Tuesday, February 13, 2018

पेन-प्रेम

    काल संध्याकाळी एका अपॉइंटमेंट नंतर नवऱ्याची वाट बघावी लागणार होती. मग शेजारीच असलेल्या मेडिकल स्टोअर मध्ये गेले. इथले मेडिकल स्टोअर म्हणजे अख्खा बिग बझारच म्हटले पाहिजे. कॉस्मेटिकपासून दूध,ब्रेड अंडी आणि शिवाय औषधे असं सर्वच मिळतं. असो. त्या दुकानात गेले तर व्हॅलण्टाइन डे चे मोठाले बुके समोरच मांडलेले होते. त्याच्यापलीकडे मग ग्रीटिंग्ज वगैरे. आता या सगळ्या वस्तूत मन रमत नाही. त्या पलीकडे होती ती स्टेशनरी. आजपर्यंत डॉलर स्टोअर पासून आर्टस् स्टोअर पर्यंत सर्व ठिकाणाहून सर्व प्रकारचे पेन, पेन्सिल, रंग, कॅनवास उचलून आणल्या आहेत. तरीही पेन, पेन्सिल, रंगीत स्केचपेन असं दिसायला लागलं की मी तिथंच थांबते. त्यात मी एकटीच होते दुकानात, सोबत मुलं नाहीत म्हणजे अजून निवांतपणे बघायला मिळालं.
       तिथेच मला दिसलं,"फाऊंटन पेन". त्यासोबत रिफिलची नळीही होती. एक उचलून घेतला. त्या आनंदात असतानाच मला अजून एक पेन दिसलं,"Pilot" लिहिलेलं. त्या पॅकेटमध्ये दोन पेन होते. मग तेही एक घेतलं. नवरा पोहोचला आणि मला निघावं लागलं. मुलांच्या क्लासला जायचं होतं. तर वाटलं, आता कधी मिळणार हे पेन उघडायला?  मग त्यांच्या क्लासच्या बाहेरच एक पेपर घेतला आणि ते फाऊंटन पेनचं पाकीट उघडलं. त्या पेनमध्ये शाई घालण्यासाठी काही नव्हतं. ती शाई असलेली नळी फक्त पेनात बसवायची. नळी बसवून थोडं झटकायची सूचना दिली होती पाकिटावर. मी आपलं नाजूक हातानी झटकत होते, नवऱ्याने मस्त जोरात झटकला आणि 'हे घे' म्हणून हातात दिला. पेनातून शाई कागदावर उतरली आणि कित्येक वर्षाच्या आठवणी जाग्या झाल्या. :)  
      तिसरीत असताना आई रोज पुस्तकातलं एक पान वहीत लिहायला सांगायची. आता मुलांची अक्षरं पाहता, तिने तसं का केलं असावं याचा अंदाज येतो. तेव्हा राग यायचा कधी कधी, पण एकदा तंद्री लागली की उगाच लिहीतही बसायचे. शाळेत असताना पेन्सिल जाऊन पेनने लिहायला कधी सुरुवात झाली ते आठवत नाही. पण हे नक्की आठवतं की शाईपेनची सुरुवात साधारण सातवीत झाली. आजोबांनी घेऊन दिलेलं. मोठं जाड शाईपेन मिळायचं ना, तसलं. खूप भारी वाटायचं. शाळेत जाताना पेनात शाई आहे ना हे पाहणं एक महत्वाचं काम होतं. नाहीतर ऐनवेळी शाई संपली की लोकांकडून उधार पेन मागावे लागायचे, तेही मिळाले नाहीत तर बसा तसेच. तर शाई भरण्यासाठीचे स्किल येण्यासाठीही बराच काळ गेला. ते ड्रॉपरने शाई भरून हात खराब न होऊ देणे फार जिकिरीचं काम होतं. शाईपेनने लिहिण्याची सवय लागल्यावर बाकी सर्व पेन फिके वाटू लागले होते. अगदी बाकी सर्वांकडे रेनॉल्डचे पेन आले ना तेव्हाही. फक्त एक प्रॉब्लेम होता, काही कागदांवर शाई पसरायची. मग त्यासाठी खास रेनॉल्डचे पेन वापरायचे. त्यातही ती नळी संपली की परत उधारी आलीच.
      मला आवडायचं ते रात्री कधी लाईट गेली तर मेणबत्तीच्या उजेडात शाईपेनाने लिहिताना, चमकणारी अक्षरे. उगाचच एरवीपेक्षा जास्त सुंदर वाटायचं अक्षर. माझ्या वडिलांची त्यांच्या शाळेतील एक छोटी डायरी तेव्हा आम्हाला मिळाली होती, त्यात त्यांचे सुंदर अक्षरांत लिहिलेले सुविचार वगैरे होते. ते पाहिलं की आपणही असंच अक्षर काढावं असं वाटायचं. तर त्यांनी ते बहुदा बोरुच्या पेनाने लिहिले होते. म्हणजे लाकडी कोरीव टोक असलेली  लाकडी लेखणी. अनेकदा मग तसेच पेन बनवून लिहिण्याचाही प्रयत्न केला होता. एकूण काय तर ते शाईपेनवरचं प्रेम फारच. आठवीत असताना एक माझा आवडता पेन हरवला आणि कित्येक महिने सापडला नाही. नवीन पेन आणला तरी त्या जुन्या पेनची आठवण यायची. तो परत सापडला पण त्यातली शाई सुकल्यामुळे त्याचे निब गंजले होते. मग पुन्हा तो कधी पूर्वीसारखा लिहिता झाला नाही. असो.
     कॅम्लिनचे जाड मोठे निब असलेले पेनने लिहिणे म्हणजे कसरतच असायची. निब तुटले की ते आणून पुन्हा बसवणे हेही अवघड काम. त्यात हात खराब होणे ठरलेलं. मग एखादा चुकून ड्रेसला लागला तर झालंच. शिवाय शाई पेनाच्या टोकापर्यंत येण्यासाठी कितीतरी वेळा झटकावा लागायचा. असेच अनेकदा पेन झटकून शेजारच्या मुलं-मुलींच्या अंगावर शाई उडाली आहे. निबच्या आजूबाजूला कधी घाण अडकत असे, (कदाचित कागदाची असावी, माहित नाही), तर ती काढण्यासाठी वडलांच्या दाढीच्या ब्लेडचा वापर सर्रास व्हायचा. आता विचार केला तर किती मोठं 'सेफ्टी हॅझार्ड' होतं ते. असो. तेव्हा ते कधी वाटलं नाही. पुढे ते कॅम्लिनच्या मोठ्या निबचे पेनच्या जागी एकदम फक्त टोक दिसणारे, बाहेरून छान चकचकीत असलेले हिरोचे शाईपेन आले. त्यात शाई भरणेही सोपं होतं. पेनाच्या आतली नाली फक्त शाईच्या बाटलीत घालून ड्रॉपरसारखी वापरायची. सोपं काम होतं. त्यातही मला माझ्यापेक्षा माझ्याएका मैत्रिणीचं अक्षर तसल्या पेनाने छान येतं असं वाटायचं. आजही तिचं ते पेन आणि अक्षर आठवतं. दहावीच्या परीक्षेच्या वेळी वडिलांनी पायलट पेन घेऊन दिला. क्रीम कलरचा पेन, एकदम टोकदार असलेली निब आणि त्यातून येणारं सुरेख अक्षर.आवडलं होतं तेही. १०-१२ चे पेपर त्यानेच लिहिले. मधेच सोबतीला शाईपेन असायचंही.
       शाळेत असताना अनेकदा वाटायचं, मैत्रिणीसारखं पेन असेल तर आपलं अक्षर किती भारी येईल. तिच्या पेनाचा आणि अक्षराचा हेवा वाटायचा. आजही त्या सर्व मैत्रिणीचं अक्षर ही त्यांची डोक्यात बसलेली एक जुनी ओळख आहे. तेव्हा एक पेन असताना दुसरा मागणं म्हणजे 'उधळपट्टी' होती. पोरं इकडे तिकडे वाटेल तसे पेन पेन्सिल टाकताना पाहिलं की आई-वडिलांचा व्हायचा तसाच माझाही संताप होतो. वडिलांच्या, आजोबांच्या पेनाला हात लावण्यास मनाई होती. काल नवीन पेन आणल्यावर मुलाने हात लावला, आणि मीही त्याला ताकीद दिली,"माझ्या पेनला हात लावलास तर बघ'. :) चित्र रंगवण्यासाठी म्हणून काही रंगीत जेलपेन घेऊन आलेय तेही मुलांनी एकेक करुन वापरायला सुरुवात केली आणि मग ते इकडे तिकडे पडू लागले. तेव्हा कळू लागलं की मोठ्यांच्या पेनांना हात लावायची मनाई का होती. :)
       कविता,प्रेमपत्रं वगैरे लिहीपर्यंत नियमितपणे पेन वापरला जायचा. मध्ये अनेक वर्षं ते बंद झालं होतं. दीडेक वर्षांपूर्वी पेनाने कविता एका डायरीत लिहायला सुरुवात केलीय आणि तेव्हापासून हे पेन-प्रेम पुन्हा  बळावत आहे. अगदी काहीवेळा छान लिहितेय म्हणून एखाद्या कॉन्फरन्सला देतात ते पेनही घरी घेऊन आलेय आणि अजूनही कधीमधी त्याने लिहिते. हात पूर्वीसारखा वळत नाहीये, तरीही इच्छा जात नाही. काल पायलट पेन आणि शाईपेन दोन्हीही एका दुकानात मिळाले तर इतकं भारी वाटलं. कालच लगेच कॅम्लिनचे होते तशा पेनचीही ऑर्डर दिली. पूर्वी एखादा पेन घ्यायची इच्छा असताना घेता यायचा नाही, आता परवडते तर का नाही घ्यायचे? काही दिवसांपूर्वी एक पेन हरवला आहे, घरातच, पण तो सापडत नाही म्हणून बेचैन व्हायला होतं. अशावेळी वाटतं की अजूनही पूर्वीचं काहीतरी आहे माझ्यात. कदाचित सर्वच काम लॅपटॉप वर असल्याने मला  पेनचं आकर्षण वाटत असावं. बाकी क्षेत्रातील लोक अजूनही वापरत असतीलच की पेन. असो. उगाच नॉस्टॅल्जीक पोस्ट लिहायच्या नाहीत असं ठरवलं तरी, काल पेन पाहून जे वाटलं ते शब्दातीत होतं. त्यामुळे सगळं उतरवून काढलं आणि त्यांचे फोटोही शोधून पाहिले. हे काही डाऊन्लोड केलेले फोटो. 
आणि हो, ते हँडमेड पेपर, डायऱ्या, रंगीत कागद यांच्यावर पुन्हा कधीतरी. :) 


विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, February 12, 2018

प्रेमबीम काही नको बघ

आजकाल लोकांच्या इतक्या पोस्ट येत राहतात कुठल्या ना कुठल्या 'डे' चे. मग उगाचंच ते दिवस आठवतात आणि त्यातलं नक्की काय आवडायचं तेही. प्रेमाच्या प्रेमात पुन्हा एकदा पडावंसं वाटतं ते यासाठीच. आज नवीन पेन आणला त्यामुळे हात शिवशिवत होते. मग लिहीत बसले उगाचच. :)


Tuesday, February 06, 2018

री-युनियन भाग ४

रिक्षा तुळशीबागेजवळ थांबली आणि प्रज्ञाचा चेहरा लहान मुलांसारखा खुलला. दोघीही मग तिच्या खरेदीत गुंतल्या. सकाळची वेळ असल्याने गर्दी जास्त नव्हतीच. तिच्या क्लिप, साडीपीन, मुलीला केसांचे बेल्ट, रंगीत बेल्ट, आवडतील त्या सर्व प्रकारच्या चप्पल-सॅन्डल घेऊन झाल्या. गार्गी तिला एकेक गोष्ट आठवण करुन देत होती.
"ए तुला आठवतंय तू अशीच मला सोडून अजयबरोबर आली होतीस एकदा? हे असले झुमके घेतले होते दोघींसाठी?", प्रज्ञाने विचारलं.
"हो तुला किती राग आला होता. घेतलेच नाहीस ते. चल, घे आता एक. मी पैसे देते. ", गार्गी हसून म्हणाली.
"राग येणारच ना? माझी बेस्ट फ्रेंड तू. मला सोडून, न सांगता अशी त्याच्यासोबत फिरलीस. तेव्हापासूनच राग आहे मला त्याचा. काहीतरी खटकायचं त्याच्याबद्दल नेहमी. उगाच तुझ्याशी बोलायचं म्हणून माझ्याशीही चांगलं वागायचं प्रयत्न करायचा. मला अजिबात आवडायचं नाही ते. ", प्रज्ञा म्हणाली.
"हम्म, तुला राग येतो म्हणून तुला न सांगता जायचे गं. बाकी काही नाही.",गार्गी.
"माझी इतकी काळजी? उलट तुझ्या लग्नासाठी किती कष्ट घेतले मी. काका-काकूंकडे त्याचं किती खोटं कौतुक करावं लागलं माहितेय का? आणि तुझ्या लग्नात तुझ्या त्या जाऊ-दिरांचे किती नखरे सहन केले मी. जाऊ दे सोड. भैया ये कितने का?", म्हणत प्रज्ञाने ते कानातले दुकानदारासमोर धरले.
खरेदी काही संपत नव्हती. पुढं जेवायला परत हॉटेलवर जायचं होतं त्यामुळे घाई करायची होती. मुलींसाठी एक दोन ड्रेस, फ्रॉक घेत प्रज्ञा घाईने निघाली खरी पण तिला अजून खूप काही घ्यायची इच्छा होत होती. नाईलाजाने गार्गीने अनिरुद्धला फोन लावला.
"अन्या, आम्हाला उशीर होतोय रे जेवायला नाही येत, चालेल का?", तिने विचारलं.
"अगं असं काय करताय? फक्त आपल्यासाठी ठेवला होता ना हा वेळ? मग तुम्ही पर्सनल कामं का करत बसलाय?", त्याने चिडून विचारलं.
"अरे ती आलीय ना आपल्यासाठी इथे. मग तिची नको का मदत करायला? थोडी खरेदी करुन येतो आम्ही, संध्याकाळी आहेच ना डिनरला. ", गार्गीने त्याला समजावलं.
"बरं या मग लवकर.", तो म्हणाला.
अजून खरेदी म्हटल्यावर प्रज्ञा एकदम खुश झाली. दोघीही मग लक्ष्मी रोडवर साड्या, ड्रेस, दागिने बघत फिरल्या.
"आपल्या सारी-डे ला भारी मजा आली होती ना? तुला साडीत बघून शिट्ट्याच मारल्या होती वीरेनने. ",प्रज्ञा हसून म्हणाली.
"हो ना, आयुष्यात पहिल्यांदा साडी नेसली होती. सगळे जुनियर्स पण माझ्याकडेच बघत होते, भूत पाहिल्यासारखे. ", गार्गीला तो दिवस आठवला.
दोघींनी बोलता बोलता साड्या निवडल्या आणि खरेदी आटोपून हॉटेलच्या रस्त्याला लागल्या.
----------

