Thursday, April 27, 2017

माझा मराठी बाण (बाणा)

डिस्क्लेमर:
या पोस्टमधील सर्वच पात्रे काल्पनिक नसली तरी प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत आणि जे काही साधर्म्य तुम्हाला वाटत असेल ते केवळ योगायोग समजावे.
(हे असले फुसके डिस्क्लेमर देऊनच मराठी बाण्याचे आपण बारा वाजवत आहोत असे वाटते. मराठी माणसाने कसं ताठ मानेनं लिहावं. एखादा नवीन डिस्क्लेमर शोधला पाहिजे खास मराठी माणसासाठी. असो..त्यावर पुन्हा कधीतरी. )

बाकी विनोदी पोस्ट बद्दलचे डिस्क्लेमर आहेतच. आपापल्या विनोदबुद्धी नुसार ही पोस्ट समजून घ्यावी.
                    -------------------------------------------------------------------------------------------

तर झालं असं..... एका रविवारी नवऱ्याच्या साऊथ इंडियन मित्राच्या घरी असताना त्याच्या आईने निरागसपणे विचारलं,"रोज चपाती बनाते हो क्या?". आता हा प्रश्न हजार वेळा अनेक साऊथ इंडियन व्यक्तींनीं विचारला असल्याने मी,"हो" म्हणून सांगितलं. नाहीतर आधी मी भाकरी, भात, चकोल्या, थालीपीठ, धिरडं, डोसा  आणि अजून १० पदार्थांची नावं तरी सांगायचे. पण माणसाने समोरच्याला अपेक्षित उत्तर दिलं की पुढचा त्रास कमी होतो हे मी शिकलेय. मी 'हो' म्हणल्यावर ऑंटीचे डोळे मोठे झालेच. 
'बरा बाई तुला उरक असतो कामाचा' अशा टाईपचा लुक देऊन त्यांनी पुढचा प्रश्न विचारला,"तो पनीर और क्या क्या बनाते हो सब्जी?"
आता हे मात्र अतीच झालं हे माझ्या नवऱ्याला कळलं होतंच. मी चिडून काही बोलणार इतक्यात तो म्हणाला,"ऑंटी आपका सांबर अच्छा था." आपलं कौतुक ऐकून ऑंटी खूष झाल्या आणि मग पुढचा तासभर दुधी, कारलं, तोंडली आणि कुठले कुठले सांबर त्यांना बनवता येतात यावर माहिती मिळाली. 

गाडी बसताच मी सुरु होणार हे नवऱ्याला माहित होतंच.
"काय रे हे साऊथ इंडियन लोक? यांना कर्नाटकच्या वरचे सर्व नॉर्थ इंडियनच वाटतात. पनीर म्हणे. तू विषय बदललास म्हणून नाहीतर चांगली यादी ऐकवली असती मी.... दोडका, पावटा, घेवडा, चुका, अंबाडी, चाकवत....." माझा स्पीड बघून नवरा बिचारा शांत बसलाच. 
मी पुढे बोलत राहिले,"सारखं काय 'आपलं रोज चपाती बनवता का' विचारायचं? मी म्हणते का त्यांना रोज राईस बनवता का म्हणून?". 
"अगं पण ते खरंच रोज राईस खातात..." नवऱ्याने जोक मारण्याचा प्रयत्न केला.
"तू गप्प बस. मला वैताग आलाय सारखं आपलं सांगायचा की महाराष्ट्र भारताच्या पश्चिमेला येतो, उत्तरेला नाही."
"जाऊ दे ना?",नवरा. 
"जाऊ दे ना काय? या असल्या मवाळ भाषेमुळेच मराठी माणूस महाराष्ट्रातूनही नाहीसा होत आहे. आणि इथे तर आपण मेले अमेरीकेत."
"आता अमेरिकेनं तुझं काय वाकडं केलंय?", नवरा.
"तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही बघ. मराठी माणसाचं अस्तित्व म्हणून काही राहिलं पाहिजे का नाही? अमेरिकेत सुद्धा तेच. बास आता पुढच्या वेळी ऑंटी मला बोलल्या तर भारताचा नकाशाच घेऊन बसणार आहे सोबत. आईशप्पथ."
"हे बघ, आता आईला मध्ये कशाला आणतेस?", नवरा. 

    यावर मात्र माझी तलवारच काढायची बाकी राहिली होती. घरी येऊन चरफडत ऑंटीनीच दिलेली इडली चटणी पोरांना भरवून, भरपेट खाऊन मी झोपून गेले.
     
      दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आम्ही सर्व मैत्रिणी जेवायला निघत होतो. त्यात एक पंजाबी मुलगी होती. मॅडम आपल्या पंजाबी भाज्या, कल्चर आणि बऱ्याच गोष्टी सांगत होत्या.
"हमारे यहां तो रोज पराठे होते ही है नाश्तेमें. आलू, गोबी, दाल, अलग अलग टाईप के. पता नहीं तुम लोग रोज राईस कैसे खाते हो."
हेSSSSS म्हणजे माझ्या कालच्या ताज्या जखमेवरचं मीठच होतं. मग काय? सोडते काय तिला?
म्हटलं,"हम पश्चिम भारत में रहते है, साऊथ नहीं. हम भी रोज चपाती खाते है. " आता माझा टोन ऐकून,'हिच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही' हे तिला कळलं होतंच. पण जेवतानासुद्धा तिला मी मराठी पदार्थांची नावं ऐकवायला सुरुवात केली. मला त्यांचे पदार्थ माहित असतील तर त्यांना का नाही? अडाणीपणाची हद्दच झाली ही. 
"'पिठलं' पता है क्या तुमको?", मी विचारलं.
'पीटला'? तिने विचारलं. माझ्या पिठल्याला तिच्या त्या प्रश्नाने क्षणार्धात पिटलं होतं. 
मग एकदम आठवलं,"पुरणपोळी तो तुमको पता होगा?".
ती म्हणाली,"हां, वो मीठा पराठे जैसा होता है ना? ". 
'तुमचा जन्म पराठ्यांतच जायचा' हे मनातच म्हणून आणि मनातच म्हटलंय ना ही खात्री करेपर्यंत तिकडे एका कर्नाटकी मैत्रिणीने तोंड उघडलं,"अरे दॅट इज आवर ओबट्टू. वी मेक इट विथ ऑल पर्पज फ्लॉर". 
चिडचिड नुसती. माझ्या पुरणपोळीचं तिने बोबट्टू केलं ना? बराच वेळ मग थालीपीठ, चकुल्या, भरलं वांगं आणि अजून काय काय सांगत बसले. तोंडाला कोरड पडली बोलून बोलून. पण महाराष्ट्राचा एखादा प्रसिद्ध पदार्थ काही यांच्या पदरात पडेना.  शप्पथ सांगते, आज पुण्यात असते ना? तर चितळ्यांच्या माव्याच्या, तिळाच्या पोळ्या आणि दोन चार बाकरवाड्यापण तोंडावर मारून आले असते त्या पंजाबीणीच्या. खरंच, मराठी माणसाचं मराठीपण टिकवल्याबद्दल चितळ्यांच्या अभिमानानं ऊर भरून आला माझा.

        घरी येताना गाडीत बसले की मी सुरु झाले. नवऱ्याला म्हटलं, "तुला सांगते आपण ना मराठी माणसं....". माझी गाडी तिथेच अडकलीय कळून चुकलं बिचाऱ्याला. काय करणार तोही मराठी नवरा. ऐकून घेतलं त्याने हो... 
मी पुढं बोलले,"आपण मराठी माणसं ना स्वतःच्या जेवणातही कमीच पडलो बघ. आता हे साऊथ इंडियन लोकांनी कसं त्यांचं जेवण जगप्रसिद्ध केलं आहे? इडली, डोसा आणि राईस. बास तीन शब्दांत संपले. तिकडे नॉर्थला पराठा, PBM आणि CTM म्हंटले की झाले."
"PBM?", नवरा.
"पनीर बटर मसाला रे आणि चिकन टिक्का मसाला. ही नावे सांगितली की कसं नॉर्थ इंडियन पदार्थ आहेत ते कळून जातं. त्यात समोसा आहेच. पण आपल्या पदार्थाना ना काही मान-सन्मान ना आयडेंटीटी. अर्थात त्याला आपणच दोषी आहे. मी तर म्हणते मी आता डोसा आणि पनीर सर्व बंदच करणार आहे बनवायचं. "

माझ्या बोलण्यावर मागे बसलेल्या आमच्या इंग्रजाळलेल्या पोरांनी भोंगा पसरला,"That's not fair आई!!!!".
त्यांना बघून वाटलं,'आधी यांनाच सुधारलं पाहिजे'. पण सध्या दुसरा लढा लढत असल्याने ते 'आई' म्हणत आहेत यावरच समाधान मानून गप्प बसले आणि नवऱ्याशी बोलायला लागले. 

