Wednesday, May 31, 2017

'न लिहिलेली पत्रे' -प्रेमपरीक्षा

       गेल्या काही दिवसांपासून एक उपक्रम चालू आहे. तसा थोडा उशीरच झाला इथे सांगायला. पण या पेजवर येणाऱ्या अनेक वाचकांना कदाचित हेही आवडेल म्हणून इथे लिंक देत आहे. तर ही आहे 'न लिहिलेली पत्रे' या पेजवरील माझी नवीन पत्रमालिका. नाव आहे 'प्रेमपरीक्षा'. कुणाला तरी हाताने पत्र लिहून अनेक वर्षं झाली. या पेजवरील अनेक पत्रमालिका वाचून मलाही तो मोह टाळता आला नाही. पत्रं हे असं माध्यम आहे जिथे मनातले अनेक विचार सहजपणे मांडता येतात. त्यातूनही एखादी कथा सांगण्याचा एक वेगळा प्रयत्न आहे.
       'न लिहिलेली पत्रे'  या पेजवर दर आठवड्याला तीन पत्रे प्रसिद्ध होतील, सोमवार-बुधवार-शुक्रवार सकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार. तर जरूर वाचा, प्रेमपरीक्षा. इथे या आठवड्यात प्रसिद्ध झालेली पहिली दोन पत्रांच्या लिंक देत आहे. या पुढील पत्रे तुम्ही तिथेच वाचाल आणि आवडतील अशी अपेक्षा आहे. तुमच्या प्रतिक्रिया, कमेंट जरूर सांगा. :) बाकी माझ्या या पेजवरील पोस्ट्स नियमित चालू राहतीलच. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे आणि प्रोत्साहनामुळेच मी नियमित लिहू शकत आहे. आणि निरनिराळे प्रयोगही करून पाहू शकत आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार.


विद्या भुतकर. 

Monday, May 29, 2017

एक सकाळ

रोज सकाळी सर्वांना घरातून बाहेर पडायची घाई असते. शाळा, ऑफिस, कॉल्स, डबे या सगळ्यांत रात्री आवरलेलं घर एकदम पसरून जातं. आम्ही संध्याकाळी परत येईपर्यंत तसंच पडून असतं.घरी आल्यावर सकाळी सोडून गेलेला पसारा दिसायला लागतो आणि सकाळपासून निवांत असलेलं घर पुन्हा जागं होतं. अनेकदा तर सकाळी खिडक्या बंद केलेल्या तशाच असतात आणि संध्याकाळी अंधार पडलेला असतो त्यामुळे त्या खिडक्याही उघडल्या जात नाहीत. रात्री मुलं झोपलं की पुन्हा स्वयंपाकघर, हॉल सर्व आवरून ठेवावं लागतं कारण नाहीतर ते दुसऱ्या दिवशी पर्यंत ते तसंच पडून राहतं. 
        या शनिवारी मात्र सकाळी उठले तेव्हा घरातलं अजून कुणीच उठलेलं नव्हतं. खाली आले, बाहेर मस्त ऊन पडलेलं होतं. सगळ्या खिडक्या उघडल्या. ऊन घरात आलं. रात्री आवरून ठेवलेल्या किचनच्या ओट्याकडे पाहिलं. रात्री सर्व साफ करून ठेवल्याबद्दल स्वतःचंच कौतुक करून घेतलं. कुठेही जायची घाई नव्हती. मग दरवाजा उघडून बाहेर आले. नुकतीच लावलेली काही रोपं पुन्हा एकदा न्याहाळली. दोन कुंड्यामध्ये लावलेली मेथी मस्त बाहेर आली आहे. बेसिल नावाच्या रोपाच्या बिया पेरल्या होत्या त्याची बारीक फुट जमिनीच्या वर दिसू लागली. छोट्या गुलाबाच्या, एका शेवंतीच्या रोपाच्या कळ्या मोजल्या. दोनेक आठवड्यापूर्वी लावलेली बरीचशी रोपं नीट आलेली पाहून छान वाटलं. 
         घरात परत आले.  अजूनही बाकी सर्व झोपलेलेच. पुन्हा एकदा सगळीकडे नजर टाकली. माझ्या आवडत्या खिडकीत बसले आणि मनात विचार आला, "हे आपलं घर आहे". आपण राहात असलेलं, सजवलेलं, नीट मांडलेलं. कित्येकदा त्याला किती गृहीत धरतो आपण. असंच पसरून, दिवसभर सोडून जातो. असं अधूनमधून त्याला निरखलं पाहिजे. खिडक्या उघडून ते उन्हानं भरून घेतलं पाहिजे. घर मनात भरून घेतलं पाहिजे. त्याचं कौतुक केलं पाहिजे. आपल्या आयुष्याचा इतका मोठा भाग आहे ते. त्यालाही थोडा वेळ दिला पाहिजे, असा एकांतात. त्या दिवशीची ती सकाळ मन एकदम प्रसन्न करून केली. 

विद्या भुतकर. 




Sunday, May 21, 2017

So no more excuses :)

      कधी कधी आम्ही जरा जास्तच वाहवत जातो आणि एखादया विकेंडला ढिगाने कामं किंवा कार्यक्रम येऊन पडतात. शेवटी स्वतःवरच चिडचिड होते की आपण नीट विचार का करत नाही. अर्थात आधीच ठरवल्यामुळे नाही तर म्हणता येत नाही कशालाच. यावेळीही असेच झाले. मुलांचा पोहण्याचा क्लास होता. त्यात शनिवार रविवार त्यांचा आईस स्केटिंग चा शो होता. गेले १० आठवडे ते सराव करत होते. एकदाचा शो संपला की त्यांचा सरावही संपला. त्यामुळे तो शो नीट व्हावा इतकाच विचार मनात होता. हे सगळं आधी ठरलेलं. मग स्वनिकच्या एका मित्राबरोबर प्ले-डेट ठरली. (प्ले डेट म्हणे, आम्हाला इथे 'डेट' वर जायला सुद्धा जमेना का? ) जाऊ दे. त्यात नुकतेच मुलांच्या शाळेत एक ५किमी रेस होणार आहे कळले होते. त्यातही भाग घेतलेला. एकूण काय तर नुसता सावळा गोंधळ. 
        तर या सगळ्यात दोन दिवस बरेच धावपळीचे गेले. खरंतर प्रत्येक गोष्ट ठीकच झाली. मुलांचे कार्यक्रम, त्याच्या मित्राची भेट, पण सगळ्यात अविस्मरणीय ठरली ती ५किमी ची रेस. सकाळी शाळेत गेलो, तिथे सुरुवातीला मुलांना थोडेसे पळायला दिले होते प्रोत्साहनपर मेडल्सही मिळाली त्यांनी. पुढे आमची रेस सूरु झाली. मैत्रिणीसोबत पळून अगदी निवांत पूर्णही झाली. बक्षिसे वाटताना महिलांमध्ये तिसरे पारितोषिक जिला मिळाले तिला पाहिले आणि माझी उत्सुकता जागी झाली. कारण ती स्त्री बरीच वयस्कर दिसत होती. 
       मी पुढे होऊन त्यांना 'अभिनंदन' बोलले आणि विचारले तुम्हाला किती वेळ लागला ती पूर्ण करायला.त्यांनी सांगितले २२ मिनिटं. बाप रे ! मला नेहमी वाटते की संदीप बराच जोरात पळतो. साधारण ५ मिनिटांत त्याचे एक किमी अंतर होते. पण त्या आजी २२ मिनिटांत पळाल्या. आणि त्यांचं वय? ६५ वर्षं !!! मला आजही ३८ मिनिट लागले. मी तर ४०-४५ वर्षांनंतर पळेन की नाही अशी मला शंका वाटते आणि त्या इतक्या जोरात ५ किमी अंतर पळून आल्या होत्या. त्यांनि सांगितले की त्यांच्याकडे ना फोन आहे ना अंतर किंवा वेळ किती झाला हे पाहण्यासाठी घड्याळ. म्हणजे केवळ वेळ झाली की पळत सुटायचे. त्यांना विचारून फोटो काढला तर तोही इमेल कर म्हणाल्या. कारण त्यांचे फेसबुक अकाऊंटही नाहीये. 
      त्यांच्याशी बोलून आपण जे काही करतोय ते किती सामान्य आहे असं वाटलं. आधी त्यांनी आपला स्पीड कसा वाढवायचा यावर टिप्स दिल्या. मग हेही बोलल्या की आता त्यांच्या वयोगटात जास्त लोक नसतात त्यामुळे बरेचदा अगदी हाताच्या बोटांवर मोजावे इतकेच लोक पळताना दिसतात. तेव्हा थोडंसं वाईटही वाटलं. दुपारी संदीपही जेव्हा पळताना कसा दम लागला सांगत होता तेंव्हा त्याला म्हटलं, जोपर्यंत आता तुझा टायमिंग २२ होत नाही तोवर सांगू नकोस. :) जोक्स अपार्ट, मला असं वाटतं की आपण कितीतरी कारणं सांगून साधा किंवा थोडासाही व्यायाम करायचं टाळतो. पण या अशा व्यक्ती पाहिल्या की वाटतं आयुष्यात अजून कितीतरी काय काय करायचं आहे. So no more excuses. :) 

विद्या भुतकर. 

