं रागाने दुखायला लागलं होतं. 

"चिराग, मी आता काहीच बोलू शकत नाहीये. बाकी त्या सर्वांपेक्षा तुझा जास्त राग येत आहे मला.",तिने स्पष्ट सांगितलं. 

"माझ्यावर का? मी काय केलंय?" त्याने विचारलं. 

"त्या घरात मी येतेय ती तुझ्यासाठी म्हणून. नाहीतर त्या घरात मला काहीच स्वारस्य नसतं. आई-वडील ठीक एकवेळ, हे असले नातेवाईक तर मुळीच नाही. आता आईनी फोन केला त्याआधी तू का नाही बोललास त्यांना? तुला माहीत आहे ना मी कशी आहे? नमस्कार केल्यानेच मान मिळतो असं नाही ना?", दीपू. 

चिराग फक्त ऐकत होता. 

 "तू ठरव तुला नक्की काय हवंय? केवळ मी का हे बाकी सर्व लटाम्बर?", तिने विचारलं. 

"तू मला धमकी देतीयस का?" त्याने रागाने विचारलं. 

"धमकी नाही विचार करायला सांगतेय. आपण कुठे होतो आणि कसे झालो आहे याचा विचार कर. आणि खरंच हे तुला हवंय का तेही.",इतकं बोलून तिने फोन कट करून टाकला. 

दीपूच्या मनात आजतागायत कधीच न आलेला विचार येत होता,"खरंच मला चिरागशी लग्न करायचं आहे का?"..... 

क्रमश:

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, June 06, 2017

कळलेच नाही.... तुझ्या प्रेमात.... -भाग ३

गाडीत कुणीच कोणाशी बोललं नाही. चिरागही कसलातरी विचार करतोय असं त्याच्या आई-वडिलांना वाटत होतं. घरात गेल्यावर मात्र बाबांनी विषय काढला. 
"चांगलं वाटलं स्थळ मला तरी. तुम्हाला काय वाटतं?" त्यांनी दोघांकडे पाहून प्रश्न विचारला. 

"तसं ठीक होतं. मुलगी सावळी वाटत होती नाही आपल्या चिरागपेक्षा?" आईने विचारलं आणि चिराग एकदम दचकला. आपले आई-वडील असाही विचार करू शकतात हे तत्याच्या डोक्यातच आलं नव्हतं. 

"त्याचं एव्हढं काही नाही, बाकी घरदार, शिक्षण चांगलं आहे. बोलायलाही चांगली वाटली मला. तुला काय वाटतं चिराग? तूच तिच्याशी बोललास.",बाबांनी विचारलं. 

चिरागने विचार केल्यासारखं करून उत्तर दिलं,"असं एका भेटीत सांगता येत का? ते पण लग्नाचा विषय. अजून एक-दोनदा तरी भेटायला हवं ना?". 

"ह्म्म्म तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण त्यांची परवानगी पाहिजे ना? त्याशिवाय कसं करणार?", बाबा म्हणाले. 

"देतील की का नाही देणार? एव्हढा चांगला मुलगा आहे तर...",आईने एकदम ठसक्यात विचारले. 

"तसं नाही, पण काही मत असतात लोकांची.",बाबा. 

"मला तरी ते तसे मॉडर्न वाटले, विचारा तुम्ही. मग बघू..", चिरागने शेवटचं वाक्य टाकलं. 
                                    
                                                 -------------------------

 दोन दिवसांनी संध्याकाळी त्यांच्या नेहमीच्या कॅफेमध्ये ते भेटले. 

दीपूने विचारलं,"काय रे? इतका भाव खातोयस? म्हणे मुलीशी अजून बोलायचं आहे. बाबा नाही म्हणाले असते तर?". 

"तर काय तू पटवलं असतंच की?",चिराग.

 "आई काय म्हणाली माहितेय? अगदीच बरोबरीचे वाटत होते उंचीत." तिने सांगितलं. 

"हो का? आणि तू सावळी म्हणे आमची आई. काय पण या आया ना? उगाच खुसपट काढत असतात. "

"जाऊ दे रे. पण हे असं फुल-टू परमिशन घेऊन भेटायला भारी वाटतंय ना? नो टेन्शन.."दीपू खूष होती. 