म्हटलं,"मराठी माणसाला आयडेंटिटीच नाही काही. तू सांग बरं, एखाद्याला आपल्या फेमस पदार्थाचं नाव सांगायचं तर काय सांगशील? इथे कसे ते इटालियन लोकांनी पिझ्झा जगभर नेला. या अमेरिकन लोकांचं बर्गरही पोचलं भारतात. पण आपल्याकडे काय आहे? आठवतंय? आपलं उगाच थालीपीठाची रेसिपी सांगावी लागते." दुपारची माझी हिंदीमध्ये 'थापण्याची' रेसिपी सांगण्याची कसरत आठवून कसंतरी झालं परत. 
माझा मराठीचा कळवळा पाहून जरा गंभीर होऊन नवऱ्याने सहभाग घेतला,"असं कसं म्हणतेस तू? आपल्याकडे असते ना सुरळीची वडी, पाणीपुरी, पावभाजी."
"हे बघ, तुझं ना भूगोलच कच्चं आहे.", मी वैतागले आणि 'हिच्याशी बोलण्यात अर्थ नाही' हे समजून नवराही. पण ऑफिसमध्ये लीडच्या रोलसाठी मला सर्वांना कसे समजून घेतले पाहिजे हे नुकतंच कळलं(कळवलं) होतं. त्यामुळे मी जरा समजुतीचा पावित्रा घेतला. नाहीतर मी सोडते का? 
" अरे, पाणीपुरीला इतकं युनिव्हर्सल केलं आहे लोकांनी आणि शिवाय प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव वेगळं. त्यामुळे ती 'आपली' म्हणता येत नाही रे. नाहीतर ते बॉंगाली येतील लगेच 'आमोर पुचका' म्हणत. खांडवी, खमण आणि पावभाजी म्हणजे एकदम गुजराती. त्यावर मराठीचा ठप्पा नाहीये ना.  मराठी म्हणजे कसं एकदम भारदस्त पाहिजे. नुसतं नाव घेतलं तरीआपली ओळख पटली पाहिजे."
आता नवराही विचार करू लागला किंवा मी अजून त्याच्या भूगोलाची परीक्षा घेईन असे वाटल्याने गप्प बसला असेल. घरी गेल्यावर त्याने पुरी भाजी, श्रीखंड, मिसळ, वडापाव अशी नावं घेतली. मीही मग कुठले कुठले पदार्थ खास मराठी आहेत याचा विचार करू लागले. वाटलं, आपणच आपली पब्लिसिटी करत नाही. 'नाहीतर भारतात सगळीकडे ढाबे आणि उडपी हॉटेल सारखे 'झुणका-भाकर' केंद्रही झाले असते' असं मला ठाम वाटू लागलं.
        पुढच्या काही आठवड्यात ऑफिसमध्ये पॉटलक करायचं ठरलं आणि मी विसरून गेलेल्या मुद्द्याने पुन्हा डोकं वर काढलं. बिचारा नवरा आताशी कुठं 'सुटलो' असा विचार करत असणार. पोरांनाही मी नाईलाजाने इडली आणि पालक पनीर करून दिलं होतं एकदा. त्यामुळे पोरंही बिचारी खुश होती. असं निवळलेलं वातावरण असताना हे 'पॉटलक' निघालं होतं. तुम्हाला सांगते, डोकं फुटायची वेळ आली विचार करून. आपल्या राज्याची संस्कृती दाखवणारा एखादा पदार्थ कसा बनवायचा? खूप राग आला त्यावेळी 'मराठी लोकांचा'. एक साधी रेसिपी तुम्ही जगाला देऊ शकला नाही? काय हे? म्हणे अटकेपार झेंडा रोवला. 
      बरं त्यात इथे मदतीला कुणी नाही, त्यामुळे ती पुरणपोळी करणं म्हणजे पुढचे पाच दिवस घरच्यांची उपासमार. शिवाय आपल्याला आली पण पाहिजे ना? नाहीतर 'आ बैल मुझे मार' व्हायचं. यात बाकीही बऱ्याच अटीही होत्याच. त्यादिवशी ऑफिसला पटकन करून नेता आलं पाहिजे, गरम करायला किंवा वाढायला, डब्यातून न्यायला सोपं पाहिजे. शिवाय अमेरिकेत त्यातलं सर्व साहित्य मिळायला हवं. डोळ्यासमोर त्या पंजाबीणीचे सामोसे तरळत होते आणि तिकडे इडल्या. 
       एका संध्याकाळी नवरा म्हणाला,"एक काम कर वडा-पाव नाहीतर मिसळपाव बनव. चांगली आयडिया आहे की नाही?" त्याच्या कल्पनेवर मीही खूष झाले. पण यात एकच गडबड होती ती म्हणजे 'पावाची'. 
"आपले मराठमोळे मावळे काय पाव बनवायला बेकरीमध्ये थोडीच गेले होते? ", माझ्या या युक्तिवादावर नवऱ्याने फक्त घर सोडून जायचं बाकी राहिलं होतं. 
मी म्हटलं तसं नवऱ्याला,"अरे तू विचार कर ना? ते समोसे बेकरीतुन थोडीच आणत असतील पंजाबी लोक? एकदम घरगुती पदार्थ पाहिजे. ऑथेंटिक."
"आपण तर बुवा बेकरीतूनच आणतो समोसे", नवऱ्याने परत टाकला होता. 
नेहमीप्रमाणे त्याच्याकडे दुर्लक्ष करुन मी पुन्हा विचार करायला लागले. रात्री वरण फोडणी टाकताना त्याच्यात हिरव्या मिरच्या घालत होते आणि एकदम आठवलं,"ठेचा". तो आर्किमिडीज पण इतका ओरडला नसेल तितक्या जोरात नवऱ्याला हाक मारली मी. 
"अरे, मिळाली मिळाली रेसिपी मिळाली." मी ओरडले. त्यानेही 'सुटलो' चा निःश्वास टाकत आनंद व्यक्त केला. 
दुसऱ्याच दिवशी मग इंडियन स्टोअर मध्ये जाऊन मी अर्धा किलो मिरच्या आणल्या, होय अर्धा किलो. किती डॉलर झाले ते विचारू नका. आणि तेही एकदम तिखट 'थाई चिली'. इथल्या त्या अमेरीकन मोठ्या, कमी तिखट असलेल्या नाही हं. पिशवीतल्या इतक्या मिरच्या बघून पोरं घाबरली होती. आधीच वरणातल्या मिरच्यांनी त्यांना पिडलं होतं त्यात इतक्या मिरच्या. शिवाय आपली आई 'मराठीपण' संचारल्यावर कशी असते ते त्यांना चांगलंच ठाऊक होतं. एकदा झणझणीत मिरचीचं पिठलं त्यांना खाऊ घातलं होतं मी. मग काय सोडते काय? 

       सगळ्यांत आनंदाची गोष्ट म्हणजे त्या ठेच्याला कष्टही कमी होते. एकदा मिरच्या परतून ठेवल्या की झालं. पोळ्या-बिळया लाटायची गरज नव्हती. 'आपल्या पुरणपोळीला आपण केवळ आळशीपणामुळे डावलत आहे' अशी थोडी मनात लाज वाटली स्वतःचीच पण आधी लगीन कोंढाण्याचं होतं.. पोळ्या काय सणाला केल्याच असत्या. घरी येऊन उत्साहाने मिरच्या निवडल्या. तेलात भरपूर लसूण, जिरे, मिरच्या आणि कोथिंबीर घालून परतून घेतलं. वाह..... काय ठसका उठला होता म्हणून सांगू. खोकणाऱ्या पोरांनी फक्त इमर्जन्सीसाठी '९११' कॉल लावायचं बाकी ठेवलं होतं. पण मी माघारी हटणार नव्हते. एखादा आलाच पोलीस विचारायला तर त्यालाही त्याच मिरच्यांची धुरी दिली असती मी. नाद नाय करायचा. 

      आता परतलेले सर्व मिश्रण, मिरच्या ठेचणे हेच काम बाकी राहिलं होतं. खलबत्यात त्या घातल्या आणि पहिल्या बुक्क्यालाच एक मिरची फटकन फुटून डोळ्यात उडाली. झाला ना घोळ. नेहमी.... मी हे अशी उत्साहाच्या भरात उद्योग करते. नळाखाली जाऊन भराभरा थंड पाणी डोळ्यांवर मारून घेतलं. डोळे लाल झालेच होते पण नशीब उघडले तरी. आता एक मावळा घायाळ झाल्यावर दुसऱ्याला पुढाकार घेणं भागच होतं. नवरा मेकॅनिक इंजिनियर असल्याने जरा हुशार होता. माझी अवस्था बघून त्याने सेफ्टी गॉगल घातले आणि (बहुदा मनातल्या मनात मला शिव्या देत) मिरच्या चांगल्याच ठेचल्या. मी एका डोळ्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवून ललिता पवार स्टाईलमध्ये लक्ष ठेवून होतेच. हातात ग्लोव्हज घालून सगळा ठेचा एकत्र करून नवऱ्यानेच एका डब्यात काढला. मी म्हटलं त्याला,"काय तू असा सेफ्टी गॉगल आणि ग्लोव्हज घालणारा मराठी माणूस?" पण माझ्या ललिता पवार पेक्षा तो बराच म्हणायचा. सगळा ठेचा डब्यांत पाहून मला एकदम टेन्शन आलं ना? अर्ध्या किलो मिरच्यांचा इतकुसाच ठेचा झाला होता. माझं त्यापेक्षाही छोटं झालेलं तोंड पाहून त्रासलेल्या नवऱ्याने भरभरून मिठी मारली आणि दामटून झोपवलंही. 

       जाम टेन्शन मला त्या पॉटलकचं. आमच्या दाक्षिण्यात्य मैत्रिणीने ह्या भल्या मोठ्या डब्यांत इडली आणि सांबर आणलं होतं, कुणी छोले, कुणी पनीर (तेच आपलं PBM हो), पंजाबी मॅडमनी सामोसे आणलेच होते आणि शिवाय कचोरीही. 'भलतीच दाखवायची हौस' असा मेसेजही मी माझ्या नवऱ्याला केला. या सगळ्यांत एका कोपऱ्यात माझा ठेच्याचा डबा बिचारा दबून बसला होता. माझा चेहराही पडलाच होता. लोकांना आपल्या मराठी प्रांताची माहिती देण्यासाठी तो पुरेसा वाटत नव्हता. जेवायच्या वेळी सगळ्या टाईपचे राईस आणि बाकी लोकांचे पदार्थ घेऊन प्लेट तुटायची वेळ आली. एका कोपऱ्यात ठेचाही घेतला. सर्व घेऊन जेवायला बसलो आणि मॅडमनी विचारले,"सामोसा खाया क्या? कैसा बना है?". सामोशाच्या तोबरा भरूनच मी मान हलवली. काय बोलणार ना? तिने पुढे विचारलं,"तुमने क्या बनाया है?". 
मी माझ्या ताटातल्या एका कोपऱ्यातला थोडासा ठेचा तिला दाखवला. तिने एकदम भाजीसारखा उचलला. तरी मी म्हटलं तिला,"अरे वो तिखा है बहोत".
"मै खाती हूँ रे" म्हणत तिने तो तोंडात टाकला. मी बघतंच बसले. आमच्या अक्ख्या जन्मात कधी कुणी इतका ठेचा तोंडात टाकला नव्हता. पुढच्या क्षणाला अख्ख्या फ्लोअरला ऐकू जाईल अशी किंकाळी ऐकू आली आणि माझ्या चेहऱ्यावर हसू पसरलं. इडलीच्या घासाबरोबर ते पट्कन लपवलं मी. मग पंजाबी आणि तिकडे साऊथ इंडियन मैत्रीण दोघीही पाणी घ्यायला पळाल्या. त्यांच्या भराभरा पडणाऱ्या भारदस्त पावलांनी फ्लोअर दणाणून गेला. 'क्या हुआ?' असं म्हणायचीही संधी त्यांनी मला दिली नव्हती. घटाघटा १-२ बाटल्या पाणी त्यांनी ढोसलं आणि डोळे पुसत टेबलवर येऊन त्या बसल्या. इतक्यात त्या सर्व प्रकाराची बातमी पसरली होती. मागे राहिलेल्या ठेच्याला आता सेलेब्रिटीचं रुप आलं होतं. सर्वानी एकमेकाला धोक्याची सूचना देत कणभर का होईना चव घेण्यापुरता ठेचा ताटात घेतला होता. हा हा म्हणता, गुगलवर १०००-२००० सर्च तरी आले असतील 'ठेचा' वर. त्या पंजाबीणीच्या अहंकाराला माझ्या ठेच्याने चांगलंच ठेचलं होतं. मी आपली हा सगळा प्रकार ठेचा तोंडी लावत पाहून घेतला. 

