Tuesday, December 12, 2006

त्रिशंकू!!!

कॉफी मशीनजवळ चार टवाळांचा खिदळण्याचा आवाज आला आणि तो वैतागला. मनातल्या-मनात एक दोन शिव्या घालून त्याने आपल्या कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. "साले एक तर उशिरा ऑफिसला येतात आणि त्यानंतरही असाच टाईमपास करत राहतात. कधी वेळेवर काम करायची बोंब." तसे त्याला त्यांच्यावर चिडायचे काही कारण नव्हते, तेही त्याच्याच देशातले, त्याच्यासारखेच नोकरीसाठी इथे राहिलेले. शिवाय त्यांनी आजपर्यंत कामात कुठेही चूक केली नव्हती. त्यामुळे त्याला फारसे बोलताही यायचे नाही.फरक फक्त एवढाच होता की तो आता जवळ-जवळ अमेरिकनच झाला होता तो काम करत असलेल्या कंपनी सारखाच. आणि या खिदळणाऱ्या, एका भारतीय कंपनीकडून आलेल्या लोकांचा तो साहेब झाला होता.तिकडून हसण्याचा आवाज वाढतच होता. शेवटी त्याने संगणकाला कुलूप लावून खिडकी समोर येऊन उभा राहिला. त्याची ती आवडती जागा होती. त्या खिडकीतून बाहेर पाहत त्याने कितीतरी गोष्टींवर विचार केला होता. पण आज त्या खिडकीतूनही फक्त सगळीकडे बर्फच बर्फ दिसत होते. प्रत्येक वस्तूवर एक प्रकारचा थंडपणा आला होता.इथली थंडी त्याला बऱ्याच जुन्या गोष्टींची आठवण करून द्यायची. त्या दिवसांची जेव्हा तो नुकताच इथे आला होता....
पुण्या-मुंबईच्या एका मध्यमवर्गातील घरातून तो आलेला. बारावी, अभियांत्रिकी शिक्षण सारे अगदी नेहमीसारखे.त्यानंतर त्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायचा निर्णय घेतला. आई-बाबांची आयुष्यभराची पुंजी खर्चून तो अमेरिकेत पोचला.मग अभ्यास,रात्रीची नोकरी, इथली थंडी, परीक्षा यांना तोंड देत त्याने डिग्री मिळवली. हे सगळं होईपर्यंत तरी तो तसाच होता, खेळकर, अभ्यासू, मनमिळाऊ, घराची, आपल्या देशाची ओढ असलेला एक भारतीय. शिकताना, पैसे पुरेसे नसले तरी मिळेल त्या वेळात, पैशात मित्रांबरोबर मजा करणे, घरच्यांशी बोलणे या सगळ्या गोष्टी तो करत असे. अगदी इथल्या लोकांवर, इथल्या व्यवस्थेवर, आसपासच्या गमतीजमती वर गप्पा मारणे, हसणे-खिदळणे हे ही करत असे. लवकरच डिग्री मिळाली आणि नोकरीची शोधाशोध सुरू झाली.आपल्या वक्तृत्व कौशल्यामुळे,चांगल्या मार्कांमुळे नोकरीही मिळून गेली. पैसे काही खूप जास्त नव्हते पण कर्ज फेडणे आवश्यक होते. एक-दोन वर्षात कर्जही फेडून टाकले त्याने. आई-बाबांची मान गर्वाने उंच झाली होती. पण हळूहळू त्याच्यातील बदल त्यांनाही जाणवत होता.

तो बराच एकटा एकटा राहत होता.अमेरिकन कंपनीमधल्या परक्या लोकांबरोबर जुळवून घेणे त्याला अवघड जात असले तरी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मिळून-मिसळून राहणे त्याला भाग होते.शिवाय आपल्या वेगळेपणाचा, बावळटपणाचा कुणी हशा उडवू नये यासाठी तो जास्तीत जास्त प्रयत्न करू लागला. त्यामुळे त्याच्या बोलण्याच्या ढंगात, वागण्यात, एक प्रकारची व्यावसायिकता आली होती.त्याचे मित्र आपलल्या कामात गुंग झाले होते. तो ही आपल्या आयुष्यात रमून गेला. पैशाची नशा दारूच्या एकदम उलट असते. आधी गरज म्हणून नंतर गंमत म्हणून पैशाची ओढ लागते, तशी ती त्यालाही लागली. लवकरच त्याला भारतातल्या व्यवस्थेचा, तिथल्या लोकांच्या वागणुकीचाही राग येऊ लागला. प्रदूषण, उष्ण वातावरण, गर्दी यात त्याचे मन रमेनासे झाले आणि त्याने कायमचे अमेरिकेतच राहण्याचा निर्णय घेतला!!!
आता आई-बाबांनी त्याला त्याच्या पसंतीने मुलगी बघून दिली आणि त्यांचे लग्न लागले......आरती....!बापरे!! तिला फोन करायचा होता! एकदम भूतकाळातून बाहेर येत त्याने तिला फोन लावला.
आरती, "अरे काय तू, जेवायला येणार आहेस की नाही घरी?"
त्याने वैतागून उत्तर दिले,'नाही गं,किती वेळा सांगितले मला वेळ नाहीये म्हणून? "
ती, "डबा तरी न्यायचा होतास."
तो अजून चिडला,"सांगितले ना मला नाही आवडत ते भाजी-पोळी डब्यात न्यायला."

