Thursday, January 26, 2017

भारत माता की जय !

       २६ जानेवारी संपला की सर्वांच्या प्रोफाईल वरचे झेंडे खाली असतील, नसतील, आपापल्या तत्परतेचा प्रश्न आहे तो. बाकी सकाळपासून रस्त्यांवर खाली पडलेल्या, अवहेलना होणाऱ्या झेंड्यांचेही फोटो येतीलच पेपर मध्ये इत्यादी. कुणाच्या उपहासात्मक पोस्टही दिसल्या असतील किंवा दिसतीलही. मध्ये राष्ट्रगीताच्या वेळी उभे न राहण्यावरून झालेली भांडणं किंवा प्रत्येकवेळी थिएटर मध्ये चित्रपटाच्या आधी राष्ट्रगीत ऐकवण्याच्या कोर्टाच्या आदेशावरून बरेच वाद झाले. प्रत्येकवेळी असं वाटतं की खरंच हे इतके वाद का? आणि असे १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला एकदम येणारे प्रेम का? असो. 
         आज पर्यंत मी अमेरिकेत जितक्या पळण्याच्या इव्हेन्ट मध्ये भाग घेतला आहे त्या सर्व रेसची सुरुवात अमेरिकन राष्ट्रगीत होऊन होते. जो कुणी गायक किंवा गायिका ते म्हणत आहेत ते अगदी मन लावून म्हणतात. आणि मला लक्षात येतं की या सगळ्यांत मी कुठेच नाहीये. परदेशात, परक्या हजारो लोकांमध्ये उभे राहून त्यांचे राष्ट्रगीत ऐकताना जे एकटेपण जाणवलं आहे त्याबद्दल केवळ शब्दांत सांगणे अवघड आहे. त्याच्या १० टक्के जरी कुणाला अनुभवता आलं तर ते आपल्या राष्ट्रगीताला आपोआप उभे राहतील असं मला वाटलं. आपल्या देशात उभे राहून आपले राष्ट्रगीत म्हणता येण्यासारखा अभिमान नाही. तो जाणवण्यासाठी माझ्यासारखं कधी एकटं उभं राहून पाहिलं पाहिजे हजारो लोकांमध्ये. 
     सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो माहितेय का? ते अमेरिकन राष्ट्रगीत संपल्यावर लोक जोरात टाळ्या वाजवतात आणि मी मात्र आतून जोरात ओरडू इच्छिते,"भारत माता की जय !". आपल्या संस्कृतीमुळे म्हणा किंवा सवयीमुळे म्हणा, राष्ट्रगीतानंतर 'भारत माता की जय' म्हणता आलं नाही तर काहीतरी अपूर्ण राहिल्याची भावना मनात येते. आणि मुख्य म्हणजे ती बाजूला असणाऱ्या हजारो लोकांना मी सांगूही शकत नाही. अशा वेळी वाटतं, आपल्याकडे थिएटरमध्ये असणाऱ्या शेकडो लोकांसोबत आपण ते म्हणू शकतो, बोलू शकतो हा हक्क काय कमी आहे?
       गेल्या वर्षी १५ ऑगस्टला भारतात होतो आणि बिल्डिंगच्या झेंडावंदनाला आणि पुढच्या कार्यक्रमाला हजर होतो. .मुलांनाही त्यात भाग घेता आला याबद्दल खूप आनंद झाला होता, पुढच्या वर्षीही करायचा विचार आहे. राष्ट्रगीत म्हणताना अंगावर उभे राहणारे रोमांच केवळ तेंव्हाच येतात. आयुष्यात दुसऱ्या कशानेही ते मी तरी अनुभवले नाहीयेत. ते वातावरण, झेंडावंदन, राष्ट्रगीत, ते शुभ्र पांढरे स्वच्छ कपडे आणि त्यानंतर मिळालेली जिलेबी या सगळ्यांत जो सण साजरा केल्याचा भाव असतो ना तो कुणाला सांगून कळत नाही. निदान भारतीय नसलेल्या लोकांना तरी. एक भारतीयच हवा आपला आनंद वाटून घेण्यासाठी. असो. आज तुमच्यासोबत हे शेअर करू शकले याचाही आनंद आहेच. पुढच्या रेसला 'भारत माता की जय' असे जोरात म्हणायचा विचार आहे, बघू काय होते. 
तोवर, भारत माता की जय ! :)

विद्या भुतकर.

Wednesday, January 25, 2017

Tuesday, January 24, 2017

स्वप्ना आणि सत्या : भाग ६ - सुट्टी

        अनेकवेळा अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपला किंवा आपल्या जोडीदाराचा स्वप्नाळू स्वभाव दिसून येतो. बरं जिथे स्वप्नं आहेत तिथे सत्याची जाणीव करून देणारा पार्टनर असतोच. दोघेही स्वप्नाळू असणारी जोडी विरळाच. अगदी सहज म्हणून सुरु केलेल्या या पोस्टचे ५ भाग झाले आजपर्यंत. त्या सर्वांची लिंक देत आहे इथे आणि आजचा भागही.  प्रत्येकवेळी तो किस्सा लिहिताना किंवा वाचताना किती सहज रोज कुठेतरी तो घडत असेल असं वाटतं. त्यामुळे तुम्हालाही तसंच वाटलं तर शेअर नक्की करा. भाग १:  https://www.facebook.com/VidyaBhutkar1/posts/1022515327828002
भाग २:  https://www.facebook.com/VidyaBhutkar1/posts/1055392274540307:0
भाग ३:  https://www.facebook.com/VidyaBhutkar1/posts/1062843353795199
भाग ४:  https://www.facebook.com/VidyaBhutkar1/posts/1075633792516155:0
भाग ५:  https://www.facebook.com/VidyaBhutkar1/posts/1142875719125295:0
 
आजचा भाग: 
       दोघेही टिव्ही समोर बसून मध्ये मध्ये बोलत आहेत. 
 
ती: ए आपण सुट्टीला कुठं जायचं? 
तो: कुठली सुट्टी? 
ती: असं काय करतोस आता २६ जानेवारी येतोय ना? 
तो: अगं मग एकच दिवस तर आहे. 
ती: अरे, मधला एक दिवस रजा टाकली तर ४ दिवस मिळतात ना? 
तो: हां खरंच की. 
ती: मग कुठे जायचं? 
तो: जायला कशाला पाहिजे? घरीच राहू की. 
ती: शी किती बोअर होईल अरे? घरी काय राह्यचं? 
तो: उलट चार दिवस म्हणून सगळी जनता बाहेर पडते. उगाच गर्दीत कशाला जायला पाहिजे? 
ती: मग काय करायचं?
तो: काही नाही. निवांत घरी बसू, खाऊ-पिऊ, टिव्ही बघू. 
ती: बस इतकंच? 
तो: उलट घरासारखी व्हेकेशन नाही. 
ती: बाहेर जाऊ ना, एखाद्या गावाला. छान तीनेक दिवस रूम बुक करू. खायचं प्यायचं, फिरायचं. 
तो: बाहेर जाऊन रूमवरच पडून राहायचं तर घर काय वाईट आहे? 
ती: जरा बदल होतो ना तेव्हढाच. फ्रेश होतो एकदम. 
तो: उलट मी तर म्हणतो त्या गर्दीत, प्रवास करून त्रास करून घेण्यापेक्षा घरी राहून फ्रेश होऊ मस्त. 
ती: .... 
गप्पच... 
तो: शिवाय त्यासाठी पैसे घालवायची काय गरज?
ती: प्रत्येक गोष्ट गरजेसाठी करतो का माणूस. मजा म्हणून पण करू शकतो ना?
तो: अगं पण त्यासाठी बाहेर पडलंच पाहिजे असं थोडीच आहे? 
ती(चिडून) : जाऊ दे मग. घरीच राहायचं आहे तर मी रजा तरी का घेऊ? 
तो: ठीक आहे, नको घेऊस. 
ती: तुला ना काही बोलण्यात अर्थच नाही. 
तो: नको बोलूस !
 
दोघेही तोंड फिरवून बसले होते. आज पुन्हा एकदा स्वप्नं आणि सत्याचं वाजलं होतं. आज पुन्हा दोघांना एकमेकांचं मन समजलं नव्हतं.
 
विद्या भुतकर.


Monday, January 23, 2017

नवऱ्याचा मित्र :)

        नवऱ्याचा मित्र हा लग्नानंतर सोबत आलेल्या नातेवाईकांपैकी 'आपला' वाटणारा माणूस. :) आता हा मित्र कसा असला पाहिजे, जो एकदम जवळचा आहे, ज्याने आपल्या नवऱ्याला चांगल्या- वाईट दिवसांत पाहिलेलं आहे आणि त्याला साथही दिली आहे. अगदी बालपणीचाच असे नाही पण त्याला आतून बाहेरून ओळखणारा. दर वेळी अशा मित्रांना( अगदी एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतात) भेटले की ठराविक अनुभव येतात ते दरवेळी मनात येतात पण बोलायचे राहतात.
        तर या मित्रांनी नवऱ्याला चांगले ओळखलेले असते. आणि त्याच्या बायकोची दुखरी नस काय आहे हेही त्यांना माहित असते. भेटल्यावर काही वेळाने कुठल्यातरी क्षणी बरोबर तो मित्र तो विषय काढतोच. "काय रे मदत करतोस का नाही वहिनीला घरी?"  किंवा "जिम जातोस की नाही रोज?" असं त्याने आपल्यासमोर म्हटलं की झालं. त्याला काय? फक्त कळ दाबली की बरोबर तिकडे गाडी सुरु होते. पुढे फक्त मित्राची मजा बघत बसायचं. मित्राची बायको त्याची कशी वाट लावते आणि तो तिला कसे समजावतो हे पाहण्यासारखी  मजा नाही. आपण त्यात दार थोड्या वेळाने तेल टाकायचे चमचाभरच. Entertainment Unlimited !
        पण गंमत माहितेय का? आजपर्यंत हे माहित असूनही मी ते करून घेते. एकतर मित्र म्हणजे सासू सासरे नाहीत किंवा दुसरे कुठले नातेवाईक नाहीत. त्यामुळे, त्याच्यासमोर का होईना नवऱ्याला चार शब्द ऐकवायला मिळत असेल तर संधी का सोडायची म्हणते मी? :) आता कितीही बोलून नवरा सुधारणार नसतो ना मित्र त्याला काही समजावून  सांगणार असतो. पण आपल्या मनाचे तरी समाधान ना? यात खरी मजा येते ती नवऱ्याची. त्याला माहित असते मित्र खेचतोय आणि बायको सिरियसली बोलतेय. त्याला मित्राला शांत करता येतं नाही ना बायकोला. पण एक असतं, थोड्या वेळाने त्यालाही तीच संधी मिळणार असते मित्राची बायको समोर असताना. त्यामुळे तोही मुकाट ऐकून घेतो आणि वेळ आल्यावर संधी सोडत नाही. :)
       या सगळ्यांत खरी मजा असते ती या सर्व नात्यांची. हे सर्व करणारे मित्र आहेत हेच मोठं भाग्य असतं. कारण नवरा आणि तो मित्र जवळचे तर असतातच. आपल्यालाही तो एक आधार असतो. कधी नवऱ्याची ना पाहिलेली हसमुख बाजू दाखवून देतो, कधी जुने किस्से सांगतो. खरंच वेळ पडली तर मित्राला त्याची चूक दाखवून द्यायलाही कमी करणार नसतो. आणि मुख्य म्हणजे कधीही, कुठल्याही क्षणी तुम्ही कॉल केला तर 'दोन मिनिटांत येतो वहिनी'  म्हणून धावत यायला कमी करणार नाही असा तो मित्र असतो. :) 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Saturday, January 21, 2017

दिसतात बरं !

        हे सौम्य शब्दांत कसं बोलायचं म्हणून इतके दिवस विचारायचं राह्यलं होतं. शब्द सापडले नाहीत म्हणून शेवटी स्पष्टच बोलते जरा. 