Monday, May 15, 2017

पक्याचा मोबाईल (अंतिम भाग)

        पक्या गाडीत बसला आन त्याला जरा आराम झाला. सकाळपास्नं नुसता जीव काकुळतीला आलेला. खायला चार घास पन मिळालं नव्हतं. मंग्याच्या खांद्यावर डोकं ठिवून त्याला गाढ झोप लागली. तिकिटं मंग्यानंच काढली. गाडी थांबली तसं खिडकीतनं येनारं वारं थांबलं. पक्याची झोप हळूहळू उडाली. बाहेर पाह्यलं तर लोकांची गर्दी उडालेली. गाडीतनं लोकं घाईनं बाहेर पडत होती. पक्या उठला, टपावर चडून त्यानं एकेक करून पोती खाली उतरवली. इतक्या गर्दीत कुटं जायचं त्याला काय उमगत नव्हतं. एका कोपऱ्याला मंग्याला हुभा करून तो स्टँडच्या बाहेर चौकशी कराय गेला. रिक्षावाले, ट्रॅक्सवाले काय काय इचरत होतं त्याला काय पन सुधरत नव्हतं. कुटून तरी 'मार्केट यार्ड' 'मार्केट यार्ड' ऐकलं आन तिकडं धावला. 

"मार्केट यार्ड?" त्यानं रिक्षावाल्याला विचारलं. 
"हां, २५ रूपे होतील." 
पक्यानं मान हलवली. 

"मी आलोच" म्हनून मंग्याला घ्यायला धावला. दोघांनी परत एकेक करून पोती आनली. तंवर कुटं तो रिक्षावाला थांबतोय? तिसऱ्या पोत्यापातूर रिक्षावाला गेलेला. आता परत 'मार्केट यार्ड' मार्केट यार्ड' ची आरोळी यिस्तवर ते  दोघं थांबलं. रिक्षावाल्यानं 'हां' म्हनताच त्यांनी पोती रिक्षात टाकली. पन आजून तो थांबून राह्यला. दुपार टळून गेलेली. तरी अजून काम काय हुईना. अजून तीन गिऱ्हाईक आल्यावर रिक्षा सुरु झाली. लोकांना बसायसाठी पक्या, मंग्या पोत्यांवरच बसलं. एकेक करत सवारी उतरवत गाडी मार्केटयार्डाला आली. 
रिक्षावाला म्हनला, "१०० रूपे झाले."

आता इतकं गणीत तर पक्याला येत हुतं. 
"आवं असं काय करताय? २५ म्हनला ना?", पक्यानं विचारलं. 
"मानसी २५.", रिक्षावाला बोलला. 
"तरी ५० झालं."
"त्या पोत्यांचं कोण देणार?"
"पोत्याला काय जीव हाय का?", पक्या लै गरमला हुता. 
"होय पण त्यांना उचलेपर्यंत तुमचा जीव गेला असता ना? सामानाचे ५० रुपये झाले."
पक्या तावातावानं काय बोलनार तंवर मंग्यानं १०० काढून दिलं. रिक्षावाला खुन्नस दिऊन निगाला. 
"तू कशाला दिलंस पैसं? मी चांगला बरोबर केला असता त्याला.", पक्या. 
"जीव हाय का अंगात? आदी खाऊ कायतरी? चल.", म्हनून मंग्या त्याला घेऊन चालाय लागला. 
आता परत त्या खायच्या गाडीपातर पोती न्यायची हिम्मत त्यांच्यांत नव्हती. मग पळत पळत मंग्या गेला दोन वडापाव घेऊन परत आला. 
"च्या मारी, लै महाग हाय रं हिकडं सगळं." मंग्या वैतागला हुता. 
"का? काय झालं?"
"२५ रूपे म्हनं वडापाव. काय पन उगा लुटत्यात लोकास्नी."
"आपला गावंच बरा बाबा. चांगली तिखट चटनी वरून देतो आपला बजरंग वाला." , पक्या बोलला. 
वडा पाव खाऊन जरा बरं वाटलं त्याला.आता नव्या जोमानं त्यांनी काम सुरु केलं. मार्केटयार्डात आपली ज्वारी विकायची, फोन घ्यायचा, पहिल्या गाडीनं घरी जायचं. बास! यार्डात भली गर्दी हुती. रस्त्याव सगळीकडं घान पसरलेली. कुटं चिखल, सडलेल्या भाज्या, कुटं ढीग लावलेली पोती, तीच जड पोती भराभर खांद्याव घेऊन जाणारी लोकं. कुनी जोरात वरडुन दर सांगत हुता कुनी बोली लावत हुता. कदी असल्या जागी पक्यानं पाय ठिवला नवता. 

    पहिलं काम होतं पोती न्यायची कुटं? त्यानं एका मानसाला विचारलं. त्यानं त्याला 'एजंट मिळतो का बघ' सांगितलं. एका ठिकानी ढिगानं पोती यिऊन पडत होती. गाड्यांच्या मधनं जात त्यानं एक बारकं हॉपिस गाठलं. दोन लोकं फोनवर बोलत हुती, बाकी सगळी नुसती पाठीव एकेक पोतं घेऊन ढीग लावत हुती. त्यांच्या खांद्यावरचं वज्ज पाहून पक्याला आपल्याला काय पन झेपत नाय याची लाज वाटली. तरी एकाला धरला त्यानं आणि इचारलं,"हे आपलं ज्वारी विकायची हुती." 
"ते शेटला विचरा" सांगून तो मानुस परत पोती लादायला लागला. 
फोनवरच्या शेटनं हातानंच इचारलं,"काय?"
"ते अडीच पोती ज्वारी हाय? काय दरानं घेनार?"
"२०" शेट बोलला. 
"वीस?? अवो हिथं तर जास्त दर पायजे. गावातच २५ नं हुती."
शेटनं फोन ठिवला आन म्हनला, "मग गावालाच जा. इतक्या दुपारी माल खपत नाय. सकाळी चारला येतात गिर्हाईक माझ्याकडं. आता रात्रभर माझ्याकडं ठेवायला लागल तुझी पोती मला. पाऊस, उंदरं लागली तर कोण बघणार?" शेट गुश्श्यानं बोलला.
त्याला दोन पोत्यांची काय बी पडली नव्हती. पक्याचा लै हिरमोड झाला. त्यानं मंग्याला गाठला. तिकडं मंग्यानं गप्पा मारून मायती गोळा केली व्हती. 
"हे बघ पक्या तो शेट जावं दे, आपन हिथंच सुट्टी विकू ज्वारी. चांगला चाळीस चा दर मिळल." 
पक्याचा शेटवर संताप होत हुता. उगा हाव केली आन हिकडं आलो असं त्याला झालं हुतं. 
मंग्या म्हनला म्हनून त्यानं जागा शोधाय सुरवात केली. पन सकाळपास्नं आपली जागा धरून बसलेलं लोक कशाला त्याला फुकट जागा देतील. शेवटी एका बाईला त्यानं विचारलं,"मावशे हिथं ठिऊ का माजी ज्वारी? लगी विकून जानार मी.शंभर रूपे देतो तुला. " 
ती 'व्हय' म्हनली. 

     त्यानं आपली पोती तिच्याजवळ ठिवली. त्याच्याकडं ना तराजू होता ना वजनं. कुनी विचारलं तर करायला हिशोब बी येत नव्हता. त्यात आपली वस्तू विकायसाठी वर्डायला तर लईच लाज वाटत हुती. तरी हिम्मत करून मावशीलाच त्यानं उधार देनार का तराजू इचारलं. ती 'व्हय' म्हनली. मावशीच्या काकड्या, कोथिंबीर सुकत चाल्लेली. तिनं त्यातलीच एक कापून खाल्ली अन त्यान्ला एक दिली. काकडी खाऊन जीव जरा थंडावला. पन आजून गिऱ्हाईक काय त्याला मिळालं नव्हतं. त्याच्याकडं आयतं कोन येनार हुतं?
"कधी पास्न बसलीयस?" पक्यानं मावशीला इचारलं. 
"पाहट पाचपास्न निगालोय घरंनं. चांगली ५० किलो काकडी इकली आसंल. "
"मग चांगलं हाय की. "
"व्हय आजून १० किलो गेली की सुटलो. नायतर परत टोपल्या गाडीत टाकून न्यायला लागतील.आन उद्या खराब बी हुईल. " मावशी. 