"म्हणून तर बोलावलं. आणि एकदम खरं वाटलं पाहिजे ना नाटक. त्याशिवाय मजा काय? म्हातारपणी याच आपल्या आठवणी होतील, होय की नाही?", चिराग म्हणाला. 

त्याच्या हुशारीचं भारी कौतुक वाटलं तिला. :) तिने होकारार्थी मान डोलावली. निवांत गप्पा मारून, आपली नेहमीची ऑर्डर खाऊन-पिऊन झाल्यावर ते निघाले. 

"ए बास हा आता, आजच फोन करून सांगून टाक होकाराचा." दीपू म्हणाली. 

"बाप रे, किती ती घाई.... हो...हो.. करतो गं. काळजी करू नकोस." चिरागने आश्वासन दिलं. 

रात्री दोघांचं आपापल्या घरी बोलणं झालं. बराच वेळ तिने फोनची वाट पाहिली. रात्री अकरा नंतर तिने अपेक्षा सोडून दिली. 

'फोन का केला नाही?' तिने मेसेज केला रात्री उशिरा. 

'बाबा म्हणाले इतकी काय घाई आहे? करू की सावकाश?', त्याचं उत्तर. 

त्याच्या 'गुड नाईट..'ला तिचं उत्तर आलं नव्हतं. 

                         -----------------------------------------

शेवटी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी एकदाचा फोन वाजला. बाबांच्या बोलण्याकडे कान लावून ती जेवत होती. फोन ठेवल्यावर आई विचारणार हे माहीतच होतं. त्यामुळे तिने अजिबात घाई केली नाही. 

"काय म्हणाले?", आई. 

"होकार आहे म्हणाले मुलाचा. मग मीही सांगितलं आमच्याकडून 'हो' आहे म्हणून.",बाबा. 

"मग?", आई. 

"काही नाही. याद्यांना कधी बसायचं याचा मुहूर्त काढू म्हणाले. ते बघतीलच, मीही उद्या जाऊन येतो भटजींकडे.", बाबा म्हणाले. 

न राहवून तिने विचारलं,"याद्या? ते कशाला?", दीपूला आतून चिरागवर प्रचंड संताप होत होता. 

"अगं कशाला म्हणजे? सगळं लग्नाचं, देवाणघेवाण ठरवायला नको का?", आईने समजावलं. 
तिने भराभर चार घास गिळले आणि आतल्या गच्चीतून तिने त्याला फोन केला. त्याने तो कट केला होता. 

शेवटी तिने मेसेज केला,"काय रे याद्या कशाला?". 

"मी सांगून पाहिलं ऐकत नाहीयेत, सॉरी. मघाशी तेच बोलत होतो तुझा कॉल आला तेंव्हा. उद्या कॅफे मध्ये बोलू. शांत हो." त्याचं उत्तर आलं होतं. 

घरी दोघांनीही बोलून त्यांचं कुणी ऐकलं नव्हतं. आता इतकं सर्व होत आहे तर पुढे काही बोलताही येत नव्हतं. 
एकदा चिराग बोललाही,"कशाला देवाण-घेवाण?" तर आई म्हणाली होती,"दोन दिवसांत तुला भारीच जवळीक झालेली दिसतेय त्या मुलीशी."

हा असा संशय घेतल्यावर तो गप्पच बसला. आता घरच्यांना 'काय करायचे ते करू दे' असा विचार दोघांनी केला. ते ठीक आहेत तर आपण कशाला अडवायचं? 
                         -----------------------------------------

एकेक दिवस सरत गेला. याद्यांसाठी चिरागच्या घरचे आणि जवळचे नातेवाईक येणार होते. तिच्या घरीही केटरिंग, साफसफाई हे चालूच होतं. याद्या पार पडल्या तर लगेचच 'साखरपुडाही करून घेऊ' म्हणाले होते बाबा. दीपूला घरातले एकेक खर्च दिसत होते आणि तिची चिडचिड होत होती. तिकडे चिरागच्या घरीही तेवढंच काम होतं. 

"मुलीसाठी साडी घ्यायची आहे. कधी जायचं?",आई म्हणाली. 

"मी जातो ना? एखाद्या मैत्रिणीला घेऊन जातो ऑफिसमधल्या", तो म्हणाला. 
आईने संशयाने पाहिलं. 

"अगं म्हणजे काय ती फॅशन वगैरे बघून घेतील ना?" चिरागने सारवासारव केली. 

