Friday, July 29, 2016

ओढणी !

       आज सकाळी एका ड्रेस ची घडी घालत होते. त्यात मग त्याची ओढणीही होती. ती ओढणी दिसली आणि मला फार भारी वाटलं. बांधणीची, शिफॉनची ओढणी. तिच्यासाठी म्हणून तो ड्रेस घेतला होता मी. :) म्हणजे नालासाठी घोडा घेण्यासारखं. प्रेमाने मग ती घडी घालून ठेवली. आजकाल एक तर ती शर्ट-जीन्स, फॉर्मल ड्रेस आणि फारतर कुर्ते घातले जातात त्यामुले पंजाबी ड्रेस घालायची वेळच येत नाही. 'आज -काल' किंवा ' एकेकाळी' ऐसे शब्द वापरले की खूप वे वाढल्याचं फिलिंग येतं.  पण खरच पूर्वीसारखे पंजाबी ड्रेस घालणे होत नाही. आणि त्यात ओढणी तर नाहीच. पण एकेकाळचं प्रेम ते असं अधून मधून वर येतं. असो.
       तर ओढणी, शाळेत पहिला पंजाबी ड्रेस घातला तो युनिफॉर्म म्हणून. लाईट ब्लू ड्रेसवर पांढरी ओढणी दोन्ही बाजूना पिन लावून घातलेली. गळ्यासमोर मधोमध 'V' चा आकार व्हायचा. अजूनही अशा कधी शाळेच्या मुली पहिल्या की मजा वाटते बघायला. अर्थात ही सुरुवात होती. असे अनेक प्रकार ती ओढणी ओढायचे. कधी पूर्ण गळ्याला चिकटून मागे लांब सोडलेली, कधी एका बाजूला एकदम कडक इस्त्री केलेली कॉटनची ओढणी. कधी फक्त कोपऱ्यापर्यंत येईल इतकीच पिन-अप केलेली, कधी पूर्ण हातभर. आम्ही शाळेत असताना कधी तरी ती झोळीसारखी घ्यायची स्टाईल सुद्धा केली होती. दोन टोकं गाठ मारून एका खांद्यावर टाकायची आणि दुसरी बाजू दुसऱ्या खांद्यावर. मग मध्ये झोळीसारखा आकार येतो. :) काहीही हां  ! :) 
          नुसते घालायचे प्रकार जाऊ दे, तिचे भावही वेगळे. कधी लेझीम खेळायला, कधी स्वयंपाक करताना एका बाजूला गाठ मारून एकदम तयारीत असलेल्या हावभावात. कधी पोटावरून बांधून घर साफ करायच्या तावात. कधी मुलाला गाडीवरून नेताना, आपलं काळीज पोटाला बांधून नेणारी ओढणी. कॉलेजमध्ये असताना कधी थंडीत चहा घ्यायला जाताना खांद्यावरून कव्हर करून घेतलेली, कधी पावसात डोक्यावरून ओढलेली. कधी आवरता ना येणारं रडू पोटात घेणारी. जुनी झाली तर मऊ केसाला बांधायला ठेवलेली तर आपल्याच पोरांच्या दुपट्याला भर म्हणून घातलेली. हे केवळ नमुनेच.  बाकींच्यांचे असतीलच.
        या ओढणीमुळे शॉपिंगला एक ग्लॅमर असतं. अनेकदा दुकानात गेल्यावर सर्वात पहिली एक ओढणी आवडते. मग त्याचा ड्रेस बघायला मागतो. पण तो काही पसंत पडत नाही. म्हणून तो सोडून देतो. बाकी अनेक ड्रेस पाहिले तरी काही मजा येत नाही. पुन्हा पुन्हा त्याच ओढणीकडे मन जातं. आणि शेवटी तो ड्रेस घेऊन आल्यावर एखादी मैत्रीण म्हणतेच,"ओढणी भारी आहे गं!". आपणही उत्साहाने बोलतो,"हो ना? मी पण त्यासाठीच ड्रेस घेतला." आणि खी-खी करून हसतोही. कधी एखादा ड्रेस आवडतो तर ओढणी आवडत नाही. मग वाटतं नुसता ड्रेस घ्यावा आणि ओढणीसाठी ते ड्रेस मटेरियल दुकान-दुकान फिरत राहावं, 'ओढणी देता का?' म्हणून. 
       मी सेकंड ईयरला असताना 'हं दिल दे चुके सनम आली होती. त्यात मग 'चाँद छुपा बादल में' हे गाणं पाहिलं आणि तारे असलेल्या ओढणीच्या प्रेमात पडले. दुकानात सेम तसाच लाईट ब्लू कलरचा ड्रेसही घेतला आणि जाळी असलेली ताऱ्यांची ओढणी. नीट पाहिले तर जाळीच्या कपड्यावर त्यात प्लॅस्टिकचे छोटे छोटे ठिपके होते. दोन धुण्यात खराब होऊन गेली. पण ते दोन वेळा घातल्याचं समाधान तर अजूनही लक्षात आहे. बांधणीच्या एकदम घट्ट गुंडाळून गाठ मारून ठेवलेल्या पुरचुंडी सारख्या ओढण्या. पहिल्या धुण्यात तिचा रंग जातोच आणि त्या वळ्याही. पण तरीही वेगवेगळे रंग आणि डिसाईन बघून अनेक बांधणीचे ड्रेस घेतले आहेत मी. एखादी शिफॉनची, सिल्कची, गोंड्यांची, एम्ब्रॉयडरी असलेली किंवा फक्त आवडत्या रंगामुळे, अशा अनेक कारणांमुळे अनेक ओढण्याच्या अनेक आठवणी आहेत आणि असतीलही. नाही का? असं होतं. कुठे विषय सुरु होतो आणि कुठे पोचतो. आता या ट्रिप मध्ये एखादी सुंदर ओढणी असलेला ड्रेस नक्कीच घेतला पाहिजे. :)
        
विद्या भुतकर.

