Wednesday, August 07, 2013

योगायोग

            आपण लोक पण ना इतके वेडे असतो. म्हणजे कशानेही खूष होतो, अगदी कुठल्याही छोट्या कारणाने. मित्राने डब्यात भेंडीची भाजी आणली, खूष ! ऑफिसला येताना पाऊस पडला नाही आणि ऑफिस मध्ये आल्यावर सुरु झाला , हो खूष. बसमध्ये बसायला जागा मिळाली, हो खूष.  दोघांनीही एकाच वेळेस एक वाक्य बोलले, हो खूष आणि मग पुढे हीहीही…खिखिख. आता काल रस्त्यावरून जाताना खूप छान पेरू दिसले. आम्ही दोघेही मग उतरलो आणि मुलांसाठी घेऊ लागलो. चांगले पेरू मिळाले म्हणून आम्ही खूष आणि एकदम एक किलो पेरू घेणारे गिऱ्हाईक मिळाले म्हणून मालक खूष.
             तीच कथा काळजीची. आम्ही पेरू घेत असताना तिथे एक माणूस पेरू घेत होता. म्हणाला एक कडक द्या आणि एका जर मऊ द्या. मग त्याने स्वत:च दोन निवडून घेतले आणि बाजूला झाडाखाली गेला. तिथे एक वयस्कर माणूस उभा होता. त्याच्या कानाजवळ वाकून म्हणाला,' हा घ्या. तुमच्यासाठी मऊ बघून आणलाय'. ५-१० रुपयाची कथा पण किती काळजी आणि प्रेम वाटत होतं त्यात. कुणी गावाला चाललंय? मग सोडायला जा, रात्री उशीर झाला तर आणायला जा. फोन लागत नाही म्हणून काळजी, फोन उचलत नाही म्हणून काळजी, त्याचा फोन येणार तर चार्जिंग संपत आलंय म्हणून काळजी. आज रागावून गेला, चहा न घेताच गेला, रात्री सर्दीने झोपच नाही, काही न काही असतंच.
              माझा आणि माझ्या भावाचा वाढदिवस एकाच दिवशी असतो हे मी कित्येक लोकांना सांगितले आहे आणि प्रत्येक वेळी त्यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया द्यावी अशी अपेक्षाही करते. तर हे असे योगायोग कुठे न कुठे घडतच असतात. पण ते सांगण्यात आणि प्रतिक्रिया देण्यातही किती आनंद आणि आश्चर्य?  मुलीची आणि एका मैत्रिणीच्या मुलाची जन्मतारीख एकच. तर ऑफिसमध्ये सर्वांना आम्ही लगेच सांगितलं. ते बिचारे काय करणार त्यात? आता एखादीला बाळ होण्यासाठी दिलेली तारीख समजली की त्यातही ती आपल्या, आपल्या नातेवाईकांच्या तारखेच्या किती जवळ आहे ते सांगत बसायचे. आता १० मार्च तारीख दिली असेल तर ते बाळ १९ मार्चपर्यंत कशाला थांबेल पोटात काकाच्या वाढदिवसाची वात बघत? काहीही !! कधी कधी तर जन्मतारीख आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस यांचाही धागा जोडायचा प्रयत्न करायचा. असो.
           कधी कधी आपण काही गोष्टी सोडूनही देतो. सासूने एखादा टोमणा मारला, जाऊ दे. ऑफिसमध्ये कुणी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, जाऊ दे. कधी नवीन आणलेली छत्री, चप्पल पहिल्याच वापरात खराब झाली, जाऊ दे. रस्त्यावरून खड्डा चुकवला नाही असा एकही क्षण नाही, जाऊ दे. मुलाने पहिल्याच दिवशी नेलेली वस्तू हरवली, जाऊ दे. उठल्यापासून झोपेपर्यंत कित्येक गोष्टी अशाच सोडून देतो. पण कधी तेव्हढ्याच छोट्याशा गोष्टीवर भडकतो देखील. चालताना एखाद्याचा चुकून धक्का लागला, लगेच मागे वळून 'काय रे, दिसत नाही का म्हणतोच?' रिक्षावाल्याने १० रुपये जास्त मागितले की त्याला ऐकवतोच. धोब्याने कपड्याचा डाग नाही काढला , बाईने भांडं नीट नाही घासलं, आईने डब्यात सर्व दिलं पण चमचाच नाही दिला, बाबांना हजार वेळा सांगूनही रिक्षा न घेता बसच घेतली. चिडायला कुठलंही कारण पुरतं.
         वाटत किती क्षुद्र आयुष्य आहे नाही आपलं? कशानेही खूष होतो, कशानेही रडतो, हसतो, चिडतो. मोठ्या लोकांचं नसेल ना असं होत. म्हणजे एखाद्या अंबानीला भाजी स्वस्त झाली म्हणून थोडीच आनंद होणार आहे? की होणार आहे एखाद्या राजकारण्याला संताप रस्त्यात ट्राफिक लागलं म्हणून ? की  बसमधून उतरल्यावर लगेच रिक्षा मिळाली म्हणून कुणी शाहरुख आईला फोन करणार आहे? आपल्या या छोटेपणावर हसू येतं, पण त्यालाच जिवंत असणं म्हणत असावेत. सर्व भावनाच बोथट झाल्यावर आनंद कशाचा आणि दु:खं कशाचं ? असा विचार केल्यावर वाटतं बरं आहे छोटंच राहिलेलं. 

-विद्या.