Wednesday, October 31, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - २०

संत्या रात्री त्याच्या ऑफिसमध्येच झोपला. घरी जायची इच्छाच राहिली नव्हती. सकाळी जाग आली तर पाटील समोरच बसलेले होते. 
"हे हिथं यीवून झोपल्यावर वाईट वाटायला मी काय तुमची आई न्हायी. ", पाटील. 
"हे बगा पप्पा, तुम्हाला मी फायनल सांगतोय, मी अर्ज माघारी घेनार न्हाई. सरकारनं न्हाई केलं तर मीच कमी दरात बस सोडीन गावातनं. ", संत्या निकराने बोलला. 
"हे असले निर्णय घ्यायला पॅड दिलं न्हाई मी तुम्हाला.", पाटील बोलले. 
"तुमी दिलं तवा मला नको हुतं. आता मी घेतलंय तर असंच काम करनार. तुम्हाला काढून घ्यायचं तर घ्या, मी काम करायचं सोडनार न्हाई. ", संत्याने निक्षून सांगितलं होतं. पोरगं आता आपलं ऐकणार नाही हे त्यांना कळलं होतं. बन्या आत आला तसे ते बोलायचे थांबले. रोजचा रिपोर्ट घेऊन बन्या आणि पाटील निघून गेले. 
कालचं भांडण आठवून संत्याचं डोकं ठणकत होतं.  इतका मोठा आरोप तिनं केलाच कसा या विचारानं त्याचा राग वाढतंच होता. खरंच तिच्यासाठी जीव दिला तरी थेंब पण गळायचा नाही डोळ्यांतून तिच्या, असं त्याला वाटून गेलं. आजवर जे करत होतो त्याला खरंच काही अर्थ आहे का? या विचारानं तो अस्वस्थ झाला. 
दुपारी विक्याशी बोलताना त्यानं आपली खंत बोलू दाखवली, "लैच जोराचं भांडन झालं रं?". 
"व्हय, तुला इतका चिडलेला काल पयल्यांदा पाह्यला. कसला आवाज चढलेला.", विक्या अजूनही तो प्रसंग आठवत होता. 
"तुमी तरी अडवायचं मला? काय अक्कल हाय का न्हाई?", संत्या बोलला. 
"तुजं तुला तरी भान हुतं का? कुनी मधी आला तर मेलाच असता. ", विक्या. 
"हम्म काय करावं सुचंना रं. कासावीस व्हुयला लागलंय.", संत्याचा जीव तळमळत होता. 
"मरु दीना, तुला काय इतकी पडलीय पन? तू किती जीवतोड काम करतूय म्हायीत न्हाई का तिला?", विक्याला रागच येत होता तिचा. 
"चल पिक्चरला जाऊया, बास आता इचार करायचं.", विक्यानं बोलतच अम्याला फोन लावला. 

------------------------------

रविवारचा दिवस होता. उद्याच्या लेक्चरचं पुस्तक हातात धरुन सपना काहीतरी विचार करत बसली होती.  संत्याशी भांडण झाल्यापासुन तिचं हे असंच चालू होतं. काही ना काही विचार डोक्यात होतेच. नक्की काय झालं, तो काय बोलला, ती काय बोलली, याची उजळणी चालू होती. पण त्यातून तिला काय हवंय हे मात्र कळत नव्हतं. दारावरची बेल वाजली आणि ती भानावर आली. बाईंनी दार उघडलं आणि सपनाचे कान टवकारले.

"अहो, शिंदे सर आलेत", बाईंनी सरांना हाक मारली. 
सर मागून बागेतून तातडीनं घरात आले. हात धुवून त्यांनी सरांना हात जोडून नमस्कार केला.

"काय म्हणताय सर? आज सकाळ सकाळी कसं काय येणं केलं?", सरांनी पाहुण्यांना विचारलं. सोबत मनोजही होता. त्यानं सरांच्या पायाला हात लावला. सरांनीही,"आयुष्यमान भव" असा आशीर्वाद दिला आणि खुर्चीत बसले. 
"ए जरा चहा पाण्याचं बघ गं", म्हणून त्यांनी बाईंना सांगितलं. त्या आधीच तयारीला लागल्या होत्या. आज काहीतरी होणार हे त्यांना नक्की वाटलं होतं. 
सोफयावर बसल्यावर शिंदे सर बोलू लागले,"काय करनार? या पोरांच्यावर सोपवून निर्धास्त होतो. पण शेवटी आपल्यालाच कायतरी करायला लागनार असं दिसतंय. म्हणून आलो.". 
"का बरं? मी तुम्हाला फोन करुन कळवलं होतं की आमचं उत्तर.", सर बोलले. 
"होय की, मी सांगितलं तसं याला, पन तरून रक्त हाय. असं जुमानतय का?", शिंदे सर बोलले. 
"पण अशा बाबतीत जबरदस्ती करुन चालतीय का?", सरांनी विचारलं. 
"म्हनून तर स्वतः बोलाय आलो. म्हनलं, काय अडचण हाय बघावं स्वतःच.", शिंदे सर. 
"अडचण म्हणाल तर सपनाला शिकायला जायचंय पुण्याला. ती तिथं, मनोजराव इथं, कसं चालेल? अजून दोन तीन वर्ष तरी ती तिथं राहील. पुढं तिकडंच नोकरी लागली तर?", सरांनी विचारलं. 
"इतकंच ना? मग मनोजला पन बगु की आपन तिकडंच नोकरी. काय लागले पैसे तर जमवू आपन.", शिंदे सर बोलले. 
"पैसे? कसले पैसे?", सरांना काही कळलं नाही. इतक्यात सपनाही ओढणी घेऊन आहे त्या ड्रेसमध्ये तशीच बाहेर आली होती. 
"सर, तुम्ही सांगा आजकाल नोकरी सहज लागतीय का? कायतर करावंच लागल ना? करु की आपन. थोडे तुमी द्या, थोडं आमी करतो बंदोबस्त. ", शिंदे सर बोलले. 
सपनाला आता राहवेना. ती रागाने पुढे येऊन मनोजला बघत म्हणाली,"काय हो मनोज, तुम्ही विचारलं म्हणून भेटले, बोलले. तिथून तुम्ही प्रकरण पैशांपर्यंत नेलंत?". 
"मी कुटं काय म्हंतोय? तुम्ही सातारला असाल तर प्रश्नच मिटला ना?", मनोजने विचारलं. 
"पण मुळात तुमची जबरदस्ती का म्हणते मी? मला तर काही कारणं द्यायचीच नाहीयेत तुम्हाला.", सपना तावातावाने बोलली. 
मनोज ताड्कन उठला आणि म्हणाला,"म्हंजे इतके दिवस भेटलो, बोललो ते व्यर्थच?". 
शिंदे सर बोलले,"सर परत सांगतोय, या असल्या गोष्टी पसरायला वेळ लागत नाही. विचार करा.". 
"धमकी कुणाला देताय?", सपनाने सरांना विचारलं. तिची हिम्मत बघून मनोजही घाबरला होता. 
पुढे मनोजकडे बघत ती बोलली," आन काय रे? चार वेळा मोजून तू मला भेटला, बोलला, त्यात किती कष्ट पडले ते तुला? प्रयत्न व्यर्थच म्हणे. मी काय लगेच हो म्हणाले होते का लग्नाला? का तुझ्या गळ्यात हात घालून फिरलेले? "
"सपना !!", बाईंनी जोरात ओरडून तिला आतून हाक मारली.
"हे बघा पप्पा मी स्पष्टच सांगते, मला या घरात लग्न नाही करायचंय.", आणि तिथून निघून गेली.
"सर, तिच्याकडून मी माफी मागतो. पण ती म्हणाली तसं तिचा जो निर्णय तोच आमचा. आम्ही काही जबरदस्ती नाही करणार तिच्यावर.", सरांनी हात जोडून शिंदे सरांना विनंती केली.
"आता काय बोलनार आमी? आमच्या पोरालाच अक्कल न्हाई. उत्तर म्हाईत असून इथंवर यायला लावलं.", शिंदे सर बोलले.
"झालं का समाधान? चला आता अजून अपमान करून घ्यायचा बाकी हाय का? ", शिंदे सरांनी मनोजकडे बघून विचारलं. आतून सपना ऐकत होतीच. तिचा राग अजून कमी होत नव्हता.
मनोज वडलांचा चेहरा बघून गप्प झाला. शिंदे सरांनी पायात चपला चढवल्या आणि निघाले.
"बघा यांच्यासाठी इतकं केलं आनी तरी हे असं ऐकून घ्याय लागतंय.", मनोज जोरात ओरडला.

तशी सपना पळत पळतच बाहेर आली आणि मनोजला म्हणाली, "करायचंय ना लग्न? चला ना मग?". तिने मनोजचा हात धरला. पायांत चपला घातल्या आणि निघालीच. सर, बाईही तिला थांबवत होते पण ती ऐकत नव्हती. तिने मनोजचा हात ओढतच निघाली. त्याला हे असं लोकांसमोर जायला लाज वाटत होती पण तिला मात्र काही सुचत नव्हतं , दिसत नव्हतं आणि ऐकू येत नव्हतं. तिच्या आवाजात, डोळ्यांत जरब होती. ताड ताड चालत सपना संत्याच्या ऑफिससमोर येऊन थांबली. तिला असं आलेलं पाहून बाहेर उभी असलेली पोरं बिथरली. त्यातलं एक पोरगं आत पळतच गेलं. संत्या केबिनमध्ये बसलेला.

ते पोरगं ओरडलं,"संत्या वहिनी आल्यात रं.". त्याचा अवतार बघून संत्या धावतच बाहेर आला.

        समोर सपना मनोजचा हात धरून उभी. त्याला समोर पाहिलं आणि सपनाचं अवसान गळल्यासारखं झालं. तिच्या डोळ्यांत पाणी साठलं. तिने मनोजचा हात सोडला आणि संत्याचा धरला आणि म्हणाली,"हा संत्या शाळेत असल्यापासून माझ्या मागावर. सकाळ संध्याकाळी सावलीसारखा माझ्यामागे फिरायचा. मी घरी नीट पोहोचते का नाही ते बघायचा. पण कधी कशाची अपेक्षा केली नाही, काही मागितलं नाही. मी कानाखाली मारली तरी उलट मारली नाही मला. उलट चांगल्या कामाला लागला. मी विश्वास ठेवला नाही तरी आपलं काम करत ऱ्हायला. मी कचाकचा रस्त्यात भांडले त्याच्याशी. तरी वाटेत सोडून नाही गेला. प्रयत्न म्हंजे काय, प्रेम म्हंजे काय ते त्याला विचारा.

तिच्या आवाजानं अजून चार माणसं जमा झालेली. त्यांच्याकडे पाहून ती म्हणाली,"ही बदनामीची धमकी कुनाला देताय? सगळ्या गावापुढं त्याचा हात धरतीय आज. त्यो जसं माज्यासाठी काय पण कराय तयार आहे, मी पन त्याच्यासाठी सगळं सोडायला तयार आहे. पन हे सगळं मी तुमच्यासाठी का सोडायचं? आन मी म्हनलं तर जन्मभर माझी वाट बगल तो. काय रे बघशील ना?", सपनाने संत्याच्या डोळ्यांत पाहात विचारलं.

तो गप्पच होता. तिला अजून रडू येऊ लागलं. ती पुढे बोलू लागली,"पर्वा बोल्लास ना ते पटलं मला. मला फक्त माझीच फिकीर होती, बाकी कुणाचीच न्हाई. तुजितर कणभर पन न्हाई. पण तवापासुन चैन न्हाई जीवाला, तुज्याशी बोलता येनार न्हाई या विचारानं झोप न्हाई. तू नसलेलं आयुष्य कसं हा विचारच करवेना. मला माझं स्वप्न पायजे आन तू पन. जमल का? आजवर होतास ना सावलीसारखा? तसाच. कधी माझ्या मनात तुझं रुप बदलत गेलं कळलंच नाही. अन ते झालं तरी मी मान्य केलं नाही. पण आता मलाही तुझी सावली व्हायचंय. हा एकट्यानं प्रवास कुठंवर करशील? कधीतरी थांबवला अस्तास का नाही? चुकलं माझं त्यादिवशी. ". ती बोलतच राहिली.

"सपने मला काय बोलू देशील का न्हाई?",संत्यानं जोरात ओरडून विचारलं तेव्हा कुठं ती शांत झाली. 
"सगळ्यांत पयलें ते डोळ्यातलं पानी पूस", म्हणत त्याने तिच्या गालावरचं पाणी टिपलं आणि पुढे बोलू लागला,"हे बघ एकतर मी तुला लै घाबरतो. जी काय हिम्मत केली ती पर्वा तुज्याशी भांडायला केली. पन तुज्याशी भांडून करमत न्हाई. लै वाईट वाटलं तवापासनं. तुज्याशी भांडून कुटं जानार हाये मी? तू म्हनशील ते सगळं जमल. तू 'हो' म्हनायची वाट बघत होतो. तुज्या कॉलेजचं म्हनशील तर इतकी वर्षं आलो तुज्यामागं. अजून पन बसनं मागं यायची तयारी हाय, जिथं म्हनशील तिथं. आता बाकी या लोकांचं काय? तू हो म्हंनलीस ना? मग बास! मला यांचं काय करायचंय मग?", संत्या मनोजकडं बघत बोलला. त्याच्याकडे पाहात त्याने हात जोडले आणि म्हणाला,"साहेब या आता.".

बोलण्या-ऐकण्यासारखं काही नव्हतंच. मनोजला फारच शरमल्यासारखं झालं होतं आधीच. तो तिथून निघाला. तो निघाल्यावर बाकीचीही गर्दी तिथून पांगली. संत्या आणि सपनाच, रस्त्याच्या मधोमध, एकमेकांकडे बघत. आणि त्या क्षणाला पहिल्यांदा दोघांना जाणवलं की,"पुढे काय?".

तीही थोडी लाजली. संत्यानं ऑफिसकडे हात केला. ती त्याच्या मागोमाग आत गेली आणि संत्यानं तिला पहिला प्रश्न विचारला,"अख्ख्या गावासमोर विचरायची वाट बघत होतीस व्हय? आन म्या न्हाई म्हनलं असतं तर?".

     त्याने असं विचारलं आणि ती थोडी हसली. तिला जाणवलं आपण दोघेच आहोत त्या छोट्या खोलीत.
तिने त्याच्या खांद्यावर जोरात बुक्का मारला आणि म्हणाली,"तर तर, न्हाई म्हनून तर बगायचं मग कळलं असतं सपना काय हाय ते."
      त्या दिवशी रागाने थरथरत तिचे खांदे धरणारे हात आता तिच्या हातांवर अलगद विसावले होते. तिच्या डोळ्यांतून अलगद पाणी पाझरू लागलं. आज पहिल्यांदा तिला त्याच्या प्रेमाचा स्पर्श झाला आणि ती सुखावली होती. त्यानं पुढं होऊन तिच्या कोरड्या ओठांवर आपले ओठ टेकले आणि ती हुंकारली. दोघे मग बराच वेळ  बसून राहिले. आज संत्याला जाणवलं, ती असताना मला बोलायची गरजच नाहीये. हे असं तासनतास न बोलता बसून र्हायलं तरी चालणार आहे. आणि संत्याचं आयुष्यभराचं स्वप्नं आज पूर्ण झालं होतं. 