Tuesday, July 26, 2016

एक रोजची सकाळ

         आजकाल सकाळी जाग येते ती खरं तर Jet lag मुळे. :) तिकडच्या-इथल्या दिवस-रात्रीच्या फरकाचा अमल हळूहळू उतरत आहे. पण सकाळी जाग यायला लागली आणि बोस्टनला जायच्या आधीचे दिवस लगेच डोक्यात आले. प्रत्येक देशाची, त्या त्या ऋतूची, प्रत्येक घराची एक सकाळ असते. ती त्या घरात राहूनच अनुभवता येते. कुणाला अशी सांगून समजावता येणार नाही. तरीही प्रयत्न करतेच. :) आज सकाळी जाग आली, चहा-पाणी झालं. त्यामुळे थोडा निवांत वेळ मिळाला, म्हटलं लिहीत बसावं जरा वेळ. :) मस्त वाटत आहे वातावरण. त्यात गेले दोन दिवस पाऊस नाहीये त्यामुळे थंड, कोरड्या वातावरणात अजून छान.
          बॉस्टनमध्ये रोज घराच्या स्वयंपाकघरातून सूर्य प्रकाश येतो. खिडकीचे पडदे उघडले की बाहेर काय चित्र असेल असे विचार मनात येत असतात. कारण काय तर, तिथे हवामान इतके बदलत असते कि थंडीत कधी ४-५ फुटाचा बर्फ बाहेर असू शकते. मग घरासमोर पांढरे शुभ्र रस्ते, घरांचे छत हे बघून छान वाटते. कधी पाऊस आहे असा अंदाज असूनही मस्त उबदार सकाळ असते. बाकी मुलांचे आवरणे, ट्रॅफिक, ट्रेन हे सर्व तर तिथल्या रोजच्या दिनचर्येचा भाग असतेच. तिथली सकाळ कितीही धावपळीची असली तरी ती धावपळ फक्त आमच्या चौघांची असते. आमचा आरडा ओरडा, मुलांची रडारड, काही सामान घरात राहिले तर परत कुलूप काढून जाताना होणारी चिडचिड हे सर्व फक्त आमचंच असतं. ऑफिसला पोचले की मागे कितीही रामायण झाले असले तरी लोक दिसल्यावर 'गुड मॉर्निग' म्हणावंच लागतं.
        गेल्या आठवड्याभरात मात्र आमच्या घरची इथली सकाळ अनुभवायला फारंच मस्त वाटत आहे. आमच्या बिल्डिंगलाही स्वतःची अशी एक सकाळ आहे. आणि इथे राहून खऱ्या अर्थाने दिवस उजाडणे काय असेल याचा अर्थ समजतो. रोज सकाळी येणारा पाखरांचा किलबिलाट( हो अजूनही येतो इथे तो. ), रिक्षा-गाड्यांचे हॉर्न, कधी लोकांच्या घरात लवकर वाजणाऱ्या कुकरच्या शिट्ट्या, दुधवाल्यानी वाजवलेली दारावरची बेल, शेजारच्या बिल्डिंगमध्ये असणाऱ्या मंदिरातली घंटा या सर्व आवाजात दिवस उजाडतो. 
        पडदे उघडले की कधी दूरवर दिसणारे ढग, पडणारा पाऊस, हिवाळ्यात थंड प्रसन्न वाटणारी तर उन्हाळ्यात एकदम गरम ऊन घेऊन बसणारी गच्ची. बाल्कनीचं दार उघडलं की सकाळ जणू घरात येते. दुधावरची साय काढणे, दूध उकळणे, चहा करणे यातही वेगळेपण असतं. तिकडे आमच्या दुधाला साय येत नाही. त्यामुळे कॅन मधून ओतून घ्यायचं, यात विरजण वगैरे बऱ्याच स्टेप वगळून जातात. कधी ऊन पडलंय म्हणून कपडे लवकर मशीनला लावून वाळत घालणे, कधी धूळ साफ करणे अशी छोटी मोठी कामं चालू असतात. आता ही तर तिकडेही करायला हवीत, पण तिथे सर्व कामं फक्त शनिवार-रविवार मध्ये होतात. त्यामुळे रोजच्या-रोज अशी ही काम करायची वेळ येत नाही.
       घरात लवकरच पोळ्या करायला येणाऱ्या, भांडी केर फरशी करायला येणाऱ्या मावशी यांची ये-जा चालू होते.  मुलांची शाळेची तयारी सुरु झाली की घर जागं होतं. घराप्रमाणेच, खालीही ही वर्दळ सुरु होते. खाली वेगवेगळ्या वेळेला येणाऱ्या अनेक शाळांच्या बस, सकाळी फिरायला-चालायला जाणारे लोक, दूध-ब्रेड, भाज्या घ्यायला डेअरीवर-दुकानात  जाणारे लोक, योगा क्लासवरून येणाऱ्या मैत्रिणी, गेटमधून ऑफिस साठी बाहेर पडणाऱ्या गाड्या अशा एक ना अनेक गोष्टी चालू असतात. मी इथे रनिंगला जायचे तेंव्हा हे सर्व ठरलेलं असायचं. कधी कधी मी पळत असताना सकाळ-सकाळी कुत्री भुंकत माझ्या मागे लागतील अशी भीतीही मला वाटलेली आहे. त्यामुळे कित्येकदा मी कुत्रे दिसले की चालत जायचे आणि थोडे पुढे गेले की परत पळणे सुरु. :) तर हे सर्व केवळ इथेच.
         सर्वात जास्त छान वाटतं ते  आमच्या रोजच्या धावपळीत बाकीच्यांचाही सहभाग असतो. रात्री झोपताना बाय केलं असलं तरी सकाळी ५ मिनिट का होईना शेजाऱ्यांशी गप्पा. कधी कधी तर काकूंनी सानुला उशीर होत असताना तिचे केसही बांधून दिले आहेत. किंवा आई-दादांचा(सासू-सासऱ्यांचा) हातभार, मग ते सानूला सोडायला जात असताना झोपलेल्या स्वनिककडे पाहणे असो किंवा एकीकडे डबा भारत असताना सानूच्या मागे 'दूध पी' म्हणून आईंनी हातात धरलेला कप असो, रोजच्या सकाळ मध्ये या सर्वांचा सहभाग असतो. आम्ही इथे असताना स्वनिक समोरच्या काकांकडे सकाळी चादर घेऊन जायचा आणि त्यांच्या सोफ्यावर पडून रहायचा. ते फक्त तो इथेच करू शकतो. मी ऑफिसला लवकर जायचे त्यामुळे सकाळी संदीपला अनेक मदतीचे हात असायचे. अगदी आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशीही त्यांच्या कामापलीकडे जाऊन मदत करायच्या. कधी कुणी स्कुलबसला थांबवून ठेवायचं.
       कितीतरी गोष्टी, किती लोक आणि किती ती गडबड. सध्या पुन्हा हे सर्व नव्याने अनुभवत आहे. तर या अशा अनेक गोष्टीमुळे आमची इथली सकाळ फक्त इथली म्हणून खास अशी राहते.  नाहीतर, सूर्य काय सगळीकडेच उगवतो. :)

विद्या भुतकर.