अभ्या आणि दिपक परत आले फुंकून तर अजय तयार झालेला मस्तपैकी. आता फक्त ब्लेझर घातले की झालं. त्याच्याकडे बघून दोघेही थक्क झालेले.
"भारी दिसतोस की अज्या. कॉलेजमध्ये कधी टाय तरी बांधता येत होता का रे आपल्याला?", दिपक हसून म्हणाला.
"टाय जाऊ दे, त्या इंटरव्यूला पण हा माझी पॅन्ट घालून गेलेला", अभ्या बोलला.
"तेंव्हा तुझी पॅन्ट त्याला बसत होती ना, आता कुठली बसेल? ", दिपकने त्याला चिडवले.
"हो ना, जरा बघ स्वतःकडे? असं दुर्लक्ष करु नकोस.",अजय बोलला.
"अरे तो वीरेन बघ कसला फिट आहे अजून पण", दिपक.
"त्याचं कौतुक मला नको सांगुस. मला तर मघाशी कानाखाली द्यायची इच्छाच होत होती. फालतू चौकशा. म्हणे तुम्ही दोघे वेगळे राहताय का डिव्होर्स झालाय.", अभ्याला तो कधीच आवडला नव्हता.
"वीरेन तुला विचारत होता? मग तू काय सांगितलंस?", अजयने त्याला विचारलं.
"हो, मघाशी खाली गेलो तर भेटला होता. काय सांगणार? म्हटलं आपल्याला काय करायचंय? त्यांचं ते बघतील. म्हणे, हम उनके फ्रेंड्स है ना. अपनी रेस्पॉन्सिबिलिटी है उनकी हेल्प करना.",अभ्या त्याची नक्कल करत बोलला.
"हा कसली हेल्प करणार? मी तर म्हणतो वाटच बघत असेल ती एकटी भेटायची. तुझ्यावर किती खुन्नस खाऊन होता तो कॉलेजमध्ये.", आता दिपकलाही त्याचा राग आला होता.
अजयने पुन्हा एकदा तो विषय टाळला.
"चला, जेवायला. लेक्चर ऐकवतो तुम्हाला. बोअर करुन मारतो त्या वीरेनला.", अजय हसत बोलला.
"खरंच रे, दुपारी जेवण झाल्यावर किती त्रास व्हायचा लेक्चरला. आता आठवलं तरी झोपायची इच्छा होते.", अभ्या.
"तुझं आयुष्य झोपेतच जाणार आहे. उठ आता तरी.", अजयने त्याला सोफ्यातून उठवला.
तिघेही जेवायला गेले तेंव्हा बँक्वेट हॉल मध्ये फार कमी लोक होते. अन्या टेन्शनमध्ये लोकांना फोन करत होता.
"कुठे आहेत रे सगळे?", अजयने त्याला विचारलं.
"अरे हे लोक पर्सनल कामं काय काढतात रियुनियन मध्ये?", अनिरुद्ध चिडून बोलला.
"जाऊ दे ना, तू का असं घरचं लग्न असल्यासारखा टेन्शन घेतोय्स?", दिपकने त्याला विचारलं.
"अरे इथे पैसे दिलेले आहेत जेवणाचे वगैरे सगळे. मग का असे वाया घालवायचे?", त्याचंही म्हणणं बरोबर होतं.
"आपण एक काम करुया या? तुझा इव्हेंट रात्री डिनरला ठेवू. ", अनिरुध्धने अजयला विचारले.
"अरे हो, चालेल ना, तू त्याचं काय टेन्शन घेतोस. आपलेच लोक आहोत. मी काय तुझा क्लायंट नाहीये, इतकं टेन्शन घ्यायला. तू रिलॅक्स राहा.", अजयने त्याला समजावलं.
"चल आपण तरी जेऊन घेऊ. भारी जेवण होतं रे, दुपारचं. ", अनिरुद्धाने त्याला टेबलाकडे नेलं.
सगळे एकेक करुन जेवायला ताट घेऊन आले. वीरेनही दिसला तिथे अजयला आणि मघाचं रुममधलं बोलणं त्याला आठवलं. गार्गी कुठे दिसत नव्हती. त्याने तिचा विचार मनातून झटकला आणि पुन्हा मित्रांशी बोलू लागला.

---------
संध्याकाळ झाली तशी अनिरुद्धने पुन्हा एकदा सर्वाना घाई केली लॉनवर यायला. आजची शेवटची रात्र. सकाळी सगळे उठून घरी परत जाणार होते. आज एक मस्त स्टेज बांधलं होतं मध्ये. सातेक वाजता स्टेजवर लाईट लागले आणि समोरच्या खुर्च्याही भरुन गेल्या. मुली मस्त तयार होऊन आलेल्या होत्या. कुणाची साडी, तर कुणाचा इव्हनिंग गाऊन. पहिल्या दिवसाचं अवघडलेपण नव्हतं आज. प्रत्येकजण जणू वर्गातल्या आपल्या ठरलेल्या जागेवर जाऊन बसावा तसा आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींजवळ जाऊन बसला.
अनिरुद्ध स्टेजवर आला आणि पुन्हा एकदा सर्वजण ओरडले, "मित्रहो!" आणि जोरात टाळ्या पडल्या.
"आता उगाच लाजवू नका तुम्ही लोक मला. अरे मी फक्त सांगतोय की कालच चर्चा करुन आरती आणि अर्चनाने एक डान्स बसवला आहे. त्या सादर करत आहेत,'ताल से ताल मिला'." अनिरुद्ध माईक बाजूला ठेवून खाली बसला.
त्या दोघेही कमालीच्या डान्स करायच्या. पुढे जाऊन नक्कीच त्या क्षेत्रात काहीतरी करतील असं सर्वाना वाटायचं. पण दोघीही संसाराला लागल्या आणि विसरुन गेल्या. त्या जुन्या स्टेप्स पुन्हा करायच्या या विचाराने एकदम उत्साहाने कामाला लागल्या होत्या. जणू मध्ये २० वर्ष गेलीच नाहीत इतक्या सहज दोघीनी तो डान्स केला. त्या काळातलं ते रेहमानचं फेमस गाणं, ऐश्वर्या, सगळं लोकांच्या डोळ्यासमोरुन एक क्षणभर तरळून गेलं. जोरात टाळ्यांनी सर्वांनी त्यांचा उत्साह वाढवलाही. एकूणच रात्र रंगणार होती.
डान्स नंतर अनिरुद्धने अजयला पुढे बोलावलं. तो अगदी ब्लेझर ,टाय सर्व घालून आला होता. "how to be successful in corporate life?", या विषयावर बोलणार होता.
तो स्टेजवर आल्यावर अनिरुद्धने त्याला कोपऱ्यात बोलावून सांगितलं,"सॉरी जरा बदल आहे कार्यक्रमात. हा कागद हातात ठेव." कागद हातात देऊन अनिरुद्ध स्टेजवर आला आणि म्हणाला, "अजय आज एका मोठ्या कंपनीत व्हीपी असेलही. पण आपल्यासाठी अजूनही तो शांत राहणारा, थोड्याच शब्दांत खूप काही व्यक्त करणारा कवी म्हणून आठवतो. अजय तुझं ते लेक्चर बाजूला ठेव, ती भरपूर मिळतील परत. पण तुझ्या हातातल्या कागदावर आहे ते परत मिळणार नाही. तर टाळ्यांनी स्वागत करु कवी अजय यांचं!", म्हणत अनिरुद्धने माईक अजयकडे दिला.
त्याने शेवटच्या वर्षी वाचलेली कविता होती ती. हा कागद त्याला कुठून मिळाला ते त्याला आठवत नव्हतं.
आता असं सर्वांसमोर आल्यावर दुसरा पर्यायच नव्हता.
त्याने वाचायला सुरुवात केली,

"मी मागे नसतानाही,
असल्याचा भास होतो ना तुला?

लोकांशी महत्वाचं बोलतानाही ,
माझा एखादा जोक आठवतो ना तुला?

आपण गर्दीत असतानाही,
माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला?

इतरांसोबत जोरात हसतानाही,
माझा दुरावा रडवतो ना तुला?

कधी उदास वाटतानाही,
माझा चेहरा हसवतो ना तुला?

तुला नको असतानाही,
माझा आवाज लाजवतो ना तुला?

तू शब्दांनी नाकारतानाही,
चेहराच सांगतो, मी आवडतो ना तुला?".