"अरे वा, किती काळजी फॅशनची, बघितलं का हो?मला कधी घेतली नाहीस ते?", आईचे टोमणे काही सुटत नव्हते. 

"बरं बाई नाही जात. तुला घेऊ ना लग्नाची. तू म्हणशील तिथून.", चिराग बोलला. 

"जाऊ दे, घेऊन ये पाहिजे तशी. पण हां उगाच महागाची घेऊ नकोस हं. घे आपली हजार-बाराशे पर्यंत." आईने बजावलं. 

चिराग मग दीपूला हवी तशी साडी तिच्यासोबत जाऊनच घेऊन आला. रिसीट मात्र सोयीस्कररीत्या त्याने हरवली होती. अर्थात साडीच्या किमतीची कल्पना आईला बघूनच आली होती. 

                         -----------------------------------------
याद्यांच्या दिवशी दीपूचं घर पाहुण्यांनी भरून गेलं होतं. तीही एकदम सजून-नटून तयार होत होती. आई-बाबा, काका-काकू, मावशी सगळे कामाला लागले होते. नाश्ता,चहा पाणी झालं. दोन्ही घरातले पुढारी आपली जागा पकडून बसले. याद्यांना सुरुवात झाली. 

त्याचे मामा बोलले,"हे बघा, फार पटकन होऊन जाईल काम. तीनच गोष्टी आहेत. आपापले मान-पान त्या-त्या बाजूने करायचं. लग्नं मुलीकडच्यांनी लावून द्यावं. आम्ही रिसेप्शन करू. मंगळसूत्र आमच्याकडे आणि बाकी तुमच्याकडून तुम्ही काय ते ७-८ तोळे सोनं घाला मुलीला. काय वाटतं काका?",मामांनी दीपूच्या काकांना विचारलं. 

मागणी आली तसे आपापल्या बाजूला मागे बसलेले चिराग आणि दीपू दोघेही दचकले. प्रेमात या सगळ्या गोतावळ्याला जमवून मोठाच घोळ घातलाय आपण हे त्यांना कळलं होतं. 
तिचे बाबा काकांशेजारीच बसले होते. ते काकांच्या कानात काहीतरी बोलले. 

"लग्नं गावातच करू इथे, चांगला हॉल वगैरे बघू. पण आपापले पाहुणे मात्र जेवण-झोपायची व्यवस्था तुम्ही बघून घ्या.काय वाटतं? ",काका म्हणाले. 

"अहो असं काय करताय? पाहुणचार नको का पाहुण्यांचा आमच्या? पहिलंच लग्न आमच्या घरचं हे, मोठं नको का करायला?",मामा. 

इकडे दीपूचा राग वाढतच होता. ती आत गेली आणि तिने त्याला मेसेज केला,"अरे काय चाललंय? बोल की काहीतरी?"
"काय बोलू? इतके लोक आहेत समोर, उगाच नाटक नको." चिरागचं उत्तर. 
"तू बोलतोस का मी बोलू?" तिने विचारलं. 
तो उत्तर देणार इतक्यात शेजारी बसलेले मावशीचे मिस्टर त्याच्याकडे डोळे वटारून बघू लागले. त्याला नाईलाजाने फोन बंद करावा लागला. 

"अहो आमचे पण पाहुणे येतीलच ना गावाकडून. दोघांचंही आम्हीच करायचं? बाकी सगळं मान्य आहे. आमची एकुलती एक पोरगी आहे. सगळं हौसेनं करू."काका आग्रहाने बोलले. 
मामांनी शेजारी बसलेल्या त्याच्या वडिलांच्या कानात खुसपूस केली आणि मान हलवली. दोन्ही कडच्या मंडळींनी सह्या केल्या, याद्या झाल्या. दोन्हीकडची मंडळी काहीच झालं नाही या आविर्भावात एकमेकांना हसून खेळून बोलू लागली. 

"साखरपुड्याची तयारी करा." भटजींनी आरोळी ठोकली. 

त्याच्या घरच्या बायका जमल्या, तिच्यासाठी ओटी तयार केली. तीही दिलेली साडी नेसून बाहेर आली. त्याच्या मावशीने तिच्या साडीच्या पदराला हात लावून पाहिला."छान आहे हं साडी.", मावशी म्हणाली. 
"चिरागची पसंती आमच्या",आईने तत्परतेनं उत्तर दिलं होतं. 

