Thursday, March 29, 2018

भय इथले संपत नाही


भय इथले संपत नाही 
मज तुझी आठवण येते 
मी संध्याकाळी गातो 
तू मला शिकविली गीते.... 

कालपासून हे गाणं सतत डोक्यात, कानात, फोनमध्ये चालू आहे. दार थोड्या दिवसांनी हे असं होतं. हे गाणं ऐकणं ही एक अनुभूती आहे. प्रत्येकवेळी ते ऐकायला लागलं की एक विचित्र वलय मनाभोवती तयार होतं. मनातली अव्यक्त भीती पुन्हा एकदा वर येऊ पाहते. नक्की कशाचं भय असतं माहित नाही, पण ते अस्पष्ट असणं याचीही भीती असतेच की. याचे बोल, ते गहिरं संगीत आणि त्यांत ऐकू येणारा स्पष्ट सुंदर मनाचा ठाव घेणारा आवाज. सगळं मनाला घेरुन राहतं. खरंच आपलं नशीबच म्हणून हा अनुभव आपल्याला घेता येतो. 
भय सतत कशा ना कशाचे. एखाद्या जवळ आपल्या मनातला शब्दन शब्द सांगण्याचं. त्याला सर्वच कळलं तर? किंवा जीव तोडून सांगूनही, ते त्याला कळलं नाही तर? उमजूनही न उमजल्याचा आव आणला तर? कुणी इतकं प्रेम करावं की 'नाही' म्हणणंही जड व्हावं आणि ते 'नाही' म्हटल्यावर पुढे त्याचं काय होईल याचं भय. कधी हातातल्या इवलुशा पोराकडे पाहात 'त्याच्यावर किती जीव आहे' या विचारांचं भय? आणि या सगळ्यांपेक्षा सर्वात जास्त भीती कशाची माहितेय? हे सगळं आपण सहन करत असताना, तो किंवा ती सोबत नसण्याची. ती व्यक्ती जिच्यासमोर या कशाचीच भीती नसते, व्यक्त होण्याची, हसण्याची, रडण्याची. 
भय इथले संपत नाही..... हेच खरं.. 

https://youtu.be/x88r7JI4ljU


विद्या. 


संदर्भासहित स्पष्टीकरण

काल पोस्ट लिहिली 'जशी आहे तशी' आणि रात्री वाचून झाल्यावर नवरा म्हणाला, "काय लिहिलं होतंस काही कळलं नाही". त्याच्या म्हणण्यानुसार, बाकीच्यांना माझं लिखाण कळेल की नाही याचा मापदंड तो आहे. त्याला मी लिहिलेलं कळलं तर मग बाकीच्यांनाही कळेल. :) मग मी त्याला सांगत बसले डोक्यात काय आलं ते, आणि तो म्हणाला, यातलं काहीच त्या पोस्ट मध्ये दिसत नाहीये. :) मी त्याला संदर्भासहित स्पष्टीकरण देत होते तेच इथेही लिहितेय. 
          तर पोस्ट होती एका जोडप्याबद्दल, जे एकमेकांना वर्षभर तरी ओळखत आहेत. त्यात त्यांचं नातं मैत्री, आकर्षण आणि प्रेम या पायऱ्या ओलांडत गेलंय. या सगळ्या प्रवासात एक स्त्री म्हणून विचार केला तर आपण आपलं सर्वस्व कधीच दिलेलं नसतं. त्याला समोर जो चेहरा दिसत असतो, जे शरीर दिसत असतं, त्यावर कितीतरी आवरणं असतात. कधी ते मेकअपचं असतं, तर कधी आभूषणांचं असतं. कधी चांगल्या कपड्यांचं, कधी बारीक वाटावं म्हणून कंबरेला करकचून बांधलेल्या पँटचं असतं. बरं या सर्व झाल्या वरवर दिसणाऱ्या आवरणाच्या भौतिक खुणा. काही न दिसणाऱ्याही असतात. कधी त्यात भीती लपलेली असते, कधी काळजी, कधी आपल्याच शरीराबद्दलचा न्यूनगंड. हे सगळं हसण्यात, रडण्यात, उडवून लावण्यात लपवलेलं असतं. 
         ही सगळी आवरणं, आभूषणं जेव्हा गळून पडतात, तेव्हा ती फक्त एक स्त्री म्हणून उरते. त्याच्यासमोर आपण जसे आहोत तशीच उभी असलेली. त्यात तिची ती भीती, आपल्या शरीराबद्दलचं अवघडलेपण, न्यूनगंड सर्व समोर असतं त्याच्या. तिथे मग काहीच लपत नाही. आणि हे सर्वस्व घेऊन त्याच्या समोर उभं राहणं हा एक अविस्मरणीय अनुभवच, नाही का? 