Monday, July 25, 2016

Change is constant

        मागच्या आठवड्यात भारतात पोचले. ४-५ दिवसांत बरीच सेट्ल झाले. मला तिकडून निघायला अजून एक आठवडा होता तेव्हा एका टीम-मेटने सोमवारी सकाळी एकदम आनंदाने विचारलं,"अरे तू आहेस होय अजून? मला वाटलं तू निघून गेलीस आणि मला बाय पण करता आलं नाही." तिच्या या वाक्याने मला थोडा का होईना आनंद झाला. आम्ही निघायच्या आधी अजून एक मैत्रिणी घरी येऊन गेली. मी हक्काने तिला नाश्ता करून आणायला सांगितलं आणि तिनेही मस्त उपमा, मेदू वडा बनवून आणले. निघायच्या दिवशी शेजारच्या काकूंनी आठवणीने विचारून डब्यात पराठे बांधून दिले. एक दोन मित्रांनी विचारलेही की एअरपोर्टला सोडायला येऊ का? एकाने सोडलेही.
           हे सर्व सांगायचं कारण म्हणजे, गेले वर्षभर एका नवीन जागी, नवीन घर, नवीन नोकरी, नवीन लोक या सर्वात मिसळून जाण्याचा हळू हळू प्रयत्न करतच होते. पण असं कुणी बोलल्यावर, केल्यावर वाटतं की खरंच आपण असल्याने किंवा नसल्याने कुणाला फरक पडतो हि कल्पना किती आनंददायक आहे. इथे पुण्यात आल्यावरही शेजाऱ्यांना, घरच्यांना आणि भेटायला आलेल्या मित्र मैत्रिणींना पाहून हा आनंद द्विगुणित झाला. 'काय गं, कधी आलीस?' असं केवळ विचारल्याने किती फरक पडतो नाही? गेले वर्षभर आपण नव्हतो यानेही कुणाला फरक पडला हे पाहून छान वाटले.
          आजपर्यंत आम्ही इतक्या जागी फिरलोय आणि राहिलोय, प्रत्येकवेळी नवीन जागी गेल्यावर मागे राहिलेल्या लोकांची आठवण, वाटणारा एकटेपणा या सर्वांमुळे आपण घेतलेला निर्णय योग्य होता का असे वाटत राह्यचे. त्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे एखादी छान भाजी केली की शेजारी देऊन येण्याची इच्छा होणे आणि ती त्यांनी आवडीने खाणे यातही एक प्रकारचा आनंद असतो. किंवा आपल्या घरी एखादी नवीन वस्तू आणली, मग ती कितीही छोटी असू दे, ती शेजाऱ्यांना दाखवणे आणि त्यांनीही 'पार्टी कधी?' असं म्हणणे हाही एक अनुभव असतो.  
         ऑफिसला गेल्यावर, एखादा नवीन ड्रेस घातला असेल तर "अरे वा !" असं म्हणणारी एखादी मैत्रिणी. कधी मूड नसेल तर,'काय झालं? ठीक आहेस ना?' असं म्हणणारं कुणीतरी तिथे असणं. आपण ना सांगता सुट्टी टाकली तर,"बरं नाहीये का? ' असं विचारणारं कुणीतरी असणं. आपल्या रोजच्या आयुष्यात या किती छोट्या असणाऱ्या पण तरीही नवीन जागी गेल्यावर त्यांची आठवण होणाऱ्या गोष्टी असतात. एखाद्या ठिकाणी त्या मिळाल्या की मग ते कुठेही असो, मन रमून जातंच. आणि त्या नसतील तर, तो आपला देश असला तरी तिथे करमत नाही.
          अनेक जण नोकरी, घर किंवा देश बदलायला तयार होत नाहीत. बरेचदा त्रास होत असूनही त्याच ठिकाणी राहतात.  'बाकी सर्व ठीक आहे ना? मग नको बदलायला' असा विचार करतात. त्यामुळे अशा अडकलेल्या लोकांना पाहून त्यांना माझे अनुभव सांगायची इच्छा झाली. आमच्या अनेक अनुभवांवरून मी आता हे नक्की सांगू शकते की, माणूस म्हणून जुळवून घेण्याची आपली नैसर्गिक प्रवृत्ती असते. त्यानुसार मग आपण त्या त्या ठिकाणी सामावून जातोच. त्यामुळे कुठलाही बदल कितीही अवघड वाटला तरी हळूहळू सोपा होऊन जातो. आणि त्यातून जुने आणि नवीन मित्र जोडले जातात हे वेगळेच. असो. सध्यातरी मी थोडे दिवस पावसाळ्याचा आणि इथे राहण्याचा पूर्ण आनंद घेत आहेच. :) शक्यतो लिहिण्याच्या रुटीन मध्ये फरक पडणार नाही, असा विचार आहे. बघू कसे होते. :)

विद्या भुतकर.

Sunday, July 24, 2016

स्वप्ना आणि सत्या- भाग ३

अलार्म वाजला आणि ती धडपडत उठली. आज ओळीने चौथा दिवस तिने केलेला निश्चय पाळायचा.
तो: उठलीस?
ती: हं . (अजून झोपतच)
तो: कशाला नसते उद्योग लागतात तुला काय माहीत.
ती: हं . (अजून झोपतच)
तो: जा बरं झोप जा जरा वेळ.
ती: अं हं .
बंद डोळयांनीच तिने फ्रिजमधली भाजी काढली. एका भांड्यात पीठ घेऊन कणिक मळून घेतली.
तो: अगं काय हे? किती वेळा सांगितलंय मला रोज डबा नसला  तरी चालतो.
ती: हो पण मला चालत नाही ना. (आता ती जरा जागी झाली होती. )
तो: नुसती फिल्मी आहेस बघ.
ती: असू दे. जशी आहे ती अशीच आहे. (ती भाजी चिरत राहिली. )
तो: पण मला सांग तरी हा हट्ट कशाला?
ती: मला तुझ्यासाठी रोज डबा करायचाय.
तो: बरं, डबाच ना? मग मी कालची भाजी पोळी घेऊन जातो ना?
ती: नाही मला ताजा करायचाय.
तो: मग ते शिळं कोण खाणार?
ती: कोण म्हणजे? डोन्ट वरी, टाकून नाही देणार.
तो: म्हणजे तूच खाणार. मग मी खाल्लं तर काय होतंय?
ती: नको उगाच. लोक म्हणतील शिळं देते नवऱ्याला आणि स्वतः ताजं खाते.
तो: म्हणू देत. मग त्यांनाच ताजं करून आणायला सांगतो माझ्यासाठी.
ती: तू पण ना.
तो: हे बघ ते सिरीयल मध्ये बायका देत असतील आपल्या नवऱ्यांना रोज डबे. तू उगाच त्रास करून घेऊ नकोस.
ती: अगदी तसंच नाही, पण चांगलं वाटतं रे नवऱ्याला असं रोज गरम गरम डबा करून द्यायला.
तो: किती स्वप्नाळू  आहेस गं. जा झोप आणि स्वप्नं  बघ. मी आहे तेच घेऊन जातोय.
तिला जबरदस्ती झोपायला लावून तो कालचीच भाजी पोळी घेऊन गेला.
ती: (मनातल्या मनात) वेडाच आहे. चांगले बायको करून देतेय तर नाही म्हणतोय. काय होतंय थोडे कष्ट पडले तर?
तो: (मनातल्या मनात) वेडीच आहे. नाईट शिफ्ट करून पहाटे येते आणि म्हणे ताजा डबा करून द्यायचाय. काही होत नाही शिळं खाल्लं तर.

आज पहिल्यांदाच स्वप्नापेक्षा सत्य जास्त छान वाटत होतं. दोघांचं मन अजूनही मागेच रेंगाळत होतं.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Friday, July 22, 2016

निःशब्द

         जुन्या डायरीतले संदर्भ आठवले नाहीत की त्रास होतो, अनेक गोष्टींचा. तेंव्हाच सर्व मनमोकळ, सविस्तर लिहायची का गरज वाटली नाही? कोड्यांसारखे लिहिलेले समजून घेण्यासाठी मग लिहिलेल्या अक्षरांपेक्षा खोडलेल्या शब्दांकडे जास्त लक्ष जात राहतं.
         लिहिण्याइतपत महत्वाचे असलेले बरेच काही इतक्या सहज विसरले जाते? मग आयुष्यात काहीच महत्वाचं नाही? त्या त्या वेळेला महत्वाचं वाटणारं नंतर विसरण्याइतकं क्षुद्र होऊन जातं?
        दुसरं म्हणजे, कधीतरी इतके जवळ वाटणारे लोक इतके दूर गेले याचा खूप त्रास होतो. आणि ते इतके दूर जातील असं स्वप्नातही वाटलं नसल्याने, तेव्हा त्यांचे नंबरही लिहून न घेतल्याचा. नाही का? अशाच अनेक दूर गेलेल्या आपल्या लोकांसाठी कधी तरी तेंव्हाच लिहिलेलं.


विद्या भुतकर.