कविता संपली आणि २० वर्षांपूर्वी पडल्या तितक्याच टाळ्या आजही ऐकू येत होत्या. पण त्या गॅदरिंगच्या दिवशी सगळं कॉलेज कविता संपल्यावर,"गार्गी गार्गी" म्हणून ओरडत होतं. तीही मग बिनधास्तपणे उठून स्टेजवर जाऊन,टाळ्या वाजवून, "बहोत खूब , बहोत खूब" म्हणून आली होती.
आज मात्र आपल्या खुर्चीत बसून फक्त निरपेक्षपणे बघत होती. तिच्याकडे पाहून मग सर्व वातावरण मग थोडं शांत झालं. गिऱ्याने पुढे होऊन माईक हातात घेतला. अजय खाली उतरला.
"अजय द कवि! एनीवे, मला अनिरुद्धबद्दल चार शब्द बोलायचे होते. म्हणजे त्याचं नाव घेतलं तरी चार शब्द संपतील, म्हणून अजून थोडे बोलतो. त्यानं गेल्या काही दिवसांपासून हे सर्व इतकी मेहनत करुन जुळवून आणलं त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या. आपल्या वर्गाचे मॉनिटर म्हणून मी पुन्हा २० वर्ष त्यांची निवड करत आहे. ", असं म्हणत गिऱ्या हसला. अनिरुद्धने मान हलवून 'हो' म्हणून सांगितलं. त्याला एक मिठी मारुन गिऱ्या खाली उतरला.
"आता वन लास्ट मील. पुढच्या २० वर्षापर्यंत", असं म्हणत अनिरुद्धने माईक बंद केला. मंडळी जेवायला पांगली.
---------
जेवण संपवून सगळे आता फक्त गप्पा मारण्यात गुंगले होते. जणू दोन दिवसांत पुन्हा नव्याने त्यांची मैत्री होत होती. जेवण संपवून, एकमेकांना मिठ्या मारुन सगळे परत झोपायला जाऊ लागले. प्रज्ञा आणि गार्गीला सोडायला वीरेन आणि गिऱ्या होतेच. ते लॉबीतून जात असताना अजयचा आवाज आला,"गार्गी".
तिने मागे पाहिलं. प्रज्ञा, वीरेनला 'तुम्ही जा पुढे' म्हणून ती त्याच्याकडे गेली. दोघेही चालत चालत परत लॉनकडे वळले.
"बाबा कसे आहेत?", त्यानं विचारलं.
"ठीक आहेत. अजून ट्रीटमेंट चालू आहे. ते दोघे?", ती बोलली. तिला मुलांचं नाव घेतलं तर पुन्हा रडू येईल असं वाटू लागलं होतं. इतके दिवस झाले होते दोघांना बघून.
"तुला घेऊन येणार का विचारत होते?", अजय बोलला. तसे गार्गीने वर पाहिलं.
"गार्गी, गेल्या दोन दिवसांत जाणवलं की वीस वर्षांपूर्वी तुला मिळवण्यासाठी किती धडपड केली होती मी. माझा स्वभाव बुजरा होता, तू इतकी मनस्वी, मनमोकळी, दिलखुलास वागणारी मुलगी.  पण तरीही तू हवी होतीस. तुझ्या बाबांकडे यायला किती भीती वाटली होती. तो दिवस आठवला. त्यांनी त्या दिवशी लग्नाला नकार दिला असता तर? तुझ्या भावाने मला पसंत करावं म्हणून त्याला किती मस्का लावला होता. आज ते माझे नातेवाईक आहेत आणि मला त्यांच्याशी अनेक महिने बोलायचेही कष्ट घेता आले नाहीत.
      वीरेनसोबत तुझे पहाटेचे फोटो पाहिले आणि 'तू खरंच त्याच्यासोबत गेलीस तर?' अशी तेव्हा मनात असलेली भीती क्षणभर पुन्हा मनात येऊन गेली. अभ्या तुला, वीरेनला नावं ठेवत होता तेंव्हा त्यांना सांगितलेली कारणं पुन्हा एकदा मनात येऊन गेली. तेव्हा तुला मिळवण्याचे इतके प्रयत्न केले आणि त्यात यश आलं नसतं तर आज कुठे असतो माहित नाही. फोटो पाहतांना तेव्हाची 'तू' आणि आज बदललेली 'तू' यातला फरक जाणवला. आपण सोबत राहूनही तुझ्यातली तू हरवत गेलीस आणि मी साधं शब्दानेही विचारलं नाही. खरंच मला आज क्षणभर का होईना तुला कायमचं हरवण्याची भीती वाटली आणि मी हादरलो. इतके दिवस रागाने, तुझ्या तिरस्काराने घेरलं होतं मला. आज ते सर्व जाऊन फक्त तू दिसत आहेस. ", बोलता बोलता त्याने तिचा हात हातात घेतला होता. तिने चटकन आजूबाजूला पाहिलं.
तिच्या डोळ्यांतून पाणी झरत होतं.
"कालपासून प्रज्ञाचंही तेच चालू आहे. तिलाही तू आवडायचा नाहीस अजिबात. आपण तिला सोडून खरेदीला गेलेलो ते अजून विसरली नाहीये ती. ",गार्गी रडता रडता हसत बोलली.
"आपण भेटायचो ते हॉटेल, त्या जागा, जुन्या आठवणी तिच्यासोबत फिरताना परत जाग्या झाल्या. आई-बाबा, मुलं या सगळ्यांना सोडून फक्त तू आणि मी आठवत राहिले. गेले कित्येक वर्षं असं झालं नसेल. किती वेगळे होतो ना आपण? फक्त तू आणि मी ! या बाकी सगळ्या संसाराचं किती ओझं घेऊन फिरत राहतो आपण, तू आणि मी कधी हरवून जातो कळतंच नाही. आता या क्षणाला तू हाक मारली नसतीस तर काय केलं असतं मी काय माहित? तुझी कविता वाचल्यावर वाटलं हा कुठे हरवून गेला काय माहित. आणि मीही त्याला शोधलं नाही परत.",म्हणून रडत तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं.

त्या दोघांना असं बघून मागे वीरेन, प्रज्ञा, अभ्या, गिऱ्या, दिपक आणि अनिरुद्ध एकमेकांकडे बघून हसत उभे होते. त्यांचा रियुनियनचा हेतू सफल झाला होता.

