Monday, February 16, 2009

प्रेमा तुझा रंग कसा?

नुकताच व्ह्यालेंटाईन्स डे झाला, झाला म्हणजे काय नेहमीसारखा एक शनिवार संपला. सकाळचे चहापाणी, Doctor ची भेट, मग थोडीफार खरेदी, घरी येऊन साफसफाई, जेवण-खाण आणि झोप. या सगळ्य़ामधे अगदी दुकानात जाऊनही साधे गुलाबाची फुलं कितीला होती हे बघणंही झालं नाही किंवा तो माझ्यासाठी घेईल का ही उत्सुकताही नाही की त्याने घेतलीच नाहीत म्हणून दु:खंही नाही. म्हणजे अगदी आई-दादांनी तो दिवस घालवावा तसा आम्ही पण घालवला म्हणायचा. अर्थात लग्नाच्या काही वर्षानंतर लोक असेच होत असतीलही, होय ना? :-) तर मी, आम्ही गेल्या थोड्या वर्षात साजरे केलेले १४ फेब्रुवारी आठवत होते, त्याबरोबरच बदलत जाणारं आमचं नातं आणि प्रेमही.
पहिल्या दोनेक वर्षी, किती बावळट होतो ना आम्ही, फुलांवर, ग्रीटिंग कार्डवर पैसे खर्च करायला.(म्हणजे मी तरी, मुलं काय नेहमीच व्यवहारी असतात म्हणा) :-)) पण त्या दिवशी त्याला न भेटता रहायला लागणं म्हणजे कुणीतरी काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यासारखं वाटलं असतं. ’मै उसके बिना जी नही सकती’ टाईप आमचं प्रेम. :-P मग पुढचे दोन वर्षं नोकरीसाठी दोन वेगळ्य़ा ठिकाणी, कधी वेगळ्याच देशात होतो. तिथेही मग त्याने साधं कार्डंही पाठवलं नाही म्हणून भांडणं, हिरमुसले होणं हेही झालं. पण तोपर्यंत आम्ही १४ फेब. ला न भॆटता राहू शकतो हे मनाने स्विकारलं होतं, अर्थातच आम्ही मोठे झालो होतो बहुतेक. :-) लग्नानंतरही तसं फारसं नाविन्य नव्हतंच राहिलं काही पण पहिला दिवाळी-दसरा कसा साजरा करतो तसा हाही दिवस साजरा करुन घेतला. आजकाल पहिल्या वर्षातल्या सणात, दोघांचे वाढदिवस, साखरपुड्याची anniversary, etc पण येतात बरं का. असो. तर नव्याचे नऊ दिवस सरल्यानंतर उरलं होतं ते आमचं सोबत रहाण्याने, एकमेकांबद्दल नवीन नवीन जाणून घेतल्यानंतरचं प्रेम. म्हणजे, मी दोन महिने सुट्टीला गेले तेव्हा, तो एकटा कसा राहील, काय खाईल, इ. काळजीवाहू प्रेम.
पण या सगळ्यापेक्षा, हा १४ फेब्रुवारी वेगळाच होता. अगदी अगदी वेगळा. विशेषत: गेला एक आठवडा जसा गेला त्यानंतर अजूनच. मागच्या शनिवारी Doctor ने बेड-रेस्ट सांगितली मला.शनिवारचा दिवस आम्ही दोघेही जरा घाबरलेलेच होतो, अचानक admit व्हायला सांगितल्यावर. मग तिथे राहिलेले ६/७ तासही कित्येक महिन्यांसारखे वाटले. शुभांगी-राम आले होते म्हणा धीर द्यायला, पण त्यादिवशी उगाचच आपण कुठलेही महत्वाचे निर्णय घ्यायला अजूनही किती लहान आहे असं वाटलं. आई-दादा असते तर किती बरं झालं असतं ना. असो.
घरी आल्यानंतर त्याने माझी जशी काळजी घेतली ते पाहून कसंसंच होतं होतं. मी आमच्या दादांना आजोबांची आणि आईला आमची अशी सेवा करताना पाहिलं आहे. पण त्यासर्वामधे आणि नवऱ्याने करण्यामधे कितीतरी फरक होता. त्याने अगदी उठवण्यापासून, परत गादिवर आणून झोपवणे, पाणी-जेवण अगदी हातात आणून देणे आणि नुसते पायमोजे घालणेही मला जमत नाही म्हणून पळत येऊन ते घालून देणे, हे सर्व (आई-वडील सोडून) कुणीतरी माझ्यासाठी करण्याची पहिलीच वेळ होती.मी कधी काही काम करायला उठले तर, तू जाऊन बैस पाहू म्हणणारा तो वेगळाच वाटत होता मला. :-) हे सर्व तो करत असताना मला जाणवलं की आमचं ते एकेकाळी फिल्मी वाटणारं प्रेम आता कुठल्यातरी वेगळ्याच पातळीवर आहे. तो माझ्यासाठी इतकं करू शकतॊ हे कधी माहितच नव्ह्तं मला, इतक्या वर्षांच्या सहवासानंतरही त्याचा वेगळाच पैलू मला दिसला होता. माणूस अंथरूणाला खिळल्यावर त्याला बरेच साक्षात्कार होत असावेत, कोण आपलं, कोण परकं याचे. लग्नाच्या बंधनात जेव्हा माणूस अडकतो तेव्हा किती काय-काय वचनं तो देऊन बसतो ना? म्हणजे सप्तपदी चालताना किंवा 'Do you promise to be with her in Sickness and Health?' याला ’I Do' म्हणताना कुणाला कल्पनाही नसेल पुढे काय वाढून ठेवलेलं असू शकतं.
काल रात्री तो झोपल्यावर त्याच्या शांत चेहऱ्याकडे पाहून जे प्रेम वाटत होतं, ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. हे फक्त थोडे दिवस, कारण आणखी थोड्या दिवसांत हे नातं अजूनच वेगळं होणार आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. :-)
-विद्या.