पक्याला पोती आठवली. 
"व्हय बस बस.", पक्या बोलला. 
"तुमी का इतक्या लेट आला पन?" मावशीनं इचारलं. 
"हां जरा उशीर झाला." पक्याला काय सुधरत नव्हतं बोलाय. कधी आठच्या आत उठून तोंड बी धुतलं नव्हतं त्यानं. माय बिचारी वाफ्यातल्या भाज्या काढून विकून परत लोकांच्या शेताव कामाला जायची. त्याला मायची लै आठवन जाली. 
"मी काय म्हनतो तुमी एक काम करा, गावात बारक्या दुकानांत विका. ह्ये एजंट लोक लै वाईट. तुमी दोगंच एखाद्या दुकानात विकून टाका. त्ये घेत्याल एकदम ज्वारी. " मावशीनं भारी आयडिया दिली. 
मंग्याला जरा मस्का लावाय लागला पर त्याचा जीवाचा दोस्त त्यो. लगीच मनला. 
पक्यानं चार लोकास्नी इचारून पत्ता घेतला. जरा गावाच्या बाहेरच्या आडरस्त्याचा पत्ता हुता. पन नवी वस्ती हुती म्हनं तिकडं. गावाच्या दुप्पट दर मिळाला असता. पक्यानं परत रिक्षां मिळवली. यावेळी रिक्षाचा, पोत्यांचा दर आदीच ठरवून घेतला. एव्हडं मोठठं शहर त्ये, नुसत्या एका कोपऱ्याव उतरून चालतंय व्हय? पक्याला काय पन ठावू नव्हतं. रिक्षावाल्यानं त्यान्ला एका बिल्डिंगसमोर उतरवला. त्यात एका वळीनं बारीक बारीक किराणाची दुकानं तिथं हुती. पक्याला आता जरा समज आली हुती. त्यानं समद्या दुकानांत जावून दर इचारला. मंग्या आपला टपरीवर च्या घित बसला. 
मागं फुडं करत शेवटी एका दुकानदारानं त्याला '३८ नं घेतो नायतर राहू दे ' म्हनून सांगितलं. 

त्यानं इचारलं,"ज्वारी बघू तरी दे?" 
आतापर्यंत पक्यानं ज्वारीच्या दान्याला हात बी लावला नव्हता. नुसताच आपला उड्या मारत व्हता. 

"आमच्या शेतातली ज्वारी हाय, एक नंबर !", पक्या बोलला. 
दाभण घालून दुकानदारानं पोत्याची सुतळी उसवली. मूठभर ज्वारी हातात घेतली आन एकदम भर्रकन फेकून दिली. ज्वारीत ही कीड लागलेली. पक्या वैतागला. 

"आसं कसं?" इचरत त्यानं दुसरं पोतं खोलाय लावलं. मग तिसरं. तिन्ही पोत्यातल्या ज्वारीत कीड लागलेली. 

"बरं मी पाह्यलं, नाहीतर लुटलाच असतं तू मला." दुकानदार चिडला. 
पक्याला काय पन सुधरत नव्हतं. त्यानं कदी शेतात ना कधी घरी, ज्वारीला हात लावलाच नव्हता. वर्ष झालं मायनी ती पोती जपली व्हती एव्हडं त्याला ठावं होतं. 

"घोड्याला तरी द्यायच्या लायकीची आहे का तुझी ज्वारी?" म्हणून दुकानदारानं पक्याला भाईर हाकलला. 
     
       पक्या जाम वैतागला. मंग्या आपला बेफिकीर बसला हुता. पक्याला एकदम राग आला मायचा आन मंग्याचा पन. समदं हुईस्तवर अंधार पडलेला. इतकं करून हातात काय पन घावलं नव्हतं. त्यानं परत रिक्षा धरली आन स्टॅंडचा रस्ता पकडला. आता परत पोती रिक्षातनं काडून स्टँडला उतरवली. धावत जाऊन बसची चौकशी केली. ताटकळत बसची वाट बघून, बस आल्याव पोती टपावर टाकली. गाडीत बसल्यावर त्याच्या जीवाला जरा आराम मिळाला. 'फोन मरू दे पन ज्वारीची पोती नको' असं झालेलं त्याला. गाडीत उभ्या उभ्याच त्याला झोप लागली. भूक तर पार मेलेली. कदीतरी गाव आल्याव मंग्यानं त्याला उठवला. किती काळ आपन झोपलो हुतो असं पक्याला वाटलं. दिवसभर मरमर करून हातात कायबी नव्हतं. गाडीतनं पोती उतरून तिथंच टाकून द्यावी असं त्याला वाटलं. पन त्यात त्याच्या मायेची म्हेनत त्याला दिसत हुती. त्यानं अमल्याला बोलवून पोती घरी घेऊन गेला. अमल्यानं फोनचं इचारलं तर त्याला तोंड उगडायची बी विच्छा झाली नव्हती. पोती दारात टाकून अमल्या परत गेला. रात्र उलटून गेलेली. 

      पोराला दारात बघून मायच्या जीवात जीव आला. तिनं त्याला "हात धु, ताट करतो" सांगितलं. 
ती खाली बसून ताटं घेतंच हुती आन पक्या तिच्या मांडीव आडवा झाला. तिनं त्याला मायेनं कुरवाळला. 
"लै कीड हुती का?" तिनं इचारलं तसा पक्या उठून बसला. 
"म्हंजी तुला ठावं हुतं."
"मग काय? कदी रेशनचा नाय परवडला तर त्योच खायचा हुता. मागच्या महिन्यांतच पायलं हुतं. पन सुकवून पावडर लावायला जीव नव्हता अंगात. म्हनलं करू जरा सावकाश. तुला सांगून पटलं नसतं.म्हनलं खरंच चार पैसं मिळालं तर चांगलंच हाय. "
"माय तू कसं कर्तीस गं समद काम?", पक्यानं इचारलं. 
तिनं पदराला डोळं पुसलं. म्हनली,"तू कदीतरी सुधारशील या भरोशावर." 
"तुला शप्पत सांगतो मी करंन तुला मदत. "त्यानं गळ्याव बोटं ठिवून सांगितलं.  
ती हसली गालातच. तिनं त्याला मायेनं गोंजारला आन कडाकडा समदी बोटं मोडली. ज्वारीला कीड असली तरी तिच्या घरातली कीड गेली हुती. 

विद्या भुतकर. 

Thursday, May 11, 2017

पक्याचा मोबाईल- भाग १

       दोन हातात पाच पाच किलोच्या कापडी पिशव्या धरून माय खोलीवर आली. तिच्या हाताच्या गट्ट्यानाही गट्टे पडले असतील. मालकीणबाईंच्या घरातून रेशनिंगचे तांदूळ, ज्वारी, डालडा घेऊन यायचं म्हणजे लै वैताग यायचा तिला. एकतर दरासाठी घासाघीस. मग वजनात काटछाट आणि हे सगळं कमी का काय म्हणून त्यांच्या बागेतलं गवतबी काढायला लागायचं. घरी येऊन भाकरी करंस्तोवर जीव घाईला यायचा. पोराला पन आवडायचं नाय तिनं त्यांच्याकडनं आणलेलं. "घरची ज्वारी असताना त्याला काय सोनं लागलंय का?" तो तिला विचारायचा. घरची ज्वारी न्हाई म्हटलं तर चार पैसं जास्त द्यायची. राशनची कदी खडा कुडा असला तर काढून साफ करून घ्यायची पन दर तरी कमी असायचा. 'तेव्हढंच चार पैसं जमत्यात, तुला नाय कळायचं', तिने अनेकदा पोराला समजावलं होतं.
        खोलीत आली तर अंधारबुडुख सगळा. पक्या अजुनपन आला नव्हता. 'मुर्दा बसवला त्याचा, नुस्ता गावभर बोंबलत फिराय पायजे' मनातल्या मनात त्याला एक शिवी दिवून तिनं दिवाबत्ती केली. देवाजवळ हात जोडलं आन कामाला लागली. स्टो पेटवला तर नीट लागंना, शेवटी पिन मारून जरा घाण काढली आन मग कसा विस्तू पेटला. डब्याच्या तळाशी असलेलं ज्वारीचं पीठ परातीत घिऊन मळून त्राग्यानं दोन चार भाकरी थापल्या. 'आला की लगी जेवाय मागंल आन जनावर गत गपागप खयील' तिच्या डोक्यातला राग वाढतच होता. आजून जरा उशीर झाला तर त्याला भाकरीच्या जागी तिचं पायतानच खायला लागनार हुतं. त्याच्या नशिबानं तो टपकला. धाडकन दार उघडून डायरेक ताट घिऊन जेवाय बसला. समोरच्या पातिल्यातली आमटी वाटीत घेतली आन भाकरी मोडून सुरुवात केली. माय त्याच्याकडं बघतच बसली. त्याच्या काटकुळ्या बारीक अंगावर मांस कधी चढायचं? केसं तर कोंबडीच्या खुराड्यागत झाली होती. आला तसा दहा मिन्टात तीन भाकरीचा त्यानं फडशा पाडला.  