समाप्त.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, February 05, 2018

री-युनियन भाग ३

         सकाळी  शार्प नऊ वाजता हॉटेलच्या एका कॉन्फरन्स रुममधे नाष्टा होता. सकाळी उठल्यावर ग्रुपवर पाहिलं तर दोन नवीन फोटो आले होते. गिऱ्या, वीरेन, प्रज्ञा आणि गार्गीचे पहाटे भुर्जी पावाचे. त्यावर अजून दोन चार जणांनीं रात्रीचे सेल्फी टाकले. त्यावर कमेंट सुरु झाल्या तशा अनिरुद्धने परत एकदा सर्वांना दटावलं,"चला आवरा, नाष्टयाला आले की बोलू", म्हणून. कॉन्फरंस रुममधे एकेक करुन सगळे साडेनऊ पर्यंत जमले. जे आले नव्हते त्यांना अनिरुद्धने स्वतः फोन करुन 'लवकर या' म्हणून झापलं होतं. गार्गी, प्रज्ञा पोचल्या तर त्यांच्यासाठी वीरेनने टेबलवर जागा पकडून ठेवली होती. तिथे बसल्यावर चौघांना एकदम 'देजा वू' सारखं काहीतरी झालं. चार वर्ष कँटीन, हॉटेल, बस, रिक्षा जिथे गरज लागली तिथे चौघांनी एकमेकांची जागा पकडून ठेवली होती. समोर एक मोठा पडदा होता त्यावर प्रोजेक्टर सुरु केला होता अनिरुद्धने. त्याने माईक हातात घेतला तसे,"मित्रहो!!" असे सगळे जण एकसुरात जोरात ओरडले आणि तो ओशाळला.
"याची मॉनिटर व्हायची हौस अजून गेली नाहीये",  गिऱ्या हळूच बोलला.
" घाबरु नका, जास्त नाही बोलणारे मी. तुम्हा सर्वांकडून बोलून काही फोटो मागवून घेतले होते. कॉलेज सुरु झालं तेव्हा पासून आजपर्यंत म्हणजे साधारण २४ वर्ष झाली आपल्या सर्वांची ओळख होऊन. आपल्या वयाच्या निम्म्यापेक्षा जास्त वर्ष. आता मागे वळून त्या फोटोंकडे पाहताना कसं वाटेल म्हणून ते मागवले. आपल्याकडे प्रत्येकाकडे तेव्हा कॅमेरे तसे नव्हतेच, काही होते त्यांनी इमेज स्कॅन करुन पाठवल्या. घरुन मागून घेतल्या. ते सगळे फोटो एकत्र करुन त्यांचं प्रेझेंटेशन बनवलं आहे. एंजॉय!", म्हणून त्याने माईक खाली ठेवला आणि प्रेझेंटेशन सुरु केलं.
       पहिल्या वर्षी त्यांची ट्रिप गेली होती त्यातले काही फोटो होते. प्रत्येक फोटोला त्याने चांगला अर्धा मिनिट गॅप ठेवला होता. मधेच स्लाईड थांबवून कोण कुठे दिसतोय यावर चर्चा चालू होती. मग प्रत्येकाचे प्रोजेक्टचे फोटो, कुणाचे गॅदरिंगचे फोटो, मुलींचे सारी-डे चे फोटो, कुणाच्या वाढदिवसाच्या पार्टीला असलेल्या ७-८ जणांचे फोटो, रुमवर एकमेकांच्या अंगावर पडून घेतलेले फोटो, असे येत राहिले. कुठले फोटो, कुठल्या वर्षीचे हेही आठवून झालं, कोण एखाद्या ग्रुप फोटोमध्ये का नव्हतं यावर बोलून झालं, त्यावरुन एखादं भांडणही झालं. पण एक मात्र होतं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं, २०-२४ वर्षापूर्वीचे आपण कसे होतो ते पाहून. सगळे मागे जाऊन परत आले होते. त्यात एक फोटो होता गार्गी, प्रज्ञाच्या ग्रुपसोबत अजयचा. तो पाहून एकदम सगळं पब्लिक शांत झालं.
         पुढचा फोटो, होळीला अंगभर रंग माखलेला आल्याने सर्वजण सुटले. त्या होळीच्या फोटोत एकाचं म्हणून तोंड नीट दिसत नव्हतं. त्यादिवशी कुणाला किती रंग लावला, हॉस्टेलवर पाणी झालं म्हणून रेक्टर किती ओरडला यावरही बोलणं झालं. वीरेन-गिऱ्याला तर पोलीस पकडून घेऊन गेले होते रंगाची पोती गाडीवरुन घेऊन जात होते म्हणून. पोलिसांच्या गाडीत बसलेल्या गिऱ्याचा रडवेला चेहरा आठवून गार्गी हसू लागली, जोरजोरात.
"किती घाबरला होतास. तुझ्याऐवजी मीच जाऊन आले असते जेलमध्ये.", गार्गी बोलली.
"तू काय गं, डॅशिंगच होतीस. जाऊन आली असतीस तरी चाललं असतं. मेसवर जेवणही मिळालं नाही. किती भूक लागली होती माहितेय का?", गिऱ्या नाराजीने बोलला.
"मग ते बाहेर पडल्यावर दोन थाळ्या जेवण जेवलास ना?", प्रज्ञा हसून बोलली.
नाश्ता करुन पोट आणि मन दोन्हीही भरलं होतं. सगळे जण अनिरुद्धचे मनापासून आभार मानत होते. सर्वांचा पुन्हा एकदा ग्रुप फोटो काढून घेतला. सर्वांचे सेल्फी वगैरे काढून झाले, कुणाचे अपलोड झाले. जेवेपर्यंत ब्रेक होता मध्ये.
सगळे बाहेर पडले, कुणी खरेदी करणार होतं, कुणी अजून कुणाला भेटून येणार होते. प्रज्ञाला खरेदी करायची होती परत जायची, त्यामुळे ती आणि गार्गी खरेदीला जाणार होत्या. इतक्यात वीरेनने मागून हाक मारली तिला,"गार्गी". ती थांबली. प्रज्ञाने, "मी वर जाऊन पर्स घेऊन येते गं", म्हणून पटकन कल्टी दिली.
तो आणि गार्गी मग हॉटेलच्या लॉबीमध्ये एका टेबलजवळ जाऊन बसले.
"बहोत अच्छा लग रहा है.", वीरेन बोलला.
"I know, I am glad I came too!", ती बोलली.
"कैसी है तू?", त्याने विचारलं.
"ठीक हूं.", गार्गी.
"गार्गी, I am still your friend. You can talk to me.", वीरेन बोलला.
इतका जवळचा मित्र ज्याच्याजवळ आजतागायत तिने मन मोकळं केलं होतं. तिला एकदम भरुन आलं. मोठ्या मुश्किलीनं रडू आवरुन तिने सांगितलं, "I am done with him yaar".
"चल अच्छा है. अब तू अपनी जिंदगी अराम से जी बस. हम है ना, अब सब?", त्याने विश्वासाने तिला विचारलं.
ती डोळे पुसत 'हो' म्हणाली.
प्रज्ञा खाली आली आणि त्याला बाय करुन दोघी बाहेर निघाल्या.
"काय झालं, काय म्हणत होता तो?", तिने रिक्षात बसतांना विचारलं.
"तेच गं जे टाळत होते.", गार्गी.
"का पण? हे बघ तुला सांगू का तुम्ही ठरवलं ना तेंव्हाच मला माहित होतं असं काहीतरी होईल म्हणून. तू सांग आपल्या ग्रुपमध्ये कुणाला तरी तो ठीक वाटायचा का? आम्ही तुला बोलतोय असं वाटलं तर तू आम्हांला तोडायला निघालीस. मग शेवटी आम्हीच त्याला स्वीकारलं. पण मला कधीच नाही आवडला तो. किती शिष्ठ आहे. काल आल्यापासून फक्त 'हाय' केलं त्याने मला. तुझ्याशी बोलला तरी का?", प्रज्ञा आज स्पष्ट बोलत होती.
गार्गीने 'नाही' म्हणून मान हलवली.
"त्याचं स्वतःच्या विश्वात राहणं, तू अशी इतकी सोशल. शक्यच नव्हतं तुमचं जमणं.", ती म्हणाली.
"मी खूप प्रयत्न केले गं. आई-बाबा इथे, बाबांची तब्येत ठीक नव्हती. मला सारखं ये-जा करावं लागत होतं मुंबईतून. पण याची काहीच मदत नाही. मी म्हटलं त्याला इकडे शिफ्ट होऊया. तर म्हणाला, माझा भाऊ इथेच असतो. आई बाबा आहेत, तर का तिकडे जायचं?", गार्गीने शेवटी बोलायला सुरुवात केली.
"गेले दोन वर्ष मी प्रत्येक वीकेंडला ये-जा करत होते. तर शेवटी म्हणाला मला, 'मुलांकडे दुर्लक्ष करते' म्हणून. गरज होती तेंव्हा त्यांच्यासाठी घरी राहिले. आता त्याने नको बघायला थोडं? प्रत्येक वेळी मी पुण्याला येताना भांडण, परत गेलं कि भांडण. मध्ये एक महिना सलग इकडे राहावं लागलं तर इतके वाद झाले. मीही म्हटलं नाही येणार, काय करायचं ते कर. मुलांना घेऊनच इकडे येणार होते. पण त्यांची शाळा अशी मध्ये सोडताही येणार नाहीये. आज चार महिने झाले, फक्त मुलांशी बोलतेय. त्यांची एकदा परीक्षा झाली की भांडून त्यांना इकडे घेऊन येणार आहे. काल खूप इच्छा झाली होती त्यांच्याबद्दल विचारायची, पण परत उलट बोलला तर अजून नाटक झालं असतं लोकांसमोर. ज्याला काय म्हणायचं ते म्हणू दे. मी नाही बोलणार त्याच्याशी काही. ", गार्गीने निर्धार केला होता.
----------

अजय, अभ्या, दिपक रुमवर आले.
"मस्त होता ना शो. भारीय अन्या पण.",अभ्या बोलला.
"कसले फोटो होते एकेक. काय बावळट होतो आपण", दिपक हसून बोलला.
"चला रे मी आंघोळ करुन येतो, अन्याने मला बोलायला सांगितलं आहे दुपारी", अजय म्हणाला.
"तू काय बोलणारेस?", अभ्यानं विचारलं.
"माझे अनुभव नोकरीतले", अजयने सांगितले.
"तुम्ही काय बाबा मोठी माणसं. व्हीपी, बीपी.", अभ्या म्हणाला.
"ते जाऊ दे रे. तू आधी बस आणि सांग तुझं आणि गार्गीच काय चाललंय? अभ्या तू पण सांग रे याला. नुसता विचार करत बसलाय. ", दिपकने मूळ मुद्द्याला हात घातला.
"काही नाही रे. तिचं म्हणणं आम्ही इकडे पुण्याला येऊन राहावं. तिचे आईबाबा इथेच असतात. गेली दोन वर्ष झाली हेच नाटक चाललंय. सारखी ती आपली इकडे पळते. मी तिच्या माघारी मुलांना सांभाळतो. मध्ये तर सरळ महिनाभर तिकडे जाऊन राहिली. इथे पोरांची परीक्षा आहे, आजारी पडलेयत, काही नाही त्याचं.", अजय वैतागून बोलला.
"घराचं कर्ज घेतलेलं. त्यात हिचे इतके हेलपाटे, त्यामुळे तिचीही नोकरी थाऱ्यावर नाही. मधे तर घरात इतका गोंधळ चाललेला, माझीच नोकरी गेली असती. जरा वर चढायला लागलं की बाकी लोकांना त्रास होतो. माझी धावपळ होतेय बघून काड्या टाकतात. हिला समजायला नको का थोडं तरी? जातीस तर जा म्हंटलं. काल पण बघ की पोरांबद्दल एका शब्दाने तरी बोलली का? ते बिचारे रोज विचारतात तिला कधी येणार म्हणून, ही रोज नवीन तारीख सांगणार. म्हटलं नकोच येऊस. ", अजय रागाने बोलला.
दिपक विचार करत होता.
"तुला आम्ही सांगितलं तर पटलं नसतं तेव्हा. पण ती अशीच आहे अरे, हट्टी. तू इतका वेद झाला होतास तेव्हा प्रेमात की आम्ही 'नाही' म्हटलं तरी ऐकलं नसतास. शेवटी गप्प बसलो आम्हीही. ", अभ्या म्हणाला.
"जाऊ दे रे, उगाच नको तो विषय. हे बघ अज्या नीट विचार करुन काय ते कर. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस असा. मी काही तिच्या इतका जवळ नव्हतो कधी त्यामुळे तिच्याशी तसा बोलू शकत नाही. तू बघ इथे आहेस तर बोलून." दिपक त्याला समजावत होता.
 "ती नाही ऐकणार रे. मघाशी पण त्या वीरेनच्या टेबलवर बसली होती. यायचं होतं ना आपल्या टेबलावर.", अजय म्हणाला.
"आता त्यांचा ग्रुपच आहे ना तो. पण तुमच्या लग्नाला किती मारामारी केली होती आम्ही. कसलं टेन्शन तिच्या बाबांशी बोलतांना. तुझी तर फाटली होती. आम्ही होतो म्हणून वाचलास, नाहीतर मारच खाल्ला असतास त्यादिवशी. ", अभ्या हसत म्हणाला.
"हो बरका. आम्हाला ढाल बनवून गेला होतास त्या दिवशी. ", दिपकलाही तो प्रसंग तसाच्या तसा आठवत होता.
अजयही ते आठवून थोडं हसला. त्याला हसताना पाहून बरं वाटलं दोघांना.
"अरे पण तिचे आई बाबा कुठे गावात राहायचे ना? मग इकडे कसे आले?", दिपकने विचारलं.
"तिच्या भावाने घर घेतलं आहे इथे, तेव्हा आले. पण तो आता गेला ऑनसाईटला. ते इथेच आहेत. ", अजयने सांगितलं.
"तिचा तो छोटा भाऊ का रे? आपल्या रुमवर आला होता ना एकदा?", अभ्याने विचारलं.
"हो तोच. ", अजय.
"कसला बावळट होता रे तो. तू फुल त्याला अगदी लहान बाळासारखा सांभाळत होतास. मी तर म्हणत होतो त्याची रॅगिंग घेऊ, तर नको म्हणालास. ", अभ्याने आठवण करुन दिली.
"हो ना, चांगली मजा घेतली असती. बरं तो नाही का परत येणार इकडे मग?",दिपक बोलला.
"माहित नाही रे मला त्याचं काय आहे ते. मी काही कुणाशी बोलत नाही त्यावर. ", अजय बोलला आणि आंघोळीला जायला निघाला.