         आम्हालाही दिसतात बरं, पुरूषांचे ते वरचे बटण उघडल्यामुळे छातीवरचे केस. घामेजल्या अंगाने आळस देताना काखेतले घामाचे डाग. येतो वास आम्हालाही दोन दिवस अंघोळ न करता शेजारी बसलेल्या माणसाचा. दिसतात पायावरचे भरभरून केस, शॉर्ट घातलेली असताना. कधी दिसते ढेरीही, तटतटून पोटावर बसवलेल्या शर्टातून. जानवं आणि पंचा नेसून रस्त्यावरून जातानाही पाहिलेत बरेच आणि कसलीही लाज न बाळगता स्विमिंग पुलात पोहणारेही. पण यात कुठेही त्यांची स्वतःच्या शरीराची लाज दिसली नाही. अजूनही दिसत नाही.
          आम्हाला मात्र अजूनही ब्रा ची पट्टी आत घालावी लागते चुकून दिसली तरी. पॅन्ट प्रत्येक वेळी उठताना वर ओढावी लागते. पाय प्रत्येकवेळी बसताना क्रॉस करावे लागतात आणि खाली वाकून वाढताना ओढणी नीट करावी लागते. पाच वर्षाच्या मुलीलाही सरळ बस म्हणून सांगावं लागतं आणि थोराड मुलीला पळू नकोस, हळू चाल म्हणून. घातला छोटा स्कर्ट तर ओढावा लागतो हजार वेळा. पूलचं तर बोलूच नका.     
         दिसतात कधी हृतिक आणि सलमान शर्ट काढूनही. असतात एकेक फॅनही. दिसतो एखादा, शर्ट मधून मजबूत दंड दिसणारा आणि कळतो एखाद्याचा वट केवळ नजरेतला. आवडतो एखाद्याचा रुबाब आणि मिजासही. कळते एखाद्याची रुखरुख आपल्यासाठीची आणि काळजीही. येतो राग एखाद्याचा प्रचंडही, इतका की जीव घ्यावा. येतं एखाद्यावर प्रेम खूप, तरी लाख प्रयत्न करून मिळत नाहीही. पण म्हणून त्याचं पुरुषत्व ओरबडायला जात नाही, कुठेही. ना घरात ना रस्त्यावर. ना हातांनी ना शब्दांनी ना नजरेनी. 

आम्ही मात्र सर्व झाकून किंवा दाखवून गुन्हेगारच !

विद्या भुतकर.

Monday, January 16, 2017

शी,शु, पालकत्व

      आयुष्यात ...... (एकदा 'आयुष्यात' या शब्दाने सुरुवात होणाऱ्या गोष्टी मोजल्या पाहिजेत. निदान एका दिवसात किती बोलते ते तरी.) हा तर.... आयुष्यात म्हणजे आतापर्यंतच्या आयुष्यात, 'सडासंमार्जन' या शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळाच आहे असे समजून बरीच वर्ष काढली. त्यातला 'टिंब' कुठून कुठे गेला असणार हे सूज्ञांस सांगणे न लगे. हा तर....  आयुष्यावर बोलत होते. रोज सकाळी उठून 'प्रातर्विधी' आटोपणे यामध्ये केवळ शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला वेळेत पोचणे आणि तिथे जाऊन 'गुडगुड', गडबड होऊ न देणे इतकाच हेतू होता. उठण्याच्या वेळेवर आत बसायला मिळणारा वेळ ठरतो आणि हो, घरात किती बाथरूम आहेत यावरही. आमच्याकडे एकच असल्याने आई सर्वांना एकेक करून उठवायची किंवा तुमच्या सवयीनुसार. म्हणजे कुणी आत जाऊन डोळे उघडतो, कुणी चहा घेऊन, कुणी ब्रश करून-चहा घेऊन तर कुणी सर्व आटोपून अंघोळीला जायच्या आधी. एकटे असताना किंवा दुकटे झाल्यावरही काही विशेष फरक पडला नव्हता. दिवसातला जास्तीत १५ मिनिटांचा वेळ सोडला तर बाकी वेळ जगातली सर्व महत्वाची किंवा फालतू कामे करायला रिकामा होता. ही पोरं झाली आणि सर्व चित्र बदललं.
       शी आणि शू या आयुष्याचा किती मोठा भाग बनू शकतात हे त्यांनीच आम्हाला शिकवलं आहे, अर्थात अजून बऱ्याच गोष्टी शिकवल्यात त्यातली ही एक. जन्म झाल्या झाल्या दोन तासांतच नवऱ्याला 'लहान बाळाचे डायपर कसे बदलायचे' याचा धडा मिळाला होता. नर्सने चांगले शिकवले असावे कारण दोन्ही मुलांच्या वेळी तो त्याला चांगलाच कामात आला(आणि माझ्याही:) ). हॉस्पिटलमध्ये होतो ते तीन दिवस ठीक होतं पण घरी आल्यावर पहिले २ महिने दिवसातून दहा वेळा डायपर बदलायचे म्हणजे जरा जास्तच झालं होतं. बरं त्यात शी चा हिशोब वेगळा, शु चा वेगळा. आणि हे सर्व का करायचं तर बाळाला शी, शु सर्व नियमित होत आहे ना, त्याचा रंग बरोबर आहे ना? हे सर्व कळलं पाहिजे. प्रश्न डायपर वापरतो किंवा नाही याचा नाहीये. प्रश्न हा आहे की दिवसातले किती तास आणि किती वेळ इतर कामे करण्यात घालवत होतो आणि आता तोच शी-शु वर.
        बरं, नुसतं असं नाही की साफ केलं आणि झालं. जरा रडायला लागलं की, आजी  सुरु होते,"अगं भूक लागली असेल त्याला". नुकतंच दूध पाजून दमलेली आई वैतागते. मग म्हणते,"ढेकर काढला नसेल. ढेकर येतो का बघ" म्हणून बाळ बाबाच्या हातात जातं. बराच वेळ थोपटलं तरी बाळ काही ढेकर देत नाही आणि रडायचंही थांबत नाही. मग आजी अजून एकदा बोलते,"तरी तुला म्हटलं होतं दोन महिने कळ काढ. थोडं बिनचवीचं खाल्लंस तर काही बिघडत नाही. गॅस झाला असेल त्याला. मी ओव्याचा शेक देते". आजी आणि आई शेकण्यात व्यस्त असताना बाबा बायकोसाठी केलेली खीर खाऊन, तिच्यासाठीच केलेला ओवा-तीळ खाऊन बसलेला असतो. ओवा कधी कामाला येतो  कधी नाही. काहीच नाही झाले तर ग्राईप वॉटर म्हणजे तर नवीन आई-बाबांसाठी देवाने साक्षात स्वर्गातून पाठवलेलं अमृतच आहे. किती वेळा त्याने रात्रीची झोप वाचवली असेल ते देवालाच ठाऊक. काहीच उपाय चालेनासा झाला तर 'दृष्ट काढणं' तर ठरलेलंच असतं.
        पहिले दोन महिने झाल्यावर बाळाला दूध पचायला लागतं. आणि शी करण्याचं प्रमाण कमी होतं. दिवसाला ४ वेळा करणारं बाळ दोन तीन दिवस झाले तरी 'शी' करत नाही म्हणजे काय? किती तो जीवाला घोर? बाळाला काही खायला देता येत नाही त्यामुळे आईवरच सर्व खाण्याचे प्रयोग चालू असतात. काहीही कारण नसलं तरी एरवी हसत खेळत असलेल्या बाळाचा "चेहरा किती कोमेजून गेला गं" म्हणून आजीला वाईट वाटत असतंच. ऑफिसला गेलेले बाबा दुपारी फोन करून 'बाळाने शी केली का नाही?' असे महत्वाचे प्रश्न विचारतात. आईही मग झाल्या झाल्या 'पोरगं बोर्डात आलं' या आनंदात बाबांना फोन लावते. "हो हो अगदी पिवळी. हा सुरुवातीला जरा त्रास झाला त्यामुळे रडत होती. पण खेळतेय आता. हो ना झाली बाई एकदाची. " वगैरे संवाद ठरलेले असतात.
          हे काम दुपारी होऊन गेलं तर ठीक. पण तेच मध्यरात्री झालं तर शी पुसायला घेतलेले वाईप चुकून आपल्याच तोंडाला पुसले जातील इतकी झोप येत असते. एखादा उत्साही आई किंवा बाबा असेल तर 'हा चालू दे' म्हणून रात्री दोन वाजताही बाळाशी गप्पा मारत बसतो. तर एखाद्या वेळी, दोन चार दिवसांनी शी झाल्याने पोर एकदम खुश होऊन खेळत असतं आणि इकडे ते कधी झोपून आपल्याला सुट्टी मिळते याचा विचार करत असतो. त्यातही कौतुक असतंच, दुसऱ्या दिवशी एकमेकांशी बोलताना सांगितलं जातं,"हो ना? किती ते चेकळायचं? ".आणि हे कौतुकाचे बोल 'आईबाबांची कशी गंमत केली बाळाने' या टोन मधेच होत असतात.  मुलगा असेल तर त्यात तोंडावर तुषार उडणे हे एक नेहमीचेच आहे. आई-वडील होईपर्यंत ज्या गोष्टींचा विचारही केलेला नसतो त्यावर तासनतास डिस्कशन होऊ शकतात. लाईफ चेंजेस सो मच !
       मुले साधारण दोनेक वर्षाची झाल्यावर चित्र थोडं बदलत. डायपर नसेल तर उत्तमच आहे, तरी त्यासाठीही बॅग मध्ये ज्यादा कपडे घेऊन जा किंवा ऐनवेळी आपलेही कपडे खराब झाल्यावर धावपळ होऊ नये यासाठी खबरदारी घ्यायलाच लागते. काही सणाला कार्यक्रमाला जायचं असेल तर नक्कीच. नाहीतर पैठणी घातली तर 'तो माझा नव्हेच' म्हणत दिवसभर पोराला बाजूला ठेवावं लागेल. :) डायपर असेल तर बरेच त्रास टळतात. पण डायपर फेजमधून बाहेर पडणे हेही काही छोटे काम नाही. "बाबा शु आली" म्हणत ते पळत आलं की आईबाबा हातातलं सर्व टाकून त्याला बाथरूममध्ये घेऊन जायला पळतात. बाथरूममध्ये जाऊन खरंच केली तर टाळ्याच! किती ते कौतुक ! :) पण नुकत्याच मावशी फारशी पुसून गेल्यावर शु केल्यावर सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे असतात. मला तर वाटतं या पोरांना चांगलं माहित असतं काय करायचं नाही ते, तेच करतात !
       या फेजमध्ये मुलांना बाहेर नेणं म्हणजे हातात बॉम्ब घेऊन फिरण्यासारखं आहे. एक तर घरून निघताना, तासभर बसवून थोडी का होईना करू दे म्हणून आग्रह करायचा. आणि तरीही तुळशी बागेत एखाद्या दुकानात साडी बघायला बसलं की बरोबर तेव्हाच सुरु होतात,"आई शु आलीय. जोरात आलीय." मग एकतर आईला साडी सोडवत नसते आणि बाबाला कळत नाही की त्याला त्या गर्दीच्या जागी कुठे घेऊन जाणार? कुठल्यातरी हॉटेलात नेऊन आणलं की येताना एक मोठ्ठा फुगा किंवा चॉकलेट मुलाच्या हातात दिसत असतंच. :) आई खुश आणि मूलही. बाबाची मात्र जोरदार चिडचिड होत असते ती मुलामुळे का बायकोच्या खरेदीमुळे हे मात्र कळत नाही. अशा अनेक ठिकाणी आपली वाट लावण्यात पोरं पटाईत असतात. मॉलच्या दुसऱ्या टोकाला आल्यावर, सिनेमा अगदी महत्वाच्या पॉईंटवर असताना , भांड्यात फोडणी जळत असतानाच बरोबर 'जायचय' म्हणून सांगणे हे तर नेहमीचेच आहे. शिवाय बाथरूममधून ओरडून (अनरिलेटेड) प्रश्न विचारणे, 'आई शी झाली' असं अख्ख्या बिल्डिंगला ओरडून सांगणे, पब्लिक टॉयलेटमधे गेल्यावर शक्य तितक्या घाणेरड्या वस्तुंना हात लावणे, अशी छोटी मोठी कामेही करतात.
        आता आमची जरा मोठी झाली. शाळेत जायला लागल्यावर थोडी शिस्त आली. पण तरीही अनेकदा थोडीफार का होईना पळापळ होतेच. कधी पोट बिघडलं तर किंवा पाणी कमी प्यायलं तर थोडं लक्ष द्यावं लागतं. अशा वेळी मग पाणी पिऊन शतपावली करायला लावणं  किंवा 'भाज्या भरपूर खा' म्हणून ओरडणं हे करायला काही वाटत नाही. पण ती त्यांची लहानपणीची फेज आठवून हसू येतं. आणि थोडं हुश्श पण होतं. बाकी सध्या जे यातून जात आहेत त्यांना ऑल द बेश्ट !
         
विद्या भुतकर.


