Thursday, June 30, 2016

जित्याची खोड

         आयुष्यातला पहिला पिझ्झा खाल्ला तेव्हा किती मीठ आणि मिरची त्यात घालू असं झालं होतं. तरीही त्याला चव नव्हतीच. तीच गोष्ट बर्गरची. इतका छान वडा पाव मिळत असताना त्यात संपर्क बर्गरसाठी ३५ रुपये का घालवायचे असा मला प्रश्न पडायचा. पुढे हळूहळू महाराष्ट्रीय जेवण सोडून बाकी पदार्थांची ओळख होऊ लागली. त्यातही गुजराती जेवण गोड असेल तर त्यात थोडं मीठ घालायची इच्छा व्हायचीच. इडली डोसे, सांबार चटणी मात्र जशी ची तशी आवडली आणि पंजाबी जेवणही. अर्थात हे सर्व त्या त्या प्रदेशात न खाता त्यांचं मराठी रूप पाहिलेलं त्यामुळे ते कितपत खरं-खोटं माहीत नाही. 
         भारताबाहेर आल्यावर मला सर्वात पहिली जाणीव झाली ती म्हणजे पदार्थ 'फिका म्हणजे किती फिका' असू शकतो. सॅलड म्हणून कच्च्या भाज्या कशा खाऊ शकतो कुणी? अर्थात पाण्यात पडल्यावर पोहयाला तर लागणारंच होतं. त्यामुळे वेळ पडेल तसे आळणी चिकन, कधी नुसत्या उकडलेल्या भाज्या कधी कच्ची सिमला मिर्च असलेले सॅलड असे पदार्थ घशाखाली ढकलावे लागलेत. आणि एकेकाळी, 'लोक काय ते सॅलड खातात' म्हणून नाक मुरडणारी मी आता पाचही दिवस ते खाऊ शकते. अर्थात हे बदल व्हायला कमीत कमी १० वर्षं लागली. आता मी पिझ्झा वर केच-अप घेणाऱ्या लोकांकडे बघून भयानक लुक देऊ शकते. माझी एक मैत्रीण शिकागो मधल्या एका भारतीय बफे मध्ये जायला नको म्हणायची. का तर, तो म्हणे हक्का नूडल्स मध्ये हळद घालतो. मला फार हसू आलं होतं. अजूनही येतं. ते हळद घातलेले नूडल्स आठवून. नशीब त्याने त्यात मोहरी घातली नव्हती. :) 
            तर मुद्दा हा की, भारतीय जेवण इतके सवयीचे पडले आहे की बाकी कुठलेही पदार्थ दिले तरी ते तशाच पद्धतीच्या चवीचे असावेत असा आपण आग्रह धरतो. विशेषतः तिखट घालण्याबद्दल तर बोलायलाच नको. आमचे दोघांचेही आई-बाबा इथे आलेले असताना कुठल्याही हॉटेल मध्ये गेले तरी तिथे सर्व पदार्थात मीठ आणि मिरेपूड घालायचेच. आता एखाद्या आळणी पदार्थात कितीही मिरेपूड घातली तरी काय फरक पडणार आहे? पण प्रयत्न करायचेच. एखादा रोल घेतला किंवा त्यातल्या भाज्या बाहेर येऊन मग त्या रोलसोबत पोळी भाजी सारख्या खायच्या. चायनीज खातानाही आपण खरे-खुरे चायनीज खात नाही. आपण खातो ते इंडियन-चायनीज असते. म्हणजे प्रत्येक पदार्थ 'इंडियन' केल्याशिवाय आपल्याला जातच नाही. इमॅजिन, चायनीज माणसाने 'पनीर टिक्का मसाला' मध्ये सोय सॉस घालून खालले तर? 
         खरं सांगायचं तर मला नेहमी वाटायचे की भारतीय जेवणच खूप भारी आहे आणि अजूनही ते खरेच आहे. पण काही काही गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे:
१. आपण जेवण बहुदा गरजेपेक्षा  जास्त शिजवतो. त्यामुळे बरेचदा जेवणातील सर्व जीवनसत्व नाहीशी होत असतील. त्यापेक्षा कच्चे सॅलडही खाऊ शकतो. 
२. प्रत्येक गोष्टीला तिखट किंवा मीठ सोडूनही बाकी चव असते. शिवाय आपण बाकी गरम मसाले घालतोच. पण  त्यामुळे जो पदार्थ खाणार आहे त्याची चव राहात नाही ना. म्हणजे मोड आलेल्या उसळी, स्टर-फ्राय केलेल्या भाज्या यांनाही त्यांची स्वतःची अशी चव असते. पण त्यांना आपण मसाले घालून पार चव मारून टाकतो. म्हणजे माझी भरली वांगी कितीही छान वाटली मला तरी त्यात बिचारं वांगं कुठेतरी हरवून गेलेलं असतं. 
३. तिखट हा सर्वात कॉमन असलेला मसाला. प्रत्येक राज्याची स्वत:ची मिरची वेगळी, त्याने बनवलेला घरगुती मसाला वेगळा, त्या मिरचीचा रंग वेगळा, तिखटपणा वेगळा. पण बरेचवेळा त्या तिखटपणा मुळे बाकी कुठल्याही मसाल्याची चव लागत नाही. म्हणजे नुसती मिरपूड आणि बटर लावून केलेला टोस्टही छान लागतो. किंवा फक्त बेसिल घालून बनवलेला पास्ता किंवा थाईम असलेले सूप यांची स्वतःची चव असते. केवळ एकाच मसाल्याला प्राधान्य देऊन केलेल्या पदार्थाची चव घेण्यातही मजा असते. 
          या सर्व आणि अनेक गोष्टी मी गेल्या काही वर्षात मी शिकले. मध्ये दोन वर्ष पुण्यात असताना मला बाहेर कुठे जेवायला जायचे म्हणले तर फक्त इंडियन जेवण जेवायचा कंटाळा आला. एक दोनदा चायनीज आणि इटालियन जेवायला गेले आणि त्यातही इंडियन चव आल्यावर थोडीशी चिडचिड झाली. अर्थात त्यांचा तरी दोष काय? या अशा सवयी बदलणे खरंच अवघड आहे. :) पण माझं म्हणणं असं की एकदा थोडा दुसऱ्या चवीलाही चान्स देऊन बघायला पाहिजे, हो की नाही? पण खरंतर हे बोलायचा मला काही हक्क नाहीये. :) कालच एका सूप मध्ये मी थोडीशी लाल मिरची पूड घातली होती. सानूने खूप तिखट आहे म्हणून एक चमचा पण खाल्ला नाही. पुढच्या वेळी मला माझा हात आखडता घ्यावा लागणार आहे. पण जित्याची खोड ती अशी थोडीच जाते? :)

विद्या भुतकर . 
 

Tuesday, June 28, 2016

हेअरकट पार्ट २

        दोनेक आठवड्या पूर्वी मी केस कापून आल्यावर मोठया तोऱ्याने एक पोस्ट टाकली होती की कसे केस कापणे, रंगवणे किंवा लांब ठेवणे हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. मग प्रोफाईल लाही तोच फोटो लावला. आणि हो शिवाय, ऑफिसमध्येही भरपूर हवा करून घेतली. अगदी,"वाटत नाहीस हो आई!" असेही. ;) बोलत बोलत त्या कोरियन बाईने केस कापून कसे सेट केलेत हे काय पाहिलेच नव्हते. आणि इतक्या छोट्या केसांना काय लागतंय? त्यामुळे काय एकूण मजाच होती पहिला आठवडा तरी. पुढे त्याचा पार्ट २ होणार आहे असं बिलकुल वाटलं नव्हतं.
           पहिल्या रविवारी, "आता पहिल्यांदा घरी सेट करायच्या आधी मेहेंदीही लावून घेऊ" असा विचार केला . शिवाय इतक्या कमी केसांना लावायची म्हटल्यावर अजून खूष झाले. पण केस धुतल्यावर त्या केसांच्या 'कॉपरच्या तारा' वर दिसत आहेत असे संदीपने म्हटल्यावर मूड गेलाच जरासा. एरवी मोठे केस असले की निवांत क्लिपमध्ये टाकून कामाला लागता येते. पण म्हटले जरा चांगले दिसायचे तर कष्ट घेतले पाहिजे ना? म्हणून मी माझी अस्त्र(हेअर ड्रायर आणि हेअर स्त्रेटनर) घेऊन कामाला लागले. "आपल्याला कधीही आवरायला वेळ मिळत नाही आणि सारखं मुलांचंच आवरत बसायला लागत" अशी तणतण करत मी थोडेफार केस सेट केले आणि आम्ही तासभर उशिराच निघालो. आम्ही बीचवर गेलो होतो. तिथल्या वाऱ्याने केस सगळे उलट सुलट होऊन गेले होते. समुद्राच्या वाऱ्याने फक्त हिरोईनचेच केस हवे त्या दिशेने छान उडतात. आपल्यासारख्या पामरांसाठी ही सोय नाही. त्यामुळे संध्याकाळी घरी  बहिणीला फोटो पाठवले तर,"सत्य साईबाबा" अशी कमेंट आली. :( 
            आता वीकेंडला असे उलट सुलट झालेले केस घेऊन परत ऑफिसला कसे जाणार? काय सुखात होते आधी मी. एकदा केस धुतले की पुन्हा आठवडा भर बघायला नको. अगदी तेलकट झाले तरी तसेच बांधून जायचे. आठवड्यातून दोन चार वेळा त्यात वेळ वाया घालवायला, वेळ आहे कुणाला? पण नव्याचे नऊ दिवस अजून चालूच होते. त्यामुळे नेहमीपेक्षा अर्धा (अर्धा !!) तास लवकर उठून मी बाकी सर्व आवरले आणि केस सेट करायला लागले. बिचाऱ्या संदीपलाच पोरांचं आवरावं लागलं. नेहमीपेक्षा ५-१० मिनिट उशीरच झाला. बरं हे रात्री सेट करूनही झोपता येत नाहीत. नाहीतर अजून उलट सुलट झाले तर कोण बघणार? सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर पडणारे सुंदर केसही फक्त हिरोईनच्याच नशिबात. आमचं नशीब इतकं चांगलं कुठे? त्यामुळे कडमडत गेलेच ऑफिसला. जरा स्मार्ट दिसणाऱ्या एकाने 'छान दिसतोय कट' म्हटल्यावर कष्टांचं चीज वगैरे झाल्यासारखं वाटलं. पण त्यासाठी सकाळची अर्धा तास झोप गमवावी लागली त्याचं काय? 
         बरं दिवसभर कीबोर्ड सांभाळायचा की केस? मीटिंगमध्ये बोलता बोलता सारखं कितीवेळा केस मागे सारणार? मिटिंग जाऊ दे, जेवतानाचे काय? कधी कॅफे मध्ये ट्रे बघू की डोळे असा महत्वाचा प्रश्न पडतो. ओले असताना तर  अगदी तेरे नाम च्या सलमान सारखे दिसतात. त्या फेज मधून कधी बाहेर पडणार याची वाट पाहत आहे. ट्रेनमधेही एक खांद्याला पर्स आणि दुसरा हात आधाराला वर लटकलेला. पण ते खालचा ओठ वर करून फुंकर मारून केस वर उडवायला फक्त जुही चावलाच हवी. आपण केलं तर ट्रेनमधले अजून चार लोक बघतात. त्यापेक्षा गप केस डोळ्यावर घेऊन उभं राहायचं. 
        घरी आल्यावरही या त्रासातून सुटका नाही. लांब असले केस की पटकन वर टांगून कामाला लागताना अगदी पदर खोचल्याचं फीलिंग येतं. घरी त्यातल्या त्यात निवांत म्हणजे डोक्याला सान्वीचा पट्टा लावणे. तो बेल्ट लावला तरी जेवणात एखादा केस येणार नाही याची १०० टक्के खात्री नाहीच. शिवाय सानूचे केस आता माझ्यापेक्षा मोठे असल्याने ते बेल्ट जागेवर मिळत नाहीतच. परवा तर शेवटी गाडीत एक होता तो लावला. मध्ये एक दोन वेळा तो बेल्टही मिळाला नाही. म्हणून मग जेवण बनवताना लावायला क्लिप शोधल्या. त्याही एका रंगाच्या मिळाल्या नाहीत. चिडचिड नुसती. रविवारच्या रेससाठी सुध्दा आदल्या दिवशी बाकी सर्व सामानासोबत एक बेल्ट आणि दोन एकाच रंगाच्या क्लिपा शोधून  एका जागी ठेवल्या. पहाटे कोण शोधत बसणार? पळतानाही दोन चार वेळा एक बाजूची क्लिप घसरत होती. च्या मारी. फोटोमध्येही कुठेतरी कानामागे तुरे दिसत होतेच.
          हे असं किती दिवस चालणार? मला माझे जुने केस हवेत. निदान बांधून टाकले की बाकी कामाला रिकामे. बाकी पोरी कितीही स्टायलिश असल्या तरी हे  प्रकरण आपल्यासाठी नाही. पुढचे दोन-चार महिने तरी हे कष्ट करावेच लागतील. नाहीतर आज केले तसे ऑफिसला जातानाही दोन क्लिपा लावायच्या आणि जायचं. हे सेट वगैरे करणाऱ्या मुली नेहमी कशा करतात आणि त्या आवरत असताना त्यांची पोरे काय करतात? आणि हे सर्व करून वेळेत सर्व ठिकाणी पोचतात का? असे अनेक प्रश्न मनात आहेत. खरंच असं नेहमी छान केस सेट करणाऱ्या सर्वांबद्दल मला आता कुतुहूल आणि आदर दोन्हीही वाटत आहे. असो. व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे ठीकेय पण पुढच्या वेळी केस  कापायची खुमखुमी आलीच तर आठवण करून द्यायला म्हणून आताच लिहून ठेवते. रिमाइंडर नक्की द्या. :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, June 27, 2016