Thursday, July 21, 2016

खूप दिवसांनी

जुन्या डायऱ्या उघडल्या की काय सापडेल नेम नाही. त्यातलीच ही एक. कधी कधी वाटतं त्यावेळची मी आणि आताची मी यात किती अंतर आहे. ती खूप हळवी होती. आता मनाला तितक्या गोष्टी जाणवू देते की नाही माहीत नाही. असो पण कविता मला आवडतेच त्यामुळे.. इथे देत आहे.


विद्या भुतकर. 

Wednesday, July 20, 2016

Sunday, July 17, 2016

Friday, July 15, 2016

पाकिस्तान, फवाद खान आणि मी.

        गेल्या वर्षी नोकरी शोधत असताना एक वेगळाच अनुभव आला. इंटरव्ह्यूला गेले तर तिथे ज्यांनी इंटरव्ह्यू घेतला ते मॅनेजर पाकिस्तानी होते. इंटरव्ह्यू छान झाला. अर्थात सर्व बोलणं इंग्लिश मधेच होत होतं आणि तेही अमेरिकेत त्यामुळे तसा विचार करायचं काही कारण नव्हतंच. सर्व बोलणी झाल्यावर मला त्यांनी एक प्रश्न विचारला,"तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना की आमचं ऑफशोअर चं ऑफिस पाकिस्तान मध्ये आहे?" खरंतर भारतीयांनी जगात आय टी मध्ये इतकं नाव मिळवलं आहे (चांगलं आणि वाईट दोन्हीही) की पाकिस्तान वगैरे मध्ये ऑफशोअर म्हणल्यावर मला जरा हसूच आलं. कधी असा विचारच केला नव्हता. अर्थात मला काय इथे बसूनच काम करायचं होतं. आणि याआधीही मी २-३ पाकिस्तानी लोकांसोबत काम केलं आहे. त्यामुळे मला असा काही प्रॉब्लेम नव्हता. आणि मी तसं सांगितलंही.
        पुढे होऊन त्यांनीच सांगितलं मग,"मी इथेच राहिलोय, वाढलोय आणि बरेच वर्षे काढलीत त्यामुळे माझे विचार जास्त विस्तारित आहेत. तिथे राहणाऱ्या लोकांची मनोवृत्ती थोडी संकुचित आहे. मी तर तिकडे टीममध्ये ३-४ हिंदू लोकांनाही घेतलं आहे. आणि त्यासाठी भांडलोही आहे. " आता हे ऐकून मात्र मला जरा भीतीशी वाटली. माझ्या आजवरच्या आयुष्यात कधीही अशी वेळ आली नव्हती जिथे कुणी केवळ हिंदू आहे म्हणून त्यांना ऑफिसमध्ये प्रॉब्लेम आला आहे. आणि त्यांचे बोलणे ऐकून लोकांना तिथे काय त्रास होत असेल असा विचार करून थोडी भीतीही वाटली. पण खरं सांगायचं तर जे माझ्याशी बोलत होते ते मात्र एकदम छान, सुसंकृत होते आणि खूपच छान बोलले होते. पुढे जाऊन तिथे मला त्यांचा दुसरा कॉलही आला. पण तोवर दुसरीकडे नोकरी पक्की झाली होती त्यामुळे तिथे काम करण्याचा प्रश्न आला नाही. पण आजही त्या अनुभवाबद्दल विचार करते. खरंच एक स्त्री म्हणून आणि तीही भारतीय, मला तिथे कसे अनुभव आले असते? कदाचित एक वेगळे जग अनुभवायचा माझा चान्स हुकला. असो.
       आज त्याबद्दल बोलायचं कारण म्हणजे गेल्या १०-१५ दिवसांत एक पाकिस्तानी सिरीयल पाहिली. बऱ्याच लोकांनी बऱ्याच दिवसांपासून सांगितली होती, शेवटी पाहिलीच. नाव आहे 'जिंदगी गुलजार है." आता ती कशी वाटली हे सांगायला नकोच. फवाद खान असलेली सिरीयल काय डॉक्युमेंटरी बघायलाही मी तयार आहे. सॉलिड फॅन झाले मी त्याची. फवाद खानचे दोन्ही चित्रपट मी पाहिले आहेत. त्यामुळे ती सिरीयल एका पाठोपाठ एक करत पटापट सर्व एपिसोड्स संपवले आणि एकदम महाभारत, रामायण, DDLJ, हम दिल दे चुके सनम वगैरे संपल्यावर वाटलं तसं वाटलं. असो त्याबद्दल तर काही करू शकत नाही. पण ती सिरीयल बघून वाटलं की पाकिस्तान मध्ये कितीतरी वेगळं वातावरण आहे. अगदी मॉडर्न म्हणून असलेल्या स्त्रियांचे कपडे पण पूर्ण अंगभर होते. तेच आपल्या सिरीयल मध्ये गुढघ्याच्यावर तरी असतेच किंवा ब्लाउज तरी बिनबाह्यांचे. अर्थात सिरीयल बघून देशाचा अनुमान काढता येत नाही. तरीही फरक जाणवलाच.
            दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे आजपर्यंत मला तामिळ, तेलुगू आणि मल्याळम मुव्ही बघायलाही सबटायटल्स ची गरज पडली होती. पण ती सिरीयल पाहताना मला थोडेफार शब्द समजले नसतील पण बाकी पूर्ण समजत होते. आपण बोलतो ती भाषा इतकी सारखी असू शकते? बरेच बोलण्याचे संदर्भ, भाषा, कधी विचारच केला नव्हता की खरंच इतके साधर्म्य असेल. त्यांचे ते उच्चार ऐकून मला माझं बोलणं किती गावठी वाटत आहे असं वाटत होतं. किती सुंदर उच्चार, भाषा. गझल मला त्यामुळेच आवडत असतील. मनाला लागतात एकदम, कुठे तरी खूप आत. पुढे माझ्या लक्षात आले की त्या सिरीयल मध्ये इस्लामाबाद, लाहोर, कराची वगैरे जे नावं घेत होते ती सर्व मला ऐकून माहीत आहेत. पण कुठल्याही नकाशात मी कधी नीट लक्ष देऊन पाहिले नाहीये की खरंच किती अंतरावर आहेत ती शहरं, किंवा त्यांच्यात विशेष असं काय आहे. यातलं मला काहीच माहीत नाहीये. बरेच ठिकाणी भाज्या करण्याचे किंवा मटण किंवा बिर्याणीचे संदर्भ होते. मग माझ्या मनात विचार आला की तिथे लोक काय खात असतील नाश्त्याला रोज? तिथेही कुणी डोसा, इडली, पोहे उपीट खात असेल का? एखाद्या शेट्टीचे तिथेही हॉटेल असेल का? की फक्त पाकिस्तानीचं जेवण खात असतील? आणि असेल तरी काय असते ते? काहीच माहीत नाही मला. 
          गेल्या काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता साहिर लुधियानवी यांच्यावर. गुलजार, साहिर यांच्याकडून कितीतरी गाण्यांचा, शब्दांचा, भावनांचा खजिना आपल्याला तिकडून आणून दिला. इतक्या गझल ऐकायला मिळाल्या. आजही राहत फतेह अली खानच्या आवाज ऐकला की ऐकत बसावसं वाटतं. पहिली सिरीयल संपल्यावर अजून एक पाहिली, 'हमसफर' आणि त्यात एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे त्याचं टायटल सॉंग. काय आवाज आहे. संदीप म्हणालाही, "घंटा एक शब्द कळत नाहीये." खरंच बरेचसे उर्दू शब्द होते. पण त्या गाण्यात जे दु:खं, प्रेम ऐकलं ते केवळ शब्दांत सांगता येणार नाही. आता त्या गझल बद्दल आणि त्या गायिकेबद्दल माहिती काढायची आहे. एक ध्यासच लागलाय म्हणा ना?
            आपल्या देशाला, मला माहीत नसलेल्या अशा अनेक गोष्टी आपल्याला तिकडून मिळाल्या असतील. किंवा अनेक गोष्टी आहेत ज्या अजिबात माहीत नाहीयेत. अक्खा देश भारत-पाकिस्तान मॅच बघतो, आपण हरलो की रडतो, चिडतो. ते हरले की फटाके वाजवतो. त्यातला प्रत्येक खेळाडू आपल्याला तोंडपाठ असतो. कुठल्या मॅच मध्ये किती धावांनी आपण जिंकलो यावर तासन तास गप्पा होऊ शकतात. काश्मीरमध्ये चाललेला दहशतवाद, नेहमीची भांडणं, कधीही येऊ शकतं असं युध्दाचं  सावट हे सर्व बघून खूप त्रास होतो. आपल्या एका सुंदर राज्याला इतके वर्षे इतका त्रास सहन करावा लागत आहे. तिथलं वातावरण बघून लोक कसे जगत असतील असा विचार नेहमी येत राहतो. भांडण, युद्ध, मॅचनंतर चे फटाके सर्व तर करूच पण निदान ते सर्व करताना त्या देशात अजून काय काय आहे हेही बघायला पाहिजे एकदा असं आज पहिल्यांदा वाटायला लागलं आहे. आणि शिवाय मुव्ही बघायला 'फवाद खान' ची भर झालीच आहे. ;)