Sunday, January 15, 2017

प्रश्न गोड बोलण्याचा नाहीच मुळी

प्रश्न गोड बोलण्याचा नाहीच मुळी
ते तर मिळतंच सगळीकडे
"अय्या किती छान दिसतेस" पासून
"बारीक झालीस का?" पर्यंत.

कधीतरी स्पष्टही बोल,
"अशी का राहतेस गबाळ्यासारखी?
थोडी फ्रेश हो नं,
संसाराच्या रगाड्यात
इतक्या सहज हरवू नकोस नं."

"मुलांच्या खेळण्यात, अभ्यासात,
त्यांच्याच करियरच्या काळजीत असतेस.
थोडं स्वतःकडेही लक्ष दे नं.
वेळ काढून चालायला जा नं."

असंच कधी खरं सांगून पहा नं.

प्रश्न गोड हसण्याचा नाहीच मुळी.
ते तर मिळतंच सगळीकडे.
कधी थोडं रडलं तरी चालेल नं?
मैत्रिणीला खरं खरं सांग नं !

गॉसिपला मागे टाकून, तिच्या दुःखासाठी
थोडं तरी थांब नं.
गोड बोलणारे, हसणारे मिळतीलच..
पदोपदी, क्षणोक्षणी.

खऱ्या नात्यांनाही थोडं ओळख नं?
त्यांच्यासाठी थोडा वेळ काढ नं.

विद्या भुतकर.

Wednesday, January 11, 2017

इष्क मुबारक, दर्द मुबारक: भाग शेवटचा (आतापुरता तरी :) )

       एक अवघडलेला आठवडा सोबत घालवून रितू आणि आनंद भारतात परत आले होते. दोघांनींही सुटकेचा श्वास घेतला होता. पुढे काय? कधी भेटायचं? काय करायचं? यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दोघांनाही द्यायचं नव्हतं.दोघेही आपापल्या घरी पोचले होते. घरी कितीही दिवसांनी जा किंवा वर्षांनी तुम्ही दोन मिनिटांत पूर्वीसारखे होता. घरात घालायचे कपडे, चप्पल, बसायची जागा, झोपायची गादी, पांघरूण, टिव्ही, रेडिओ जिथल्या तिथे असतं सर्व. जणू बाहेरच्या अस्थिर जगात ती एकच जागा स्थैर देते, काहीतरी शाश्वत असल्याचं आश्वासन देते. रितू इतक्या दिवसांनी आल्याने तिचे लाड चालू होतेच. गेल्या काही महिन्यांचा ताण, शीण सर्व कमी होत होता. यावेळी प्रोजेक्ट संपवून आल्याने तेही काही काम डोक्यात नव्हते. एक मोठठी सुट्टी घ्यायचं तिने ठरवलं होतं.
        तिकडे आनंदही घरी गेला होता. पण आठवड्यातच परत आला. असेही घरी राहून करमणार नव्हते. रूमवर राहायला आल्यावर त्याला सगळ्यांत पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे आता सोबत रितू नाहीये.  गेल्या सहा महिन्यांची सवय झालेली, 'हे असं वाटणारच थोडे दिवस' असं स्वतःला समजावून तो पूर्वीसारख्या रुटीनमध्ये येण्याचा प्रयत्न करू लागला. एक चांगलं झालं होतं, ऑफिसला आल्यापासून आनंद थोडा मनातून शांत झाला होता. जुन्या मित्र-मैत्रिणींना इतक्या महिन्यांनी भेटल्याने, त्यांच्यासोबत बाहेर जाणंही सुरु झालं. वाईट फक्त एकाच गोष्टीचं होतं, इतक्या दिवसांत रितूने एकदाही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला नव्हता. बरं त्यांचं नातं असं होतं की विचारणार कोणाला? उलट लोकंच त्याला विचारत,"रितू कैसी है?". तोही आपला,"ठीक है" म्हणून निभावून नेत होता.
      काही दिवसांनी एके रात्री त्याने तिला फोन केला. आता पुढे काय? उचलेल किंवा नाही शंका होतीच. पण तिने उचलला. आता पुढे काय?
तो,"हाय!"
ती,"हाय."
तो,"कशी आहेस?"
ती,"मी ठीक आहे. तू?"
तो,"मी ठीक. परत ऑफिस जॉईन केलं."
ती,"अच्छा? लवकर जॉईन केलंस?'
तो,"हां, असंच."
मग बराच वेळ शांतता....
तो,"Happy Birthday."
ती,"मला वाटलं विसरलास."
तो,"मला वाटलं 'थँक्स' म्हणशील."
ती हसली, थोडंसं आणि 'थँक्स' म्हणाली.
..
..
..
..
त्याने विचारलं,"जेवण झालं?"
ती,"हो, केव्हाच."
तो,"हां बराच उशिरा कॉल केला. सॉरी. पण म्हटलं उचलशील की नाही म्हणून करत नव्हतो."
ती,"का नाही उचलणार?"
..
..
..
..
..
..
अनेक तास वाटतील अशा थोड्या वेळाने विचारलं,"काय केलंस आज विशेष?"
ती,"काही खास नाही. घरीच होतो. केक आणला होता."
तो,"छान."
ती,"बाकी सगळं ठीक?"
तो,"हां ठीकच आहे."
ती,"गुड !"
तो,"चल ठेवतो मग मी. गुड नाईट."
ती,"हा गुड नाईट. बाय."

त्याने फोन ठेवून टाकला. बराच वेळ फोन हातात धरून बसला. विचार करून त्याने तिला मेसेज केला,"I miss you."
त्याच्यासाठी ती रात्र जरा जास्तच लांबली होती.
    
                 -----------

          घरी येऊन महिनाभर गेला तरी रितू ऑफिसला कधी जायचं यावर काही बोलत नव्हती. पण आई-वडिलांनी पाहिलं होतं की आल्या आल्या एकदम काळवंडलेली ती आता जरा सुधारली होती, सर्वांशी नीट बोलत होती, मिसळत होती.
असेच एकदा जेवण करताना तिने आईला सांगितलं," कांदा भाजताना मीठ घातलं ना की जरा लवकर भाजतो आणि चवही छान येते."
आईने जरा आश्चर्यानेच पाहिलं तिच्याकडे, म्हणाली,"आता मलाच टिप्स द्यायला लागलीस तू?"
ती हसली काहीतरी आठवत. तिकडे आई बोलतच होती,"चला आता मला लग्नाचं टेन्शन नाही म्हणजे. "
ती चिडली जराशीच आणि म्हणाली,"म्हणजे काय? लग्नासाठी प्रत्येक मुलीला स्वयंपाक आलाच पाहिजे का?"
आई,"असं नाही गं. गम्मत केली. पण चांगलं आहे ना तुला इतकं छान जेवण आता बनवता येतं."
ती,"हां, इतके दिवस तिथे स्वतःलाच सर्व करायला लागत होतं ना? मग काय शिकावंच लागलं. पण मी आता काही नाही करणार. मस्त पोळ्या-भाजीला बाई लावणार आणि आराम करणार."
आई,"बरं बाई, सांग नवऱ्याला सर्व कामाला नोकर ठेवायला. "
ती पुन्हा चिडली,"नवऱ्याला कशाला सांगू? मी आहे ना कमावणारी?".
 आईने पुन्हा विषय काढला. "रितू, तुला येऊन बरेच दिवस झाले. तू यायच्या आधीपासूनच बरीच स्थळं येऊन गेलीत. आल्या आल्या, तू अगदीच दमलेली दिसत होतीस, म्हणून मीच नको म्हटलं तेव्हा. पण तुला असाही वेळ आहे प्रोजेक्ट सुरु व्हायला तर भेटून घेऊ ना काही मुलांना."
ती म्हणाली आईला,"अगं पण इतकी काय घाई आहे?"
आई,"घाई कुठे? तुझं वय आता २८ वर्षं झालं आणि तरीही तू म्हणतेस घाई का करताय? हे बघ, मी आता काही बोलू शकत नाही. तुला काय बोलायचं आहे ते बाबांना सांग. "
         बाबांकडे विषय काढायची काही तिची हिम्मत नव्हती. आईनेच तिला दोन तीन मुलांचे प्रोफाईल दाखवले होते. त्यातले दोन तर तिने असेच कारणं सांगून नाही म्हणून सांगितले. शेवटी एका रविवारी एका मुलाला भेटायचे तिने मान्य केले.. अर्थातच 'एका भेटीत काही मी लगेच हो म्हणणार नाही' हेही तिने स्पष्ट सांगितलं होतं. मुलाला भेटणे ही आता केवळ औपचारिकता राहिलेली नव्हती. रविवारी तो मुलगा आणि त्याचा सर्व गोतावळा घरी आला.
तिने थोडी चिडचिड केलीच,"इतकं काय सोनं लागलंय मुलाला म्हणून तुम्ही इतकी धावपळ करताय?".
तिच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष देत नव्हतं. ते लोक आले आणि सर्व वातावरण एकदम तंग झालेलं. तिच्या दिसण्याकडे आज आवर्जून लक्ष दिलं जात होतं. त्याचा तर तिला अजून राग येत होता. साडी वगैरे मी काही नेसणार नाही हे तर तिने सांगितलं होतं आणि हातात ट्रे ही घेऊन जाणार नाही. उगाच काय फालतू प्रथा! तिला आपलं असं प्रदर्शन अजिबात आवडत नव्हतं.
         पण मुलगा ठीक होता. त्याच्याशी बराच बोललीही ती. उगाच नावं ठेवण्यासारखं काही नव्हतंच. पण एकमेकांना सांगण्यासारखंही काही नव्हतं. तिने थोडक्यात आटोपलं. बाकी सर्व ठीक होतं, घर, नोकरी, घरचेही सर्व ठीकच होते. पण त्या 'ठीक' असण्याने तिने त्याला 'हो' म्हणायचं का? की नकार द्यायला काही कारण नाही म्हणून 'हो' म्हणायचं? ते लोक गेल्यावरही घरात तीच बोलणी चालू होती. तिला कळत नव्हतं, इतका त्रास का करून घ्यायचा?  म्हटलं 'नाही' तर काय होणारे? काही सोनं लागलं नव्हतं त्याला ! सोनं लागलं असतं तर कसा दिसला असता हे आठवून तिला हसू आलं. पण ते कुणाला सांगताही येईना.
       रात्री बराच वेळ विचार करून तिने आनंदला फोन केला. उचलेल की नाही शंका होतीच. पण उचलला.
ती,"कसा आहेस?"
तो,"मी बरा आहे. तू?"
ती,"मी ठीक आहे."
'बोलणं पुन्हा एकदा मागच्या सारखंच चालणार वाटतं', असा त्याने विचार केला.
इतक्यात ती म्हणाली,"आज एक मुलगा आला होता घरी."
तो"कशाला?"
ती,"कशाला म्हणजे? मला बघायला?" त्याचा श्वास एक क्षण थांबला.
तो,"मग?"
ती,"मग गेला बघून."
तो गप्पच.
ती,"वेडाच होता. म्हटलं गाणी ऐकायला आवडतात का? तर म्हणाला, हो, शास्त्रीय संगीत ऐकतो कुठल्याशा पंडितजींचे. मला तर हसूच आले. तर चिडला. म्हणे 'इतके मोठे आहेत ते, त्यांना ओळखत नाहीस का?'.
अरे? असेल त्याचा पंडितजी. मी काय करू? त्याला कोडिंग दिले तर जमेल का?"
तिच्या बोलण्यात आज तो पूर्वीचा मिश्कीलपणा होता. पण त्याचे लक्ष त्या 'मुला' बद्दल ऐकण्यात होते.
"मग पुढे?"
"पुढे काय? मी 'नाही' म्हणून सांगितलं. अरिजितचा कुणी फॅन असेल तरच लग्न करणार म्हणूनही सांगितलंय." ती बोलली.
तो शांतच.
ती,"बरं चल ठेवते मी उशीर झालाय. पुढच्या आठवड्यात अजून कुणी येणार आहे म्हणे. बघू तो आहे का अरिजीतचा फॅन."
त्याने नुसतंच ह्म्म्म केलं आणि तिने फोन ठेवून दिला होता.
             