सोबत


आपण दोघे एकत्र जाऊ या का रेसला? एकत्र पळू, मजा येईल ना?  करतो तसंच हेही. काय म्हणतोस?
तो मान डोलावतो.
.....

ती, "आपण दोघेही यावेळी रेसमध्ये भाग घेऊ बघ. तू यावेळी जरा जास्त प्रॅक्टिस कर. आपण आपापल्या परीने जोरात जाऊ. जो आधी पोहोचेल तो वाट पाहील दुसऱ्याची. चालेल ना?"
 तो, "होय, उगाच जोरात पळणाऱ्याची कुचंबणा आणि हळू पळणाऱ्याची ओढाताण. त्यापेक्षा आपल्याला जमेल तसं पळू, शिवाय मी जवळपास राहीनच. "
ती,"हो चालेल."
........

तो मोडलेल्या पायाने, "यावेळच्या रेसमध्ये मला भाग नाही घेता येणार. काय करू चालत चालत पूर्ण करू का?"
ती, " करायचं का तसं? बघ जमेल का? असंही एकट्याने करायचं म्हणजे बोअरचं होतं."
पुन्हा विचार करत, "नाहीतर राहू दे, आपण दोघेही जायला नको. पुढच्या वेळी पुन्हा एकदा भाग घेऊ पण सोबतच जाऊ."

.......
 
तो मोडलेल्या पायाने, "यावेळच्या रेसमध्ये मला भाग नाही घेता येणार. काय करू चालत चालत पूर्ण करू का?"
ती, " करायचं का तसं? बघ जमेल का? असंही एकट्याने करायचं म्हणजे बोअरचं होतं."
पुन्हा विचार करत, "नाहीतर राहू दे, यावेळी नको करुस. मी करते पूर्ण एकटीच. पुढच्या वेळी पुन्हा एकदा भाग घेऊ पण सोबतच जाऊ."
तो,"हो चालेल. यावेळी राहू देतो. तू जोरात पळ. मी असेनच सोबत तुझ्या, दुसऱ्या टोकाला."
ती,"हो चालेल."
........

तो मोडलेल्या पायाने, "यावेळच्या रेसमध्ये मला भाग नाही घेता येणार. काय करूया?"
ती,"हे बघ मी जाईन तर तुझ्या सोबतच जाईन. पण रेस पूर्ण करणार हेही नक्की. एक काम करू, तू व्हीलचेअर मध्ये बस. मी तुला ढकलत घेऊन जाते."
तो,'अगं कशाला? मी आहेच तुझ्या सोबत."
ती, निर्धाराने,"मी काही ऐकणार नाहीये. जायचे तर सोबतच जायचं. "
तो,नमतं घेत,"बरं सोबत जाऊ. मी व्हीलचेअर मध्ये येतो. चालेल? :) "
 ........ 

तो मोडलेल्या पायाने, "यावेळच्या रेसमध्ये मला भाग नाही घेता येणार. काय करू चालत चालत पूर्ण करू का?"
ती, "नको उगाच त्रास नको. यावेळी राहू दे. पुढच्या वेळी नीट झाला की परत घेऊ. "
तो,"चालेल. मग असं करू, तू जा रेसला. मी घरी राहतो. मुलांना सांभाळतो. तू आलीस की मस्तपैकी खा, पी, आराम कर."
ती, खुशीत,"चालेल. :) "

........

सोबत असण्याच्या किती तरी व्याख्या असू शकतात, असतातही. कुणाला एक  चुकीची वाटते, कुठली बरोबर. कुणी मागे थांबून साथ देतं, कुणी धावपळ, ओढाताण करून सोबत राहण्याचा प्रयत्न करते. कुणी हट्टाने बरोबरच जायचे म्हणून दुसऱ्याला ढकलत नेते. तर कुणी माझं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून तू तरी कर असा विचार करतं. कुणी मागचे सर्व सांभाळून समर्थन करतो. तर अशी ही सोबत आयुष्याच्या धावपळीत जमेल तशी देतो.

या सर्वातली माझी कुठली? :) 

तो मोडलेल्या पायाने, "यावेळच्या रेसमध्ये मला भाग नाही घेता येणार. काय करू चालत चालत पूर्ण करू का?"
ती, "नको उगाच त्रास नको. यावेळी राहू दे. पुढच्या वेळी नीट झाला की परत घेऊ. "
तो,"चालेल. :) "
तो आला माझ्यासोबत रेसला. आणि हो, मुलांनाही घेऊन. त्या शेवटच्या रेषेपलीकडे ते तिघेही माझी वाट पहात होते. :)


विद्या भुतकर.

Wednesday, June 22, 2016

हरवलेल्या गोष्टी

          ही पोस्ट हरवलेल्या कथांची नाहीये. किंवा 'आजकाल पूर्वीसारखे काही राहिले नाही' म्हणत सध्या जे  पोस्ट येतात ना तशीही नाहीये. किंवा 'गेले ते दिवस', 'बालपणीचा काळ सुखाचा वगैरेचीही नाहीये. सॉरी बोअर केलं. तर ती अशा काही वस्तूंची किंवा गोष्टींची आहे ज्या आपल्याला त्या त्या वेळी खूप प्रिय असतात आणि  अचानक गायब होतात. परवा (म्हणजे कधीतरी रीसेंट्ली :) ) , स्वनिकची आवडती चादर सापडेना. तोही निमित्त काढून खेळत बसला. आम्ही मग  त्याला लवकर झोपवायचे म्हणून चादर शोधायला लागलो. सर्वात पहिला भीतीदायक विचार मनात आला तो म्हणजे बाहेरून येताना कुठे विसरलो तर नाही ना? बराच वेळ झाल्यावर  एका ठिकाणी मिळाली आणि हुश्श झालं. पण अशा काही गोष्टी असतात ज्या हरवल्या तर बरेच दिवस, महिने आणि वर्षेही वाईट वाटत राहते. त्या, वस्तूंबद्दल ही पोस्ट.
          शाळेत असताना माझा एक स्केचपेन चा बॉक्स होता. त्यातला नेमका काळाच स्केचपेन हरवला. त्यामुळे कुठेही काही रेघा काढायच्या म्हणलं की त्याची आठवण यायची. किती शोधला, पण मिळाला नाही. तसेच आठवीत असताना आजोबांनी आणलेला एक शाईपेन होता. मला त्याने लिहायला खूप आवडायचं. म्हणजे उगाच लिहीत बसायचे त्याने इतका प्रिय. एक दिवस तो असाच गायब झाला. शाळेत हरवला नव्हता हे नक्की होतं. घरात खूप शोधला. इतकं वाईट वाटायचं की तो पेन असता तर आपलं अक्षर किती छान आलं असतं असे विचार मनात यायचे. कधीतरी सहा महिन्यांनी घरात कुठेतरी तो मला अचानक परत सापडला. त्याची शाई सुकून गेली होती. मी धुवून छान लिहायला पाहिले पण तो पूर्वीसारखा उठत नव्हता. त्याची नीब बदलली त्यामुळे तर अजूनच खराब झाला. मग माझाही मूड निघून गेला आणि त्याचं माझं प्रेम तिथेच संपलं. 
        एकदा घरी एक गंमत झालेली, एक पळी होती, ती अचानक गायब झाली.  शोधली पण कुठे मिळाली नाही. आई नेहेमीप्रमाणे,'कमाल झाली बाई, कुठे गेली असेल' असा विचार करतच राहिली. आणि जवळ जवळ महिना-दोन महिन्यांनी, एक दिवस छोट्या डब्यातली चटणी (काळ मसाला ) संपलीय म्हणून मी काढायला गेले तर त्यात पळी दिसली. :) आजही तो सीन आठवतो. का? तर आपल्या समोर रोज असणारी, दिसणारी अशी वस्तू गायब झाली की समोरून कुठे गेली हा विचार छळत राहतो आणि तो काही केल्या जात नाही. विक्सची बाटली, सॉक्स, फोन अशा पटकन हाताशी न लागणाऱ्या वस्तू आणि आता तर इथे होती म्हणत आपण खाजवलेले डोके. :) 
       काही हरवणाऱ्या वस्तूंमधे आपण दुसऱ्या कुणीतरी हरवलेल्या वस्तूही आहेत. त्यात एखाद्या प्रिय ड्रेसची ओढणी किंवा सलवार हरवली तरी असे वाईट वाटायचे. आता ती कशी हरवू शकते? असा कुणी विचार करू शकते. तर त्याला एकच उत्तर, 'धोबी' आणि इस्त्रीवाले' :) . मग तो ड्रेस पडूनच राहणार ना कायमचा. आणि त्यांना बोलूनही काही उपयोग होत नाही. त्यामुळे आपल्यालाच त्रास. कितीही नवीन जोड त्याला आणले तरी त्या ड्रेसची मजा निघून गेलेली असते. तसेच एखादे कानातले, त्यातील एक हरवले की संपलेच ना. आणि बरोबर तेच आपल्याला सर्व ड्रेस वर सूट होणारे कानातले असते. :( तसे पुन्हा घ्यायचे म्हणले तरी त्यात तो आनंद नाहीच. 
         हरवणाऱ्या वस्तूंमध्ये चोरीला जाणे हा एक मोठा विषय आहे. असेच एकदा शाळेत असताना मला नवीन स्लीपर आणले होते, पांढरे आणि  निळ्या पट्ट्यांचे. अगदी पहिल्याच दिवशी घालून गेले आणि ग्राऊंड वरून कुणीतरी ते चोरून नेले. नवीन चप्पल हरवले म्हणून बोलून घेतलं ते वेगळंच पण ते हरवले याचं दु:खं अजूनही आठवतं. त्यानंतर चोरीला गेलेली अजून एक वस्तू. (नशिबाने माझा फोन तरी हरवला नाहीये अजून. आता संदीप म्हणेल उगाच कशाला बोलतेस. ) पण संदीपने एकदा मला एक ब्लू टूथ गिफ्ट दिला होता.  तो मुंबईत कुठेतरी चोरीला गेला. असे त्याकाळी महागडे घेतलेले गिफ्ट हरवले म्हणून मला वाईट वाटले ते एक  आणि त्याचे ऐकून घ्यावे लागले ते वेगळेच. त्यामुळे १० वर्षे झाली तरी तो ब्लू टूथ अजूनही माझ्या लक्षात आहे. माझ्या तरी याच दोन गोष्टी लक्षात आहेत. पण बरेच लोकांनां गाडी, पर्स, प्रवासाचे सामान, अशा अनेक चोऱ्यांचा त्रास नक्की झाला असणार. आणि त्यात गमावलेली वस्तू मग कायम लक्षात राहते. 
       कधी कधी जुने मित्र-मैत्रिणीही, जुनी नातीही असेच असतात. त्यात त्या वेळी खूप प्रिय असलेले लोक, रोज भेटणारे, नाही भेटले तर फोनवर बोलणारे. पण एकदा स्वत:च्या किंवा त्यांच्या नवीन विश्वात हरवले की शोधूनही आपल्याला सापडत नाही. त्यांच्यातलं आपलेपण सापडत नाही. आणि पुन्हा कधी मिळाले तरी त्यातला तो आनंद निघून गेलेला असतो. पण मन मात्र त्या जुन्या आठवणी काढतंच राहतं, हरवण्याचा आधीचे ते सोबतचे दिवस. त्यांच्याही हरवलेल्या यादीमध्ये आपण असू का? असो. तुम्हालाही येते का अशा हरवलेल्या गोष्टींची आठवण? 

