Monday, October 31, 2016

स्वप्ना आणि सत्या-भाग ५ "तर..... तर ....." :)

तो: परवा लाईट बिल भरलंस ना?
ती: अर्रर्रर्रर्रर्रर्र .....सॉरी विसरले.
तो: किती वेळा आठवण करून द्यायची?
ती: ए मला नाही लक्षात रहात असलं सगळं.
तो: म्हणूनच तर सांगतोय.
ती: पण मी बाकी बघतेच ना?
तो: मग हे पण करायचं. तुला आठवण राहावी म्हणून मुद्दाम तेव्हढं एकंच काम सांगितलंय. बरं, तेही ऑनलाईन भरायचं असतं. स्वतः जायलाही लागत नाही.
ती: बरं, भरते आज.
तो: काही गरज नाहीये. काल शेवटची तारीख होती. मी भरून टाकलं कालच.
ती: (लाडाने) थँक्यू !!
तो: मी आहे म्हणून चाललंय सगळं !
ती: तर तर .... :)
तो: असू दे.. असू दे..पुढच्या वेळी भर वेळेत नाहीतर कॅण्डल लाईट डिनर करावं लागेल.
ती: हो डिनरवरून आठवलं, आज संध्याकाळी अंजू येणार आहे.
तो: ओह. आज येणार आहे का?
ती: असं काय करतोस? मी किती वेळा सांगितलं तुला. आज लवकर घरी ये.
.
.
.
.
.
. .
ती: (संध्याकाळी) अरे येताना पनीर आण म्हणून सांगितलं होतं. आणलंस का?
तो: अर्रर्रर्रर्रर्रर्र विसरलो.
ती: कितीवेळा आठवण करून द्यायची?
तो: सॉरी, मला असल्या गोष्टी लक्षात रहात नाहीत.
ती: मग रिमायंडर लावायचा ना? आज पनीरच करायचे होते जेवायला. मला फिरून जावं लागतं डेअरीकडे.
तो: मग आता?
ती: आता काय? मी येते घेऊन येताना.
तो: सॉरी ! सॉरी !!
ती: नशीब मी विचारले तरी.
तो: थँक्यू.
ती: असू दे असू दे ! मी आहे म्हणून चाललंय सगळं.
तो: तर..... तर ..... :)

सत्यातले साथीदार असे असताना, स्वप्नातला 'परफेक्ट' साथीदार कुणाला हवाय?

विद्या भुतकर.

Thursday, October 27, 2016

५० शेड्स ऑफ शंकरपाळ्या

         दरवर्षी दिवाळीला फराळ म्हणजे चर्चेचा विषय असतो. तो चघळण्यासाठी तितकाच चिवट चिवडा, स्प्रिंग चकली किंवा दगड लाडू पाहिजे. :) लहान असताना कुणाकडून काय काय खायला आलंय आणि त्यातलं काय काय बरोबर जमलं आणि काय फसलं यावरही गप्पा व्हायच्याच. पण तेव्हा त्यावर लिहायला काही स्कोप नव्हता. आता आहे तर लिहितेच ना. तर दरवर्षी प्रमाणे यावेळीही दोन लाडू (रवा, बेसन), शंकरपाळ्या (गोड, तिखट), चकली आणि चिवडा हे माझ्या लिस्टवर असतं. आणि गेले १० वर्षे करूनही त्यासाठी मला त्याच्या रेसिपी, मोजमाप नेटवर पहावंच लागतं. त्यातल्या त्यात सर्वात सोपी आणि पटकन होणारी रेसिपी म्हणजे शंकरपाळ्या असं मला वाटतं. आणि यावर्षी मुलांनी माझ्या आईच्या हातच्या शंकरपाळ्या नुकत्याच खाल्लेल्या असल्याने, "aaji is the best shakarpali maker" असं वाक्यही पोरीने टाकलं होतं. त्यामुळे त्या चांगल्या जमणं गरजेचं होतं. नाहीतर पोरं लगेच,"आजीसारख्या झाल्या नाहीत म्हणून खाणार नाही' म्हणायलाही कमी करायची नाहीत. 
        तर दिवस सोमवारचा आणि वेळ रात्री १०.३० ची. म्हणजे थकव्याची परिसीमा. पण पुढे बरीच कामे असल्याने त्यादिवशी ते करणं भाग होतं. नेटवर मोजमाप बघून पीठ, दूध, साखर, मोहन सर्व व्यवस्थित घेतलं. छान घट्ट मळलेही. मधेच एक विचार आला, या पिठात सर्व काही आहे जे केक मध्ये घातलं जातं. थोडी बेकिंगपावडर घालून बेक करून बघाव्यात. पीठ इतकं छान झालं होतं की त्याच्या मस्त फुललेल्या शंकरपाळ्या होणार यात मला कणभरही शंका नव्हती. शिवाय लोकांच्या अनेक पोस्टमध्येही मी 'बेक्ड शन्करपाळ्यांचे' फोटो पाहिले होते. आता आपल्याला एकदा ओव्हर-कॉन्फिडन्स आला की बस ! एकदम जोर येतो सर्व करायला. त्यामुळे नुसते एक-दोन लाट्या नाहीत तर ४-५ लाट्या लाटून माझ्याकडे असलेल्या दोन ट्रे मध्ये शंकरपाळ्या ओव्हनमध्ये ठेवायच्या असं ठरवलं. आणि हो, त्यात माझा नवरा होताच बरोबर. त्याने ओव्हन प्री-हीट करून घेतला. एका ट्रेला त्याने भरपूर तूप लावले आणि माझ्या ट्रेला मी थोडे कमी लावले होते. एक ट्रे जरा पातळ होता तर दुसरा एकदम जाडजूड. 
         आम्ही मस्त अरेंज करून त्या लाट्या ट्रे मध्ये ठेवल्या आणि ट्रे ओव्हनमध्ये. २० मिनिटे १८० डिग्री ला ओव्हन लावला. पाचेक मिनिटात एकदम भारी केकसारखा वास येऊ लागला. एक फोटोही काढून घेतला. आता सक्सेस स्टोरी लिहायला तो कामात आला असता ना? संदीप ओव्हनचा लाईट लावून समोरच बसून राहिला. त्याला हळूहळू शंकरपाळ्या फुलत आहेत असंही वाटू लागलं. आमचा प्लॅन तयार झाला होता. पुढचे निम्मे पीठही असेच ओव्हनला लावून द्यायचे आणि मग तासभर टीव्ही बघत बसायचा. :) आत्ताशी ११ वाजले होते. 
         १५ मिनिटात थोडा जळाल्यासारखा वास येत होता म्हणून ओव्हन उघडून पाहिला, तर त्या पातळ ट्रे मधील शंकरपाळ्या खालून करपत होत्या. आम्ही घाईने त्या काढून घेतल्या. आणि हो, ओव्हन छोटा असल्याने दोन्ही ट्रे एकाच लेव्हलला बसत नव्हते. तो पातळ ट्रे वरच होता त्यामुळे त्याला हीट जास्त लागत असेल. तर आम्ही घाईने तो ट्रे बाहेर काढला. तूप लावलेली ट्रेची बाजू बरीच जळली होती. संदीप म्हणे,"जाऊ दे, थोड्या वरच्या अंगाला भाजल्या गेल्यात." :) असे असले तरी, हा पहिला लॉट अगदीच वाया गेला नव्हता. थोड्या लालसर झाल्या होत्या आणि कडक इतकेच. मी तर म्हणाले, "चहात पडल्या आणि भिजत घातल्या तरी मऊ पडणार नाहीत याची गॅरंटी आहे". :) एक चांगले होते, चव एकदम मस्त होती. एखादे कडक बिस्कीट असावे तसे. त्या अजिबात फुगल्या नव्हत्या, किंवा कुरकुरीत नव्हत्या. त्यामुळे उरलेल्या पिठाच्या तळूनच करायच्या असे ठरले. 
           आम्ही भांड्यात तेल घालून तापेपर्यंत त्या जाड ट्रे मधील लॉट बघत होतो. तो ट्रे जाड असल्याने पीठ अजूनही कच्चे वाटत होते थोडे. त्याला ओव्हनमध्ये वरच्या जाळीवर ठेवून, आम्ही तापलेल्या तेलात नवीन लॉट तळायला टाकला. आता इथे थोडा वेळ होता. म्हटले, ओव्हनमध्ये दुसरा लॉट खरंच चांगला वाटत आहे पण थोडा रंग सफेद आहे अजूनही. म्हणून मग मी फक्त दोनच मिनिट का होईना 'ब्रॉईल' सेटिंगवर ठेवते असे म्हणले. आता हे ब्रॉईल सेटिंग काय आहे? तर ओव्हनच्या वरच्या कॉइल्स तापून जरा जास्त तापमानात लवकर रंग आला असता. पण त्याची आणि माझी जुनी दुश्मनी आहे. प्रत्येक वेळी जसे दूध लक्ष नसताना उतू जाते तसे मी ठरवूनही ब्रॉईलला लावलेले काही ही असो, मी २ मिनिटंच असे ठरवून ते विसरून जाते आणि मग जळालेले टोस्ट, ब्रेड, केक असे पदार्थ पदरी पडतात.संदीप बिचारा त्यांचे जळालेले भाग खरडून, उरलेला पदार्थ गोड मानून खातोही. :)
          तर यावेळीही मी लक्षात ठेवून ब्रॉईल सेटिंगला दोनच मिनिट लावायचे म्हणून ओव्हन सुरु केला आणि भांड्यातल्या शंकरपाळ्या तळायला सुरुवात केली. कुठलेही काम मनापासून करणे हा माझा स्वभावच असल्याने, तळण्याच्या नादात खाली जोरदार धूर येऊन त्या ओव्हनमधल्या शंकरपाळ्या बिचाऱ्या करपून गेल्या. माझ्यावर चिडचिड करत, नवऱ्याने परत तो लॉट ओव्हनमधून काढला. त्या वाचण्याचा काही स्कोप नव्हताच. पण.....त्यांच्या नादात इकडे तेलात टाकलेल्याही जास्त जास्त लाल होऊन गेल्या होत्या. नक्की कुठली आग आधी विझवायची हे सुचत नव्हते. त्यात बाहेर थंडी असल्याने खिडक्या बंद होत्या. उगाच धुरामुळे फायर अलार्म वाजून अजून दुसराच त्रास नको म्हणून तिकडेही खिडक्या उघडायच्या कामाला नवऱ्याला लावले. एकूण काय, गोंधळ नुसता. 
       आता ओव्हनमधले सर्व लॉट संपले होते. तेलातील पहिलाही जळून गेला होता. तेलातल्याचा आणखी वेगळाच प्रॉब्लेम होता. पिठात थोडी बेकिंग पावडर आणि तूप असे दोन्हीही असल्याने त्या मस्त तेल पीत होत्या. त्यासाठी मग थोड्या पातळ लाटायचे ठरवले. आणि तेलही थोडे जास्त गरम करून घेतले म्हणजे जास्त वेळ तेलात राहणार नाहीत. पण त्याचसोबत त्या तेलात फुटू नयेत याचीही काळजी घ्यायची होतीच. नुसते नाटक. एकेक लाटीला वेगळे वेगळे प्रयोग करत सर्व शंकरपाळ्या संपल्या. सर्व संपेपर्यत खरंच ५० शेड्स झाल्या असतील. पण 'फेअर न लव्हली' सारखे वेगळे शेड शोधून त्याचा फोटो काढत बसले तर नवऱ्याने वेड्यात काढले असते. आता दोघेही चिडणे किंवा वैतागणे याच्या पलीकडे गेलो होतो. :) भराभर आवरून १२-१२. ३० ला झोपायला गेलो. सोप्या सोप्या वाटणाऱ्या या पदार्थाने बराच व्याप झाला होता. 
         दुसऱ्या दिवशी पोरांना दाखवल्या तर म्हणे, "हे असे का दिसत आहेत?'. म्हटलं, चॉकलेट शंकरपाळ्या आहेत, खायच्यात का?" दोघांनाही खायला दिल्या आणि दोघांनाही त्याची चव आवडली. कडक किंवा खुशखुशीत हे समंजण्याचे त्यांचे अजून वय नाहीये त्यामुळे आम्ही वाचलो. स्वनिकला तर इतक्या आवडल्या की संध्याकाळी दोन वेळा मागून घेतल्या आणि मला मिठीही मारली 'फॉर बेस्ट शंकरपाळी'. :) त्यामुळे गोष्ट कशीही असली तरी शेवट गोड झाला होता. :) पुढच्या वेळी बेकिंग वगैरेंच्या नादाला न लागता सरळ तळून करायच्या असा कानाला खडा लावला. :) दुसऱ्या दिवशी नवऱ्यानं विचारलं की 'चकली बेक करायची आहे का?" मी मुकाट्याने तेलाचे भांडे काढून घेतले तळायला. :) 