                            --------

            पुढचा महिनाभर तिचा काही कॉल आला नाही. त्यानेही मग काही विचारपूस केली नाही. सोमवारी सकाळी त्याच्या दारावर एक मोठ्ठी थाप पडली. झोपेतून उठत त्याने दरवाजा उघडला. दूध, पेपर असेल म्हणून खाली वाकला तर ती म्हणाली,"आयुष्यमान भव!" आणि खूप हसली. तो दचकून तिच्याकडे पहातच राहिला. खाली पडलेली दुधाची पिशवी, पेपर आणि ती सर्व एकत्रच घरात आले. रूम अस्ताव्यस्त पसरली होती. त्याच्या गादीवर ते दोघेही बसले.
तिने विचारलं,"बसलास? चहा नाही करणार? छान आहे रे ही रूम. मी इथे कधी आले नव्हते. "
त्याने डोळे चोळत मान हलवली आणि तो चहा टाकायला उठला. तो  पटकन ब्रशही करून आला. ती पेपर वाचत बसली होती. चहाचा पहिला घोट घेतल्यावर तिला एकदम त्यांच्या अमेरिकतेल्या घराची आठवण झाली. तिने त्याच्या विस्कटलेल्या केसांकडे पाहिलं, त्याचा नेहमीचा घरातला टीशर्ट आणि पॅन्ट, सर्व कसं ओळखीचं, अगदी गादीवरची त्याची चादरही.
        तोही तिच्या फ्रेश चेहऱ्याकडे टक लावून बघत होता. किती छान दिसतेय, एकदम फ्रेश. इतकी का खुशीत असेल? लग्न ठरलं की काय?
"इकडे कशी काय?" शेवटी त्याने विचारले.
"इकडे म्हणजे? मग कुठे जाणार ना? ऑफिस इकडेच आहे अजून माझं."
"चला म्हणजे अजून नोकरी सोडलेली नाहीये. का राजीनामा द्यायला आलीयस?",तो.
"का रे? नकोय का मी तुला त्या ऑफिसमध्ये?", तिने डिवचून विचारलं. तो नुसताच हसला.
'किती छान दिसतो तो हसताना. किती दिवसांनी पाहतोय त्याला हसताना', तिने विचार केला.
"आजपासून जॉईन करतेय ना परत.",ती म्हणाली.
"अच्छा? मला वाटलं...." तो आश्चर्याने बोलला.
"काय वाटलं? ठरलं लग्न. जाईल एकदाची सोडून मला? हेच ना", ती.
त्याने पुन्हा मान हलवली. तिने त्याचा खाली बघत असलेला चेहरा हातात घेत वर केला.
"लग्न करायचंच असतं तर तिकडे अमेरिकेतच केलं असतं ना तुझ्याशी, आजपर्यत कशाला थांबले असते. ".

ती पुढे बोलत राहिली.

"घरी गेल्यावर खूप बरं वाटलं मला. आपलं घर, आईवडील, माझं बाकी सर्व जग हे किती महत्वाचं आहे मला हे जाणवलं. त्यांनीच मला माझ्या मनस्थितीतून बाहेरही काढलं. पण तरीही काहीतरी कमी होतीच. तुझी! एक मित्र म्हणून, एक रूममेट म्हणून, एक पार्टनर म्हणून.
         तो पहिला मुलगा आला ना भेटायला तेंव्हाच क्षणोक्षणी तुझी आठवण येत होती. त्याच्या तोंडून जणू तू बोलशील तीच उत्तरं ऐकावीशी वाटत होती. तुला तेंव्हा फोन केला तो माझ्या मित्राला, त्याची आठवण जास्त झाली तेंव्हा. कुणाला सर्व सांगता येत नव्हतं, जे तुझ्याशी शेअर करता येतं. पण तेंव्हा काही बोलले नाही. वाटलं, बहुतेक तुझी सवय झाली म्हणून सर्वांची तुझ्याशी तुलना करतेय. ते कुणी नकोत म्हणून 'तू' हा ऑप्शन मला नको होता. म्हणून मग पुन्हा फोन केला नाही. घरी राहिले, तुझी आठवण येत होतीच.  पाहायला येणारी मुलेही चालूच होती.  प्रत्येक मुलगा एक चॅलेंज म्हणून बघत होते. एखादा, जो तुझी एक क्षणासाठी तरी आठवण येऊ देणार नाही. पण असा एकही भेटला नाही.
         अनेकदा वाटलंही त्यांना विचारावं,'लग्ना आधीच्या सेक्सबद्दल तुमचं काय म्हणणं आहे'. पण घाबरले असते बिचारे. त्यांचा चेहरा कसा होईल हा विचार करून अजून हसू यायचं. एखाद्याला आपल्या अबॉर्शन बद्दल सांगून तो 'हो' म्हणतोय का हेही पाहणार होते. पण हे उगाच त्यांना 'गिनिपिग' केल्यासारखं झालं असतं. आपण दोघांनी गेल्या काही वर्षांत जे एकत्र अनुभवलं आहे ना? प्रेम, दुरावा, राग, त्रास, एकत्र राहणं, सेक्स, अबॉर्शन या सर्वांतून माझ्यासोबत अजून कुणीच गेला नसता किंवा मीही हे अजून कुणासोबत करू शकले नसते. कारण आपलं प्रेम, मैत्री, एकमेकांबद्दलचा आदर, करियरबद्दलची काळजी, आपले जुळलेले स्वभाव किंवा जुळवून घेतलेलेही. अजून कुणी कितीही जवळ आला तरी हे सर्व त्याच्याशी पुन्हा जोडू शकले नसते.
        परत आले तेंव्हा भीती वाटत होती की जे झालं त्याच्याहून किती परीक्षा द्यायला लागत असतील एका लग्नाच्या नात्यात. पण आता वाटतंय आपण ज्यातून गेलो त्यापेक्षा अजून काय त्रासदायक असणार आहे? त्यातूनही आपलं नातं टिकलं. मला पुन्हा तुझ्याकडे घेऊन आलं. आपलं नातं वेगळंच आहे रे. हे सगळं कळायला मला इतका का वेळ लागला रे? मला खरंच खूप वेळ लागला. त्यासाठी तुझ्यापासून इतके दिवस दूर राहावं लागलं. तू काय करत असशील याचा विचारही केला नाही. कारण मला तुझा विचार करून परत यायचं नव्हतं. मला माझ्यासाठी परत यायचं होतं, कायमचं." ती बोलत कमी आणि रडत जास्त होती. तिचे हात पुन्हा एकदा त्याच्या हातात होते.
"I am really sorry" म्हणत तिने पुन्हा रडायला सुरुवात केली.
तो मात्र हसत होता. रडता रडता हसत होता.
तिने पाहिल्यावर तो बोलू लागला,"आपण किती वेडे आहे यावर हसत होतो. आयुष्यात आपण कधीतरी एका गावात राहणार आहे का? ".
"म्हणजे?"
"म्हणजे, तू परत येशील म्हणून मी इथे वाट बघत होतो. तुझा शेवटचा फोन येऊन गेला आणि मी पूर्ण आशा सोडली. तुझे 'मुलगा बघायच्या' कार्यक्रमाचे किस्से मला ऐकायचे नव्हते. आणि इथे राहावतही नव्हते. म्हणून मी माझी बदलीची request केली होती. ती नुकतीच अप्रूव्ह झालीय आणि आता मी हे सामानच आवरत होतो. "
"हे बघ, तू आता हे असले काही करू नकोस हं." ती चिडून बोलली.
"म्हणूनच तर हसत आहे. आता पुन्हा ती कॅन्सल करायला काय कारण सांगायचं याचा विचार करत होतो."
"मी इथे रडतेय आणि तुला चेष्टा सुचतीय?",ती रागाने बोलली.
"रितू, माझ्याशी इतक्या मोकळेपणाने बोलणारी तू अशी गप्प झालीस. फोनवर तुझ्याशी बोललो तर जीव तुटला माझा. कधी इतका कुणासाठी हळवा झालो नव्हतो. मी आधीच म्हटलं होतं ना? हे प्रेम वगैरेंच्या भानगडीत पडायचचं नसतं. नसते व्याप. तू येशील म्हणून रोज ऑफिसला जायचो. तुझ्या मैत्रिणीशी बोलायचो. तुझीच आवडती भाजी खायचो आणि तुझीच आवडती गाणी ऐकायचो. हे सर्व थांबवायला हवं असं अनेकवेळा वाटलं पण जमलं नाही. तू म्हणतेस ते बरोबर आहे, आपण इतक्या वर्षांत जे अनुभवलं आहे, ज्यातून गेलो आहे ते सर्व विसरणं अवघड होतं.
       काय केल्यावर हे विचार थांबतील कळत नव्हतं. शेवटी बदली मागून घेतली. पुन्हा पूर्वीसारखं होण्यासाठी.  जरा चार दिवस उशिरा आली असतीस तर मग टाळेच असते दाराला. हे बघ, ती सीडी वरच ठेवली होती. तुला द्यायला आणली होती वाढदिवसाला. पण मीच रोज रात्री ऐकत होतो." त्याचा रडवेला चेहरा पाहून तिला पुन्हा भरून आलं.
"पण मला हे सर्व थांबवायचं आहे. एका ठिकाणी, एका गावात, एका घरात, कायमचं राहायचं आहे. तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे. आपण जी काही स्वप्नं पाहिली ती सर्व पूर्ण करायची आहेत. हे असं पुन्हा कधीच सोडून जायचं नाही आणि चिडूनही. नक्की ना?" त्याने तिच्या डोळ्यांत पाहून विचारलं विचारलं आणि तिनेही त्याला मिठी मारून होकार दिला.कितीतरी वेळ दोघे तसेच बसून राहिले.
       थोड्या वेळाने थोडं शांत झाल्यावर तिने ती सीडी हातात घेतली आणि सिस्टीम मध्ये टाकली. सीडी कव्हरवर तिच्यासाठी 'हैप्पी बर्थडे' लिहिलेलं त्याचं अक्षर दिसलं. 'वेडा कुठला' म्हणत तिने त्याच्या खांदयावर मान ठेवली. सीडीमधलं पहिलंच गाणं सुरु झालं होतं.

"हम तेरे बिन अब रह नहीं सकते
तेरे बिना क्या वजूद मेरा
क्यों के तुम ही हो,
अब तुम ही हो...... जिंदगी अब तुम ही हो..... "

विद्या भुतकर.