विद्या भुतकर. 

Wednesday, March 28, 2018

जशी आहे तशी

       तो तिच्या जवळ होता. इतका की बोलताना ही ओठ एकमेकांना चिकटत होते. इतका की श्वास घेताना थोडासाही फरक एकमेकांना जाणवत होता. तिच्या डोळ्यांत त्याला दिसत होती भीती, 'हाच तो क्षण' हे जाणवलेली आणि तिलाही कळत होती त्याच्या स्पर्शातली आतुरता. तिच्या चेहऱ्याकडे पाहात एकदम तो बाजूला झाला. ती गोंधळली. त्याने बाथरूममधून एक रुमाल ओला करुन आणला. ती विचारणार इतक्यात तिला गप्प करुन, तिच्या चेहऱ्यावरुन तो रुमाल फिरवला. चेहऱ्याला लावलेलं क्रीम, फौंडेशन सर्व उतरत गेलं. तितक्याच जोराने त्याने तो रुमाल तिच्या ओठांवरुन फिरवला. तिच्या ओठांना आकार देणारी, बोलताना तिच्या बारीक हालचालीही स्पष्टपणे दाखवणारी ती लिपस्टिक पुसली गेली. मागे राहिले ते फक्त फिकट ओठ. तिच्या कानातले झुमके, तिच्या चेहऱ्याला शोभा देणारे. ती हसत बोलताना तिच्या चेहऱ्यासोबत हलणारे. तेही काढून टाकले त्याने. तिच्या गळ्यातलं मॅचिंग नेकलेस त्याने धडपडत मागे हात घालून मोकळं केलं आणि त्याचसोबत केसांनाही. तिचा शर्ट घाईने काढून टाकला आणि तिची पॅडेड ब्रा ही. ओघळले तिचे वक्ष मग त्यांच्या नेहमीच्या जागेवरुन. बटण काढल्यावर पोटाला करकचून बांधलेली पँट निसटली आणि पँटचे पोटावर पडलेले वण त्याला दिसले. लवकरच मग ती उभी राहिली त्याच्यासमोर, निर्वस्त्र. 

       गेल्या वर्षभराची त्यांची ओळख. मैत्री, आकर्षण, प्रेम यातून पुढे सरकत जाणारी. तासनतास झालेल्या गप्पा, हसणं, रडणं, चोरटे स्पर्श, नजरानजर यातून मनात प्रत्येक कोपरा जणू दिसला होता. एक शब्दही न बोलता समोरच्याला सर्व कळेल इतकी पारदर्शकता. आणि तरीही....  आज प्रथमच तो तिला बघत होता. ती जशी आहे तशी. निर्वस्त्र, थोडी घाबरलेली, थोडी अवघडलेली,  त्याच्या उत्तराची, होकाराची, संमतीची वाट बघत उभी असलेली ती. जशी आहे तशी. 

विद्या भुतकर. 

Sunday, March 25, 2018

आजही :)