घरी जाताना चाटून पुसून खाल्लेला तो डबा दाखवून सर्व प्रसंग नवऱ्याला सांगितला. म्हटलं, "आयुष्यात विसरणार नाहीत मी कुठली आहे ते....".  धारातीर्थी पडलेल्या मैत्रिणी आणि मराठी ठेच्याने अमेरिकेत मराठ्यांचं गाजवलेलं नाव यासर्वांनी जाम खूष झाले मी. माझा मराठी बाण कसा बरोबर बसला होता. एक गड सर केला होता. आता फक्त त्या 'आँटी' बाकी होत्या. :) 


विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
       

Monday, April 24, 2017

कथा - व्यथा कढीपत्त्याची

       मला आमच्या जवळच्या इंडियन स्टोअर मध्ये मिळणारी एका ठराविक ब्रँडची (डाएट) भेळ मिक्स आवडते. डाएट हे फक्त नावाला लिहिलेलं असावं कारण शेव वगैरे भरपूर असते. पण नेहमीच्या चिरमुऱ्यांपेक्षा ते जास्त कुरकुरीत लागतात त्यामुळे मी तेच पाकीट हट्टाने आणते.  ते खरेतर फक्त फोडणी टाकलेले चिरमुरे, शेव आणि फरसाणअसतात. घरी आणून त्यात मग कांदा, टोमॅटो, कैरी, गोड चिंचेची चटणी मिक्स करून मस्त भेळ बनते. आठवड्यातून २-३ वेळा तरी एक वाटीभर खाल्ले जाते. परवा असाच खाऊन झाले आणि थोड्या वेळाने बहुदा ओठांवर त्यातला एक कढीपत्त्याच्या कण तसाच राहिला असावा, तो तोंडात आला आणि बराच वेळ कढीपत्त्याची चव रेंगाळत राहिली. :) किती अगदी इतकासा तो कण पण किती चविष्ट.
       तर कढीपत्त्याच्या नावाबद्दल मला एक शंका आहे. आयुष्याची अनेक वर्षे मला असंच वाटत आलं की कढीमध्ये घालतो म्हणून त्याला 'कढीपत्ता' म्हणतात. त्यामुळे शिकागोमध्ये असताना कढीपत्ता मिळाला नाही म्हणून अनेक वेळा मी कढी केली नाही.  पण पुढे जेव्हा काही ठिकाणी विना कढीपत्त्याची कधी मी खाल्ली तेव्हा मला जरा धक्काच बसला. :) अनेक उत्तर-दक्षिण भारतीय लोकांना 'करीपत्ता' म्हणताना ऐकले तेव्हापासून मनात ही शंका निर्माण झाली. 'कढीपत्ता' की 'करीपत्ता'?  पण मग 'करी' हे तर इंग्रजी नाव झालं? त्यापेक्षा  कढीपत्ता हे जास्त भारतीय वाटतं. असो. कुणाला याचं उत्तर माहित असेल तर जरूर सांगा.
       भारतात असताना कधी कढीपत्त्याची किंमत जाणवली नाही जितकी अमेरिकेत. एकतर आईकडे दारातच मोठं झाडं आहे(रोप नाही झाड). अनेकदा तर आई तेल भांड्यात टाकून फोडणीसाठी पानं तोडायची. अर्थात आम्हाला त्यासाठी पळायला लावलं की चिडचिड होणारच आमची. पण दारातच असल्याने कधी त्याची कमतरता वाटली नाही. आणि दुसरे म्हणजे पुण्यात  भाज्या आणायला एकतर गेलं तर तिथे भाजीवाल्या मावशी दोन काड्या तशाच देऊन टाकायच्या. त्यामुळे कढीपत्त्याची जुडी कधी विकत घ्यावी लागली नाही. पण इथे मात्र मोजून २-३ काड्या असलेल्या एका प्लास्टिक पिशवीची किंमत १ डॉलर. सढळ हाताने वापरायची सवय असल्याने एका पाकिटात काही होत नाहीच. त्यामुळे कमीत कमी ३ तरी घेऊन यायचीच. कधी मुळातच थोडे खराब असलेली पानं अजून काळी पडून जातात म्हणून मग थोडे दिवस धुवून पुसून पेपरमध्ये गुंडाळून डब्यात घालून फ्रिजमध्येही ठेवत होते. पण इतक्या शिस्तीत काम नियमित केलं तर काय ना? कधीतरी खराब होतातच. तर कधी  ऐनवेळी संपली तर अजून चिडचिड.
      यावर उपाय म्हणून मग मागच्या ट्रिप मध्ये ताजा छान वासाचा बराच कढीपत्ता धुवून सुकवून तेलात परतून आईंनी डब्यात भरून दिला. तेव्हापासून कधी ऐनवेळी संपला तर निदान सुकलेली २-४ पाने का होईना टाकता येत आहेत. आता तोही संपून जाईल. तर हे असं कढीपत्ता पुराण. आता इतकं काय सोनं लागून गेलंय त्याला असे वाटेल. पण आपल्या काही ठराविक पदार्थांना त्याच्याशिवाय चव नाही. सर्वात पहिले म्हणजे, मस्त भरपूर आले, लसूण आणि कढीपत्ता घातलेली कढी. त्यानंतर नंबर येतो तो वरण किंवा आमटीचा. केवळ हळद, हिंग, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता असला तरी किती चव येते साध्या वरणाला. आमटीचे तर मग विचारून नका. पुरणपोळी सोबतच्या कटाच्या आमटीमध्ये तर भरपूर कढीपत्ता पाहिजेच. आजकाल मी छोले भिजवून उकडून त्यांना केवळ जिरे मोहरी,लाल तिखट, कढीपत्ता, चाट मसाला याची फोडणी देते त्यातही आले लसूण कांदा टोमॅटो यातले काहीही नसते. तरीही स्नॅक किंवा दुपारच्या जेवणात ते सुके छोले खूप छान लागतात, केवळ कढीपत्यामुळे.

      दुसरे महत्वाचे पदार्थ म्हणजे भडंग आणि चिवडा. खरपूस भाजलेला कुरकुरीत कढीपत्ता त्यात हवाच. तोही भरपूर. प्रत्येक घासासोबत त्याचा बारीक तुकडा तरी तोंडात आला पाहिजे. पोहे, उपीट, फोडणीची पोळी, फोडणीचा भात यातही आलाच. बटाट्याची भाजी, दहीभात यासर्वांत बाकीच्या सामग्रीसोबत आपलेही वेगळेपण तो जाणवून देतोच. शेंगदाण्याच्या चटणीमध्येही छान लागतो. टिपिकल महाराष्ट्रीय पदार्थांत कढीपत्ता घालायचे हे तर ठरेलेलंच असायचं. पुढे अनेक लोकांशी ओळखी झाल्या तसे अजून तो आवडू लागला. खांडवी किंवा ढोकळ्यावर असलेल्या फोडणीमधून त्याची चव अजूनच खुलते असं वाटतं.
       अनेक दक्षिण भारतीय मॆत्रिणीमुळे नवीन पदार्थ शिकले. इडली-डोसा सोबत खोबऱ्याच्या चटणीवर घालायच्या फोडणी मधला कढीपत्ता, पुढे जाऊन टोमॅटो आणि शेंगदाणे असलेली चटणीही बनवू लागले. त्यात कढीपत्ता बारीक होऊन जातो त्यामुळे पूर्ण चटणीलाच त्याची चव असते. लेमन राईस, पुलिहोरा, बिसीबेळे, चटणी पावडर, पोंगल अशा अनेक पदार्थांची ओळख झाली आणि त्यातला कढीपत्ता आवडू लागला. सर्वात मोठा बदल होता तो म्हणजे मांसाहारी जेवणात. आमच्याकडे घरी कधीही अंडाकरी किंवा चिकनमध्ये कढिपत्ता मी खाल्ला नव्हता आणि कधी घालणारही नाही. पण एका मित्राकडे नारळाचे दूध, हिरव्या मिरच्या, भरपूर काळे मिरी आणि कढीपत्ता घातलेली अंडाकरी खाल्ली एकदा. आणि ती इतकी आवडली की बासच. तेंव्हपासून मीही तशी थोडी कमी तिखट करी बनवते. त्यातही कढीपत्ता हवाच. वर उत्तरेकडे मात्र पनीर, बटर चिकन किंवा छोले वा दाल माखनी मध्ये तो दिसला नाही आणि मीही कधी घालणार नाही.
     तर असा अनेकवेळा वापरला जाणारा कढीपत्ता रोजच्या स्वयंपाकाचा मुख्य घटक. मी पुण्यात असताना एक रोपटं लावलं होतं आणि ते थोडं वाढलंही होतं. त्याची काही पानं खुडल्यानंतर मात्र त्याची तितकीशी वाढ झाली नाही. बॉस्टनला येताना ते सोडून यावं लागलं. :( इथे काही ती रोपं लावणं थंडीमुळे जमत नाही. पण तरीही जो काही विकत आणेन अगदी सोन्यासारखा त्याचा पुरवून वापर करते. :) आज पोस्ट लिहितानाही काही पदार्थांची नावं आठवून तोंडाला पाणी सुटलं. :) पोस्ट लिहून झाल्यावर पुनः एक वाटी भेळ मिक्स घेऊन बसले. :) रात्री हे भरीत आणि कढी बनवली. मुलीने जेवण झाल्यावर येऊन मिठी मारली. म्हणाली,"जेवण तिखट होतं पण मस्त होतं." एकूण काय कढीपत्याने आजचा दिवस सार्थकी लागला. :)  