Tuesday, January 10, 2017

इष्क मुबारक, दर्द मुबारक: भाग ७

         रितू हादरली होती, मुळापासून की काय म्हणतात ना तसं ! आयुष्यात जास्तीत जास्त एखाद्या प्रॉजेक्ट मध्ये त्रास झाला म्हणून रडली असेल किंवा चांगले मार्क मिळाले नाही म्हणून. काही वेळा आनंद सोबत नव्हता तेंव्हाही. पण हे असं काही जग उलथवून टाकणारं घडलं नव्हतं. कितीतरी वेळ ती त्या 'टेस्ट' कडे बघत होती आणि मधेच रडत होती. 
आनंदही बराच घाबरला होता. मुळात हे असं काही होऊ शकतं याचा विचारच त्याने केला नव्हता. त्यामुळे त्याच्यापुढे काय करायला हवं हेही कळत नव्हतं त्याला. त्याने रितूला समजावण्याचा प्रयत्न केला. 
"अगं यात लिहिलं आहे की ती टेस्ट इतकी ऍक्युरेट असतेच असं नाही. आणि असं होण्याची शक्यता नाहीयेच ना. तुला तर माहितेय आपण योग्य ती काळजी घेत होतोच. हे बघ तुला हवी तर मी अजून एक टेस्ट आणलीय. ती चेक करून बघ. " 
         तिला थोडी आशा मिळाली. तिने दुसरीही टेस्ट करून पाहिली पण जे व्हायचं ते झालंच होतं. यात आता बदल काही होणार नाही हे तिला कळून चुकलं होतं. दिवसभरात कितीतरी वेळा तिने मनात उजळणी केली होती असे कसे चुकलो आपण, का नाही थांबवलं स्वतःला आणि त्यालाही, इतकं काय बिघडणार होतं अजून दोन महिन्यांनी, या आणि अशाच अनेक विचारांची. पण ते फक्त प्रश्न होते आणि त्यांना उत्तर काहीच नव्हतं. फक्त प्रश्न होता मोठा, "लोक काय म्हणतील?". आता लोकांमध्ये घरचेही आलेच. त्यांना काय सांगणार? बरं अजून घरी जाऊन लग्नाचाही विषय काढला नाहीये. त्याच्यावर किती रामायण होईल माहित नाही आणि ते सर्व सोडून थेट मूलच? डोक्यात विचारांची नुसती गर्दी झाली होती. तिकडे आनंद तिला थोडं शांत करत होता, मधेच जेवण बनवत होता. तिला सर्व दिसत होती त्याची धडपड तिला जपण्याची. पण पुढे काय करायचं यावर दोघांनाही काही बोलता येत नव्हतं. 
         कसेतरी दोन घास घेऊन तिने झोपण्याचा प्रयत्न केला. पण झोप लागणं अशक्य होतं. कितीही सपोर्ट हवा असला तरी आज तिला आनंदचा स्पर्शही नको होता. ती तिच्या रूममध्ये जाऊन पडून राहिली. त्यालाही तिला विचार करायला वेळ देणं आवश्यक होतं. त्याच्या मनातही काही कमी गणिते चाललेली नव्हती. आपण ही प्रेग्नन्सी  कंटिन्यू केली तर अंदाजे कधी बाळ होऊ शकत याची माहिती नेटवर पाहिली. साधारण जायला दीड महिना बाकी होता. तो जमा करून घरी जाऊन लगेच लग्न केले तरी मूल पुढच्या सहा-सात महिन्यांत झाले असते. तोवर तिलाही बाकी लोकांपासून हे लपवून ठेवता आलं नसतं. घरी जाऊन लग्न करण्यासाठी निदान दोन महिने तरी गेले असते एकूण. बरं आता अचानक जायला विचारावं तर मॅनेजर असे थोडक्यासाठी लवकर परतही पाठवणार नव्हता. काम पूर्ण केल्याशिवाय निघणे अशक्य होते. बरं घरी काही इमर्जन्सी नसताना का सोडतील तेही? मोठा पेचच पडला  होता. त्याने अनेक शक्यता पडताळून पाहिल्या आणि मनाशी काहीतरी निश्चित करून तो झोपून गेला. 
         सकाळी दोघांनाही ऑफिसला जायची इच्छा नव्हती. तिला या सर्वातून मार्ग काढायचा होता. पण घरी बसून तरी नुसते विचार मनात येत राहतील म्हणून ते दोघेही ऑफिसमध्ये जाऊन बसले. तिने अनेक गोष्टी नेटवर सर्च केल्या. बाळ कधी होऊ शकते, इथे राहिले तर डॉक्टरकडे जाऊन काय काय चेक केले पाहिजे, लोकांना दिसण्याइतपत  तिचे पोट कधी मोठे होते. पुढचे काही दिवस उलट्या वगैरे झाल्या तर कुणाला काय उत्तर द्यावं असंही एक टेन्शन होतं तिला. त्याच्यासारखेच घरी काय सांगायचे, लग्न करायचे तर कधी हे सर्व विचार ती करत राहिली. प्रत्येकवेळी विचार करताना तिला हेच डोक्यात येत होते की जे झाले ते झाले पण यातून मला बाहेर पडायचे आहे. ते निभावून न्यायचे नाहीये. आपल्याला नक्की काय हवंय याचा विचार तिने करायला सुरुवात केली. आनंद दुपारीच घरी निघून गेला होता. तिला मैत्रिणीने घरी सोडले. 
         घरी गेली तर आनंद सर्व आवरून, जेवण बनवून खुशीत बसला होता. त्याने तिला चहा करून दिला. ती जरा बावरली. आपलं काय चाललंय आणि हा काय करतोय असा विचारही मनात येऊन गेला. त्याने तिला चहा घेऊन दिला आणि सोफ्यावर बसवून बोलायला सुरुवात केली,"हे बघ, आपल्याला आयुष्यभर सोबत राहायचं आहे यात मला तरी शंका नाहीये. तुला आहे का?", त्याने विचारलं. 
तिचं लक्ष नव्हतं. ती त्याच्या प्रश्नाने भानावर आली. "आं!". तिने नकारार्थी मान हलवली. 
तो मग समजावू लागला,"आपल्याला जर सोबत राहायचंच आहे तर मग इतका का विचार करायचा? का टेन्शन घेतेस?". 
ती," अरे पण घरचे नाही म्हणाले तर?" 
तो,"तू गप्प बसणार आहेस का?"
ती,"तसं नाही रे पण त्यांना हे सगळं कसं सांगणार आपण स्वतःहून?". 
तो,"हे बघ आपल्याला लग्न करायचंच आहे तर इथेच करू ना? मी विचार केला तिकडे जाऊन लग्न होईपर्यंत तुझे अडीच तीन महिने होतील. आपण ते इतके दिवस कुणाला न सांगता राहू शकत नाही. मग इथेच लग्न करू आणि घरच्यांना फोनवर सांगू किंवा तिकडे गेल्यावर समजावू. मी सर्व माहिती काढलीय. आपल्याला इथे १५ दिवसाच्या आत लग्न करता येईल अगदी हिंदू भटजींकडून."  आपण सर्व माहिती कशी सविस्तर दिली यावर तो खूष झाला होता. इथेच लग्न करायचे म्हणजे मग तिकडे गेल्यावर सांगितले तरी काही प्रॉब्लेम नाही. " 
तिच्या विचारांपलीकडचे होते सर्व. या अशा मोठ्या गोष्टीत निर्णय घ्यायची वेळ कधी आलीच नव्हती तिच्यावर. त्यामुळे अशावेळी काय करावं याचा ती हजारवेळा विचार करत होती. एक चूक झाली होती आणि त्यापुढे दुसरी नको इतकेच तिचे म्हणणे होते. 
त्याला बोलताना ऐकल्यावर तिला जाणवलं 'मला हे नकोय', लग्न, लगेच ७-८ महिन्यांत मूल, का कशासाठी? लग्नाची, पुढच्या संसाराची कितीतरी स्वप्नं तिने पाहिली होती, अर्थात त्या स्वप्नांत एक बाळ होतंच पण सुरवात त्याने होत नव्हती. आणि सर्व गोष्टी त्या बाळाच्या भोवती फिरत नव्हत्या. त्यात दोघांच्या करियरमध्येही बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि हे सर्व तिला करायचं होतं कुठलेही लादलेले निर्णय न घेता. 
तिने आनंदला सांगितले," खरं सांगू का मला यातलं आता काहीच नकोय. मला मान्य आहे जे झालं त्यावर काहीतरी उपाय शोधायला हवा पण लग्न असं घाईत करणे हा त्यातला एक नक्कीच नाही. मला आपल्या घरच्यांसोबत रीतीने लग्न करायचं होतं आणि आहे. माझे सर्व लाड करवून घ्यायचे आहेत आणि बरंच काही. आपलं करियर आहे, दोघांना अजून आपला असा वेळ हवा आहे. ते सर्व सोडून आपण असं घाईत लग्न करून लोकांना त्याचं स्पष्टीकरण का द्यायचं? मला वाटतंय की मला ही प्रेग्नेंसी नकोय." 
तिच्या या निर्णयावर काय बोलावे त्याला कळेना. ती असेही बोलू शकते असा विचार त्याने केलाच नव्हता. पण आता तिने स्वतःच सांगितलं आहे तर तिच्या मताला पूर्णपणे मान्य करायचं त्याने ठरवलं. 
"ओह! मला वाटत होतं मी एक मुलगा म्हणून शारीरिक फरक पडत नाही पण तुला स्वतःसाठी असा काही निर्णय घ्यायचा असेल की नाही काय माहित म्हणून मी बोललो नव्हतो. पण तुलाच नको असेल तर मला काहीही हरकत नाहीये. शेवटी हे सर्व तुला पार पाडावे लागणार आहे. मी सोबत असलो तरी त्यातून तू स्वतःच जाणार आहेस." 
तिलाही ते पटलं होतं. त्या दोघांनीही अबॉर्शन बद्दल माहिती काढायला सुरुवात केली. 
       तिला जसे माहिती काढेल तशी अजून चीड येत होती अनेक लोकांच्या अनेक मतांचा. एक स्त्री म्हणून तिने कसा बाळाचा जन्म पवित्र मानला पाहिजे किंवा अनेक देशातले अनेक कायदे जे स्त्रियांना अबॉर्शन करायला बंदी आणत आहे. अगदी भारतातला कायदाही वाचला तिने. आपण सध्या अमेरिकेत आहे याबद्दल तिने एक मोकळा श्वास घेतला. पण तोही काही काळापुरताच होता. तिथेही अनेक लोक आहेतच जे 'प्लॅन्ड पेरेंटहूड' सारख्या संस्थांच्या विरोधात आहेत. राग याचा येत होता की सेक्स मध्ये दोघांचाही तितकाच हिस्सा होता पण केवळ आपण तो भ्रूण पोटात वाढवू शकतो म्हणून त्यात अडकून पडलो आहे आणि पुरुष मात्र नामनिराळा राहतो. उद्या त्यालाच जर हे मूळ स्वतःच्या पोटात वाढवावे लागले तर एखादा करेल का मान्य? मूळ वाढवणे किंवा नाही हा दोघांचा निणर्य असला तरी ते दोघांच्या पोटात वाढत नाही. मग त्याबद्दल निर्णय घ्यायचा अधिकार तिच्यापासून कायद्याने का काढून घ्यावा? तिने एका संस्थेत कॉल करून माहिती घेतली काय केले पाहिजे याची. पुढचे दोन दिवस कसेतरी पुढे ढकलले आणि शनिवारी सकाळी ती आनंदसोबत आपल्या अपॉईंटमेन्ट साठी गेली.
        बाहेरच अबॉर्शन विरोधात असणारे लोक मोठ्याने घोषणा देत होते. आत जाऊन सिक्युरिटी गार्डकडून चेकिंग झाल्यावर दोघेही आत गेले .ती नर्सशी बोलली. तिने सांगितले ६ आठवडे होऊन गेले आहेत बाळाला. सोनोग्राफी मध्ये बघायचे आहे का तेही विचारले. पण रितूला ज्यात मन नाहीयेच ते बघायचेही नव्हते. तिने नकार दिला. वाट बघायला सांगून नर्स निघून गेली. थोड्या वेळात डॉक्टर आली आणि तिने सर्व माहिती तपासून घेतली. तिला ऍबॉर्शन साठी लागणाऱ्या गोळीची माहिती दिली. काय काय होईल, काय करायचे हे सर्व सांगितले. तिने सर्व नीट ऐकून घेतले. बाहेर आनंद वाट बघत होता. ती त्याच्यासोबत सर्व गोळ्या घेऊन निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोळी घेतली की सर्व संपले. पुन्हा मग त्यांचे आयुष्य पूर्ववत होणार. रात्रभर ती विचार करत राहिली. त्याला विचारलंही,"तुला खरंच नकोय ना हे सर्व? नक्की सांग." त्याने तिला नकार दिला. सध्या तुझ्यासाठी जो निर्णय योग्य वाटतो तो घेऊयात आपण. मी तुझ्यासोबत आहेच. तिचा निर्णय पक्का होताच. 
     दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तिने औषधे घेतली. तिला चक्कर येत होती, रक्तप्रवाह जास्त होत होता पाळीच्या वेळी. पण हे सर्व अपेक्षित होते म्हणून डॉक्टरने सांगितले होतेच. पाली सुरु झाल्यावर रितुने सुटकेचा श्वास घेतला. पुढचा आठवडा मग आनंदने तिची पूर्ण काळजी घेतली. त्याच्यासोबत असल्यानेच ती हे सर्व निभावून नेऊ शकली होती. कुणाशीही बोलायची इच्छा होत नव्हती तिची. आठवड्यात ठीक होऊन तिने ऑफिसला जायला सुरुवात केली. आनंदलाही सर्व ठीक झाल्याचे समाधान होतेच. "आता आपण परत गेलो की सर्वात आधी लग्न पार पाडायचं आणि मगच बाकीचं" असे त्याने स्वतःला आणि तिलाही समजावून सांगितले होते. त्यांनी जायची तयारी सुरूही केली होती. 
        वरून सर्व ठीक वाटत असलं तरी रितू थोडीशी शांत झाली होती. या इतक्या मोठया धक्क्यातून सावरायला वेळ लागणारच ना? असा विचार करून आनंदही जास्त काही बोलत नव्हता. ती मधेच काहीतरी विचार करत शांत बसायची. अर्थात आता त्यांचे शारीरिक संबंधही नव्हतेच. त्याच्यासोबत हात धरून बसणे किंवा त्याच्या आधाराने सोफयावर पडून राहणे हेही आता होत नव्हतं. कितीही मिस केलं हे सर्व तरी तो तिला आता स्वतःहून विचारणार नव्हताच.  तिला सावरायला हवा तितका वेळ घेऊ द्यायचा असे त्याने ठरवून टाकले होते. घरी जाऊन थोडे दिवस राहिली, सर्व लोकांना भेटली की बॅरो होईल अशी खात्री होती त्याला. निघायला आता फक्त एक आठवडा राहिला होता. 
        एका रात्री कॉल संपल्यावर रितू कॉफी घेत बाहेर बसली होती, पुन्हा एकदा विचार करत. इतका वेळ ती काय करत आहे हे बघायला आनंदही बाहेर आला. तिच्या खांद्यावर हात ठेवून त्याने विचारलं," काय झालं रितू? कसला विचार करत आहेस? जातोय ना आता ४ दिवसांत घरी? होईल सर्व ठीक." त्याच्या आवाजातल्या काळजीने तिला वाईट वाटलं. किती काळजी करतो हा आपली? पण तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू होतं. 
ती बोलू लागली," आनंद मला तू सहा महिन्यापूर्वी आला होतास तेव्हा जे वाटलं होतं ना? तसं वाटत नाहीये गेल्या काही दिवसांत. किती खूष होतो आपण ! गेल्या काही दिवसांत सर्व हरवलंय असं वाटत आहे. आपण गेल्यावर लगेच लग्न करूही पण आज जे वाटत आहे ना ते तसंच वाटत राहिलं तर? पुढे जाऊन फक्त हे सर्व झालंय म्हणून लग्न केलंय असं वाटलं तर? तेंव्हा काय करणार? आज हे सहा आठवड्यांचं फीटस होतं म्हणून काढू शकलो. लग्न, आपलं नातं कसं ऍबॉर्ट करणार? मला वाटतं आपण एक ब्रेक घ्यावा. मला या सर्व गोष्टींवर विचार करायला वेळ हवा आहे."