त. टी. - इथे थोडे फोटो देत आहे. तुम्हीच शेड्स मोजून घ्या. तुमच्याही अशा काही पदार्थांच्या गोष्टी जरुर सांगा. कारण दिवाळी त्यांच्याशिवाय दिवाळी होत नाही.  आणि हो, Please dont judge my cooking skills by this story. अजून भरपूर आहेत. :D 

सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
काय आवडतं तुला ?


Tuesday, October 25, 2016

नेकी कर फेसबुक पे डाल

          थोड्या दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकली होती, पणत्या रंगवून विकण्याचा प्रयोग करणार होते म्हणून. पणत्या विकण्याचा प्रयोग करण्यामागे दिलेल्या अनेक कारणांमध्ये अजून एक कारण होतं. ते पूर्ण झाल्यावरच बोलायचं म्हणून थांबले होते. पणत्या रंगवण्यात आनंद मिळत होताच तरी त्या विकून त्याच्यातून मिळणाऱ्या पैशांची तुलना नकळत माझ्या नोकरींशीही होत होती. खरंच त्यात इतका वेळ घालवावा का हे कळत नव्हतं. त्यांची क्वालिटी चांगली असली तरीही लोक त्यासाठी जास्त पैसे द्यायला तयार होतील का हाही विचार येत होता मनात. पुढे जाऊन माझा त्यात खरंच फायदा होता का? आणि २०० रुपये शेकड्याने मिळणाऱ्या पणत्यातून जिने त्या घडवल्या तिला काहीच फायदा नाही. असे असताना त्यातून मी पैसे कमावणे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न मनात येत होतेच.
           पण हे सर्व नाहीसे झाले कारण त्यातला हेतू. मागच्या वर्षी एका मैत्रिणीने तिने बनवलेल्या पणत्या विकून आलेले पैसे दान केले होते. त्यामुळे यावेळी आमचाही तोच विचार होता. हेतू निश्चित असला ना मग बाकी सर्व गोष्टी फिक्या वाटतात. आता फक्त एकच हेतू होता, ज्या संस्थेला आम्हाला देणगी द्यायची होती त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी. अर्थात तरीही ज्यांना पणत्या खरंच आवडल्या आहेत त्यांनाच तो हेतू आम्ही सांगितला होता. कारण त्याची जाहिरात करून त्या मला विकायच्या नव्हत्या. एकेक करत २३०$ च्या पणत्या विकल्या गेल्या. यात झालं काय की अनेकदा मला वाटायचं की कशाला लोकांना पुन्हा विचारायचे किंवा नवीन पणत्यांचे फोटो टाकायचे? या सर्व विचारांना मागे सारून एकच विचार पुढे होता, जितके जास्त विकल्या जातील तितकी जास्त मदत आपण करू शकतो. त्यामुळे काही सोशल ग्रुपवर पण मी पणत्यांचे फोटो आणि त्यांचे दर दिले. ऑफिसमध्ये विचारायला मन थोडं कचरत होतं पण म्हटलं,"कुठे आपल्याला ते आपल्यासाठी विकायचेत?" त्यामुळे तिथेही मैत्रिणींना विचारले. ज्यांना आवडल्या त्यांनी आवर्जून मागून घेतल्या. आता घरी फक्त डझनभर पणत्या राहिल्यात. त्या घरी वापरेनच.:)
          कुणाला वाटेल हे सर्व सांगायची काय गरज आहे? एखादी ५ किमी ची रेस पळल्यावर १० फोटो टाकतो आपण. बाकी कुठं गेलो, काय खाल्लं त्यावर १००. मग यावर का नाही लिहायचं? दोनेक वर्षांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने आम्हाला सांगितलं, तिच्या आईच्या ७५ व्या वाढदिवशी तिने एक चांगले काम केले. सिंधुताई सपकाळ यांच्या मुलींच्या आश्रमातील एका मुलीचे शैक्षिणक पालकत्व घेतले आहे. वर्षातून त्या मुलीच्या शाळेसाठी लागणार खर्च ती करते. तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या कामाबद्दल मला माहिती झाली. सासवड जवळच्या एका गावात असलेला तो मुलींचा आश्रम. त्यानंतर माझ्या अजून एका मैत्रिणीने तिच्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी तिथे देणगी दिली. त्यांच्याकडून त्या आश्रमाबद्दल ऐकून जायची, काहीतरी करायची इच्छा झाली.
        दोन वर्षांपूर्वी तिथे गेलो तेंव्हा तिथल्या मुली, त्यांची स्वच्छता, कॉलेजसाठी जाणाऱ्या मुलीची धावपळ आणि तिची शिक्षणासाठीची जिद्द सर्वच प्रेरणादायी होतं. तिथे असणाऱ्या शिलाईच्या मशीन आणि पिशव्या शिवण्याचा, विकण्याचा उद्योगही पाहिला. आपण त्यांना कोणत्या प्रकारे मदत करू शकतो हा एकच विचार तेंव्हा मनात येत होता. कपडे, पैसे, स्टेशनरी, मुलांचे शैक्षिणक पालकत्व किंवा एकरकमी देणगीमुळे त्यांचे एखादे मोठे कामही मार्गी लागू शकते असे अनेक पर्याय समोर आले. सध्यातरी आम्ही एकहाती रक्कम देण्याचा पर्याय अवलंबला आहे. पण खरंच करण्यासारखं खूप आहे आणि लोक कमी असं वाटलं. आणि हो, माझ्या मैत्रिणीने मला त्यांच्या कामाबद्दल सांगितले म्हणून मी काहीतरी करू शकले. मग मी बाकी लोकांना सांगून त्यांच्याकडून काही चांगले झाले तर का नाही? म्हणून हा उपद्व्याप.
        कालच माझी ती मैत्रीण, पणत्यांचे आलेले आणि आमच्याकडून थोडे असे पैसे संस्थेत जाऊन देणगीची रक्कम देऊन आली. दिवाळीच्या आधी हे काम व्हावे अशी खूप इच्छा होती. ती जाऊन आल्यावर, अशा कामासाठी लोकही किती उत्साह दाखवतात असं वाटून गेलं. आपण इथून विचारल्यावर तिकडे कुणीतरी हे करतंय हेही भारीच ना? तिच्यासोबत बाकीच्यांनीही मग पैसे, कपडे, मिठाई जमेल तसं दिलं. आज तिच्याकडून तिथले फोटो मिळाले आणि खूप भारी वाटलं. आपण केलेल्या कामाने कुणाचे तरी काही चांगलं झाल्याचं समाधान. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पणत्या विकत घेतल्या त्यांनाही ते फोटो दाखवले आणि त्यांनाही तोच आनंद मिळाला. तर एकूण काय, तुम्हालाही खरंच काहीतरी करायची इच्छा झाली तर जरूर कळवा त्या संस्थेला. त्यांचा नंबर माझ्या एका फोटोत दिसेलच. आणि हो, त्यांचा मुलांचाही आश्रम आहे पुण्यात. तुमच्याकडून काही भलं झालं तर बाकीच्यांनाही जरूर सांगा. त्याचं समाधान तुम्हालाही मिळेलच.
           माझी मैत्रीण म्हणते ते बरोबर आहे, अशा कामात विचारायची लाज कशाला बाळगायची आणि लोकांना सांगायचीही? "नेकी कर फेसबुक पे डाल", बरोबर ना ? आता पुढच्या वेळी पणत्यांच्या उद्योगाला अजून हुरूप येणार आहे हे नक्की. :)
सर्वाना शुभ दीपावली !