      सोळा-सतरा  वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. पुण्यात राहून वर्ष होऊन गेलेलं. कर्वेरोडवरची सर्व हॉटेलं पालथी घालून झालेली. व्हेज, प्युअर व्हेज असं लिहिलेली अनेक हॉटेलं असायची, दिसायची. तसंच मांसाहारीही होती, ठराविकच पण होती. इतक्या ठिकाणी फिरुनही एक गोष्ट मात्र मला खटकत होती. मला एखाद्या हॉटेलमध्ये बसून ऑम्लेट-ब्रेड खायचा होता. त्यात चीज ऑम्लेट असेल तर उत्तमच. कित्येक दिवस होऊन गेलेले बाहेर असं ऑम्लेट खाऊन. मग एका सुट्टीच्या दिवशी, संदीपच्या मागे लागलेच. म्हटलं मला खायचंय ऑम्लेट. रविवारी सकाळी ८-९ वाजता डहाणूकर पासून सुरु केलेला शोध. प्रत्येक हॉटेलसमोर थांबायचं, संदीप विचारून यायचा. 'नाही' म्हटलं की पुढच्या हॉटेलात. ऑम्लेट, तसं रात्री कुठे तरी टपरीवर मिळालं असतं. पण तेही कुठेतरी स्टेशनवर वगैरे. आणि तोवर कोण थांबणार? ८-१० हॉटेल पालथी घातल्या वरही काही मिळालं नाही म्हणून मी खट्टू झालेले. शेवटी संदीप म्हणाला, 'चल जाऊ एका ठिकाणी' आणि डेक्कनला 'गुडलक' ला घेऊन आला. तिथं मस्तपैकी हवं तसं ऑम्लेट खाल्लं आणि समाधान झालं. :) त्याला तेव्हा ते मुलीला घेऊन जाण्या योग्य वाटलं नव्हतं, 'का?' ते माहित नाही. पण नाईलाजाने का होईना, शेवटी घेऊन गेलाच आणि मला असं खाताना पाहून खूषही झाला एकदम. तो किस्सा आयुष्यभर विसरणार नाही. 
       काल संध्याकाळी आम्ही सगळे जण तयार झालो. मला एका मिडल-ईस्टर्न हॉटेलमध्ये खायचं होतं. बॉस्टनमध्ये आल्यापासून एकही चांगलं खाण्याजोगं मिडल-इस्टर्न हॉटेल मिळालं नाहीये. त्यात मग हुक्की झाल्यावर इंटरनेटवर एक शोधलं. तिथे पोहोचलो तर तो बार होता. मुलांना नेण्यायोग्य नाहीच. दुसरं पाहिलं शोधून तर तिथे दोन-दोन लोकांना बसता येतील असे चारच टेबल. मग तिसऱ्या ठिकाणी गेलो, तोही बारच. इतक्यात मुलं कंटाळली होती. त्यांची कुरबुर चालू झाली. आता त्यांच्यासाठी म्हणून अनेक वेळा इच्छा मारली जाते. काल मात्र तसं करावं वाटत नव्हतं. दुसरंच काहीतरी खावंसं वाटत नव्हतं. शेवटी अजून एक हॉटेल मॅपवर शोधलं आणि अजून अर्धा तास गाडी चालवत तिथे पोहोचलो. जेवण तसं ठीकच होतं.  पण भूक लागली होती. तिथे बसून मुलांनी, आम्ही पिटा ब्रेड, हमस, चिकन, ग्रीक सलाड हे सगळं भरपूर खाल्लं. पोट भरलं. पण त्याही पेक्षा मन जास्त भरलं होतं. लग्नाच्या बाराव्या वाढदिवसानिमित्त ही सगळी खटपट केली होती. दीड तास इकडे तिकडे शोधून मला हवं तिथेच जेवायला तो घेऊन गेला होता, आजही. :) 

विद्या भुतकर. 