         गेल्या दोन महिन्यांत जे काही झालं त्यानेही इतका हादरला नव्हता तितका तिच्या या बोलण्याने हादरला होता. आज पर्यंत तिच्या प्रत्येक पायरीवर तो तिच्या सोबत होता. जिच्या प्रेमामुळे आपले ठरवलेले मत बदलून तो अमेरिकेत आला, जिच्या सोबत इतक्या मोठ्या घटनेतून पार पडला, परत जाताना तीच त्याच्या सोबत राहणार नव्हती. इथे येऊन आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली की काय असे वाटून तो स्तब्धपणे बसून राहिला. 
 क्रमश: 

विद्या भुतकर.
       

Monday, January 09, 2017

इष्क मुबारक, दर्द मुबारक: भाग ६

       रितू आणि आनंदला आता लोकांची कुजबुज अजिबात ऐकू यायची नाही. एकतर त्यांनी त्याच्यावर विचार करायचं सोडून दिलं होतं आणि ऑफिसमधल्या लोकांनीही 'यांना बोलून असेही काही फायदा नाही' म्हणत वस्तुस्थिती स्वीकारली होती. फक्त एकच गोष्ट त्यांना खटकायची ती म्हणजे 'आई बाबांना' याबद्दल काहीच सांगू शकत नव्हते ते. तितकी हिंमत काही त्यांना होत नव्हती. त्यातल्या त्यात एक समाधान त्यांना होतं की अजूनही त्यांच्या मध्ये कुठलेही शारीरिक संबंध नव्हते. कितीही आकर्षण असलं तरी एक मित्र किंवा मैत्रीण म्हणून जे प्रेम किंवा आपुलकी असते त्याच्या पलीकडे जाऊन जवळीक करणे याची थोडी त्यांना दोघांनाही भीती वाटत होती, जे आहे ते गमवायची भीती. शिवाय इतक्या वर्षाच्या ओळखीनंतर असं एखाद्या समोर आपले इतके उत्कट भाव व्यक्त करणं यातही थोडा संकोच वाटत होताच.
        पण अशा गोष्टी कितीही ठरवलं तरी व्हायच्या राहतात का? वीकेंडला कधी तिचे केस धुतलेले असताना सोबत स्वयंपाक करणं त्याला अवघड जायचं. आणि कितीही 'टिपिकल वाटलं तरी तिच्या धुतलेल्या केसांचा सुवास, तिच्या चेहऱ्यावरची तरतरी, अशा वेळी तिच्या आसपास असणं त्याला त्रास द्यायचं. तिच्या एखाद्या टोमण्यावर करकचून तिचा मुका घ्यायची इच्छा व्हायची. तर कधी सोफ्यावर बसून टीव्ही बघताना तिच्या मांडीवर डोके ठेवून बघायची. तीही या त्रासातून सुटली नव्हतीच. याचं एखाद्या दिवशी शायनिंग मारत फोटो काढणं, कुठेही जाताना पटकन हात पकडून पुढे घेऊन जायची सवय, कधी जेवण बनवताना खांद्याला धरून 'तू बैस गं' म्हणून खोटं रागावून केलेली जबरदस्ती त्या सगळ्यांतून स्वतःला सावरणं जणू अशक्यच होतं तिला. अनेकदा रात्री कॉल संपल्यावर त्याच्या रूममध्ये जाऊन झोपायची इच्छा व्हायची. पण किती सावरलं होतं तिने स्वतःला.
       अशाच एका रविवारी दोघे जेवण बनवत असताना ती त्याला म्हणाली,"कधी जायचं रे आपण भारतात? मला आता कंटाळा आलाय इथे राहायचा."
त्याने मस्करीने विचारलं,"का माझा कंटाळा आला वाटतं इतक्या लवकर?".
रितू,"तसं नाही रे घरी जाऊन आता जवळजवळ दोन वर्षं झाली. सगळ्यांना कधी एकदा भेटेन असं झालंय." बोलतानाच घरची आठवण येऊन तिच्या डोळ्यांत पाणी दाटलं. त्यालाही थोडं वाईट वाटलं. आपण तिकडे असूनही हिच्या आठवणीत घर विसरलो आणि ती तर केव्हाची इकडेच आहे.
"हो आता लवकरच संपव काम तुझं आणि जाऊ आणि लग्न करू पटकन." त्याने तिला असं म्हणत जवळ ओढलं.
त्याच्या या अचानक जवळीकीने ती थोडी बावरली पण त्याच्या छातीवर डोकं ठेवून तशीच उभी राहिली. तिलाही आता पुढच्या स्वप्नांचे वेध लागले होते. ती अजूनही रडत आहे हे पाहून त्याने तिचा इतकासा चेहरा हातात घेतला. पुन्हा एकदा त्याला मनात आलं,'किती टपोरे डोळे आहेत हिचे'. त्याने तिच्या चेहऱ्याजवळ जात अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तीही जणू या क्षणाची कित्येक वर्षं वाट पहात होती. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने, त्याच्या उष्ण श्वासांच्या वेगाने आणि तिच्या कानामागे असलेल्या त्याच्या हातांच्या ओढीने ती अजून वेडी झाली आणि कितीतरी वेळ दोघेही सर्व विसरून तसेच त्या एका क्षणात हरवून गेले. कुकरच्या शिटीने त्यांना भानावर आणलं.
"लग्नापर्यंत थांबायला हवं रे" असं त्याला म्हणत आणि स्वतःलाही समजावत ती त्याच्यापासून दूर झाली.
        दोन व्यक्तींमध्ये बाकी कितीही पल्ला पार केला तरी त्या दोन ओठामधलं अंतर पार करायला जणू अनेक युगं लोटतात. पण तो क्षण एकदा येऊन गेला की त्याच्या आधीच्या सर्व क्षणांची मुक्ती होते आणि फक्त एक 'किस' मनात राहतो. तसाच तो राहिला दोघांच्याही मनात, श्वासांत आणि त्यांच्या ओठांत. दोघांनीही पुढच्या दोन-तीन दिवसांत त्याची कितीतरी वेळा मनात पुनरावृत्ती केली होती. त्याच्यापुढचा अख्खा आठवडा म्हणजे जणू त्यांची परीक्षाच होती, त्यांच्या संयमाची. पण ते टिकणार नव्हतेच. इतक्या जवळ राहून आणि दोघांना काय हवंय हे माहित असतानाही आवरणं अवघड होतं. शेवटी तो दिवस आलाच जो लग्नाआधी येऊ नाय अशी त्यांची अनावर इच्छा होती. पण आता त्या 'किस' नंतर त्यांना थांबणं शक्य होतं नव्हतं. Finally They Had Sex !
         होय ! त्याच्यानंतर जे झालं ते सांभाळणं मात्र आनंदला अवघड गेलं. रितू रडू लागली. का? त्याला अर्थातच अनेक कारणं होती. इतक्या उत्कट क्षणी तिचं त्याच्याबद्दलचं प्रेम भरून आलं होतं. त्यांतच  'आता पुढे काय करायचं?', 'आपण थांबायला हवं होतं' असे अनेक विचार तिच्या डोक्यात येत होते. तिला नक्की काय समजवायचं हे त्याला कळत नव्हतं. त्याने तसेच तिला आपल्या छातीवर डोके ठेवून पकडून ठेवले. कधीतरी तिची झोप लागून गेली त्याच्याच मिठीत. आपण जिच्यावर इतके प्रेम करतो ती खरंच आपल्या मिठीत आहे आणि इतक्या प्रेमाने झोपलीय हे पाहून त्याला एक प्रकारचं समाधान वाटत होतं आणि सोबत 'सकाळी तिची काय प्रतिक्रिया असेल' याची त्याला  काळजीही.
      पण मुळात हा सगळा विचार करायला त्यांना वेळ झालाच नाही. सकाळी उशिराच जाग आली,"अरे माझी मिटिंग होती ९ वाजता" असं ओरडतच आपले कपडे त्याच्या रूममधून गोळा करत रितू बाथरुमकडे पळाली. दोघांची आवरण्यात एकदम धावपळ झाली. नास्ता करून डबे भरून दोघेही ऑफिसला निघाले. रात्रीबद्दल विचार करायला फुरसतच नव्हती. ऑफिस आल्यावर तो तिला म्हणाला,"तू जा पुढे मी कार पार्क करून येतो नंतर." ती "हो" म्हणून गप्प बसली. गाडी स्लो करत असतानाच त्याने पुढे होऊन तिच्या गालांवर एक किस घेतला आणि 'गुड डे' म्हणत गाडी थांबवली. तीही लाजून हसत 'यू टू' म्हणत लॅपटॉप घेऊन घाईत बिल्डिंगमध्ये घुसली. पुढच्या काही दिवसांत कोण कुणाला जास्त प्रेम व्यक्त करून दाखवतो याची जणू रेसच लागली होती. वेगवेगळ्या प्रकारे दोघे एकमेकांना खूष ठेवत होते. कधी आवडीचे जेवण बनवून, कधी घर साफ करून कधी फुले-कॅण्डलने घर सजवून आणि वेगवेगळ्या प्रेमाच्या नोट्स देऊन. कितीही बालिश वाटलं तरी त्यांचं पहिलं प्रेम होतं ते !
        एक दिवस रात्री जेवण झाल्यावर आनंदने तिला जवळ घेत विचारले, "कधी आहे कॉल तुझा?".
ती वैतागून बोलली,"रात्री अकरा वाजता !"
इतक्या उशिरा तिचे कॉल असले की तो कंटाळून झोपून जायचा. त्याने लाडीकपणे विचारले,"चला म्हणजे अजून एक तास आहे."
त्याचा हेतू समजून ती म्हणाली," मला हे कॉल च्या आधी वगैरे काही जमणार नाही हां."
त्याने तिच्या केसांतून हात फिरवीत विचारले,"असं काय? नुसता रिपोर्टींग कॉल आहे ना?"
ती,"हो, पण तू मला उगाच आग्रह करू नकोस. मला उशीर होईल तू जा झोपायला." आणि ती त्याच्या मिठीतून बाहेर पडत उठून गेली. तो हिरमुसला आणि तिथेच बसून राहिला. ती परत बाहेर येत नाही हे पाहून तो त्याच्या रूममध्ये जाऊन झोपून गेला.
लवकरच तिचा कॉल सुरु झाला आणि बऱ्याच वेळाने संपला. अर्थात आता त्यात तिचे लक्ष लागतही नव्हते. कॉल नंतर पाणी पिऊन ती त्याच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहून पुन्हा आपल्या रूम मध्ये गेली. "सारखं काय विचारायचं? काम वगैरे असतं की नाही?", तिने विचार केला.
       'तो रुसून झोपलाय' या विचाराने तिला झोप येईना. उगाच चुळबुळ करत ती पडून राहिली. या अशा नात्यामध्ये कधी भांडण झालं की मात्र त्रास जास्त होतो. एकतर त्याच्यावर चिडलोय हे बाकी कुणाला सांगता येत नाही. बरं आजपर्यंत कुठल्याही गोष्टीत ज्या प्रिय मित्राला सांगायचो तोच आता 'प्रियकर' झाल्यावर त्या 'मित्राची' अजून आठवण येते. अजून किती वेळ असं बसणार म्हणून ती वैतागली. तिला त्याच्यावर चिडल्याचे वाईट वाटले. आपली चादर उचलून ती त्याच्या रूममध्ये गेली. त्याला झोपतेच सरकायला सांगून त्याच्या पांघरुणात घुसली. त्यानेही तिला एका हाताने मिठीत घेतलं आणि झोपून राहिला. त्याचा हात अंगावर घेऊन तिला बरं वाटलं, तिची चुळबुळ आता थांबली होती. कधीतरी तिची झोप लागून गेली.
        त्यांना अजून दोनेक महिने काम बाकी होते. घरी जायचे वेध दोघांनाही लागले होते. तिच्या घरचे ती येणार म्हणून आधीपासूनच मुलांचे फोटो, माहिती तिला पाठवू लागले होते. त्यांना हे सर्व कसे सांगायचे हा मोठा प्रश्न तिला होताच. पण आनंद सोबत होता तिच्या आणि इथून माघार नाही हे दोघांनीही पक्के केले होते. राहत्या घरातले सामान विकायचे, काय काय परत न्यायचे, खरेदी कधी करायचे याच्या चर्चा अनेक वेळा करून झाल्या होत्या. त्यानेही तिच्या प्रोजेक्ट्च्या वेळेतच आपले कामही पूर्ण करायचे ठरवले होते त्यामुळे त्याची धावपळ होत असायचीच. एक दिवस तो उशिरापर्यंत ऑफिसमध्येच होता. तिचे त्याला ७-८ कॉल येऊन गेले होते. त्याने 'In meeting' असा मेसेज करूनही तिचा फोन येतंच होता. त्याने तो सायलेंट करून काम पटकन पूर्ण करून घरी जायचे ठरवले. मिटिंग मधून बाहेर आल्यावर त्याने तिला फोन केला. रितू फोनवर बरीच घाबरलेली वाटत होती.
       "हे बघ तू उगाच घाबरू नकोस मी घरी येतोय मग बोलू आपण. तू शांत हो मी आलोच २० मिनिटांत असे सांगून आनंदने तिला शांत केले आणि काळजीत तोही लगेच घरी निघाला. घरी आल्यावर तिने त्याला सांगितलं," अरे अशी उशिरा येत नाही कधी. मी गेले ५-७ दिवस झाले वाट बघतीय. मला खूप टेन्शन येतंय."
"हे बघ मला तरी असे काही होईल असे वाटत नाहीये. पण तुझ्या खात्रीसाठी आपण चेक करून घेऊ. " त्याने समजावले. तिने मन हलवली. थोडे इंटरनेट वर चेक करून ते दोघेही फार्मसीत गेले. टेस्ट दुसऱ्या दिवशी सकाळी करायची होती. दोघांनीही अख्खी रात्र 'काय होईल' बेचैनीत घालवली.
        पहाटे पहाटे तिने बाथरूममध्ये जाऊन टेस्ट केली. पुढचे २-४ मिनिटंही तिला उसंत नव्हती. आनंदही तिच्यासोबत ती टेस्ट पहात होता. टेस्ट पॉसिटीव्ह होती. मोठ्या अक्षरात त्या स्टीकवर दिसत होते,"Pregnant!".