"जरा दमानं खा की. कुत्रं मागं लागल्यागत का खायल्यास?", त्याची भूकभागल्यावर तिनं रागानं विचारलं. 

"मला रातच्या पिच्छरला जायचंय पोरं वाट बघायलीत." त्याने ताट तसंच टाकलं. मोरीत हातावर उगा पानी घेतल्यासारखं केलं आन पायतान घालून निघायला लागला. आता मात्र मायेचा पारा चढलाच. भाकऱ्या सोडून तशीच उठली आन त्याला शर्टाला धरून तसाच आत खेचला. माय इतक्या रागात आल्यावर आपलं काय खरं नाय हे त्याला बी ठाव होतं. 

"अगं असं काय करायलीस? ९ चा शो हाय. स्टार्टींन बुडल माजी.", पक्या बोलला तशी खाडकन त्याच्या गालावर एक बसली. 

"मी हितं जीव घायकुतीला इस्तवर काम कर्तो आन तू पिक्चर बघ मेल्या. कितींदा म्हनलं कामावर ये, नायतर शेतावर बघ, तुला काय पन करायला नकु. आन वर पिच्छर्ला पैसं कोन देतंय तुज्या?"

"अमल्या देतुया तुला नाय मागनार" तो वैतागून बोलला. 
त्याच्या शर्टावरचा हात अजून तसाच होता तितक्यात बाहेरनं शिट्टी ऐकू आली. तसं त्याला राहवना. 

"आजचा दिवस जातो. परत काय म्हनशील ते कर्तो." त्यानं विनवणी केली. पन आज माय लैच चिडली हुती. 

"तुला शिकायला पाठवला तर नुसतं दिवसभर हुंदडत असतुस. त्या पुस्तकाच्या पैशापारी लोकांची कामं करायला लागत्यात मला पन तुला त्याचं काय बी पडलं नाय." तिच्या शब्दाचा मार चालूच होता. तिकडं अजून एक शिट्टी आली आन त्यानं मान सोडवून घेतली आणि धावत सुटला. रागानं माय थरथरली.

"तू घरी कसा येतुस बगतो", जोरात वराडली. 

तिला रागानं उभं राहवना मग मट्कन बसली बराच येळ डोक्याला हात धरून. समोर भाकरी आमटी पडलेली पन भूक बी गायब झाली. तसंच तांब्याभर पानी पिऊन ती लवंडली. रात्री कधीतरी पक्या हळूच दार उघडून आत आला. तिला कांबरून घातलं आन तिच्याशेजारी झोपून गेला. 

सकाळी मायला जागा आली तर पक्या उठून चार घागरी पाणी आणून बादल्या भरून ठेवत हुता. त्यानं स्टो पेटवून तिच्यासाठी पानी गरम केलं, अंघोळबी झालेली. तिला काय कळंना हे काय चाललंय. 

ती उठून बसलेली दिसली तसा पक्या तिच्याशेजारी बसला म्हनला,"माये चुकलं माझां काळ रातच्याला. उगा तुला तरास दिला परत असं नाय करनार, तुजी शप्पत.". 
तीबी सकाळी कशाला उगा चिडायचं म्हनून गप बसली. 
"बर जाऊ दे" म्हनाली. 
तिनं चूळ भरून चा ठेवला. त्यानं बशीतनं चहा सुरुक्कन वडला. तिच्याकडं बघत हळूच म्हनला,"माय मला एक मोबाइल पायजे." 
"काय?" तिनं तसा मोबाईल पायला हुता पन हे काय आपल्यासारक्याचं काम नाय हे तिला पुरतं ठावं होतं. 
"ही असली थेरं कराय पैका कुटून आननार?" तिनं विचारलं. 
बोलू का नको करत त्यानं कोपऱ्यातल्या ज्वारीकडं बोट दाखवलं. तिनं डोक्यावर हात मारून घेतला. 
"काय करावं रं देवा तुजं? माज्याच नशिबाला असलं पोर का घातलास?", तिनं देवाला दोश लावला. 
"समद्या पोरांकडं हाय मोबाइल. मी तरी किती कळ काडू?" त्याचा चेहरा बोराएवढा झाला. 
"आरं कधी कामाला लागलं म्हनून ठेवल्या ती पोती. उद्या दुसरं काय हाय आपल्याकडं? रोजचा भाजीपाला विकून दिवस कसाबसा काढतूय. तुजा तर कशाला हात नाय. त्या एवढ्या तुकड्यात काय काय करनार मी एकटी?"
"मी कर्तू मदत तुला. बास मला फकस्त मोबाईल घेऊन दे."
तो ऐकना मग ती म्हनाली,"मलाच वीक आता."
"मी म्हनलं ना मी करतो मदत तुला.", त्यानं विनवलं. 
"एक काम कर तूच जा मार्केटयार्डात पोती घिऊन, काय मिळालं ते घे त्याचं काय करायचं ते कर. परत माज्याकडं यीऊ नगंस." ती दमली व्हती. 
"मी करतो समदं तू चिंता नकु करुस",  पक्या. 
"जा निघ घरातनं", ती वराडली. 

पक्या एकदम उडी मारून उठला. सायकलवर टांग मारून मित्राकडं गेला. माय कामाव निघताना तिला पक्या आन अमल्या पोती त्याच्या गाडीवर बाजूला लावताना दिसलं. 
"काय करू रं या पोराचं?" तिनं परत पांडुरंगाला विचारलं. 
पक्यानं ती पोती कशीतरी गाडीवरनं मार्केट यार्डात नेली. तिथं ही गर्दी उसळलेली. लोकं नुसती आरडत-वरडत हुती. त्यानं एकाला विचारलं,"ज्वारी हाय?"
"मग?"
"कुठं विकायची?"
"किती टन हाय?", त्यानं विचारलं. 
"नाय ठावं." 
"मग आदी वजन करून आना." 
"वजन कुठं करायचं?"
"आरं काय डोसकं फिरवायलायस सकाळ सकाळी. जा बरं हितनं." 

मग पक्या मार्केटयार्डभर फिरला. एकानं सांगितलं म्हनून गेला तर भली मोठी रांग लागलेली. दोनच वजनकाटे आनी इतकी मानसं. तरी तसाच भर उन्हात उभा राह्यला पक्या. अमल्या तर वैतागला व्हता. आजून किती येळ लागनार रं" विचारून पक्याला जीव नकुसा करून टाकला त्यानं. कसाबसा नंबर लागला त्याचा. अडीच एक पोती भरली सगळी ज्वारी. त्याचा चेहरा पार सुकून गेला हुता.

"तिकडं रेट लावलेत बघा जा", म्हनून मागच्या माणसानं त्याला सांगितलं.  

धावत धावत दर पायला पन हिशोब कुटला येतोय त्याला? पयल्या वर्षी मायकडून ते कॅल्सी-पाल्सी ला पैशे घेतले आन उडवले पन. त्यात इतका मोटा हिशोब त्यानं जल्मात केला नव्हता. २५० किलो ज्वारी २५ च्या दरानं किती पैशे मिळतील असं लैच डोकं खाजवलं. अमल्यानं तर आधीच माघार घेतली. परत शोधत त्यानं ते गणित करायचं मशीन आनलं. इतक्या वर्षात आज त्याला त्याचा वापर काय असतो ते कळलं होतं.  

      "सा-साडेसा हजार येतील म्हनत्यात.", पक्यानं अमल्याला सांगितलं. अमल्याला काय पन पडली नव्हती. पन इतक्या पैशात साधाच फोन येनार त्ये त्याला पक्कं मायती हुतं. तो बोलला तसा पक्याचा चेहरा आजून पडला. शेजारीच उभ्या असलेल्या एका शेतकऱ्यानं त्यांना सांगितलं,"शेरात जावा दर जास्ती यील. दीडपट तरी मिळलं. मला नाय जमत इतक्या लांब जायला. तुमी पोरं हाय जाऊन या की." 
पक्याला ते लगेच पटलं. आता ही बोचकी न्यायची कशी? दोघांनी परत तीन फेऱ्या मारून स्टँडवर पोती नेली. अमल्याला काय पुढं जमत नव्हतं मग त्यानं मंग्याला फोन केला. बस आली तशी मंग्या आन पक्यानं एकेक करून पोती टपावर चढवली आन गाडी निघाली. अमल्या तिथंच थांबला आन पक्या नव्या मित्राला घिऊन पुढं निगाला हुता. 