दोघांचे पाट समोरासमोर मांडले गेले. दोघांनी अंगठ्यांची अदलाबदल केली. टाळ्या वाजल्या. 

"आमची झाली हो पोरगी",म्हणत त्याच्या मावशीने तिला जवळ ओढलं होतं. 

दीपूला मात्र कशातच आनंद वाटत नव्हता. चिरागला तिच्या चेहऱ्यावरची नाराजी अजूनही दिसत होती. ज्या क्षणाची दोघे इतकी वाट बघत होते तो प्रत्यक्षात येत असताना, दोघांच्याही चेहरयावर आनंद मात्र दिसत नव्हता. 

क्रमश: 

विद्या भुतकर. 

Monday, June 05, 2017

कळलेच नाही.... तुझ्या प्रेमात.... -भाग २

        बेडरूमचं दार बंद झालं आणि दोघेही एकमेकांकडे पाहून आनंदाने चित्कारले. त्याने तिला दटावून तोंडावर बोट ठेवलं. तरी तिच्या मनातला आनंद आणि चेहऱ्यावरचं हसू कमी होत नव्हतं. घुसळून ती त्याच्या मिठीत शिरली आणि त्यानेही तिला प्रेमाने थापटलं. प्रेमाचा भर ओसरला तसे दोघे गादीवर बसले. ती त्याला चिकटून बसली आणि तो जरा भानावर आला. 
म्हणाला,"जरा लांबच बसा दीपा मॅडम. मी एकदम सभ्य मुलगा आहे, मघाशी ऐकलंस ना?". 

"सभ्य म्हणे, डोंबल माझं. तोंड बघ जरा आरशात. शनिवारी भाजीही तोच आणतो हां..." त्याच्या आईची नक्कल करत ती बोलली. 

"सांगू का कुठल्या भाज्या घ्यायला जातोस ते? तुझ्यासाठी आधी जाऊन भाज्या घेऊन बसावं लागतं मला." दीपूने त्याच्या खांद्यावर रागाने चापट मारली. 

"गप्पं बस हा, नाहीतर सांगेन आईला..."

"हो सांग ना...  आईचं शेपूट. निदान फॉरमॅलिटी म्हणून तरी दोन प्रश्न विचारायचेस? तुझ्यापेक्षा मीच बरी." दीपूने चिडवले. 

"आणि काय रे, तुला सांगितलं होतं ना वेळेत ये म्हणून...उशीर का केलास?" तिने पुढे विचारलं. 

"अगं वाटलं पाहिजे ना मुलाकडचे लोक आहे ते, म्हणून उशीर केला. बाय द वे, तू साडी का नेसली नाहीस? मी सांगितलं होतं ना?", चिराग. 

"गपे... उगाच नाटकं करू नकोस. मला नाही आवडत साडी-बिडी. ", दीपू लटक्या रागाने बोलली. 

"ते जाऊ दे, समोशाची आयडिया भारी होती हां.." तो म्हणाला. 

"हो ना... आमच्या चिरागला आवडतात हो...." तिने पुन्हा त्याच्या आईची नक्कल केली. 
"दुसरा कुणी असता तर नुसतं त्या कारणानेच नाही म्हटलं असतं, असला शेम्बडा आहे म्हणून..". 

"म्हण ना मग मला पण....म्हणून तर दाखव...." म्हणत त्याने तिला आपल्या जवळ ओढले आणि म्हणाला,"पण खरंच थँक्स, माझ्यासाठी तू या बोअरिंग प्रोसेस मधून जातेयस. आई-बाबा खूष होते आज एकदम. त्यांनी पाहिलेल्या मुलीला बघायला मी फायनली होकार दिला म्हणून. नाहीतर पियुष चा डिव्होर्स झाला तेंव्हापासून त्यांनी अपेक्षाच सोडून दिल्या होत्या आमच्या लग्नाच्या."

"ह्म्म्म ठीक आहे रे, तुझ्यासाठी काय वाट्टेल ते.... गरज वाटली तर तुला पळवूनही नेला असता. हे 'बघणं' तर काहीच नाही. " दीपू म्हणाली. 