क्रमश:

विद्या भुतकर.

Sunday, January 08, 2017

इष्क मुबारक, दर्द मुबारक: भाग ५

       आनंद खरंच आपल्यासमोर आहे आणि सोबत आहे यावर कितीतरी वेळ रितूचा विश्वास बसत नव्हता. कितीतरी वेळ हरखलीच होती ती. नुसती हसत होती वेडयासारखी छोट्या-मोठ्या कारणाने. दिवसभराच्या उत्साहात काम करण्यात लक्ष कुठे होतं तिचं? कसंबसं काम संपवून ती त्याच्यासोबत ऑफिसमधून बाहेर पडली. तिला सरप्राईज देण्यासाठी सर्व सामान हॉटेलवर ठेवूनच तो ऑफिसला आला होता. त्याला ती आपल्या घरी घेऊन गेली. घरी गेल्यावर समोरच तिने सकाळी घाईत टाकलेला ड्रेस पडला होता, सिंक मध्ये भांडी तशीच. असाही एकटा जीव, कोण येणार आणि कुणासाठी आवरायचं? तिला ओशाळल्यासारखं झालं. तिने घरात येऊन पटापट कपडे गुंडाळून रूममध्ये टाकले. त्याला बसायला सांगून किचनकट्ट्यावरील भांडी सिंकमध्ये ठेवली आणि चहा करायला ठेवला आणि त्याच्यासमोर जाऊन बसली.
        त्याच्या डोळ्यांत झोप दाटून आली होती. प्रवासाचा थकवा जाणवत होता. तिने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. त्याने हलकेच हाताने 'शेजारी बैस ना' अशी खूण केली. ती समोरून उठून त्याच्याशेजारी बसली. त्याने तिचा हात हातात घेतला आणि ती शहारली. त्याचा हाताचा  स्पर्श, त्याचं डोळ्यांत रोखून बघणं तिला आरपार कापत होतं. 'I missed you' म्हणत त्याने तिच्या खांदयावर डोकं ठेवलं. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू गळत राहिले. दोन क्षणांतच ते जणू सर्व जग विसरून गेले होते. आणि इतक्या दिवसांत आपण कशाची वाट बघत होतो हेच त्यांना कळत नव्हतं. ती दचकली ती उतू जाणाऱ्या चहाच्या आवाजाने. पट्कन जाऊन तिने चहा शेगडीवरून उचलला आणि शेगडी बंद केली. चहा गाळून ती घेऊन आली तोवर त्याची झोप लागली होती. जेटलॅगचा परिणाम किती असतो हे तिला चांगलंच माहित होतं. त्याला उठवणं अशक्य होतं. तिने रात्रीच्या जेवणासाठीही त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ होता. त्याला सोफयावर झोपू देऊन ती झोपून गेली. आज तो आपल्यासोबत एका घरात आहे यावर अजूनही तिचा विश्वास बसत नव्हता.
         संध्याकाळ पासून झोपल्याने आनंदला पहाटेच जाग आली. थोडा वेळ लागला आपण कुठे आहोत हे समजायला. पण त्याने उठून घरात एक चक्कर मारली. भूक लागल्याने किचनमध्ये पाहिलं तर त्याच्यासाठी तिने थोडे फार खायचे सामान कट्ट्यावर काढून ठेवले होते. त्याने हसून थोडंसं खाऊनही घेतलं आणि रितूच्या उठण्याची वाट बघू लागला. सकाळी रितू उठली आणि तिची थोडी धावपळ झालीच. एक तर आवर्जून तयार व्हायचं होतं त्यानंतर त्याच्या हॉटेलवर जाऊन त्याला तयार होऊन ऑफिसला पोहोचायचं होतं. तिला सर्व सराईतपणे करताना पाहून त्याला किती छान वाटत होतं. गाडी शिकतानाची तिची भीति, नविन गाडी घेताना असलेल्या शंका, या सगळ्यांत तो तिला धीर देत असायचा.  आणि आता पहिल्या दोन-चार दिवसातंच आनंदला तिने सर्व गाव फिरवून दाखवलं. कधी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन गेली. आजूबाजूच्या लोकांचे, ऑफिसचे कशाचेच भान दोघांना नव्हते. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच असावं. 
          आता या आठवड्यातच त्याला हॉटेलमधून बाहेर पडावं लागणार होतं. त्याने दोन तीन ठिकाणी चौकशी केलीही होतीच. पण सगळीकडे वर्षभराचे कॉन्ट्रॅक्ट होतेच. एखाद्याच्या रूमवरच राहावे असाही विचार करून झाला होता. पण रितूसोबत घालवायच्या वेळात ही असली कामे करण्यात त्याला अजिबातच इंटरेस्ट नव्हता. शनिवारी रितूनेच विषय काढला, "तू माझ्यासोबत राहशील का? ". तिच्या या प्रश्नाने तो तर उडालाच. ती पुढे बोलत होती,"माझे ट्रान्झिशन ३-४ महिन्यात होईल. नवीन माणसाचा व्हिसा हे सर्व होऊन येईपर्यंत इतका वेळ तर जाणारंच आहे. मीही एकटीच राहते. उगाच कशाला दोघांनी वेगळे घरभाडे भरायचे? शिवाय इथेही २ रूम आहेतच. माझे आहे ते कॉन्ट्रॅक्ट संपवून परत जाऊ आपण." तिचं म्हणणं बरोबर होतं. दिवसभर आणि रात्रीही बराच वेळ ते सोबतच असायचे. खरंतर त्याला कुणा रूममेटसोबत राहून तिच्यासोबत घालवायचा वेळ कमी करायचा नव्हता. त्यामुळे कितीही दचकला असला तरी त्यालाही हे चालणार होतं. फक्त प्रश्न एकच होता, "लोक काय म्हणतील?". 
        "लोक काय म्हणतील?" कितीतरी वेळ ते दोघे विचार करत होते. कितीही घरापासून दूर असले तरी शेवटी आसपासचे सर्कल तेच असते. तेच कंपनीतील लोक, त्यांच्याशी बोलणारे भारतातील ओळखीचे लोक. अशा बातम्या पसरायला वेळ लागत नाही आणि तुम्ही कुठेही असला तरी ते टाळू शकत नाही. शिवाय दोघांचे घरचेही होतेच. त्यांना काय सांगणार होते? एक भारतीय म्हणून कितीही भारतातून दूर राहिले तरी हे असले प्रश्न आपल्या भारतीय असल्याची आठवण करून देतात. असो. प्रेमात वेडेपणा करणारे ते एकटेच नव्हते आणि पहिलेही. त्यामुळे लवकरच सर्व सामान घेऊन आनंद रितूसोबत शिफ्ट झाला होता. रितूने घरी काही विषय काढलाच नाही आणि आनंदनेही खोटेच कारण सांगितले होते. पण तिच्यासोबत राहण्याच्या एकसाईटमेन्ट समोर असे छोटे विषय जास्त वेळ डोक्यात राहिलेही नाहीत. त्याची रूम सेट करण्यात पुढचा अख्खा आठवडा गेला होता.
         कुठल्याही गोष्टीच्या नवेपणात ज्या आठवणी गोळा होतात ना त्या कशातही नसतात. नवं प्रेम असो किंवा नवं लग्न किंवा नुकतंच जन्मलेलं बाळ. सुरुवातीच्या दिवसांतल्या काही गोष्टींतच आयुष्यभराच्या आठवणी आपण जमवतो. आणि पुढे आयुष्यात काहीही झाले तरी त्या आठवणी कधीही विसरल्या जात नाहीत. असेच चालू होते त्यांचे ते नव्याचे नऊ दिवस. आनंदही अनेक वर्षं अमेरिकेत राहिल्याने तिथल्या आयुष्याची त्याला चांगलीच कल्पना होती. त्यामुळं रोज सकाळी आवरून घाईत नाष्टा करून जाण्यात, संध्याकाळी एकत्र जेवण बनवण्यात आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र फिरायला जाण्यात सर्व वेळ जायचा. जणू लग्नानंतरच्या आयुष्याची एक झलकच होती ती. 
        हे सर्व असले तरी दोघांनाही संध्याकाळी झाली की थोडे अस्वस्थ वाटायचेच. दोघांनाही संध्याकाळी एकमेकांशी बोलण्यासाठी ऑनलाईन राहायची सवय लागली होती. सुरुवातीचे काही दिवस दोघेही अगदी नियमाने सर्व वेळेत करायचे. पण नव्याचे नऊ दिवस संपले आणि हळूहळू ते दोघेही संध्याकाळी आपले लॅपटॉप घेऊन बसू लागले. एकमेकांसोबत बोलताना ते बाकी मित्र-मैत्रिणींशी बोलायचे, त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलू लागले. दोघे एकमेकांशेजारी असूनही संध्याकाळचा तासभर तरी त्यात जायचाच. कधी दोघेही टीव्ही बघत बसायचे आणि रात्री उशिरा जेवण बनवायचे. त्यात अजून एक त्रास होता तो म्हणजे रितूला वेळी अवेळी येणाऱ्या ऑफिसच्या कॉल्सचा. अर्थात ते असणार हे दोघांनाही माहित होतंच. तिला जाण्याआधी बरीच कामे पूर्ण करायची होती. त्यामुळे भारतातून येणारे कॉल्स शक्यतो रात्रीच असायचे. 
         असेच एक दिवस संध्याकाळी सुरु झालेले तिचे कॉल्स रात्री उशिरा पर्यंत चालले आणि बाहेर येऊन पाहिले तर आनंदही मित्राशी चॅट करत बसला आहे. जेवायलाही काही शिल्लक नव्हते. तिची फार चिडचिड झाली. .तिने त्याला थोडे रागानेच विचारले,"आनंद जेवण कधी बनवायचे आहे?". तिचा टोन पाहून त्यानेही लगेच गप्पा थांबवून किचनमध्ये धाव घेतली. आता रात्रीचे अकरा वाजले होते आणि आता यापुढे 'काय बनवायचे?' हा त्याचा प्रश्न ऐकून तर तिचा बांधच फुटला. "मला भूक लागली आहे अरे ! आता कधी बनवणार आणि कधी खाणार? बाहेर पण सर्व बंद असेल आता. " असे म्हणत तिने रडायला सुरुवात केली. त्याला अचानक तिचे रडू पाहून काय करावे ते कळेना. त्याने तिला सोफयावर बसवले आणि समजवायला सुरुवात केली, "अगं विवेक होता. किती दिवसांनी बोलत होतो. वेळ कसा गेला कळेलच नाही. सॉरी ! थांब मी मॅगी करतो ५-१० मिनिटांत होईल." तो घाईने कामाला लागला. पटापट मॅगी बनवून तिला आणून दिली. पहिले दोन-चार घास तर तिने घाईनेच खाल्ले. पॉट थोडं शांत झाल्यावर तिने वर पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं अजून त्यानेही काही खाल्लं नाहीये. 
ती मग हळूच बोलली," तूही घे ना." 
"नाही नको. तुला अजून लागलं तर संपलंय म्हणून अजून रडशील.", त्याने गमतीने तिला चिडवलं. 
"एव्हढी काही खादाड नाहीये हां मी."तिच्या आवाजावरून ती शांत झाल्याचं कळत होतंच.
"अरे एकतर ते कॉल्स संपत नाहीत. इतके फालतू प्रश्न विचारत राहतात. अभ्यास करून या म्हटलं तर काहीही न वाचता येतात आणि सर्व मी आयतं सांगावं अशी अपेक्षा करतात." तिच्या डोक्यातलं सर्व बाहेर पडत होतं आणि तो बसून ऐकत होता. 
"बसून बसून पाठ दुखायला लागली. उद्या सकाळी पण लवकर जायचंय. त्यात ही पोटदुखी. मला त्रास होतो फार पिरियड्स चा. आज संध्याकाळी जाऊन पॅड्स आणायचे होते. ते करायलाही जमलं नाही. आता कधी जाणार?" तिच्या आवाजात आता पुन्हा रडू दाटून येत होतं. मुख्य म्हणजे दोन महिन्यात तिने कितीही झालं तरी तिच्या या गोष्टी त्याच्यापासून राखूनच ठेवल्या होत्या. आपल्या पिरियड्स बद्दल त्याला उगाच का सांगावं म्हणून. कितीही जवळचा म्हटलं तरी ती अजून मोकळेपणाने त्याच्याशी यावर कधी बोलली नव्हती आणि असेही एकत्र राहीपर्यंत या सर्व गोष्टी सांगायचा प्रश्न येतोच कुठे? तिने खाऊन डिश सिंकमध्ये ठेवली. तो लगेच तिच्यामागे आलाच. 
"हे बघ तू झोप आता मी जाऊन येतो फार्मसी मध्ये. तुला काय हवं आहे ते सांग मला.", आनंद बोलला. 
'बाप रे आता याला पॅड्स पण आणायला सांगायचे? ' तिचं मन कचरत होतं. 
ती म्हणालीही, "नाही अरे असू दे. तू सोबत ये पाहिजे तर. २४ तास फार्मसी मध्ये मिळतील. तू फक्त सोबत चल." 
त्याने तिला गप्प केलं. "हे बघ एकतर तुला काही झेपत नाहीये. त्यात कुठे अजून इतक्या लांब येतेस. शांतपणे घरी बस मी जाऊन येतो. तो आपले ऐकणार नाही हे कळल्यावर ती गप्प बसली. त्याला पॅड्स चे नाव सांगितले आणि कुठे ठेवलेले असतील हेही आणि सोफयावर पडून राहिली. 
          बाहेर पडल्यापासून पंधरा मिनिटांतच त्याचा फोन तिला आला,"अगं हे किती काय प्रकार आहेत, मला काही कळत नाहीये. तू सांगितलेल्या कव्हरच्या रंगाचेही २-४ दिसत आहेत." तिला हसू आलं. तिने त्याला अजून डिटेल्स सांगून त्याने काहीतरी घेतले आणि तो तिथून निघाला. 'आपण घेतले ते बरोबर असू दे रे बाबा' अशी एकच प्रार्थना तो मनात करत होता. तो घरी आल्यावर त्याने तिला ते पॅड्स दिले आणि किचन आवरायला घेतले. रात्रीचा एक वाजत आला होता. त्या ते सर्व आवरताना पाहून तिला भरून आलं आणि त्याच्यावर प्रेमही. त्याने येताना एक आईस्क्रीमचा डब्बाही आणला होता. आवरून दोन वाट्यांमध्ये आईस्क्रीम घेऊन तो तिच्यासोबत बसला. 
खाता खाता मधेच बोलला, "रितू, आपण दोघे चांगले मित्र म्हणून राहतो आणि रूममेट म्हणूनही. उद्या माझ्याजागी मुलगी असती तर तिला तू सांगितलं असतंच ना तुला काय होतंय? तिने मान डोलावली. 
"मग मला सांगायला काय हरकत आहे? " त्याने विचारलं. "यापुढे हे असले काही लपवून ठेवायचे नाही. प्रत्येकाच्या शारीरिक गरजा असतात. तुला मी रोज केस विस्कटलेल्या अवतारात पाहतो आणि आवरलेल्याही. प्रत्येकवेळी तू चांगलीच दिसावीस अशी काही माझी अपेक्षा नसते. तसेच तुला काही बरं नसताना किंवा अजून काही असेल तर मला तू सांगितलंच पाहिजे. उद्या मला ताप आला तर तू नाही करणार का माझं? बरोबर ना? ", तिला त्याचं म्हणणं पटलं होतं. "आईस्क्रीम छान आहे रे" म्हणत तिने अजून एक चमचा मागितलं. आज जेवणापेक्षा त्याच्या बोलण्यानेच तिचं पोट भरलं होतं. 

