Wednesday, July 17, 2013

झिम्मा- आठवणींचा गोफ

         आज रिक्षातून जाताना खूप रिकामं वाटत होतं. इतक्या दिवसांचा माझा आणि त्या पुस्तकाचा प्रवास संपला म्हणून. हे असं वाटणं म्हणजेच पुस्तक आवडलं बहुदा.   'झिम्मा' वाचायला घेतलं ते मुळात त्याबद्दलचे दोन रिव्ह्यू वाचल्यामुळे.
विजया मेहता यांनी त्यांच्या मराठी रंगभूमी, सिनेमा, टीव्ही अशा वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या कारकिर्दीचे त्यांच्या शब्दातील वर्णन. आत्मचरित्र म्हणता येईल पण त्यापेक्षा त्यांच्या रंगभूमीवरच्या अनुभवांची साठवण म्हणणं जास्त योग्य होईल. 
          सर्वात आधी सांगायचं म्हणजे माझी अजिबात लायकी नाही या पुस्तकाबद्दल, किंवा अशा मोठ्या व्यक्तीच्या एव्हढ्या मोठ्या कारकिर्दीबद्दल लिहिण्याची किंवा बोलण्याची. पण एक वाचक म्हणून काय वाटलं ते लिहिण्याचा प्रयत्न करतेय. तोही नीट जमत नाहीये, तर एव्हढं मोठं पुस्तक लिहिण्यात किती वेळ, विचार, उर्जा, लागली असेल याची कल्पनाच नको. गेल्या कित्येक वर्षातलं माझं वाचायाला घेतलेलं पहिलं मराठी पुस्तक. रोज दुपारी घरी जाताना रिक्षात २५ -३० मिनिटांचा वेळ तोच काय तो माझा. मग त्यात हे असं मोठं पुस्तक (४५०) वाचून होणार का अशी शंका आलीच मनात पण पुस्तकाने शेवटपर्यंत मला बांधून ठेवले. अर्थात त्यातले प्रसंग/वर्णनही एखादा सोडला तर उद्या वाचला तरी चालेल असा असल्याने ते फक्त रिक्षातच वाचलं गेलं. वेड्यासारखं वाचत सुटून संपवून टाकावं असं झालं नाही. (हे माझं मत. बाकी लोकांचं मत वेगळं असू शकतं असा डिस्क्लेमर आधीच दिलेला बरा.)
         तर  झिम्मा चार वेगवेगळ्या व्यक्तींच्या रुपात भेटतं. बेबी जयवंत, विजू जयवंत , विजया खोटे आणि विजया मेहेता.  सुरुवातीला ते लक्षात राहतं पण जसे जसे कामाचा आवाका आणि कारकीर्द वाढत जाते तसे या रेषा पुसट होत जातात. पहिल्या तिन्ही आयुष्यांबद्दल स्वत:ला तिसऱ्या ठिकाणी ठेवून स्वत:च्या आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोण मला थोडा खटकला. कदाचित वयाच्या सत्तरीनंतर तो दृष्टीकोण येतही असेल, मला तो उगाच परका वाटला. सुरुवातीची बेबी जयवंत वाचताना तो जास्त खटकला. त्याच सोबत बेबी जयवंत बद्दल पडलेला प्रश्न म्हणजे वयाच्या सत्तरीनंतर पाचव्या वर्षी काय केलं हे आठवू शकतं? की भासच ते? नंतर त्याच्या पलीकडे जाउन वाचायला सुरुवात केली. बेबीच्या आयुष्यातील दोन गोष्टी लक्षात राहिल्या.  त्या काळातील एकत्र कुटुंबामुळे बेबीच्या मावशीला जसे जयवंत कुटुंबाने जसे आपले केले तसे एखाद्या अनाथाला आजच्या चौकोनी घरात जागा मिळेल? हा प्रश्न. आणि त्यांनी केलेले कोकणातील त्या काळचे वर्णन. त्या काळातील समाजाची थोडीफार कल्पना ते वाचताना येते. त्याच्याशी एकदम विरोधी मुंबईतील वातावरण. तेव्हाही किती पुढारलेली होती मुंबई हे वाटल्याशिवाय राहत नाही.