         चिरागच्या भावाने हट्टाने लव्ह-मॅरेज केलं होतं अमेरिकेतच आणि वर्षभरात त्याचा डिव्होर्सही झाला होता. त्यामुळे तो लहान असूनही त्याच्या लग्नाला होकार देणारे आई-बाबा आता त्या पध्द्तीच्या अगदीच विरुद्ध झाले होते. आई-वडील, नातेवाईक, घरचं सगळं पाहिल्याशिवाय होकार द्यायचाच नाही मुलीला हे त्यांनी मनाशी पक्कं केलं होतं. कितीही ठरवलं तरी प्रेम ठरवून थोडीच टाळता येतं? चिराग नाही म्हणता म्हणता दीपूच्या प्रेमात पडलाच होता.  वर्षभर झालं त्यांचं चोरून भेटणं चालू होतं. ती तरी घरी किती थांबवणार? 

        हा दिवस पाहण्यासाठी त्यांना कितीतरी युक्त्या कराव्या लागल्या होत्या. आधी त्यांच्या जातीतल्या मुली पाहिल्या, त्या त्याला पसंत पडत नव्हत्याच. मग त्याने विचारलं, "तुम्हाला महत्वाचं काय आहे? मुलगी तुमच्या पसंतीची हवी का जातीतली? नक्की ठरवा. " 

        हळूहळू मग त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या मुलीही पाहिल्या. मग एक दोनदा चिरागनेच वेबसाईटवर लॉगिन केले आणि तिचा प्रोफाईल चेक केला. त्याने तो दोन तीनदा पाहिल्यावर ती वेबसाईट आपलं काम करत होती. पुन्हा पुन्हा मागचे व्हीव्यू समोर आणून दाखवत होती. हे होतंय याची खात्री पटल्यावर त्याने एकदा आई-बाबांना त्या वेबसाईटवर बघायला सुचवले. समोर ती आलीच. हो-नाही करत त्यांनी भेटायचं, बोलायचं ठरवलं. त्यानेही 'हां, ठीक आहे.. म्हणून होकार दिला होता. आजचा दिवस उजाडला आणि आपण असे समोर आहोत एकमेकांच्या यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता खरंतर. 

कितीतरी वेळ त्यांनी मग पुढे काय करायचं यावर चर्चा केली. बाहेर गप्पा चालूच होत्या. 

"चल जायचं का बाहेर?", चिरागने विचारलं. 

"बैस ना जरा वेळ... अजून भारी वाटतंय." ती म्हणाली. 

"घर छान आहे हा तुमचं...",आजूबाजूला बघत चिराग बोलला. 

"हो, थँक्स..."... 

"या फोटोतली तू आहेस का? मुलाच्या कपड्यात? चेहऱ्यावरची आठी मात्र तशीच आहे अजून... खडूस कुठली..." चिराग म्हणाला. 

बाहेर कुणाची तरी चाहूल लागतेय असं वाटलं तसे दोघेही दार उघडून बाहेर पडले. 

"काय बऱ्याच गप्पा मारलेल्या दिसतायेत??", चिरागचे वडील बोलले. चिराग नुसतंच हसला. 
दीपूची मानही खालीच होती. 

पाचेक मिनिटांत त्याच्या वडिलांनी मुक्काम हलवला. "चला, येतो आम्ही. कळवूच एक-दोन दिवसांत. आज-काल आपल्या हातात काही नसतं, मुलं म्हणतील ते. "

त्यावर सगळे हसले...जोरजोरात.... त्याच्या आईने आणलेले पेढे आणि केळी तिच्या हातात दिली. हळदी-कुंकू लावलं आणि सर्व निघाले. दीपूला आईने 'पाया पड' अशी खूण केली. पण तिने सरळ ती धुडकावून लावली होती. 
सर्व पाहुणे बाहेर पडले आणि तिच्या आईने सुटकेचा निःश्वास सोडला आणि सोफयावर जरा आडवी झाली. दोन तासांचा कार्यक्रम पण किती ती दगदग. कुणी काहीच बोलत नव्हतं. 

मग आईनेच विषय काढला,"कसा वाटला तुम्हाला?"

बाबा,"ह्म्म्म ठीक होता."

आई,"उंची जरा कमी आहे ना? दोघे शेजारी उभे राहिले तर एकदम बरोबर दिसत होते.". 