समाप्त. 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, October 30, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - १९

      सपना गाडीत बसल्यावर स्थिरावली. त्याने तिला पाण्याची बाटली दिली. तिने घटाघटा पाणी पिलं आणि तिला जाणवलं खरंच किती तहान लागली होती. त्याची नजर रस्त्यावर होती. इतक्या अरुंद रस्त्यावरुन गाडी न्यायची म्हणजे कसरतच असायची. त्याने घातलेल्या खादी कुर्त्याच्या बाह्या वर दंडापर्यंत दुमडल्या होत्या. त्याच्यावर दिवसभर असलेलं जाकीट काढून टाकलेलं होतं. केस, डोळे, चेहरा पाहून किती दमलेला वाटत होता. त्याच्यी दिवसभराची धावपळ तिला आठवली. 
"काही खाल्लंय का?", त्याने विचारले. 
"आता घरी जाऊन जेवणारच आहे.",सपना बोलली. 
त्याने आपल्या उजव्या बाजूने हात घालून दाराच्या कप्प्यातून केळं काढून तिला दिलं. तिनेही मुकाट्याने ते खायला सुरुवात केली होती.  
"आज इतका उशीर कसा झाला ते?", त्याने पुन्हा एकदा विचारले. एकेकाळी तिच्या क्षणा-क्षणाची माहिती ठेवणारा तो. तिच्याबद्दल आपल्याल्या काहीच माहित नसतं याचं त्याला वाईट वाटलं. 
" काम होतं थोडं. आणि आज कार्यक्रम पण होता ना  …" ती पुढे बोलता बोलता ती थांबली. 
आपल्या कार्यक्रमामुळे तिला उशीर झाल्याचं त्याला वाईट वाटलं. 
"चांगला झाला आजचा कार्यक्रम", तिने काहीतरी बोलायचं म्हणून सांगितलं.
"तुम्ही होता का? मला दिसला न्हाई ते?", त्याने सरळ थाप मारली. 
"हो होते ना. चांगलं बोलता तुम्ही भाषणात", ती. 
तो तसा लाजला. गाडीने आता जोर पकडला होता.…. 
मागे आशिकी २ ची गाणी लागली होती. 'सून रहा है  ना तू... '. तिने पुढे होऊन आवाज वाढवला थोडासा. त्याला तिच्या आठवणीत रिपीट वर लावलेलं हेच गाणं आठवलं. 
त्याने एकदा मागे बघून घेतलं. पोरं दमली होती. एकमेकांच्या खांद्यावर माना टाकून झोपली होती. 
तो तिच्याकडे बघत बोलला, "एक सांगायचं होतं तुम्हाला", त्याने बोलू का नको विचार करत बोलून टाकलं. 
तिला वाटलं,'झालं आता'. त्याच्या नजरेशी भिडलेली नजर तिचं हृदय कापत गेली. 
"मी लई मूर्खपणा केलाय ह्याच्या आधी. तुम्हाला लई त्रास दिला ना?",त्याने स्पष्ट सांगितलं.
त्याचं हे वाक्य तिला अनपेक्षित होतं. तो आजवर कितीही तिच्या मागे असला तरी असं स्पष्टं कधी बोलला नव्हता. त्यामुळे तिला काय उत्तर द्यावं कळेना. 
"जाऊ दे, मी नाही लक्ष देत आता अशा गोष्टीकडे", ती काहीतरी बोलावं म्हणून बोलली. 
"तो तुमचा मोठेपणा झाला ओ. पण चुकलं माझं. आता कामाला लागल्यावर कळलं आयुष्यात काय काय असतं ते. आता माझं तेव्हाचं वागनं म्हंजे माकडखेळच." , संत्या बोलला. 
ती गप्प  बसली. 
"पण तुम्ही चांगल्या हाय. कधी उलट बोलला नाही. आपलं काम, अभ्यास करत राहिलात. असंच करत राव्हा.", संत्या बोलला. ती थोडंसं हसली फक्त. 
थोडं अंतर गेल्यावर ती म्हणाली,"तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बरंका?"
"अरे ?? तुम्हाला कसं कळलं?", त्याने आश्चर्याने विचारले. 
"ते काय गुपित आहे का? बिलबोर्डवर दिसलं होतं मध्ये. ", ती हसून बोलली. 
त्याला आपला हाताची घडी घातलेला बोर्डवरचा फोटो आठवला आणि त्याच्या खाली लिहिलेली ढीगभर नावंही. तीही आपल्याला तिथे पाहते हा विचार करून तो लाजला. 
"त्ये होय. करावं लागतं पार्टीसाठी. बाकी काही नाही." , तो. 
 तिलाही मग त्याचा 'गोरा' फोटो आठवून हसू आलं. 
"अभ्यास कसा चाल्लाय?", त्याने विचारलं.
"हां, चालू आहे. आता लेक्चरर म्हणून जाते ना? तुम्ही कॉलेजला नाहीच जात का आता? ", ती म्हणाली. 
"माझं काय ओ अभ्यास आपला नावाला. उगाच हट्ट म्हणून सातारला यायचो.", संत्या बोलताना ओशाळला. 
"आमचं जाऊ द्या. तुम्ही अजून काय करनार हाय पुढं?",त्याने विचारलं.
"प्रोफेसर व्हायचं आहे मला. पीएचडी करायची आहे. सरांशी बोलणं चालूय. बघू किती जमतं." ती बोलली. 
"शिका, शिका. आपल्या गावच्या पोरांना पन शिकवा. लवकरच गावात १२वी च्या पुढं कॉलेज पायजे असा आग्रह करणार हाय आम्ही. तुमच्यासारख्या हुशार लोकांना मग बाहेर जायची गरज नाय पडणार.", संत्या. 
      सपनाला त्याचा हा विचार ऐकून एकदम छान वाटलं. कधी विचारच केला नाही आपण या गोष्टीचा. पुढं शिकायचं तर बाहेर जावं लागणार इतकंच तिला माहीत होतं. त्याच्या बदललेल्या रुपाकडे ती जणू पहातच राहिली. 
"आपल्या गावातून सातारला जाणाऱ्या-येणारया बस पण वाढवून घ्यायचा प्रयत्न चालू आहे. बघू काय काय जमतं ते.पन प्रयत्न नक्की करणार. तुम्ही पण या की आमच्या हॉपीसमध्ये एकदा", त्याने तिला सांगितलं. 
"तुमच्या सारखे शिकलेले लोक हवेत गावाचा सुधार करायला. पार्टीच्या कामांसाठी तुमच्या सूचना लै उपेगी पडतील. आमी काय अडानीच लोकं. ", संत्या बोलत राहिला. 

       तिने मान डोलावली. जरा वेळ गेला आणि त्याने अजून एकदा तिची माफी मागितली. "सून रहा है ना तू" रिपीट वर चालू होतं. तोही सोबत गुणगुणत गाडी चालवत होता. सपना आपल्याशेजारी गाडीत बसली आहे याच्यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. गावात पोचायला अजून पाऊणेक तास तरी होता इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने 'पप्पा' बघून कट केला. 
परत चार वेळ वाजल्यावर त्याने फोन तिच्याकडे देऊन सांगितलं, "स्पीकरवर ठेवून देता का मला?".  
तिने फोन उचलून स्पीकरवर ठेवला आणि त्याच्यासमोर धरला. 
"संत्या !!!! मी तुला म्हनलं होतं ना? ते एसटीचा अर्ज भरु नगंस म्हनून? आज तरी तू तो कलेक्टरला दिऊन आलास? आता दादासाहेबांचा फोन आला हुता.", पाटलांचा आवाज जोरजोरात येत होता. त्यांचा तो आवाज ऐकून त्याने सपनाकडे पाहिलं. गाडी बाजूला घेतली आणि गाडीतून उतरला. मागून सपनाही उतरली.
"पप्पा अवो, लोकांची किती तारांबळ हुती. फकस्त चार बस येतात दिवसाला. असं कसं चालंल?", संत्या कळकळीनं बोलत होता. 
"आपला ट्रॅक्सचा बिजनेस हाय ते इसरलाच का?", रात्रीच्या शांततेत पलीकडचाही आवाज स्पष्ट ऐकू येत होता. 
"म्हनून काय लोकांची आबाळ करायची का? आपल्याला अजून बाकीची पण कामं हायत की.", संत्या बोलला. 
"हे बगा मला हे असलं काय चालनार न्हाई. मुकाट्यानं उद्या जाऊन एसटीचा अर्ज आन त्या टपऱ्यां पाडायचं अर्ज सगळं मागारी घ्यायचं.", पाटीलांनी निर्णय दिला. 
"मी तुमच्याशी घरी यीवून बोल्तो.", संत्या हळूच बोलला.
"तुम्ही घरी या नायतर जावा, मी सांगतोय ते काम झालं पायजे. कळलं का?", त्यांनी निर्णायक स्वरात विचारलं.
संत्या गप्प बसला. त्याने फोन ठेवला.
मागे उभी असलेली सपना कुत्सित हसली.
त्याने तिच्याकडे वळून बघत विचारलं, "काय झालं?". 
"मला वाटलंच होतं हे समाजकार्य म्हणजे सगळं देखावा आहे.", सपना बोलली. 
हे ऐकलं अन क्षणात संत्याचा पारा चढला. 
"दिखावा? कसला दिखावा? हे करतोय ते सगळं दिखावा वाटतंय का तुम्हांला? ", तो रागानं बोलला. 
"अच्छा? मग आजवर बाकी सगळी कामंकेलीत. त्याला परवानगी मिळत गेली बरोबर. आता त्येच घरच्या धंद्यांवर आलं तर तुमचं धाबा दणाणलं, नाही का?", तिने विचारलं. 
"काय बोलतीयस तू सपने? उलट मी भांडतोय पप्पांशी. तुला कळत न्हाईये का?", त्याने जीव तोडून विचारलं. 
"तेच! तोही दिखावाच असणार. मला दाखवायला, की मी किती सुधारलोय.", ती रागानं बोलली. 
आता मात्र त्याचं डोकं सटकलं होतं. 
"तुला दाखवायला म्हंजे? तुला काय वाटतं? सगळं जग तुझ्याभवतीच फिरतं का? सपने कधी बाहेर पडून बघ तुझ्या जगाच्या. तू मुस्काटात दिलीस त्यादिवशी जाग्याव आलो. तुझ्याभवतीच फिरत होतं आयुष्य माझं. त्यातून बाहेर पडलो. किती कष्ट पडले त्यासाठी? म्हायतेय का? आता कळतंय तूही माझ्यासारखीच. आपल्याच जगात ऱ्हानारी. भायेर पड, आजूबाजूला बघ काय चाललंय. ", संत्या जोरजोरात बोलत होता.  
"कसलं कष्ट?", तिने विचारलं. 
"तुला सांगू? तू नव्हतीस कधीच सोबत. या पोरांनी साथ दिली आजवर. त्यांना म्हायतेय कसलं कष्ट ते. म्हनून त्यांच्यासाठी करायला बगतोय. त्यांना कायतर उद्योग धंद्याला लावावं म्हनून धडपतोय. त्यात काय दिखावा करनार?", त्याने रागाने तिचे खांदे धरले. तिनेही तितक्याच रागानं ते झटकले. 
"तू,  तो मनोज, सगळे एकसारखेच. नाटक, दिखावा नुसता. ", सपना. 
"आन तू काय गं? मला भायेर जायचं. तू बाकी कुनाची पर्वा केलीस आजवर? आपलंच बघायचं. तुझ्यासारखी स्वार्थी लोकं नकोच या गावात. आज बरं डोळं उघडलं माझं. ", संत्याचा आवाज वरच्या पट्टीला पोचला होता. 
तो आपल्यावर असं उघड्यावर इतक्या जोरात ओरडतोय बघून सपनाला त्रास होऊ लागला, रडूचयेऊ लागलं. 
"चांगलंच झालं. तुझं पण हे रुप परत बघायला मिळालं.", सपना बोलली.
"तुला जे पायजे ना तेच बघतीस तू. तुझ्यापायी जीव जरी दिला ना? तरी म्हनशील, माझ्या दारात का दिलास?", संत्या आता सुटला होता. 
तिकडं 'गाडी का थांबली' म्हणून पोरं जागी झाली होती. त्यात यांच्या भांडणाचा आवाज. अम्यानं येऊन गाडीचा हॉर्न वाजवला आणि संत्या शुद्धीवर आला. संत्या गाडीत जाऊन बसला आणि सपना तिच्या जागेवर. गाडी जोरात धावली. तिचं घर आलं. ती खाली उतरली आणि तो निघाला. ती दार उघडून घरात गेली का नाही ते पाहायलाही नेहमीसारखा तो मागे थांबला नाही.  

क्रमशः 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, October 29, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - १८

सकाळ सकाळी पाटील चिडलेले होते. संत्या सातारच्या कार्यक्रमाची तयारी करत होता आणि इतक्यात पाटलांची हाक त्याला ऐकू आली. हाक कसली, आरडा ओरडाच तो. 
"काय झालं पप्पा?", संत्यानं विचारलं. काकीही पळतच बाहेर आली. 
"हे काय ऐकतुय मी? त्या टपऱ्या काढायला कुणी सांगितलं होतं?", त्यांनी संत्याला विचारलं. 
संत्या मान खाली घालून उभा राहिला. 
"अवो पन झालं तरी काय?", काकीला काही कळत नव्हतं. 
"त्या बसस्टँड वरच्या टपऱ्या उडवून टाकायचा अर्ज केलाय यानं. हे असले उद्योग करायच्या आधी मला इचारायचं तरी हुतं.", पाटील. 
"आईस्क्रीम, वडापाव, सगळं?", काकीने विचारलं. 
"सगळं बेकायदेशीर गाळे होतं ते. ", संत्या. 
"हातावरचं पोट त्या लोकांचं आन तुम्ही असं सरळ काढून टाकणार त्यांचा धंदा?", पाटलांनी रागानं विचारलं. 
"मी बघतोय त्यांच्या कामासाठी. आपल्या गावात, बाहेर कितीतरी कामं हायेत. तुम्ही का इतकं चिडताय? अन त्यांना कर्जावर घेता यील की जागा, धंद्याला पैसे. मी बोलावलाय एक मानूस उद्या, करियर कौन्सिलिंग म्हनतात त्याला. तो दिल त्यांना काय करता यील याची आयड्या.", संत्या बोलला. 
"ल्हान हाय अजून. शिकल की हळूहळू.", काकीनं मध्ये पडायचा प्रयत्न केला. पण त्यानं काही होणार नव्हतं. 
"हे बगा, तुमी बाकी सगळी कामं केलीत ती ठीक पन हे असलं लोकांचे धंदे बंद करायचं काम करु नका.", हे फायनल ऐकवून पाटील तिथून निघून गेले. 