विद्या भुतकर.

Tuesday, June 21, 2016

डोक्यातला भुंगा आणि डोक्याचा भुगा

        आज एकदम डोकं रिकामं होतं, ब्लॅंक म्हणतात ना तसं. फार कमी वेळा होतं असं माझ्यासोबत. कारण दिवसभरात आणि अगदी झोपेतही काही ना काही डोक्यात चालूच असते. तर आज काहीच संवेदना नाहीयेत असं वाटत होतं किंवा वाटून घेत होते. आनंद, दु:खं, कंटाळा, किंवा काहीच नाही त्यामुळे लिहिणे हा ही विषय नव्हताच डोक्यात. मग घरी आल्यावर चहा घेऊन एक झोप काढली आणि अजूनच ब्लँक झाले. मुलांचं काय चाललंय, जेवण बनवायला किती वेळ लागेल, उशीर झाला तर झोपायला वेळ होईल वगैरे असले कसलेच विचार नव्हते. जेवायला काय बनवायचं  बोलणं झाल्यामुळे तेच करायला यांत्रिकपणे सुरुवात केली. मग पोळ्या संपेपर्यंत निदान वैताग नावाची फीलिंग तरी जागृत झाली होती. मग पोरांच्या आंघोळी होईपर्यंत चिडचिड जागी झाली आणि सर्व उरकेपर्यंत कंटाळा. बाहेर थोडं चालून आल्यावर जरा आळसही कमी होतोय असं वाटायला लागलं. म्हणून म्हणलं मग लिहूनही घ्यावं म्हणजे अजून थोडी नॉर्मल होईन.
           तर आज म्हणलं त्याच विषयावर लिहावं. असं कितीदा होतं आपल्याला की डोक्यात काहीच विचार नाहीयेत. फार कमी वेळा. निदान मला तरी. सकाळी उठले की आज किती वाजता ऑफिसला पोचणार, कुठले कपडे घालावेत पासून रात्री झोपताना 'मुलांना डब्याला काय द्यायचं' पर्यंत अनेक विचार चालू असतात. कधी कधी मला वाटतं की असं सारखं डोकं वापरूनच माझे केस पिकात असतील. मग विचार केसांकडे वळतात पण बंद होत नाहीत. उलट असे सारखे ब्लँक असणारे लोक मला वेंधळे वाटतात मग. "जरा लक्ष दे की मी काय म्हणतेय त्याच्याकडे." किंवा "काय कुठे हरवलास" अशी अनेक वाक्य त्यांना ऐकायला मिळतात.
         कित्येक वेळा मला असे ब्लँक राहण्याची गरज असते पण जमत नाही. योग क्लासच्या शेवटी शवासन आले की आमची ट्रेनर म्हणायची,'रिलैक्स व्हा. कसलेही विचार मनात आणू नका. मनाला शांतता असली पाहिजे."
डोंबल शांत. माझा हा क्लास शिकागोच्या  असायचा. त्यामुळे डोक्यात काही ना काही कामे असायचीच. नंतर सकाळी होता तरी दिवसभर काय करायचेय. कधी  सारखं आपलं घड्याळाकडे लक्ष, कधी भूक लागलीय, कधी चुकून झोप लागेल कीकाय ही भीती आणि मग त्या भीतीमध्ये खरंच एकदा झोप लागली होती त्याची आठवण. आणि मग त्या आठवणींसोबत बाकी लोकांच्या आठवणी. असं मन भरकटत कुठं जाईल याचा नेम नाही अजिबात.
         बरं आपले हे विचार बरेच वेळा सुसंगत असतात. कशामुळे? तर आमच्या शाळेत मराठीच्या बाई एक खेळ घ्यायच्या. उभे राहिले की ओळीने १० वाक्य बोलायची, त्यांचा एकमेकांशी संबंध असला नाही पाहिजे अजिबात. मग मी प्रयत्न करायचे.
१. मला आंबा आवडतो.
२. मी दुपारी खो खो खेळले.
३. मला भाषण देता येत नाही.
मोठ्या मुश्किलीने  पोचलेली गाडी भाषण म्हणाले की लोकमान्य टिळकांपर्यंत अडकणार. मग मी त्यांच्यावर काही बोलले की संपले, बस खाली. कधीही माझे ४ च्या पुढे एक वाक्य झाले नाही. विसंगत विचार करायलाही काहीतरी वेगळे असावे लागते हे आता लक्षात येते. अजूनही कधी मनातल्या मनात मी तो गेम आठवून प्रयत्न करते तसे विसंगत विचार ओळीने मनात आणायचा. पण जमत नाही आणि मग गाडी पुन्हा शाळेतल्या बाई, आठवीतला तो वर्ग आणि त्याच्या सोबत बाकीच्या आठवणी असे फिरत जाते.
           कधी कधी मला खरंच खूप वैतागही येतो  डोक्यात येणाऱ्या विचारांचा. कितीही थांबवावे म्हणले तरी ना थांबणाऱ्या चक्राने मग डोकं दुखायला लागतं. म्हणजे साध्या साध्या गोष्टीत चालूच राहतं. म्हणजे उदा. सकाळी, गाडी चालवताना, ८. १७ निघालय, मग किती ट्राफिक असेल, मुलांना सोडून स्टेशनला किती वेळात पोचता येईल, कुठली ट्रेन मिळेल, मग जागेवर पोचून लगेच काय करता येईल.... असं चक्रच ते. पण का चालू राहतं? मरू दे ना, आता गाडीत बसलोय तर ज्या वेळेत जे व्हायचं ते होईलच ना? असं कसं? विचारच तेमी, चालूच राहिले पाहिजेत.
        कधी रात्री आले डोक्यात तर अगदी तोंड उशीत खुपसून पडून राहिलं तरी जात नाहीत.(अर्थात पाठ टेकली कि दोन मिनिटांत झोपलेली असतेस असं म्हणणाऱ्या नवऱ्याला हे पटणार नाही. पण होतं असं कधी कधी. ) तर कधी एखाद्या माणसाशी बोलताना मधेच काही विचार येऊनही जातात आणि समोरचा काय बोलला हे कणभरही लक्षात रहात नाही. मी विचार करतेय (हो अजून विचार :) ) की महिन्यातून असा एखादा खास दिवस काढायला हवा ब्लँक राहण्यासाठी. एकदम 'निवांत' दिवस गेला म्हणतात ते यालाच म्हणत असावेत. त्यात कधी उठायचं, कधी झोपायचं, काय जेवायचं, भांडी घासायचीत, घरात पसारा पडलाय, मुलांना काय अभ्यास करायला सांगायचा किंवा किती वेळ टीव्ही  किंवा उद्या उठून काय करायचं आहे असे कुठलेच प्रश्न पडायला नकोत. किंवा काही केलंच पाहिजे असा अट्टाहासही त्या दिवशी नको. आणि असा दिवस घालवल्यावर दुसऱ्या दिवशी काय होईल याचा विचारही नको. असा एखादा दिवस काढून बघते जमतं का आणि कसं वाटतं ते. :)

विद्या भुतकर.

Monday, June 20, 2016

पाऊलविद्या भुतकर.

Sunday, June 19, 2016

फ्रूट केक

        काही काही पदार्थ आणि त्यांच्या आठवणी आयुष्यभर पुरतात. आणि त्याची स्वत:ची एक वेगळी अशी गोष्ट असतेच तीही त्याच्यासोबत फिरत राहते. असाच आजचा हा केक. सध्या आई इकडे असल्याने सलग दोन वेळा झाला. पहिल्या वेळी इतका लवकर संपला की त्यावर लिहायला डोक्यातही आले नाही. शेजारच्या काकूंना दिल्यावर त्यांनीही त्याची रेसिपी मागितली आणि मग म्हणले लिहूनच टाकावी. :) त्यासाठी मग आईच्या मापातल्या वाट्यातून प्रत्येक साहित्य केकच्या मापांमध्ये  घेतल. नाहीतर अंदाज पंचे धागोदरशेच होतं नेहमी.  रेसिपीच्या आधी गोष्ट त्या केकची गोष्ट.
           आम्ही लहान असताना माझ्या भावाला आमच्या तिथल्या एका काकूंच्या घरी खाल्लेला केक आवडला. लाडका नातू, मग काय, आमचे आजोबा लगेच आईला म्हणाले, "सातारला सर्कस आलीय तर या मुलांना घेऊन जा आणि येताना ते केकसाठी लागणारा ओव्हन घेऊन ये". तर असे आजोबांनी दिलेला शब्द लगेच ऐकून आम्ही सर्कसला गेलो. येताना आईने एका दुकानातून (त्या काकूंच्या सांगण्यावरून) तो अलुमिनियम चा ओव्हन आणला. शिकत शिकत आईने मग त्या केकच्या कृतीत एकदम परफेक्शन आणलं. त्या ओव्हनच्या भांड्यात केक करणे किंवा त्यावर तापमान बरोबर लावणे, मधेच लाईट गेली तर कधी तो न फुगणे असे अनेक प्रकार झाले आहेत. आमचे सर्व वाढदिवस या केकवर झाले. आणि जमले तर अजूनही होतात. आईने केलेला केक बरेच वेळा आम्ही कॉलेजला किंवा ऑफिसला घेऊन गेलोय आणि फस्त केला आहे.          
         मला बाहेरचे केक फार कमी आवडतात.आणि ते तर या घरच्या केकसमोर अगदीच गोड आणि नकोसे वाटतात. विशेषत: आजकाल जे ढीगभर क्रीम थापलेल्या गोड केकने तर माझा घसाच बसतो. असो. आता हा साधा सुंदर केक बघूनच खावासा वाटतो. मुलानाही आवडला तो. अजून तरी मी काही हा केक बनवायला शिकले नव्हते. पण यावेळी म्हणले निदान रेसिपी लिहून ठेवावी आणि बाकीच्यांना ही सांगावी. आई घरी केला की ताजे लोणी काढून त्यात घालते. पण इथे ते काही जमत नाही. त्यामुळे इथले बटर घेतले होते. पण यावेळी बाकी सर्व मापाने केले आहे.