क्रमश: 
विद्या भुतकर. 

Wednesday, May 10, 2017

मिळून सारे जण


एक्सरसाईज पोस्ट अलर्ट ! :) गेल्या काही दिवसांपासून थंडी कमी झाली आणि आमच्या गावात वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या तसे रस्त्यावर पळणारे, सायकलस्वार, वॉकर ते अनेक लोक दिसू लागले. त्यात आमचीही भर होतीच. गावातूनच एक मोठा सायकलसाठी रस्ता आहे. तिथे मोठ्या गाडयांना जाण्याची परवानगी नसल्याने व्यायामासाठी तो चांगला रस्ता आहे. शिवाय आजूबाजूने दाट झाडी त्यामुळे उन्हाळ्यात तर तिथे अजूनच थंड वाटते. आम्हीही मुलांना शनिवारी, रविवारी सायकली घेऊन तिकडे जातो. किंवा कधी आमच्या रनिंगला ही तिथेच असतो. 
      गेल्या काही दिवसांत अनेक वेळा वेगवेगळ्या वेळी निरनिराळे लोक मला तिथे दिसले. त्यात मग दोन समवयस्क मैत्रिणी, कधी एखादे आजी आजोबा नातवाला चालायला किना सायकल चालवायला घेऊन आलेले दिसले. एकदा एक वडील पळत होते आणि छोटी मुलगी शेजारून सायकल चालवत होती. अनेकवेळा अगदी छोट्या बाळांना स्ट्रोलर मध्ये ठेवून तो स्ट्रोलरच पळवत नेणाऱ्या आया पाहिल्या. माझे आवडते म्हणजे काही आजी आजोबा दोघेच जाताना पाहणे. यात फार क्वचितच दोघे सोबत दिसतात. एक जण नेहमी पुढे आणि दुसरा सावकाश मागून येणार. मग पुढे गेलेला थांबून मागच्यांची वाट पाहणार. एकदम ग्रुपने जाणारे सायकलस्वार तर खूपच पाहिले. 
       आता हे सर्व सांगायचा मुद्दा असा की सोबत कुणी असेल व्यायाम करायला तर खरंच फरक पडतो. मी रनिंग सुरु केले तेंव्हा संदीप घरी राहून मदत करायचा. पण दोघांचे सुरु झाले तेव्हा जास्त चांगले वाटू लागले. आम्ही सोबत पळत नाही, तर आलटून पालटून मुलांना सांभाळतो आणि दुसरा पळायला जातो. तर अशा वेळी आपला साथीदार मदतीला आहे ही भावना सुखकारक असतेच पण घरीही गप्पा मारताना तो अजून समान धागा असतो बोलायला. 'आज तुझे किती मैल झाले?', 'स्पीड किती होता?' किंवा 'पाणी जास्त पी' अशा अनेक गोष्टी बोलता येतात. काही त्रास होत असेल  तर सांगूही शकतो. त्यामुळे मला वाटतं की घरात एकाच व्यक्तीने व्यायाम करण्यापेक्षा सोबत करावा म्हणजे जास्त फायदा होतो. केवळ नवराच नाही तर आपल्या प्रिय मैत्रिणी असतात, ऑफिसमधले लोक असतात. एकमेकांशी तुलना करून, चढाओढ, खेळीमेळीची स्पर्धा यातून खूप काही मिळवता येऊ शकतं. आमच्या पुण्याच्या बिल्डिंगमध्ये ३-३ जणींचे ग्रुप होते. त्यांना नेहमी मी संध्याकाळी वेगाने चालताना पाहायचे. खूप छान वाटायचं. :) 
      दुसरा मुद्दा असा की फक्त मोठ्यांनीच हे करण्यापेक्षा मुलांनाही त्यात सहभागी करून घ्यायचं. अनेकदा मुलं खेळत असताना आणि आई-वडील गप्पा मारत आहे असे होते. त्यापेक्षा मुलांच्या सोबत आपणही पळायचे किंवा सायकल चालवायची. किंवा त्यांना पकडायला सांगायचे असे अनेक गोष्टी करू शकतो. मुलं मोठी असतील त्यांच्याशी तुलनाही करू शकतो. सायकल, पळणे, स्विमिंग अशा अनेक प्रकारात. योगासने हेही एक चांगलं माध्यम आहे मुलांना सोबत घेऊन व्यायाम करायला. 
     अनेक पालक मुलांना सर्व क्लासेस लावतात पण स्वतः मात्र व्यायाम करत नाहीत. हे अतिशय अयोग्य वाटते. अनेकवेळा शनिवार-रविवारी मुलांना घेऊन मुव्ही किंवा बाहेर जेवायला जातो. त्यापेक्षा खेळायला जावं. शनिवारी लवकर उठून बागेत फिरायला न्यावं. पुण्यात शनिवार-रविवारी हॉटेल्सना प्रचंड गर्दी असते. सकाळी व्यायामाला मात्र त्याच्या १ टक्काही नाही. मी या तक्रारी आधीही केल्या आहे किंवा हेच मुद्दे मांडले आहेत. पण सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वजण बाहेर पडलेले दिसतात. मुलांना निरनिराळे क्लासेस असतात. पण या सुट्ट्यांमध्ये त्यांच्यासोबत आई-वडिलांनीही व्यायामात भाग घ्यावा असे मला वाटते. एकदा सुरुवात झाली की हळूहळू याच गोष्टी नियमित केल्या जातात आणि त्यांची मुलांना चांगली सवय लागू शकते. असो. 
       तुम्हीही करून बघा नक्की हे प्रयोग आणि मला सांगा यांनी फरक पडतो की नाही. हे आम्ही चौघे सायकलस्वार. :) 


विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, May 09, 2017

तो एक क्षण

      गेलं जवळजवळ वर्षभर पोरांनी त्यांना शाळेसाठी घेतलेले शूज बरेच नीट वापरले. निदान नवे घ्यायची वेळ तरी आली नव्हती. (आता हे वाक्य लिहिताना जाणवतंय की ४ आणि ७ वर्षाच्या मुलांसाठी तेच एक मोठठं काम आहे आणि आई-वडील म्हणून कदाचित थोडं जास्त श्रेय त्यांना आम्ही दिलं पाहिजे. असो. ) अजून दोन महिन्यांनी शाळा सुरु होत असल्याने नव्या खरेदीची तयारी सुरु झाली होती. यात स्वनिक डे-केअर मधून शाळेत जाणार असल्याने त्याच्यासाठी अजून उत्साहाची गोष्ट.  

     तर झालं असं, दुकानात त्याच्यासाठी शूज बघताना त्याला 'स्पायडरमॅन' चे रंगीत लाईट लागणारे शूज दिसले. निदान मला तरी ते बटबटीत वाटले. आणि आता त्याच्या साईजमध्येही असेही लाईट असलेले शूज मिळणं अवघड होत होतं. म्हणून मी नाईलाजाने त्याला म्हटलं"बाबू तुला आता शाळेत घालायचे आहेत ना हे शूज मग कशाला लाईटचे बघतोस? तू आता बिग बॉय झाला ना?"

त्याने पटकन मान हलवली आणि माझ्या हातात असलेले थोडे मोठ्या मुलांसारखे वाटणारे शूज पायात घालून बघायला तो लगेच तयार झाला. तो ते घालून बघत असतानाच मला त्याच्या आकाराचे लाईटचे शूज दिसले आणि मी आनंदाने त्याला ते दाखवले. पण ते नाकारून लाईट नसलेले शूज त्याने घेतले होते. 