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


तुझा अबोला


Thursday, October 20, 2016

दिवाळी येतेय ....

दिवाळी येतेय त्यामुळे घरात सर्वांचीच घाई, गडबड, खरेदी, सफाई, फराळाची तयारी चालू असेल असं गृहीत धरतेय. :) यावर्षीच्या पणत्यांचे काम एकदाचे उरकले. त्यासाठी गेल्या दोन तीन दिवसांच्या पोस्टना कल्टी द्यावी लागली. पण पुढे बरीच कामं आहेतच, दिवाळीची. लगेचच फराळाचे सामान घेऊन आलो. दरवर्षी निदान चार पाच पदार्थ तरी बनवण्याचा प्रयत्न असतोच. अनेकदा मित्र-मैत्रिणी म्हणतातही, "तू अजूनही फराळ करतेस? कशाला पण?" बरं, असंही नाही की मला सर्व उत्तम बनवता येतं.दरवर्षी आपण नव्याने फराळ शिकतोय असं वाटतं. त्यामुळे दरवेळी मी वेगवेगळ्या रेसिपी ऑनलाईन बघते आणि फराळ बनवते.तसाच यावेळीही सुरु केला आहे. 
           ही पोस्ट लिहितानाच व्हाट्स अँप वर एक पोस्ट वाचली, दिवाळीला आपण काय काय करायचो आणि आता कशी त्यातली काहीच गम्मत नाहीये. पण मला वाटतं की गम्मत असणे किंवा नसणे हे आपल्याच हातात आहे ना? आजच बेसन भाजत असताना, स्वनिकने त्याचा वास घेतला आणि म्हणाला, "याचा वास खरंच लाडूसारखा येत आहे. आपण कधी बनवणार लाडू?". त्याला हेही आठवत होते की मागच्या वर्षी लाडू वळताना त्यांनी मदत केली होती. त्यामुळे यावर्षी त्यांना त्याचीही उत्सुकता आहे. एकूण काय, घरात रव्या-बेसनाचे खमंग वास, ताज्या गरम दळून आणलेल्या भाजणीचा वास, मैत्रिणींनी एकमेकांना,"तुझं काय काय करून झालं गं?" हे विचारणं, हे सर्व आपल्याच हातात आहे. मग उगाच आपण लहान असताना दिवाळी कशी होती आणि ती आता कशी मिळत नाही यावर का रडायचे? 
          आजच मुलांना लाडूसाठी वेलदोडे सोलून द्यायला सांगितले. एकदम मन लावून करत होते. आपल्याला जशा दिवाळीच्या आठवणी आहेत, तशाच त्यांनाही मिळतीलच, नाही का? एका मित्राला विचारले की फराळाचे काय? तर म्हणाला, त्यातले निम्मे काम मलाच करायला लागेल. मग त्यात काय चूक आहे? करायचं निम्मं काम ! आयतं हातात आलेलं ताट चांगलं वाटतच कुणालाही. पण स्वतः राबून बनवलेल्या फराळाचा आनंद वेगळाच. आणि तो मुलांनी आवडीने खाल्ला तर अजूनच आनंद. आणि खरंच, त्यात थोडेफार प्लॅनिंग असले की पटकन होऊन जाते सर्व. 
       एकतर आता माझ्या यादीत, रवा लाडू, बेसन लाडू, चिवडा, चकली, तिखट आणि गोड शंकरपाळ्या साधारण यातले पाच पदार्थ तरी होतातच. दोघेही थोडे जागून, कधी शनिवार-रविवारी बसून काम उरकतो. मुलं मदत करतातच. शिवाय दिवाळीच्या दोन आठवडे आधी रवा आणि बेसन भाजून ठेवून देते. म्हणजे ऐनवेळी लाडूसाठी पाक घालून किंवा साखर घालून वळून घेता येतात. चकली साठी भाजणी शक्यतो विकत आणते किंवा मैदा आणि मूग डाळीचीही करते कधी कधी. त्यासाठी सर्व मसाले (तिखट, मीठ, ओवा, हळद, धणे-जिरे पूड ) तयार करून ठेवते. या गोष्टी रोजच्या कामासोबत एकेक करून होऊन जातात. मग एका शनिवार-रविवारी बसून सर्व काम उरकून घ्यायचं. ते दोन दिवस जरा कंटाळा येतो. पण पुढे महिनाभर मस्त वाटतं फराळ खायला(हो महिनाभर होईल इतका करते. ) आणि हो मी सुरुवात केली तेव्हा माझ्याही यादीत एक-दोन पदार्थच होते. पण ती हळूहळू मोठी होत आहे. 
        दिवाळीच्या दिवशी नवीन कपडे घालणे, रांगोळी काढणे, पणत्या लावणे, आकाशकंदील लावणे ही सर्व छोटी मोठी कामं करण्यातही वेगळाच उत्साह असतो. उगाच आपण आता दु:खी आहोत म्हणत, 'गेले ते दिवस' टाईप पोस्ट फॉरवर्ड करण्यात काहीच साध्य होत नाहीत हे खरंय. त्यापेक्षा आपण त्यातले काय काय करू शकतो आणि याचा विचार करून त्याचा आनंद दघ्यावा आणि मुलांनाही द्यावा असं मला वाटतं. असो. माझा फराळ बनवून झाला की फोटो टाकतेच. तोवर, तुमचीही तयारी चालू राहू दे ! तोवर हे पणत्यांचे काही फोटो.

विद्या भुतकर.

Sunday, October 16, 2016

'आई' झाल्यावर......पुढे काय?

         आजकाल 'दिवस गेले' म्हटलं की इंटरनेटवर ढिगाने माहिती मिळते. भरपूर पुस्तकेही आहेत. शिवाय मी तर शिकागो मध्ये असताना एक-दोन टीव्ही सिरीयलही बघायचे. त्यामुळे मला वाटते की आपल्या आईपेक्षा आपल्याला डिलिव्हरीच्या आधी बरीच माहिती मिळालेली असते. पण 'आई' झाल्यावर पुढे काय? यावर कुणीच कधीच मला सांगितलं नव्हतं जे मला वाटतं बोलणं गरजेचं होतं. यातील बरीचशी माहिती कुठेतरी मिळेलही पण मला मात्र त्या अनुभवातूनच जावे लागले होते. काही अनेक मैत्रिणींना पाहून लक्षात आले आहेत. कदाचित हे सर्व मुद्दे वाचून कुणी काही माझ्याबद्दल मत बनवलं तर मी काही करू शकत नाही. यातील काही अगदीच व्यक्तिगत वाटतील पण बोलणं गरजेचं आहे.