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

माझं चुकलं !





Tuesday, July 12, 2016

स्वप्ना आणि सत्या भाग २

दोघेही हॉटेलमध्ये चाट खात बसलेले. तिचे डोळे अजूनही स्वप्नाळूच.
ती: कसला भारी पिक्चर होता ना?
तो: ठीक होता. नेहमीसारखाच होता तसा.
ती: (हिरमुसून) तुझं आपलं नेहमीचंच. किती रोमँटिक होता. मला तर जाम आवडला. परत जायचं का?
तो: खुळी आहेस का काय? आजच पाचशे रुपये घालवलेत. आणि पुन्हा जायचं?
ती: किती पैसे पैसे करतोस रे?
तो: मग? नको करू?
बोलत बोलत त्याने त्यांच्या प्लेटमधली शेवटची दही पुरी खाऊन टाकली. तिने रागानं त्याच्याकडे पाहिलं.
तो: अरे? आता काय झालं?
ती: काय म्हणजे? खायच्या आधी विचारायचंस तरी ना?
तो: हे बघ असं असतं. म्हणून मी तुझ्यासोबत एक प्लेटमध्ये खात नाही. आणि म्हणे रोमँटिक वाटतं.
त्याने चिडवलं.तिने हसून जीभ चावली. बिल भरून दोघेही गाडीवर बसले. रस्त्यात तिला सुंदर लाल गुलाबाची फुलं दिसली विकायला ठेवलेली.
ती: तू का नाही देत रे मला अशी गुलाबाची फुलं गिफ्ट?
तो: परत काय आता?
ती: तो हिरो बघ किती रोमँटिक होता.
तो: हे बघ ते उगाच फुलांवर पैसे घालवायला मला नाही आवडत.
ती: मी काय रोज म्हणत नाही त्याच्यासारखे पण वर्षातून एक द्यायला काय जातंय?
तो: पण ते घेऊन तू काय करणार आहेस? दिवसभर त्याच्याकडे बघून पोट भरणार आहे का? की वेणीत घालणार आहेस?
ती: ईईई, वेणीबिणी काय? पण छान वाटतं ना असं फूल दिलेलं?
तो: उलट मी तर म्हणतो हे असं फुलात पैसे घालण्यापेक्षा तुझी एक पाणीपुरीची एक प्लेट येईल.
ती: शी ! किती बोअरिंग आहेस रे?
ती गप्पच बसली तिच्या पिक्चरमधल्या हिरोला आठवत. तरीही तिला राहवेना.
पुढे बोललीच ती: पण मी काय म्हणते तुला काय फरक पडणार आहे १० रुपयाने?
तो: (वैतागून) पण तुला काय फरक पडणारे मी ते न दिल्याने?
ती: (मनातल्या मनात) बाकी इतकं सर्व करतो, तर मग माझ्यासाठी म्हणून इतकं करायला काय होतंय त्याला?
तो: (मनातल्या मनात) आजच इतका खर्च करून आलो. तरीही शेवटी फूलच महत्वाचं?

आज पुन्हा एकदा स्वप्न आणि सत्याचं भांडण झालं होतं. आज पुन्हा एकदा ते दोघे तोंड फिरवून बसले होते.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, July 10, 2016