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, April 23, 2017

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई

       सुंदर चित्रं काढता न येणं, गाण्यासाठी आवाज चांगला नसणं या दोन  गोष्टी करता आल्या असतं तर..... असा विचार लाखो वेळा मनात येऊन गेला, अगदी लहान असल्यापासून. आमच्या शाळेत रांगोळी प्रदर्शन आणि स्पर्धा असायची. तिथे आपल्याच वर्गातल्या मुला-मुलींनी काढलेली सुंदर रांगोळी, सूर्यास्ताच्या वेळी पाण्यात दिसणारी बोट आणि त्याचं परफेक्ट प्रतिबिंब पाहून चॅन वाटायचंच पण आपल्याला हे जमत नाही याचं दुःखही. चित्रकलेच्या बाकी मुलांची वही पाहूनही तेच वाटायचं. 
        पहिल्या नोकरीत सेट्ल झाल्यावर एक मोठी चित्रकलेची वही, रंग सर्व घेऊन आले. त्या वहीची कल्पना मात्र मला स्वतःलाच खूप आवडली होती. प्रत्येक पानावर एक चित्र काढायचं बॅकग्राऊंडसाठी आणि त्यावर एक पुढे एक कविता. मोठ्या उत्साहाने त्यात अनेक कविता लिहिल्या. अनेक वर्षे ती सोबत घेऊन फिरलेही भारत, अमेरिका कॅनडाला. पुण्यात राहिलो तेव्हा मात्र ती तिथेच घरी ठेऊन आले. एका भारतवारी मध्ये त्यातली उरलेली पानेही पूर्ण केली. ती वही संपली तेंव्हा फार समाधान वाटलं अनेक वर्षांनंतरही ती वही पूर्ण करू शकले आणि दुःखही त्यात नवीन पान जोडता न येण्याचं. 
         शिकागो मध्ये असताना नवीनच वेड होतं, पेन्सिल स्केच शिकायचं. मग दोनेक पुस्तकं, अनेक पेन्सिलीचा सेट, असे सर्व घेऊन आले. त्यात थोडे स्केचेस काढलेही. पण या सर्व गोष्टी वेळेच्या प्रवाहात मागे पडून जायच्या. नोकरी बदल, मुलं झाली किंवा काय तर ब्लॉग लिहायला सुरुवात केली किंवा पळायला... अशा अनेक कारणांत नियमितपणे चित्रकलेवर कधी भर दिलाय असे झालेच नाही. पेन्सिल स्केच बद्दल कधीतरी ब्लॉग पोस्टही लिहिली एक. पण हौस काही टिकली नाही. पुढे काही वर्षांनी पुण्यात असताना मायबोलीवर जलरंग कार्यशाळेच्या पोस्ट वाचण्यात आल्या. त्या पाहून मग पुन्हा नवीन जलरंग, हँडमेड पेपर, ब्रश हे साहित्य व्हिनस मधून घेऊन आले. त्या कार्यशाळेच्या पहिल्या चारेक भागांपर्यंत नियमित शिकण्याचा प्रयत्नही केला. त्यापुढे काही नियमितपणा टिकला नाही आणि नेहमीप्रमाणे तेही बंद पडले. 
         आता तिथेच असताना दिवाळीच्या वेळी मैत्रिणीने दिवे रंगविण्याची कल्पना दिली आणि ते काम जोमाने सुरु झालं. गेले तीनेक वर्ष दिवाळीत पणत्या रंगविणे नियमित चालू आहे. त्यावरून छोटे फ्लॉवरपॉट रंगवून त्यांचा सेट बनवायची कल्पनाही सुचली. त्याप्रमाणे दोन रंगविलेही. अजून ४-५ बाकी आहेत पण तोवर दिवाळी आली आणि ते काम मागे राहिलं. मागच्या वर्षी काही अडल्ट कलरिंग पुस्तके घेऊन आले होते. त्यातही मन थोडे रमले. पण रंग भरण्यापेक्षा चित्र काढणे जास्त आवडत आहे असे वाटले. सोपे वाटले म्हणून वारली पेंटींगचाही प्रयत्न केला. एक छान वारली पेंटिंग बनवायचा विचारही आहे. थोड्या दिवसांपूर्वी मंडला डिझाईनचे कॅनवास बनवायची कल्पना सुचली आणि तेही करून पाहिलं. त्याचे मोठं कॅनवास बनवायचे होते तेही पूर्ण केले. बरेच दिवसांपासून daisy चे चित्रं काढायचे होते. गेल्या ५-६ दिवसांत लिहायचे सोडून ते करत बसले. आता ते पूर्ण झाल्यावर जरा शांत वाटत आहे. 
        या सर्वातल्या एकेकाचे फोटो इथे शेअर करतेय. एक तर नक्की आहे की अनेक चित्रकार, कलाकार मी पाहिले आहेत त्यामुळे मला त्यांच्यापुढे अगदीच सामान्य वाटते. पण त्याचसोबत चित्रांची, रंगांची नेहमी भूल पडते. आपणही प्रयत्न करावेत असं वाटत राहतं. आज पोस्ट लिहिताना जाणवलं की गेल्या १२-१४ वर्षांत वेळ मिळालाय तेंव्हा काही न काही करण्याचा प्रयत्न नक्की केलाय. या कलेशी नक्कीच काहीतरी नातं आहे माझं. अनेक मोठ्या कलाकारांसारखे खूप सुंदर जमत नसल्याने कल्पनाशक्ती आणि कलाकृती मर्यादीत राहतेच. ती मर्यादा नेहमी जाणवत राहते. प्रश्न असा आहे की या इच्छेचं काय करायचं? ती इच्छा पुन्हा पुन्हा वर येतेच. 

      खरंच पुढे काय शिकता येईल, एखादी दिशा कशी देता येईल यावर कुणी काही सुचवले तर खूपच छान होईल. अर्थात जे काही करायचे ते आठवड्यातून २-३ तास देता येईल असे हवे. त्यात सलगता आणि प्रगती दोन्हीही पाहता आले पाहिजे असे वाटते. तुमच्या सूचना जरूर सांगा. :) कदाचित हे असं अधे मध्ये काही न करता एक मार्ग मिळेल अशी अपेक्षा आहे. :) 
      अशा कितीतरी गोष्टी असतील ज्या केवळ योग्य दिशा नसल्याने राहून जात असतील. तुमच्याही अशा काही आवडी असतील त्यांनाही काही दिशा द्यायची असेल तर अशी यादी जरूर करून बघा. कदाचित तुम्हालाही उत्तर मिळेल. :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, April 17, 2017

काळ्यावरचं सोनं

       थोड्या दिवसांपूर्वी मायकल्स(Michaels) नावाच्या माझ्या आवडत्या आर्ट आणि क्राफ्ट दुकानात कॅनवास सेलवर होते. तेही मोठे. आता सध्या वेळ असल्याने हौस म्हणून ५-५ कॅनव्हासचे २ सेट आणले. शेजारीच नवऱ्याला काळ्या रंगाचे कॅनवास दिसले आणि तेही एकदम मोठे आणि स्वस्त. १८*२४ इंचाचे. थोड्या दिवसांपूर्वी मंडल डिझाईन लहान आकाराच्या कॅनवास वर काढून पहिले होते. तेव्हापासून मोठे करायचे इच्छा होती. मग काळ्या रंगाचे ४ कॅनवास घेऊन आले. यात मोठं फायदा हा होता की मागच्या वेळी काळा रंग देण्यातला बराच वेळ आणि रंग वाचला. लगेचच डिझाइन्स सुरु करता आले. पेन्सिलने आधी काढून त्यावर ब्रशने रंगवले. पण यावेळीही आधीसारखाच प्रॉब्लेम आला तो म्हणजे सोनेरी रंगाच्या मागून काळा कॅनवास दिसतोच. रंगाचे ३ हात दिले तरी अजूनही थोडे फिकट वाटत आहे. थोड्या दिवसांनी हुरूप आला तर अजून १-२ हात पुन्हा देईन पण सध्या इतकेच. :) घरात भिंतीवर लगेच टांगून टाकले. :)

        मोठा कॅनवास आणि बारीक डिझाईनमुळे थोडं दमायला झालं. पण एकदा सुरु केलं की एकदम तंद्री लागते. करत राहावंसं वाटतं. दमल्यासारखं वाटतं ते बंद केल्यावरच. ५ दिवसात साधारण पूर्ण झाले. खूप छान अनुभव आला. माझ्यासारख्या बेसिक चित्रकलाही येत नसलेल्या लोकांसाठी चांगले आहे हे असे वाटले. एकदा वर्तुळं काढली की झालं. एकदम सोपे आकार काढून चांगला परिणाम साधता येतो. स्वतः काहीतरी केल्याचा आनंद आहेच.

विद्या भुतकर.
Sunday, April 16, 2017

मैं अकेला ही चला था.....