तिने रागाने फोन ठेवून दिला. त्यानेही मग फारसे लक्ष न देता कामाकडे मोर्चा वळवला.दुपारी त्याच्या ऑफिसमधली बाकीची मंडळी आपापले डबे घेऊन जेवायला जाताना दिसली.कधीकधी त्याला त्यांचा हेवा वाटत असे.त्याला ती एकत्र डबे खाण्यातली गंमत आठवली. :-) पण त्याच्या बॉस बरोबर जाताना डबा घेऊन जाणे त्याला आवडत नसे. त्या लोकांना मात्र या माणसाची फार कमाल वाटत असे. सुरुवातीला भारतीय असल्याने त्याच्याशी बोलण्याच्या, ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने तो अगदी धुडकावला होता. मग त्याचा नाद सोडून दिला त्यांनी.एक जण बोलत होता,"हा काय फार स्वतः:ला शहाणा समजतो काय रे? एकदा बघितला पाहिजे मीटिंगअध्ये त्याला." दुसरा, "हो ना,अमेरिकन कुठला!" तिसरा," ते जाऊ दे.अरे या शनिवारी डाऊनटाऊन मध्ये महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम आहे, जायचंय का बोला?" सगळे, " हो!!!" तर असं भारताबाहेरही त्याचं ते भारतीय मन आपलेपण शोधत होतं.'त्या'ला मात्र त्यांचं अव्यवस्थित राहणं अजिबात आवडायचं नाही. मोठ्याने बोलणे, हसणे, अकारण सलगी दाखवणे, त्यांचा बोलण्याचा हेल, सगळं कसं लाजिरवाणं वाटायचं. असो.
आजचा सगळा दिवसच कंटाळवाणा होता. त्याच-त्याच जुन्या आठवणी, नको असलेले विषय आणि वैताग आणणारे लोक, या सर्वांनी हैराण केलं होतं. त्यात अचानक एक मीटिंग बोलवली होती त्याच्या बॉसने, जॉनने. सगळी मंडळी एकत्र जमल्यावर कळले की प्रोजेक्ट संपत आल्याने बरेच लोक भारतात परत चालले आहेत. त्यांच्यासाठी एक पार्टी ठेवायचं बॉसच्या मनात आहे. आता हे काय? पार्टी कशासाठी? तिथं गेल्यावर या लोकांबरोवर बसायचं, बोलायचं, खोटं-खोटं हसायचं. :-(( त्याला नको होतं हे सर्व. त्याने टाळण्याचा प्रयत्न केला पण साहेबांची आज्ञा असल्याने गप्प बसावं लागलं. दोन दिवसांनी पार्टी होती एका अमेरिकन रेस्तराँमध्ये.

एक-एक करून सर्व लोक जमले. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर गप्पा सुरू झाल्या. प्रत्यकेजण घरी गेल्यावर काय करणार याबद्दल जॊन विचारत होता. कुणाला लग्न ठरवायचे होते, तर कुणाला घरी निवांतपणे पडून घरच्यांशी गप्पा मारायच्या होत्या. पण चांगली गोष्ट होती की दिवाळी तोंडावर आली असल्याने तेव्हा घरी राहायला मिळणार म्हणूनही आनंद होता.जॉनने मग दिवाळी काय असते ते विचारले. सर्वांनी उत्साहाने बोलायला सुरुबात केली. तो गप्पच बसला होता. कित्येक वर्षात त्याने दिवाळी साजरी केली नव्हती. जॉनने एकदम त्याला विचारले, "बाय द वे, व्हाय डोंच्यू सेलिब्रेट दिवाली?". त्याच्याकडे काही उत्तर नव्हते.तो कसंसं हसला.

जेवायला घेताना कळले की बर्याचसे पदार्थ मांसाहारी होते,त्यातही गायीचे/डुकराचे मांस जास्त.मग प्रत्येकाने आपापली ताटली स्यलडकडे वळवली.ते पाहून जॉन त्याच्याकडे पाहत म्हणाला, 'ओह, आय अम व्हेरी सॉरी. आय डिड नोट नो मच अबाउट धिस.आय आलवेज सॉ हिम ह्यविंग इट'.खरंतर त्याने कुणी काही बोलायला नकॊ म्हणून कधी सांगितलेच नव्हते.आता मात्र सर्वांसमोर त्याला चोरट्यासारखे वाटत होते. हीच नाही अशा अनेक गोष्टी त्याने स्वतः:मध्ये बदलल्या होत्या. तो कॊणती एक सांगणार होता?

घरी जाणाऱ्या पैकी जवळपास सगळेच साधारण एक-दोन वर्षे इथे राहत होते.त्यांना आता घरी जाण्याची ओढ जाणवत होती. जॉन त्यांना म्हणत होता,"I can understand your feelings. I cannot stay away from my home or my folks for long. I miss them." घरी जाण्याची ओढ असलेले,मनाने अजूनही भारतीय असलेले ते साधे-सरळ लोक आणि एकीकडे त्यांच्या भावना समजून घेणारा जॉन यांच्यामध्ये तो एकटाच पडला होता. परत ये म्हणून-म्हणून थकलेले आई-बाबा, पूर्वी यांच्यासारखाच असलेला तो, त्याचे मित्र-मैत्रिणी, ते जुने दिवस आठवत, समोर आलेल्या मांसाहारी सूपमधले 'पोर्कचे' तुकडे बाजूला काढून खात असलेल्या त्याचा आज त्रिशंकू झाला होता!!

-विद्या.