संभ्याची सह्याद्रीचे शिलेदार- १० किमीची शर्यत

"       संभ्या आज पहाटेलाच एफ सी रोडला येऊन बसला होता. कारणच तसं होतं. कालच रात्री त्याला त्याच्या दोस्तानं मस्त 'आयड्या' दिली होती. थोड्याच वेळाच्या कामांने त्याचे पुढच्या ८-१० दिवसांच्या इतके पैसे जमणार होते. आज पुण्यात 'सह्याद्रीचे शिलेदार - १० किमी' ची रेस होती. सकाळी रेस सुरू झाल्यावर साधारण अर्ध्या तासात काम सुरू करायचं ते पुढच्या ४ तासात संपून जाणार होतं. त्याला शिर्क्यानं सांगून ठेवलं होतं, उगाच आळस करू नकोस. चांगल्या १५-२० गोण्या तरी घेऊन ये. त्यानं बजावून सांगितल्यामुळे रात्रीत मागून जमतील तितक्या सर्व गोण्या घेऊन तो बरोबर ७ वाजता जागेवर हजर झाला होता.
        रेस सातला सुरू झाली आणि सगळे लोक जोरात पळू लागले. संभ्याची ही पहिलीच वेळ होती त्यामुळे तो नुसता बघतच होता. शिर्क्याने त्याला पळायला सांगितले. म्हणाला,"चल पटापट पाय उचल. दोनच्या बोर्डाला पाण्याचा सटॉप हाय." दोघेही धावत २ किमी च्या बोर्डपर्यंत पोचले. एकतर इतक्या गोण्या घेऊन फिरायचं. आणि तेही इतकं धावत. दोन किमी च्या बोर्डाजवळ पाण्याचा स्टोप होता. बराच वेळ होऊन गेल्याने बरीच लोकं तिथून पुढे निघून गेली होती. आजूबाजूला छोट्या छोट्या पाण्याच्या बाटल्या, पाण्याचे प्लास्टिकचे ग्लास पडले होते. बरेचसे तिथे ठेवलेल्या कचऱ्याच्या पेट्यांमध्येही होतेच. रस्त्यावर पाणी सांडून ओला झाला होता. संभ्या वाकून पडलेल्या बाटल्या, कप एकेक करत गोणीत भरायला लागला. शिर्क्या पण होताच सोबत.
          मधेच फटकन एक पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडावर आला. घाबरून त्यानं वर बघितलं. एक जाडजूड पंचविशीतला पोरगा कसाबसा जोर लावून पळत होता. पाणी पिऊन त्याने ग्लास फेकला तो संभ्याच्या तोंडावर बसला. तोंडातून एक  शिवी पडेपर्यंत तो पोरगा पुढं निघून गेला होता. शिर्क्याने त्याला समजावलं. "असू दे रं. ही असली जाडी माणसं पळून बारीक व्हय साठी तर अशा स्पर्धेत जात्यात. तू आपलं काम कर. "
पण संभ्याला प्रश्न होताच,"ही रेस म्हंजी तर काय रं. पळून झाल्यावर काय नंबर येतोय का? "
शिर्क्या," हा असतोय की नंबर. आणि बाकी लोकाला मेडल पण मिळतं. त्यांना मधीच थान लागली तर म्हून पानी देत्यात. म्हून तर इतक्या जोरात पळत्यात. आन पानी पिऊन ग्लास तसाच टाकून जात्यात. आपल्याला काय? आपलं धा दिवसाचं प्लास्टिक मिळतं आपल्याला. " 
संभ्या जमेल तितक्या गोण्या भरून एका बाजूला ठेवत होता. 
शिर्क्याने त्याला सांगितलं,'ह्ये बघ. त्या अर्ध्या पाण्याच्या बाटल्या आहेत ना, त्या येगळ्या ठेव. घरी जाऊन त्यातलं पानी गोळा करून प्यायला घेता येतं. "
संभ्याने मग त्या थोडं थोडं पाणी असलेल्या बाटल्या वेगळ्या ठेवल्या. हळू हळू करत ते चार किलोमीटरच्या टप्प्याला आले होते. त्याने पुन्हा विचारलं शिर्क्याला,"पन हे सह्याद्रीचे शिलेदार काय म्हनं?"
 "आरं आता आपण हिथं राहतोय. आपल्या हिथं किती डोंगर आहेत आजूबाजूला. आपल्या देशाची शान आहयेत ना त्ये. डोंगरावर लोकं जाऊन घान करत्यात. कधी झाडं तोडून नासधूस करत्यात. आनी आता या दुष्काळानं पाऊस बी नाय डोंगर वाचवायला. आपला सह्याद्री आपली शान हाय. त्याला जपायला लोकास्नी सांगायला ही रेस हाय.", 

          शिर्क्या मोठ्या माणसासारखं समजावून सांगत होता.संभ्याला काय कळत नव्हतं. आपण हिथं बसून डोंगराचं रक्षण कसं करणार आणि त्याचा पळण्याशी काय संबंध? आणि असेही तो कधी डोंगरावर गेलाच दोस्तांसोबत तर आपला डबा घेऊन जायचा आणि पाण्याची बाटली. परत येताना परत. पाण्यासाठी अशा बाटल्या विकत घ्यायच्या का आणि टाकायच्या का? हे त्याला काही कळत नव्हतं. जाऊ दे म्हणून त्याने ते सोडून दिलं आणि कामाला लागला. पुढे सहा किलोमीटरच्या टप्प्यावर कसल्या रंगीत बाटल्याही होत्या. शिर्क्याने त्याला समजावले की या 'शक्तिदायक पाण्याच्या' बाटल्या आहेत. इतके पळून लोकांना दम लागतो म्हणून प्यायला ते पाणी ठेवलेलं होतं. संभ्यानं जरा चव घेतली एक बाटलीची. त्याला काय त्याची चव आवडली नाही. 
त्याने परत शिर्क्याला विचारलं,"मी काय म्हंतो या बाटल्या, गिलास कोन आनतो? आन असंच फुकट देत्यात पानी? ".
शिर्क्या म्हणाला,"आरं त्या पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्या कंपन्या असतात. त्या देतात लोकांना पानी इथं. त्यांची जाहिरात होते ना फुकट."