Thursday, March 22, 2018

मला पडणारे प्रश्न

        लहानपणी मला अनेक प्रश्न पडायचे. म्हणजे गाणी ऐकताना फक्त बाई किंवा पुरुषाचाच आवाज का असतो? असं विचारल्यावर आई म्हणाली, मग दुसरा कुणाचा असणार? मी मला माहीत असलेले सर्व सजीव विचार करुन पहिले. मग लक्षात आलं की, "अरे, खरंच, स्त्री आणि पुरुष सोडले तर बाकी सारे प्राणीच आहेत. दुसरा प्रश्न म्हणजे,"भाषा कुणी निर्माण केली?". तेव्हा तर फक्त मराठीच माहित होती. त्यामुळे विचार फक्त मराठीचाच करायचे. उदाहरणार्थ, "स.... र...... ळ...." ही तीन अक्षरे आहेत. ती तशीच का लिहायची? बरं, 'स' हे एक चित्र आहे, 'र...  -...  ।...  ' हे तीन आकार जोडून काढलेलं. ते चित्र म्हणजेच 'स' कशावरुन? आणि त्याचा उच्चार 'स' असाच करायचा हे कुणी ठरवलं?  मग अशी प्रत्येक अक्षरे एकत्र करुन 'स र ळ' हा शब्द बनणार. आता या तीन अक्षरांनी बनलेला शब्द आणि त्याचा अर्थ कुणी ठरवला? 'सरळ' म्हणजे 'सरळ', हे कधी ठरलं? 
आता हा एका भाषेतील एक शब्द झाला. अशा प्रत्येक भाषेतला प्रत्येक शब्द, त्यांची रचना. कितीतरी गोष्टी. हे सर्व कुणी ठरवलं? आणि आपण जन्मलो तेव्हा हे सर्व आधीच तयार होतं. म्हणजे आपण किती उशिरा जन्मलो आहे. 
       हे असले अनेक प्रश्न मूळ मानवजातीबद्दल अजूनच चौकस करायचे. गेली अनेक वर्षं माझ्या डोक्यात एक चित्र उभं राहतं. एक घोळका एका प्राणिसंग्रहालयाचा फेरा मारत आहे. एक मोठा काचेचा बॉक्स आहे. प्रचंड मोठा. त्यात एक घर आहे, बाहेर छोटी कृत्रिम बाग आहे. झाडं, फुलं आहेत. बाहेरुन पाहणारा घोळका कशाचा आहे माहित नाही. कुठलातरी नवीन प्राणी असावा. कारण काचेच्या आत जो प्राणी ठेवला आहे ते म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष आहेत. जसे आपण दोन वाघ, कधी हत्ती, जिराफ, झेब्रा वगैरे बघतो ना? तसेच. एकटेच. बाहेरच्या घोळक्याला फक्त त्या आतल्या प्राण्याची माहिती दिली जात आहे. 'माणूस' नावाच्या प्राण्याची. त्यात मग स्त्री आणि पुरुष हे नर-मादी आहेत. त्यांचं प्रजनन कसं व्हायचं वगैरे. त्यांची जीवनशैली, राहणीमान हे सर्व बाहेरुन कुणीतरी त्या घोळक्याला सांगत आहे. 
       आता पुढे जाऊन विचार यायचा तो म्हणजे, आत असणाऱ्या या माणूस नावाच्या प्राण्यांच्या डोक्यात काय चालू असेल? तो पुरुष, एकटाच सगळीकडे फिरत आहे, तिकडे ती स्त्री काहीतरी काम करत आहे, उगाच. कारण त्यांना जगण्यासाठी काही कष्ट तर घ्यायचे नाहीयेत. ज्यांनी हे प्राणिसंग्रहालय चालवलं आहे ते त्या दोघांची काळजी घेतात. त्यांना नियमित जेवण, पाणी वगैरे वेळेत दिलं जातं. ते जेवणही ते बाहेरचे प्राणी केवळ हा मनुष्य प्राणी खातो म्हणूनच बनवत असतील. फक्त आला दिवस संपवणे इतकंच काम आहे त्यांना. आता हे स्त्री आणि पुरुष एकमेकांशी बोलत असतील का? माहित नाही. कारण त्यांची भाषा वेगळी असू शकते. दोन निरनिराळ्या देशातून, जागेतून शोधून आणलेले हे प्राणी असू शकतात. त्यांना एकमेकांबद्दल काही प्रेम वाटत असेल का? कारण एकमेकांचा काही संबंध नाहीये. केवळ एका प्राण्याच्या जातीतले म्हणून एकत्र आलेत. बरं असंही असू शकतं की त्यांचं वय कमी जास्त आहे. पुरुष ६५ वर्षाचा म्हातारा आहे तर स्त्री २५ वर्षाची.(इथे मी पाचच्या पाढ्यातीलच आकडे का घेतले माहित नाही.) किंवा याच्या उलट. समजा त्यातला एक जण उद्या मेला तर? मग त्या बॉक्समध्ये फक्त त्या जमातीचा एकच प्राणी शिल्लक राहील. त्या मागे राहिलेल्या प्राण्याच्या डोक्यात काही विचार येत असतील का? अशा वेळी मग तिथले व्यवस्थापक शेवटी उरलेल्या प्राण्याची किती काळजी घेतील? आणि मुळात त्या एकट्या जीवाला अजूनही जगायची इच्छा असू शकेल का? 
       तर हे असं सगळं अनेकदा माझ्या मनात येऊन गेलंय. पण कधी लिहिणं जमलं नव्हतं. परवा सुदानमधल्या जगातल्या शेवटच्या ऱ्हायनो च्या मृत्यूची बातमी वाचली तेव्हा पुन्हा एकदा हे विचार डोक्यात आले. माणूस जातीचा शेवटचा प्राणी जेव्हा असा बॉक्समध्ये जाईल तेव्हा काय वाटेल? याचा कधी विचार केलाय? असंच उगाच. :)

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, March 14, 2018

आवडण्याचा आग्रह

      आपण कुणाला तरी आवडत नाही हा विचार माणसाला किती टोचू शकतो? खूप ! आयुष्यात अनेक ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या लोकांचा संपर्क येतो. त्यात दिवसभराचं ऑफिस असो किंवा एखादा जवळचा नातेवाईक वगैरे असो. त्या समोरच्या व्यक्तीला आपण आवडत नाही असं दिसल्यावर काय वाटतं? त्रास होतोच.