साहित्य:
५ अंडी
१ कप बटर (२ स्टिक्स बटर )
१. ५ कप साखर
३ कप मैदा
१.५ टेबल स्पून बेकिंग पावडर
१ टी स्पून व्हनीला इसेन्स ( माझ्याकडेचे फिके आहे त्यामुळे १.५ स्पून घातले होते. )
३/४ कप दुध
भांड्याला लावायला मैदा, थोडेसे तूप
वरून टाकायला टूटी फ्रुटी

कृती: मी हे सर्व माझ्याकडच्या Stand मिक्सर मध्ये बनवले आहे. आई घरी अंडी फेटून घेते बाकी सर्व ताटात हाताने एकसारखे मिक्स करते. hand मिक्सरनेही सर्व मिश्रण एकत्र करता येईल.
आधी अंडी भांड्यात घालून फेटून घेतली. मग त्यात बटर घालून अजून थोडा वेळ मिक्स केले. बटर मिक्स झाल्यावर साखर त्यात घातली. व्हनिला इसेन्स आणि दुध घालून मिक्स करते राहिले.
बाजूला मैद्यामध्ये बेकिंग पावडर घालून ते एकत्र चाळून घेतले होते.
मिक्सरमधले मिश्रण एकसारखे झाल्यावर बाजूला मैदा हळूहळू करत घालून फिरवत राहिले. सर्व Stand मिक्सरमध्ये सर्व एकसारखे खाल्यावर भांड्यामध्ये तूप लावून थोडा मैदा पसरून यात सर्व मिश्रण घातले. भांडे थोडे आपटून सर्व सपाट करून घेतले. त्यावर टूटी फ्रुटी पसरली.
ओव्हन ४०० F ला प्रिहिट करून घेतला होता. मिश्रण घातलेली भांडी त्यात ठेवून ३५ मिनिटे ३६० F तापमानाला ते ठेवून दिले. केक हळूहळू फुलत आला. मग ३५ मिनिटा नंतर ओव्हन बंद करून अजून १० मिनिट ठेवले त्यामुळे वरचे आवरण कुरकरीत होते थोडे. मध्ये सुरी घालून आतून काही चिकटत नाही ना हे पाहिले.
बाहेर काढलेला केक ताटात पालथा घालून काढून ठेवला. :) आता फक्त खायचे बाकी आहे.
विद्या भुतकर.  

Saturday, June 18, 2016

तुझा माझा फोन...

 
विद्या भुतकर
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Thursday, June 16, 2016

Wednesday, June 15, 2016

हेअरकट

          विकेंडला हेअरकट केला. कापले म्हणजे अगदी संदीपचे चार महिने कापले नाहीत तर किती वाढतील इतके बारीक केले. माझ्या एक लक्षात आलं की गेल्या काही वर्षात दर थोड्या दिवसांनी आपले वय अजून जास्त वाटत आहे असे वाटायला लागते. केस वाढले की नेहमीप्रमाणे मागे बांधून टाकले जातात त्यामुळे अजूनच चेहरा कंटाळवाणा वाटायला लागतो आणि केस कापायची खुमखुमी येऊ लागते. मुलीचा वाढदिवस आणि माझा यात चार महिने असतात मध्ये आणि तिच्या वाढदिवसापासून माझा येईपर्यंत मधेच कधीतरी मी केस कापून येते. मला वाटतं की हा तिशीतला आजार असावा एखादा. त्यात जसेजसे वय वाढेल तशी केसांची लांबी कमी होत जाते. एकदा कापले की पश्चाताप होतो आणि मग पुढे वर्षभर पुन्हा त्यांना हात लावायची हिम्मत होत नाही. तर हा असा आजार नक्कीच मला झालेला असणार. त्यानुसार मी केस लहान करून आले.
           आता यात लिहिण्यासारखं काय आहे? तर माझे केस तीस वर्षात तीन फुटांपासून तीन इंचावर आले आणि त्या प्रोसेस मध्ये बऱ्याच लोकांच्या कमेंट मी ऐकल्या आहेत. अर्थात हे सर्व माझ्या जवळचेच लोक आहेत ज्यांना माझे लांब केस असलेले पाहायला आवडते. त्यामुळे त्यांना बोलणे हा मुद्दा इथे नाहीये. तर यावेळीही केस कापल्यानंतर 'अरे कशाला कापले?' असा प्रश्न आलाच. पण आता मी नवऱ्याकडे आहे आणि 'त्याला चालतं ना मग काय?' अशा कमेंटमुळे बरेच वाद टळतात. आणि हाच माझा मुद्दा आहे आजचा. कित्येकवेळा कितीतरी मुलींना आजही,'नवऱ्याकडे जा आणि मग काय करायचे ते कर ' हे ऐकायला मिळते.
            यावरून मी विचार करत होते की केस जे कापले तर दोन तीन वर्षात वाढतीलही पुन्हा पण त्यासाठी किती बाऊ होतो आणि तोही लग्नासारख्या विषयातच डायरेक्ट. मुलीने केस कापले तर काही आकाश कोसळणार आहे का? तिला ठरवू द्यावे ना? आणि मुलीच्या आई वडिलांना तरी काय बोलणार? कितीतरी मुलांच्या किंवा त्यांच्या घरच्या लोकांच्या अपेक्षा असतील मुलींचे केस लांबच असण्याच्या? केस लहान असतील, अगदी बॉयकटच असेल तरी त्याने ती व्यक्ती कशी आहे यात काही फरक पडतो का? का कित्येक हिंदी, मराठी चित्रपटात, सिरियल मध्ये अजूनही मुलींचे, सुनेचे केस लांबच असतात? सून छोट्या केसांची असल्याने काय फरक पडणार आहे? अगदी मुलीही लग्न ठरले की केस वाढवणाऱ्या पहिल्यात मी. माझे स्वत:चे केस अनेक वर्ष लांब होते पण ते केवळ वाढत आहेत म्हणून किंवा चांगले दिसत आहेत असे वाटत होते म्हणून. पण ते कापल्याने मी काही बदलले का?
        बरं मुलींचे जाऊ दे, मुलांच्या बाबतीत तरी हे नाटक कमी आहे का? एखादया केस कापलेल्या वाढवलेल्या मुलाबद्दल कितीतरी गैरसमज असतात. अगदी त्यावरून चेष्टाही होतेच. किंवा एखादा विचित्र केस कापलेला मुलगा असेल तर त्याच्याकडेही वळून पाहिले जाते. असाच एखादा मुलगा लांब केस वाढवलेला किंवा रंगीत केस असलेला, मुलगी बघायला गेला तर त्याच्या केसांवरून त्याच्या स्वभावाचे कितीतरी अनुमान काढले जातील यात वाद नाही. बाकी मुली बघायचे राहू दे, तसाच जर तो नोकरीच्या इंटरव्ह्यू ला गेला तर? त्याच्या केसांपलीकडे जाऊन त्याचे स्किल पाहिले जाईल का? शिवाय केस वयाच्या आधी पिकलेल्या किंवा टक्कल पडलेल्या मुलांचे तर बोलायलाच नको.
        आता हे सर्व बोलायच्या आधी मला एक मान्य केले पाहिजे की मलाही हे सर्व पटवून घ्यायला वेळ लागलाच. गेले काही महिने इथे नवीन ऑफिसमध्ये एक मुलगी बघते, तिचे केस कधी गुलाबी असतात किंवा कधी एखादीच पट्टी मध्ये जांभळी असते किंवा कधी चंदेरी असते. आधी वेगळे वाटायचे पण आता काही वाटत नाही. असाच एकजन आहे ऑफिसमध्ये त्याचे केस लांब आहेत निदान ६ इंच शेंडी येईल इतके तरी. बर ते नुसते लांब नाहीत तर ते हळदीच्या रंगाचे पिवळे आहेत. कितीतरी वेळा मला वाटत राहायचे की त्याला हात लावला तर माझ्या हाताला तो पिवळा रंग लागेल, इतके पिवळे. एकदा एका मिटिंगमध्ये अजून एक जण असाच दोन फुटाचे लांब केस मोकळे सोडून बसला होता. तो काय बोलतो यापेक्षा त्याला त्याचे केस  होते आणि ते कापले तर तो कसा दिसेल यावरच माझं लक्ष होतं. अनेकदा इथे आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या वेगवेगळया स्टाईल पाहील्या. ते सर्व पटवून घ्यायला वेळ लागलाच. असे अनेक लोक पाहिल्यानंतर मला लक्षात येऊ लागले की माझे विचार किती संकुचित आहेत. 
        केस छोटे किंवा मोठे ठेवणे किंवा रंगवायचे हे सर्व व्यक्तिगत निर्णय असावे अस मला वाटते. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमधेही आपल्याला स्वातंत्र्य का नसते किंवा त्यापेक्षा लोक काय म्हणतील याचा विचार का करावा लागतो? हे कधीपर्यंत चालेल? आणि आपण म्हणजे केवळ मुली नाहीत तर मुलेही. किंवा केस कसे आहेत यावरून ती व्यक्ती कशी असेल हे मत कधीपर्यंत ठरवले जाणार?

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, June 14, 2016

मी मराठी आहे, म्हणजे काय?