त्या एका क्षणात त्याचं मन पक्कं झालं होतं. आणि आई म्हणून मला मात्र अतिशय वाईट वाटलं होतं. 'तू बिग बॉय आहेस ना?' , 'तू मोठी झाली ना आता?' या अशा वाक्यांनी किती मोठी जबाबदारी आपण त्यांच्यावर देतो याचं वाईट वाटलं आणि त्या एका क्षणात मोठ्या झालेल्या आमच्या बाळाचंही. दुसऱ्या दिवशी  सकाळी उठल्या क्षणी तेच  शूज घालून तो घरभर नाचला तेंव्हा थोडं बरं वाटलं. पण तो एक क्षण येऊन गेला होता आणि आमचे 'लाईटचे शूज' कायमचे निघून गेले होते. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, May 08, 2017

तुझा माझा खेळ रंगला(अंतिम भाग)

     त्याच्या त्या अदबीने बोलण्यांत, धावपळ करण्यात तिला उगाचच एक लाचारी दिसत होती. तो सतत मान खाली घालूनच बोलत असल्याने त्याचा चेहरा तसा पाहिलाच नव्हता. पण त्याला ते असं झोपलेलं पाहून तिला पहिल्यांदाच त्याचा चेहरा कसा आहे ते दिसलं. त्याच्या चेहऱ्यावर ती लाचारी नव्हती, उलट एक तजेला होता. कष्टाच्या खुणा चेहऱ्यावर, हातांच्या कोपऱयांवर, सुकलेल्या ओठांवर, भेगा पडलेल्या पायांवर दिसत होत्या. ती त्याला तिथेच सोडून स्वयंपाकघरात गेली आणि एक पेला घेण्यासाठी फडताळाला हात लावला आणि शेजारचा पेलाही खाली आला. त्याच्या आवाजाने दचकून उठत धावत पळत तो तिच्यामागे आला आणि पलटणाऱ्या तिला धडकला. ती कावरीबावरी झाली आणि 'पाणी' इतकंच बोलून दूर उभी राहिली. त्याने घाईने तिला पाणी दिलं आणि 'उठवायचं की बाईसा' असं तिला म्हणाला. ती पाणी पिऊन तिथून आवरायला निघाली आणि तोही त्याच्या खोलीत गेला. 

       ती अनेक वर्षांनी आपल्या खोलीत गेली होती. तिथे तिच्या भल्या मोठ्या संदुकींतून तिने आपले लहानपणीचे कपडे चाळले. ते घालताना आईसोबत केलेल्या गप्पा तिला आठवल्या आणि अचानक काहीतरी आठवून ती शेजारच्या खोलीत गेली. तिथे अशाच अजून दोन संदुकी होत्या. तिने त्यातली लुगडी काढली. एकेका शालूवरील कशिदाकारी, नक्षी, एकेक रेशमी धागा पाहिला. त्यांना हात फिरवून, कधी गालांना लावून तर कधी त्यांचा सुगंध घेऊन त्या न्याहाळत बसली. त्यातीलच एक रेशमी शालू उचलून ती आंघोळ करायला गेली. ती तयार होऊन आली तेव्हा तो तयार होऊन दिवाणखान्यातील पसारा आवरत होता. मोठ्या आईसाहेबांची लुगडी नेसलेल्या तिला पाहून तो थोडासा बावरला पण तिच्या मोहक चेहऱ्याकडे पाहून हलकेसे हसलाही. 

ती दिवाणावर बसली आणि तिने त्याला विचारलं,"कंटाळा नाही येत तुला एकटं राहायचा इथे?"
तो थबकला आणि मालकीण बाईंना खरं सांगायचं की नाही याचा विचार करत क्षणभर थांबला. पुढे बोलला,"हां कधी कधी येतो कटाळा. पण काय करणार? आयुष्यभराचं कामच हाय माझ्यासाटी. "

"म्हणजे?", तिने विचारलं. 

"मोठा किस्सा हाय तो सांगीन कधीतरी " असं म्हणून तो तिथून निघून गेला. 

ती त्याचाच विचार करत बसली होती. आपल्या  कामासाठी तिने पुन्हा वह्या काढल्या, कागदपत्रं चाळायला सुरुवात केली. दोन दिवस सतत हाच कार्यक्रम चालला. 

एक दिवस असेच बागेत फिरताना तिला तो गवत खुरप्याने काढताना दिसला. फुलांना न्याहाळत आपलं काम करत होता. ती तिथे थांबली आणि म्हणाली,"मला ऐकायचा आहे तुमचा किस्सा. माझं कामच आहे ते. मला सगळा इतिहास लिहायचा आहे आमच्या घराण्याचा". 
तिने त्याचा हात धरून त्याला "सांग ना आत्ताच" असा हट्ट धरला. आयुष्यात ज्यांच्या चेहऱ्याकडे वर मानेने पाहिलं नाही त्या मालकांनी असा हात धरावा? त्याला एकदम घाबरल्यासारखं झालं. पण तिच्या हातातून आपला हात सोडवणं त्याला जमणार नव्हतं. तिने त्याला आपल्या शेजारी खुर्चीत बसवलं आणि विचारलं,"हां सांगा आता."
त्याचा नाईलाज झाला. 

"लई वर्षाआधीची गोष्ट हाय. म्हंजे २०० वर्षांपूर्वी आसल. माझ्या खापरपंज्याचं राज्य आणी तात्यासायबांच्या पंज्याचं राज्य शेजारी शेजारी हुती. आमचा खापरपंज्याचं वय झालं हुतं. एका लढाईत त्यांची हार झाली. आमच्या खापरपंज्याला पकडून तुमच्या पंज्यासमोर हजर केलं आन माझ्या पंज्याला पन. म्हाताऱ्याचं वय झालंच हुतं पन आपल्या पोराचा जीव लई प्यारा त्यास्नी. म्हाताऱ्याने आपला मृत्यूदंड सिवकारला पन पोराला माफी द्यायला सांगितली. तुमच्या पंज्यानं बी मोट्या मनानं माफ केला पन एका अटीवर. आमचं आख्खा खानदान या खानदानाचा गुलाम राहील. तवापासुन त्या घरान्याचं रूप पालटलं, ती इंग्रज बी गेलं पन माजी गुलामी काय संपली नाही. चार पिढ्या गेल्या. आमच्या घरातल्या पुरुषांनी लग्नं केली पन मला माज्या पोराला गुलाम नाय करायचं. मजा जनम जाईल तो पत्करला पन पोराचा नको. " 

त्याच्या डोळ्यातलं दुःखं तिला दिसत राहिलं. आपण हे सर्व त्याच मालकासमोर बोलत आहे तो विसरून गेला. तिने पुन्हा एकदा त्याचा हात धरला आणि आपण बोलून मोठी चूक केली असं त्याला वाटलं. 

ती निर्धाराने बोलली,"मी आज या घराण्याची वारस म्हणून तुझी या गुलामीतून मुक्तता करते. यापुढे तू माझी चाकरी नाही करायची."
तो गडबडला. "मग मी सोडून जाउ? असं कसं? मालकांना नाय चालायचं हे सगळं."
"तू त्यांची चिंता नको करुस. मी आजच त्यांना पत्र लिहिते याबद्दल. "
तिच्या आश्वासक स्वरात त्याला एक नवी उमेद दिसली. तरीही इतक्या वर्षाची गुलामी सोडून अचानक काय करणार हा प्रश्न त्याला होताच. 
तो म्हणाला,"एक काम करतो मालकांचं उत्तर येस्तोवर थांबतो."
ती 'चालेल' म्हणाली. तो उठून मेजावर ठेवलेला तिचा पेला उचलून नेऊ लागला आणि तिने त्याला थांबवलं. 
"मी समर्थ आहे माझी कामं करायला. आमच्या घराण्याच्या इतिहासातलं एक पान मिळालं आज मला. धन्यवाद."

तिच्या या बोलण्यावर त्याला काही उत्तर सुचेना. इतक्या वर्षाची गुलामी कशी काय सुटणार? खरंच असं होणार? यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. आजपर्यंत अनेक वर्षं या महालाची देखरेख करत एकटाच राहिलेला तो आयुष्याची उमेद हरवून बसला होता. ती पुन्हा नव्याने जागवण इतकं सोपं नव्हतं. 

संध्याकाळी स्वयंपाक करताना तिने त्याला विचारलं,"ब्रेड कुठे आहे?"

त्याने तर ते काय असतं हे कधीच पाहिलं नव्हतं. 

"डबल रोटी?" तिने त्यातल्या त्यात समजेल असा प्रश्न विचारला पण तेही त्याला माहित नव्हतं. मग त्याने केलेली भाकरी भाजी खाऊन तिने दिवस काढला. 
"मला उद्या बाजारात घेऊन चल, मी बघते मिळते का."
त्याने मान हलवली. 

        दुसऱ्या दिवशी मोठ्या बाईसाहेबांची अजून एक रेशमी शालू नेसून ती तयार होती, त्याच्यासोबत बाजारात जायला. आज स्वतःचं सर्व काम अगदी पाणी तापवायचंही तिनेच केलं होतं. पण त्यासाठी लागणारी लाकडं मात्र त्यालाच आणावी लागली होती. बंब पेटवण्यासाठी तिने केलेली धडपड पाहून त्याला तिचं कौतुक वाटलं आणि काळजीही. त्यानेही जरा साफ असलेला पायजमा, सदरा आणि टोपी घातली होती. तिच्या उत्साहाचं त्याला खूप कौतुक वाटत होतं. एव्हढ्या घरंदाज स्त्रीसोबत जाण्याची त्याची पहिलीच वेळ होती, मुख्य म्हणजे यावेळी तो नोकर म्हणून जात नव्हता. बाजारात तिने अनेक गोष्टी पाहिल्या, त्या काय काय आहेत याचं वर्णन केलं. रस्त्यात दिसणाऱ्या एका गजरेवालीकडून एक सुंदर गजरा घ्यायचा हट्टही तिने केला. पण उगाच बाईसाहेबांच्या भोवती गर्दी जमू नये म्हणून तो तिला घेऊन लवकरच घरी परतला. प्रत्येक ठिकाणी तिची काळजी घेताना पाहून तिला मनातून खूप आनंदही होत होता. 