पण मुळात प्रश्न असा आहे की समोरच्या माणसाला आपण आवडलंच पाहिजे असा आग्रह का? आपल्यालाही येतो ना एखाद्याचा राग. कधी कारण असतं तर कधी नसतं. तसा राग मनात घेऊन जगणं जितकं त्रासदायक तितकाच त्रास होतो समोरच्या माणसाला आपण आवडण्याचा आग्रह धरला की. मला वाटतं, खरं तर अशावेळी उत्तर हवं असतं,'का त्याला माझा इतका राग येतो? मी काय वाकडं केलंय, वगैरे वगैरे'. मग समोरच्या माणसाला खूष करण्याचा प्रयत्न केला जातो. कधी थोड्या फार प्रमाणात तर कधी अतोनात. अशात सर्वस्वही गमावून जातं.

कालच स्वनिक सांगत होता, "माझा एक मित्र आहे. माझं कधी चुकलं आणि मी सॉरी म्हणलं तरी तो मान्य करत नाही, सोडून देत नाही."
 मग म्हटलं,"अरे तू तुझं काम केलंस ना? मग बास. त्याच्यापुढे त्याने काय करायचं हे तू ठरवू शकत नाहीस."

सोपंय ना सांगायला? पण प्रत्यक्षात आणणं जमत नाही. शिकागोमध्ये असताना आजूबाजूला असंच वातावरण आहे असं वाटायचं. शेजारी पाजारी बोलायची इच्छाही मरुन गेली होती. पण मग त्यातून चांगलं काहीतरी बाहेर आलं. बाकी गोष्टीत पडायचंच नाही असं ठरवलं आणि तेव्हा रनिंगला सुरुवात झाली. पण प्रत्येक वेळी हे असं काहीतरी चांगलं होतंच असं नाही. 
अशाच एका झगड्यातून जातेय सध्या. चांगलं काहीतरी मिळवता यायला हवं अशातुन. समोरच्याला मी आवडलंच पाहिजे हा आग्रह सोडून द्यायला हवा. आपण आपले प्रयत्न केलेत ना? मग दुर्लक्ष करता यायला हवं. आणि मुख्य म्हणजे त्याच्या खुशीसाठी म्हणून स्वत्व सोडून द्यायला नको. बाय द वे, हे बाकीच्यांना नाही, स्वतःला समजावतेय.  :)