तो बाथरुममध्ये गेला आणि दोघे अभ्याला फुंकायचं होतं म्हणून ते दोघे बाहेर पडले.

क्रमश:

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, February 04, 2018

री-युनियन भाग २

       गार्गी आली या विचाराने त्याला चढलेली उतरली. तो एकदम जागा झाला. मागच्या टेबलावर प्रज्ञाशी बोलत हसत होती ती. मघाशी प्रज्ञाला 'हाय' केलं होतं त्याने पण पुढे होऊन तिच्याशी बोलायची हिम्मत झाली नव्हती. तिची रुममेट आणि जवळची मैत्रीण होती. म्हणजे माहितच असणार गार्गी येणार की नाही ते. शिवाय पुढे जाऊन तो बोलला आणि तिने नको ते प्रश्न विचारले तर? नकोच ते म्हणत तो नुसतं 'हाय' करुन गेला होता. तिने जीन्स आणि टॉप घातला होता. बारीकही झाल्यासारखी वाटली त्याला ती. तो तिच्याकडे थेट बघायचं टाळत होता, कारण त्याला माहित होतं या वर्गातल्या सगळ्या नजरा त्याच्यावर असणार, ती आल्यापासूनच. तरीही तिचं हसू ऐकल्यावर एकदम बोचल्यासारखं झालं काहीतरी.
     प्रज्ञा आणि नितासोबत बोलत तिने जेवण केलं. बरेचजण जे परदेशातून आले होते, कुणी थे एअरपोर्टवरुन इकडे आले होते ते सर्वजण पांगले. कुणाला चढली होती, तर कुणी जुन्या घट्ट मैत्रीच्या घोळक्यात बसून जोरजोरात हसत होता. मुलींनी थोडा वेळ वेगळा घोळका केला होता, पण त्यावर टोमणा मारला आणि मग सगळ्या विखुरल्या. कुणी प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करणाऱ्या मित्राशी बोलू लागली तर कुणी एकेकाळच्या आपल्या जवळच्या मित्राशी. रात्री ११ वाजले. लॉन रिकामं करणं गरजेचं होतं. उरलेले लोकही आपापल्या रुमवर निघून गेले. गार्गी प्रज्ञासोबत आपल्या हातात छोटीशी बॅग घेऊन तिच्या रुमवर गेली. दोघींच्या गप्पा आताशी सुरु झाल्यात असं वाटत होतं.
   
"बारीक झालीस किती?", प्रज्ञानं तिला विचारलं.
"हो नं, झुंबा लावलाय थोडे दिवस झाले. म्हटलं पूर्वीसारखं होऊन जायचं.", एकदम हसून गार्गी बोलली.
"बरं झालं आलीस, मला फार वाईट वाटलं असतं तुझी भेट झाली नसती तर.", प्रज्ञा.
"खरं तर तू इकडे येणार असं कळलं म्हणून आलें नाहीतर माझी यायची अजिबात इच्छा नव्हती. एकदा तू अमेरिकेत गेलीस की परत कधी भेटणार आम्हाला तू? ",गार्गी.
"तसं नाही गं, इकडे आलं तरी पुण्यात यायचं जमत नाही.माहेर-सासर करत सुट्टी संपून जाते. यावेळी तुम्ही सगळे भेटणार म्हणून का होईना ब्रेक मिळाला त्यातून. बरंय, सगळे एकत्रच भेटले ते. ", प्रज्ञा बोलली.
दोघी चालत रुमवर आल्या. बॅग टाकून गार्गीने रूमचं निरीक्षण केलं. छान होती.
"भारीय ना? मुद्दाम कॉर्नरची रुम द्या म्हणलं त्या माणसाला मी. मस्त मोठी आहे. मी आर्ची, प्राचीची जाऊन पाहून आले. त्यांच्यापेक्षा मोठी आहे. " प्रज्ञानं पुढची माहिती दिली होती.
"तू ना सुधारणार नाहीस. ", गार्गी म्हणाली.
"तुझ्याकडूनच शिकलेय ना? आठवतंय का तू हॉस्टेलला भांडून आपली बदलून घेतली होतीस. कसली चिडली होती ती मोनिका. तिच्या रुममेट पण मला खुन्नस द्यायच्या वर्षभर. कधी पटलं नाही ना आपलं त्यांच्याशी परत मग?", प्रज्ञा होस्टेलवरचं पहिलं वर्ष आठवत बोलली.
"हो ना, मला खूप राग येत होता की सिनियर म्हणून आपल्या मजल्यावरची मोठी रुम त्यांना द्यायची. गेल्या ना मुकाट्याने मग त्यांच्या मजल्यावर.", गार्गीला आठवलं होतं ते.
 रुममध्ये बेडवर पडून तिला फार बरं वाटत होतं. एकदम निवांत.
कपडे बदलून प्रज्ञा बाहेर आली तशी तीही आवरुन पडली मग.
"हे घे" म्हणत प्रज्ञाने तिच्या हातात एक बॉक्स टेकवला.
"माझ्यासाठी ना? ", गार्गीने आनंदानं तो घेतला.
"मग काय प्राचीसाठी?", प्रज्ञा.
"ए मस्तय गं.", गार्गीला तिचं ते गिफ्ट मिळालेलं घड्याळ आवडलं होतं.
"आवडलं ना? माझ्यासाठी पण सेम आणलंय, आपण घालूया उद्या-सेम टू सेम.", प्रज्ञा.
"हां भारी आयडियाय. ए सचिन काय म्हणतोय? ", गार्गी म्हणाली.
"काही नाही आता दोन दिवस लेकीला एकट्याने बघायचं म्हणून वैतागला होता. पण करेल.", प्रज्ञा म्हणाली.
"ए तसं तो सगळं करतोच हां घरातही.", गार्गी.
"हो तसं करतो पण मग मधेच लहर आली की उगाच चिडचिड असते त्याची.", प्रज्ञा.
"जाऊ दे गं, तेव्हढं चालायचंच. ते मध्ये त्याला त्रास होत होता डोकेदुखीचा, कमी झाला का तो?", गार्गी.
"हो ना, खूप चेक अप केले पण काही कळत नव्हतं. त्याच्या आईचा आयुर्वेदावर खूप विश्वास, आता आलाय तर घेऊन जातील डॉक्टरकडे. म्हटलं जाऊन या, माय-लेक. ",प्रज्ञा.
"हम्म जाऊ दे. तू आलीस ना इकडे? मग ते काय का करेनात.", गार्गीनं तिला समजावलं.
"हो नं, मी सुटले दोन दिवस तरी. मध्ये खूप टेन्शन होतं पण त्याच्या आजाराचं आम्हाला. कमी होईल औषधाने तर चांगलंच आहे. ", प्रज्ञा विचार करत बोलली.
"तो अभ्या किती वेगळा दिसत होता ना ?", गार्गी मधेच बोलली.
"हो नं, मला तर कळलंच नाही कोण आहे ते आधी. ", प्रज्ञा जोरात हसत म्हणाली.
"तू काय बावळटसारखं विचारतेस त्याच्यासमोरच, 'हा कोण म्हणून'?", गार्गीने तिला झापलं.
"अगं नाही आलं लक्षात तर काय करणार?", प्रज्ञा अजूनही त्यावरुन हसत होती.
"प्राची-अर्चूशी बोलणं नाही झालं माझं. उगाच परत ते प्रश्न नकोत.", गार्गी जणू लॉनवरच्या प्रत्येक माणसाचा परत आढावा घेत बोलत होती.
दोघी आपापल्या गाद्यांवर पडून, हातात डोकं टेकवून एकमेकींकडे तोंड करुन बोलत होत्या. मधेच गार्गीने कूस बसलली.
"एका बाजूला बघून मधेच मान अशी अवघडल्यासारखी होते बघ.", ती छताकडे बघत बोलली.
"ह्म्म्म मला पण त्रास सुरु झालाय हल्ली थोडा पाठदुखीचा. ", प्रज्ञाने तिला सांगितलं.
खूप वेळ मग प्रज्ञाच्या घर, सासर, माहेर, ऑफिसच्या गप्पा झाल्या. रात्रीचे दोन वाजले तसे त्यांना भूक लागू लागली.
"मला ना खूप इच्छा होतेय आपण रात्री बाहेर मॅगी खायला जायचो तसं जायची. ", प्रज्ञा म्हणाली.
"वेडी आहेस का? तेव्हा कसे जायचो काय माहित, आता मात्र माझी हिम्मत होणार नाही. "गार्गी म्हणाली.
"जाऊया ना. माझा असाही जेटलॅग चालूय. चल, एक काम करु वीरेनला बोलावू.
"वीरेनला काय? नाही नको, तो झोपला असेल. तो मात्र अजूनही तसाच दिसतोय ना? ", गार्गी म्हणाली.
"हो तसाच दिसतो अजूनही. बरं ते जाऊ दे, थांब मी त्याला फोन लावते.", म्हणत तिने त्याला फोन लावलाही.
   