१. सर्वात पहिली गोष्ट मला आठवते ती म्हणजे माझ्या डिलिव्हरी नंतर, कितीतरी वेळ (अगदी गुंगीत असूनही ) मला वाटत होते की, आपले पहिले बाळ झाले आहे आणि मला झोप का येतेय? एक दोन वेळा हॉस्पिटलच्या बेबी-केअर मधेही ठेवले आणि तेच वाटत राहिले. आज परत फिरून पाहताना वाटतं की, त्या वेळी मी स्वतःच इतकी दमलेली होते. त्यात हे विचार नसते केले तरी चालले असते. सर्व प्रोसेसमध्ये इतके परिश्रम झालेलं असतात की बाळाची कुणी काळजी घेत असेल तर उगाच स्वतःला 'वाईट आई' असे लेबल लावून घ्यायची काहीच गरज नाहीये. त्यासाठी सर्वाना भरपूर संधी मिळतातच.
२. लगेचच आता बाळाला द्यायला दूध कसे येणार असा प्रश्न पडतो. आणि यात बाळाला प्यायला काय ही भीती सर्वात जास्त असते. पुन्हा एकदा, हा काही नळ नाही की सुरु केला की पाणी येईल. त्यामुळे जो काही वेळ त्यासाठी लागत असेल तो घ्यावा. त्यासाठी स्वतःला काळजीत टाकायचे नाही. नंतर तेच दूध थांबवावे कसे हाही प्रश्न पडेल. तोवर बाळाला देण्यासाठी अनेक पर्याय असतात. ते नक्की वापरावे.
३. घरी आल्यावर बाळाला कुठे ठेवायचं, आपण कुठे झोपायचं यात वेळ जातोच. पण तोवर हॉस्पिटलमध्ये कुणीतरी असतं काही लागलं तर सांगायला. पण घरी आल्यावर काय अशी थोडी काळजी असतेच. पण अशावेळी, बाळाला फक्त दूध द्यायचे, ढेकर द्यायचा आणि स्वतःही खूप खायचे प्यायचे इतकेच लक्षात ठेवायचे. कारण त्या वयात बाळ २०-२२ तास झोपतंच. पण तितकेच ते दिवस खूप दमवणारेही असतात. आपलं आयुष्य आता असंच असणार का अशी एक भीतीही वाटतेच. तर उत्तर आहे, नाही ! मला वाटतं की पहिले २-३ महिने थोडे दमवणारे असतातच. पण हळूहळू बाळाचे रुटीन बदलत जाते आणि आपल्यालाही त्याची कल्पना येते. इतकेच लक्षात ठेवायचे की हे सुरुवातीचे दोनेक महिने शांतपणे काढायचे.
४. आता हे सर्व होत असताना, अतिशय हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो. त्यामुळे अनेकदा उगाच चिडचिड होते, रडू येणे, कणकण येणे हे होतेच. अशावेळी जे वाटतंय ते सरळ सांगून टाकायचे. 'आई' म्हणून अगदी प्रत्येकवेळेला  'भारी' वाटलंच पाहिजे असे नाही. हे सर्व होणे साहजिक आहे, पण ते स्वतःजवळ ठेवणे हे जास्त त्रासदायक आहे.
५. दूध यायला लागल्यावर, छाती भरून येते आणि अशावेळी खूप गरम व्हायला लागते. अशा वेळी बाळाला दूध देणे किंवा काढून घेणे किंवा अंघोळ करून घेणे असे अनेक उपाय करू शकता. मुख्य म्हणजे, थोडे दिवस उंच उशी घेऊन मान आणि वरचा भाग थोडा उंच ठेवणे यामुळे झोपेत होणार त्रास कमी होतो.
६. बाळाला सांभाळणे, त्याला स्वीकारणे, त्याला नावाने हाक मारणे या सर्व गोष्टी एकदम येत नाहीत. कुठलीही व्यक्ती स्वीकारायला थोडासा का होईना वेळ लागतो. तसेच आहे हेही. "आई" म्हणून आपण लगेच एक "महान" व्यक्ती होऊ शकत नाही. त्यात मग, बाळ रडत असताना घाईने का होईना चार घास खाऊन घेणे, त्याला कुणी बघत असेल तर झोपून जाणे यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. मी वाचले होते, As a new parent, accept all help you get. आणि ते बरोबरही आहे.
७. आता बाळाला स्वीकारणे हा एक भाग आणि आपल्या नवऱ्याला बाळासोबत वाटून घेणे हा दुसरा भाग. अनेकवेळा असेही वाटू शकते की नवरा आपल्यापेक्षा बाळाकडेच जास्त बघत आहे. मला असे वाटते की हेही वाटणे साहजिक आहे. त्यासाठी काही वाटलं तर हक्काने नवऱ्याला सांगावं. उगाच माझ्या मनात असे विचार येऊच कसे शकतात असे वाटून स्वतःला त्रास का करून घ्यायचा?
८. तीच गोष्ट जवळच्या बाकी व्यक्तींची. आपल्या आई किंवा सासूलाही या सर्व गोष्टी आठवत असतातच असे नाही. त्यात जुने-नवे, योग्य-अयोग्य असे अनेक वाद होतात. पण त्यातून शांतपणेच मार्ग काढायला हवा. कुणीही कुणाचेही वाईट चिंतत नाही हे डोक्यात ठेवायला हवे.
९. सर्वात अवघड वाटणारी गोष्ट म्हणजे पहिले मूल होण्याच्या आधीचा काळ केवळ दोघांचा असतो. त्यामुळे उठून कुठेही कधीही फिरून आले. एखाद्या कार्यक्रमाला, सिनेमाला जाऊन आले. यामध्ये खुपसा विचार करायला लागत नाही. पण आता घरात बांधल्यासारखे होते. आपले आयुष्य असेच जाणार की काय असे विचारही येतात. कधी कधी तुमच्या मित्र- मैत्रिणी तुमच्याशिवाय बाहेरही जातात. तेव्हा वाईट वाटणे साहजिक आहे. पण हे सर्व तात्पुरते आहे हे लक्षात ठेवायचे. बाळ थोडे मोठे झाले की त्याला घेऊनही(किंवा कुणी सांभाळणारे असेल तर सोडूनही) आपण जाऊ शकतो हे डोक्यात ठेवले पाहिजे. Its not end of the world.
 १०. आपल्या मानसिकतेसोबत, शारीरिक बदलही खूप होत असतात. छाती ओघळले, स्तनांचा आकार वाढणे, पोटाची कातडी गोळा होणे हे सर्व होतेच. त्यात इतक्या सर्व गोंधळात केसांवर कंगवा फिरवायलाही वेळ नसतो. मग कधी चुकून जुना ती शर्ट घालून पाहिला की अजून वाईट वाटते. आपण आधी कसे दिसत होतो आणि आता कसे दिसतो यावरून. जे बदल होत आहेत ते बदलू शकत नाही. पण त्यातून बाहेर यायला अनेक पर्याय आहेत आणि ते लवकरच करता येतीलही. पण बाळ दोन महिन्याचंही नाही आणि आधीच वाढलेल्या वजनाची काळजी करायची, हे योग्य नाही. कालांतराने (म्हणजे साधारण बाळ सहा महिन्याचे झाल्यावर) आपण व्यायाम, डाएट इ करून मूळ रूपात येऊ शकतो. हे मी दोनही मुलांच्या वेळी अनुभवले आहे.
 ११. नोकरी वर कसे जाणार, काही आठवतही नाहीये इ वाटते. पुन्हा एकदा ते साहजिक आहे. पण बाळ तीनेक महिन्याचे झाल्यावर एकदा ऑफिसला गेले की सर्व आठवते आपोआप. आणि हो, Its not end of your career !

          खूप बोलले. मला खात्री आहे अजूनही काही मुद्दे राहिले असतीलही. पण जे आहेत ते मांडायचेच होते. अनेकदा, केवळ माझ्यासारखं अजून कुणीतरी आहे हेही कळलं तरी पुष्कळ असतं. म्हणून हा प्रपंच. यात बाळाबद्दल जास्त काही लिहिले नाही कारण त्याचा विचार आपण करतच असतो. पण त्याचसोबत आपण आपलाही विचार केला पाहिजे. मला वाटतं की, आजपर्यंत आपण ऐकलेल्या, पाहिलेल्या 'आई' च्या इमेज मध्ये आपण बसत नाहीयेत अशी भीतीही वाटायला लागलेली असते. 'आई म्हणून मी इतकी स्वार्थी विचार का करतेय' असं वाटून उगाच त्रास करून घ्यायचा नाही इतकंच सांगायचं आहे.
       बाळ झाल्यानंतर नऊ महिन्यानी पुन्हा एकदा आपण आपल्याकडे पूर्वीसारखे बघण्याचा प्रयत्न करतो. पण तोवर अनेक बदल झालेले असतात. पण म्हणून आपण अचानकपणे कुणीतरी दुसरी व्यक्ती होऊ शकत नाही. ते बदल स्वीकारायला वेळ द्यायला हवा. आणि जे आपल्याला वाटतंय ते वाटूनही घ्यायचं.  हळूहळू आयुष्य पूर्वीसारखं नसलं तरी त्या पहिल्या तीन महिन्यापेक्षा बरंच सुधारतं. पुन्हा एकदा, Its not end of the world ! :) तोवर All The Best.  :)

पोस्ट जवळ जवळ संपलीच असे वाटत असतानाही काही डोक्यात होतेच, ते असे. आई होणे हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, पण अनेकवेळा अनेकजणी त्याला 'कारण' बनवतात, बऱ्याच गोष्टींपासून वाचण्यासाठी. एखादे काम करायचे नसेल किंवा त्याला थोडे जरी प्रयत्न लागणार असतील तर, 'अगं, मुलांमुळे कुठे जमतंय?' असं कारण काढू नका. It shouldnt become an excuse to run away from things. उलट आपण त्यांना सोबत घेऊन अजून काही करून शकतो यातून जी शक्ती मिळते ती जास्त चांगली असते. मला तरी वाटते की मी आई झाल्यापासून जास्त स्ट्रॉंग झाले आहे. असो. थांबतेच आता. पुन्हा कधी तरी अजून याच मुद्द्यावर काही असेल तर नक्की लिहीन. तुम्हाला कुणाला असेच काही अनुभव आले असतील तर नक्की सांगा. आणि ही पोस्टही आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा.

विद्या भुतकर.