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, March 13, 2018

फिल्टर

नुकतंच एका मित्राला सांगत होते, एका विषयावर एक सलग लिही, अजिबात वाहवत न जाता, निबंध लिहितात ना तसं, प्रत्येक मुद्दा मांडत, ओळीने. त्याला वाहवत जाण्याची सवय आहे. पण त्या वाहण्यात बरंच काही बाहेर येतं. विसंगत वाटलं तरी जसं आहे तसंच बाहेर पडतंय असं वाचताना तरी वाटतं. तसं लिहायला यायला हवं. मनात येईल तो प्रत्येक शब्द कागदावर येऊ द्यायचा. पण माझं तसं होतं नाही. शाळेत असताना एका बाईंनी आम्हांला सलग १० विसंगत वाक्यं एका पाठोपाठ बोलायला लावली होती. तिसऱ्या वाक्यापर्यंत माझी विसंगती संपली होती. भरकटत जाणं मला जमलं नाही तेव्हाही आणि आताही बरेच वेळा जमत नाही.
       आजही लिहायला सुरुवात केली तेव्हा डोक्यात येईल ते सलग लिहीत जायचं असं ठरवलं होतं. लिहीत राहायचं मनात येईल तसं. कुठेही फिल्टर नको शब्दांचा, अट्टाहास नको शुद्धलेखनाचा. पूर्वी लिहिताना मनात येईल तसं लिहीत राहायचे. पण आता तसं होत नाही. आता डोक्यात विचार आला की तो साठवला जातो. सगळं एकत्र साचलं की बाहेर पडतं. लिहिताना त्याचं विच्छेदन होतं. एकेक करत मुद्दे लिहिले जातात. कुठे काही राहिलं तर नाही ना हे पाहिलं जातं. बरं, माझाच मुद्दा मांडून चालत नाही. त्याच्यावर बाकी काही मतं असू शकतात, तीही लिहायची. नाहीतर उगाच कुणी खुसपट काढलं तर? कुणाला वाईटही वाटायला नको ना? तर हे असं लिहिणं म्हणजे त्या वाहवत जाण्याच्या एकदम विरुद्ध. कितीही ठरवलं तरी नाही जमत मनात येईल ते तसंच मांडणं.
         हे फिल्टर लिहिण्यातच कशाला वागण्यातही येतातच. ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये वावरताना प्रत्येकवेळी वेगळा फिल्टर. जो तिथे नाही त्याचा तर असतोच. नुसत्या बोलण्यातले जाऊ देत, चेहऱ्यावरच्या हावभावातलेही फिल्टर. एखाद्याने काहीतरी सांगावं आणि आपण आपल्या खऱ्या भावना मनातून चेहऱ्यावर येईपर्यंत बरंच काही गाळून घेतलेलं असतं. सोशल मीडियावर दिसण्यासाठी फोटोला लावलेले असतात ते फिल्टरही वेगळेच. घरातही कुणी येणार असलेलं तर तेही सजलेलं असतं, सगळा पसारा बंद कपाटात ठेवून. 
       पोरांकडे पाहून हेवा वाटतो, एखादी गोष्ट नाही आवडली लगेच बोलून टाकतात. अगदी त्याचा जवळचा मित्र असला तरी, 'तो माझ्याशी चांगला वागला नाही, माझा मित्र नाहीये तो' असं तिथल्या तिथे बोलून टाकायचं. उद्या चांगला बोलला की आपणही चांगलं व्हायचं. किती सोपं, सरळ आहे. नाही जमणार आता तसं करायला. खूप साऱ्या भूतकाळ, भविष्यकाळातल्या गोष्टी विचार करुन बोलायचं. एखाद्यानं दिलेली वस्तू नाही आवडली स्वनिक लगेच बोलून टाकतो नाही आवडत मला म्हणून. तसं करता यायला हवं, लिहिताना, वागताना, बोलताना. मला नाही जमत आता ते आणि जमणारही नाही. किती पुढे गेलो आहोत आपण या वागण्यात याचा पत्ता लागण्यासाठीही दूरवर शोधत जावं लागेल स्वतःला. आपण कसे होतो ते बघायला. असो. 
मनात येईल ते लिहायचं असं ठरवूनही वाहवत जाता आलं नाही याचं दुःखं आहेच पण निदान उगाच जास्त विचार करुन लिहीत बसण्यापेक्षा इथेच थांबते. :) 

विद्या भुतकर. 

Monday, March 12, 2018

Wednesday, March 07, 2018

साथ देत राहू....


गेले दोन महिने आजारपणाची सुट्टी होती. आज सुट्टीनंतर ऑफिसचा पहिला दिवस. कसा जाईल दिवस,  पाठ दुखली तर, पुढचा प्रोजेक्ट काय असे अनेक विचार डोक्यात येत होते. इतक्यात एका मैत्रिणीचा मेसेज आला,"एकेकाळी तू मला सुचवलेलं गाणं ऐकतेय आणि तुझी आठवण झाली. कशी आहेस?". म्हटलं,"ऑफिसला चाललेय.". तर पुढचा मेसेज होता,"keep your chin up and smile. Dont be meek."(ताठ मानेने आणि हसत ऑफिसला जा. ) केवळ त्या मेसेजमुळे इतकं छान वाटलं. प्रत्येकाच्या आयुष्यात इतक्या गोष्टी चालू असतात. हे असे क्षणच सुखावतात, आयुष्य सुसह्य करतात. बाकीही मैत्रिणींनी विचारलं, कसा गेला पहिला दिवस. जणू हे सर्व पहिल्यांदाच करतेय. त्यांच्या त्या विचारण्यानेही एक सोबत, मदत मिळाली. 
         गेल्या चार महिन्यात, आजारपणात प्रत्येकीकडून वेग-वेगळ्या प्रकारचं बळ मिळालं. कधी जेवणासाठी डबा घरी आणून देऊन, कधी मुलांना सांभाळून, कधी कामातील ताणाच्या तक्रारी ऐकून-सांगून, कधी 'होशील गं बरी, दम धर' असं आश्वासन देऊन, कधी 'आराम कर मुकाट्याने' असं दटावून, 'कधी फोन केला नाहीस, ठीक आहेस ना?' विचारून, तर कधी 'आई, पाय दाबून देऊ का विचारुन'. आणि हे सर्व आपापले व्याप सांभाळून. प्रत्येकीचं रुप निराळं, नातं निराळं. अगदी आईइतकीच काळजी करणाऱ्या सासूचंही. प्रत्येकवेळी प्रेम, शक्ती, अनुभव, धैर्य, उत्साह, जवळीक, सहनशीलता यांचं नवं रूपं बघायला मिळतं. 

आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, त्या सर्व जणींना माझ्या शुभेच्छा. अशीच एकमेकींना साथ देत राहू, पुढे जात राहू. 

विद्या भुतकर. 

Monday, March 05, 2018

फूड पॉर्न

          अनेकदा हॉटेलमध्ये आपण जेवायला गेल्यावर समोर अन्न येतं आणि केव्हा एकदा जेवायला सुरुवात करू असं होतं. अनेकदा तर शेजारच्या टेबलवर काय आलंय हे पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. अन्नाचा सुवास हे तिथे एक मुख्य कारण असतं. आजकाल समोर आलेला पदार्थ खाण्यासाठी केवळ तो कसा लागतोय इतकंच पुरेसं होत नाही. तो पदार्थ दिसतो कसा, त्याची मांडणी कशी आहे हे सर्वही महत्वाचं झालंय. त्यात फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या माध्यमांमुळे अन्नाचे फोटो काढून ते सर्वांशी शेअर करणं अजून वाढलं आहे. त्यामुळे दिसण्याला अजूनच महत्व. अगदी थोड्या दिवसांपूर्वी आलेला 'गुलाबजाम' हा चित्रपटच त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याचा ट्रेलर पाहूनच तोंडाला पाणी सुटलं होतं, कारण काय? तर सर्व पदार्थांची मांडणी. टीव्हीवरही खांद्यपदार्थांवर अनेक कार्यक्रम असतात. एकूण काय 'फूड पॉर्न' हा प्रकार वाढलेला आहे.
          हे सगळं लिहिण्याचं कारण सांगेनच पुढे. काही वर्षांपूर्वी, माझी मुलगी दीड वर्षाची असताना भारतात सहा महिने राहून आम्ही अमेरिकेत परतलो होतो. तिला अंगठा चोखायची सवय होती आणि बाकीही काही वस्तू तोंडात घालायची अनेकदा. डॉक्टरकडे पहिल्या भेटीत त्यांनी आम्हाला तिची 'लेड टेस्ट' करायला सांगितली होती. अर्थात इथे ती सर्वच मुलांसाठी केली जाते. आमच्यासाठी ते काळजीचं कारण ठरलं कारण तिच्या शरीरातील 'लेड' चे प्रमाण जास्त निघाले. पुढे अजून रक्ततपासणी केल्यावर खात्री पटली. त्यावेळी पहिल्यांदाच मला हे असं काही असतं हे कळलं होतं. लहान मुलांच्या शरीरातील 'लेड' जास्त असणे हे काळ्जीदायक असते. 'लेड' म्हणजे शिसे या धातूचे कण शरीरात गेल्यावर त्याची विषबाधा होते. आणि त्याचे लहान मुलांवर घातक परिणाम होऊ शकतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी काय काय केले पाहिजे हे आम्ही तपासलं आणि डॉक्टरांनी तिला 'आयर्न सप्लिमेंट' द्यायला सांगितली. लवकरच ती बरीही झाली.
        त्याचदरम्यान मी या विषयावर पुढे माहिती काढायला सुरुवात केली. हे लेड जातं कसं शरीरात हे पाहिलं. अनेक ठिकाणी घरातील भिंतींच्या रंगांमध्येही 'लेड' असते. किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या, खेळण्यांच्या रंगातही असू शकते. मुले त्या वस्तू, खेळणी तोंडात घालतात आणि त्यातून हे लेड पोटात जाऊ शकते. पण या सगळ्यांपेक्षा धक्कादायक गोष्ट होती ती म्हणजे, अन्नातून जाणारे शिसे, अन्नातील भेसळ. हे कसे तर, हळद, तिखट अशा खाद्यपदार्थात रंग चांगला दिसावा म्हणून रंग घातला जातो. आणि त्यातूनही लेड जाऊ शकते.