     वीरेन आणि त्याचा मित्र, गिऱ्या जागेच होते, गप्पा मारत. चौघेही मग हॉटेलमधून बाहेर पडून जवळच्या टपरीवर गेले. तिथे मॅगी मिळत नव्हती, पण चहा आणि भुर्जी-पाव होता. सगळ्यांनी खाऊन मस्त चहा घेतला आणि गप्पात दोन तास कसे उलटले कळलंही नाही. परीक्षेच्या वेळी केलेली गंमत, अभ्यासाच्या दिवसांत रात्री जागून केलेली तयारी, त्यात कुणी सकाळी उठणारा तर कुणी रात्री जागणारा. गप्पा संपतच नव्हत्या. कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून त्यांचा ग्रुप होता. कॉलेजची चार वर्षं  ते सोबतच होते. चार वाजता परत येऊन त्या दोघीना त्यांच्या रुमच्या दारापर्यंत सोडून ते दोघेही परतले.

"मजा आली ना? ", प्रज्ञा बोलली.
"हो ना, बरं झालं गेलो ते.", गार्गी म्हणाली.
"तुला एक विचारु?", प्रज्ञाच्या आवाजावरुन तिला माहित होतं ते प्रश्न आता येणार आहेत.
"मला नेहमी वाटायचं की तू आणि वीरेन कधी ना कधी एकत्र याल. पण ते कधीच झालं नाही. ", प्रज्ञा बोलली.
"जाऊ दे ना तो विषय. आता तर त्याचं लग्नही झालंय.", गार्गी बोलली.
"गार्गी, किती बदललीयस तू ! तुझं तुला तरी कळतंय का?", प्रज्ञाला मात्र ते कळत होतं, दिसत होती.
हसणारी, भांडणारी, हक्कानं सर्वांना घेऊन जाणारी गार्गी एकदम शांत होती.
"तुला मी सांगितलं होतं ना तू काही बोलणार नसशील तरच मी येते म्हणून. खूप त्रास होतो बोलताना मला. जाऊ दे, आज नको तो विषय. त्यात आणि उशीर झाला म्हणून आपले ऑर्गनाईझर ओरडतील. ", म्हणून गार्गीने तिला थांबवलं आणि ती झोपलीही.
"हो ना, किती सिरियसली करतो नाही हे सगळं, अनिरुद्ध?", प्रज्ञाला त्याची धडपड आठवली एकदम.

दोघी लवकरच झोपूनही गेल्या.
----------

तिकडे अजय, दीपक, अभ्या त्यांच्या रुमवर एकत्र आले होते. बाराही वाजले नव्हते इतक्यात अभ्याची झोप लागून गेली होती.
"इतकी चढलेली त्याला. " दिपक बोलला.
"हो ना, झेपत नाही तरी प्यायची सवय काही गेली नाहीये त्याची. ", अजय हसत बोलला.
"किती ओरडायचो त्याला आपण, हॉस्टेलवर हे असलं आणू नकोस म्हणून. मला तर जाम टेन्शन यायचं त्या रेक्टरचं.", दिपक बोलला.
"तू अजूनही तसाच आहेस बघ, ऑफिसमध्ये मॅनेजरला आणि घरी बायकोला घाबरुन राहात असणार.", अजय.
"रहावं लागतं बाबा. सुखी संसाराची गुरुकिल्ली, घरी आणि ऑफिसमध्येही. ते जाऊ दे, पण तुला प्यायची सवय कधीपासून लागली. ", दिपक हसत बोलला.
"अरे ऑफिसमध्ये अनेकदा नाही म्हणायचो सुरुवातीला. पण सारखंच नाही म्हणता येईना. शेवटी थोडी का होईना सुरु केली मग.", अजय बोलला.
"ह्म्म्म. मुलं कशी आहेत? ", दिपकने विचार करुन विचारलंच.
"ठीक आहेत. थोडी धावपळ होतेय, पण बाई आहे कामाला त्यांच्या. सर्व बघते त्यांचं. दादा, वहिनी पण आहेत. त्यांचीही मदत होते. बरं, चल झोपतो मी. इकडे यायचं म्हणून पहाटे उठून ऑफिसला गेलो होतो. ", अजय शांतपणे बोलला.

दिपकने 'हो' म्हणून लाईट बंद केला आणि अंगावर पांघरुण घेतलं. मधेच अभ्याच्या घोरण्याचा आवाज ऐकू येत होता.
'तिने साधं विचारलंही नाही!', मनातल्या मनात बोलत अजय अस्वस्थपणे पडून राहिला. आपण आहोत त्याच हॉटेलमध्ये ती आहे या कल्पनेने त्याला अजिबात झोप येत नव्हती. पण विषय टाळण्यासाठी गप्पं राहणं भाग होतं त्याला. छताकडे एकटक बघत तो पडून राहिला.

क्रमश:

विद्या भुतकर
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Thursday, February 01, 2018

री-युनियन - भाग १ (कथा )

    अजय दुपारी धावतच गाडीकडे गेला. ऑफिसमधून निघायला बराच वेळ झाला होता. पुण्याला पोहोचायला अजून तीनेक तास तरी लागणार होते. अजून घरी जाऊन एका दिवसाची बॅग तरी भरायची होती. त्याने गालाला हात लावून पाहिलं. "काय त्रास आहे?", काल केलेली दाढी परत वाढली होती. आता तेही करावं लागेल म्हणजे. 
घाईघाईत घरी पोचला तर घर तसंच पडलेलं. मुलं आज थेट काकाच्या घरी जाणार होती. ते सगळं ठरेपर्यंत गोंधळ चालू होता. दुपारी निघता येईल की नाही, ट्रॅफिक कसं असेल, सुट्टी मिळेल की नाही, मुलं दादाकडे राहतील की नाही असे अनेक प्रश्न समोर होते. एका पाठोपाठ एक अडथळ्यांची शर्यत पार करत तो घरी पोचला होता. त्याने कपाटातून खालच्या ढिगातून दोन इस्त्रीचे शर्ट बाहेर काढले, धुवायला लावलेले दोन टी-शर्ट, एक जीन्स टाकली, बाकी सामान झटक्यात बॅगमध्ये टाकून तो बाथरुममध्ये पळाला. पटकन दाढी केली, तोंड धुतलं आणि घरातून बाहेर निघाला. जाता जाता पोटावर घट्ट बसणाऱ्या त्याच्या शर्टची जाणीव झालीच. 'तरी डोक्यावर केस आहेत' याचंच समाधान मानून तो निघाला. गाडी पुण्याच्या मार्गाला लागल्यावर त्याला हुश्श झालं होतं. 
          