     शनिवारी, यावर्षीची बॉस्टन ऍथलेटिक असोशियनची पहिली रेस झाली ५किमी अंतराची. यावर्षी १० किमी आणि हाफ मॅरॅथॉनही आहे. याला खरेतर रेस म्हटलंच नाही पाहिजे. कारण मला कुठेही पहिले बक्षीस मिळवायचे नसते. अर्थात हवे असले तरी ते काय जमणार नाहीये. :) इथे भले भले लोक सुसाट वेगाने पळत असतात. त्यांच्याशी स्पर्धा करणे हे ध्येय नाहीच मुळी भाग घेण्याचे. पण तरीही आपलं लोक म्हणतात म्हणून 'रेस' म्हणायचं. तर ही ५किमीची रेस शनिवारी पार पडली. आता हे अंतर तसं फार जास्त वाटत नाही आणि नसतंही. शिवाय यावेळी ती सकाळी ९.३० वाजता होती त्यामुळे पोहोचायचं टेन्शन नव्हतं. त्यामुळे तसं निवांतच म्हणायचं.
      पण यावेळी भाग घेताना एक वेगळी मजा होती बाकी लोकांच्या सोबतीची. मागच्या वर्षी मी आणि संदीपच होतो फक्त. शहरात नवीन होतो, अजूनही नवीन ओळखी होत होत्या. यावेळी रजिस्ट्रेशन सुरु झालं तेंव्हाच मी ऑफिसमध्ये काही लोकांना आठवण करून दिली तर संदीपने त्याच्या ऑफिसमधील काही मित्रांना. त्यातील ५ जणांना तर रजिस्टर केलेही त्याच दिवशी. बाकीही अजून ४-५ मित्र-मैत्रिणींना आठवणीने विचारले आणि त्यांनीही रजिस्टर केले होते. बरं त्यातील एकीने तर पुढे जाऊन अजून तिच्या ४-५ मैत्रिणींना रजिस्टर करायला सांगितले. असे करत करत आमच्यासोबत अजून १२-१५ लोक तरी येणार होते.
     जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान एक तर बाहेर थंडी आणि बर्फ त्यामुळे बरेच जणांनी सराव केला नाही किंवा ज्यांनी थोडाफार केला त्यांचे पाय दुखायला लागले. काहींनी सराव करताना पाय का दुखत आहे, काय केले पाहिजे वगैरे विचारले. पण एकूण रेसच्या दिवसापर्यंत काही लोक तर नक्कीच गळून पडले. एक दोघांना आदल्या दिवशी बोलून 'चलाच' म्हणून आग्रहही केला. आता हे असे आग्रह करण्यात जरा टेन्शन असतं कारण उगाच कुठे काही दुखापत झाली तर? असा विचार असतो. पण हेही माहित असतं की एकदा तिथे पोहोचलं की सर्व ठीक होईल. फक्त ट्रॅकपर्यंत पोहोचायचा प्रश्न असतो. त्यामुळे योग्य प्रमाणात आग्रह कसा करायचा हे अवघडच गणित असतं. अर्थात ते आपल्या जवळच्या मित्रांनाच हे करू शकतो. 
      तर हे सर्व झाल्यावर आम्ही एकूण रेसच्या दिवशी १२ जण होतो. त्यातील ३ लोकांनी फक्त याआधी ५किमी रस मध्ये भाग घेतला होता. बाकी सर्वांना हा अनुभव नवीनच होता. त्यामुळे ट्रेनमध्ये जाताना किंवा कारमधून एकत्र जाण्यात अगदी ट्रीपला जाण्यात असतो तशी मजा वाटली. रेसच्या पार्कमध्ये गेल्यावरही बरेच जण नवीन असल्याने बॅग कुठे चेकइन करायची, कुठे उभे राहायचे, काय करायचे अशा साध्या गोष्टी होत्या पण त्या नव्या लोकांना सांगताना मजा येत होती आणि त्यांनाही अगदी कुणीतरी अनुभवी लोक सोबत असल्याचं समाधान. :) सर्वांचा उत्साह ओसंडून वाहात होता. रेसच्या आधी फोटो काढणे, अपलोड करणे, टॅग करणे वगैरे सर्व झालेच. रेस सुरु झाली आणि संपलीही. सर्वानीच त्यांच्या स्वतःच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या स्पीडने पूर्ण केली. 
       रेस संपल्यावर तर मग काय, मेडल घेऊन, टीशर्ट घालून एकेकाचे 'सोलो' मग ग्रुपचे असे अनेक फोटोसेशन झाले. ज्यांची ती पहिली रेस होती ते तर अजून खूष होते, ज्यांना जायचे की नाही अशी शंका वाटत होती तेही आलो या आनंदात होते. सर्व उरकून घरी निघालो. जातानाही जे लोक कारने सोबत आलो होतो ते सर्व सोबत होतो. नेहमीप्रमाणे मित्रांच्या घरी मुले होती. तिथे मैत्रिणीच्या आईनी छान स्वयंपाक केलेला होता. जेवण करून घरी येऊन गाढ झोप काढली. दिवसभर मनात एक वेगळंच समाधान होतं. मी आणि संदीपने दोघांनी या वर्षीच्या रेसला सुरुवात झाली याचं आणि आपल्यासोबत बाकी लोकांनाही या अनुभवाचा आनंद घेता आला याचं. 
      मी पुण्यात असताना किंवा इथे आल्यावर, जमेल तेंव्हा अनेक मित्र मैत्रिणींना व्यायामाचा किंवा पळण्याचा आग्रह करते. पुण्यात असताना केलेल्या एका रेसबद्दल पोस्टही लिहिली होती. कधी कधी वाटतं, 'जाऊ दे ना कशाला पाहिजे? आपण करतोय ते बास आहे. कशाला लोकांना आग्रह करायचा?'. पण प्रत्येक वेळी ज्या ज्या ठिकाणी माझ्या मित्र मैत्रिणींनी अशा रेस मध्ये भाग घेतला त्यांनी नंतर मला आवर्जून सांगितले की 'बरं झालं गेले/गेलो ते'. या अशा अनेक अनुभवानंतर वाटतं,'जे केलं योग्यच केलं. मी आणि संदीप आता नियमित पळतो. त्यामुळे त्या दिवशीचं ते वातावरण,  रेसच्या नंतर मिळणारं समाधान, त्यासाठी ठरवून केलेला सराव हे तसं ओळखीचं झालं आहे. तोच आनंद बाकी लोकांनाही मिळावा आणि तो वाटता यावा हे तर अजूनच खास. खरंच ते स्वतः अनुभवल्याशिवाय कळत नाही हे नक्की. म्हणूनच हा सर्व खटाटोप. 
      कधी कधी वाटतं याबद्दल लिहायचं की नाही? उगाच 'आपणच किती ग्रेट' टाईप्स लिहिल्यासारखं वाटतं. पण यातूनही कुणाला तरी पुन्हा व्यायामाची, पळायची इच्छा झाली तर तेही चांगलेच आहे. म्हणून प्रत्येक रेसनंतर आवर्जून पोस्ट लिहिते. प्रत्येकवेळी काहीतरी खास त्यात असतंच. यावेळचीही खास झाली ती आमच्या बॉस्टनमधल्या मित्र-मैत्रिणींमुळे. :) बॉस्टनमध्ये राहून जमा होत असलेल्या गोतावळ्याचं ते प्रतीक होतं. पुढच्या वर्षी अजून लोक सोबत असतील अशी अपेक्षा आहे. :) त्यादिवशी ग्रुप फोटो काढताना राहून राहून तो शेर आठवत होता,
"मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर
लोग साथ आते गये और कारवां बनता गया"
- मजरूह सुलतानपुरी

खरेच,"कारवां बनता गया". 
         
विद्या भुतकर. 