        मला हे वाचल्यावर काळजी वाटू लागली म्हणून मी शोधले की तिखट आणि हळदीतील भेसळ कशी शोधायची. ते पाहून मी तशी टेस्ट घरी केली. गिरणीत कांडून मिळणारी हळद आणि तिखट वापरायला सुरुवात केली. त्या टेस्टबद्दल तुम्हाला नेटवर माहिती मिळेलच. पण साधा उपाय म्हणजे, एका पारदर्शक ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात वरुन हळदीची किंवा तिखटाची चिमट सोडायची. जर भेसळ असेल तर जसे हळद किंवा तिखटाचे बारीक कण पाण्यात खाली जाऊ लागतात तसे तसे त्यातील रंग पाण्यात पसरु लागतो. जर रंग पसरत असेल तर भेसळ आहे. हळद किंवा तिखट शुद्ध असेल तर त्याचे कण पाण्यात उतरताना रंग पसरत नाही. दुकानातून आणलेल्या तिखट हळदीलाही असेच तपासून पहा. पोस्टसोबत काही फोटो लावलेत, त्यातून थोडी कल्पना येईल.
       आता हे झाले घरातील पदार्थ. मी भारतात परत आले तेव्हा मला हा अनुभव येऊन गेला होता. त्यामुळे अनेकदा हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर समोरच्या वाटीतील पनीर एकदम रंगीत दिसले किंवा टोमॅटो सूप केशरी दिसले की ते खाण्याची शिसारी येऊ लागली. बिर्याणीच्या वरील थरातील रंगीत भात, तंदुरी चिकनवरचा लाल रंग हे सर्व बघून त्रास होऊ लागला. त्यामुळे अनेक वेळा आम्ही बाहेर जाणं टाळू लागलो. सगळ्यात त्रासदायक होते ते म्हणजे चायनीज जेवण. त्याच्यावरील लाल रंग तर एकदम नकोसा वाटतो. मी अनेक केक बघते, ज्यात रंगीत क्रीम असते. आता त्यात खाऊ शकतो असे रंग मिसळले असतात, तरीही अनेकदा ते नैसर्गिक रंग नसतात. त्यामुळे केक घेतानाही शक्यतो चॉकलेट किंवा साधा क्रीम रंग असलेले घेऊ लागले. बिग बझार मध्ये गेल्यावर मुलांसाठी अनेक प्रकारचे रंगीत सिरीयल्स, बिस्किटे  मिळतात. त्यातही हे असेच रंग वापरलेले असतात. त्यामुळे एकवेळ दिसायला चांगले नसले तरी चालेल पण साधे सिरीयल्स घ्यावे. अशा अनेक गोष्टी नजरेसमोर येत गेल्या आणि खाण्याची निवड बदलत गेली.
       खूप दिवसांपासून हे सर्व लिहायचं होतं पण राहून गेलं. मागच्या आठवड्यात एका मैत्रिणीला घरात तिखट टेस्ट करायला लावले आणि पुन्हा लिहायची आठवण झाली. तर लेखाच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं ना की खाद्यपदार्थ दिसतो कसा यावर आपण खूप लक्ष देतो. अनेकदा एखादी हळद खूप छान रंग देतेय असं वाटलं तर ती तपासून पहा. चुकून जास्त लाल दिसणारी मिरची तर नाहीये ना हे नक्की तपासून घ्या. कारण आजकाल अन्न दिसतं कसं यावर अनेक गोष्टी ठरत आहेत, अगदी छोट्या कार्यक्रमात येणारे केटरर्सचे पदार्थही. त्यामुळे ही भेसळ अजूनच वाढतेय असं वाटतंय. हॉटेलमधील जेवण, बाहेरील खाद्यपदार्थ टाळणं हे तर उत्तमच. अर्थात हे सर्व बंद करणं अतिशय अवघड आहे, पण निदान प्रयत्न केले पाहिजेत. हा लेख लिहिताना पूर्ण रिसर्च लिहिणे हा हेतू नव्हता. तर केवळ या प्रकाराची जाणीव करुन देणे आणि विचार करायला लावणे हा होता. त्यामुळे नक्की या विषयावर वाचून पहा नेटवर आणि हो, निदान आपल्या घरातील जेवणात तरी ही भेसळ कमी होईल किंवा टाळता येईल असा प्रयत्न करा. भेसळ असलेले तिखट:विद्या भुतकर.