        इतक्यात विक्या त्याला घ्यायलाच आला होता. आज सातारला कॉलेजात दादासाहेबांचा कार्यक्रम होता. गावांतून पोरांना मदतीला घेऊन जायची आज्ञा होती त्यांची. त्यात संत्या आता त्यांचा खास कार्यकर्ता बनला होता. 
"३ इनोव्हा आणल्यात आपल्या आन कोरेगावात दोन मिळतील. ", विक्या घरात येता येता बोलला होता. 
संत्यानं घड्याळ पाहिलं आणि झटक्यात कपडे बदलले. दोन-चार लोकांना फोन लावले आणि सगळी मंडळी गाड्यांमध्ये घालून निघाला. डोक्यांत पप्पांचं बोलणं अजून घोळतंच होतं. सातारला आल्यावर त्याच्या लक्षात आलं हे तर सपनीचं कॉलेज होतं. सकाळच्याभांडणात ते विसरुनच गेला होता तो. कॉलेजच्या ग्राऊंडवर दादासाहेबांचा मोठा कार्यक्रम होता. त्यांच्या हस्ते गरजू मुलांना साहित्य, मानधन मिळणार होतं. हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार होता. दुपारी तीन नंतर कार्यक्रम ठेवला होता. 
         तिथे पोचल्यावर मात्र संत्या लगेच कामाला लागला. मंडपवाल्याना बोलावून मंडप, मंच बांधून घेतला. खुर्च्या लागल्या. माईक, साऊंड सिस्टीम लागली. सपनाच्या क्लासमधली निम्म्याच्या वर मुलं गायब होती. आज हा कार्यक्रम म्हटल्यावर बोलून काही उपयोग नव्हताच. बरं, स्टाफ म्हणून नाईलाजानं थांबावंच लागणार होतं. दुपारचं प्रॅक्टिकल कॅन्सल करुन सगळी पोरं मंडपात जमली. बराच वेळ झाला तरी दादासाहेबांचा पत्ता नव्हता. लोकांची, पोरांची चुळबुळ वाढली होती. कॉलेजची पोरं ती, किती वेळ शांत बसणार? संत्या फोन लावून सतत माहिती काढत राहिला. लवकरच दादासाहेब आले आणि कार्यक्रम सुरु झाला. प्रतिष्ठितांचे मान-सन्मान झाले. प्रिन्सिपल सरांचं, दादासाहेबांचं भाषण झालं. 
         जागोजागी कार्यक्रमात संत्याचा वावर सपनाला जाणवत होता. स्टाफच्या पहिल्या रांगेत बसून ती त्याला न्याहाळत होती. त्याचं ते खादीतलं रूप वेगळंच दिसत होतं. त्याच्याकडे बघण्याच्या नादात ती मागे काय चालू आहे हे विसरुन गेली होती. 

"आज साहेबांनी आपला बहुमूल्य वेळ तर आपल्याला दिलाच आहे. पन अनेक विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि बाकीही गरजेच्या वस्तू दिल्या जानार हायेत. मी एकेकाचं नाव घेतो तसं त्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन या भेटीचा स्वीकार करावा. विठ्ठल जाधव, उमेश वाणी, महेश... ", संत्याचा आवाज ऐकून ती भानावर आली. 
"त्याचं बोलणंही किती बदललंय", सपनीने मनात विचार केला. 
एकेकाचं स्टेजवर येऊन वस्तूवाटप होईपर्यंत बराच वेळ गेला. थोड्याच वेळात साहेब निघालेही. 
संत्या पुढे होऊन माईक हातात घेऊन बोलला,"दादासाहेबांना महत्वाच्या कामासाठी निघावं लागणार आहे. तर पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानू. धन्यवाद साहेब.", असं बोलत संत्या त्यांच्या पाय पडला. त्यांनीही त्याला आशीर्वाद देऊन मिठी मारली. 
त्याच्या हातातून माईक घेत दादासाहेब बोलले,"इथं आल्याचा खूप आनंद होत आहे. आज संतोषरावांचं विशेष कौतुक करायचं आहे मला. त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या गावात इतक्या सुधारणा तर केल्याच आहेत. पण आजचा कार्यक्रमही त्यांच्या पुढाकारानेच पार पडला आहे. त्यांच्याकडून असंच देशकार्य होत राहावं ही सदिच्छा. त्यांना आणि तुम्हा आजच्या पिढीच्या युवकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. "
        इतकं बोलून दादासाहेब निघाले. संत्याने त्यांच्यासाठी गाडी काढायला सांगितली. ते खाली उतरल्यावर बाकीचा कार्यक्रम औपचारिकच होता. स्टाफचं चहापान झालं. तेही सर्व करण्यात संत्याने पुढाकार घेतला होता. सगळ्या प्रोफेसरना काय हवं नको ते तो बघत होता. 
'आयुष्यात स्वतःच्या सरांना इतका मान दिला नसेल, आणि आता गोड बोलतोय', सपनाच्या डोक्यात विचार आला. या सगळ्यांत इतका वेळ गेला होता. सपनाला घर गाठायची घाई होऊ लागली. स्टाफरुममध्ये येऊन तिचं राहिलेलं थोडंसं काम पूर्ण केलं आणि स्टॅंडकडे निघाली. उशीर झालाच होता. शेवटची तरी गाडी मिळावी म्हणून तिची धडपड चालू होती. 
        
          कॉलेजमधलं सर्व सामान मार्गी लावून संत्या इनोव्हा घेऊन परतीला लागला होता. बराच उशीर झाला सगळं उरकायला. गाडी नाक्यावर आली तशी त्याला स्टॉपजवळ सपना त्याला दिसली.त्याने तिला कुठूनही ओळखलं असतं. त्यात आता लेक्चरर म्हणून जायला लागल्यापासून ती साडी नेसून जाऊ लागली होती. ते पाहून तर त्याला अजूनच प्रेम यायचं तिच्यावर. आजच्या घाईतही त्याने तिला पहिल्या रांगेत टिपलं होतं. रस्त्यावर इतक्या उशिरा एकटीच पाहून संत्यानं गाडी थांबवली. तिच्या इतक्या जवळ गाडी थांबल्यावर ती दचकली. 
"उशीर झाला वाटतं?", त्यानं खिडकीची काच खाली उतरत विचारलं. 
        खरंतर आधी त्याची हिम्मतही झाली नसती तिला विचारायची. पण आजकाल एक नवीनच आत्मविश्वास मिळाला होता त्याला. 
"हां शेवटची बस चुकली आज. ट्रक्सची वाट बघत होतो.", सपनानं सांगितलं. 
"येताय का? मी सोडतो घरला.", संत्या बोलला. 
तिने घड्याळ पाहिलं. गाडीत वाकून पाहिलं तर अजून ५-६ पोरं होती. विचार करुन ती 'हो' म्हणाली. गाडीत पुढं बसलेलं पोरगं झटक्यात उडी मारुन मागं गेलं. ती पुढच्या सीटवर बसली आणि गाडी सुरु झाली. 

क्रमशः 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, October 28, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - १७


सकाळी सपना उठली ती अजून स्वप्नातच असावी अशी. सकाळच्या पेपरमध्ये कालची बातमी आलेली होती. सरांनी एकदम मोठ्याने वाचून दाखवली. त्यात त्यांचा सर्वांचा एकत्र फोटोही होता. तो बघून सपना हसली, संत्या त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये खिशात हात घालून एका पायावर थोडा तिरका उभा होता. 

"किती काम उरकलं ना?", सर म्हणाले. 

"हो नं, मला वाटलं नव्हतं इतकी माणसं येतील.", बाई बोलल्या. 

"चांगलं काम केलं पोरांनी.", सर आठवून बोलले. 

"होय की", बाई.

          सपनाचं मात्र कशात लक्ष नव्हतं. दिवसभरात मोजून चार शब्द बोलली असेल ती. संध्याकाळ झाली तरीही तिची काहीच करायची इच्छा होईना. ती घड्याळाकडे बघत होती आणि तिचे कान फक्त दाराकडे बघत होते. कधी बेल वाजते आणि ती दरवाजा उघडते असं तिला झालं होतं. बेल वाजलीच. तशी सपना पळत दरवाज्याकडे धावली. शेजारची पोरगी आली होती. सपनाचा हिरमोड झाला.

"झंडूबाम हाय का?", पोरीने विचारलं.

"काय गं काय झालं?", बाईंनी विचारलं.

"आईचा पाय दुखतोय. त्ये काल जरा काम जास्त झालं ना शाळांत.", पोरगी बोलली.

"हां बरोबर. काय लागलं तर सांग, गोळी पण आहे.", बाईंनी तिला सांगितलं.

"कपाटाच्या वरच्या कप्प्यात आहे बघ.", बाईंनी सपनाला सांगितलं.

          सपनाने शोकेसमधून झंडूबाम काढून दिलं. ती पोरगी झंडूबाम घेऊन निघून गेली. सपनाला वाटलं आता रडूच येईल की काय आपल्याला. ती जेवण करुन खाटेवर पडली आणि तिला रडू येऊ लागलं. का? कशाचं? काही कळेना? जोरजोरात आरडून रडावंसं वाटत होतं तिला.

        दोन दिवस झाले तरी अंगावरची मळ जात नव्हती. केसांतली धूळ, हातांवरचा काळा थर आणि संत्याचे विचार. कपडे काढून ती अंघोळीच्या पाटावर तशीच बसून राहिली. शरीरावर जणू त्याच्या अस्तित्वाच्या नसलेल्या खुणा शोधत. त्या दिवशी दारु पिऊन तिचा पकडलेला तो हात, त्याचा स्पर्श आता आठ्वणीतही टोचत नव्हता. त्याच्या नशेतल्या डोळ्यांची जागा, त्याच्या कष्टाने दमलेल्या तरीही काम करणाऱ्या डोळ्यांनी घेतली होती. तिला हवं होतं अजून. त्याचा स्पर्श, त्याचा श्वास, त्याचं शरीर तिच्या अंगावर. पण केवळ कल्पनाच त्या. बाईंनी दारावर थाप मारली तशी सपना भानावर आली. आपल्या एकटेपणात असा अडथळा आल्यावर सपनाला आईचा खूप राग आला. तिने अंघोळ केली आणि बाहेर आली. खोलीत जाऊन कपडे घातले आणि आरशासमोर वेणी घालायचं सोडून आपल्या चेहऱ्याकडे बघत बसली. 'त्याला काय आवडलं असेल यातलं?' असा विचार करत. 

         महिना होत आला होता शाळेचं रुप पालटून आणि सपनीने संत्याला बघूनही. शाळा, कॉलेज परत सुरु झालं. सपनाने सातारला तिच्याच कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून तात्पुरतं काम सुरु केलं होतं. पीएचडी साठी ती सरांशी बोलत होतीच. एक प्रकारे आपण त्या विचारातून बाहेर पडलो ते बरंच झालं असं तिला वाटलं. उगाच अभ्यास सोडून दुसरा ताप कशाला? पावसात पुन्हा बसच्या चकरा सुरु झाल्या. आता तर वैशूही नव्हती सोबत आणि मागे वळून पाहायला संत्याची सावलीही. एकदा ती कामाला लागली आणि रोज सतावणारी त्याची आठवण जरा कमी झाली. या दरम्यान बरेच वेळा तिला मनोजचे कॉल येऊन गेले होते. त्याच्याशी बोलण्यातही तिला आता स्वारस्य उरलं नव्हतं. त्यामुळे ती त्याचा फोन आला तर सरळ कट करुन टाकत होती. 

          असंच एक दिवस तिने शेवटी सरांना विचारलं,"पप्पा ते शिंदे सरांना सांगितलं ना नाही म्हणून त्यांच्या मुलासाठी?". 
सरांनी बाईंकडे पाहिलं. 
"नाही अजून. मध्ये या शाळेच्या कामात बोलणंच नाही झालं.", सर बोलले. 
"कारण काय सांगणार गं पण? उगाचच नाही का म्हणायचं चांगल्या स्थळाला?", बाईंनी विचारलं. 
"काय म्हणजे? सांगा की मला जायचंय पुण्याला पुढच्या शिक्षणाला.", सपना. 
"अगं असं नाही तोडता येत एकदम माणसं.", सर. 
"मग काय डायरेक्ट लग्नच करुन टाकू का?", सपना रागानं बोलली. 
"एकदम टोकालाच जाते ही पोरगी." ,बाई चिडल्या. 
"मला जायचंय खरंच पुढं शिकायला.", सपना तावातावानं बोलली. 
"बरं बाई जा. काही सोयच नाही हिला कुणी बोलायची.", बाईही टोकाचं बोलल्या. 
"तुम्ही तेव्हढं सांगा त्यांना फोन करुन. त्यांच्या मुलाचा सारखा फोन येत राहतो मला.", असं बोलून ती कॉलेजला निघून गेली. 

--------------

शाळेच्या सुधारणेची बातमी गावातून शहरात आणि तिथून टीव्हीवर पोचली होती. फेसबुकवरही पार्टीच्या पेजवर संगळ्यांनी संत्याचं खूप कौतुक केलं होतं. पाटलांना तर आपल्या पोराला कुठं ठेऊ असं झालेलं. त्याच्याशी बोलतानाही त्यांच्या बोलण्यात एक अभिमान आणि आदर दिसत होता. त्याचबरोबर आपल्या पोराला आपल्याला येतं ते सगळं शिकवण्याचा अट्टाहासही. त्यामुळे रोज सकाळी ते त्याला शेजारी बसवून कामाची आखणी करत. त्याला सूचना देत. तोही शिकत होता हळूहळू. त्याच्याबरोबरच्या पोरांनी एकदम भारी काम केलं होतं. 

'त्यांना एकदा जेवायला घेऊन जा' असं पाटलांनी संत्याला सांगून ठेवलं होतं. आज उद्या करत शेवटी संत्या सगळ्यांना गावातल्या एकुलत्या एक हॉटेलात घेऊन गेला होता. 

     तेव्हांच त्याला सपना बसमधून उतरुन घरी परत येताना दिसली. अशी चार टाळकी दिसली की आपण मान खाली घालून जायचं इतकंच तिला ठाऊक होतं. तरी जाताना कुणीतरी शिटी मारलीच. कुणाला शिट्टी मारतोय बघितल्यावर संत्या चिडलाच. त्या पोराकडं रागानं बघत तो तिच्या मागे पळत गेला. 