Thursday, October 13, 2016

सणवार आणि खादाडी

मला ना कधी कधी आपण खूप भारी आहोत असं वाटतं. म्हणजे अगदी नवऱ्याला "तुला कधी शोधूनही अशी बायको मिळाली असती का?" हा प्रश्न तर दिवसातून एकदा तरी विचारतेच. त्यात मग मुलांच्या शाळेची एखादी गोष्ट आठवणीत ठेवलेली असो वा घराच्या एखाद्या कोपऱ्यात कुठे बारीकशी वस्तू शोधून दिलेली असो. कारण काहीही पुरतं. आणि त्यात परवा दसऱ्याला घरी पुरणपोळी, कटाची आमटी केली. मग तर काय बोलायलाच नको. आठवडाभर चांगले जेवण नाही झाले तरी चालेल इतकं भारी झालं जेवण. पोरांनाही खूप आवडल्या पोळ्या.
       संध्याकाळी सहाला सुरु करून नऊच्या आत जेवणही करून घ्यायचे म्हणजे काही खायचे काम नाहीये. :) असो. कौतुक पुरे. एकतर तो ऑफिसचा दिवस, त्यात इथे व्हाट्स अप वर येणारे मेसेज सोडले तर सण आहे असं वाटण्यासारखं काहीच नाही. मग घरी जाऊन काही विशेष करण्याचा उत्साह कुठून येणार? पण ऑफिसमध्ये बसल्या बसल्या मला मागे मी एकदा बनवलेल्या पुरणपोळीची आठवण झाली. २००८ मध्ये केली होती. :) त्यानंतर आताच. तर तेव्हा माझे जेवण बनवण्याचा स्पीड आणि कौशल्य दोन्हीही कमीच होते. अगदी थोडीच डाळ घातली होती. गूळ कोरडा असल्याने खिसून घेता येत नव्हता आणि कडक होता त्यामुळे फुटत नव्हता. म्हणून मी डोकं चालवून तो सर्व गूळ मायक्रोवेव्हमध्ये घातला. म्हटलं वितळून जाईल जरा. आता मला काय माहित काय होते ते. ३०-४० सेकंदात तो ताडताड उडून मायक्रोवेव्ह आतून काळा पडला होता. ते घर सोडताना तोही लोकांना देऊन आलो. विकत कोण घेणार? 
         तर यावेळी मी अशा चुका करणार नव्हते. त्यात गूळ मिक्सरमध्ये मस्त बारीक होतो हेही कळलं होतं. त्यामुळे डाळ बरोबर शिजली, गूळ बरोबर झाला, पुरणही थंड झाल्यावर बरोबर झाले. सगळ्यात महत्वाचे, एकही पोळी फुटली नाही. मग इतके सर्व झाल्यावर भारी वाटणारच ना? शेजाऱ्यांनाही दोन ज्यादा पोळ्या केल्या. पोरांना कळत नव्हतं नक्की काय आहे आज? मग मी साध्या शब्दात स्वनिकला सांगत होते. म्हटलं, "चांगले आणि वाईट यांची लढाई झाली तर कोण जिंकलं पाहिजे?". त्याने बरोबर उत्तर दिलं. म्हटलं,"बरोबर. म्हणून आज सगळे सेलिब्रेट करत आहेत. The win of Good over Bad." त्याला ते पटलं. त्याने सानुलाही नंतर तेच प्रश्न विचारून तिला समजावून सांगितलं. कधी कधी एखादी संध्याकाळ 'साध्या पासून एकदम किती स्पेशल होऊन जाते ना? 
         आम्ही तसे बरेच सण करतोच. पण त्यासोबत हे खायचे पदार्थ केल्याने किती फरक पडतो ना? त्याच दिवशी मी आणि माझी ऑफिसमधली शेजारीण बोलत होतो. ती मला सांगत होती की तिने त्या रविवारी भजी केल्या होत्या. म्हणाली,"मुलांना खूप मस्त वाटलं खायला. आपल्याला आपल्या आई-वडिलांनी सर्व दिले म्हणून आपल्याला माहित झाले. आपण तब्येतीच्या नादात या सर्व गोष्टी करत नाही. मग मुलांना कसे मिळणार ना?" मला ते पटलेही. अर्थात भजी करायला कुणाला खास कारण लागेल असे नाही. त्यात मुलांचे निमित्त असेल तर मग काय? पण खरंच, आम्हालाही आई अनेकदा पापड, कुरवड्या तळून द्यायची. फराळ, पुरणपोळी आणि दिवाळीचे अनेक पदार्थ, त्यांनी केले म्हणून आपण चाखले. परवा सानूने पोळी आणि दूध खाल्ले तर किती छान वाटले. आता आमच्या खायच्या यादीत अजून भर नक्की पडणार आहे. :) 
त. टी.: कृपया पोळीचे डाळ -गूळ इ चे माप विचारू नये. सर्व अंदाजे घातले होते. :D
विद्या भुतकर.

Tuesday, October 11, 2016

फेसबुक नैवेद्य :)

सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

विद्या. 

Monday, October 10, 2016

बदलणाऱ्या प्रायॉरिटीज

         आमचा एक मित्र म्हणत असतो की तुमच्या घरी नेहमी काही ना काही किस्से होतंच असतात. काय करणार? कितीही टाळायचं म्हटलं तरी झाल्याशिवाय राहत नाहीत.  आणि खरंतर मुलांच्या बाबतीत म्हणा किंवा एकूणच अनेक अनुभवांमुळे मी थोडी भित्री झालेय म्हटलं तरी चालेल. असो. आजची पोस्ट त्यावर नाही. सलग दोन दिवसांत असं काही झालं त्यामुळे आपल्या प्रायॉरिटीज कशा बदलतात याचा अनुभव आला. म्हणून म्हटलं लिहावं. 
        विकेंडला पाणी पुरी बनवायची होती. मी पणत्यांचा पसारा आवरत होते तेव्हढ्यात संदीपला म्हटलं पाणीपुरीचा तिखट मसाला मिक्सरला बारीक करून घेशील का? तो ते करत असताना एकदम जोरात त्याचे पाणी उडाले आणि त्याच्या डोळ्यांत गेले. हिरव्या मिरच्या असल्याने आम्ही दोघेही एकदम गडबडलो. त्याला धरून पटकन बाथरुमकडे घेऊन गेले. तिथे त्याने डोळ्यांवर जोरजोरात पाणी मारले. सतत पाणी मारून डोळे लाल झाले थोडे पण दोनेक तासात डोळे ठीक झाले आणि आगही कमी झाली होती. 
        दुसऱ्याच दिवशी मी कसला मसाला बारीक करत असतानाही तो गरम असल्याने पटकन थोडेसे बाहेर आले. (clearly we need to work on our mixer or our mixer handling skills) तरीही ताजाच अनुभव असल्याने मी जपूनच करत होते. त्यामुळे झालं काय की जे काही थोडेसे उडाले ते माझ्या स्वेटर आणि भिंतीवर उडाले. एकतर नुकताच संदीपचा किस्सा झाल्याने मला कळत नव्हतं की नक्की काय गोंधळ होतोय त्या मिक्सरचा. पण माझ्या लाईट कलरच्या स्वेटरवर उडाल्याने मी जरा वैतागले होते. एकतर ते हळदीचे डाग निघणार का असा मला प्रश्न पडला होता. संदीप भिंत पुसायला आणि मी स्वेटर साफ करायला गेले. 
      मी नंतर विचार करत होते, संदीपच्या डोळ्यांत जेव्हा तिखट गेले तेव्हा त्याने कुठला शर्ट घातला होता किंवा त्यावर डाग पडले किंवा नाही याचा विचारही आमच्या डोक्यांत आला नाही कारण त्या क्षणाला त्याचे डोळे ठीक असणं महत्वाचं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी मी ठीक होते त्यामुळे आता माझी प्रायॉरीटी बदलून स्वेटर आणि भिंतीची सफाई झाले होते. परिस्थितीनुसार महत्व कशाला द्यायचे कसे बदलते याचं एक उत्तम उदाहरण होते ते. 
     अनेकवेळा आपण उशीर झालाय म्हणून कुठेतरी घाईत निघतो, किंवा गाडी जोरात चालवतो. त्या क्षणाला वेळेत पोहोचणे महत्वाचे असते. पण तेच जर कुठे अपघात झाला तर? तेव्हा कितीही महत्वाची मिटिंग असो, स्वतःचा जीव महत्वाचा असतो. त्या क्षणाला कुठलीही गोष्ट मग महत्वाची वाटत नाही. बरोबर ना? मुलांचा अभ्यास त्यांचे मार्क यावर होणारी चिडचिड हे सर्व दुय्यम वाटायला लागतं जेव्हा ते आजारी पडतात. अर्थात या सर्वांसाठी काय करायला हवं मलाही कळत नाही. पण निदान असे किस्से झाल्यावर त्या त्या गोष्टीचं महत्व समोर येतं इतकं खरं.
      हां पण, अशा काही गोष्टी आहेत की ज्या वेळ गेल्यावर परत नक्कीच येत नाही. एखादं स्वप्नं पूर्ण करण्याची संधी, मुलांचं बालपण, शारीरिक स्वाथ्याकडे केलेलं दुर्लक्ष, आपल्या लोकांना न दिलेला वेळ निदान अशा बाबतीत तरी आपण कशाला महत्व द्यायचं हे नक्की केलं पाहिजे. म्हणजे निदान त्या बाबतीत तरी डोळे उघडण्यासाठी असे काही किस्से व्हायला नकोत. बरोबर ना?

विद्या भुतकर.