         विजू जयवंत बद्दल वाचताना फार आश्चर्य वाटलं मला. ८०-९० च्या दशकात एका मुलगी म्हणून मलाही काही बंधनं पाळावी लागली. जरा जास्त कॉलेजच्या गप्पा आईला सांगितल्या की 'हेच करता का तिकडे?' असे टोमणेही ऐकायला लागले. तर मग ५० च्या दशकात नाटकांत भाग घेण्यासाठी परवानगी देणाऱ्या त्यांच्या भावाचे आणि आईचेही कौतुक वाटले. तेव्हा झालेल्या थोड्याफार विरोधाचे संदर्भ येतात अधे मध्ये, पण कडकडून निषेध, विरोध हे कुठे दिसले नाहीत. त्याचवेळेस, इतकी सवलत मिळाल्यानंतर एवढ्या मोठ्या वर्तुळात आत्मविश्वासाने वागणाऱ्या तरीही वाहवत न गेलेल्या विजू जयवंत चे जास्त कौतुक वाटले.
         हरीन खोटेशी ओळख, लग्न हे सर्व उत्सुकतेने वाचलं. लोकांच्या पर्सनल आयुष्यात पाहण्याची काय उत्सुकता असते काय माहीत? विजू खोटे होऊन जमशेदपूरला गेल्यावर मलाच टेन्शन. तिथे एक छोटासा का होईना नाटकाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न वाचून वाटले की खरंच इच्छा असेल तर माणूस काही ना काही करतोच. But she was not meant for it. पुढे बायकोच्या करियरसाठी दोघांनी थोडे दिवस का होईना जमवून घेणे, वेगळे राहणे, हे वाचून वाटले मग आज काल टीव्ही वर दिसतात ते लोक कुठल्या जगात वावरत असतात? आपण तेव्हा जर इतके पुढारलेले होतो तर आज नाहीये का? या सर्व व्यक्तिगत आयुष्यातल्या गोष्टींबद्दल लिहिण्याचं कारण म्हणजे ते पुस्तक वाचताना एक स्त्री म्हणून माझी स्वत:शी, तेव्हाच्या-आताच्या समाजाची तुलना होत होती. हळूहळू त्यांच्या मराठी रंगभूमी वरच्या कार्याला वेग येऊ लागतो आणि ते वाचताना आपणही त्या नाटकाचा, नेपथ्याचा, त्यांच्या अभ्यासाचा एक भाग बनून जातो. 'रंगायन' सारखी इतका विचार करून बनवलेली संस्था,  त्याच्यामागचे विचारमंथन, लेखक, त्यांच्याशी झालेल्या चर्चा, एक संस्था म्हणून कार्यरत झाल्यावर आलेल्या अडचणी, त्याना मदत करणारी मंडळी हे वाचून आपल्याला किती उत्कृष्ठ इतिहास लाभलाय याचा अभिमान वाटतो.            
        पुढे विजू खोटे, विजया मेहेता कशा झाल्या याचा एका ठिकाणी संदर्भ येतो.  तोवर पुस्तकात खऱ्या अर्थाने रंगभूमीवरच्या कार्याला वेग आलेला दिसतो. त्यांचे पूर्व जर्मनीतील नाटकांचे प्रयोग, त्या मध्ये भेटलेले वेगवेगळे लोक, त्यांनी युरोपमध्ये केलेला अभ्यास, हे सर्व स्वप्नवतच. एक मराठी स्त्री चांगली नायिका म्हणून चित्रपटात काम करू शकत असताना, दिग्दर्शनात तेही मराठी रंगभूमीवर कशी पडू शकते हे फक्त त्यांनाच माहीत. त्यासाठी लागणारी दृष्टी, एक पूर्ण संकल्पना उभी करण्याचे सामर्थ्य, लोकांशी/ लेखकांशी, संगीतकारांशी , नेपथ्यकारांशी  चर्चा हे सर्व कसे केले असेल?  हे सर्व फक्त प्रायोगिक नाही तर लोकमान्य रंगभूमीवरही ! एखादी व्यक्ती रोज त्याच उत्साहाने ५० वर्षे काम करू शकते?नाटकातून मराठी सिनेमाकडे जाताना त्यांना आलेले अनुभव, नाटकाचेच सिनेमात रुपांतर केल्यावर त्यात करावे लागलेले बदल, मराठीतून हिंदी सिरियल, शोर्ट फिल्म्स, तिथून पुढे हिंदी चित्रपट, त्यांना मिळालेले पुरस्कार हे वाचायलाही आवडलं. बंगाली, मल्याळी नाटकातून कलातून त्यांना मिळालेले संदर्भ, इंग्रजी नाटकांची भाषांतरित नाटकं, त्याचं भारतीयकरण करण्यासाठी केलेला विचार,एखादी कलाकृती किंवा भूमिका करताना त्यात एकजीव 
होण्यासाठी लागलेले प्रयत्न खूप वाचनीय. पुस्तक संपताना उगाच उदास वाटायला लागलं हे सर्व थांबलं आणि आपण त्यातलं एकही नाटक पाहिलंही नाही म्हणून.     