          गेल्या कित्येक दिवसांपासून त्याचे मित्र मागे लागलेले 'रियुनियला येच' ,म्हणून. बरं वीस वर्षांनी सर्व भेटणार होते. गेले एक वर्षभर लोक प्लॅन करत होते. अनेकांना परदेशातून यायचं होतं. त्यामुळे ते आता नाही भेटले तर परत कधी? 'अजून वीस वर्षानंतरही अजून एक असंच प्लॅन करु' , जोशात अजय बोलला होता. आणि आजपर्यंत स्वतःच जाणार की नाही हे नक्की होत नव्हतं. जमतंय असं वाटल्यावर त्याने गाडीतूनच अभय, दिपकला फोन केला होता. तो येतोय म्हणल्यावर दोघेही खूष झाले होते एकदम. अभ्या फ्लाईटमध्ये चढत होता तर दिपक, 'आपल्याच गावात आहे गेट-टू' म्हणून खूष होता. अजयच्या मनात फक्त एकच प्रश्न सलत होता,"गार्गी येणार आहे की नाही?". आपण जातोच आहे की मग तिला काय प्रॉब्लेम असेल? आली तर? नाही आली तर? काय बोलायचं हे त्याचं नक्की होत नव्हतं. संध्याकाळी रिसॉर्टवर पोहोचून त्यानं रुम घेऊन टाकली आणि जिथे सर्व भेटणार होते त्या लॉनवर आला. 
        लॉनवर काही मंडळी जमली होती. आता एकाच वर्गाचं रियुनियन, त्यात नवरा, बायका-मुलं नको. का? तर पूर्वी होस्टेलवर रूममेट म्हणून राहायचो तसं राहायचं, दोन दिवस मजेत घालवायचे आणि आपापल्या मार्गाला लागायचं. यांत दोन हेतू होते, एकतर नवरा किंवा बायको आली की मोकळेपणाने बोलता आलं नसतं.  आणि ओळख नसलेल्या लोकांशी बोलण्यात यांच्या नवरा किंवा बायकोला तरी काय इंटरेस्ट असणार?  मुलं आली की मग तेच घर, संसार आणि त्यातच अडकून जातात सर्व. मस्त बॅचलर लाईफ जगता आलं पाहिजे असं काहींना वाटत होतं. पन्नास जण एकत्र येणार म्हणजे मारामाऱ्या होणार होत्याच. कसेतरी सर्वाना समजावून एकेकटे यायचं हे नक्की झालं होतं. जसा एक कॉमन व्हाट्स ऍप्प ग्रुप झाला होता, तसाच मुलींचा एक झाला, एक मुलांचाही. त्यातूनही, जवळच्या मित्र-मैत्रिणींचे असतील ते वेगळेच. प्रत्येक ग्रुपवर वेगवेगळ्या गप्पा, इथून तिथे काय बोलायचं, काय टाळायचं हे सर्व जपूनच करावं लागत होतं. या सर्वांत गार्गी कुठेच दिसत नव्हती. मधेच तिचा विषय कुणी काढला तरी त्याला कुणी काही विचारलं नव्हतं. 
        लॉनवर दिपक भेटल्यावर दोघांनी कडकडून मिठी मारली होती. मग दिपकने त्याला एक गुद्दा मारला पाठीत. "व्हीपी झालास म्हणून इतका माज का रे? दोन तासांवर राहतोस, तरी चार वर्षात भेटला नाहीस. लाज आहे का नाही?", दिपकने त्याला झापलं. 
"कामं खूप आहेत रे डोक्यावर. कितीही म्हटलं तरी जमतंच नाहीये यायला इकडं. ", अजय बोलला. 
"तर तर मला सांगू नकोस पुण्याला येत नाहीस म्हणून.", यावर मात्र, "नाही येत" असं थेट उत्तर अजयनं दिलं आणि विषय मिटवला. 
        प्रज्ञा, अर्चना, स्वप्नाली, एकेक करत मुली, मुलं सगळे येत होते. नुसता दंगा चालू होता. एखादा कुणी  ओळखूही येऊ नये इतका बदलेलला तर अगदीच एखादीला 'तू अजिबातच बदलली नाहीस हां' असा कॉम्प्लिमेंट मिळत होता. ड्रिंक्स ठेवले गेले. ड्रिंक्स ठेवायचे की नाही यावरुनही वाद-विवाद झाले होते. मुलींच्या आणि मुलांच्या ग्रुपवर त्यावरुन वेगवेगळे डिस्कशनही झालं होतं. 'कोण मुलगी अजूनही तितकीच बोअरिंग आहे' असं मुलांचं आणि  'कोण किती पितो किंवा पीत असेल' यावरुन मुलींचं. कुणा मुलीला किंवा मुलाला फेसबुकवर एखाद्या पार्टीत दारुचा पेला हातात धरुन टॅग केल्यावरुनही चर्चा झाली होती. कुणाचं पोट २०१२ च्या फोटोमध्ये कमी होतं आणि बियरमुळे कसं वाढलंय हेही. एखाद्या मुलीचे डोळे पिऊन लाल झालेत का तिचे सर्वच फोटोमध्ये  'रेड आय' असते यावरुनही. एकूण काय, लोकांनी भरपूर चर्चा केल्या होत्या. 
       आता सर्वजण कुठला ना कुठला रंगीत प्याला हातात घेऊन मिरवत होते. मुलींनी पार्लरला जाणे, नवीन साडी किंवा ड्रेस विकत घेणे हे सर्व केलं होतं. पुढचे दोन दिवस काय कपडे घालायचे, एखादा ड्रेस कोड ठेवायचा का?, एकाच रंगाचे कपडे घालायचे का? अशाही चर्चा गर्ल्स-ओन्ली ग्रुपवर झालेल्या. जरा जास्त जवळच्या मैत्रिणींना आपल्या खरेदीला गेल्यावर फोटो पाठवून 'घेऊ का नको?' असे व्हाट्सअँप शॉपिंगही झाले होते. मुलं निदान नीट इस्त्रीचे कपडे घालून, दाढी करुन तरी आले होते. एखादाच विरेन सारखा होता, फिटनेस फ्रीक, जो अजूनही फिट दिसत होता. त्याच्यावर मरणाऱ्या दोन-चार पोरींनी एक-दोनदा त्याच्याशी बोलून झालेलं होतं. 'त्याची बायको किती हॉट आहे' यावर बोलणंही झालेलं त्यांचं. एखादाच न आवरता आला असेल. 'त्याचं ब्रेक-अप झालं की डिव्होर्स?' असे प्रश्न चोरुन विचारण्यात येत होते. नक्की माहित नसल्यानं समोर आल्यावर त्याच्याशी काय बोलावं कुणाला कळत नव्हतं. खरंच हा वॉर्मअप सेशन होता. 
         अजयने ती नाही आली तरी आपल्याला काय फरक पडतोय म्हणून विचार करायचा नाही असं ठरवलं होतं. तरीही लॉनच्या गेटकडे नकळत त्याची नजर जात होती. स्टार्टर सुरु झाल्यावर मधेच कधीतरी तो थोडा शिथिल झाला. जास्त काही न खाता घेतलेल्या ड्रिंकचा प्रभाव असावा. एका ठिकाणी टेबलाजवळ बसून घेतलं त्यानं. दिपक स्टार्टरच्या दोन प्लेट घेऊन आला. त्याच्याशी बोलताना थोडं मन रमल्यासारखं वाटलं त्याला. मधेच फोन काढून ऑफिसच्या काही मेल आल्यात का तेही तपासून घेतलं त्यानं. अचानक हसण्याचा आवाज आला आणि त्याला कळलं ती आलीय, गार्गी आली होती!

क्रमशः
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/