Friday, April 14, 2017

माझा सायकल प्रवास

       आमच्या घराजवळ एक सायकल ट्रेल आहे. एक जुनी रेल्वे लाईन होती ती काढून तिथे सायकलिंग साठी चा रस्ता बनवला आहे, मस्त सलग १० मैलापेक्षा जास्त लांबपर्यंत आहे. आम्ही मुलांना सायकली घेऊन त्यांच्यामागे रनिंग करत जातो. त्यामुळे गेल्या वर्षीपासून नवऱ्याला सायकल घ्यायची होती. यावर्षी त्याची घेतली आणि मी एकटीच राहिले होते. थोड्या दिवसांपूर्वी माझ्यासाठीही सायकल घेऊन आलो. काय माहित पण सायकल घेतानाही उगाच जमेल की नाही अशी शंका येत होती. एकतर माझी उंची कमी आणि सायकल चालवून बरीच वर्षं झाली आहेत. विकत घेण्यासाठी चालवून बघतानाही नीट जमत नव्हती. पण किंमत, उंची, रंग अशा महत्वाच्या गोष्टी पाहून घेऊन टाकली. पुढच्या रविवारी आम्ही ट्रेल वर गेलो मुलांसोबत अनेक वर्षांनी सायकल चालवली.  सायकल चालवायला सुरुवात केली आणि खूप भीती वाटली. अजूनही तशी थोडी भीती वाटत आहेच. गियर वगैरे बदलता येत नाहीये, इ. पण सुरुवात झाली आहे. आजची पोस्ट माझ्या गेल्या अनेक वर्षातल्या सायकल स्वाऱ्यांबाबत. तुमच्याही अशा काही आठवणी असतील तर जरूर सांगा. :) 
        आयुष्यात उंची कमी असल्याचे अनेक तोटे आहेत हे अनेकवेळा जाणवले आहे. पण सर्वात जास्त पहिल्यांदा वाटले ते सायकल शिकताना. कमी उंचीमुळे सायकलवरून खाली कधी पाय टेकणार नव्हतेच. साधारण ६-७वीत असताना सायकल शिकलीच पाहिजे असे वाटले. तोवर बऱ्याच मुलींकडे वर्गात स्वतःच्या सायकली होत्या आणि त्यांना त्या चालवताही येत होत्या. माझ्याकडे दोन्हीही नव्हते. मी आणि माझी मधली बहीण सुट्टीच्या दिवशी वडिलांची सायकल घेऊन घराच्या मागे असलेल्या मोठ्या खाजगी रस्त्यावर जायला लागलो. एकतर ती जेन्टस सायकल, त्या दांडीच्या मधून पाय घालून शिकणे म्हणजे अवघडच. त्यात पडताना धरायलाही बहीणच, म्हणजे मोठं कुणी नाही. 'एकदा पेडल मारायला यायला लागलं की झालं आली सायकल' इतकंच ध्येय होतं. दोघी मिळून किती वेळा पडलो असू माहित नाही. त्यात आजूबाजूला घाणेरीची झुडपं गेलं की त्यात झुडूपातच. पण कशीबशी शिकलो. 
        आता सातवीत मला सायकल यायला लागली. मला नेहमी वाटायचं की लेडीज सायकल असेल तर किती नीट चालवत येईल. अनेक वेळा शाळेतल्या मैत्रिणीची सायकल दुपारच्या सुट्टीत मागून घेऊन चालवायची. कधी ती हो म्हणेल कधी नाही. हळूहळू मला नीट जमायला लागल्यावर मी घरी सायकल घ्यायचा हट्ट धरला. उत्तर 'नाही' होतं. एकदिवस मी अगदीच रागाने जेवण न करता एका खोलीत दार बंद करून बसून राहिले, दिवसभर. :) आता वाटतं किती बावळटपणा होता. असं केलं माझ्या मुलांनी तर मीही नाहीच म्हणेन. पण त्या रात्री शेवटी कुणी ऐकत नाही म्हणून खोलीतून बाहेर आले. माझ्या रुसलेल्या चेहऱ्याकडे पाहून आजोबांनीं हळूच बोलावलं. म्हटले,"सायकल नाही पण घड्याळ घेऊ तुला." :) मग एक दिवस जाऊन आम्ही एक सेकंडहँड घड्याळ घेऊन आलो. :) (त्याचं पुढे काय झालं आठवत नाहीये. ) पण ते आयुष्यातलं पहिलं घड्याळ मिळालं. असो.  तरीही सायकलचा हट्ट होताच. तोही आजोबानी पूर्ण केला. 
    सायकलचा हट्ट पूर्ण व्हायला जरा वेळ लागला. तेव्हा मी आठवीत होते. आजोबांच्या ओळखीच्या माणसाकडूनच ती घ्यायची होती. मी त्यांना म्हटले, "मला बाकीच्या मुलींसारखी BSA ची सायकल हवी आहे". त्यांच्यादृष्टीने ऍटलासची सायकलच बेस्ट होती, एकदम टिकाऊ. :) त्यामुळे तीच घ्यायचे ठरले. त्यात दोनच पर्याय होते, २२ इंच आणि २४ इंच, मला छोटीच घ्यावी लागणार होती. ज्यादिवशी घ्यायची म्हणून दुकानात गेलो तर त्या माणसाने आणली नव्हती. मग अजून एक दिवस वाट पहावी लागली. अशा वेळी एक दिवस वाट पाहणे म्हणजे किती त्रासदायक असते ते कळते. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आजोबांसोबत जाऊन ती सायकल घेऊन आलो. काळी कुळकुळीत नवीन कोरी सायकल! कधी एकदा दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन जातेय असं झालं होतं. :) आता दुसऱ्या कुणाची सायकल चालवायची गरज नव्हती. हवी तेंव्हा, हवी तितका वेळ चालवता येणार होती. 
         दुसऱ्या दिवशी आवरून शाळेला निघणार तर दादा म्हणाले," सायकल चालवत नेऊ नकोस." 
मी रागाने विचारले,"का?"
तर म्हणे, 'मला सायकल गर्दीत चालवायची सवय नव्हती आणि त्यामुळे कुठेतरी धडपडेन म्हणून हातात धरून चालत घेऊन जा' असं त्यांचं म्हणणं होतं. अर्थात मी ते ऐकलं नाहीच. :) पण आई-वडील म्हणून त्यांना तेंव्हा किती काळजी असेल हे आता जाणवत आहे. लवकरच मी नियमित सायकल घेऊन शाळेत जाऊ लागले. कधी गावात जाऊन सामानही आणू लागले. गावातल्या बसस्टँड जवळून सायकल नेताना भीती वाटायची, एकतर गर्दी आणि तिथे असणारा उतार. हळूहळू त्याच्याही सवय झाली. आता साधारण ४-५ महिने झाले असतील सायकल घेऊन. एकदा तोंडी परीक्षा देऊन घरी येत असताना घराच्या समोर मी रस्ता क्रॉस केला आणि क्षणभर कळलेच नाही, काय झाले होते. 
       मागून येणाऱ्या एका बाईकने मला जोरात धक्का मारला होता. आणि घराच्या गेटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मी कुठेतरी उडून पडले होते. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मातीत माझा चेहरा पूर्णपणे घासला गेला आणि पुढे मग मला हॉस्पिटलमध्ये कसे नेले वगैरे काही आठवत नाही. दिवसभर माझ्यावर लक्ष ठेवून कुठे डोक्याला मार लागला नाहीये ना हे पाहिले आणि सोडून दिले. जी काही दुखापत झाली होती ती बरीचशी चेहऱ्यालाच होती. चेहऱ्यावर बरेच खरचटले होते, सूज होती. मला पाहायला वर्गातल्या सर्व मुली आल्या होत्या हे नक्की आठवतं. :) अनेक दिवस घरी राहून मग पुन्हा शाळा सुरु झाली. परीक्षा जवळ आल्या होत्या. ऊनही वाढलं होतं. लागलेल्या ठिकाणी उन्हाच्या झळा अजूनच त्रासदायक वाटायच्या. त्या परीक्षेला सायकलने गेले की नाही हे काही आठवत नाही. पण गेले असेन तर माझा हट्टच असेल तो. :) 
       पुढच्या वर्षी,९वीत पुन्हा सायकलस्वारी सुरु झाली. पण यावेळी सोबत लहान भाऊ होता. त्याची पहिली होती. 'शाळेत जायचे नाही' म्हणून तो हट्ट करायचा. त्याला शाळेत नेण्याची जबाबदारी माझीच. तिथेही आजोबांचं म्हणणं,"याला मागे बसवून सायकल चालवू नकोस. मागे बसव आणि तू चालत सायकल हातात धरून ने". काय लाड नुसते नातवाचे. :) पण हे असे अपवाद वगळता, सायकल आता एकदम सुरळीत चालू होती. ९वी-१०वी संपली आणि जुनियर कॉलेज मध्ये सायकलचे वेगळे पर्व आले. कॉलेज थोडे घरापासून दूर होते. (तीनेक किमी असेल पण तेव्हा ते खूप वाटायचे.) कॉलेजमध्ये आमचा मुलींचा एक चांगला ग्रुप जमला. मग आम्ही गावातून वेगवेगळ्या दिशांनी आपल्या बाजूला असलेल्या मैत्रिणीला घेऊन निघायचो. वाटेत कुठे भेट झाली की सगळ्या मिळून कॉलेजला. परत येतानाही एकत्र निघायचे आणि जिथून वेगळे होणार त्या ठिकाणी बराच वेळ गप्पा मारत रस्तातच उभे राहायचे. एकत्र जाताना अगदी रस्ता अडवूनच जायचो म्हणा ना. सायकलवरून जातानाही अनेक गप्पा व्हायच्या. तेंव्हाच्या त्या गप्पा आणि स्वप्नं वेगळीच होती. 
      पुढे इंजिनियरिंगला गेल्यावर वाटले सायकल सुटली. पहिल्या सेमिस्टर मध्ये चालतच सगळीकडे जायचो. पण कॉलेज खूप मोठं(तेंव्हा तरी वाटायचं). त्यात रूमवर यायला, जेवायला जायला इ बरंच चालावं लागायचं. म्हणून मग लवकरच घरून सायकल घेऊन आले. यावेळी बहिणीची छोटी रंगीत सायकल घेऊन आले होते. मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही अनेकदा माझ्या त्या सायकलवर डबलसीट जायचो. आम्हाला 'फिशपॉन्ड' पडला होता त्या वर्षी,"सोने की सायकल....". :) तेव्हा सायकल होती तर वाटायचे आपल्याकडे बाईक(स्कुटी) हवी. पण तीही चालवता येत नव्हतीच. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. कॉलेजच्या शेवटच्या दोन वर्षात मित्राची MTB सायकल चालवायची भारी हौस होती. सगळीकडे घेऊन जायचे, मेसवर वगैरेही. भारी वाटायचे ती सायकल चालवायला. :) माझ्यामते बंडखोरीचं एक रूप होतं ते. अमुक एक प्रकारचीच सायकल का चालवायची असं काहीसं. असो.              कॉलेजची चार वर्षं संपली आणि सायकलचा प्रवासही संपला. नोकरी लागल्यावर गाडी घेतली आणि पुन्हा कधी सायकल चालवली नाही. मुलांना घेतली तेंव्हाही कधी वाटलं नाही आपल्यालाही हवी म्हणून. सानुला दोन वर्षांपूर्वी शिकवायला सुरुवात केली. तिला हळूहळू यायला लागलीही. पण एक दिवस लक्ष नसताना सायकलवरून पडून हात मोडून घेतला. हाड मोडले होते आणि तिच्या सर्जरीच्या वेळी उगाचच तिला शिकवली असं वाटलं. तिला भूल देत असताना पाहून खूप रडू आलं होतं. अजूनही ती चालवताना भीती वाटतेच. आता ती भीती कशी घालवायची माहीत नाही. माझ्या आई-वडिलांनी माझ्या अपघातानंतर मला कशी चालवू दिली काय माहित. मला तर जाम टेन्शन येतं. आयुष्याचं चक्र म्हणतात ते हेच असावं. :)
        तर असा मोठा प्रवास माझ्या सायकलस्वारीचा. तो सगळा आठवला तो नवीन घेतलेल्या सायकली मुळे. शाळेत, कॉलेजमध्ये सायकल चालवताना एक वेगळं विश्व् मिळालं होतं. एक प्रकारचं स्वातंत्र्य, आपलं दप्तर मागे लावून वाऱ्यासोबत जोमाने पुढे जायचं, उतारावरून सुसाट जायचं, रात्रीही काही सामान लागलं तर पटकन आणून द्यायचं. तिथपासून ते आताच्या भित्र्या 'आई'पर्यंत मोठाच प्रवास घडला.आता, भित्री आई ते पुन्हा त्या मोकळ्या, मनसोक्त जगणाऱ्या मुलींपर्यंत पुन्हा कधी येते काय माहीत.  :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


        

Wednesday, April 12, 2017

बाब्या मी इंजिनियर आहे !