         आयुष्यात दोनच आत्मचरित्र वाचली, हे त्यातलं एक. शाळेत असताना क्रिकेटच खूप वेड  लागलं आणि मग जे दिसेल, मिळेल  ते वाचत सुटले. त्यात एक म्हणजे डॉन ब्रॅडमन यांच्या काराकीर्दीवरील मराठी पुस्तक. (ते शाळेच्या लायब्ररीत काय करत होतं हा मोठा प्रश्नच आहे.) ते वाचायला घेताना खूप उत्साह होता. हळूहळू मात्र त्यातील वाचण्याची मजा गेली आणि राहिले ते फक्त आकडे. त्यांनी कुठे किती रन काढल्या, त्यात कसे आउट झाले, इ.इ. (उद्या सचिनने पुस्तक काढलं तर ब्रॅडमन सारखं काढू नये हे नक्की.) तर झिम्मा बद्दलही असंच काहीसं झालंय. म्हणजे बेसिकली विजयाबाईंच्या इतक्या अवाढव्य कारकिर्दीची तुलना मग ब्रॅडमन किंवा सचिनच्या कार्कीर्दीशीच होतेय. पण तरीही हे सर्व प्रत्यक्षात पाहिलं असतं तर सचिनला पहिल्यासारखा आनंद वाटला असता. पण आता सध्या ब्रॅडमन वाचल्यासारखे थोडे थोडे वाटत आहे. मराठी रंगभूमीच्या एव्हढ्या मोठ्या इतिहासाला आपण मुकलो, तरी तो वाचायला चुकलो नाही याचा आनंद आहेच. 
 
-विद्या. 

Thursday, July 04, 2013

अस्वस्थ

          गेले कित्येक दिवस हात शिवशिवत आहेत काहीतरी लिहायला पण विचारांची इतकी सरमिसळ होती की एक असं ठाम पोस्ट लिहिता येत नव्हतं. अर्थात लिहायची इच्छा होण्याचं कारण म्हणजे पाऊस !अगदी जूनच्या तिसऱ्या दिवशीच टपकला आणि एकदम रडू दाटून आलं. शिकागोमध्ये पडणाऱ्या पावसात ती ओढ नव्हती. (कदाचित तिथल्या हिमवर्षावात असेल ? ) पण पाऊस पडला आणि लोकांची फेसबुक वर गर्दी झाली स्टेटस अपडेट करण्यासाठी. कुणीतरी लिहिलंही की 'इतकाही पाऊस नाही पडला जितके स्टेटस अपडेट झालेत.'
हळूहळू मग लिहिण्याचे विचारही मागे पडत गेले. पण रोज घरातून निघताना, घरी जाताना, कपडे वाळत घालताना, मुलांना खेळायला नेताना दिसतच होता पाऊस आणि प्रत्येकवेळी अस्वस्थ व्हायचं. कशामुळे माहित नाही. ते टाळायला काय करायला हवं हे ही  माहित नाही. 