Sunday, October 09, 2016

एक परीक्षा संपली

            ऑस्कर वगैरे मिळेल अशी शंका आल्यावर जसे लोक भाषण देण्याची तयारी करतात ना तशी मला खूप इच्छा होत होती आधीच विचार करायची, माझी रेस झाल्यावर काय बोलायचं यावर. पण जोवर खरंच रेसला पोहोचत नाही तोवर हजार विघ्न मध्ये त्यामुळे पोचले तिथे तरी नशीब असे म्हणायची वेळ आली होती. अगदी पोरांना पण कुठे धडपडू नका म्हणून सांगत होतो. तर यावेळची रेस जरा खास होती. यावेळी तीन रेसच्या मेडले मध्ये भाग घेतला होता. म्हणजे काय तर एप्रिल मध्ये ५किमी, जून मध्ये १० किमी आणि आज ची हाफ मॅरेथॉन असे तिन्ही पळाले तर अजून एक मेडल मिळणार होतं. विचार करायला गेलं तर त्यात खूप अवघड काही नव्हतं. ५किमी आणि १० किमी अंतर पार पडायलाही अवघड नाही आणि हाफ तर मागच्या वेळी पण केली होती. पण प्रत्येक रेसच्या वेळी काहीना काही अडचण येतंच होती. अगदी १० किमी मध्ये संदीपला भागही घेता आला नाही त्याच्या पायाला दुखापत झाल्याने. तर एकूण काय की जानेवारी मध्ये अख्या वर्षाच्या पळण्याचे प्लॅनिंग करणे हा वेडेपणा आहे हे तरी आम्हाला कळले. असो. 
         आज सकाळीही अगदी शेवटच्या घटकेला रेसच्या जागी पोहोचलो. रेसचा भोंगा वाजला आणि आम्ही रांगेत जाऊन उभे राहिलो होतो. त्यात सर्वात वाईट गोष्ट काय असेल तर सतत पाऊस चालू होता. आजपर्यंत अनेकवेळा उन्हात पळालो आहे पण पावसात पळायची पहिलीच वेळ होती. मी तर दोन जॅकेट घालून बसले होते. संदीपचा पाय एकदा दुखावल्याने सोबतच पळायचे असे ठरवले होते. दोन मैल झाले आणि पावसाने माझे जॅकेट अतिशय जड झाले होते. नेहमेप्रमाणे माझे ओझे संदिपवर गेलेच. बिचाऱ्याने माझे जॅकेट त्याच्या खांद्यावर टाकले आणि पळत राहिलो. अनेकवेळा आपण गाडीपासून घरापर्यंत पोचताना धावत येतो ओलं होऊ नये म्हणून. पण एकदा एक जण मला म्हणाला होता,'इट्स जस्ट वॉटर.' तर त्यानुसार भिजत भिजत पळत राहिलो. इट वॉज जस्ट वॉटर !
        नेहमीप्रमाणे रेस सुरु झाली की माझी विचारयात्रा सुरु होते. अनेकवेळा रेस चालू असताना मला कौतुक वाटतं ते त्या लोकांचं जे सकाळ-सकाळी स्वतः बोर्ड घेऊन लोकांना प्रोत्साहन देतात किंवा काही आपल्या लहान मुलांना घेऊन आलेले असतात. कितीही थकून पळत असलो तरी मी त्या लोकांना थँक यु म्हणतेच. इतक्या सकाळी तेही रविवारी लवकर उठून कुणी येईल का? पण त्यांच्या बोलण्यानेही बरेचदा स्पीड वाढतो. उत्साह येतो. असाच विचार करत होते, आम्ही मुलांना स्केटिंग क्लासला घेऊन जातो तिथे यावेळी स्वनिक बराच वेळ दीदीच्या क्लासकडे बघत होता. कितीतरी वेळा त्याच्या ट्रेनरने त्याला हाक मारून पुढे चालायला सांगितले. तो बाहेर आल्या आल्या आम्ही दोघांनी त्याला एकच प्रश्न विचारला,"तू तुझा क्लास सोडून बाकी मुलांकडे काय बघत बसतोस?". त्याने नाराज होऊन विचारले,'पण मी गुड जॉब केला ना?". आज विचार करत होते, परक्या लोकांनी  केवळ बोलण्याने मला पळायला जोर येत असेल, तर आमच्याकडून त्याच्याही काही अपेक्षा असतीलच. कितीतरी वेळ तोच विचार डोक्यात घोळत राहिला. 
        बाकी, पावसात भिजत पळाल्याने अनेक फायदे झाले. एकतर अजिबात गरम झालं नाही आणि शरीरातील पाणीही नेहमीइतकं कमी झालं नाही. नेहमीप्रमाणे माझी गणितं चालूच होती, चार मैल झाले म्हणजे ९ च राहिले. पुढे ७ झाल्यावर आता निम्म्याहून कमीच अंतर राहिले इ. मागच्या अनुभवामुळे रेसचा रस्ता माहित झाला होता. तरी पावसात ओले झालेले शूज, जॅकेट यांचं ओझं वाटायला लागलं होतं. अनेकवेळा ट्रेकिंगला जाताना भिजत गेले आहे पण तीन तास पावसात पळण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे एक वेगळाच अनुभव घेतला दोघांनीही. दरवेळी फिनिश लाईन पार पडली की काहीतरी वेगळं वाटतंच. यावेळीही वाटलंच. नंतर काकडत गाडीजवळ येऊन कपडे बदलून पुढचा अर्धा तास तरी थंडी जात नव्हती. नेहमीप्रमाणे मित्राकडे घरी जाऊन खाऊन एक झोप काढली. :) मेडल बघून मुलांना होणार आनंदही दरवेळी नवीनच. आता घरी उबेत बसून ही पोस्ट लिहितानाही छान वाटत आहे.
        एकेकाळी पहिली हाफ मॅरेथॉन झाल्यावर परत मी असं काही करेन का असा मला प्रश्न पडला होता. पण आज ४ हाफ मॅरेथॉननंतर खरंच काहीतरी सातत्याने केल्याचा आनंद वाटत आहे. :) जानेवारी मध्ये रजिस्टर केलेली ही रेस होती. तेव्हापासून वर्षातले ९ महिने बाकी सर्व गोष्टींसोबत या एका गोष्टीचे वेधही लागले होते. ते एकदाचं पार पडलं आहे. त्यामुळे आज एकदम ओझं हलकं झाल्यासारखं वाटत आहे. पाय जड झालेत ही गोष्ट वेगळी. ते किती दुखतात ते उद्या कळेलच. :) तोवर सर्व मेडलचे आणि आज ओला होऊन चुरगळाल्येला बिब चे हे फोटो. :) आणि ओलेचिंब झालेले आम्ही. 
विद्या भुतकर.

Wednesday, October 05, 2016

तू का पळतेस?

         आज ऑफिसमध्ये एकाशी बोलत होते. या रविवारी माझी रेस आहे. त्यामुळे जरा डोक्यात बरेच विचार चालू असतात. वेळेत उठणे, पोचणे, त्यासाठी पायांची, नियमित जेवणाची काळजी घेणे इ. आता बऱ्याच जणांना हे उगाच बाऊ करणे वाटू शकते. पण त्याला काही करू शकत नाही. असो. तर आज एकाने विचारले,"तू का पळतेस? म्हणजे उगाच काहीतरी करायचं म्हणून की तुला खरंच पळायला इतकं आवडतं?". जरा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरा. अनेकवेळा पळण्याबद्दल लिहिले आहे, अनेक वेळा फेसबुक वर पळून झाल्यावर त्याचे फोटो टाकते, मित्र मैत्रिणींना पळायला जा म्हणून मागे लागते. त्यात खरंच आवड किती आणि दिखावा किती? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. आणि तो मलाही पडला.
         आता एखादी व्यक्ती केवळ दिखाव्यासाठी इतके करू शकते का हा प्रश्न आहेच. पण जाऊ दे. खरं सांगायचं तर आता पूर्वीसारख्या परीक्षा द्यायला जमत नाही. देण्यासाठी तितका उत्साहही नाही. बाकी देश बदलणे, घर बदलणे, नवीन नोकऱ्या-आजारपणं यातून छोट्या मोठ्या परीक्षा चालूच असतात, पण त्यात हातात येईल असं एखादं मेडल नसतं. त्यामुळे एखादी छोटीशी का होईना रेस झाली की काहीतरी मिळवल्यासारखं वाटतं. त्या रेससाठी केली जाणारी तयारी, सराव, प्रत्यक्षात त्या दिवशी पळून आल्यावर काहीतरी ध्येय ठेवून ते साध्य केल्याचं समाधान असतं. जगात अनेक खेळाडू आहेत जे इतकी मेहनत घेतात. आपण खेळाडू म्हणून कधी शाळेत किंवा कॉलेजमध्ये कुठे भाग घेतला नाही याची उणीव भरून काढण्याचा तो एक प्रयत्न असतो. आता हे सर्व झालं तरीही मी केवळ हट्ट किंवा दिखावा म्हणून हे करते का हा प्रश्न आहेच?
          बरेच वेळा असं होतं की थंडीत बाहेर कुठेही जाता येत नाहीये. घरी बसून मस्त जेवण करून आरामात टीव्ही बघत बसू शकते. पण त्यात मजा येत नाही.  कितीही लोळत पडलं, खाल्लं-पिलं, अजून काही करमणूक केली तरी उगाच काहीतरी कमी पडतंय असं वाटतं. उठून काहीतरी केलं पाहिजे असं वाटायला लागतं. तरीही इतका उत्साह नसतो की जाऊन भरपूर पळून यावं. अशा अनेक वेळा मी बिनाचप्पल घरातल्या ट्रेडमिलवर नुसती चालत राहिले आहे. आणि १५-२० मिनिटांनी एकदम फ्रेश वाटायला लागलं म्हणून मधेच थांबून पायात शूज चढवून पुन्हा जोमाने पळायला सुरुवात केलीय. कधी उदास वाटत असताना २-३ मैल हळूहळू चालण्यानेही फ्रेश वाटायला लागलंय. अशा अनेक क्षणात कुणीही नसतं 'दिखावा करायला'. ते केवळ स्वतःसाठीच केलेलं असतं. पळत नसताना जे वाटतं ना? ते आवडत नाही, म्हणून पळते म्हटलं तरी चालेल. आणि त्या वाटण्याला नावं दिलं नाही तरी चालेल पण ते आहे म्हणून आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी पळत राहणार. :) आणि हो बाकीच्यानाही सांगत राहणार.

विद्या भुतकर.