      पुढचे काही दिवस ते दोघे एकमेकांना समजून घेत राहिले. त्याने तिच्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा सडा अंथरावा तर तिने रोज नवीन शालू नेसून त्याला छान नटून दाखवावं. गेल्या काही पिढ्यांमध्ये घडलेली अनेक राजकारणं, किस्से, गावातील गप्पा तो तिला रंगवून सांगत असे. तर लंडनमध्ये आपल्या राहणीमानाबद्दल, तिथल्या संस्कृतीबद्दल, खाण्यापिण्याबद्दल,  तिच्या शिक्षणाबद्दल ती त्याला सांगत होती. तिच्या मनातलं प्रेम आता जास्तच व्यक्त होऊ लागलं होतं. त्याने कितीही संयम ठेवला तरी तिच्या प्रेमाला त्याच्याकडूनही नकळत उत्तर दिलं जात होतं. आपण आपल्या मनाला उगाच असं वाहू देतोय याची त्याला भीती वाटत होती. तर दुसऱ्या कुणाशी लग्न करावं लागलं तर काय याची तिला. 

     एक दिवस सकाळी तिचा चेहरा खूप रडवेला झाला होता आणि तिच्या हातात एक कागद होता. तिच्या चेहऱ्याकडे पाहून तो घाबरला. त्याने तिला खुणेनेच विचारलं,"काय झालं?".
ती रडत सांगू लागली,"तात्यासाहेबांचं पत्र आलंय. मी तुझ्याबद्दल त्यांना लिहिलेल्या पत्राचं उत्तर दिलंय. मुलगी म्हणून इतकंही करण्याचा हक्क नाही मला? योग्य-अयोग्य काय ते कळतं आता मला. लंडनमध्ये किती पुढारलेला आहे समाज. हे असं मागासलेली वृत्ती किती काळ जपणार आपण?". 

तिच्या आवाजात कळवळा होता. तो तिला म्हणाला,"असू द्या. माझंच नशीब म्हणायचं. तुमी चिंता करू नका. मी राहीन आयुष्यभर हितच. "

त्यावर तिने त्याचा हात धरला आणि त्याच्या खांदयावर डोके ठेवून ओक्सबोकसी रडू लागली. 

"मी नाही तुला हे असं गुलामीचं आयुष्य देऊ शकत." ती बोलली. 

त्याचा हात तिच्या डोक्यावरून फिरत राहिला. दिवसभर ते दोघेही मनात तेच विचार घेऊन होते. शेवटी तिने निर्णय घेतला आणि त्याच्याकडे आली आणि निग्रहाने म्हणाली,"मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आयुष्य तुझ्यासोबत काढायचं आहे." 

तो तिच्या इतक्या तडकाफडकी निर्णयाने बावरला होता. तिचा हात पहिल्यांदाच त्याने स्वतःहून हातात घेतला 
आणि पुढे बोलणार इतक्यात दरवाज्याचा आवाज झाला. तिला त्याच्या मनात काय आहे जाणून घ्यायचं होतं. 'तू बोल पुढे' असं ओरडून सांगायचं होतं. पण...... 

...... तो आवाज त्या दोघांच्याही ओळखीचा होता. दोघेही काळजी सोडून थोडंसं हसले आणि उडत जाऊन दिवाणखान्यातल्या दोन फुलदाण्यांमध्ये बसले. दोघेही समोर होणारी गंमत पाहू लागले. 

 ....... दादासाहेब एका हातात एक डबा आणि दुसऱ्या हातात पाणी घेऊन आले होते. त्यांनी प्रत्येक खोलीच्या उंबऱ्यावर दहीभात ठेवला आणि पाणी शिंपडलं. त्यांनी तिच्या फोटोचा हार बदलला. तिथे समोर अगरबत्ती लावली. घरात वेगवेगळ्या ठिकाणी पेले, ताटं पसरली होती, ती त्यांनी आवरून ठेवली. तिच्या खोलीतील दोन्ही संदूक बंद करून ठेवल्या. आईसाहेबांच्या लुगड्यांच्या घड्या करून ती पुन्हा संदुकीत ठेवली. कितीतरी वेळ आवरलेल्या खोल्यांमधून फिरत राहिला. 

      आज चाळीस वर्षं झाली. त्या रात्री तात्यासाहेब स्वतः आले होते. त्यांच्या समोर त्यांनी दोघांना हातात हात धरून बसलेलं पाहिलं होतं. तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्यांनी दिवाणखान्यातल्या बंदुकीने दोघांनाही गोळ्या घातल्या. दोघेही बागेत पुरले गेले. त्याचं उत्तर ऐकण्यासाठी आसुसलेली ती आणि त्याच्या हातातून सुटणाऱ्या तिच्या हातांचा स्वर्श दोन्हीही तसेच अपूर्ण राहिले होते. गेली चाळीस वर्षं दोघेही नव्याने सुरु करून पुन्हा तोच खेळ खेळत आहेत. मोजून महिन्याभराचा खेळ तो. दादासाहेब आले की बंद पडायचा. त्यांच्या हताश चेहऱ्याकडे पाहून दोघांनाही हसू फुटत असे. ते निघून गेले की खेळ पुन्हा सुरु होई. गेटच्या बाहेर मात्र चाळीस वर्ष झाली एक पाटी तशीच अडकून होती,"प्रॉपर्टी विकणे आहे."

समाप्त. 


विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, May 07, 2017

तुझा माझा खेळ रंगला - भाग १ (कथा )

        ती त्या भल्या मोठ्या लोखंडी दारासमोर उभी राहिली आणि अभिमानाने समोरून पाहिलं. आत दूरपर्यंत जाणारा खडीचा रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूनी वाढलेली आंबा, गुलमोहर, वडाची मोठाली झाडे आपल्या सावलीने जणू ती वाट घरापर्यंत नेऊन पाहोचवत होती. रुंद खांद्यांनी उंच मान करून रुबाबात उभा असलेला त्यांचा खानदानी बंगला. बंगला कुठे? मोठा महाल होता तो, काळ्याकुट्ट मोठमोठाल्या दगडांनी त्याची एक एक भिंती अभेद्य करून ठेवलेली.भिंतीच्या आजूबाजूने एकदम लागून असलेल्या गुलाबांच्या रोपांनी जणू काटेरी कुंपण बनवलं होतं. त्यावर बहरलेली लाल, सफेद, गुलाबी फुलं तिने कितीतरी वेळ न्याहाळली. वर मान करून पाहिले तर उंच तटबंदी तिला दिसली. त्यातून आतलं काही नजरेस पडणं अशक्यच होतं. खाली दारात एक भलं मोठ्या अर्धवर्तुळात फरशी बसवलेली होती. तिथेच दोन लाकडी खुर्च्या ठेवलेल्या होत्या. त्यांच्या हातावरचं नक्षीकामही तिने जवळून पाहिलं. पुढे येत व्हरांड्याच्या लाकडी दरवाजावरील कोरीव काम न्याहाळलं. दरवाज्याच्या उजव्या बाजूला दोन दगडांत तिच्या आजोबांचं आणि वडिलांचं नाव कोरलेले तिने अभिमानाने वाचलं. आपल्या पूर्वजांच्या या मालकी हक्काच्या घराकडे आणि समोरच्या बगीच्याकडे पाहत तिने लोखंडी कडी वाजवली.
    
    दार उघडण्याची वाट पहात तिने पदर सरळ केला, हातातल्या रुमालाने चेहऱ्यावरचा घाम पुसला. डोळ्यावरचा काळ चष्मा पुन्हा एकदा पुसून हातातल्या पर्समध्ये ठेवला. उन्हाने तिचा मूळचा गुलाबी चेहरा अजूनच लाल झाला होता. पायातल्या चपला धुळीने खराब झाल्या म्हणून तिची चिडचिड झाली होती. कधी एकदा आत जाऊन आराम करतेय असं तिला झालं होतं. त्यात मघाशी बेल वाजवूनही अजून दार उघडलं नव्हतं. तिने वैतागून जोरात कडी वाजवली आणि तितक्यात दार उघडलं. समोर एक सहा फुटी तरुण उभा होता. त्याचा चेहरा उन्हाने चांगलाच रापलेला होता. धावत आल्याने अजूनही त्याचा श्वास जोरात चाललेला आणि जाडसर सफेद कपड्याच्या आतूनही त्याची कसलेली छाती जाणवत होती. त्याच्या रुंद खांद्यावर एक मळका कपडा दिसत होता. खाली मळका पायजमा होता.