दीपूने यावर कधी विचारच केला नव्हता. ती नुसतंच 'ह्म्म्म' म्हणाली. 

"बाकी चांगला वाटला, घरचे नीट बोलत होते तसे.",बाबा. 

"नाही हो, आई किती शिष्ठ वाटत होती. साधं घर छान आहे असंही म्हणाली नाही.", आईला काही ती बाई आवडली नव्हती. 

"हे बघ आधी मुद्याचं बोल, मुलगा कसा वाटला?",बाबांनी डायरेकट विचारलं. 

"चांगला होता. शिक्षण, दिसायला, घरदार सगळं चांगलं वाटतंय", आईने मुलावर फोकस केलं. 
दीपू त्यांची तोंडं बघत होती फक्त. 

"तू सांग की गं?" तिला आईने विचारलं. 

"मी काय सांगू? ठीक होता. असं एका भेटीत कळतं थोडीच? बघू विचार करते.",दीपूने आव आणला होता. 

"मला ना एका गोष्टीचं टेन्शन वाटतंय हो",आई. 

"कशाचं?" दीपू. 

"त्यांच्या छोट्या मुलाचं लग्न झालेलं म्हणे, आणि लगेच डिव्होर्सही. काय असेल कारण काय माहित? मला तर तेच एक टेन्शन वाटत आहे. 

आईचा चेहरा चिंताग्रस्त झाला होता आणि इतका वेळ जरा पॉसिटीव्ह असलेले बाबाही जरा विचार करू लागले. आणि दीपूला 'पुढे काय होणार?' या काळजीने ग्रासलं. 

कधी एकदा त्याच्याशी बोलतेय असं तिला झालं होतं. 'त्याचे आई-बाबा हो म्हणाले की घरी समजाऊ आपण', असा विचार तिने केला. 

तिकडे चिरागच्या घरीही चर्चा चालू होतीच.... 

क्रमश:

विद्या भुतकर. 

Sunday, June 04, 2017

कळलेच नाही.... तुझ्या प्रेमात.... -भाग १

दीपूच्या घरी सकाळपासून धावपळ चालली होती. तिची आई मावशींना मागे लागून दमली.

"अहो जरा त्या कोपऱ्यातून घ्या की ! सोफ्याच्या मागे सगळी धूळ जमली आहे. किती वेळा सांगायचं."

मावशींनीही उगाच थोडं हात ताणल्यासारखं कोपऱ्यात हात फिरवला. त्या कोपऱ्यातली जराशी धूळ फडक्याला चिकटून बाहेर आली आणि आधी पुसलेल्या फरशीलाही लागली. आईनी आता डोक्यावर हातच मारला.

"अगं काय जरा बघ की फरशीवरची घाण. किती वेळा सांगू आता?". आई 'अहो' वरून  'अगं' वर आली होती. 
मावशींनी पुन्हा हात फिरवल्यासारखं केलं. आता आई दमलीय हे दीपूला कळलं होतं. पण त्या दोघीना पाहण्यात तिला आज जरा जास्तच आनंद मिळत होता. डायनींग टेबलच्या एका खुर्चीवर बसून हातातलं फळ दाताने तुकडा तोडत ती गालातल्या गालात हसत होती.

आईकडे बघून ती बोलली,"अगं आई, पण तुला काय इतकं हवंय? जरा धूळ असली तर काय पाहुणे पळून जाणार आहेत?"

आई वैतागून म्हणाली,"हो तू बस निवांत. काम करून पाठ मोडली तरी चालेल. तुझं लग्न थोडीच आहे? बरोबर ना?"

"असं नाही, पण तुम्ही दोघं उगाच सगळं 'पर्फेक्ट' दाखवण्याचा हट्ट करताय? राहू दे ना आहे तसं." दीपू.

"हम्म पण आता इतके बायोडेटा पाहून, कितींना नकार दिलास तू. आता एक येतंय तर सगळं नीट पाहिजे ना?"

"बरं तू म्हणशील तसं.",दीपू.

"चांगलं आहे ना त्याच्या घरचं सगळं. मुलगाही बरा दिसत होता. आता आपल्याच गावात, पाहिजे तसं असलेला मुलगा येतोय तर आपणही थोडे प्रयत्न नको करायला?" आईने विचारलं.