Tuesday, October 04, 2016

Being Parents of अमुक तमुक

        शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना प्रत्येकवर्षी ठरवायचे, यावर्षी एकदम सुरुवातीपासून मन लावून अभ्यास करायचा. कितीही केले तरी परीक्षेच्या वेळी होणारी धावपण व्हायचीच, विशेषतः कॉलेजमध्ये. त्याप्रमाणेच सानूची शाळा, म्हणजे ती बालवाडीत होती तेंव्हापासून दार वर्षी ठरवतो, तिच्या अभ्यासाकडे, बाकी ऍक्टिव्हिटी कडे अजून जास्त लक्ष द्यायचे, वेळ द्यायचा, तरीही एखादी पेरेंट-टीचर मिटिंग चुकलीच आहे, अनेक नोटिसा अगदी शेवटच्या दिवशी सह्या करून दिल्यात किंवा एखाद्या प्रोजेक्ट्च्या वेळी द्यायचे सामान राहून गेले आहे.  आणि हो ज्या दिवशी 'रेड डे' म्हणून लाल रंगाचे कपडे घालायचे असतील तेव्हा हमखास निळे-हिरवे-पिवळे घालून गेलो आहे. ती ४-५ वर्षाची असताना बरेचवेळा पुण्याच्या शाळेत एखादा अंक किंवा अक्षर २५-३० वेळा लिहून आणायचं होमवर्क असायचं. मी म्हणायचे जाऊ दे, लिहिता येतंय ना, मग कशाला ३० वेळा काढायला लावायचं? अशा वेळी टिचरकडून 'होमवर्क पूर्ण करून पाठवा' अशा नोटही आलेल्या आहेत. एकूण काय की थोडे इकडे-तिकडे झालेच आहे.  
          बरं नुसते शाळेतला अभ्यास नाही. त्यासोबत एखादा खेळ किंवा कलाही शिकवावी म्हटलं. पोहायला सर्दी होते म्हणून दोन-तीन वेळा राहिलं, तर एकदा हात मोडला म्हणून. कधी घर बदलले म्हणून चित्रकलेचा क्लास मागे पडून गेला. अशा एक ना अनेक गोष्टी. जागरूक आई-वडील म्हणून कितीही धावपळ करायची म्हटलं तरी काहीतरी राहून जायचेच. पण यावेळी आम्ही अगदी ठामच ठरवले, वेळच्या वेळी सर्व कामे करून, पोरांचे अभ्यास घेऊन, बाकी सर्व क्लासही वेळेत करून घ्यायचे. त्याप्रमाणे शाळेतल्या सर्व नोटिसांना वेळेत सह्या करून पाठवल्या, शाळेत लागणाऱ्या मदतीलाही भाग घेतला (PTO मध्ये). ऍक्टिव्हिटी सेंटर ला गेलो तर पोहायचे, जिम्नॅस्टिकचे आणि सॉकरचे सर्व सेशन आधीच भरून गेले होते. ice skating हा आम्हाला हवा असलेला एकमेव क्लास वेळेत मिळाला त्यामुळे ते तरी काम पूर्ण झाले होते. सानूची चित्रकला छान आहे असे आम्हाला वाटते म्हणून तिचा मागच्या वर्षी अर्धवट राहिलेला क्लासही लवकरच सुरु होणार आहे. अशा रीतीने निदान मागच्या वर्षीपेक्षा बरीच प्रगती आहे म्हणायची. 
        आता यात पोरीला किती पिडणार? असे विचारही अनेक लोकांच्या मनात आले असतील. बरोबर! मलाही हे असेच वाटायचे. कशाला उगाच पोरांना ढीगभर क्लासला घालायचे आणि त्रास द्यायचा? त्यामुळे बरेच वेळा माहिती असूनही आम्ही बरेच क्लास लावले नाहीत. पण यावेळी म्हटले एक प्रयत्न तरी करून बघू. आता यात होते काय की आजपर्यंत तरी असे कुठलेही गुण आमच्या मुलांचे दिसले नाहीयेत ज्यामुळे आम्ही म्हणू शकू की 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात'. त्यामुळे त्यांना कुठल्या गोष्टीत प्रोत्साहन दिले पाहिजे हे कळत नाही. आता स्वनिकला वाचनाची आवड लवकर लागली आणि तो ५ वर्षाच्या आतच बरंच छान वाचू शकतो हे कळलं. तर कधी त्याला गाणी ऐकायला प्रचंड आवडतं हेही दिसतं. आम्ही काही कलाकार नाही, अशा वेळी त्याला एखाद्या क्लासला लावूनच त्याला त्यात आवड आहे की नाही हे पाहू शकतो ना? त्यामुळे एक अभ्यासाचं क्लास, एक खेळाचा आणि एक कलेचा असे तीन क्लास झालेच. बरोबर? आजकाल अनेक पालक जागरूक राहून मुलांच्या भल्यासाठी त्यांना या सर्व क्लासमध्ये घालून प्रोत्साहन देतात. त्यात 'मला हे सर्व करायला मिळालं नाही तर मुलाला तरी मिळू दे' अशी सदिच्छाही असतेच.
        आता याची दुसरी बाजू अशी की हे सर्व केल्यामुळे मुलांची दमछाक होते असेही बोलले जाते. त्यांच्यावर नको इतके ओझे लादले जाते किंवा त्यांचं बालपणच हरवलंय हेही बोललं जातं. पण खरं सांगू? एक आई म्हणून आपल्या मुलाची काय आवड असेल हे लहान वयात ओळखणे अवघड आहे. पण त्याचसोबत त्याचा कल कशाकडे असेल हे पाहण्यासाठी त्याला सर्व संधी उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे. कदाचित पुढे जाऊन मुलाचा कल पाहून त्यांना त्या त्या आवडीच्या गोष्टीला प्रोत्साहन देताही येईल. पण अशा अनेक गोष्टी असतात ज्या लहानपणापासून सुरु केल्यास त्यांचा सराव चांगला होतो किंवा हात चांगला बसतो असे असेल. उदा: झाकीर हुसैन, लता मंगेशकर यांनीही लहानपणापासूनच सराव केला असेल ना? त्यांच्या घरी संगीताचं वातावरण असेल, माझ्या घरी नाहीये तर मला कसं कळणार काय केलं पाहिजे?तर आपण पालक म्हणून आपल्या पाल्याची आवड निवड ओळखणं खरंच अवघड आहे आणि ती कळेपर्यंत तरी अशा अनेक संधी त्यांना आपण दिल्याच पाहिजेत असं मला आता वाटू लागलंय. 
        खरं सांगू का? अगदी बाळ पोटात असल्यापासून ते जन्मानंतर पुढे त्याची वाढ कशी होत आहे हे बघायला डॉक्टर तर असतातच. पण इंटरनेटवरही बरीच माहिती मिळते, एक पालक म्हणून आपण कसं वागलं पाहिजे किंवा नाही याच्यावर ढिगाने पुस्तकं मिळतील. पुढे एखादा खेळाडू, गायक, अभिनेता आपल्या आईवडिलांच्या मताविरुद्ध जाऊन कसा यशस्वी झाला हे सांगणारे अनेक चित्रपट आणि पुस्तकंही मिळतील. पण एखाद्या मोठया व्यक्तीच्या आई-वडिलांचं एखादं पुस्तक कुणाला आठवतंय का? आता PV Sindhu च्या आई-वडिलांनी तिच्यासाठी बरीच मेहनत घेतली असणार, पण त्यांच्यावर पुढे जाऊन पुस्तक थोडीच लिहिलं जाणार आहे? किंवा मी माझ्या मुलींसाठी कसे कष्ट घेतले यावर ते लिहितील का? मला शंकाच वाटते. कितीही मोठी व्यक्ती असली तरी तिच्या आई-वडिलांनी तिच्यावर घेतलेली मेहनत कशी घेतली असेल हे नेहमी एक कोडेच राहते. त्यांना कसं कळलं आपल्या मुलाला हे शिकवलं पाहिजे, इ? 
        मला असं वाटतं की भारतातही अनेक आईवडील आहेत ज्यांना आपल्या मुलाला अशा संधी द्यायच्या असतात, त्यांनी ऑलम्पिक मध्ये चांगली कामगिरी करावी असं त्यांना वाटत असेल. पण सुरुवात कुठून आणि कशी करायची? कधी ठरवायचं की माझ्या मुलाला किंवा मुलीला केवळ सोबत राहून मदत करण्यासाठी मी आहे ते माझं सर्व करियरही सोडलं पाहिजे? कुठले तरी त्याग कुणीतरी केलेच असतील ना? कोण सांगणार हे सर्व? बरं, एखाद्या 'दीपा करमाकर' ला असं वाटलं असेल ना 'माझे आई वडील मला किती त्रास देत आहेत'. पण केवळ त्यांच्या आग्रहामुळे, 'तू हे करू शकतेस' या विश्वासामुळे तिने खेळ चालू ठेवला असेल? नक्की कुठल्या वेळेला आपण थांबायचं? आणि मुलाला त्याच्या मनाप्रमाणे करू द्यायचं हे कसं कळणार? स्केटिंग क्लासच्या पायऱ्यांवर बसून मी आणि संदीप बोलत होतो,"हे मोठ्या खेळाडूंच्या आईवडिलांनाही असेच त्यांना वेळेत क्लास लावले असतील का?" कुठेतरी त्यांनीही सुरुवात केलीच असेल ना? कुणाला आवडेल आपल्या मुलाची एकच आवड असताना हजार क्लासेस लावायला? 
        खरंच असं कुणाचं एखादं पुस्तक मिळालं तर? अशा किती आईवडिलांची पुस्तकं असतील? समजा हिंदी, इंग्रजी, मराठी सर्व भाषा मिळून २००-३०० पुस्तकं जरी असती तर त्यातलं एखादं फायद्याचं झालं असतं. जगात अनेक प्रसिद्ध व्यक्तींची किंवा त्यांच्यावर लिहिलेली हजारो पुस्तकं असतील, पण आई वडिलांवर किंवा त्यांचे स्वतः लिहिलेले मात्र जवळ जवळ नाहीच? मी तर म्हणते भरपूर पाहिजेत. निदान आमच्यासारख्या पामराला त्याचा नक्कीच फायदा होईल. आमचे आणि पोरांचेही जरा भले होईल. होय ना? असो. लेख खूप मोठा झाला. तरीही साध्य काहीच नाही. आपल्याकडे मुलं इंजिनियर झाली म्हणून त्याच्या मागे लाखो होतात आणि त्यांना मार्गदर्शन करायला हजारो क्लासेस असतात. पण मग इतक्या आई-वडिलांमध्ये 'Being Parents of अमुक तमुक' हे लिहिणारे निदान हाताच्या बोटावर मोजण्याइतकी तरी पाहिजेत ना? तुम्हाला काय वाटतं?

विद्या भुतकर.

Monday, October 03, 2016

नसते उद्योग......