"सॉरी हं", मागून सपनीला आवाज आला आणि ती थांबली. एकतर सकाळपासून त्या मनोजच्या नाटकामुळं डोकं उठलेलं तिचं, त्यात कॉलेजमध्ये लेक्चरला पोरांनी दिलेला त्रास आणि आता हे. तिच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. तिने त्याच्याकडे वळून पाहिलं.
"सॉरी ते उगाच काहीतरी चेष्टा करत होते.", संत्या शरमेनं बोलला. 
"तुम्ही माझी काळजी करु नका. मला हे काही नवीन नाही. मलाच काय गावातल्या कुठल्याच मुलीला नवीन नाही.", सपना रागानं बोलली. 
संत्याने लाजेनं मान खाली घातली. 
"हे बघा कसे घोळके करुन बसतात. तिकडं स्टॅण्डवर पण असतातच. दुसरं काम काय यांना?", असं बोलून ती निघून गेली. 
तो तिथेच उभा राहिला ती वळते का काय बघत. डोक्याचा भुगा झाला होता रागानं.हॉटेलच्या मालकाला 'नंतर पैसे देतो काय होतील ते' असं सांगून पार्टी सोडून तोही घरी निघून गेला. 
रात्री कधीतरी अम्याचा फोन त्याला आला. 
"संत्या, जेवलास का?", त्यानं विचारलं. 
"जेवायला काय ठेवलंय का या पोरांनी, लाज आनली आज.", संत्या वैतागून बोलला. 
"आर बास की, किती इचार करशील अजून?", अम्या.
"असं न्हाई अम्या, आपल्या गावच्या पोरांची काय इज्जत हाय का न्हाई?", संत्या. 
"म्हंजे काय? सगळीच काय पडीक असतात काय?", अम्यानं विचारलं. 
"तसं न्हाई, मी इचार करतोय काय करावं यांच्यासाठी. आपन बी असंच हुतो, बोंबलत भटकायचो. त्यांना पन कायतर कामाला लावलं पायजे का न्हाई? उद्याला समद्यांना बोलाव हापिसला, त्यांच्यासाठी कायतर करुया. ", संत्या बोलत बोलत विचार करत होता. 
"बरं अन्तो. तू आदी शांत हो अन झोप बरं.", अम्या बोलला. 
त्याच्या आवाजानं संत्या नरमला. "सपनीची आठवन येतीय रं.", त्याने अम्याला सांगितलं. 
त्याला असं झुरताना पाहून अम्याला, विक्याला वाईट वाटायचं. 
"झोप आता आणि बग तिला सप्नात. आन आम्हाला बी झोपू दे. ठिवतो आता.", म्हणून अम्यानं फोन ठेवला. 

संत्या झाल्या प्रसंगाचा विचार करत बसला होता. आताशी कुठं जरा त्याला स्वतःबद्दल आदर वाटायला लागला होता आणि आता हे असं. 

- क्रमशः

विद्या भुतकर. 

Thursday, October 25, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - १६

        अम्या, विक्या संत्याच्या ऑफिसमध्ये बसले होते. गुरुवार होता. संत्या काहीतरी काम करत होता.

"संत्या अक्षयचा पिक्चर लागलाय चल की." , विक्या बोलला.
"काम सोडून पिक्चरला कुठं जायचं?", संत्या मन वर करुन बोलला.
अम्या असंच काहीतरी फोनवर बघत बसला होता. आजूबाजूला काय चाललंय याची त्याला काही पडली नव्हती. "अम्या" म्हणजे काय? त्याचा स्वभाव काय? त्याचे गुण-अवगुण काय? आपल्याला सपनी आवडते, याला कुणी आवडते का? विक्याचं काय? तो दिवसभर आपल्या सोबत नसतो तेव्हा काय करतो? त्याला आयुष्यात काही ध्येय आहे की नाही? असे अनेक प्रश्न संत्याला पडायला लागले, उगाचच. त्या दोघांकडे पाहून त्याला जाणवलं, आपण तरी काय वेगळे होतो? आहोत?
"चल की", अम्या बोलला आणि संत्याची तंद्री भंगली.
"नको तुम्हीच चला माझ्याबर, कॅफेमध्ये. त्याच्याकडं जनरेटर हाय, लाईट गेली तरी काम होईल.", संत्या बोलला आणि ताडकन उठलाच.

        दोन-चार दिवसांत संत्याकडे बरीच माहिती गोळा झाली होती. कॉन्ट्रॅक्टर कोण वगैरे ठरवायला पाटलांनी मदत केली होती. तेही खूष होते लेकावर. संत्याचं सरांच्या घरी येणं जाणं आता नियमित झालं तरीही तो तिच्याशी कधीच बोलला नाही पुढे होऊन. फक्त आपलं काम करत राहिला. ज्या पोरांवर तक्ते बनवायचं काम दिलं होतं त्यांनी चार वेळा सांगूनही पूर्ण केलं नव्हतं. त्यामुळे अम्याला त्यानं त्या पोरांना बोलवायला धाडलं आणि स्वतः विक्याबरोबर कॅफेमध्ये गेला. सपनीने तक्त्यांसाठी लागणारी यादी दिली होती. पण यातलं त्याला काहीच येत नव्हतं. कधी अभ्यास केला असेल तर ना? त्या कामचुकार पोरांनीही ते काम केलं नव्हतं. शेवटी नाईलाजाने संत्या स्वतःच नेटवर थोडी थोडी माहिती शोधू लागला. तिकडे विक्या अजून दोन पोरं जमवून आचरट काहीतरी बघत बसला होता. खरंतर एरवी संत्याही तिथेच दिसला असता पण आता त्याला पॉर्नपेक्षाही काहीतरी उत्तेजित करणारं मिळालं होतं. त्याने विक्याला झापलं आणि तो सांगेल ते उतरवून घ्यायला लावलं. सगळी माहिती त्या धरुन आणलेल्या पोरांच्या हातात दिली आणि संत्या अम्याला घेऊन फ्लेक्सची माहिती काढायला सातारला जायला निघाला.

           संध्याकाळी बन्या सरांकडे पोचला तरी संत्या अजून आला नव्हता. बन्याने दिवसाचा वृत्तांत दिला, इतक्यात दारावरची बेल वाजली. सपनानं दार उघडलं तर तारवठलेल्या डोळ्यांनी, उभे राहिलेल्या मळकट केसांनी, हातात सामान घेऊन उभा राहिलेला संत्या तिला दिसला. तिच्या बसच्या मागे गाडीवरुन येतानाही असाच काहीतरी अवतार असायचा त्याचा.

"हे घ्या", म्हणून त्याने तिच्या हातात सामान दिलं आणि घरात शिरला.
त्याच्या तसं हक्काने हातात देण्यानही तिच्या आत काहीतरी हललं. सर्व घेऊन ती आत आली.
"हे काम झालं सर",म्हणून संत्या बन्याशेजारी जाऊन बसला.
त्यांनी एकेक तक्ता उघडून पाहिला. इतकं छान चित्रण, वर्णन आणि समजेल अशी भाषा. दिवसभरात सतत मागे लागून ते सर्व करुन घेतलं होतं त्याने. एका ठिकाणी त्याला अचानक काहीतरी दिसलं,"इतकं बघून पण चूक राहिलीच.".
शुध्द्लेखनाची चूक होती ती. त्याने सपनाकडे खोडरबर मागितलं. तिनेही ते आणून दिलं. मग त्याने दुसरीची पहिली वेलांटी करुन घेतली. सगळे त्याचं काय चाललंय हेच बघत बसले होते.
एकदम मान वर करुन तो बोलला,"सातारला जाऊन आलो. फ्लेक्स चं काम झालंय. परवापर्यंत येतील बोर्ड. "
"अरे जेवलास का न्हाई मग?", बन्याने त्याला विचारलं.
"हां आता जातो आपलं झालं की घरीच.", संत्या हळूच आवाजात बोलला.
"किती उशिर झाला. अजून जेवला नाहीयेस?", सर रागावून बोलले.
"खाल्लं होतं सांच्याला", तो शरमून बोलला.
"काय नाही, चल आताच खाऊन घे जरा. सपना ताट कर गं. ", सर म्हणाले.
"न्हाई अवो सर ऱ्हाऊ दे.", संत्या.
"अरे एक भाकरी टाकायला किती उशीर लागतोय?", म्हणत बाईही उठल्याच.
सपनाही मग उठली. भाकरी होईपर्यंत तो मोरीत हात-तोंड धुवून आला. केसांवरुन त्याने ओला हात फिरवला तसे त्याचे उभे राहिलेले केस उलटे मागे झाले. क्षणभर त्याच्याकडे बघत सपनाने त्याच्या हातात रुमाल दिला. तोंड पुसून तो पाटावर बसला. बाई म्हणाल्या तसं दहा मिनिटांत भाकरी झाल्या होत्या. तोवर सपनानं ताटात लोणचं, चटणी, मीठ, एक हिरवी मिरची वाढून दिली. त्याला जेवताना बघून तिच्या पोटात कालवलं. दिवसभर किती दगदग केली होती काय माहित? 
         नेहमीसारखंच बोलून घरी परतायला उशीर झालाच. त्याचे डोळे आज थकलेले दिसत होते.
"जा झोप आता. किती दमलेला दिसतोस.", सर संत्याला बोलले.
"नाय सर, आता कुटं जागा झालोय.", म्हणत संत्या हलकंच हसला. तो गेल्यावर कितीतरी वेळ सपना त्याला आठवत बसली, उगाचच.

---------------------------

फ्लेक्स लागले आणि गावात चर्चा सुरु झाली. दिसेल तिथे तीच चर्चा चालू होती. इतकंस गाव ते, त्यात कुठे खुट्ट झालं तरी चौघांना कळायचं. इथे तर मोठा कार्यक्रमच होता. लोकं येऊन संत्याला, आबांना, सरांना, बन्याला प्रश्न विचारत होते. काय मदत पाहिजे? कसं काम आहे? किती वेळ थांबावं लागेल? बारक्या पोराला घेऊन आलं तर चालेल का? त्याचं जेवण मिळेल का? अनेक प्रश्न. त्या प्रश्नांतून उत्तरं देत, प्रश्न पडल्यावर उत्तरं शोधत आजचा दिवस आला होता. सगळं सामान शाळेत येऊन पडलं होतं. संत्यानं पोरांना कामं सांगून ठेवली होती. त्यात हयगय झाली तर त्याचा ओरडा खावा लागणार हे त्यांनाही कळलं होतं. त्यामुळे तेही मुकाट्याने आपली दिलेली कामं करत होते.
        पाण्याच्या टाकीचं आणि शौचालयाचं काम सुरु झालं होतं. पहाटेच काँट्रॅक्टरनं आपल्या माणसांना बोलावून आणलं होतं. पहाटेच सर, बाई, सपना, अम्या, विक्या, पाटील, बन्या सगळी शाळेवर पोचली होती. सगळ्या शिक्षकांनाही मदतीला बोलावलं होतं. नऊ वाजायला आले तशी बरीच मंडळी जमली. सरांनी एकेका शिक्षकांना आपापल्या वर्गाचं काम दिलं होतं. तिथले बेंच शोधून दुरुस्तीला द्यायचे, तक्ते लावून घ्यायचे. खिडक्या दुरुस्त करुन घ्यायच्या. पंखे, लाईट काय लागेल ते बघायचं आणि वायरमनला सांगून बसवून घ्यायचं. प्रत्येक सरांकडे ८-१० माणसं लावून दिली होती. त्यानुसार सगळ्यांचं काम सुरु झालं. चार रंगारीही आलेले होते. त्यांनी ज्यादा रंग, बादल्या, ब्रश आणलेले होते. काही लोकांना बाहेरच्या भिंती रंगवायचं काम दिलं गेलं. थोडी माणसं मातीच्या पाट्या एका जागेवरून ग्राउंडवर नेऊन टाकू लागली. नंतर एकसारखं लेव्हलिंग करुन घ्यायचं होतं.
      एरवी टापटीप असलेली सपनाची ओढणी आज कमरेला खोचलेली होती. तिकडे संत्याचं काम बांधकामाजवळ जोमात चालू होतं तर प्रत्येक वर्गात जाऊन काय काय लागतंय ते बघायचं सपनीचं होतं. एका वर्गातले बेंच तपासत ती मागच्या बाजूला आली. तिचा आठवीचा वर्ग होता तो. एका बेंचवर तिला त्याची ती नेहमीची खूण दिसली. 'SS' लिहिलेली. तिचं मन थोडा वेळ का होईना मागे गेलं. सरांनी त्याला कोपऱ्यात उभं केलं होतं ते तिला आठवलं आणि ती हसली. वर्गात फळ्यावर मराठी व्याकरणाचं काहीतरी लिहिलेलं होतं. कित्येक दिवसांत कुणी फिरकलं नसल्याने पुसट झालेलं. तितक्यात संत्या अम्या सोबत आत येताना तिला दिसला. दोघेही बोलता बोलता थांबले तिला बघून.
"चार बेंच हलतायत, त्यांच्यावर खुणा करुन ठेवल्यात मी.", सपना बोलली.
अम्याही झटक्यात,"मी मिस्त्रीला बोलावून आणतो", म्हणून पळून गेला.
"शार्दूलविक्रीडित", संत्या बोलला.
"हां?", सपनाला काही कळेना.
"ते वृत्त", फळ्याकडे बोट दाखवत तो बोलला.
"अच्छा हो, मला काही त्यातलं लक्षात राहायचं नाही. ",सपनाने कबूल केलं.

"म्हातारी उडता न येच तिजला माता मदीया तसी ।
कांता काय वदो नवप्रसव ते सातां दिसांची असी ॥
त्राता त्या उभयांस मी मज विधी घातास योजीतसे ।
हातामाजि नृपाचिया गवसलो आता करावे कसे! ॥
..
.. "
संत्या सुरात म्हणू लागला.

सपना काहीच न आठवल्यानं त्याच्याकडे बघत बसली. 

"नळदमयंती मध्ये होतं ना?", त्याने तिला आठवण करुन दिली.
तिनेही नुसतीच हो हो म्हणून मान हलवली. तिला काहीही आठवत नव्हतं. मराठीपासून ती केव्हाच दूर गेली होती.
"नळराज्याच्या तावडीत सापडलेला हंस सांगतोय राजाला की मला जाऊ द्या, माझी म्हातारी आई, माझी बायको नवजात मुलांची आई आहे. त्यांना काय वाटेल? असं तो म्हनतोय.", संत्याने अजून समजावलं. ती फक्त त्याच्याकडे आश्चर्याने बघत होती.

"काय अजून आसलं तर सांगा, मिस्त्री येतोयच.", म्हणून संत्या तिथून निघून गेला.

आणि सपना तिथेच उभी राहून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात राहिली. त्याच्या पायातल्या मातकट स्पोर्ट्स शूजकडे, त्याच्या झरझर चालण्याकडे, त्याच्या अंगातल्या त्या नेहमीच्या टी-शर्ट, जीन्सकडे. त्याचं हे चालणं, कपडे सर्व आधीचंच होतं, तिच्या परिचयाचं. पण त्या सगळ्या तुकड्यातून नवीन दिसणारा संत्या वेगळा काढू पाहात होती. पण ती रेषा आता धूसर होत होती. अम्या तिथे आला आणि ती पुन्हा कामाला लागली.

