Wednesday, January 28, 2009

मी खूष आहे !!

आता हे जाहीर करण्याची काय गरज? तर ही जाहीरात नाही फक्त एक statement आहे. झालं असं की खूप दिवसांपासून मला इच्छा होत होती एक भाजी खाण्याची, शेंगसोला. आता कितीतरी लोकांना हे नाव माहितही नसेल. संक्रातीच्या आधी, भोगीच्या दिवशी ही भाजी बनवतात. पण मग त्याला लागणाऱ्या भाज्याही विचित्रच आहेत. पावटा, ओला हरभरा, वांगं, गाजर, शेंगदाणे, बोरं इ. :-) एकतर हे combination किती odd आणि तेही अमेरिकेत यातला ओला हरभरा, ताजा पावटा मिळणं अजून दुर्लभ. पण यावेळी माझं नशीब जोरावर होतं. मला या सर्व भाज्या मिळल्या अगदी ताज्या. आणि भाजी केल्यावर त्याची चवही अगदी आई करते तशीच....... :-P मग त्याबरोबर तीळ लावलेली बाजरीचीच भाकरी हवी. :-) ते पीठ काय मिळतंच, पण चक्क जे मिळालं त्याची एक अखंड भाकरीही झाली. नाहीतर दोन-तीन तुकडे पडल्याशिवाय भाकरी काही होत नाही इथे. एकूण काय तर मला जसा हवा तसा शेंगसोला आणि भाकरीचा बेत पार पडला. अगदी संदीपला वाटीभरच मिळेल असं सांगून उरलेला सर्व संपवूनही टाकला आणि तृप्तीची एक ढेकर दिली................. :-) ........... म्हणून मी खूष आहे!!!
हे सगळं लिहिण्याचं कारण असं की ’मी खूष आहे’ जेव्हा असं म्हणत होते तेव्हा लक्षात आलं की आजकाल दिवसभरात किंवा अगदी महिन्याभरात आपण असं कितीवेळा म्हणतो की मी आज खूष आहे? त्यासाठी मग अगदी छोटं कारण असो नाहीतर खूप मोठं. मग स्वत:बरोबरच बाकी लोकांचं निरीक्षण करताना दिसलं की आजूबाजूलाही कितीतरी लोकं आहेत की ज्यांना ’I am happy today !' असं म्हणायला अगदी जीवावर येतं. दिवसभरात आपल्याला आनंदी असण्यासाठी एक कारण मिळू नये?
एखाद्या सोबत काम करणाऱ्या माणसाने म्हटलं, how are you? तर आपण पटकन 'Good' म्हणून सोडून देतो, तेच एखाद्या प्रेमळ मित्राने विचारले, ’काय रे कसा आहेस’, तर ’अरे एकदम मजेत’ असं म्हणायला काय पैसे पडतात का? मी समजू शकते की आपली दु:खं जवळच्याच माणसांना सांगता येतात, पण म्हणून रडतच रहायचं? आज काय खूप थंडीच आहे, उद्या काय कामच खूप होतं, परवा अजून काहीतरी.
एका व्यक्तीला जुन्या नोकरीत रहायचा अगदी कंटाळा आला होता. मग नोकरी शोधण्याची मारामार कशी चालू आहे याबद्दल दु:खं. नवीन नोकरी मिळाली तर पूर्वीचीच कशी बरी होती याचं रडगाणं. मग म्हटलं बाबा घरी जाऊन ये. आता भारतात आई-बाबांना भेटलास, सही वाटत असेल ना? असं विचारलं तर कसलं काय. इथे येऊन आजारीच पडलॊ म्हणून दु:खं. काय त्रास आहे राव लोकांना?
असंच जर चालू राहिलं तर मग यांना आनंद तरी मिळतो कधी आणि कशात? बरं, यांचं आयुष्य काही अगदी वाईट चाललेलं नसतं. रोजचं जेवण-खाणं, रुटीन अगदी सिनेमाला जाणं, फिरायला जाणं अशी करमणूकही चालू असते. मग जवळच्या माणसाने विचारलं की बाबा कसा आहेस तर लगेच तोंड वाकड करायला काय होतं?
मला अजून एक गोष्ट आता ध्यानात आलीय की हे रडणारे लोक नुसते स्वत: रडत नाहीत तर समोरच्याला असं भासवून देतात की तुला काय,तुझं सर्व ठीक चालू आहे ना. म्हणजे नुसतं स्वत: दु:खी नाही रहायचं, समोरच्याला तू सुखी असण्याचा गुन्हा केलायस असं वागवायचं. मग अशा लोकांशी बोलताना स्वत:चा आनंदही व्यक्त करता येत नाही का तर ते दु:खी आहेत. जणू काही यांच्या दु:खाला समोरचाच जबाबदार आहे. या सर्व लोकांनी कदाचित आयुष्यात खरी दु:खं भोगलीच नाहीत बहुतेक म्हणून कारणं उकरून काढून रडत राहतात. पण खरं सांगू मला एक कळलं आहे, Its ok to be happy. Its not a sin to be happy and express it.
तर एकूण काय की ’मी खूष आहे’ हे म्हणणं प्रत्येकाच्या ’बस की बात नही’. होय ना? जमलं तर स्वत:ला कधी हा प्रश्न विचारून बघा काय उत्तर मिळतं. :-)
मधे एकदा एका जुन्या ’मित्राने’ विचारलं, ’कशी आहेस गं? घरचे सर्व मजेत ना? संसार कसा चाललाय?’ आणि सर्वात शेवटचा त्याचा प्रश्न होता,’ सुखी आहेस ना?’ त्या प्रश्नावर खरंच मला एका क्षणात माझ्याकडे असणार्या सर्व गोष्टींची जणू यादीच डोळयासमोर दिसली आणि एक मिनिट विचार करून समाधानाने उत्तर दिलं,’ होय, सुखी आहे मी. :-) ’ त्यावर त्याने फक्त ’:-)’ उत्तर दिलं आणि निघून गेला. पण पुढचे पाच मिनिटं मी सुन्न होऊन बसले होते.
-विद्या.
(खूप महिन्यांनी लिहित आहे आणि अगदी जसं डोक्यात येतंय तसं. गोड मानून वाचून घ्यावे ही विनंती. :-) )