         शाळेत, १० -१२ वी पर्यंत असंच व्हायचं मला मावळत्या सूर्याकडे पाहताना. त्यातले रंग इतके अदभूत, सुंदर असायचे की वाटायचं मला का नाही हे असं चित्र रंगवता येत? इतके सारे रंग इतक्या सहजतेने एकत्र कसे आणता येत असतील? म्हणजे गडद गुलाबी आणि निळा, हळूहळू एकमेकांत असे मिसळून जातात की  त्यांना जोडणारी रेघ कुठेच दिसत नाही. खूप वाईट वाटायचं मला की देवाने मला ही कला दिली नाही म्हणून.  चित्रकार असते तर किती छान झाले असते. भरभर उतरवले असते ते सर्व रंग कागदवर.१२ वी नंतर कोरेगांव सुटलं आणि ते रंगही. पण ते तसेच राहिले माझ्या मनात आणि अजूनही असे कधीतरी ते आठवतात, कोरेगावच्या रस्त्यावरून जातानाचे ते मावळतीचे रंग. 
         कॉलेजमध्ये गेल्यावर एक वेगळाच अस्वस्थपणा यायचा. तो म्हणजे शब्दांचा. ते वयच तसं होतं. प्रेमात पडण्याचं. आता वाटत ते कुणातरी व्यक्तीपेक्षा प्रेमात पडण्याच्या कल्पनेवरचं प्रेम असावं. उगाचच एका व्यक्तीचा ध्यास घ्यायचा आणि मग दिवसभर तिचाच विचार करत बसायचं. दिवास्वप्नं बघत, कॉलेजच्या व्हरांड्यात त्याला/तिला शोधत, तासाला लक्ष न देत मनाला विरंगुळा म्हणून त्याला आठवत बसायचं . तेव्हा पहिल्यांदा जगजीत आणि चित्राची एक कसेट हातात पडली होती. ती ऐकताना अस्वस्थ व्हायला होई. कुठून आणतात हे असे शब्द, त्यांचे अर्थ, आणि बरोबर कसे लागतात काळजात आपल्या? त्या शब्दांसमोर माझे साधे मराठी शब्द फार तोकडे वाटायचे, अजूनही वाटतात. का नाही माझ्याकडे ती प्रतिभा ते कविमन, ते शब्द, त्या कल्पना?
        अर्थात लिहिण्याबद्दल अजूनही एक गोष्ट जाणवते. प्रेम करण्याच्या काळात/ वयात सुचलेले थोडेफार जे शब्द होते तेही रोजच्या संसारात विसरून/विरून गेले. पण या कवी लोकांचं नाही होत असं? किती वर्षं गुलजार प्रेमावर कविता लिहू शकतात? 'आ निंद का सौदा करे, एक ख्वाब दे, एक ख्वाब दे'. त्यांच्या मनात कसं हे प्रेम अजून तग धरून बसलंय? त्यांना नाहीये का संसार, मुलं-बाळ? आणि समजा व्यवसाय म्हणूनच करायचा तरीही त्यात विविधता येण्यासाठी तरी कुठून आणतात ते सर्व शब्द, कल्पना ?   गाण्यांच्या बाबतीतही तसंच. अगदी लता-आशा ताईंचा आवाज असो रफी किंवा किशोर कुमार असो आणि अगदी परवाच ऐकलेल्या आशिकी-२ मधल्या अरजित सिंग चा असो. कधी कधी मनात ना मी खूप सही गाणं म्हणत असते. पण तोंड उघडलं की बिघडलं. मला नक्की माहित असतं की या गाण्यात या शब्दाला असं नाजूक वळण आहे, इथे आवाज असा चढतो, वगैरे. पण ओठ उघडले आणि आवाज ऐकला स्वत:चा की थिटेपणा जाणवतो. मग तसंच मनातल्या मनात गाणं म्हणायचं आणि गप्प बसायचं.