-------------------------

        दिवस सरला होता. पाटील सकाळी आणि संध्याकाळी पाहणी करायला येऊन गेले होते फक्त. बरीचशी लोकं पांगली. दिवस कधी संपला, काय काय काम झालं याचा हिशोब करेपर्यंत रात्र झाली. शाळेत असं रात्रीपर्यंत कधी थांबायची वेळच आली नव्हती. रात्रीच्या दिव्यात काहीतरी वेगळीच दिसत होती शाळा सर्वाना. त्यात तिचं असं पालटलेलं रुप. थोड्या बांधकामाला अजून २-४ दिवस लागणार होते. पण वरवरची बरीच कामं पूर्ण झाली होती. लॉकरमध्ये नवीन आणलेल्या वस्तू, साहित्य ठेवलं गेलं होतं. सर बाईना गाडीवर घेऊन जाणार होते आणि संत्या सपनीला. त्याला पर्याय नव्हताच. सर पुढे निघाले आणि त्यांच्यामागे त्याची गाडी. सपनाने तिचं नेहमीचं मळकं हुडी घातलं. ओढणी कानामागून पुढे घेतं चेहऱ्यावर घट्ट बांधली आणि त्याच्या गाडीवर मागे बसली. ती बसताना बाईकला हिसका बसला, त्याने तो त्याच्या दोन्ही पायांनी सावरला. त्याने 'झालं?' विचारलं आणि ती 'हं' म्हणाली. गाडी जोरात निघाली. त्याच्या अंगाचा घामाचा वास मागे तिच्याकडे येत होता. ओळखीचा वाटू लागला होता तो तिला. त्याची मान, हात उन्हानं काळवंडले होते. त्याच्या गाडीचा नंबर दुरुनही ओळखायची ती. आणि  त्याच्या दिसण्याचाही तितकाच तिरस्कारही करणारी ती आज त्याच्या गाडीवर बसली होती. सकाळपासून गेलेला दिवस आठवण्याची संधी मिळायच्या आधीच घर आलं होतं. तिला घराजवळ उतरवून तो फक्त 'येतो' म्हणाला आणि तिने उत्तर देण्याच्या आधी निघूनही गेला होता. 

क्रमशः

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, October 24, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - १५


       संध्याकाळी ती वेळ झाली आणि सपनाला भीती वाटू लागली. पटापट जेवण उरकून वैशूकडे जायचं तिने ठरवलं होतं. त्यासाठी सिरीयल बुडाली तरी तिला चाललं असतं. पण तिच्या दुर्दैवाने बेल वाजली होती. बन्या आणि संत्या आलेले होते. आज दुपारी शाळेतून आल्यापासून सरही एकदम खूष होते. किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. आपल्या सर्व कल्पना त्यांनी बाईंना आणि सपनाला सांगत दिवसभर भंडावून सोडलं होतं. बन्या आणि संत्या आल्यावर आपली सुटका झाली असंच बाईंना वाटलं. ते दोघे आल्यावर सरांनी लगेचच सरबत करायला सांगितलं बाईंना. दोघेही सरांकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघत होते इतके का ते खूष आहेत म्हणून.  
        सरांनी एक मोठा तक्ता बनवला होता. त्यावर चार भाग केले होते. वर्ग, शाळा, मुले आणि इतर सुविधा असे. प्रत्येकाच्या काय सुविधा हव्यात ते लिहून ठेवलं होतं. एकदम त्यांचा तो तक्ता बघून संत्याला सरांच्या क्लासचीच आठवण झाली. तितकंच ते नीटनेटकं लिखाण, अगदी मुद्देसूद, जणू भूमितीची प्रमेयच. वर्गात लाईट, पंखे, बेंच, तक्ते अशा काही दुरुस्त्या होत्या. शाळेसाठी, पाण्याची टाकी, कचराकुंडी, मुलं-मुलींची बाथरुम असे काही मुद्दे होते. मुलांसाठी, खेळाचं साहित्य, चित्रकलेचं सामान, कंप्युटर अशा काही वस्तूंची यादी होती. बाकी शाळेच्या बाजूने लावायचं कुंपण, बाहेरील भिंतींना द्यायचा रंग हे सर्व इतर गोष्टींमध्ये आलं. कामांची अशी यादी केलेली पाहून बन्या खूष झाला. 

"हे झ्याक केलंत सर तुम्ही. आता प्रत्येक गोष्टीचं शेप्रेट बजेट काढता यील.", बन्या त्या तक्त्याकडे बघत बोलला. 

"हे फक्त काय लागणार आहे त्याबद्दल आहे रे. मूळ कल्पना तर मी तुम्हांला सांगितलीच नाहीये.", सर जोमाने बोलले. 

दोघेही बघत होते फक्त सरांकडे. 

"हे बघा, आता या प्रत्येक कामाचे तुम्ही बजेट काढणार मग त्यातलं निम्मं पैशामुळे कॅन्सल होणार.", सर थेट बोलले.

"असं काही नाही सर, आपण बोलू की आबांशी.", बन्या बोलला.

"अरे हो, तू बोलशील रे. पण त्यापेक्षा मी काय म्हणतो ते ऐक. फक्त मुख्य कामांना, गोष्टींना जे काही पैसे  आणि माणसं लागतील तेव्हढंच बजेटमध्ये टाकायचं. आणि बाकी कामांसाठी गावातल्या लोकांकडून मदत मागायची.", सर हे सांगत होते, पण त्या दोघांनाही ते झेपेना. 

"संतोषराव तुम्ही सांगा, आपल्या गावात किती तरणी पोरं सांध्याकाळच्याला इकडं तिकडं फिरत असतात.", आता सरांनी असं डायरेक्ट बोलल्यावर त्याला काय बोलावं कळेना. बन्या गालात बारीकसा हसला असंही त्याला वाटून गेलं. 

"हा असतील १५-२० तरी.", तो शेवटी विचार करुन बोलला. 

"हा आता त्या १५-२० पोरांनी शाळेत येऊन थोडी मदत केली तर?", सरांनी विचारलं.

"नुसतं त्या तरण्या पोरांनीच नाही तर आता शाळेत शिकणाऱ्या पोरांच्या घरातलं एक तरी माणूस घ्यायचं. प्रत्येक घरातून एकेक केलं तर किती लोक जमा होतील?", सर बोलले. 

त्यावर बन्याची ट्यूब पेटली. त्याच्या प्रकाशाने त्याचे डोळे एकदम मोठे झाले. बन्याला असं एकदम जोशात पहिल्यांदाच बघत होता संत्या. 

"ही भारी आयडियाये.", बन्या एकदम चेकाळून बोलला. 

"होय का नाही? गावातल्या पोरांसाठी शाळा सुधारणा करतेय तर गावाची मदतही पायजेच.",सर बोलले. 

"पर ऊसाची कापणी चालूय, लोकं काम सोडून कसं येतील?", संत्यानं एकदम बरोबर मुद्दा काढला होता. 

"आपण सुट्टीच्या दिवशीच काम काढू ना? हफ्त्याची सुट्टी असतेय तेव्हांच.", सर बोलले. 

"अन त्यांच्या जेवण-खान्याची सोय करायची त्या दिवसाची, मग अजून लोकं येतील.", बन्याला लोकांची मानसिकता चांगलीच माहित होती. 

"हां करेक्ट",सर म्हणाले. 

"बरं एक काम करु आता प्रत्येक कामाला काय काय लागेल हे सर्व मांडू, म्हणजे कळेल लोकांची मदत कशात लागेल आणि काय सामानासाठी पैसे, बाहेरुन मदत लागेल.", सर बोलले. 

       संत्याने मान हलवली. त्याला एकदम वेगळं वाटत होतं काहीतरी वेगळ्या जगात असल्यासारखं. आयुष्यात असं कधीच केलेलं नव्हतं त्याने. एका उदात्त हेतूने काहीतरी करण्यात किती आनंद मिळू शकतो हे तो आता समजू लागला होता. त्यात सपना आजूबाजूला आहे याची जाणीव. एका वेगळ्याच टप्प्यावर आला होता तो. काही वेळाने, सरांनी सपनाला हाक मारली. दुसऱ्यांदा बोलावल्यावर ती नाईलाजाने बाहेर आली. 

"आत काय बसलीयस? इथे इतकं महत्वाचं काम चाललंय.जा एखादी वही घेऊन ये आणि बस खाली. ", सरांनी तिला दटावलं. 

      ती एक जुनी वही घेऊन आली आणि खाली बसली त्यांच्यासोबत. सरांनी हातात वही घेत शेवटच्या पानावर लिहायला पाहिलं. तिच्या अभ्यासाच्या काही वेड्यावाकड्या नोट्स त्याच्यावर लिहिलेल्या होत्या. तिचं ते अक्षरंही संत्याच्या ओळखीचं. त्याने पुन्हा ते बघायचं टाळलं. सरांनी पानं पालटून लिहायला सुरुवात केली. बांधकामाची कामं कुठली, त्याला लागणारं साहित्य, गवंडी लोक, पैसे दिवस हे सगळं हवं होतं. 
"तुम्ही लिहा सगळं, मी काँट्रॅक्टरना भेटून येतो दोन चार. किती पैसे, लोक, वेळ सगळं विचारतो. बघू काय सांगतात.", संत्या ते पाहून बोलला. 
"हां, तसं करुया.", बन्याने होकार दिला. 
वर्गांच्या कामाची, लागणाऱ्या साहित्याची यादी झाली. सपनाही हळूहळू त्यात गुंतत गेली. दोन चार वेळा तिची-त्याची नजरानजरही झालीच. त्याला नाईलाज आहे असं म्हणून ती गप्प बसली. तरीही संत्याची अस्वस्थता तिला क्षणात कळून गेली होती. 

"अरे हो, लोकांना सांगायला, बोलवायला प्लेक्स बोर्ड लावाय लागतील. त्याच्याआधी तारीख ठरवाय लागंल.", बन्याला आठवलं. 

"हे कॉन्ट्रॅक्टरचं, बजेटचं सगळं कळल्याशिवाय लोकांना सांगून काय फायदा न्हाई. ", संत्या बोलला. 
सरांनी ते फ्लेक्सचं लिहून घेतलं. 

"अजून एक काम आपल्याला हातोहात करता येईल. वर्गातले तक्ते. घरबसल्या कुणाला तरी सांगून करुन घेता येईल.", सर बोलले. 

"संत्या एक काम कर, तुझ्याकडं कोन पोरं असतील तर ते वर्गातले तक्ते करायचं बघ की. ", बन्याने त्याला सांगितलं. 

"हां हायेत एकदोन चांगलं अक्षर हाय त्यांचं. कुटल्या वर्गात कसलं तक्ते पायजेल ते लिहून द्या म्हंजे झालं.", संत्या सरांकडे पाहून बोलला. 

"सपने तू सांग गं. प्रत्येक तुकडीत काय काय अभ्यास ते सगळं तुला म्हायतीच आहे. ",सर तिच्याकडे पाहून बोलले. 

ती 'हो' म्हणाली. ती संत्याकडे बघत आठवेल तसे तक्ते सांगू लागली. तोही लिहून घेऊ लागला. त्याचं अक्षर ती पहिल्यांदाच बघत होती. एकदम रेखीव, सुंदर आणि नीटनेटकं, त्याच्या व्यक्तिमत्वाला अजिबात न शोभणारं. मग तिला आठवलं, त्याने तिचं कोरलेलं नाव. तेही रेखीवच असायचं की. पण त्याचा विचार करायची कधी वेळच आली नव्हती. कामाच्या नादात, रात्रीचे बारा कधी वाजून गेले कुणालाच कळलं नव्हतं. मध्ये दोन वेळा चहा, सरबतही झालं होतं. 

शेवटी बाई म्हणाल्या,"लै काम झालं एकाच दिवसात. झोपा आता.". 

त्या असं बोलल्यावर सर थांबले, म्हणाले,"हां खूप उशीर झालाय. झोपा तुम्ही पण. उद्या यातली जमेल तशी माहिती काढून घेऊन या. मग बोलूच पुढं.". 

       सर्वांनाच ते पटलं. भरपूर कामं होती उद्यासाठी. सगळ्यांच्यात इतका उत्साह भरला होता की काय बोलू, काय सुचवू असं प्रत्येकाला झालं होतं. जाईपर्यंत अजून ५-१० मिनिटं गेलीच. अगदी दारात उभे राहूनही दोन चार गोष्टी बोलू झाल्या होत्या. ते दोघे गेल्यावर घर एकदम शांत झालं. संत्या नसतानाही त्याचा मोजकंच बोललेला तो आवाज भरुन राहिलाय असं तिला वाटलं. त्याची पेन धरण्याची पद्धत, वहीत लिहिलेलं रेखीव अक्षर, तिच्या नजरानजर झाल्यावर आलेली एक भीतीची लकेर. सपना खाटेवर पडूनही जे झालं त्याचा विचार करत राहिली बराच वेळ.

-क्रमशः
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, October 23, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - १४

सपनीची सिरीयल चालू झाली होती, 'न कळले तुला, न कळले मला'. हातातला घास हातात धरुनच बघत होती ती. परीक्षा संपल्या, सुट्टी लागली होती. सुट्टीत सपनीचं रुप जरा खुलायचं. एकतर रोजची धावपळ नाही आणि घरी बसून खाऊ पिऊ घातलेलं अंगाला लागायचं. त्यात संत्याही परत तिला दिसला नव्हता. निदान तिच्यामागे तरी. बाकी गावात काहीतरी हालचाली चालूच होत्या. रोज कसली ना कसली बातमी असायचीच. छोट्या मोठ्या सुधारणाही दिसत होत्या तिला. पण त्यात तिला काहीच स्वारस्य नव्हतं. ती दुपारी वैशीकडे जाई, कधी घरच्या कुरडया-पापड तर कधी शेजारच्या काकीचे. दुपारी एखादं पुस्तक, एखादी सिरीयल. दिवस असा निघून जायचा. सरांचीही सुट्टीच होती. त्यामुळे रात्री शाळेपर्यंत चालत जायचं, येताना एखादी कुल्फी खायची गाड्यावर.

        सिरियलचा शेवट आला इतक्यात दारावरची बेल वाजली. सपनाची चिडचिड झाली. सर आत पेपर वाचत बसलेले आणि बाईनी तिच्याकडे पाहिलं. तिला नाईलाजाने जावंच लागलं दारात. दार उघडलं तर तिला संत्या दिसला. जोरात ओरडलीच ती, "आई" म्हणून. बाईही धावल्या तिचा आवाज ऐकून. सरही बाहेर आले पेपर हातात धरुनच. संत्याही घाबरला. त्याला कळेना काय बोलायचं. इतक्यात मागून बन्या समोर आला.
"नमस्कार सर", बन्या बोलला.
"या बन्याभाऊ काय म्हणताय?", सरांनी विचारलं.
"काय न्हाई काम होतं जरा. म्हटलं बसलं तर चाललं का?", बन्याने विचारलं.
"आर असं विचारताय काय? चला या आत.", सर आत जात बोलले.

सपना खरकटा हात घेऊन आत गेली. टिव्हीसमोरचं ताट तिने उचललं आणि मोरीकडे गेली. पण कान बाहेरच लागलेले.
"त्ये काय झालंय, तुम्ही तर बघतायच किती सुदारना चालल्यात गावात.", बन्या.
"होय होय, एकदम झकास काम चाललंय. परवाच कुंभारवाड्याकडं जाऊन आलो. रस्ता एक नंबर झालाय.", सर म्हणाले.
"होय, आपल्या संतोषरावांचंच काम बगा ते. लैच मनावर घेतलंय त्यांनी सध्या.", बन्या संत्याची पाठ थोपटत बोलला.
संत्या हलकंसं हसला. 
"चांगलं काम करताय. त्यात मी काय मदत करु?", सरांनी विचारलं. 
"त्येच इचारायला आलो हुतो. शाळेची बरीच कामं दिसली यादीत. हेडमास्तरांना भेटलो तर ते म्हनाले सरास्नी भेटा. ही यादी आनली हुती. एकदा बघता का?", बन्याने हातातली फाईल सरांकडे दिली. 

