Tuesday, February 26, 2019

चकोल्या

शनिवारी दुपारी चकोल्या केल्या. चकोल्या/वरणफळं किंवा दालढोकळी जे काय म्हणायचं ते म्हणा. दुपारी सर्व बनवून जेवायला दीडेक वाजला. मग मस्तपैकी ताणून दिली दोन तास. खरंतर त्या दिवशी दुपारी झोपले नसते तर ही पोस्ट तेंव्हाच लिहिली असती. पण शनिवार दुपारची झोप नाही म्हणजे काय? असो. 
       तर चकोल्या. कोरेगावात आमची रोजची शाळा ११-५ ते असायची. शनिवारी फक्त सकाळी ८-१२.३० पर्यंत.  असंही ११ वाजता शाळेत वेळेत जायची बोंब. मग शनिवारी तर काय बोलूच नका. त्यामुळे सकाळी काही खाऊन जाणे किंवा डबा  नेणे वगैरे नाहीच. शाळेतून परत येताना जोरदार भूक लागलेली असायची. घरी आलं की पहिला प्रश्न, जेवायला काय आहे? आणि आईचं ठरलेलं उत्तर, चकुल्या. आता शनिवारी चकुल्याच करायच्या हे आई-दादांचं कधी कसं ठरलं वगैरे काय माहित नाही. पण मला आठवतं तसं शनिवारचा मेन्यू फिक्स होता.
     त्याचंही नाटक कमी नाही. त्यासाठी लागणारी कणिक घट्टच मळलेली हवी. नाहीतर मग त्या वरणात घट्ट गोळा होतात. कणकेत मीठ नसेल तर खाताना ते जाणवत राहतं. मग त्या लाट्या लाटून कागदावर पसरून एकेक करून शंकरपाळीच्या आकारात कापायच्या. मला त्या कापण्यासाठी मी केलेला हट्टही आठवतो. आईच्या कशा सरसर कापल्या जातात, माझ्या नाहीत अशी माझी तक्रार असायची. पण एकदा लाट्या झाल्या की बाकी काम पटकन व्हायचं. आईची लसणाची फोडणी मस्त बसते त्यांना. चकुल्यासोबत अनेकदा आई पापड वगैरे तळायची आणि कधीतरी भरलेली मिरचीही. दादाही शाळेतून यायचे साधारण त्याच वेळेत. गरम चकुल्या, भात वरून लिंबू हे सर्व वरपून खाऊन मस्त झोप आलेली असायची. साधारण चारपर्यंत झोप काढायची. मला तर वाटतं मला दुपारी झोपायची सवय तेंव्हाच लागली असावी. :) 
      झोपेतून उठलं की संध्याकाळचा दूरदर्शनवर हिंदी सिनेमा असायचा. तो बघत घरच्या भुईमुगाच्या शेंगा फोडून त्यातून दाणे काढायचे. दादांचा शनिवारी उपवास, त्यामुळे सकाळी चकोल्या तसं रात्री खिचडी ठरलेली. ते सोललेले शेंगदाणे रात्रीच्या खिचडीसाठी वापरायचे. सिनेमा संपला की हिंदी बातम्या, एखादी ९ वाजताची सिरीयल आणि पुन्हा झोप. याच्या अधेमधे आजोबांची एखादी शिकवणी असायची. ते हमखास स्पेलिंग टेस्ट घ्यायचे शनिवारी. रात्री जमलं तर थोडासा अभ्यास. शनिवार संपला. 
       परवा शनिवारी चकोल्या केल्यावर पुन्हा हे सर्व आठवलं. अगदी जसंच्या तसं. तेंव्हा अनेकदा आईचं उत्तर ऐकून चिडचिड व्हायची की नेहमीच तेच काय खायचं. पण आता वाटतं म्हणूनच तर ती गोष्ट इतकी आठवणीत राहिली. तसंच आपणही पोरांना एखादी ठराविक वस्तू, ठराविक पदार्थ नियमित एकाच दिवशी करून द्यावा असा विचार करतेय. पोरांनाही माझा असा एखादा पदार्थ असावा ज्यावरून त्यांच्याही अशाच एखाद्या दिवसाच्या सगळ्या आठवणी जाग्या होतील. त्याचे सारे संदर्भ, वास त्यांच्या कायम मनात राहतील. मी तर म्हणतेय, चकुल्याच कराव्यात. :) तेही 'इंडियन पास्ता इन लेंटिल सूप' म्हणून खातील. 