          तीनेक वर्षांपूर्वी माझ्या मैत्रिणीने रंगवलेल्या पणत्यांचे फोटो पाहिले आणि आपणही काहीतरी करावं असं वाटायला लागलं. उत्साहाने जाऊन कुंभारवाड्यातून पणत्या आणल्या, रंगही घेतले आणि एका पाठोपाठ एक पणती रंगवण्याचा सपाटा लावला. मी आणि संदीपने मिळून १००-१२५ पणत्या रंगवल्या. त्यात प्रत्येक वेळी नवीन रंगांचे मिळून बनणारे जे सुंदर चित्र शेवटी दिसायचे त्याचा जणू ध्यासच घेतला. मान मोडेपर्यंत त्या पणत्या रंगवल्या. आता त्या करायच्या काय? मग आम्हाला कल्पना सुचली आपण सर्वांना दिवाळीला पणत्याच भेट म्हणून दिल्या तर? मग आम्ही हिशोब काढला आणि अजून पणत्या, रंग घेऊन आलो. दिवाळीला ऑफिसमध्ये आणि घरी, बिल्डिंगमध्ये सर्वांना छान पॅक करून गिफ्ट केल्या.
        मागच्या वर्षी पुण्यात नसल्याने मला इतक्या रंगवता आल्या नाहीत त्यामुळे वाईट वाटत होतं. त्यात माझ्या पुण्यातल्या मैत्रिणींनी बऱ्याच पणत्या सजवून विकल्याही. तेव्हा तर आपण खूप काही गमावतोय असं वाटत होतं. म्हणून थोड्या इथल्या इंडियन स्टोअर मधून घेऊन आले आणि रंगवलेल्या पणत्या इथे काहीजणांना दिवाळीला भेट दिल्या. मला आता असं वाटू लागलंय की दिवाळीच्या अनेक गोष्टींसोबत पणत्या हे अजून एक गणित जमलं आहे. तर त्यामुळे मी पुण्यातून येताना थोड्या जास्त पणत्या घेऊन आले. विचार आला, अनेकवेळा आपण बनवल्या आहेत तर मग यावेळी खरंच कुणी विकत घेणार आहे का हे पाहुयात.

का करायचं हे ? खरंतर न करण्यासाठी अनेक कारणं आहेत:
१. एकतर पणत्या केवळ दिवाळीसाठीच बनवले किंवा विकले जातात. म्हणजे सिझनल वस्तू म्हणतो तशी. त्यामुळे त्या नंतर शिल्लक राहिल्यास त्याचा उपयोग नाही.
२. छान वेळ देऊन रंगविण्यात बराच वेळ जातो त्यामानाने त्याची किंमत मिळेलच असे नाही.
३. त्याच्यापेक्षा सुमार दर्जाच्या का होईना पण कमी किमतीत पणत्या दुकानात मिळतातही.
४. जितका वेळ मी त्यात घालवून पैसे मिळतील त्यापेक्षा अनेकपटीने माझ्या नोकरीमध्ये मिळतात, त्यामुळे हे काही उपजीविकेचे साधन म्हणून मी बघू शकत नाही.

हे सर्व असूनही मला यावेळी पणत्यांची विक्री करून बघायची आहे कारण.....  खाज, नसते उद्योग करायची, दुसरं काय? :)

       खरंतर मी सुरुवात करतानाच मला अनेक गोष्टी लक्षात आल्या त्या इथे मांडायच्या आहेत म्हणून ही पोस्ट. आजपर्यंत मी कुठल्याही प्रकारे कुठलीही वस्तू मी व्यवसाय म्हणून विकली नाहीये. एकदा एका मैत्रिणीच्या मामीच्या साड्यांच्या व्यवसायासाठी थोड्या आमच्या बिल्डिंग मध्ये घेऊन आले होते तेही माझी साडी मैत्रिणींना आवडली, म्हणजे केवळ मध्यस्थ म्हणून. आणि हो त्यानंतर स्वतःसाठी काही केले असेल तर जेव्हा माझे हे फेसबुक पेज सुरु केले तेंव्हा लोकांना 'like' करायला invite पाठवले होते. आता त्यात कुठेही ना त्यांचे पैसे खर्च होणार होते ना मला काही पैसे मिळणार होते. तरीही काही लोकांचा निरुत्तर पाहून मला खरंच यासाठी त्यांना पैसे पडले की काय असे वाटले होते. आधी मी माझ्या मैत्रिणींना माझ्या पोस्ट रोज व्हाट्स अप वर पाठवायचे, पुढे तेही बंद केले. हो ना, उगाच कशाला रोज लोकांना त्रास?
      एकूण काय तर माझा एक विक्रेता म्हणून अनुभव शून्य आहे. त्यामुळे मला माझ्या ओळखीत असलेल्या अनेक घरगुती उद्योजक असलेल्या मैत्रिणीचं खूप कौतुक वाटतं. बिल्डिंगमध्ये अनेक जण छोटा मोठा व्यवसाय करतात. घरगुती भाजणी वगैरे सारखे छोटे पदार्थ, कपडे, साड्या, टपरवेअर, ज्वेलरी, पर्स अशा तयार वस्तू तर कुणी केटरिंग करणारी कुणी केक बनवणारी. यासर्वांचे कष्ट पाहून मला खूप कौतुक वाटतं. त्यामुळे आणि त्यांच्या चांगल्या क्वालिटी मुळेही मी अनेकदा त्यांच्याकडून अनेक वस्तू घेतल्या आहेत. आता यातील बऱ्याचजणी हे पैसे कमावण्याचे साधन म्हणून करतात की हौस म्हणून की अजून काही हे मला माहित नाही. पण एक स्त्री उद्योजक म्हणून बऱ्याच गोष्टी येतात:
१.  मुख्य विचार करणे, काय वस्तू विकायची ज्यामुळे खरंच त्यातून थोडा फार फायदा होईल.
२. केटरिंग, केक सारख्या गोष्टीत शारीरिक कष्टही आहेतच.      
३. यात बरेच वेळा मोठी ऑर्डर आली तरच मोठा फायदा होऊ शकतो, नाहीतर मग गिऱ्हाईक येईल तसे थोडा थोडा.
४. आजकाल स्टॉल लावायचे पर्याय असतात, पण त्यासाठी दिवसभर घालवूनही स्टॉलचे कमिशन जाऊन किती फायदा होत असेल? मूळ भांडवल, गेलेला वेळ आणि स्टॉल चे कमिशन वजा जाता हातात काय राहतं?
५. स्टॉल सोडले तर मग, हे सर्व बरेचदा ओळखीतच विकले जातात. त्यात असेही होते की वस्तू आवडली आहे म्हणणारे खूप पण घेणारे कमीच असू शकतात.
६. ओळखीचे लोक असल्यावर, केकसारख्या किंवा केटरिंग मध्ये अनेक हॉटेल वाले लोक कमी दरात देत असताना, चांगल्या वस्तूसाठी लोक माल पाहून जास्त पैसे द्यायला तयार होतात का? अशा वेळी आपल्या वस्तूवरील विश्वास आणि आपला दर ठाम ठेवणे हे अवघडच होते.
७. शिवाय, कमी जास्त झाल्यास कधी कधी चांगले संबंध तुटण्याची भीती आहेच.
८. घरगुतीच असल्याने घरात काही कमी जास्त झाल्यास, मुलांच्या परीक्षा, अभ्यास यामुळे सर्व बंद होण्याचा संभव आहेच.
९. घरी येऊन कुणी घेऊन जाणारे असेल तर ठीकच, नाहीतर मग माल नीट पॅक करून पोहोचवणे इ. करूनही तो व्यवसाय परवडतो का?
१०. काहींची कलाकुसरीची वस्तूही असते. आता यात तर मन आणि वेळ दोन्हीही अडकलेलं असतं. अशावेळी त्याची योग्य किंमत ठरवून ती मिळवणं नक्कीच अवघड आहे.
११. आणि माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचा मुद्दा हा की, थोडे फार प्रॉब्लेम आल्यानंतरही पुढे व्यवसाय चालू ठेवण्याची किंवा त्याचे मार्केटिंग करण्याची हिम्मत करून पुढे चालू ठेवणे.
        
          आता हे सर्व त्यांच्यासाठी ज्यांना नोकरी किंवा त्यांच्या नवऱ्याची नोकरी आहे. विचार करा, एखाद्या स्त्रीवरच तिचे कुटुंब अवलंबून असेल तर? कितीतरी कष्ट असतील त्यांचे. पणत्या घेताना जिच्याकडून घेतल्या ती कसे भागवत असेल? असो. माझी एक मैत्रीण बिल्डिंग बांधकाम व्यवसायात आहे, एक डॉक्टर आहे जिने नुकतेच नवीन क्लीनिक सुरु केले आहे. अशा ठिकाणी तर किती अडचणी येत असतील. एकदा त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकायचे आहेत.
         तर हे सर्व आणि असे बरेच मुद्दे डोक्यात आले. आज सकाळीच काही मैत्रिणींना मी पणत्यांचे फोटो पाठवले. एरवी गप्पा मरणाऱ्यांपैकी कुणीच काहीच बोलले नाही. तेव्हा जरा वेळ असं वाटलंही की जाऊ दे ना, कुठे त्या पणत्या विकून काय मिळणार आहे? पण प्रश्न पैशांचा नसून, त्यातून जे शिकायला मिळेल त्याचा आहे. म्हणून यावेळी हे एकदा करून बघणारच आहे. त्यामुळे आजच संध्याकाळी एकीला माझे डिसाईन दाखवले आणि तिला आवडलेही. थोड्यावेळ पूर्वीच तिने ८ बाजूला ठेवायला सांगितल्या आहेत. :) बघू अजून पुढे काय काय होते. एक प्रयोग म्हणून करायला नक्कीच मजा येत आहे. :) तुम्हाला कुणाला हव्या असतील तर नक्की सांगा हं ! पोस्टाचा खर्च मात्र तुम्हाला करावा लागेल. :)
विद्या भुतकर.