         तर हे असं अस्वस्थ होणं नेहमीचंच पण पाऊस असला की अजून त्रास. लोकांच्या अनेक ब्लॉग, पुस्तकं वाचतानाही जाणवतं की कितीतरी प्रकारे कितीतरी विषयांवर कितीतरी उत्तम लिहिलं जाऊ शकतं. त्यात माझे पावसावरचे पोस्ट साधेच असणार आणि असे वेगळे तरी काय असणार? म्हणजे वारजे पुलापर्यंत २ किमी चालत येताना मला लिहावंसं वाटत होतं माझ्या होणाऱ्या धावपळीबद्दल. एक तर छत्री नाही. त्यात भली मोठी पर्स घेऊन नवी कोरी काळी प्यांट घालून मी पाण्यातून चालले होते. मागून स्कुल बस जोरदार येत होत्या.  आवाज आला की पळा डावीकडे. शेवटी उजवीकडूनच चालत राहिले. समोरून कुणी जोरात येताना दिसला की आधीच हात करून हळू म्हणून सांगायचे. एकजण तरी गेलाच उडवत शिंतोडे. मग १ मिनिट त्याला शिव्या देण्यासाठी तोंड फिरवून, मान वळवून बोलण्यात गेला. माझा जोश पाहून मागचा आधीच स्लो झाला. :)  मध्येच उडी मारून एखादा खळगा चुकवून २०  मिनिटात कशी बशी बस स्टोप वर पोचले. रिक्षा मिळत नव्हतीच. शेवटी बसनेच जावं म्हटलं.
        तिथे बायका साड्या पकडून उडणाऱ्या शिंतोड्याची पर्वा न करता वाकून आपली बस येतेय का बघत होत्या. शाळेला जाणारी मुलं उभी होती. त्यात छोट्या बहिणीला सांभाळत चढवून बसवणारी एक मुलगीही. कसं ना लहानपणीच आई-पण येतं? तेव्हढ्यात एकजण बाइक वरून आला. त्याचा झोपाळलेला चेहरा, विस्कटलेले केस आणि दिसेल ते घातलेले कपडे. त्याच्यामागून बायको उतरली त्याची. बायकोच असावी. तिच्यासाठी थांबला तो बारीक पडणाऱ्या पावसात भिजत. त्याच्या त्या असं सकाळी धडपडत झोपेतून उठून येण्यात, बस जाईपर्यंत वात पाहण्यात सॉलिड प्रेम वाटत होतं मला. ती एका बसमध्ये बसली आणि तो निघाला टांग मारून. मला शिवाजीनगर बस मिळाली. बसमध्येही झिम्मा वाचत बसले. डेक्कन कॉर्नर लाच उतरून रिक्षा केली. म्हटलं कुठे चालायचं परत. रिक्षामध्ये उग्र वास उदबत्तीचा. अर्थात असे रिक्षावाले मला सिगारेटच्या वासापेक्षा कधीही चांगले वाटतात. निदान धंद्याची पूजा तरी करतात असं वाटतं. 
         पावसात असा विविध साधनांनी प्रवास करायची गेल्या १० वर्षातली पहिलीच वेळ असेल. अमेरिकेत गाडी हे केवळ नाईलाज म्हणून घेतलेलं वाहन. पण त्यातून जाताना निसर्गापासून, रोजच्या या पळापळीपासून दूर गेलेय हे जाणवलंच नाही. म्हणजे पाऊस आहे तर ज्यादा कपडे, चप्पल घेऊन जा, पावसातून भिजून आलाय म्हणून गरम गरम चहा करून द्या, कधी वडापाव तर कधी भाजलेलं कणीस. वापरायला जुने कपडे, सुकत घातलेल्या कपड्यांवर सतत लक्ष की कधी पाऊस येईल. 'जरा थोड्या वेळाने निघ, पाऊस कमी झाल्यावर',' आता कुठे पावसा पाण्याची येतेस' अशी वाक्यं. सगळं विसरले होते मी गेल्या कित्येक वर्षांत ते गेल्या एका महिन्यात अनुभवलं. पण कुठं आणि कसं मांडावं हे कळत नव्हतं म्हणून हा अस्वस्थपणा. 
आता इतक्या वर्षात इतकं तरी कळलं की या त्रासातून सुटका नाही. पण त्या-त्या क्षणाला आपल्यातला कमीपणा जाणवून लोकांची प्रतिभा दिसण्याची बुद्धी तरी मिळाली हेही नसे थोडके. :)
 
-विद्या.