         मी मराठी आहे, म्हणजे काय? तर महाराष्ट्रात जन्मले, वाढले, शिकले आणि मराठी बोलते, लिहिते आणि वाचतेही. महाराष्ट्रात होते तोवर माझ्यासाठी केवळ दोनच भाग होते देशाचे, एक नॉर्थ इंडिया आणि एक साऊथ. पण राज्याबाहेर पडले आणि मला खूप मित्र मैत्रिणी मिळाल्या. गुजरात, युपी, बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, हरियाणा, आसाम सर्व राज्यातले. आणि मला आपल्या देशाचे खरेच विविधतेने नटलेल्या या सर्व राज्यांची ओळख होऊ लागली. त्यांचे खाणे, सण, लग्नं, नातेवाईक यांच्या बद्दल समजू लागले. भारताबाहेर पडल्यावर तर या गोष्टींची अजून अजून ओळख होऊ लागली. आणि ते मला सर्व आवडलेही. शिवाय भारताबाहेर राहिल्याने भारतीय म्हणून वागायची सवय झाली आहे, फक्त मराठी म्हणून नाही. त्यामुळे मला मी मराठी असल्याचा खूप ग्रेट अभिमान बाळगता येत नाही. पण कुणी वादच घालायला लागला तर नक्की भांडू शकते. एकूण काय तर भारताचा आपला देश म्हणून मला जितका अभिमान वाटतो तो माझ्या मराठी असण्यापेक्षा जास्त आहे. 
             हे सर्व खरे असले तरी माझ्या 'मी' एक व्यक्ती असण्यामध्ये माझ्या मराठीपणाचा मोठा वाटा आहे किंवा कितीही वर्षे कुठेही राहिले तरी मी 'घाटी' च राहीन यात शंका नाही. हे सर्व पल्ह्याळ लावायचं कारण की माझ्या केवळ मराठी बोलता, लिहिता वाचता आल्याने किंवा महाराष्ट्रात राहिल्याने ज्या गोष्टी मला करायला, अनुभवायला मिळाल्यात त्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे. त्यावर लिहायचं आहे. उदा. छोट्या गावात असूनही मला शिक्षणाची पूर्ण संधी मिळाली. शिवाय माझ्या व्यक्तिगत कला आणि बाकी गुणांना वाव मिळाला. मला अनेक पुस्तके, मासिके उपलब्ध झाली. ज्यांच्या वाचनाने माझ्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या. आज जे काही थोडे फार मी लिहू शकत आहे तेही मला हे सर्व साहित्य अनुभवायला मिळाले त्यामुळेच आहे. रणजीत देसाई, पु ल. , द . मा. , अरुणा ढेरे, शांत शेळके, गुरुनाथ नाईक आणि अनेक व्यक्तींची पुस्तके मला वाचायला मिळाली. खूप हसायला, रडायला, उदास व्हायला, प्रेमात पडायला मिळालं. मला माहित नाही की बाकी कुठल्या भाषेत हे सर्व मला त्याच उत्कटतेने मिळाले असते. आणि असेल तरी जे मला मिळाले त्याचा आनंद गमावण्यापेक्षा जास्त आहे. 
       आजही मी अनेक कविता, लेख, कथा हे सर्व मी केवळ मराठी मध्ये वाचू शकते, त्यांचे अर्थ लावू शकते, समजू शकते. हा सर्व अनुभव मातृभाषेमध्ये सर्वांनाच मिळतो असे नाही. माझ्या कित्येक मित्र मैत्रीणीना त्यांची मातृभाषा जास्त वाचता येत नाही किंवा लिहिताही येत नाही. त्यामुळे केवळ त्या भाषेमध्ये बोलणे आणि बाकी सर्व इंग्रजी मध्येच. यात आपण किती गोष्टींना मुकतोय याची त्यांना कल्पना असेल का? नुसते साहित्यच नाही. मराठी पदार्थ, ठेचा, पिठलं-भाकरी, मिसळ, बटाट्याची भाजी (वडा ही आहेच), भरले वांगे, चिकन रस्सा, साधा वरण भात आणि पुरणपोळी या सर्व पदार्थांची चव मला घरी घेता आली याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आणि खूप काही ग्रेट नसले तरी साधी भाजी भाकरी, वरण भात याच्यापुढे मला डोसा इडली आणि मसालेदार पंजाबी भाज्या सर्व फिके वाटते. मला आंध्रच्या लोकांचे जेवण आवडते तरीही मी एक मराठी मुलगी म्हणून मला आपल्या घरांमध्ये बनणाऱ्या जेवणाचा खूप अभिमान वाटतो. अगदी साधे, चविष्ट आणि सकस वाटते. 
          बर या साधेपणाच्या आवडी खाण्यापर्यंत मर्यादीत राहत नाही. कित्येक वेळा माझ्या लक्षात आलंय की माझ्या हातात कितीही पैसे दिले तरी मी एखादा फिकट रंगाचा किंवा कमीत कमी डिझाईन असलेला ड्रेस किंवा साडी घेऊन येते. माझ्या अनेक मारवाडी किंवा पंजाबी मैत्रिणींच्या तुलनेत माझे ड्रेस मला बरेच साधे वाटतात. पण तरीही मला ते तसेच आवडतात. तीच गोष्ट मी मेक-अप करण्यातही पाहिली आहे. म्हणजे हा व्यक्तिगत प्रश्न असतो पण तरीही माझ्या खूप कमी मैत्रीणीना मी केवळ स्वत:चे आवरण्यात तासान तास घालवलेला पाहिलंय. आणि त्यामुळे कदाचित त्या आणि मी, बाकींच्या तुलनेत जास्त साध्या वाटत असू पण तरीही त्यात वाईट काहीच नाही असे वाटते. आयुष्यात भरपूर बाकीची कामे आहेत करायला. मुलांच्या बाबतीतही मी सरसकट सर्वाना हा नियम लावू शकत नाही पण बऱ्याच माझ्या मराठी मित्रांमध्ये दारू आणि सिगारेट याचे प्रमाण बाकींच्या मानाने कमी पाहिले आहे. अर्थात व्यसन काय कसले न कसले असतेच आणि ते बदलतही राहते. पण एकूणच माझा अनुभव तरी असा  होता. 
         हा साधेपणा मला लग्नात आणि अगदी बऱ्याच कार्यक्रमातही दिसला आहे. आज काल पंजाबी स्टाईल मध्ये संगीत, मेहेंदी वगैरे सर्व करण्याचा लोक प्रयत्न करतात. पण माझं प्रामाणिक मत असं आहे की यासर्व गोष्टी जितक्या साध्या असतील तितके उत्तम. दिखाव्यासाठी कर्ज काढून लोकांना खायला प्यायला घालण्यापेक्षा योग्य ठिकाणी पैसा खर्ची करावा किंवा निदान त्यासाठी कर्ज तरी कुणाला घ्यायला लागू नये. याचा अर्थ असा नाही की मराठी लग्नात हुंडा वगैरे नसतो. हे सर्व प्रकार मी पाहिलेत आणि ज्याचा मला प्रचंड राग आहे. पण मी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या लग्नांमध्ये तुलना केली तर मराठी लग्न जास्त साधी होती. अगदी आपली पैठणी आणि मोत्यांचे दागिनेही मला सुंदर आणि साधे वाटतात. त्यामुळे होतं काय की आपली वागणीही बरेचदा कितीही पुढे गेले तरी साधेच राहते असे मला वाटते.
        अजून एक गोष्ट जी मला खूप आवडते महाराष्ट्राची ती म्हणजे सह्याद्री. लोकांनी कितीही घाटी म्हणले ना तरी मला त्याचे काही वाटत नाही कारण खरंच आमच्याकडे इतके घाट आहेत. :) आणि त्यांचं सौंदर्य अनुभवल्याशिवाय कळणार नाही. पावसांत केलेल्या अनेक ट्रेक मध्ये मला जो सह्याद्री पाहिल्याचा आनंद मिळालाय ना तो अगदी अमेरिकेत सुद्धा नाही मिळाला. बरं झालं आज हेही बोलून घेतलं. खूप वर्षं मनात होतं आणि प्रत्येक घाटी म्हणणाऱ्या माणसाला ते सांगायचं होतं. तर या अशा अनेक गोष्टी ज्यांनी मी 'मी' बनले आहे. माझे विचार, आचार, सर्व घडले आहे. असो.
         खरं सांगू का मी लिहायला सुरुवात केली तेंव्हा काही वेगळेच कारण होते सुरु करायचे. सध्या घरी आई असल्याने संध्याकाळी मराठी गाणी लावली होती. त्यात 'सांज ये गोकुळी' हे माझं एकेकाळी आवडतं असलेलं गाणं लागलं होतं. आशा भोसलेंनी गायलेलं हे गाणं ऐकलं आणि खरंच संध्याकाळी गोकुळात गेल्यासारखं वाटलं. मग मी त्याचे कवी, संगीतकार, गायक याची माहिती वाचली. तो अनुभव, ते गाणं मला केवळ मराठी समजत असल्याने घेता आला. आणि तेच काय मंगेशकरांनी गायलेली, संगीतबद्ध केलेली सर्व मराठी गीते, भावगीते, आरत्या यांचा जो आजपर्यंत घेतलेला आनंद आहे तो मला मराठी कळत नसतं तर कधीच मिळाला नसता. मराठी नाटकं, मराठी सिनेमा यांचे मिळालेलं जे धन आहे ते मला परक्या देशात किंवा परक्या राज्यातली मी असते तर मला मिळाले असते का? कदाचित हो कदाचित नाहीही. पण त्यादिवशी संध्याकाळी त्या गाण्यावरून हे सर्व डोक्यात आलं आणि लिहिल्याशिवाय राहवलं नाही. त्यामुळे मराठी असल्याचा खोटा अभिमान मी बाळगत नाही पण मी एक व्यक्ती म्हणून जी या राज्यात बनलेय ना त्याचा नक्कीच वाटतो. :) तुम्हांला काय वाटतं? 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, June 13, 2016

वास की श्वास ?

         श्वास, जगण्यासाठी मागे कुठेतरी एक प्रोसेस चालू राहते. चालू आहे तोवर बाकी गोष्टींवरून किरीकीरी चालू असतात, पण बंद पडला की कुठल्याही गोष्टीला काहीही अर्थ रहात नाही. पण त्या श्वास घेण्याचा त्या प्रोसेसला केवळ श्वास घेणे इतकेच काम असते तर कितीतरी गोष्टी टळल्या असत्या, नाही का? श्वास आला की वास सोबत येतोच. कुणाला कमी येतो कुणाला जरा जास्तच येतो. पण हे वासही नसते तर? 
          सकाळी उठले की ब्रश करताना येणारा टूथपेस्ट चा वास , शी-शू, आंघोळीच्या साबणाचा वास, दाढीच्या क्रीमचा वास, घरातून बाहेर पडताना मारलेल्या पर्फ्युमचा वास. यातले अनेक ओळखीचे असतात त्यामुळे कधी त्यात बदल झाला की जाणवणारेही. उन्हाळ्यात, हिवाळ्यात साबण बदलला की लगेच वासासोबत ऋतूही बदलल्याची आठवण होऊन जाते. किंवा नवीन गिफ्ट देलेला परफ्युम लावला की दिवसभर त्या गिफ्टची आणि देणाऱ्याचीही आठवण होत राहते. डोक्याला लावलेलं तेल, केसाला लावलेली मेहेंदी हे थोडे कमी लक्षात येणारे त्यामुळे कमी त्रासदायक. पण त्याच मेहेंदीमध्ये अंडे टाका आणि मग काय होते हे सांगायला नको. :) मेहेन्दीचा रंग नाही मिळाला तरी चालेल पण तो अंड्याचा वास नको असे होऊन जाते. पण तीच मेहेंदी हातावर आली की त्याचे अर्थ बदलून जातात. हिरवी मेहेंदी, हातावर सुकलेली आणि निलगिरीचे तेल लावलेली मेहेंदी, मग ती काढून टाकल्यानंतरही दिवस भर वास घेतला तरी मन भरणार नाही अशी मेहेंदी. 
          मी पुण्यात असताना सकाळी ऑफिसला निघाले की तिथे पोहोचेपर्यंत या वासांची एकापाठोपाठ रांग लागायची. टपरीच्या शेजारून गेले की सकाळी सकाळी येणारा पोह्यांचा वास, एखाद्या कोपऱ्यावरून जाताना पूजेच्या फुलांचे वास, पुढे कुठे वडे तळण्याचे वास, प्रचंड उकळलेल्या चहाचे वास, एकेक करत मी ऑफिस गाठायचे. कधी कुठेतरी मन रेंगाळायचं, पण पुढे गेलं की दुसरा वास असायचाच मागचं विसरायला लावणारा. ऑफिसचाही कुणी नसतानाचा एक वास नंतर सवय झाली की हरवून जायचा. पण कॉफी ब्रेकरूमचा मात्र तसाच असायचा दिवसभर. कधी तिथे गेलं की कॉफीघेतली नाही तरी केवळ वासाने तरतरीत वाटायचं. अजूनही वाटतं. इथली ऑफिसची काळी कॉफी प्यायली जात नाही पण वास आला की मस्त वाटतं एकदम. 
         बाकी मग खाण्यापिण्याचे तर काय बोलू नका. उतू जाणाऱ्या दुधाचे वास, फोडणीचा वास, चहाचा वास, गरम गरम ताज्या जेवणाचा वास, अगदी भाकरी, चपाती, ताजा भात यांचेही. पावसात येणारा भाजलेल्या कणसाचा, भजीचा वास, थंडीतला गरम पावभाजीचा वास. हे असे इतके तीव्र की माणूस भुकेला असेल तर वासाने वेडाच होईल. अगदी समोर ताट आलं तरी पहिला घास खाईपर्यन्त चैन पडणार नाही. पण काही विशेष असतातच, जसे फक्त आईच्याच हातच्या जेवणाचे, मावशी मामी यांच्या पदार्थांचे किंवा आजीच्या एखाद्या पदार्थाचे, इ. की ते केवळ जेवण म्हणून नसतात तर ते त्या व्यक्तीची आठवण पुन्हा एकदा जागृत करतात.
          काही असेही असतात जे तुम्हाला सांगता येत नाहीत. आई झाल्यावर बाळाला जवळ घेतल्यावर येणारे बाळाचे ते तेल-पाण्याचे, पावरड-क्रिमचे आणि प्रत्यक्ष त्या बाळाचेच. आजीचे-आजोबांचे, आई-बाबांचे आणि नवरा-बायकोचेही. जे केवळ त्या त्या व्यक्तीचे आपण केलेले इन्तर्प्रिटेशन असतं, नाकाने केलेलं. बाकी अगदी ठराविक व्यक्तींचेही असतात, कुणी गुटका खाणारा किंवा डोक्याला वासाचे तेल लावणारा किंवा अत्तर लावणारा असे असतातच. पण ते विरळ. सांगता न येणाऱ्या वासात असणारा म्हणजे पहिल्या पावसाचा मातीचा वास, त्यावर अजून काही लिहायला नकोच. पण थंडीचाही असतो स्वत:चा एक, प्रत्येकाच्या घराच्या दिवाळीच्या स्पेशल साबणाचा, उटण्याचा आणि त्यात सोबत फटाक्यांचा आणि हो फराळाचा असतोच की. नव्या पुस्तकांचे वास, जुन्या पुस्तकांचे वास, नव्या कपड्यांचे वास आणि जुन्यांचेही. 
         काही नको असणारेही असतात. एखाद्या गल्लीतून जाताना नक्की माहित असतं की नाक बंद केलेच पाहिजे. काही पदार्थांचे जे एकेकाळी रोज रोज खाल्ल्याने नको झालेले असतात. त्यांचे वासही मग नको वाटतात. उग्र परफ्युम, अत्तरे, यांचे वास. आणि हो, प्रेग्नंट असताना नको नको करणारे साधे साधे वास. पाऊस पडल्यावर ओल्या कपड्यांचे कुजके वास, खरकट्या भांड्यांचे, नासलेल्या पदार्थांचे आंबूस वास, पावसात रस्त्यावर पडलेल्या पेट्रोलचे वास. तर हे असं नाक, नुसते श्वास देत नाही. सोबत वासही असतातच अनेक. ज्यातून आपण अनेक गोष्टी जगतो, त्यांच्या आठवणी मनात साठवतो आणि तोच वास पुन्हा आला की तेच क्षण पुन्हा जगतोही. 
         आजकाल माझ्या मुलांनाही माझ्या पदार्थांचे वास येतात. डोसा, पास्ता, Sandwich अशा ठराविक पदार्थ बनवायला लागले की ते येऊन विचारतात, 'की हेच करतेयस ना?'.  मला मजा वाटते असे गेसिंग गेम खेळायला. स्वनिक कधी कधी फसतोही. म्हणजे बटाटा उकडला की विचारतो पाणी पुरी करतेय का? अगदी तो बटाटा मी पराठ्यासाठी उकडला असला तरी. मध्ये एकदा मी ओलिव्ह तेल भांड्यात घातले आणि त्याने टोयलेट मधून ओरडून विचारले "तू पास्ता करतेयस का?" म्हणले, "तुझ्या शी च्या वासातून तुला पास्त्याचा वास बरा आला?" :) अशा गमती होत राहतात. खरंच हा श्वास नुसता श्वास असता तर काही मजा राहिली नसती आयुष्यात, नाही का? 