"हम्म म्हणून तर पार्लरला जाऊन आले ना. नाहीतर असं ऐकलं असतं का मी?" दीपू आईच्या गळ्यात पडत बोलली.

"ठीक आहे कळलं. चल जरा कांदा चिरून दे आणि खोबरं खवून ठेव. मी अंघोळ करून येते." आई म्हणाली. 

"शी काय ते पोहे ! मी काय म्हणते आपण एक काम करू ना बाहेरून ढोकळा आणि सामोसे आणू बेकरीतून. मग सोबत चहा, सरबत म्हणशील ते ठेवू. जरा चेंज सर्वांनाच, येणारे पाहुणे पण पोहे खाऊन कंटाळले असतील." दीपूने आयडीया दिली. 

तसा आईनेही थोडा विचार केला. हरकत नव्हती खरंतर. तिने बाबांकडे पाहिलं. इतका वेळ पेप्रात घुसवून ठेवलेलं डोकं त्यांनी जरा वर काढलं आणि मान हलवली. तशी आई चिडलीच. 

"हां डोलवा नुसत्या माना. तुम्ही आणि तुमची लेक काहीही करू नका मीच मरते सगळीकडे. उठा घेऊन या ढोकळा आणि सामोसे. आणि तिखट-गोड चटणी जरा जास्त घेऊन या. चला उठा उठाच आता" म्हणत आईने त्यांचा पेपर काढून घेऊन त्यांना उठवलंच. "

 बाबा पिशवी घेऊन बाहेर पडले. आई अंघोळीला आणि दीपूचं काम आता त्यांच्यावर गेल्याने ती पुन्हा आरामात बसून राहिली, कुठेतरी बघत,विचार करत. यावेळी आलेल्या मुलाला तिने भेटायला तरी होकार दिला याच आनंदात आई-बाबा होते. तिने पुन्हा एकदा त्याचा बायोडेटा पाहिला. शिक्षण, वर्ण, वय, नोकरी, पगार, उंची आणि त्याचा फोटो. सर्व पाहून ती थोडी हसली आणि तयार होण्यासाठी एकदाची उठली. 
      
           दीपूला साडी नेस म्हणून केलेल्या सूचनेला तिने काही भीक घातली नव्हती. मागच्या दिवाळीतला चुडीदार घातला तिने. केस धुवून, सुकवून, सेट केले तिने, थोडासा मेक-अप ही केला. सगळे खायचे पदार्थ नीट सुंदर काचेच्या भांड्यांमध्ये काढून, सजवून झाले, घरातलं एकेक कस्पट उचलून झालं, सोफयावर बसून राहायची प्रॅक्टिसही झाली सर्वांची. इकडे आईचा जीव खालीवर, कधी येणार काही येणार.  दीपू तर जाम वैतागली होती. 'लोकांच्या वेळेला काही महत्व असतं की नाही' वगैरे वाक्यही बोलून झाली. आईने त्यावर,"तू शांत राहा आणि उगाच ते आल्यावर चिडचिड करू नकोस" असं चार वेळा समजावलं. फोन करायचा की नाही या विचारात असतानाच बेल वाजली. सांगितलं होतं त्या वेळेपेक्षा तासभर उशिराच आली सर्व मंडळी. 

         बेल वाजली तशी दीपू आत गेली. दीपूने रागानेआईकडे बघून घेतलं. आईने तिला दटावलं. मुलगा आणि त्याचे आई-वडील इतकेच लोक आले होते. 

"या या बसा ना" म्हणत बाबांनी सर्वांना बसवून घेतलं. आई सर्वांना 'नमस्कार, पाणी आणते हं' म्हणत आत गेली. 
दीपूकडे बघून थोडं हसली. तिने डोळ्यांनीच 'काय?' म्हणून विचारलं. आईनेही डोळे उघड-बंद करून 'शांत राहा' अशी खूण केली. पाण्याचा ट्रे घेऊन ती बाहेर आली आणि परत आत जाऊन दीपूच्या हातात खाऊच्या पदार्थांचा ट्रे दिला. तिची चिडचिड झाली 'हे असं' जायला लागतंय म्हणून. 