मुलांना आपली आई नेहमीच कमी हुशार वाटते बहुतेक, निदान बाबांपेक्षा. म्हणजे आई म्हणून तिच्या घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये तिच्या कुशलतेत कधीही संशय नसतो. पण तेच एखादे खेळणे फिक्स करायचे किंवा टीव्ही, लॅपटॉप, किचकट खेळणी अशा गोष्टींचा विषय येतो तेंव्हा मात्र बाबाच भारी असतो. आता अर्थात आमच्याकडे तसे होऊ देण्यात माझाही हात आहेच.
एकदा संध्याकाळी ऑर्डर केलेले एक खेळणे घरी आले. आता पोरांना ते लगेच सुरु करायचे होते. मी आपली जरा निवांत टीव्ही बघत बसलेले असताना ते सर्व करायची माझी इच्छा नव्हती.
मी म्हटले, "मला नाही माहित त्यात काय घालायचे आहे."
स्वनिकने लगेच खेळणे चेक करून सांगितले, "त्यात बॅटरी लागणार आहेत" आणि स्वतःच स्क्रू-ड्रायव्हर घेऊन आला आणि AA बॅटरीही. आता नाईलाजाने टिव्ही बंद करून मला ते उघडावं लागलंच. त्यात पाहिलं तर AAA बॅटरी लागणार होत्या. त्या कुठे शोधणार, मग आठवले घरात वर लावलेल्या कागदाच्या दिव्यांमध्ये आहेत. म्हटले,"त्या वरच्या दिव्यापर्यंत माझा हात पोचणार नाही, बाबा आले की बघू."
आता माझे प्रयत्न आणि उत्साह पाहून त्याला कळलेच की बाबा आल्याशिवाय हे असलं काम होणार नाही.
शेवटी बाबा आल्यावरच त्यांचं काम झालं. 
      आपापली कामं वाटून घेतल्याने बरेच वेळा मी स्वयंपाक करताना संदीप मुलांचं आवरत असतो. किंवा त्यांना खेळायला बाहेर घेऊन जातो. अशा अनेक वेळा मी जेवण बनवत असताना तोच मुलांची खेळणी जोडणे इत्यादी कामं करतो. परवा मात्र हद्दच झाली. स्वनिकला काहीतरी टिव्हीवर लावायचे होते आणि त्यात काय सूचना लिहिल्या आहेत हे मी वाचेपर्यंत तो ओरडून रिकामा,"आई, प्रेस द स्मार्ट हब बटन, सिलेक्ट वेब ब्राऊझर, सिलेक्ट वेब ब्राऊजर". त्याचं ओरडणं ऐकून शेवटी मी म्हणाले,"बाबू जरा थांब, मी इंजिनियर आहे." 
अर्थात त्याचा माझ्यावर विश्वास नव्हताच. त्यामुळे तो पुढे बोललाच,"बाबा आले की करतील, जाऊ दे". 
       तर या अशा घटनांतून एक गोष्ट मला जाणवते की घराप्रमाणे मोठ्या माणसांची कामं तशी वाटून घेतली जातात आपल्या सोयीप्रमाणे.पण त्यातून मुलांचे आपल्या आई-वडील, आजी आजोबा यांच्याबद्दल किती सहज ग्रह निर्माण होतात? मुलीला लहान असल्यापासून माहितेय की (कुठलीच)आजी दुचाकी गाडी चालवत नाही, फक्त आजोबा चालवतात. तिचा तो ग्रह दूर करण्यासाठी एक आजी दाखवाव्या लागल्या मला पुण्यात. :) एकदा असेही झाले की मुलाना वाटत होते बाबांना जेवण बनवताच येत नाही. खरंतर, आम्ही दोघे असताना अनेकवेळा त्याने बनवलेही आहे पण आता कामाच्या वाटणीत स्वयंपाक करणे(भाजी फोडणी टाकणे आणि पोळ्या) माझ्याकडे असल्याने त्यांचा तसा ग्रह होणे स्वाभाविक आहे. तर मग त्यानंतर अनेकवेळा सॅन्डविच, सॅलड किंवा अंडाकरी असे ठराविक पदार्थ असले की संदीप करतो(मला काय तेव्हढेच बरे आहे!) आणि मुलेही त्याला मदत करतात. 
       माझ्यासारख्या अनेक स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. पण त्यातील किती जणींच्या मुलांना माहित असते की आपली आई काय करते? तिचं शिक्षण काय आहे? तिचे कलागुण काय आहेत? आमच्या मुलांना माहित आहे की मी लिहिते, चित्रं काढते, (त्यांच्यादृष्टीने) चांगला स्वयंपाकही करते. पण त्यापलीकडे बाहेरच्या जगात काय काम करते, कुणाशी बोलते, माझ्या कामामुळे लोकांना कसा फायदा होतो किंवा त्यांचे कुठले काम होते, हे सहज समजेल अशा भाषेत का होईना मुलांना सांगितले पाहिजे असं मला वाटत आहे सध्या. तसं मी सुरुही केलं होतं. अशी माहिती असल्याने मुलांच्या आपल्याकडे पाहण्याच्या दृष्टीत नक्की फरक पडेल. 
      बरं, नुसती आपल्या कामाची कल्पना देऊन उपयोग नाही. तर आपल्या घरातील कामांची अदलाबदलही करून पाहिली पाहिजे. म्हणजे, कधी गाडी चालवून कुठे जायचे असताना नवरा शेजारी आहे आणि मी गाडी चालवतेय किंवा तो जेवण बनवत आहे आणि मी त्यांचे ट्रेन ट्रॅक लावत आहे( हे अवघड आहे कारण ट्रेन ट्रॅक नवऱ्यालाच जास्त आवडतात पण आपलं उदाहरण) किंवा एखादी छोटी गोष्ट दुरुस्त करणे इत्यादी.  यामुळे मुलांच्या मनातील आई किंवा बाबा म्हणून एक जी प्रतिमा निर्माण होत असते लहान वयात त्यात आपण त्यांचे सर्व पैलू दाखवणं गरजेचं आहे असं वाटू लागलं आहे. 
      मागच्या आठवड्यात मी जेवण बनवत असताना मुलं आणि नवऱ्याने एक खेळणं जोडलं. माझ्या पोळ्या चालू असल्याने मी काही गेले नाही. थोड्या वेळाने त्या खोलीत गेल्यावर स्वनिकने मला दाखवलं आणि विचारलं,"तुला माहितेय का ही ट्रेन कशी चालते?". म्हटलं,"हो, ते ट्रॅक मॅग्नेटिक आहेत." माझं उत्तर ऐकून बराच वेळ आ वासून उभा राहिला, मग मी मोठ्याने म्हणाले,"बाब्या मी इंजिनियर आहे !". :) प्रत्येक आईने काही इंजिनियर असायची गरज नाही पण आपले सर्व गुण मुलांसमोर नक्की आणले पाहिजेत. काय वाटतं तुम्हाला? :) 

विद्या भुतकर.  
   

Monday, April 10, 2017

स्वर्गसुख

       सुट्टीच्या दिवशी सकाळ सकाळी ऊन घरात आलं. अजूनही थंडी होतीच तशी. उठून उत्साहाने मस्त झाडून घर साफसूफ केलं. सगळ्यांची तब्येत जरा नाजूकच होती. मग गरम गरम मुगाच्या डाळीची साधी खिचडी बनवली. तूप आणि शेंगदाण्याच्या चटणी सोबत परत परत घेऊन, पोटभरून खाल्ली. आणि सकाळी आवरलेल्या गादीवर,अंगावर पांघरूण घेऊन, बाहेरून येणाऱ्या उन्हाला पडद्यांनी अडवत, आडवी झाले . भरलेल्या पोटाने, डोळे जड झाले. उघडायचं म्हंटलं तरी पापण्यांवर मणामणाचे दगड बसले होते.
        कधीतरी कुठल्यातरी क्षणी झोप लागून गेली. जाग आली तेंव्हा ३ तास उलटून गेले होते. पोरांनी एकदाही उठवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी काय केलं हेही माहीत नाही. उन्हं उतरतीला आली होती. आळस द्यावा तितका कमीच. उठल्यावर एकदम अनेक वर्षांनी अशी मस्त झोप झाल्यासारखं वाटलं. गरम गरम चहा घेतला आणि जागी झाले.
        खरंच, स्वर्गसुख यापेक्षा अजून काय असतं?

विद्या भुतकर.

Thursday, April 06, 2017

अविस्मरणीय प्रसंग

कधी कधी एकदम साधेच पण अविस्मरणीय प्रसंग घडतात. आज असाच एक किस्सा पुन्हा डोक्यात आला, साधारण तीनेक वर्षांपूर्वी घडलेला. 
     रात्रीचे अकरा वाजलेले, रविवारी रात्री आम्ही पुण्यात वारजे पुलाखालून सर्व्हिस रोडने घराकडे येत होतो. रस्ता तसा बऱ्यापैकी सुनसान झालेला. मुलंही पेंगुळलेली. त्यात पाऊस जोरदार चालू होता, नेहमीपेक्षा जरा जास्तच. सर्व्हिस रोड तेव्हा छोटाच होता. आता थोडा वाढवलेला आहे. तर त्या रस्त्यावरून गाड्याच पाण्यातून इतक्या वेगाने जातात. तिथे चालायचे म्हणजे तारांबळच. अशातच आम्हाला एक वयस्कर जोडपे त्या रस्त्यावरून चालत जाताना दिसले. काकांच्या हातात बॅग आणि काकूंची पर्स असेल. दोघेही छत्री घेऊन कसेबसे पाण्यातून वाट काढत चालले होते. 
       त्या पुलापासूनच्या सर्व्हिस रोड पासून जवळच्या सोसायटींमध्ये जायला रिक्षावाले नाही म्हणतातच. हो म्हणाले तर एक-दोन किलोमीटर साठी खूप पैसे मागतात. त्यात असे सामान घेऊन असले लोक तर परगावचे आहेत ओळखून अजून जास्त. हे आम्हाला माहित होतेच. आता या दोघांकडे लक्ष जाण्याचे कारण म्हणजे, त्यांच्याकडे, त्यांच्या पेहरावाकडे पाहून एकदम संदीपचे आई-बाबा, म्हणजे माझे सासू सासरे वाटावे इतके साम्य होते. त्यांच्या वयात, कपड्यात, इ. मुख्य म्हणजे तेही असेच गावाहून येताना उतरले की रिक्षा करणार नाहीत. बसची वाट बघतात, तिथून स्टॉप पासून चालत येतात. त्यामुळे या दोघांना बघून आम्हाला कळले की हेही असेच रिक्षाला नाही म्हणून चालत आले असणार. 
      आम्ही त्यांचा विचार करत त्यांना क्रॉस केले. त्यांच्या बद्दल बोलतच 'थांबवूया का?' असा विचार करून लगेचच गाडी थांबवली. मागे येऊन त्यांना विचारले,'तुम्हाला कुठे जायचे आहे? सोडतो म्हणून'. तर काका म्हणाले,'अरे नाही तुमची गाडी ओली होईल'. आजही ते वाक्य आठवलं की खूप विचित्र वाटतं. माणसे इतकी साधीही असू शकतात? म्हटले,'असू द्या हो काका'. मग मी काकांना कारमध्ये पुढच्या सीटवर बसवून मागे आले. मागच्या सीटवर मुलांच्या कारसीट लावलेल्या होत्या. त्यामुळे मागे ३ च लोकांना बसता येत होते. मुलाला मांडीवर घेऊन मीच त्याच्या कारसीट मध्ये बसले. म्हटलं, ५-१० मिनिटांचा तर प्रश्न आहे. त्यांना जिथे जायचे ती सोसायटी घरापासून ५ मिनिटेच पुढे होती. त्यांना सोडून मागे यायचे म्हटले तर त्यांना तेही वाईट वाटत होते की आम्हाला मागे फिरून यावे लागेल. काय लोक असतात ना? 
     आत बसल्यावर आम्हाला वाटले तेच त्यांनी सांगितले, रिक्षावाले कसे नाटक करतात, यायला तयार होत नाहीत,इ. त्यांच्या बोलण्यावरून शंका आली म्हणून विचारले तर ते धुळ्याचे होते, म्हणजे संदीपला अजून जवळचे. त्याने त्यांना विचारले नाव काय? त्यांनी आडनाव सांगितले तर, तो म्हणाला, याच आडनावाचा माझा एक मित्र होता कॉलेजला. त्याचं नाव त्याने सांगितलं तर कळलं, ते त्या मित्राचेच आई-वडील होते... काय योगायोग ना? आता कॉलजला परगावी असल्यावर प्रत्येकाचे आई-वडील माहीत असतातच असं नाही. त्यामुळे ते ओळखीचे नसणे शक्य होतं. पण ते असे या पद्धतीने भेटणं? योगायोगच होता तो. त्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये सोडलं तर म्हणाले मुलगा अमेरिकेतच असतो, आम्ही राहतो इथे कधी कधी या सोसायटीमध्ये. 
       त्यांना सोडून परत येताना विचार करत होतो, पैसे हा प्रश्न नसतोच मुळी. मुलगा, ते सुस्थितीत असूनही  कुणीतरी ज्यादा पैसे रिक्षासाठी घेत आहे ते त्यांना पटत नव्हतं. त्यासाठी मग पावसात भिजत यायला लागलं तरी चालेल. तसेच माझ्या घरी, संदीपच्या घरी छोटया छोट्या गोष्टींवरून ही अशी तत्त्वं पाहिली आहेत. वाटले, या अशा छोट्या छोट्या कितीतरी गोष्टी त्यांच्या पिढीच्या पुढे पास होतील का? आपण हे रिक्षाचे दर पटत नाही म्हणून भिजत चालत येऊ का? आणि दुसरं म्हणजे, आपल्या पिढीला आई-वडिलांनी शिकवलं म्हणून त्यादिवशी त्या काका काकूंना विचारण्यासाठी थांबलो, गाडीत घेऊन आलो. त्यामुळेच आपल्या मित्राच्या आई-बाबांना मदत केल्याचं समाधान लाभलं. यापुढच्या पिढीकडे ते गुण येतील का? 