-विद्या भुतकर. 

Friday, February 08, 2019

निःश्वास

        शुक्रवारची रात्र, पोरं दमून लवकर झोपून गेली, नवरा गुंगीत. आणि मी मिणमिणत्या (म्हणजे साईड लॅम्प च्या) उजेडात बसलेय एकटीच. निरव शांतता कि काय म्हणतात ना ती हीच असावी. असं एकटं बसलं की वाटतं लिहावं. लिहावं म्हणून ब्लॉगवर आलं की आपणच आधी लिहिलेलं वाचण्यात वेळ जातो. मग ते वाचताना, त्या वेळी काय घडलं होतं, वगैरे आठवण्यात अजून वेळ. मग इकडे तिकडे उड्या मारून तासाभराने शेवटी लिहायला लागेलच. मी किती बोअर करतेय, लिहिण्याबद्दल लिहून. मला वाटतं एखाद्या दिवशी असं मुद्दाम लोकांना छळण्यासाठी बोअर लिहावं. मग त्यात काही लोक म्हणतील की त्यासाठी वेगळे प्रयत्न करू नकोस, आहे ते इनफ बोअरिंग आहे. बरोबर ना? शुक्रवार रात्र मस्त वाईनचा ग्लास तरी हातात हवा होता. काही नाही तर निदान नवऱ्याची एखादी नॉरकाटीक तरी घ्यायला हवी होती. पण आज शुद्धीत राहण्याचा माझा नंबर आहे. (मला एकदम आठवलं की आमच्याकडे, म्हणजे कोरेगावकडे काही लोक 'नंबर' ला 'लंबर' म्हणतात. ) 
        तर आज माझा नंबर असल्याने मी जागता पहारा ठेवला आहे. मागच्या वर्षी साधारण याच वेळी मी हॉस्पिटलमध्ये होते आणि नवरा बाहेर. आज बाहेर थांबण्याचाही माझाच नंबर होता, तोही पहिल्यांदा. याआधी निदान तीनवेळा तरी त्याने हे काम माझ्यासाठी केलंय. आणि प्रत्येकवेळी त्याची जबाबदारी वाढलेली होती. दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळी आणि मागच्या वर्षी दोन्ही पोरांचं करुन माझं बघायचं होतं तेंव्हा. बिचारा. त्यापेक्षा मला काय वाटतं, हे आपण बेशुद्ध किंवा गुंगीत असणं जास्त सोपं आहे. नाही का? सही झोप येते. बाहेरच्या जगात काय चाललंय याचं आपल्याला टेन्शन नाही. जे काय असेल ते बाहेरचे लोक बघून घेतील. आपण बेशुद्ध. एकदम भारी सिनॅरियो आहे तो. 
        होतं काय की डॉक्टरच्या ऑफिसमध्ये गेलं की मला झोप यायला लागते. जगात अशा दोनच जागा आहेत जिथे मला हमखास झोप येतेच. अर्थात माझं झोपेचं रुटीन बघता, "दोनच?" असं घरचे विचारतील. तर, एक म्हणजे डॉक्टरचं ऑफिस आणि दुसरं म्हणजे 'बेस्ट बाय' नावाचं इलेकट्रोनिकसचं दुकान. तिथं जायचं म्हटलं की मला आपोआप जांभया येऊ लागतात. म्हणजे मुलं पोटात असताना मला फार गिल्टी वाटायचं की चेकअपला गेल्यावर प्रश्न विचारायचं सोडून मला झोप का येतेय? असो. तर या असल्या गिल्टी वाटण्यापेक्षा तुम्हांला ऑफिशियली भूल दिलेली असेल तर बरंच आहे ना? 