संभ्याला वाईट याचं वाटत होतं की लोकांना इथे प्यायला पाणी आणायला २-४ किलोमीटर जायला लागतंय आणि इथे फुकट वाटलेलं पाणी असं फेकून हे लोक पळत आहेत.
त्याने पुढे विचारलं,"पन काय रे, हे डोंगर साफ ठेवायचं म्हंजी लोकांनी काय करायचं? आन त्यासाठी पळून काय हुनार हाय?". त्याला काहीच मेळ जुळत नव्हता.
शिर्क्याला तरी काय माहीत? तो स्वतः इथे बसून प्लास्टिक गोळा करत होता. त्याच्या समोर लोकं धडाधड बाटल्या, ग्लास टाकून पळत होते. आता या लोकांना हे माहीत असतं तर ते स्वतःच साफ करत असते ना? पळत जाताना उलट अजून कचरा कशाला करत बसले असते? त्याला याचाही आंनद होता की या साफसफाईने करण्याचे त्याला पैसे पण मिळणार होते आणि कचरा विकून अजून पैसे. आठ किलोमीटरला मात्र संभ्याला राहवेना. सकाळी नुसता चहा घेऊन निघालेला तो. शिर्क्याने त्याला समजावलं,"जरा कळ काढ. आता शेवटच आलाय बघ. रेस संपली की तिकडं काहीतरी छोटं मोठ खायला मिळल. "
संभ्याला भारी वाटलं. काहीतरी खायला मिळेल ऐकून. "काय असल रे? आन हे असं फुकट वाट्ट्यात लोकांना खायला?" त्याच्या मनात आता येत होतं आपण पुढच्या शर्यतीत नक्की जायचं. एकतर असेही ८ किलोमीटर तो पोचलाच होता. अजून दोन करून त्याला प्यायला पाणी, नास्ता मेडल सर्व मिळणार होतं. मग काय?
"आरं येड्या, केळ-बीळ मिळल. अजून पाव-बिव पन असल. आन हे काय फुकट देत नायीत. त्ये लोक पैसे देऊन पळत हायत. शर्यतीत भाग घ्यायचा म्हंजी खायचं काम नाय नुसतं. ५००-५०० रुपय भरतात लोकं यासाठी. "
"घ्या म्हंजी आपणच पैसं द्यायचं, आपणच पळायचं? त्यापेक्षा मग हे कचरा गोळा करायचं काम बरं हाय की. ", त्याने स्वतः पळायचा विचार मनातून काढून टाकला. 
            त्याने अजून ४-५ गोण्या भरून ठेवल्या. ते दोघे रेस संपते तिथे पोचले. एकदम उत्साहाचं वातावरण होतं. ढोल ताशे वाजत होते. शर्यत पूर्ण केलेले लोक फोटो काढत होते. अनेकांच्या गळ्यात मेडल्स दिसत होते. 
त्याने विचारलं शिर्क्याला, "हे फोटो कशाला काढताय रं सगळे?". 
शिर्क्याने कपाळावर हात मारला. म्हणाला, "आरं आता इतकं पळून मेडल मिळालं तर लोक सर्व्यांना दाखवायला फोटो काढत्यात. ते फोनमधी असतं कायतरी त्याच्यावर समदी बघत्यात मग. "
       संभ्याला जरा वाईट वाटलं, आपणही रोज इतकं चालून कचरा गोळा करतो. आज चाललो तितकं जर जवळ जवळ रोजच चालतो. आपला फोटो कधी नाही काढला कुणी? उलट काढला असता फोटो तरी त्याला लाजच वाटली असती, असा कचरावाल्याचा फोटो काढत आहेत म्हणून.  त्याला भूकही लागली होती, त्यामुळे त्याने विचार सोडून दिला. त्याला त्याचं काम पूर्ण करून काहीतरी खायचं होतं. शर्यत संपते तिथे तर अजूनच कचरा होता. पाव खाल्लेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, पेपरचे तुकडे, पाण्याच्या बाटल्या, कागदाचे ग्लास, केळाची सालं. अनेक ठिकाणी कचरापेट्या असूनही हे सगळं खाली का पडलंय हे त्याला कळत नव्हतं. त्याने भराभर जमेल तेव्हढ सामान भरलं.  त्याच्या गोण्या आता संपल्या होत्या. त्याला मागे जाऊन पुन्हा सगळ्या गोण्या गाडीत टाकून न्यायला लागणार होत्या.
         मधेच शिर्क्या कुठेतरी जाऊन माघारी आला होता. त्याच्या हातात दोन पिशव्या होत्या. त्याने एक पिशवी संभ्याला दिली. त्यात खायला होतं. शिर्क्याने ओळखीच्या सायबांना विचारून ते मागून आणलं होतं. संभ्याने एक केळ गपागप खाल्लं. पावाचे तुकडेही मोडले. जमा झालेला कचरा आपल्याच जवळच्या पिशवीत टाकला. पिशवीतील बाटलीतून पाणी पिलं. आणि रिकामी बाटली आपल्या गोणीत टाकली. खाल्ल्यावर त्याला जरा बरं वाटलं. रेस सुरू झाले तिथेपर्यंतच्या गोण्याचा हिशोब त्याने लावला आणि खुश झाला. इतका वेळ चालल्याचं चीज झालं. 
         सगळं आवरून निघायचं असा विचार करत होताच तेव्हढ्यात कुणी साहेब तिथे आले. बाकी सर्व लोकांनी गर्दी केली. त्यांनी संभ्याच्या हातातून पिशवी घेतली. एक खाली पडलेली बाटली त्यात टाकण्याचा आव आणला. एका माणसाने त्यांचा छान फोटो काढला. अजून दोन चार फोटो काढून साहेब निघूनही गेले. संभ्याने गाडीवाल्याला तिकडे यायला सांगितलं होतंच. त्याने एकेक करत गोण्या गाडीत टाकायला सुरुवात केली. लवकरच आपलं काम संपवून तो घरी निघून गेला. दिवसभर त्याला शर्यतीत घडलेल्या नवीन नवीन गोष्टी आठवत राहिल्या. दुसऱ्या दिवशी शिर्क्याने त्याला पेपर दाखवला. त्या साहेबांच्या मागे हे दोघे उभे असल्याचा फोटो आला होता, 'स्वच्छता अभियानाचा'. पुढच्या सर्व शर्यतीला जायचा पक्का निर्णय संभ्याने केला होता."
        