सर एकेक करुन त्यातले कागद वाचू लागले. वेळोवेळी शाळेत लागणाऱ्या छोट्या मोठ्या सुधारणांचे अर्ज होते ते. संत्या काहीच काम नसल्यानं हातांची चुळबूळ करत इकडे तिकडे बघत बसला. गोदरेजच्या टीव्हीच्या कपाटात बसलेला टीव्ही, त्याच्यावरच्या काळ्या केबलच्या डब्यावर धूळ बसली होती. त्याच्या वरच्या खणात शोकेसच्या नावाखाली जे काही ठेवलं होतं त्या प्रत्येक वस्तूची बारकाईने पाहणी करु लागला. काचेच्या दारात सपनीचा एक छोटा फोटो उभा करुन ठेवलेला होता. फोटोतली सपना पाहून तो कुठल्या वर्षाचा असेल हे त्यानं लगेचच ओळखलं होतं. त्याच्या मागे दोन लाकडी उंट उभे केलेलं होते. एक काचेचं मेणबत्तीचं स्टॅन्ड आणि त्यावर अर्धी जळलेली मेणबत्ती. शेजारी एक खोका. त्याच्यावरच्या चित्रावरुन आत काचेचे कप असणार असं वाटत होतं. खोक्याच्या वरही अजून बारीक सारीक वस्तू ठेवलेल्या होत्या. कुणाला त्या कपातून चहा द्यायलाही निदान तासभर मेहनत करावी लागली असती, फक्त तो खोका बाहेर काढून साफ करण्यासाठी. सपनीच्या फोटोवरुन आपली नजर हटवण्याचा प्रयत्न करत तो बसून राहिला. तिच्या घरात आज पहिल्यांदाच आला होता तो. तिने दरवाजा उघडला आणि ओरडली तेव्हा हार्ट अटॅकने तिथेच मरतो की काय असं त्याला झालं होतं. गेल्या दोन महिन्यांत त्याने तिचं तोंडही पाहिलं नव्हतं. आठ्वणीतल्याच चेहऱ्याला उजाळा देत असे कधी मधी. 

        सपना आतल्या खोलीत जाऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत बसून राहिली. आपण किती जोरात ओरडलो हे पुन्हा पुन्हा आठवत होती. तो इतक्या जवळ आहे या विचाराने तिला चैन पडेना. आपल्या घरात येण्याची त्याची हिम्मत बघून ती घाबरली होती. सर फाईल बघेपर्यंत जरा वेळ शांततेत गेला होता. त्यामुळे बाहेरचं काहीच ऐकू येईना तिला. ती हातात पुस्तक घेऊन बसून राहिली. 
   
"बन्याभाऊ यातले निम्मे अर्ज तर मीच भरले आहेत. काय करायचं आहे यांचं?", सरांनी विचारलं. 
"शाळा म्हंजे आपल्या गावाची शान हाय. आजवर इतकी हुशार पोरं दिली शाळंन. गावात बाकी सुधारना चालूच र्हातील पर या पोरांसाठी कायतरी केलं पायजे. संतोषनं त्याला आठवलं तशी अजून बी मोठी यादी दिली. मग म्हटलं नुसती यादी करुन काय उपेग? सुरुवात करायला पायजे. त्यात सुरवात कुटून करायची ह्ये कळंना. म्हनून तुमच्याकडं आलोय.",बन्या बोलला. 
"आबांनी सांगितलंय जे काय मदत लागंल ती करु, पैसा-मानूस सगळं.", संत्याच्या तोंडून पहिलं वाक्य बाह्येर पडलं. 
"सर, तुम्हाला चालत असंल तर रोज आपण बसून तयारी करु. तुम्ही फकस्त सांगा काय काय पायजे ते.", बन्या. 
सरांनी दोनेक मिनिटं विचार केला आणि म्हणाले उद्या हेडमास्तरांशी बोलून सांगतो. उद्या याच वेळेला या परत."
"हां चालंल", बन्या बोलला आणि उठला. क्षणात दोघं उठून चप्पल घालून निघालेही. 
"येतो मग आम्ही उद्या परत", म्हणत बन्या निघाला आणि सोबत संत्याही. 

सरांनी बसून पुन्हा एकदा ती फाईल वाचायला घेतली. सपना, बाई बाहेर आल्या आणि त्याही ते कागद वाचू लागल्या. सपनाला मात्र उद्या पुन्हा तो आपल्या घरात येणार या विचाराने चैन पडत नव्हती. तिची सुखासुखी चाललेली सुट्टी अशी विस्कटली होती. 

----------------------------

पोरांचे पेपर तपासणे सोडून बाकी काही काम नव्हतं. सगळे शिक्षक सकाळी थोडा वेळ शाळेत फेरी मारुन जात. त्यात निकालाचा दिवस जवळ येत होता त्यामुळे सर्वांची मार्कशीट तयार करणे चालू होतं. सरांनी फोन करुन हेडमास्तरांनाही शाळेत बोलवून घेतलं होतं. स्टाफरुममधून त्यांच्या केबिनच्या दारातून आत येत सरांनी विचारलं,"येऊ का आत सर?". 
कुलकर्णी सरांनी आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढत त्यांना हातानेच आत येण्याची खूण केली. सर येऊन समोर बसले आणि एकदम मुख्य मुद्द्याकडे वळले. 

"ते काल बन्या आणि आबांचा मुलगा आला होता माझ्याकडे.",सर. 
"हां मीच त्यांना पाठवलं होतं. म्हणलं आपल्या शाळेचे इतके वर्षांपासून काम करत आहात. शाळेसाठी कितीतरी सूचना तुम्ही दिल्यात पण खूप कमी अंमलात आल्या. आता कुणीतरी विचारत आहे तर हे तुमच्या सल्ल्यानेच होऊ दे. ", कुलकर्णी सर बोलले. 
"थँक्यू सर. मी काल पाहिली ती फाईल. हे बघा ही मुख्य कामांची यादी केलीय. म्हणलं तुमच्याशी बोलून कामं फायनल करावी. ", सरांनी कागद पुढे केला. 
"हे बरं केलंत. उद्या परत त्यांनी अर्धवट ठेवलं तर सगळंच राहून जाईल. या लोकांचा काय भरोसा? ", म्हणत कुलकर्णी सरांनी ती यादी चाळली. एक दोन मुद्यांना खालीवर करत त्यांनी कागदावर पेनाने दुरुस्ती केली. 
"हे घ्या" म्हणून परत सरांच्या हातात दिली. 
"मी काय म्हणत होतो सर, एक कल्पना आहे.", सरांनी पुढे होऊन सांगितलं. हेडमास्तरांनी चष्म्याच्या वरच्या रेषेतून त्यांच्याकडे पाहिले. 
"आता पोरांना सुट्ट्या आहेत पुढं. शाळेची बरीच कामं चार ज्यादा लोक आले तर होऊन जातील. मला वाटतं गावातल्या बाकी लोकांची पण मदत घ्यायला पायजे हे सर्व करायला. नुसते गवंडी, सामान आणून देऊन काय होईल ? त्यापेक्षा आपणच आपल्या शाळेच्या सुधारणा करायच्या. पैसे, माणूस आणि काही लागलं तर हे लोक आहेतच. ", सर बोलले. 
कुलकर्णींना कळेना काय बोलावं. 
"अहो पण कोण येईल बिनपैशाचं काम करायला? आणि सगळ्यांना सगळं जमतेच असं नाही ना?", ते बोलले. 
"अहो पण साधी गोष्ट, समजा मोडलेले बेंच दुरुस्त करायचे आहेत, निदान मोडके बेंच शोधून ते एकत्र आणू तरी शकतील ना लोक? बारीक सारीक खूप मदत होईल. हे ग्राऊंडच्या बाहेर कचरा असतो, ग्राऊंडचं लेव्हलिंग आहे. नुसत्या पाट्या जरी इकडे तिकडे गेल्या लोकांनी तरी किती पैसे वाचतील. खूप कामं होतील आपली. ", सर उत्साहात बोलले. 
कुलकर्णीनाही ते पटलं. 
"याचसाठी मी त्या पोरांना तुमच्याकडे पाठवलं. तुमच्या कल्पना आणि शाळेवरचं प्रेम यावर पूर्ण विश्वास आहे माझा. तुम्ही म्हणाल ती पूर्व.", ते बोलले. 
"थँक्यू सर. ही शाळाच तर आहे आपली, बाकी काय संपत्ती आपली?", सर भारावून बोलले. 
कुलकर्णी सर हसले. 
सर उठून हात जोडत "बरं येतो मी" म्हणून निघून गेले. 
त्यांना आता ही कल्पना केव्हा एकदा बन्या आणि संत्याला सांगतो असं झालं होतं. 

क्रमशः

-विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, October 22, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण -१३


सकाळी नवाच्या ठोक्याला बन्या पार्टी ऑफिसला येणार हे माहित होतं. संत्या सकाळी आवरुन बन्याच्या आधी तिथं पोहोचला होता. बन्या आला तो मोठाल्या दोन पिशव्या घेऊन. त्यात बऱ्याच फायली होत्या, कागद होते. त्याचं सामान बघून संत्या दचकलाच. हातातलं सामान घ्यायला धावला तर बन्या म्हणाला,"अजून चार पिशव्या हायत, गाडीला लावलेल्या."
संत्या त्या पिशव्या घ्यायला धावला. ढीग टेबलावर ठेवून बन्या संत्याच्या समोर बसला. एकेक फाईल काढून सांगू लागला.
"संतोषराव, या दिवसाची वाट बघत होतो. गावाच्या कामासाठी तुमच्या पप्पांसोबत इतकी वर्षं काम करतूय. रोज मेलं तरी काम संपणार न्हाई, इतकं काम हाय. ही बघा, रस्त्यावरच्या दिवांच्या मागणीची फाईल. ही घंटागाडी सुरु करायची मागणी असलेली. ही बज्या पाटलाची कोर्टाच्या कामाची. त्याचा म्हातारा कोर्टाचं चक्कर मारुन झिजून मेला पर त्याला न्याय मिळाला न्हाय आजवर. प्यायच्या पाण्याच्या शुद्धीकरणाची, वाढीव बसच्या मागणीची, कुनाची कर्जमाफीची. अजून पायजे तितक्या देतो. यातली थोडी काम आपल्या हातात हायत तर बाकीची कामासाठी हेलपाटे घालाय मानूस न्हाई म्हनून ऱ्हायलेली.

        आबा किती ठिकानी फिरणार? तलाठ्याचं हापिस, ग्रामपंचायतीचं हापिस, पंचायत समिती, सारखं चालूच असतंय त्यांचं काम. बरं हिथं लोकांना नुसतं काम करुन पायजे, मदत नको करायला. प्रत्येक कार्यकर्त्याला बोलावून कामाला लावला पायजे. हे सगळं कोन करनार? आपल्या गावाच्या तक्रारी आपन मांडल्या नीट तर सरकार कायतर करनार त्यावर. रोज तुमी पोरं हिथं धुडगूस घालत बसताय, त्या परीस पोरांना कामाला लाव. कोपऱ्याकोपऱ्याव ढिगानं कचरा पडलाय. तिकडं शाळेत पोरांना पाण्याची चांगली टाकी बी न्हाई. करेल तितकं कमीच हाय. बघ, वाच आधी समदं. ", बन्या बोलत होता आन संत्या ऐकत होता. दहा वाजले तसं बन्या उठला.

"जावं लागल, काम हाय. पर तुला सांगतो मी लागली ती मदत करीन. असा कुढत बसू नगंस. ",बन्या बोलला.
संत्यानं मान हलवली.

बन्या निघून गेला आणि संत्याचं डोकं पार गोंधळून गेलं. फायलींचा ढीग घेऊन तो बसला होता. एकेक करत त्यातली माहिती वाचण्यात दुपार कधी झाली कळलंच नाही. अम्या तावातच आला. गाडी स्टॅन्डवर लावून तडक त्याच्या केबिनमध्ये घुसला. त्याच्याकडे बघून संत्या दचकलाच.

"काय रं, कवाधरनं तुला फोन करायलोय. चार दिवस झालं. म्हनलं इतका राडा झालाय त्यादिवशी, जरा शांत होवू द्यावं. पन तू तर साधा फोन बी करनास. मी, विक्या किती वाट बघायची?", अम्या बोलला.
"हे बघ बस हितं.", संत्यानं दोन फायली त्याच्याकडं देऊन त्याला वाचायला सांगितलं.
"मी काय करु यांचं?", अम्याला काय कळंना.
"वाच तरी. ",संत्यानं त्याला बसवलाच.

गावातल्या शेतकऱ्याच्या अर्जांची फाईल होती ती. कुणी किती पैसे खर्च करुन, पिकाला पाणी देऊन, किती कर्ज काढून, त्यांना किती नुकसान झालं याची. एकेका शेतकऱ्याच्या कर्जाची आणि नुकसानाची रक्कम बघून अम्या घाबरलाच. गावात किती विहिरी आहेत, कितींना पाणी नियमित येतं, उन्हाळ्यात कुठल्या विहिरींचं पाणी आटतं. कालव्याला किती पाणी आलं पाहिजे. अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत कालव्याचं पाणी न्यायला किती त्रास होतो. तो कसा कमी करता येईल, इरिगेशन साठी सरकारनं दिलेला किती पैसा प्रत्यक्षात गावापर्यंत पोचला होता. एक ना अनेक भानगडी होत्या.

        अम्या जरा वेळ बसून वैतागून निघून गेला. संत्यानं अम्यानेच आणलेलं जेवण करुन परत कामात गुंतला होता. संध्याकाळी कधीतरी अंधार पडल्यावर तो ऑफिसमधून बाहेर पडला. सकाळपासून डोक्यात नुसती भर पडत होती. त्यातला प्रत्येक विचार सुटा करुन त्याला निवांत वेळ द्यायला झालाच नव्हता. डोकं सुन्न झालं होतं. संत्या गाडीवर बसला आणि शाळेकडे गेला. शाळेच्या मैदानाच्या दूरच्या कोपऱ्याला एक वडाचं झाड होतं आणि त्याच्या आजूबाजूने बांधलेला कट्टा. शाळेची पोरं तिथे डबा खायला आणि नंतर पारंब्यांना लटकून खेळायला सतत असतंच. संत्याचीही ती आवडती जागा होती. गाडी बाजूला लागून तो कट्ट्यावर बसून राहिला. अंधारून आलेलं. समोर अजून दोन चार पोरं खेळतच होती. त्यांच्याकडे बघून त्याला शाळेतली आठवण झाली. कबड्डी आणि खो खो चे सामने जिंकले होते शाळेने तेव्हाची. त्यांच्या संघाचा मोठा सत्कार झाला होता आणि त्यांचा नायक म्हणून त्याला मिळालेलं विशेष पारितोषिक. आयुष्यात पहिल्यांदा शाळेत कसलंतरी बक्षीस मिळालेलं. बाकी अभ्यासाची बक्षिसं घ्यायला सपना होतीच.