खरंच काही किस्से असे अविस्मरणीय असतात. :) 

विद्या भुतकर.

माझा लेख लोकमतच्या ऑनलाईन ऑक्सिजन पुरवणीमध्ये

माझा लेख लोकमतच्या ऑनलाईन ऑक्सिजन पुरवणीमध्ये. इथे जरूर वाचा. :) जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचणे, आपले अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि लोकांना पळण्यासाठी, व्यायामासाठी प्रोत्साहित करणे हे सर्वच एका पोस्टने होते. :)
 इथे पेजवरच्या वाचकांच्या प्रोत्साहनामुळेच मला नेहमी विश्वास येतो सतत लिहिण्याचा. तुमच्या नियमित प्रोत्साहनासाठी  धन्यवाद.
विद्या भुतकर.

http://www.lokmat.com/storypage.php?catid=31&newsid=4918

Monday, April 03, 2017

ओल्या हरभऱ्याची भाजी

         काही दिवसांपूर्वी 'स्वप्नाळू' नावाच्या कथेमध्ये या भाजीचा उल्लेख केला होता आणि काही प्रतिक्रिया आल्या की या भाजीची पाककृती नक्की सांगा. खरंतर मलाच ती भाजी इतकी आवडते आणि गेल्या अनेक वर्षात ती खाल्ली नाहीये त्यामुळे मलाही ती बनवायची संधीच होती. अनेक ठिकाणी ओला हरभरा शोधला पण इथे जे मिळतात ते डहाळे अगदीच दिसायला मोठे असले तरी आत बरेच छोटे दाणे होते. आणि तसे महागही. मागच्या आठवड्यात एक दिवस थोडे ओले हरभरे आणून आज सोलून त्याची भाजी करायचे ठरवले. अगदीच कमीदाणे निघाले. तसे झाले तर पर्याय म्हणून मी फ्रोजन सेक्शनमधून एक पिशवीही घेतली होतीच. नाईलाजाने तीच वापरावी लागली. कारण बरेचसे दाणे मुलीने सोलताना आणि भाजल्यावर खाऊन टाकले. :) असो. तर ही भाजी लहान असताना थंडीत खायचो. खूप म्हणता येणार नाही. कारण बरेचदा आईने हरभरा आणला तरी सोलून भाजी करण्याइतपत दाणे शिल्लक राहायचेच नाहीत. त्यातून ठरवून ठेवून भाजी करण्याचे प्रसंग तसे कमीच आहे. पण माझी ही आवडती भाजी आहे. :)

साहित्य: 
ओले हरभऱ्याचे दाणे साधारण २ वाट्या ,
जिरे, मोहरी, तेल, हळद, हिंग
लसूण पाकळ्या ३-४,
एक कांदा,
कांदा-लसूण मसाला २-३ चमचे( मसाला नसेल तर लाल तिखट, धने जिरे पूड आणि गरम मसाला)
शेंगदाण्याचा भरडलेला कूट(एकदम बारीक पेस्ट नको)
मीठ, साखर चवीनुसार

कृती:
     हरभऱ्याचे दाणे एका पॅनमध्ये मध्यम आचेवर भाजून घेतले. त्यात थोडा जास्त वेळ गेलामाझ्या इंडक्शन स्टोव्हमुळे. सहसा १०-१५ मिनिट भाजावे. दाण्यांवर काळपट डाग दिसू लागतात. माझे फ्रोजन दाणे मुळातच काळे होते त्यामुळे ते अजून काळपट दिसू लागले. दोन्ही दाण्यांचे फोटो दिले आहेत खाली.
भाजलेले हरभरे थोडे थंड करून खलबत्त्यात ठेचून घ्यावेत. माझ्याकडे खलबत्ता वापरात नसल्याने मी मिक्सरमध्येच २-३ पल्समध्ये फिरवून बंद केले.
पॅनमध्ये तेल तापल्यावर जिरे, मोहरी हिंग घातले. त्यात लसूण खरपूस भाजून घ्यायचा.
मग कांदा परतून तो भाजल्यावर त्यात हळद, धनेजिरे पूड, तिखट किंवा कांदा-लसूण मसाला घालायचा.
तिखट परतल्यावर लगेच त्यात भरडलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा. आमच्याकडे कूट जरा सढळ हातानेच पडतो.
कूट परतताना तो जळू नये याची काळजी घ्यावी.
त्यात ४ काप पाणी घालून उकळावे. पाणी उकळत असतानाच त्यात मीठ साखर घालून हलवावे.
भाजीतले पाणी उकळले की शेवटी भरडलेले हरभऱ्याचे दाणे घालावे.
भाजी झाकण बंद करून थोडा वेळ आणि पाणी जास्त झाले असल्यास उघडून शिजू द्यावी. दाणे हिरवे असल्यावर शिवाय आधी भाजून घेतल्याने भाजी लवकर शिजते. फोडणी ते भाजी साधारण २०-२५ मिनिटात होते. भाजीत थोडे पाणी राहू द्यावे, एकदम पातळही नको. रसरशीत भाजी चांगली लागते. थोडे तेल जास्त असेल तर अजून छान कट येतो. पण तो नसला तरी चवीत फरक पडत नाही.

मी भाकरी, पीठ-कूट घातलेली मेथीची भाजी आणि भाकरी केली होती. एकदम मस्त झाली. :) तुम्हीही करून बघा.
विद्या भुतकर.

Sunday, April 02, 2017

मंडला(मंडळं) डिसाईन

       मला एक गोष्ट लक्षात आलीय, बोलायला पैसे पडत नाहीत. अर्थात आधी एकदा म्हटलं होतं तसं माझ्या नोकरीत बोलायचेच पैसे मिळतात. पण अनेकवेळा अनेक मैत्रिणींशी अशाच गप्पा मारताना काहीतरी कल्पना सुचतात, कुणी त्यांना काय करायचं आहे हे सांगतं, मग मीही चार थापा मारून घेते. त्यातला आवडता विषय म्हणजे इंटेरीयर डिसाईन, चित्रकला, इ. त्यातल्या त्यात लोकांना घरात बदल सुचवताना मला तर अजिबातच पैसे पडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या एखाद्या भिंतीवर काय चांगलं दिसेल किंवा कसा सोफा योग्य असेल असे अनेक सल्ले मी वरचेवर देत असते. तर हे असंच एक दिवस गप्पा मारताना एका मैत्रिणीने मला सांगितलं की तिला कॅनव्हासवर चित्र काढून ते तिच्या हॉलमध्ये लावायचे आहेत. त्यासाठी तिने 'Mandala designs' चा विचार केला आहे. 
       आता असे काही नवीन शब्द माझ्यासमोर बोलले की मी लगेच सुरूच झाले, ते काय असतं, कसे काढतात, कसे दिसतात, इ. इ. तिने मग मला गुगलून काही चित्रं दाखवली. ते पाहून म्हटलं, हात्तेच्या हे तर आम्ही शाळेत चित्रकलेला ही काढायचो. वर्तुळात रिपीट केलेले आकार आणि तेही एकदम एकसमान. शाळेत ती वर्तुळ काढून एकसारखे आकार काढून चित्र पूर्ण करायचा बराच उत्साह होता. त्या मैत्रिणीने दाखवलेले बरेच कॅनवास सोपे वाटले. त्यातच मेहेंदीचे डिसाईनही होते. पिंटरेस्ट वर बरेच प्रकार पाहिले. एकदा का हे असं खूप डोक्यात घुसलं की मग ते पूर्ण केल्याशिवाय राहवत नाही. 
        सुरुवातीला प्रयोग म्हणून मी ८ बाय १० च्या छोट्या कॅनव्हासवर हे काढून पाहिले. जितकं सोपं ते वाटत होतं अर्थात ते तितकं सोपं नव्हतंच. एकतर वर्तुळं काढायला घरात काही साहित्य नव्हतं. मग वेगवेगळ्या आकाराचे वाट्या, ग्लास, प्लेट घेऊन पेन्सिलने वर्तुळं आधी काढून घेतले आणि त्यावर कॅनवास रंगल्यावर पुसलेही गेले. :( मग परत वर्तुळं काढली. ब्रशने बारीक बारीक एकसारखे आकार काढताना जरा डोळ्याला ताण पडला. कदाचित मी चित्रकार वगैरे नसल्याने असेल. बाकी पहिलं बरंच एकसारखं छान आलं. 
        म्हणून अजून एक प्रयोग म्हणून त्यात मेहेंदीचे डिसाईन काढून पाहिले. मला काळ्या रंगावर सोनेरी काहीतरी काढून बघायचं होतं. माझ्या एक लक्षात आलं की काळ्या रंगावर सोनेरी कलाकुसर कितीही छान दिसेल असं वाटलं तरी काळ्या रंगावर कुठलेही रंग उठून दिसायला ते परत परत गिरवून काढायला लागले. त्यामानाने सोनेरी रंगावर निळा जास्त सोपा गेला होता. दोनीही ठिकाणी मी ऍक्रिलिक रंग वापरले आहेत. ऑफसेण्टर डिसाईनसाठी आता मोठे कॅनवास घेऊन एका टाईपचे २ किंवा ३ बनवून हॉलमध्ये ठेवता येतील असा विचार आहे. ते प्रत्यक्षात कधी होईल माहित नाही. तोवर हे केलेल्या दोन कॅनव्हासचे फोटो. तुम्हीही हे प्रयोग केले असतील तर नक्की सांगा. https://en.wikipedia.org/wiki/Mandala ही विकीची लिंक अधिक माहितीसाठी.
       सहज मैत्रिणीशी बोलता बोलता असं काहीतरी माहित झालं आणि प्रयोग करून बघता आलं याचा फार आनंद वाटला. असेच कधीतरी मैत्रिणीने बोलता बोलता दिवाळीच्या मातीचे दिवे रंगविण्याबद्दल सांगितलं आणि ते ही प्रकरण बरंच पुढे गेलं होतं. तेव्हपासून मला कळलं आहे की हे अशा गोष्टीत जितकी माहित मिळेल तितकी कमीच असते. त्यातून पुढं काय शिकता येईल नेम नाही.


विद्या भुतकर.