        तिकडे बाबांनी बेसिक प्रश्न विचारून झाले होते, उशीर झाला, ट्रॅफिक होतं का, किती गरम होतंय ना आजकाल वगैरे. मुलाच्या वडिलांनीही त्याची व्यवस्थित उत्तरं देऊन झाली होती. मुलाच्या आईने घर, घरातल्या वस्तू, फर्निचर, इ वर एक नजर फिरवून झाली होती. मुलगा एकदा पाण्याचा ग्लास, एकदा स्वतःचे पाय, एकदा तिचे बाबा तर एकदा आपले बाबा यात तर टी-टी च्या मॅचसारखी मान हलवत होता. ती आली तशी सर्व एकदम शांत झाले. तिने अलगद ट्रे टेबलवर ठेवला आणि एका सिंगल खुर्चीवर बसली. 

'ही दीपा', बाबांनी माहित असलेली माहिती पुन्हा दिली. 

मुलाच्या बाबांनी 'मी मनोहर, आमची बायको आणि हा चिराग' अशी ओळख करून दिली. 

दीपूने सर्वांकडे पाहून एक कॉमन नमस्कारासाठी हात जोडले.  बाबांनीच तिची माहिती सांगितली, तिचं शिक्षण, नोकरी, इ बद्दल. मधेच आईने 'घ्या ना ढोकळा, सामोसा' असं म्हणून प्लेट हातात द्यायला सुरुवात केली. मुलाच्या आईनी प्लेट घेता घेताच सांगितलं, "अरे सामोसा खूप आवडतो चिरागला" . 

त्यावर आईने कौतुकाने सांगितलं,"हो ना, दीपूच म्हणाली, पोहे वगैरे नको करू, बदल म्हणून हा पर्याय चांगला आहे म्हणून. तसा स्वयंपाक चांगला करते ती. घरातल्या सर्व स्पेशल डिश तिच्याच असतात. मला काय ते येत नाही काही." 'हो उगाच मुलीला बाहेरचं खायला आवडतं' असं वाटायला नको ना. 

तिकडे बाबांची चिरागच्या बाबांच्या मित्राची जुनी ओळख निघाली. त्यामुळे ते दोघे बोलण्यांत व्यस्त होते. चिरागने प्लेटमधला सामोसा संपवून टाकला होता. दीपू 'पुढे काय?' या विचारात होती. ती त्याच्या हालचालींकडे बघत होती आणि तो आपला खालीच. 

त्याच्या आईने सांगितलं,"तसा शांत स्वभावाचा आहे चिराग. एकदम घरच्या कामात वगैरेही मदत करतो. उगाच बाकी पोरांसारखे दिवसभर गावभर फिरायचे अजिबात आवडत नाही त्याला. शनिवारी भाजीही तोच आणून देतो. 
" आईच्या डोळ्यांत पोराचा अभिमान उतरला होता. 
घरात कोण कोण असतं यावर, नातेवाईक यावर चर्चा सुरु झाली. 

"आमचा छोटा मुलगा आहे, तो अमेरिकेत असतो. आय-टी मध्ये आहे." त्याच्या बाबांनी सांगितलं. 

"मग तुम्ही जाऊन आला की नाही?" दीपूचे बाबा. 

"हां आता एकदा याचं जुळलं की मग जाऊन येऊ. " चिरागच्या आईनी सांगितलं. 

"हो बरोबर आहे, काळजी असतेच पोरांची. कामं सोडून असं जायला नाही जमत", दीपू ची आई बोलली. 
त्या सर्वांची बोलणी चालू असताना हे दोघे मात्र गप्पच. शेवटी त्याचे वडील म्हणाले,"तुम्हाला चालणार असेल तर, मुलांना बोलू दे एकटं पाहिजे तर. आमची काही हरकत नाही. " 

तिचेही बाबा म्हणाले, "हो हो, बरोबर त्यांना हे असं बोलता येणार नाही निवांत. आपण ताव मारू तोवर बोलतील ते आतल्या खोलीत." 

हे असं बोलणं झालं की तिची आई लगेच उठली आणि त्या दोघांना आतल्या खोलीत घेऊन गेली. 'पलंगावरचं थोडंफार आधीच आवरून ठेवलं ते बरं झालं' असं तिने मनात बोलूनही घेतलं. 
त्यांना बसवून हलकंसं दार ओढून ती बाहेर गेली. बाहेर त्यांच्या गप्पा पुन्हा सुरु झाल्या. 
इकडे दार बंद झाल्यावर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि........ 


क्रमश: 

विद्या भुतकर.