        'सपना' त्याला नाव घेताना परत त्याच्या काळजात चरचरलं. पण त्या प्रसंगाची बोच कमी झाली होती. तिच्यासोबतचे शाळेतले वेगवेगळे किस्से त्याला आठवू लागले आणि तिच्यावरचा राग बराच कमी झाला. बसमागे धावणारी, ट्रॅक्समध्ये अभ्यास करणारी, पळत येऊन पैसे देणारी सपना त्याला आठवली आणि ओठांवर हसू आलं. किती बोचरी असते ना कातरवेळ? कितीही नाही म्हटलं तरी त्या वेळी येतेच आठवण आपल्या माणसाची. आपलं नसलं तरी आपलं हवं असं वाटणाऱ्या एखाद्याची. अनेकदा ती आपल्यासोबत या कट्ट्यावर बसावी असं वाटायचं त्याला. तिथे बसून त्यांनी काय गप्पा मारल्या असत्या माहित नाही. त्याच्या ओठांवर ग्रेसचं गाणं येऊ लागलं,
"भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकवली गीतें.".

           कितीतरी वेळ तो तसाच कट्ट्यावर बसून राहिला. आपण तिच्याशी ग्रेसच्या गप्पा मारल्या असत्या का? संत्याला प्रश्न पडला. मुळात आपण तिच्याशी काय बोललो असतो हा विचार त्याने आजवर केलाच नव्हता. ती समोर आली की पाहणे, ती नसेल तेंव्हा तिचा शोध घेणं इतकंच काम होतं. पण खरंच शेजारी बसली तर काय? त्याला वाटलं, विचार करायला हवा. मग त्याने मुद्दे काढले तिच्याशी बोलायचे. पिक्चर, अम्या-विक्या आणि अनेक लेखक हे सोडून काहीच नव्हतं त्याच्याकडे बोलायला. मग त्याला एकटं वाटू लागलं. आपण ज्या व्यक्तीला इतकं जवळचं समजतो तिच्याशी बोलायला काहीच नाही? प्रश्नांमधून तो आपलं अस्तित्व शोधत होता. आकाश काळवटुन गेलं. पटांगणाच्या पलीकडल्या गणपती मंदिरातून आरतीची घंटा ऐकू येऊ लागली होती. तो चालत तिथंवर गेला. एक नवीन लग्न झालेलं जोडपं दिसलं दर्शनाला आलेलं. आरती संपल्यावर देवाला नमस्कार करुन पुन्हा गाडीकडे वळला. गाडी यंत्रवत घरी आली.

         यंत्रवतच जेवला आणि पलंगावर पडला. इतक्या दिवसांची अपमानात हरवलेली शरीराची भूक चाळवली. जग्याच्या कॅफे मध्ये बसून पाहिलेली ती फिल्म आठवू लागली. त्यातलं ते जोरजोरात आवाज काढणारं जोडपं. तो ताठरला आणि तितकाच लवकर शांतही झाला. एक क्षणही झाला नसेल आणि त्याला पश्चाताप होऊ लागला. हे असं त्याचं नेहमीचंच. पॉर्नच्या इतके व्हिडीओ पाहिलेले. पण शांत झाल्यावर हे सगळं नको वाटायचं. आपण त्या मोहाला भुललो म्हणून राग यायचा स्वतःचाच. अशा वेळी पुन्हा एकदा सपनीची आठवण यायची. तिची माफी मागून तिला कुशीत घेऊन झोपायची इच्छा बळावयाची. त्याने उशी पोटाशी धरली आणि कधीतरी त्याला झोप लागून गेली.

- क्रमशः

विद्या भुतकर. 

Sunday, October 21, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण -१२

दोन दिवस सरले तरी सपनाच्या मनातून संत्याचा तो किस्सा जात नव्हता. इतकं सगळं सहन करुन घेतलं आजवर पण प्रत्यक्षात कधी बोलायची वेळ आली नव्हती. तो कसा आहे याची तिला चांगलीच कल्पना होती. त्यामुळे हे कुणालाही सांगितलं तर गावात त्याच्याबद्दल मोठा बोभाटा झाल्याशिवाय राहणार नव्हता. वैशूला सांगावं तर ती घाबरुन घरी बोलली असती. सरांना सांगितलं तर ते सरळ संत्याच्या घरी जाऊन त्याला थोबाडीत मारुन आले असते. तिचा जीव कासावीस होत होता. संत्याने पिरगाळलेला हात, दोन्ही हातांनी रागाने धरलेले खांदे, त्याच्या तोंडाचा तो दारुचा वास, त्याच्या डोळ्यांतला राग, सगळं तिला आठवत होतं आणि आपण अजून दोन चार कानाखाली का दिल्या नाहीत असं राहून राहून वाटत होतं. अभ्यासात अजिबात मन लागत नव्हतं म्हणून थोडा वेळ ती वैशूकडेही जाऊन आली होती. नाईलाजाने काहीतरी वाचावं लागणार म्हणून शेवटी ती पुस्तक समोर धरुन बसली होती. कितीतरी वेळ सर तिच्या बाजूला येऊन उभे राहिले तरी तिला त्याची जाणीवही झाली नव्हती.

शेवटी सरांनी जरा जोरात आवाजात विचारलं,"काय म्हणतोय अभ्यास सपनाबाई?".
त्या आवाजाने सपनाची तंद्री भंग पावली.
"हां चालूय. ",सपना काहीतरी बोलायचं म्हणून बोलली.
"दिसतंय किती अभ्यास चालूय ते. दोन दिवस झाले तुझं लक्ष नाही कशात? म्हटलं विचारावं काय झालं म्हणून.", सर बोलले.
आपला चेहरा वाचण्याइतके आपण त्रस्त दिसतोय या विचारांनी सपना अजून बेचैन झाली. आता विषय एकदमच टाळता येणार नव्हता, काहीतरी सांगावंच लागणार होतं.
"या गावात मुलीला स्वप्नं बघण्याची काहीच मोकळीक नाहीये का?", सपना बोलली.
"का बरं? गावाचं जाऊ दे, आपल्या घरात तरी आहे आमच्या मुलीला. आणि मुळात ती मोकळीक देणारे आम्ही कोण? तो तिचा हक्कच आहे. आजतागायत आम्ही तो कधी नाकारला नाही आणि या पुढेही कधी हिरावून घेणार नाही. बरं, पण स्वप्नं तरी काय आहे, आम्हालापण कळू दे की?', सरांनी मोकळेपणाने तिला विचारलं.
"मला पुढं शिकायचं आहे, एमेस्सी नंतर पीएचडी करायची आहे, एखाद्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर बनून मुलांना शिकवायचं आहे. ",सपना बोलली.
"इतकंच ना? मग कोण अडवतंय तुम्हाला?",सरांनी विचारलं.
"इतकंच नाही. मी नोकरी करायला लागले की तुम्हांलाही या गावातून बाहेर घेऊन जायचं आहे.",सपना.
"गावातून बाहेर का बरं? आमचं चांगलं चाललंय की इथे?", सर हसून बोलले.
"काय आहे काय या गावात? अशिक्षित, अडाणी लोक, तसलीच त्यांची मुलं, नुसती बोंबलत गावभर फिरत असतात. कुणाला आयुष्यात पुढे जायचंच नसतं. आहे त्याच डबक्यात राहतात, त्यातच आनंद मानतात. एखादीनं पुढे जायचं म्हटलं तरी यांच्या डोळ्यांत खुपतं. त्यांचं जाऊ दे, शिकलेले लोक तरी काय शहाणे आहेत का?", सपना बोलली.
तिच्या मनातलं सर्व ऐकून सरांना तिची काळजी वाटू लागली होती. ते ऐकत राहिले.
"आता त्या शिंदे सरांच्या मुलाने मोठ्या तोंडाने सांगितलं की मला या जुन्या चाली रीती नाही पसंत आपण प्रत्यक्ष भेटून बोलू. म्हटलं चला चांगला वाटतोय मुलगा. त्याच्याशी दोनदा भेटले, बोलले. तेव्हा अगदी मोकळेपणाने बोलला. परवा त्याला सहज म्हणलं मला पुण्याला जायचं आहे पीएचडी साठी तर याचा चेहरा पडला लगेच. ",सपना बोलली.
"अगं पण ठरलंय का आपलं अजून काही पुण्याला जायचं, मग कशाला विषय काढलास?", सरांनी विचारलं.
"नसेल ठरलं पुण्याचं, मुंबईला जाईन, अजून काहीतरी करेन, पण तो विषय काढल्यावर त्याचा चेहरा पाहून कळलं की जेव्हा हे सर्व ठरवायची वेळ येईल तेव्हा हा ऐकणार नाही. त्यानंतर दोन दिवस झाले त्याचा फोन नाही, मेसेज नाही. इतके दिवस तर गॉड बोलत होता एकदम. आणि आता बोलणंच बंद?", सपना रागाने बोलली.
"हे बघ, तू इतका विचार नको करु. तू आता फक्त अभ्यास कर, नीट पेपर दे. आता काळजी करुन मार्क कमी मिळाले तर इतकं बोलून काहीच उपयोग नाही. आपल्या मार्कांनी लोकांना दाखव तुझी हुशारी, मग बघू तुला कोण अडवतो ते.", सर विश्वासाने, आपुलकीने बोलले.
सपनाला थोडं बरं वाटलं. तेही तिची पाठ थोपटून निघून गेले आणि सपनाला थोडा झाल्या गोष्टींचा विसर पडला.
--------

संत्याला मात्र दोन दिवस झाले तरी मनाची उभारी येत नव्हती. आतल्या खोलीतून बाहेर यायची इच्छाच मेली होती. विचार करुन डोकं सुन्न झालं होतं. आजवर अपमान, दुःख याची जाणीव झालीच नव्हती त्याला. एखाद्याचा आपल्याला इतका राग यावा आणि तरीही त्याच्यावरच प्रेम असावं यांच्यासारखी दुःखाची गोष्ट ती काय?  संत्या झालेला प्रसंग पुन्हा पुन्हा चाळवत बसला होता. संध्याकाळी बातम्या सुरु झाल्यावर काकीने त्याला बाहेर हाक मारली. काकी बातम्या बघत भाजी निवडत बसली. इतक्यात बन्या, त्याची बायको आणि पोरगी घरी आले. तिघेही चांगले कपडे घालून आलेले.
"येऊ का काकी आत?", वर्षानं विचारलं तशी काकी झटपट उठली. तिघांना असं आवरुन आलेलं बघून 'आपण काय विसरलो' याचा विचार करु लागली.
बन्या सोफ्यावर बसून बातम्या बघू लागला. वर्षानं काकीच्या हातातून भाजीची टोपली घेतली आणि निवडायला लागली.
"आज पोरीचा वाढदिवस हाय, म्हनलं तुमचा आशीर्वाद घ्यावा.", बन्या बोलला.
"हां तरीच म्हनलं काय विसरलं?", काकी बोलली. काकीने संत्याला बाहेर हाक मारली.
बाहेर कुणाचा तरी आवाज येतोय म्हटल्यावर संत्या नाईलाजाने शर्ट घालून बाहेर आला.
त्याला बघून बन्या सोफ्यावर बाजूला सरकला आणि शेजारी बसायला हात दाखवत म्हणाला,"काय म्हणताय संतोषराव?".
संत्या शेजारी बसला. बन्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायची त्याला गरज वाटली नाही.
"चहा ठेवते", म्हणून काकी स्वयंपाकघरात गेली होती. वर्षाही निवडलेली भाजी घेऊन काकीच्या मागे गेली. बन्याच्या मांडीवर असलेली ती सहा वर्षाची पोर. तिला मात्र काय करायचं कळत नव्हतं.
"काय कितवीला गेली जानवी?", संत्याने तिच्याकडे बघत विचारलं.
"पयलीला जानार", पोर लाजून बोलली.
"आर व्वा ! भारीच की.", म्हणत संत्यानं तिची पाठ थोपटली.
"बालवाडीला जातीय सध्या. जानू ते ट्विंकल ट्विंकल म्हनून दाखव की.", बन्याच्या डोळ्यांत पोरीचं कौतुक होतं.
पोरगी ट्विंकल ट्विंकल म्हणायला लागली. संत्यानेही टाळ्या वाजवत तिच्यासोबत मान डोलावली.
वर्षा चहाचे कप बाहेर घेऊन आली तीही पोरीचं गाणं ऐकू लागली. काकींनी आरतीचं ताट करायला सांगितलं वर्षाला. ती आत गेल्यावर चहा घेताना बन्या संतोषकडे बघून बोलला.
"अजून नाराज हाय का?", संत्याने त्याच्याकडे पाहिलं फक्त.
"संतोषराव, तुमचं वडील हायत ते. त्यांनी चिडायचं न्हाय तर मग कोन चीडनार? बापानं हात उचलला म्हनून इतकं मनाला न्हाई लावून घायचं. चला, जरा भायेर पडा आता घरातनं. उगा सुतक आणायचं न्हाय तोंडावर.", बन्या त्याला समजावत होता. थोड्या वेळाच्या अबोल्यानंतर संतोष बोलला,"संपलं सगळं बन्या. आता मी काय करनार? काय सुचत न्हायी.".
"आता इतक्यात संपलं? आता तर सुरुवात झालीय संतोषराव. मी कशाला हाय हितं. काय लागल ते काम करतो. तुम्ही फक्त सांगा. आबांचं चिरंजीव हाय तुमी. ", बन्याच्या आवाजातला उत्साह पाहून संत्याला बरं वाटलं.
"दोन दिवस झालं इचार करतूय. चुकलंय, पटलं. पन ते दुरुस्त कसं करायचं? आजवर काय केलं न्हायीए मी.", संत्या बोलला.
"बास इतकंच ना? एक काम करा, उद्या पार्टी हॉपिसला या. मी सांगतो काय करायचं त्ये." बन्याने त्याला समजावलं.
संत्याने मान हलवली.
काकींनं पोरीला हाक मारली.
जानवीला पाटावर बसवलं, तिला ओवाळलं आणि शंभरची नोट हातांवर टेकवली तशी वर्षा आणि बन्या दोघं ही एकदम पुढे झाली.
"काय काकी, याच्यासाठी आणलीय व्हय पोरीला हिथं? तुमचा आशीर्वाद द्या फकस्त. बाकी काय नको. पैसे दे परत आजीला." बन्या पोरीकडं बघत बोलला. तिनेही नोट काकींकडे धरली. पण काकीने पोरीला जवळ ओढलं आणि "आयुष्यवंत हो" म्हणून आशीर्वाद दिला.
"चॉकलेट घे काय?", काकीने हळूच पोरीला सांगितलं. तीही हसली. तिघे आले तसे गाडीवर बसून परत फिरलेही.
'गोड पोर हाय", म्हणत काकी रात्रीच्या जेवणाची तयारी करायला गेली.

संत्याच्या चेहऱ्यावर थोडी हुशारी आली होती. त्याने जेवण उरकलं आणि बाहेर अंगणात येऊन बसला. उन्हानं घर कसं खायला उठायचं. रात्री बाहेर बसून वारं खायला बरं वाटायचं. मागच्या दारातल्या खाटेवर तो बसून राहिला, आकाशाकडं बघत एकटक. एकप्रकारची शांतता मनाला मिळाली होती. डोक्यातलं एक वादळ शांत झालं होतं.

- क्रमशः

विद्या भुतकर. 