विद्या भुतकर.

Thursday, June 09, 2016

"मी" कुठली?

कधी कधी वही आणि पेन हातात आले की मग हात शिवशिवायला लागतात. खूप वर्षं झाली पत्रं लिहून. रात्रीच्या लाईटच्या उजेडात चकाकणारी शाई आणि त्यात खुलणारं अक्षर दिसलं आणि मग लिहित गेले जे सुचेल. आता हे पोस्त करतेय पण अजूनही त्या कागदावर अजूनकाहीतरी लिहिण्यासाठी हात शिवशिवत आहेत. पत्र लिहायची जबरदस्त इच्छा होत आहे, कुणाला का असेना. या रेखीव छापलेल्या अक्षरांमध्ये ती मजा नाही जी त्या प्रेमपत्रांमध्ये होती. मंगेश पाडगावकरांच्या कवितांची एकेक कडवी लिहिण्यात होती. असो. विचार करतेय काय करावं. तोवर ही पोस्ट.


विद्या. :)

Wednesday, June 08, 2016

डायरीतला एक दिवस

 हे एक प्रतीक आहे आपण दिवसभरात किती आणि कसे विचार करतो. आपल्याच विचारांच्या विरोधातही कसे वागतो, अशा अनेक गोष्टींचं.
१. नोकरीत बरोबरीची अपेक्षा करतो पण तेच काही ठिकाणी खास वागणुकीचीही, उदा: बस.
२. प्रमोशन मिळावं किंवा तो आपला हक्कच आहे, पण आपल्याच स्त्री सहकाऱ्याला योग्य ती वागणूक देत नाही.
३. आपल्या नवऱ्याने बरोबरीने संसारात भाग घ्यावा हे बरोबरच आहे. मग तेच नणंदेला का नको?
४. आपण चांगलं दिसावं, त्याचं कौतुक व्हावं अशी अपेक्षा ठेवतो पण दुसऱ्यांना मात्र नावे ठेवतो.

        आजपण सकाळी लवकर जाग आलीच नाही. रोजची रडारड आहेच मग. त्यात स्वप्नीलची काहीही मदत नसते सकाळी. स्वत:चं आवरून जातो फक्त. बिघडवून ठेवलाय आईने, दुसरं काय? असली वळणं लहानपणीच लावायला पाहिजे होती. आमचं नशीब कुठे इतकं? त्यात हा यश, अजिबात काही आवारात नाही. सगळी ढकलगाडी आहे. आणि जरा रागावलं की ओठ काढून बसतो. कित्ती क्यूट दिसतो. अगदी सशाचं पिल्लूच. मम्मिशिवाय याचं पान हलत नाही. :) अगदी लेसही मीच बांधून द्यायची याच्या शूजची. याला शाळेत सोडायचं म्हणजे जीवावर येतं. काय करणार ? अजून थोडी वर्षं तरी नोकरी करायलाच लागणार. मी तर पक्कं ठरवलंय अजून दहा वर्षं नोकरी करणार फ़क्त. मग स्वप्नील ऑफिसला, यश कॉलेज आणि मी आरामात घरी राहणार. हि रोजची मरमर झेपत नाही. घरातून घाईने निघाले. 
         त्यात आज जाऊबाईकडे जायचं होतं, पूजेचं सामान द्यायला. सामान घेऊन बसमध्ये चढले तर एक सीट मोकळी नाही. इतकं सामान घेऊन बाई उभी आहे म्हणून एक माणूस उठला नाही मेला. वर उभ्या राहिलेल्या बाईकडे टक लावायला असतातच टगे. सामान द्यायला गेले तर ऐकवलंच," अगं किती दिवस तुझ्याकडे वर्षातून एकदाच असते पूजा, इथे रोज असते ना. रोज आई मला विचारत होत्या आणलस का म्हणून." इतकी खडूस आहे. सासूसासरे हिच्याकडे असतात म्हणून आपलं रोज ऐकून घ्यायचं हिचं. तिथून ऑफिसला रिक्षानेच गेले मग. 
         जरा रिक्षात बसल्यावर बघावं म्हणून फोनवर फेसबुक उघडलं तर रावी म्याडमचा प्रोफाईल फोटो होता नवीन पोस केलेला. घ्या ढिगाने कमेंट आणि लाईक्स. हिला काय पोरं बाळ नाहीत. फिरते नवऱ्यासोबत सगळीकडे. आणि यांच्या नवऱ्याना बरे चालतात हे असले कपडे घातलेले आणि फोटो पोस्ट केलेले? आमची जरा बसताना मागून जीन्स खाली आली की डोळे मोठ्ठे होतात. आता इतके तर होणारच ना? मी काय मुद्दाम करतेय का? जाऊ दे. किती दिवस झाले छान एक फोटो काढायला पाहिजे. कुठे खास काही करणं होतंच नाही त्यात यश झाल्यावर पोट वाढलंय. जीमला जायला हवं, कधी करणार काय माहित. निदान डाएट तरी सुरु करते. मग बारीक झाले ना मी पण असे फोटो टाकते की नाही बघ रावीबाई.
       ऑफिसला पोचले तर चिडचिड झाली. काल उशिरा पर्यंत थांबून घेतलेल्या कॉलवर एकही मेल नव्हती ऑनसाईटकढून. एक तर यांना उशिरा थांबून केलेल्या कामाची किंमत नाही. आणि जरा इश्यू झाला की वर तक्रार करायला मोकळेच. सकाळ सकाळी म्यानेजरचा मेल पाहून अजून चिडचिड झाली. आता या शर्माला प्रमोशन देणार म्हणे. मी काय मेलेय का? याची कामं कोण करून देतं? लवकर घरी गेले तरी घरून कॉल घेते. याच्यासारखं बॉससोबत ड्रिंक्सला जात नाही, मागे मागे करत नाही म्हणजे बाकी कशालाच किंमत नाही का? च्यामारी ! कितीही काम केलं तरी बायकांना प्रमोशन द्यायचं म्हणालं की बोंब. सोडूनच जायला पाहिजे, म्हणजे मग कळेल यांना किती काम करते मी ते. काही नाही, आता लवकरच सुरु करते नवीन नोकरी बघायला. याच्यापेक्षा भारी नोकरी मिळवेन आणि जाईन मग यांच्या नाकावर टिच्चून. 
       दुपारी विराट डेस्कवर आल्यावर जरा डोक्यातला राग शांत झाला. इतका स्मार्ट दिसतो, म्हणजे विराट कोहलीच आमच्या फ्लोअरचा. सारखा मैम, मैम करत असतो. जरा याच्यापेक्षा मोठी आहे म्हणून इतकं अहो जाहो कशाला करायचं? त्याच्या गोड बोलण्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे मला. त्याच्याशी जरा माऊच वागते की काय अशी शंका येते मला कधी कधी. पण काय करणार? किती विचार करणार आणि कशा कशाचा? ही राशी, सात महिने प्रेग्नंट आहे. कधी दांडी मारेल सांगता येत नाही. उद्या ती सुट्टीवर गेल्यावर मला यालाच काम सांगायला लागणार आहे ना? चहानंतर बॉसकडे गेले तर म्हणे, "काम चांगलं आहे पण तुमचा विचार पुढच्या प्रमोशनला करू. यावेळी काही करू शकत नाही". घ्या, म्हणजे धार सोडताही येत नाही. सगळे नुसते गोड बोलून काम करून घेतात. ऑन साईटला जावं तर स्वप्नीलची नोकरी अशी इथली. माझ्यासोबत येणार आहे का सोडून? बसायचं मग इथेच आपण पण अडकून. वैताग आहे सगळाच. 
      घरी फोन केला तर आई बाबांचं रडगाणं. दोघेही ऐकत नाहीत. किती हट्टीपणा करतात? जरा सांभाळून घ्यायचं ना? त्यात ही ताई, पोरांचं सोडून स्वत:च्या धंद्याचं बघत राहते. कशाला हवाय हिला इतका व्याप? कधी वाटतं आपणच पैसे द्यावे तिला ज्यादा, पण त्यासाठी इकडे घरी कोण उत्तरं देत बसणार? जाऊ दे. यशला बघितल्यावर जरा बरं वाटलं. जेवायलाही 'बाहेरून आणू' म्हणाले तर 'चालेल' म्हणाला स्वप्नील. ते एक बरं आहे, सांभाळून घेतो तो. नाहीतर दिरासारखं रोज घरचंच जेवण पाहिजे दोन वेळेला म्हणालं तर मला काही जमलं नसतं. जरा रात्री निवांत टीव्ही बघत बसावं म्हटलं तर सासूबाईचा फोन. पुढच्या आठवड्यात नंदाबाई येणार आहेत. म्हणजे गेला विकेंड. तिला बरं आहे, तिकडे घरी नवरा सगळं ऐकतो आणि इकडे आम्ही आहेच सेवेला. मेलं आमचं नशीब कुठे इतकं चांगलं? 
        झालं एकदाचं आवरून घर. उद्याच्या डब्याचं बघायला पाहिजे. बाईला पैसे द्यायचेत. परवाचा ड्रेस तिने खराबच केला. आता वापरता येणार नाही. आजही व्यायाम करायला जमलं नाही. उद्यापासून डाएट सुरूच करते नक्की. उद्या यशच्या शाळेत जायचं आहे. त्याचं आजचा होमवर्क ठेवला का बघते. रिझ्युम अपडेट केला पाहिजे. इथलीच कंपनी पाहिली पाहिजे. जास्त लांबचा प्रवास करता येणार नाही. का जाऊ दे? सध्या चालू आहे ठीक तर? प्रमोशनच बघू पुढच्या वेळी. नवीन ठिकाणी अजून कसले लोक मिळतील काय माहित? झोपावं आता, आजचा दिवस संपला. निदान एक तरी सिरीयल बघावी,"नांदा सौख्य भरे" लागली असेल आता. 
         
विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, June 07, 2016

अमानुष

         कधी आपण मोठे होतो आणि कधी हे असे मनातले विचार ओठांवर न येता मनातल्या मनात मरून जातात हे कळत नाही, होय ना रे? आणि कित्येक वेळा हे असे विचार किती काळे असतात याला काहीच मर्यादा नसते रे ! कधी असतात ते हावरे. म्हणजे सख्खे सोबत वाढलेले भाऊ संपत्तीसाठी दुसऱ्याच्या खुनाचा विचार करतात तर काही बहिणीला घरातून घालवून देण्याचा. आई वडिलांना घरी न ठेवून घेण्याचा.
           येत असेल कुणाच्या मनात स्वार्थी विचारही, आपल्याच मुलांमध्ये आवडतं-नावडतं निवडण्याचा. लग्न करताना, हा बरा की तो याचा? अगदी केल्यानंतरही अनेक वर्षांनी, तेव्हा काय करायला हवं होतं याचा. तिकडे कितीही बायकोवर प्रेम असलं तरी शेजारीण जाताना नकळत डोक्यात टपकणारा, असतोच एखादा विचार.
       कधी असतात घाबरवणारेही, आपलं जवळचं माणूस नाही राहिला सोबत तर? तो नसताना मी कशी राहीन किंवा राहीन का तरी? किंवा संपला हातातला पैसा तर? पैसा संपला म्हणून त्याला सोडून जाता येईल का याचेही? किंवा उधळली पोराने इज्जत समाजात तर आपले काय होईल याचे? किंवा पोराचं काही का होईना, आपल्याला आधी मिळत होता तो मान आता मिळाला नाही तर काय म्हणूनही.
        किती किती ते काळे विचार, मनाच्या आत कुठेतरी येणारे. हे सगळे तर नुसते उदाहरण झाले. शब्दांत उतरणारही नाहीत असे अनेक लाखो करोडो विचार. प्रत्येक नात्यात, प्रत्येक कार्यात येणारे विचार. सर्वांना गाडून टाकायला किती कष्ट पडत असतील? कदाचित नसतीलही कष्ट पडत. काहीच नसल्यासारखं आपण रोज जगत राहतो. ज्यांच्या मनातले हे विचार खरंच बाहेर येतात ना ते मात्र 'अमानुष' म्हणवले जातात आणि त्यांच्याच बातम्या रोज पहात आपण विचार करतो,"कसा हे असा विचारही करू शकत असतील?".

विद्या भुतकर.  

Sunday, June 05, 2016

डांबऱ्या

         डांबऱ्या जन्मला तेव्हा केवळ मुलगा होता म्हणून जिवंत राहिला. इतका काळा होता की मुलगी असता तर केंव्हाच त्याच्या बापानं तिचा गळा दाबून कचऱ्यात फेकून आला असता. त्याचा त्वचेचा रंग, डोक्यावरच्या केसांचा रंग , तळहाताचा गुलाबी शिरा दिसणारा रंग आणि ओठांचा निम्मा लाल रंग मिश्रित काळा रंग हे सगळे म्हणजे एकाच रंगाच्या किती शेड्स असतात याचं जिवंत उदाहरण होते. शाळेत पोरांनी ठेवलेलं हे त्याचं नाव, 'डांबऱ्या'. अगदी गावात डांबरी रस्ते नसेनात का? लहान असताना लई राग यायचा त्याला. हळूहळू त्यानं ते चिडवणं स्वीकारलं, आपलं नाव आणि रूपही. 
        डांबऱ्या मोठा झाला. जमेल तशी शाळा शिकला. मजुरी, शेती करून पोट भरू लागला. उन्हा-तान्हात काम करून त्याचा काळा रंग अजूनच रापला. वय वाढलं तसं आईने हट्ट केला म्हणून लग्नाला 'हो' म्हणाला. लग्नही मुलगा होता म्हणूनच झालं. नाहीतर इतक्या काळ्या मुलीचं लग्न झालं असतं होय? पण त्याचं झालं. पोरीच्या बापालाही बरंच झालं. त्याची पोरगीही सावळी असून पोरापेक्षा गोरी म्हणून खपून गेली. वर हुंडा कमी बसला ते वेगळंच. संसाराचा गाडा चालू तसा तो जरा खुलला. कुणीतरी घरी आल्यावर विचारणारं होतं. हाता पायाला लागलं, खुपलं तर फुंकर मारायला होतं. तरीही इतक्या वर्षात घुम्यासारखं रहायची लागलेली सवय ती! इतक्या सहज जाणार थोडीच होती. 
          बायकोला दिवस गेलेत म्हणल्यावर त्याला काळजीने ग्रासलं. होणारंच ना. आयुष्यभर खाल्लेल्या टोमण्यांची, चेष्टांची आणि ठेवलेल्या नावांची आठवण झाली. मुलगा होतो का मुलगी यापेक्षा आपल्यासारखं काळ होतं का बायकोसारखं सावळा याचीच चिंता त्याला पडली होती. कळल्यापासून सात महिने त्याच्या डोक्यावर टांगती तलवार होती. बाळ आपल्यासारखं होऊ नये अशी त्याने दिवसातून हजार वेळा तरी प्रार्थना केली होती. बाळ झाल्यावर सर्वात आधी त्याला ते पहायचं होतं. त्यामुळे तिला माहेरीही पाठवायची त्याला इच्छा नव्हती. पण पहिली वेळ म्हटल्यावर ती माहेरी तर गेलीच. शेवटी माहेरून बातमी आल्यावर  पहिल्याच गाडीने तो तिला भेटायला गेला होता. बाळाला पाहीपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता. 
          इतक्याशा एक दिवसाच्या त्या रडणाऱ्या बाळाला पाहिल्यावर मात्र तो सर्व विसरून गेला. त्याचा आवाज, त्याचा इवलुसा चेहरा, टपोरे डोळे, त्याच्या जवळ जवळ तळहाताइतकंस ते बाळ. पहिला प्रेमाचा भर ओसरल्यावर मात्र त्याने थोडं निरखला त्याचा रंग. त्याची प्रार्थना देवाने ऐकली होती. पोरगा खरंच बायकोसारखा होता एकदम. त्याने मनोमन हात जोडले होते. एकवेळ तो स्वत:ला झालेला अजून त्रास सहन करू शकला असता. पण तो ज्यातून गेला त्या सर्व हालातून इतक्या छोट्याशा जीवाने जावं या कल्पनेनेच तो शहारला होता.  मोठ्या ओझ्यातून त्याची सुटका झाली होती. दोन दिवस सासरी राहून तो गावी परतला. बायकोला म्हणालाही,"कधी येतासा घरी परत?" दोन दिवसांची बाळंतीण ती, तिला काय कळणार? शेवटी तिची आईच म्हणाली,"जावईबापू पोरीला लगेच नाही पाठवणार. दो चार महिन्यांनी बारसं करूनच न्या पोरीला आणि बाळाला. " मनावर दगड ठेवून तो त्यादिवशी निघाला. 
          गेल्या महिनाभरापासून गावातून जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या कामावर लागला होता. त्यात बायकोही नव्हती म्हणून मग रात्रीचं काम लागलं तरी जात होता. शिवाय आता पोरगं झाल्यावर काम करायला अजून जोर आला होता. तिथे जे पडेल ते काम करायचा. उन्हाळ्याची सकाळी ७ पासूनच उन्हं चढायला लागायची. त्यात त्याचं काम हे असं. गेला तसा त्या गोल डब्यात डांबर ओतयचा. त्याच्या खाली लाकडं पेटवायचा. उन्हं वाढू लागली की डांबरही त्या डब्यात वितळू लागायचं. बाकी लोक चेहऱ्याला कापड लावून बसायचे. कधी ते त्याला चिडवायचे,"ह्याला काय? डांबऱ्याच हाय तो". तो बेफिकीर तसाच त्या उन्हात तो काम करत रहायचा. 
         डांबऱ्या धगीतून डांबर खडीवर ओतून घ्यायचा. मोठ्या लांब दांडक्याने डांबर आणि खडी मिसळून घ्यायचा. आणि एका खोऱ्याने ती खडी एक चाक असलेल्या गाडीत घेऊन हळूहळू करत ती खडी रस्त्यावर मन लावून ओतायचा. दुपारच्या उन्हाच्या झळा आणि डांबराची ती खडी दोन्ही मिळून त्याला तापत रहायचे. त्याच्या सोबत काम करणारी पोरं म्हणायची त्याला, "आरं जरा बस सावलीला? किती येळ झाला तसाच काम करतोयस". पण त्याला कसलीच पर्वा नव्हती. हे काम लागल्यापासून पहिल्यांदा त्याला आपल्या रंगाची, आपल्या ठेवलेल्या नावची लाज वाटेनाशी झाली होती. जणू इथेच काम करायलाच तो जन्माला होता. त्या रंगात एकरूप झाला होता. जसा जसा रस्ता पूर्ण व्हायचा, त्या एकसारख्या झालेल्या रस्त्यावर पांढरे पट्टे उठायचे. मग तो अजूनच खुलून दिसायचा. डांबऱ्या त्या तुकतुकीत रस्त्याकडे बघत रहायचा. आपल्या कष्टाचं फळ त्याला डोळ्यासमोर दिसायचं. एक तुकडा पूर्ण झाला की दुसरा. त्याला मग ध्यासच लागायचा रस्ता पूर्ण करायचा. 
        आजचं काम पूर्ण करून तो त्यामानानं लवकर घरी निघाला. जरा खुशही होता. आज बऱ्याच दिवसांनी बायको घरी येणार होती. रस्त्याने येताना त्याने स्वत:ला न्याहाळले. आपल्या मळलेल्या कपड्यांना लागलेले डांबराचे डाग आज पहिल्यांदा त्याला जाणवले होते. पायातल्या त्या रबरी चपला, कधीच काळ्या झाल्या होत्या. ठिकठिकाणी त्या स्लीपरला उंचवटे झाले होते सुकलेल्या डांबराचे. त्याने ते एका जागी बसून काढण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. उगाच उशीर नको म्हणून पुन्हा चालायला लागला. बायकोने आपल्याला अशा अवतारात बघायची त्याची मुळीच इच्छा नव्हती. पण पर्याय नव्हता. ती दुपारच्याच गाडीने घरी येणार होती. तो आला तसा पोराकडे धावला. चार महिन्याचं बाळ आणि दोन दिवसाचं यातला फरक बघून दचकलाच. पण पोरगं तब्येतीने सुधारलं होतं आणि रंगंही बराच उजळला होता. 
       बाळाला घेऊन बायको खाटेवर बसलेली होती. त्याने घाईघाईने हात धुतले आणि खाटेवर बसून पहिला बाळाला हातात घेतला. बाळाला कसं धरावं, कसं बोलावं याची काहीच कल्पना नव्हती त्याला. आणि त्यात हातात घेतल्यावर त्याला जाणवलं की आपले हात किती रुक्ष झालेत. त्या बाळाच्या मऊ कातडीला जणू काट्यासारखे टोचलेच ते. पोर जरा घाबरलाही असा एकदम वेगळा माणूस समोर बघून. त्यात याचा अवतार हा असा. आपल्याकडे बघून रडतंय म्हटल्यावर त्याला क्षणभर वेगळीच भीती मनात आली. आयुष्यभर जगाने पाठ फिरवली तशी आपल्याच पोराने फिरवली तर? आज फक्त आपला चेहरा बघून ते इतकं घाबरलं, रडायला लागलं. आपण त्याला कधी आवडलोच नाही तर? त्याला काही सुचेना, त्याने बाळाला परत आईकडे दिला आणि आत खोलीत निघून गेला. पाठोपाठ बायकोही गेलीच. 
म्हणाली, "काय झालं वो?"
आता आपल्या मनातले भाव तिने ओळखलेत म्हटल्यावर त्याला विषय टाळता येईना. "काय नाय. ते बाळ माझ्याकडे बघून रडाया लागलं. "
"अवो, नवीन मानूस बघून रडतंय ते. आणि सगळंच नवीन नवीन हाय ना त्याला. जरा दोन दिस द्या. सवय होत्ये मग." तिने त्याला समजावलं. म्हणाली, "चला आवरून घ्या. आंगोळ घालतो मीच तुमाला आज." त्याने मान हलवली.
         तिने दोन बादल्या पाणी गरम केलं. मोरीत त्याला कपडे काढून बसाय लावलं. त्याच्या काळवटलेल्या अंगाकडे बघून तिला वाईट वाटलं. त्याने स्वत:कडे असं दुर्लक्ष करावं याचा रागही आला. कितीही जगाने त्याला 'डांबऱ्या' म्हटलं तरी तिच्यासाठी तो तिचा नवरा होता. पण काय करणार इतक्या वर्षात त्याला सवयच पडली होती असं स्वत:कडे दुर्लक्ष करायची. तिने त्याला अंगाला साबण लावून दिला, राठ झालेल्या हात पायांना चोळला. दगडाने पाठीला घासून दिलं. साबणाने केस चोळून धुतले. त्याच्या अंगाचा डांबराचा वास जमेल तितका काढून दिला. पाट्या उचलून टणक झालेल्या त्याच्या दंडाकडे पाहून त्याचा अभिमानही वाटला. कपडे बदलून तो आवरून बाहेर आला. 
        थोड्या वेळाने बायकोने झोपेला आलेल्या बाळाला त्याच्या हातात दिलं. हलकेच त्याला कसं मांडीवर घेऊन थोपटायचं हे दाखवलं. मग त्याने बाळाला मांडीवर घेतलं. एक मांडी हलवत उजव्या हाताने थोपटत त्याने बाळाला झोपवलं. त्याला असं झोपलेला पाहून तो सुखावला. मघाचा किस्सा विसरून गेला. बायकोने दिलेलं जेवण मग त्याने तिथेच पोराला मांडीवर घेऊन खाल्लं. शेवटी तिनेच त्याला उठायला लावून बाळाला खाली झोपवलं. तोही मग त्याच्याजवळ पडून त्याच्याकडे बघत बसला. आपलं पोरगं आपल्यावर गेलं नाही याचा आनंद होता त्याच्या डोळ्यात. सगळं आवरून बायकोही बाळाच्या पलीकडे येऊन पहुडली. दोघेही मग बाळाकडे बघत बसले. 
          तिने बाळाच्या पलीकडून आपला हात त्याच्या दंडावर टाकला. म्हणाली,"कशाला काम करताय इतकं? जरा तब्येतीकड बघायचं ना?". तो नुसताच हसला. पण तिच्या डोळ्यात पाणी आलेलं. त्याने ते हळूच पुसलं. बाळाच्या वरून तो तिच्यामागे येऊन पडला. तिला आपल्याकडे वळवलं, म्हणाला, "इतकी कातडीची काळजी नका करू माज्या. मी हाय तोच हाय. बाकी पोरगं मात्र तुम्ही झ्याकच दिलं आमाला. " ती हसली. त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. शप्पत सांगते, तिच्या ओठाला त्याच्या कातडीचा रंग कणभरही लागला नव्हता. असलाच तर त्याच्या प्रेमाचा थोडासा जरुर लागला होता. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Thursday, June 02, 2016