गोष्ट लिहून संपली. सगळीकडे पोस्ट केली. रेसचे मेडलचे फोटोही टाकले होतेच. लोकांचे मेसेज बघून खूष झाले. जरा आराम करावा म्हणून मी लॅपटॉप बंद केला. आज सकाळीच रेस संपल्याने पाय दुखत होतेच. खाऊन झालं होतं. पाय पाण्यात ठेवून, टीव्ही लावून मी सोफयावर बसून राहिले. आता पुढच्या रेसचं प्लॅनिंग करायचं होतंच. 
 
विद्या भुतकर.

Wednesday, July 06, 2016

जावे त्याच्या वंशा

        आयुष्यात काही काही गोष्टी बोटावर मोजता  इतक्याच वेळा होतात, निदान आपल्याकडे तरी. त्यातली एक म्हणजे घराला रंग लावणे. काय तो पसारा. सर्व वस्तूंवर उडालेली धूळ, सामान जागेवरून हलवलेलं, पायांनी पांढऱ्या भुकटीने माखलेली फरशी. आणि त्यात जर स्वयंपाकघर रंगवायचे म्हणाल तर बोलायलाच नको. डबे झाकायचे तरी किती? जेवण कुठे करायचं? आपण मग हलवलेल्या सामानातून मार्ग काढत दिवस काढायचे. भांडी कुठे धुवायची सगळाच गोंधळ. तर माझी पहिली आठवण म्हणजे २० वर्षांपूर्वी आईकडे घराला रंग लावला होता ती. त्यात फक्त घरात झालेला कचरा, किचन बाहेर मांडलेलं, तो पेन्टचा वास आणि भिंतींचा लॅव्हेंडर रंग हेच जास्त आठवते. शिवाय हे पेटर लोक एखादी खोली बाकी राहिलेली असताना, पैसे घेऊन, सुट्टी टाकून निघून जातात याचा आमच्यापुरता तरी अनुभव आला होता.
          याच्या पुढचा अनुभव मात्र अविस्मरणीय आहे. दोनेक वर्षापूर्वी पुण्यातल्या घरी दोन खोल्यांचे रंग लावायचे काम काढले होते. मग रंग लावायच्या आधी वायरिंगचे काम करून घ्यायचे म्हणून भिंती थोड्या फोडल्या. बाप रे ! काय ती धूळ, कचरा, भिंतीची पडलेली पोतीभरून माती काढली मी. त्यानंतर रंग द्यायचे काम म्हणजे त्यामानाने सोपेच म्हणावे लागेल. एका बेडला स्प्रे-पेन्ट पण करायचा होता. तर त्या स्प्रे पेन्टने आक्खे घर स्प्रे झाले होते.  हो दार बंद करून पेन्ट केले होते तरी. घर ठिकाणावर यायला खूप वेळ गेला. त्यावेळी पेन्ट करायला आलेल्या लोकांना वारंवार सांगत असायचे,"प्लिज सुट्टी घेऊ नका. काय ते काम पूर्ण करूनच टाका लवकरात लवकर."
           हे सगळं आठवायचं कारण म्हणजे गेल्या दोनेक आठवड्यात इथे घरात रंग दिला. हॉल आणि डायनिंग मध्ये एकदम डार्क ब्राऊन रंग होता. त्यात मग हिवाळ्यात अजूनच अंधार दिसायचा. बाकी लोकं उन्हाळी कामे काढतात तसे आपणही काढावे म्हणून शेवटी रंग द्यायचे ठरवलेच. द्यायचे म्हणजे आम्ही दोघे मिळून रंग देणार होतो. साधारण एक दोन रंग डोक्यात होते. म्हणून इथे हार्डवेअर शॉप मध्ये गेलो. त्यात एक नशीब होते की मी जायच्या आधी कुठल्या कंपनीचा रंग घ्यावा आणि त्यातही कुठला टाईप घ्यावा यावर जरा वाचून गेले होते. म्हणजे घराला बाहेरून द्यायचा रंग वेगळा, आत भिंतींना द्यायचा वेगळा, लाकडी रेलिंग्ज-ट्रिम ना द्यायचा वेगळा. दारांचा कुठला इ इ. आम्हाला फक्त भिंतींना द्यायचा असल्याने बरेच प्रश्न कमी झाले होते. तरीही तिथे गेल्यावर मजा झालीच. 
           दुकानात आम्हाला एक माहिती देणारा माणूस भेटला. त्याने विचारले रूमचा आकार किती आहे. ते काय आम्हाला माहीत नव्हते. मी अंदाजे आकार सांगितला. मग छताची उंची? तीही अंदाजे सांगितली. त्यात आमच्याकडे ढिगाने खिडक्या आहेत. त्यांचे आकार विचारले. यात मध्ये आमच्या पोरांची लुडबुड. कसेतरी त्याने काहीतरी गणित केले आणि म्हणाला तुम्हाला इतका इतका पेन्ट लागेल. मग भिंतीचे खाच खळगे भरायला काय हे विचारले. पुढे पेन्ट ब्रश, रोलर, ट्रे हे सर्व सामान घेतले. आता बाकी सर्व माहिती मिळाल्यावर रंग कुठला तेच ठरवायचे बाकी होते. साडीच्या दुकानातही इतक्या मिळणार नाहीत त्या शेड्स इथे. आपल्याकडे कसे, निळसर जांभळा, काळपट लाल, लालसर केशरी वगैरे रंग नुसते म्हणाले की दुकानदार सर्व साड्या बरोबर काढून दाखवतो. पण इथे 'सनसेट ऑरेंज', 'मिस्टीक ब्लू' असे काय कलर कळेना. तिथेच एक मशीन होते त्याला आपल्याला हवा त्या रंगाचा कागद स्कॅन केला की रूमला तो कसा दिसेल हे लगेच दाखवायचा तो. मग आम्ही त्यातून 'ओपल वॉटर' घेऊन आलो, अंदाजपंचे! :) ओपल वॉटर म्हणजे साधारण आकाशी निळा. :) 
           दुसऱ्या दिवशी, वाढदिवसाला पोरांना असते तशी उत्सुकता मला होती रंगाची. मग नास्ता उरकून आम्ही कामालाच लागलो. म्हणले कोपऱ्यातील एक भिंती आधी बघावी. अरे हो, त्याआधी आम्ही यु ट्यूब वरून रंग घराच्या घरी कसा द्यायचा याचे व्हिडीओ सुद्धा पाहिले. त्यामुळे आम्हाला एकदम 'आय आय एम' मधून पास झाल्याचं फिलिंग आलं होतं. त्यात काय विशेष नव्हतं. इथे असेही लाकडी भिंती त्यामुळे त्याला जास्त खाचखळगे नसतात. भिंत आधी जरा घासून एकसारखी करून घ्यायची. बाकी रंगांवर नवीन रंग लागू नये म्हणून भिंतीला चौकोनाच्या सर्व बाजूनी एक टेप मिळतो तो लावायचा.  भिंत तयार झाली की रंग डब्यात हलवून घ्यायचा. मग ट्रे मध्ये ओतायचा. आणि आधी ब्रशमध्ये रंग घेऊन, सर्व कोपरे रंगवायचे आणि मग मध्ये रोलरने फिरवून रंग लावायचा. रंग लावताना वरून खाली जायचे आणि W च्या आकारात रोलर फिरवायचा म्हणजे रंग एकसारखा लागतो. आता हे सर्व कळल्यावर तर रंग देणे 'बाये हात' का खेळ होता. 
           सर्वात आधी एक कळले की दुकानात  रंगाचा डबा उघडतो तसाही सहज आपल्याला जमत नाही. आम्ही प्रायमर + रंग असे एकत्र आणल्याने एकाच वेळेत काम होणार होते. रंग ट्रे मध्ये ओतल्यावर त्याला आमटीच्या भांड्यासारखा तो ओघळ येतो. पण त्याला हात लावायची इच्छा होत नव्हती पटकन. शेवटी संदीपने तो ओघळ बोटाने पुसून घेतला. तो चुकून बोट तोंडात घालेल अशी भीती वाटत होती सारखी मला. भिंतीचे कोपरे ब्रशने रंगवायला घेतले तर ब्रशचे फटकारे दिसत होते. कसेतरी ब्रश फिरवून आम्ही रोलर हातात घेतला पण ते W च्या आकारात रोलर फिरवायला काही जमेना. पुढे मधेच एका ठिकाणी फिका तर काही ठिकाणी रंग गडद दिसत होता. काही ठिकाणी जुना रंग बारीक दिसत होता. त्यामुळे एकच थर द्यायचा असूनही आम्ही चार चार हात त्याला मारले होते. शिवाय संदीप मधेच जरा जास्त जोर देऊन रोलर फिरवत होता त्यामुळे त्या रोलरचे धागे दिसल्यासारखे वाटत होते. पहिल्याच भिंती मध्ये आम्हाला इतक्या शंका आल्या. आम्ही पुढे खिंड लढायची की इथेच माघार घेऊन त्या उरलेल्या भिंतीला जुनाच रंग देऊन गप्प बसावे असा विचार करत होतो. शेजाऱ्यांनी 'नवीन रंग छान वाटत आहे' असे म्हणल्याने मग जोर आला आणि पुढच्या कामाला लागलो. 
           यात सर्वात कंटाळवाणे काम होते ते म्हणजे चिकटपट्ट्या लावणे. भिंतीला चारी बाजून बारीक बारीक करत टेपचे तुकडे लावले. वर चढून रंग द्यायचा, खाली उतरून ब्रशमधे रंग घ्यायचा, पुन्हा वर चढायचे. किंवा खाली रंग देताना दोन पायावर बसून द्यायचा. असे एकदम दमवणारे काम होते. रोलर धरून बोटांची वाट लागली होती. हात पाय तर कामातून गेले होते. कसेबसे दोन दिवसात आम्ही बरेच काम पूर्ण केले. आता एक भिंत तशीच राहू द्यावी असा विचार करत होतो. पण ती योग्य दिसत नव्हती. पडदे ज्या रंगाचे आहेत तसा रंग घ्यायचे ठरवून पुन्हा दुकानात गेलो. पुन्हा तेच प्रश्न. कसेतरी एक रंग निवडला आणि लावला. पण तो म्हणजे एकदम भगवा दिसत होता. म्हणले सुकल्यावर बदलला तर ठीक नाहीतर काही खरे नाही. एकूण साधारण अडीच दिवसात आम्ही ते काम संपवले. शिवाय साफ सफाई बाकी होतीच. टेप काढल्यावर काही ठिकाणी बारीक रेषांत जुना रंग दिसतोय. पण ते कोण बघणार? असा विचार करून अजून ते पडून आहे. मुव्ही मध्ये ते अंगावर रंग उडवत वगैरे रंग लावतात ना घराला ते एकदम खोटे आहे बरं का ! जमिनीवरचा रंग खरडून काढेपर्यंत वैताग येतो. असो. 
           सध्या तरी हे काम पूर्ण झाले आहे. आता पुढचे चार वर्ष तरी हा रंग बदलणार नाहीये. :) कसाही असला तरी आहे तो तो आहे आता. पण घरी रंगकाम करायला येणाऱ्या लोकांना किती कष्ट असतात ते आता कळते. नशीब आम्हाला छत करायचे नव्हते, नाहीतर मान मोडलीच असती. ज्याचं काम त्यानेच करू जाणे. माझ्या चुका आहेत तशा त्यांनी केल्या तर मी किती गोंधळ घातला असता. आता आहे ते मुकाट्याने खपवून घेत आहे. :) जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे! हेच खरे. अर्थात स्वतः काम केल्याचे समाधान आहेच. असो,  हे आधी आणि नंतरचे काही फोटो. :) 

विद्या भुतकर.