Thursday, October 18, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - ११

        संत्या कितीतरी वेळ तिथेच उभा होता, झाल्या प्रसंगातून सावरणं त्याला अजूनही जमत नव्हतं. तो चालत चालत पार्टी ऑफिसला परतला. पोरांचा गोंधळ चालूच होता. त्याचं कशातही लक्ष नव्हतं. विक्या त्याला काहीतरी विचारणार इतक्यात बाहेरचा दंगा एकदम बंद झाला. पाटील आले होते. 

"संत्या!!", पाटील एकदम जोरात ओरडले आणि ताडकन त्यांनी त्याच्या कानाखाली मारली. 
"एकदा ताकीद दिऊन पन हे नाटक वाढतंच चाललंय तुमचं. जरा बघा की आजूबाजूला काय चाललंय.", पाटील बोलले. 
सगळी पोरं शांतपणे उभी होती. 
"काय रे, तुम्हांला काय हे हाटेल वाटलं का? यायचं, खाऊन पिऊन जायचं. खर्च जातोयच पार्टीच्या खात्यात. हे बगा की किती कचरा केलाय. सांगितलं हुतं ना मी हे असलं सगळं चालणार न्हाई म्हून? तरीपण सुधारना न्हाई. परत हे असले टवाळक्या करताना पोरं दिसली तर सरळ पोलिसांना बुलवून आत टाकायला लावीन एकेकाला. चला हे सगळं साफ करा आन चालते व्हा हितनं.", पाटलांच्या आज्ञेनुसार सगळे एकेक वस्तू, पसारा उचलून निघून गेले. 
संत्या अजून तिथेच उभा होता, काहीही न बोलता. सगळे गेल्यावर पाटील आत केबिनमध्ये येऊन खुर्चीत बसले. 
"तुम्हाला म्हायतेय का किती कष्टानं नाव कमावलंय तुमच्या आज्या-आबानं? हे सगळं दिसतंय ते काय आभाळातंन आलेलं न्हाई. आजवर म्हेनत केलीय आमी. सगळं आयतं मिळालं म्हनून आसलं धंदे सुचायलेत तुम्हाला. हे नाच, गाणं याच्यासाठी हॉपिस काढून दिलं का तुम्हाला? उद्या तुम्हाला हाकलला तर हजार पोरं हुबी र्हातील ही जागा घ्यायला तुमची. आन तुम्हाला त्याची काडीची किंमत न्हाई. हे असले थेरं चाल्लेत. हे सगळं साफ करुन घरला यायचं आन उद्यापासनं हिकडं न्हाई आलं तरी चालंल. लायकी न्हाई तुमची हे सगळं द्यायची. ", पाटील तावातावाने बोलले. 
संत्याने मान हलवली. ते निघून गेल्यावर त्याने कचऱ्याचा एकेक तुकडा उचलून एका पिशवीत टाकला. झाडूने केबिन, बाहेरची खोली सगळीकडचा केर काढला. कंम्प्यूटर नीट बंद करुन त्याच्यावर कव्हर घालून ठेवला. सगळं झाल्यावर बेंचवर कितीतरी वेळ बसून होता. आज त्याला कुठेही जायची इच्छाच होत नव्हती, घरी तर नाहीच नाही. त्याने काकीला फोन करुन सांगितलं,"काके मी हॉपिसातच झोपतोय आज. सकाळी येतो.". 
इतक्यात काकींकडे सगळा निरोप गेला होता. पाटलांना संतापात जेवणही जात नव्हतं. त्यांचा राग बघून 'पोरगं आज घरी न आलेलाच बरा' असं काकीलाही वाटलं. 
तिने 'बरं' म्हणून संत्याचा फोन ठेवून टाकला आणि पाटलांना टिव्हीवर बातम्या लावून दिल्या. 
"किती वर्श अशी काढायची? ल्हान हाय, ल्हान हाय म्हनून इतकं दिवस गप बसलो. तो बन्या रोज सकाळी जाऊन इचारतो यांना काय काम हाय का. रोज यांची मस्ती चाललेली असती तिथं. बाकी पोरं होती म्हणून वाचला, न्हायतर लै मार खाल्ला असता त्यानं माजा.", पाटील टिव्ही बघता बघता बोलत होते. काकीला माहित होतं आज बोलण्यात काही अर्थ नव्हता. ती आपली कामं उरकायला निघून गेली. 
संत्या ऑफिसचं दार बंद करुन बेंचवर तिथेच पडून राहिला. विचार करता करता कधी झोप लागली त्यालाही कळलं नव्हतं. 

---------


         डोक्यावरचा पंखा जोरजोरात फिरत होता. अंग आखडून बाकडयावरच झोपलेल्या संत्याला थंडीनं जाग आली. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि आपण कुठे आहोत ते त्याच्या लक्षात आलं. तसंच झोपून राहण्याचा प्रयत्न केला त्याने पण खूप थंडी वाजत होती आणि भूकही जोरात लागली होती. भुकेच्या जाणिवेने त्याला स्वतःवर राग आला, इतक्या अपमानानंतर सुद्धा आपल्याला भूक लागली आहे या विचारानं. शेवटी तो उठला आणि चालतच घरी निघाला. पहाटेचा गाव वेगळाच दिसत होता. धुरकट उजाडलेली पहाट, अंगाला लागणारा थंड वारा, गल्ल्यातून अधेमध्ये असलेले खाचखळगे, हातात तांबे घेऊन चाललेली काही मंडळी, तर काही परतणारी. हातात पाट्या घेऊन कपडे घेऊन ओढ्याला निघालेल्या बायका, भुंकणारी कुत्री, आरवणारी कोंबडी. कुणाच्या दारात नळाला पहाटेचं पाणी यायचं म्हणून सकाळी लागलेली लोकांची रांग. बायका काखेत घागरी, एका हातात भरलेली, हेळकांडणारी पाण्याची बादली घेऊन घाईघाईत घरापर्यंत पोचत होत्या. एकदा तर त्याला वाटलं पटकन ती बादली हातात घ्यावी आणि त्या बाईच्या घरी नेऊन द्यावी. किती छोटा होता त्याचा गाव आणि आपण अजूनही छोटे. एक प्रकारचं खुजेपण त्याला जाणवू लागलं. 
         संत्या घरी पोचला तर पाटील तयार होऊन बसलेले. काकीनं त्यांना चहा दिला. संत्याला बघून दोघेही गप्प झाले. तो निमूट आतल्या खोलीत जाऊन खाटेवर पडला. 
काकीने पाटलांकडे पाहून विचारलं,"परत कधी?". 

पाटील,"दोनतीन दिवस तरी लागतील. दादासाहेबांचं कामहाय, त्यांना कसं इचारनार किती दिवस लागतील म्हून. यावेळी याला घेऊन जावं म्हनून विचार केलेला. पार याची काय लक्षन बरी न्हाईत. ". 

"जाऊंद्या वो, रात्री जेवला पन न्हाई पोरगा. ", काकीने त्याची बाजू घेतली. 
"एका दिवसात काय मरत न्हाई. चांगली खाऊन पिऊन मस्ती चाल्लेली काळ तिकडं. ", पाटलांचा संताप वाढला. 
"बरं जाताना चिडू नका तुमी. मी बोलतो त्याच्याशी. ",काकीने समजावलं. 
"बगा जमलं तर. बरं यिऊ का?", पाटील. 
"हां पोचल्याव फोन करा.", काकीने पाटलांची बॅग उचलत सांगितलं. 
"हां कर्तो.", म्हणत पाटील घरातनं बाहेर पडले. 

संत्याला खाटेवर पडल्यावर पुन्हा जरा डोळा लागला. परत जाग आली ती फोनच्या आवाजानं. संत्यानं नाईलाजानं फोन बघितला, अम्याचा मेसेज होता,"उठलास का?". 

त्याने फोन परत ठेऊन दिला आणि तसाच पडून राहिला तर फोनच आला अम्याचा. 
"काय रे, कालपासन पत्ता कुठाय? लैच मनावर घेतलेलं दिस्तया. ", अम्याने विचारलं. 
".... ", संत्या गप्पच होता. त्याला तोंड उघडायचीही इच्छा होत नव्हती. 
"काल काय झालं तिकडं तू घाईघाईत गेला हुतास ते?", अम्याने विचारलं. 
"काय नाय, जाऊंदे.", संत्या बोलला. 
"आस कसं? सांग की. ", अम्याने विचारलं. 
"म्हनलं ना, काय न्हाई तर गप पड की.", संत्या चिडला. तसे अम्या शांत झाला. 
"बरं ठिवतो, फोन करतो पन परत.", अम्याने असं बोलून फोन ठेवला. 

काकीने हाक मारली,"पाणी तापलंय तवर अंघोळ कर बरं. परत बंब पेटवाय लागतोय न्हायतर.". 

संत्या नाईलाजाने उठला आणि आवरायला लागला. अंघोळ करुन माजघरात आल्यावर काकीने चहा ठेवला समोर. संत्या त्याच्याकडे बघत तसाच बसलेला. 
"च्या घेकी रं. भांडी द्यायचीत काढून चल पटापट उरक.",काकी परत बोलली. 
संत्याने मुकाट्याने चहा घ्यायला सुरवात केली. रात्रीपासून उपाशी असलेल्या त्याच्या पोटाला चहानं बरं वाटलं. 
काकी त्याच्याकडे बघतच होती. 
"काल काय झालं संत्या? तुझं पप्पा किती चिडल्यालं रात्रीला. किती वेळा सांगितलं त्यांनी कामात लक्ष दे म्हनून.", काकी बोलली. 
संत्या गप्पच होता. त्याने चहाचा कप बाहेर भांड्याच्या टोपलीत ठेवला आणि परत खाटेवर जाऊन बसला. शेजारीच एक पुस्तक पडलं होतं ते हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. पुस्तक वाचतानाही त्याला सपनीचे शब्द आठवत होते,"तुझी लायकी आहे का माझ्यासमोर उभं रहायची?". त्याने विचार मोडून पुन्हा वाचायला सुरुवात केली. 
दुपार झाली तरी त्याची जेवायची इच्छा नव्हती ना कुणाशी बोलायची. तो एकदा वाचायला लागला की लवकर उठत नाही हे काकीला चांगलंच माहित होतं. तिनेही मग त्याला उठवलं नाही. 

संध्याकाळ झाली तरी संत्या काही बोलला नाही. पोरगं घरात असूनही इतकं शांत आहे पाहून काकीला काही सुचेना. ती आतल्या खोलीत गेली आणि खाटेवर त्याच्या शेजारी बसली. संत्याला नाईलाजानं पुस्तक बाजूला ठेवावं लागलं. काकीने त्याच्या केसांतून हात फिरवला.  तिच्या मायेच्या स्पर्शानं त्याला भरुन आलं. तोही मग तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहिला. 
"तुला म्हायतेय का तुज्या पप्पांनी तुला का हे सगळं दिलं? पार्टीचं इतकं मोठं काम हाये ते. गावाच्या नवीन पोरांना एकजूट करायचं. ", काकी हळूहळू बोलू लागली. 
"तू ल्हान होतास ना? ८-१० वर्षाचा असशील, तुजं पप्पा पहिल्यांदा सरपंच झालेलं गावाचं. रोज लोकं त्यांच्याकड ह्ये ना ते काम घिऊन यायची. त्यांच्याबरबर तू पन बसायचास. त्या लोकांच्या पोरानबर्बर खेळायचास. कुनी म्हातारबाबा दिसला तर पटकन पानी आनुन द्यायचास. त्या लोकांच्या दुःखात तू जमल तशी मदत करायचास. तू ल्हान असताना तुजं पप्पा हजारवेळा म्हणायचं, आमच्यानंतर या गावचा सरपंच हाच. ",काकीचं बोलणं ऐकत संत्या पडून राहिला. 
"तू शाळत मार्क कमी पडल्यावर तुला सगळ्या शिकवन्या लावल्या मी. पर तुजं पप्पा म्हनायचं , मार्कांवर जाऊ नका तुम्ही. मार्क मिळवून सगळं मिळत न्हाई. त्याला मानुसकी यायला पायजे. आपल्या घराची रीत हाय ती, लोकांनी आपलं दुख आपल्याकडं यावं आन आपण जीव तोडून त्यांना जमल ती मदत करावी. तुजं पप्पा या वयातबी लोकांच्या कामासाठी मरमर करत फिरत असत्यात. अन तुमी असं कामं सोडून दंगा मस्ती करताय. काल लै वाईट वाटलं त्यास्नी. म्हटलं असतील या आधी तुला नालायक, पन कालच्यासारखं त्यांना कदी पायलं न्हाई आधी. तुज्याव जीव हाय त्येंचा. आता बघ, काल म्हनलं पाच पन्नास पोरं घिऊन बसला हुता हापिसात. तू समद्यांला दोस्त म्हनून मजा करतोस. त्याच्यापरास त्यान्ला कामाला लाव. त्यांच्या पोटापान्याचं बघ. तुज्यात धमक हाय इतक्या पोरान्ला समजून सांगायची. तू फकस्त काय सांगायचं ते तू ठरवलं पायजेस. चल जाऊंदे. जिऊन घे. असा किती दीस उपाशी राहशील? अन तुजं पप्पा बी न्हाईत तर मी काय एकटीच जिऊ?", काकीने त्याला जबरदस्ती हाताला धरून उठवलं. संत्याही मग उठला. काकीबरोबर त्यानं चार घास खाल्ले. 
       काकीचं बोलणं ऐकून संत्याला बरं वाटत होतं. काहीतरी कळल्यासारखं. आईच्या बोलण्याने एक नवा विचार मनात आला होता. आत्मनिरीक्षण करण्याची गरज वाटू लागली होती. रात्री मग त्याने पुस्तक वाचून पूर्ण केलं. संत्याला जश्या प्रेमकथा आवडायच्या तितक्याच रहस्यकथाही. आजवर मिळतील तितक्या सर्व मराठी रहस्यकथा त्याने वाचल्या होत्या. खिळवून ठेवणार शेवट संपला आणि संत्याला पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात परत जावं लागलं. 
     अम्या, विक्याचे मेसेज, फोन येऊन गेले होते. पण कुणाशीच तो काहीच बोलला नव्हता. रात्र वाढली तशी त्याला सपनीची आठवण येऊ लागली. आजवर आठवण आली तरी त्यात कटुता नव्हती. तिला दुरुनच पाहणं, तिचा विचार करणं इतकंच होतं. आज त्याला तिचं त्याच्याबद्दलचं मत माहित होतं. ती आपला किती तिरस्कार करते हे कळलं होतं. आणि इतकं असूनही तिच्यावर त्याला राग येत नव्हता. कालचा त्याचा राग आज निवळला होता. आपण तिच्याशी किती उद्धटपणे बोललं हे आठवत होतं. तिचा हात रागाने आवळला,तिच्यावर जोरात ओरडलो, हे सर्व डोक्यात येत होतं. तिच्याशी प्रेमाचे चार शब्द न बोलता अशी सुरुवात झाली याचं त्याला अजूनच वाईट वाटत होतं. विचार करत संत्या तसाच पडून राहिला होता. आयुष्याची पाटी पुसून नव्याने सुरवात कशी करावी हे त्याला कळत नव्हतं. 

- क्रमशः

विद्या भुतकर.