प्रेमबीम काही नको बघ

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

हिम्मत- लघुकथा एका आयुष्याची

"                                                                                                                                    दि. १२ जुलै १९७०
  
प्राणप्रिय तुम्हाला, 
  स.न. वि. वि. 
       तुम्ही म्हणत असाल, पत्रातही तुमचं नाव घेण्यास मी लाजते आहे की काय? तशी तुमच्या नावापुढे मी काय संबोधने लावावीत याचा बराच विचार करून थोडे लाजल्यासारखे झाले खरे. परंतु या पत्रामुळे तुमची बदनामी होऊ नये याची खबरदारी घेणे हे एक मुख्य कारण आहे. पत्रास कारण की, आपल्या कॉलेज बाहेर झालेल्या भेटीची वार्ता मोठ्या दादांनी वडिलांना सांगितली आहे. तसे घाबरण्याचे कारण नाही, मी सुखरूप आहे. परंतु,"पुरे झाले मुलीचे शिक्षण, आता चांगला मुलगा बघून उरकून घ्या" असे आईचे फर्मान आल्याने माझी नजरकैद सुरु आहे. माझे कॉलेजमध्ये येणे काही दिवस तरी स्थगित होईल असे दिसते.  
        "मी डोळे मिटण्याआधी हीचे दोनाचे चार झालेले बघावं" अशी इच्छा आजीनेही जाहीर करून टाकली आहे. तिला दोष देऊन काय उपयोग? आजीची प्रकृती तशी नाजूकच आहे सध्या. आजोबा गेल्यापासून त्यांच्या आठवणीत ती झुरतेच आहे. तिला पाहिल्यावर अतिशय वाईट वाटते. असेच मला तुमच्याशिवाय आयुष्य काढावे लागले तर माझे काय होईल असा भंयकर विचारही मनात क्षणभर येऊन गेला. तेव्हांच देवाकडे मी साकडं घातले आहे की या जगातून नेशील तर मलाच आधी न्यावे. तुमच्याशिवाय हे आयुष्य क्षणभरही जगणे मला असह्य आहे.
           कदाचित गेले काही दिवस तुम्ही न भेटल्यामुळे अशा वाईट विचारांनी माझ्या मनात गर्दी केली असावी. तुम्हाला पाहिल्यावर मात्र माझ्या मनातील सर्व वाईट विचार नाहीसे होऊन जातात आणि मनाला शांती मिळते. तुमच्या बाहुपाशातच माझा स्वर्ग सामावला आहे हेच खरे. तुम्हाला भेटण्याचा तो अभूतपूर्व क्षण कधी माझ्या पदरात पडेल याची मी आतुरतेने वाट पहात आहे. त्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करत आहे. 
          तुमच्या सांगण्यावरून घरी आलेली सलू  भेटल्यावर मला देवदूतच भेटल्याचा आनंद झाला आहे. तिच्याकडून मिळालेल्या तुमच्या पत्रामुळे आपल्या प्रेमावरील माझा विश्वास अजूनच दृढ झाला आहे. वडिलांनी मुंबईहून आलेल्या एका स्थळाची आईशी चर्चा करताना कानी पडले तेव्हापासून मनाची थोडी अस्वस्थता वाढली आहे खरी. तुमच्या प्रेमावर काडीमात्रही संशय नसल्याने खूप काळजी नक्कीच नाहीये. परंतु येणाऱ्या संकटाची चाहूल लागल्यावर वेळीच पाऊले उचलणे योग्य ठरेल असे वाटते, म्हणून हा पत्रप्रपंच.
          तुमच्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे. तुम्ही लवकरच वडिलांना भेटायला येऊन मला मागणी घालावीत ही प्रार्थना. आपल्या घरची थोरली सून होण्याचे माझे स्वप्न लवकरच पूर्ण कराल अशी माझी खात्री आहे. परंतु देव न करो, अशी आणीबाणीची परिस्थिती उद्भवलीच तर विष पिऊन जीव देण्याचा ठाम निर्णय मी घेतला आहे.
           हे पत्र सलुसोबत पाठवत आहे. या पत्राची पोचपावती आणि उत्तर जरूर कळवावे. तुमच्या मार्गाला डोळे लावून बसले आहे.
                                                                                                      तुमची आणि फक्त तुमचीच, 
                                                                                                      वैजयंती. " 

         तिने ते पत्र पुन्हा एकदा वाचलं. डोळ्याचा चष्मा काढून डबीत घालून ठेवला. डोळे पदराने पुसले. पत्र नीट पाकिटात ठेवलं. पत्रासोबत ट्रंक मध्ये एक फोटोही होता,  ब्लाक व्हाईट फोटो त्या दोघांचा. दोघांच्या गळ्यात हार घातलेला. तो फोटो पाहून ती जरा हसली. घरातून पळून जाऊन केलेल्या लग्नाची ती एकुलती एक आठवण होती. ती तरुणाई, ते प्रेम आणि तो दिवस पुन्हा एकदा डोळ्यात उतरले होते. आणि त्यापुढची सुखी संसाराची २० वर्षही डोळ्यासमोर तरळली.  'तुमच्याशिवाय क्षणभरही जगू शकणार नाही' म्हणणारी वैजू गेली २५ वर्ष त्याच आठवणींवर जगतेय. त्या २५ वर्षात हजारवेळा तरी जीव देण्याचा विचार तिने केला होता. पण तो विचार पूर्ण करण्याची हिम्मत मात्र तिची झाली नव्हती. जीव देण्याची हिम्मत झाली नाही म्हणून स्वत:वरच कितीतरी वेळा चिडली होती ती ! तिला कुठे ठाऊक होतं? हिम्मत मरायला नाहीलागत. हिम्मत लागते ती जगायला त्याच्यामाघारी !
         
विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, June 01, 2016

गाणं विसरणारं

           आज पळताना गाणी ऐकत होते, नेहमीप्रमाणेच. गाण्याच्या स्पीडप्रमाणे माझाही वेग बदलत असतो. आणि मधेच एखादं असं गाणं लागतं की ते आवडीचं असतं. गाणं म्हणालं की त्या गाण्यातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. किंवा त्यातले हिरो-हिरोईन, त्यांच्या डान्स स्टेप आणि त्याचा मुव्ही हे सर्व पटकन डोक्यात येऊन जातं. बाकी सर्व गाण्यांसारखे काहींच्या बाबतीत त्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहत नाही. मग मी पळता पळता फोनकडे बघायला लागते, कुठल्या मूव्हीमधलं हे गाणं आहे हे पाहण्यासाठी. मी, "अरे या पिक्चर मधलं आहे होय?" असं अविश्वासाने बघते आणि पुन्हा पळायला लागते. आणि हे आजचं नाही. आणि बरेचदा तीच ती गाणी असतात जे कुठल्या सिनेमातलं आहे हे मला आठवत नाही. एकदा तर पळताना अशी ओळीने ३ गाणी एका पाठोपाठ आली. मग माझा वेग एकदम मंदावला. या गाण्यांमध्ये असलेली काही गाणी एकदाची लिहीतेच म्हणजे तरी लक्षात राहतील. 
१. इश्क सुफियाना- डर्टी पिक्चर 
२. बेपनाह प्यार है आजा- कृष्णा कॉटेज 
३. हे बघा आता हे तिसरं गाणं डोक्यात आहे पण बाहेर येत नाहीये. त्यात सोनाक्षी सिन्हा आणि सैफ अली खान आहेत. हां शेवटी गूगल आहेच. त्या दोघांचं हे एक गाणं- सामने है सवेरा- बुलेट राजा या मुव्ही मधलं.
४. फलक तक चल- टशन. हा सिनेमा कसा आहे ते सांगायला नकोच. पण गाणं इतकं छान आहे आणि विशेषत: त्यातले शब्द. खूपच सुरेख.

          एरवी गाणी आणि त्यांचे मुव्ही लक्षात ठेवणारी मी हेच का विसरत असेन असा विचार करत होते. पहिलं गाणं कदाचित त्या मुव्ही च्या बाकी गाण्यांपेक्षा वेगळं असल्यामुळे असेल. आता बाकी सर्व गाण्यात काय कॉमन आहे तो विचार करतेय. एक तर हे मूव्ही मी स्वत: ते पाहिले नाहीयेत. त्यामुळे असेल किंवा 'अशा मुव्ही मध्ये इतके छान गाणे आहे?' असे वाटल्यामुळे असेल.  बऱ्याच सुमार सिनेमांमध्ये खूप काही सुरेख गाणी असतात. म्हणजे अगदी चिखलात कमळ असावं किंवा कोळशाच्या खाणीत हिरा तशी. मग ते हिरे कानावर पडले की ऐकावेसे वाटत राहतात. पण कितीही लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तरी आजूबाजूचे कोळसे, चिखल हे काही लक्षात रहात नाही. :)  मग प्रत्येकवेळी एक आग्रह करतो, त्याचं मूळ शोधण्याचा. 
             कितीही प्रयत्न केले तरी ते मूव्ही आठवणीत  रहात नाही. कदाचित आपला मेंदूच आपल्याला सिग्नल देत असतो फक्त हवी तीच माहिती स्टोअर करण्याचा  आणि नको ते सर्व विसरण्याचा. असे काही असेल का? पण केवळ मिव्ही चांगला नव्हता म्हणून गाण्यांना योग्य ते क्रेडीट मिळाले नाही तर नक्कीच त्यांच्यावर अन्याय होईल। गाणारा, संगीतकार या सर्वांचे कष्ट आणि कला तर त्यात आहेच ना. आठवणीतली गाणी काय सर्वांचीच असतात. काही हसवणारी असतात, काही रडवणारी. पण ही अशी न आठवणारी गाणीही असतातच. तर या अशा सर्व गाण्यांसाठी आणि त्यांच्या विसरलेल्या मुव्हीसाठी आजची पोस्ट. :) तुमचीही असतीलच अशी काही गाणी तर जरूर सांगा. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/