त्याने अदबीने तिची माफी मागितली आणि विचारलं,"इतक्या उन्हाचं एकट्या आलासा बाईसा? टेशनात आलो असतो की न्यायला." तिने रागाने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला आणि सरळ दिवाणखान्यात चालत गेली. त्याने तिच्यामागून जात पुन्हा विचारले,"पाणी, सरबत काय आणू?"
यावर मात्र तिचा संताप अनावर झाला आणि ती म्हणाली,"कशाला? चांदणंच पडलंय ना बाहेर?".
तिच्या कुत्सित प्रश्नाने तो खजील झाला आणि "आलोच" म्हणत घाईत माजघरात गेला.

     ती एका खुर्चीत ढासळली. इतक्या उन्हाची, कष्टाची सवय नव्हती तिला. खुर्चीत पडल्या पडल्या तिने वर उंच छताकडे पाहिलं. छतावरही अतिशय सुंदर कलाकारी केली होती. दिवाणखान्यातल्या दगडी खांबांवर असलेली नक्षी तिने न्याहाळली. भल्या मोठ्या भिंतीवर लावलेल्या फोटोंमधून दिसणारे तिचे पूर्वज तिने पुन्हा एकदा पाहिले आणि लहान असताना त्यांची भीती वाटायची तशीच तिला आजही वाटली. तिने नजर जमिनीवर आणली. पायाखाली असलेल्या काळ्या फरशीच्या थंड स्पर्शाने तिचे पाय सुखावले. अधे मध्ये दिसणाऱ्या रंगीत फरशा पाहून तिला लंगडी खेळायची इच्छा झाली. तिने पटकन पदर खोचला आणि साध्या फरशा सोडून रंगीत फरशीवर उड्या मारायला सुरुवात केली. मधेच एका फरशीवर दुरून झेप घेताना तो तिथे आला आणि तिच्या धक्क्याने त्याच्या हातातली थाळी खाली पडली तर त्याच्या धक्क्याने ती स्वतःच कोलमडली.
"अवो अवो बाईसा जपून" म्हणत त्याने तिला उठण्यासाठी हात पुढे केला पण तो डावलून ती स्वतःच उभी राहिली.

        तो तिच्या अल्लडपणाला हसणं टाळून आपले पितळेचे पेले आणि थाळी उचलू लागला. ती हिरमुसली आणि पुन्हा खुर्चीत जाऊन बसली. तो पुन्हा माजघरात. दमली असल्याने बसल्या जागी तिची तशीच झोप लागून गेली. बऱ्याच वेळाने जाग आली तेंव्हा तिच्या अंगावर एक मऊ शाल पांघरलेली होती. ती शाल तशीच गुंडाळून ती बाहेर आली. उन्हं उतरतीला आली होती. ती बाहेर खुर्चीवर येऊन बसली. तो आतून धावत आला आणि म्हणाला,"कायतर खावा की बाईसा. तशाच झोपला दुपारपासनं. तुम्ही बसा मी घेऊन येतो खायला."
ती तो येईपर्यंत बागेत फिरु लागली. लाल गुलाबाच्या चार पाकळ्या तोडून तिने त्या बोटांनी चुरगळल्या आणि ओठांवर घासल्या, मग ओठ पुन्हा एकमेकांवर घासले आणि त्या पाकळ्यांचा वास घेऊन त्या फेकून दिल्या.
तो एका वाडग्यांत गरम गरम शिरा आणि एका पेल्यात पाणी घेऊन आला. खुर्ची समोरच एका मेजावर त्याने दोन्ही ठेवले. तिला भूक लागलीच होती. पण शिरा पाहून तिची अजूनच चिडचिड झाली.
"इथे चहा नाही का हो मिळत?", तिने कुत्सितपणे विचारले.
"च्या? त्ये कायबा?", त्याच्या अडाणीपणावर हसून ती खाली बसली आणि खाणार तर तिच्या लक्षात आले आणि म्हणाली,"चमचा? ते तरी माहीत आहे ना तुम्हाला?"
त्याने जीभ चावली आणि तो पुन्हा पळत माजघरात गेला. ती तोवर बागेत फेऱ्या मारू लागली. अनेक वर्षांनी ती पुन्हा या गावात, महालात आली होती. लहान असतानाच्या तिच्या त्या पळापळीच्या, गजऱ्यांच्या, बागेतल्या चिंचा-बोरांच्या अनेक आठवणी आणि सोबतच आईचीही. ती विचारात असतानाच तो परत आला होता. त्याने वाटीत चमचा ठेवला आणि 'बाईसा' म्हणून हलकेच हाक मारली. भुकेल्या पोटी तिने तो शिरा गपागप खाऊन टाकला. तो तिथेच उभा आहे हे तिला जाणवलंच नव्हतं. 
त्याने विचारलं,"आणखी आणू?". ती 'हो' म्हणाली.   

         त्याच्या परत पळत जाणाऱ्या आकृतीकडे पहात उभी राहिली. लंडनमध्ये या सगळ्या ऐशोआरामाची सवय बरीच कमी झाली होती. पण जन्मजात ज्या सवयी अंगवळणी पडतात त्या परत यायला वेळ लागत नाही. त्याने आणलेला शिरा खाऊन ती बागेत फिरू लागली. तिथल्या झाडांमध्ये, दगडी पुतळ्यांमध्ये तिचं बालपण गेलं होतं. आईसाहेब वारल्या आणि ती,तिचा भाऊ पोरके झाले. त्यांतच भारतात स्वातंत्र्य का काय त्याने तात्यासाहेब चिंतीत होते. इकडे इंग्रजही देश सोडून चालले होते. इतक्या सगळ्या काळजीत मुलांचे काय हा प्रश्न तात्यासाहेबांना पडला होता. अचानक आई वारलेली आणि त्यात आपल्या माणसातून उठून परदेशात गेलेल्या ताईसाहेबांना एकदम जग नकोसं झालं होतं. 

         ते वयच लवकर सर्व विसरून जाण्याचं होतं. त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. तिथली भाषा, सवयी, जेवण सर्व अंगवळणी पडलेलं. आता लग्नाचं वय झालं तसं त्या परत आल्या होत्या. इंग्रज निघून गेले, संस्थानं खालसा झाली, राजेशाही संपली तरी सवयी, पैसा, राजेपण सर्व तसंच होतं. तिकडे सर्वजण त्यांच्या लग्नासाठी स्थळ बघत असताना या मात्र आपल्या जुन्या महालात येऊन राहिल्या होत्या. आपल्या पुर्वज्यांचा इतिहास स्वहस्ते लिहायला. आपण 'शिकलेल्या शिक्षणाचा काहीतरी फायदा झालाच पाहिजे' असा त्यांचा हट्ट पडला आणि तात्यासाहेब नाईलाज झाले. गेल्या काही वर्षांपासून केवळ सांभाळणारा माणूस ठेवलेला. तिथे जाऊन कशी राहणार ही चिंता त्यांना होती पण तिला नाही. तिथे गेल्यावर तिला आपल्या घरी आल्यासारखं वाटलं होतं. अंधार पडला तशी ती दिवाणखान्यात जाऊन काहीतरी वाचत बसली. त्याने आपलं काम चालू ठेवलं. 
"जेवायला येताय ना?" त्याने विचारलं आणि तिची तंद्री भंग पावली. दिवाणखान्यात अनेक कागद पसरलेले होते. जुने फोटो, कागदांचे काही गठ्ठे ठेवलेले होते. तिने त्याला जेवण जागेवरच आणून द्यायला सांगितलं. बराच वेळ ते ताट तसंच पडून राहिलं. ती वाचण्यात गुंग होऊन गेली होती. ततिचे ताट उचलण्याची वाट पहात त्यालाही माजघरात झोप लागून गेली होती. 

         ती सकाळी उठली तेंव्हा तिला आपण कसे, कधी झोपलो याची आठवण झाली. पसरलेले कागद, फोटो सर्व गोळा करून एका जागी तिने ठेवलं. चालत चालत ती माजघरात आली आणि त्याच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या कोवळ्या किरणांतून तसाच फरशीवर पहुडलेला तो तिला दिसला. त्याचा चेहरा किती निरागस आहे तिने मनातल्या मनात विचार केला. त्याला उठवावं असं तिला वाटलं नाही. कितीतरी वेळ ती तशीच त्याला बघत एका कोपऱ्यात उभी राहिली. 
स्वयंपाकघरात 
क्रमशः 
        
विद्या भुतकर.