         त्यातही मला प्रश्न पडला होता. टेन्शन असं होतं की भूल दिल्यावर मला जाग आली तर? आजूबाजूला नर्स डॉक्टर काय बोलत आहेत, काय करत आहे हे सगळं कळायला लागलं तर? त्याच्यावरही सर्च केलं होतं गुगलवर. तर असं शक्य आहे. भूल दिलेली असतानाही तुम्हांला जाग येणं वगैरे, खूप विरळ का होईना पण शक्यता आहे ना? अर्थात सर्जरीनंतर काय झालं हे आज आठवायचा प्रयत्न करुनही आठवत नव्हतं. जाग येणं तर राहूच दे. मुळात नवरा तर म्हणेल तुला साध्या झोपेतून जाग येत नाही. भूल दिल्यावर काये? त्यावरुन आठवलं, मागच्या वर्षी माझी भूल उतरायच्या आधीच नर्स म्हणाली, चला आता. म्हटलं, बाई मला जरा बसू दे? पण कुठलं काय? असं कावळ्यासारखे घिरट्या घालून शेवटी त्यांनी मला घरी पाठवलंच. सुखानं झोपूनही देत नाहीत. 
      हां तर, अशा निदान तीन वेळा तरी मी ऑपरेशन रुममधे गेलेय. अगदी निवांत. मला ते इंजेक्शन दिल्यावर किंवा देताना वगैरे उगाचच घाबरण्याची एक्टिंग करणारे लोक अजिबात आवडत नाहीत. काही होत नाही जरासं टोचलं तर. च्या मारी. तर एकूण काय की मी आत जाताना वगैरे निवांत होते. आज सकाळी नवऱ्याचा नंबर होता. म्हणजे तसं घाबरण्यासारखं काही नव्हतं. सर्जरी ठरलेलीच होती, काय करायचं वगैरे माहित होतंच. आणि आता आम्ही एकदम अनुभवी असल्यासारखं पोरांना तयार करुन मैत्रिणीकडे सोडून गेलो. जाताना मला काही खायला वेळ झाला नाहीच. हॉस्पिटलमध्ये पोहोचताना एकदम नवऱ्याने गाडीत असलेलं खायचं एक पाकीट आठवणीनं मला घ्यायला लावलं. 
        त्याची सर्व चेकिंग करुन त्याला आत घेऊन गेले आणि बाहेर एकटं बसल्यावर मला एकदम जाणवलं, ही असं बसण्याची माझी पहिलीच वेळ होती. पुढचे ३-४ तास. सर्व लोकांना मेसेज पाठवणे, अपडेट देणे ही कामं करुन झाली. भूक लागली होती. पर्समध्ये त्यानेच ठेवलेलं खायचं पाकीट बघून मग भरुन आलं. किती वेळ फोनकडे बघणार आणि वाट बघणार? शेवटी हातात पुस्तक घेतलं वाचायला. वाट बघणं किती अवघड असतं नाही? आणि हे असं? त्या क्षणातलं ते एकटेपण. जणू आपला सगळा इतिहास पुन्हा एकदा डोळ्यासमोरुन जातो. कदाचित तसं नसेलही होत. पण सर्जरी झाल्यावर डॉक्टर, नर्स सर्व भेटून फायनली नवऱ्याचा चेहरा पाहिला तेव्हा जाणवलं की 'निःश्वास' म्हणजे काय. दिवसभरात बाकी अनेक घडामोडी झाल्या पण आता लिहायची इच्छा झाली ती त्याचसाठी, त्या एका क्षणासाठी. 

विद्या भुतकर.