क्रमश:

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, January 04, 2017

सब मोह माया है

        माणसाचं मन कशाकशात अडकलेलं असतं, नाही? आज एक नवीन वही घेतली नवीन वर्षात काहीतरी लिहायला. नव्या वहीच्या पहिल्या पानावर लिहायची अधीरता आणि चुकूनही एखादी चूक होऊ नये म्हणून घेतलेली खबरदारी दोन्हीही पुन्हा नव्याने जाणवत होतं. असो. शाळेत किती छोट्या छोट्या गोष्टीत मन अडकलेलं असायचं आठवूनही हसू येतं. चित्रकलेचे खडू, काळा स्केचपेन, कंपास, एखादं पेन, वहीच्या पानात जपलेल्या मिक्स शेड्स च्या गुलाबाच्या पाकळ्या आणि मैत्रिणीशी देवाणघेवाण करून मिळवलेलं मोराचं पीस, अशा अनेक छोट्या वस्तू, पण किती मौल्यवान!
       सानूकडे एक छोटीशी पेटी आहे तिनेच रंगवलेली. त्यात तिनेही अशाच बारीक-सारीक गोष्टी ठेवलेल्या आहेत. स्वनिकने हात लावला की भांडण ठरलेलं. ती भांडते आणि तितक्याच आवेशाने काढून घेऊन जपून ठेवते. अशावेळी वाटतं तिला काय सांगणार? आपण तरी काय वेगळे आहोत? आता त्याच 'छोट्या' गोष्टी थोड्या 'मोठ्या' झाल्यात इतकंच. आणि त्यात एक स्त्री म्हणून आपलं मन जरा जास्तच गोष्टीत गुंततं असं मला वाटतं. 
       सगळ्यात जास्त जीव त्या कपड्यात असतो. साड्या, चुडीदार, लग्नाची साडी, लग्नाच्या वाढदिवसाला भेट दिलेली साडी, अमुक-तमुक साडी, अशा अनेक. माझे बरेच ७-८ वर्षं जुने चुडीदार आहेत सांभाळून ठेवलेले. आता फारसे वापरले जात नाहीत, पण त्यांना कुणाच्या हातातही देववत नाही. बरं, नुसते माझे कपडे आहेत का? पोरांच्याही कपड्यात जीव अडकलेला असतो. ते जन्मले तेंव्हाचा, पहिल्या वाढदिवसाचा, कधी आजी दिलेला, कधी स्वतःला आवडतो म्हणून घेतलेला पण पोरांनी कधीच न घातलेला. ते कुणाला द्यायचे म्हणजे काळजाचा तुकडाच देतोय असं वाटतं. आजपर्यंत अनेक कपडे दिलेही असे कुणा-कुणाला, कधी बहिणीच्या मुलाला, मावशीच्या नातवांना, पुतण्याला. पण तरीही अजून काही खास आहेतच ते आजही जपून ठेवले आहेत. त्यांचं काय करायचं या विषयावर सध्यातरी विचार करत नाही. :) आमच्या आईने माझ्यासाठी बनवलेले टोपडे अजूनही जपून ठेवले आहे त्यामुळे या स्वभावात माझा दोष आहे असे मुळीच म्हणता येणार नाही. (हा गुण कुठून आल्या कळलंच असेल. ;) ) 
        कपड्यानंतर येतात दागिने, एखादे घड्याळ( माझी तर बंद पडलेली जुनीही आहेत अजून १२-१३ वर्षे जुनीही. ) एखादी पर्स अशा अनेक वस्तू. कधी म्हणून किंवा आवडली म्हणून ती वस्तू जवळची होते आणि कितीही खराब झाली किंवा जपून ठेवली तरी ती कुणाला द्यायची हिम्मत होत नाही. कधी बाबांची बॅग असते, आजीचा बटवा असतो तर कधी एखादी चप्पलही असते. या सर्व वस्तू तर ठीक आहेत, पण घरातल्या भांड्यांवरही जीव बायकांचा. :) २५ वर्षापूर्वीचे प्रोटीनएक्स चे पत्र्याचे डबे, बरण्या, एखादे आमटीचे भांडे, स्टीलचे एका आकाराचे डबे, अगदी बोर्नविटाच्या प्लॅस्टिकच्या बाटल्याही जपून ठेवायची इच्छा होते एखाद्याला. आणि ते एकदा घरात राहिले आणि त्यावर जीव बसला की त्यांचं बाहेर पडणं मुश्किल. इथे कधी कधी हॉटेलातून जेवण मागवल्यावर जे प्लास्टिकचे डब्यात घालून ते देतात ना? ते डबेही सोडवत नाहीत. कधी एखादी छोटी डबी असेल कुणाला दिलेली असेल तर घरी येईपर्यंत चैन पडणार नाही. कुणाला वाटेल ती छोटीशी डबी तर आहे. पण त्यांतच आपला जीव असायचा. कुणी सांगावं? :) 
          
        जितका जीव अडकतो तितकेच सामान गोळा होत राहते. कुठलीही वस्तू घरातून टाकून देताना किंवा दुसऱ्याला देताना मन कचरते किंवा राहू दे म्हणून सर्व साचून तसेच राहते, वर्षानुवर्षे, असेच सानूच्या त्या छोट्या पेटीसारखे. आणि जितके दिवस ते सोबत राहिले तितका अजून त्यात जीव. बारीक सारीक वस्तू तर झाल्याच, मोठ्याही असतातच. एखाद्याचा जीव घरात असतो. ते घर मोठ्या मेहनतीने बनवलेलं असतं, त्यामुळे त्याला जीवापाड जपतात तर कुणाचा जमीनजुमल्यात. ती आपल्या ताब्यात आहे तोवर जीव तोडून त्याचं संरक्षण करतील. मला तर आमचे पुण्यातले घर इतके प्रिय आहे की मी संदीपला गमतीने म्हणतेही, मी गेल्यानंतरही तिथे राहीन. :)) तर एकूण काय की माणसांत तर जीव रमतोच पण या छोट्या मोठ्या गोष्टीत कधी अडकून पडतो कळतही नाही. एखादा म्हणेलही ही की ही सर्व मोह-माया आहे आणि यातून बाहेर पडणं म्हणजेच खरा मोक्ष आहे. ते सर्व मान्य आहे पण त्यात न अडकता जगण्यातही कुठे मजा आहे? लहानपणी छोट्या पेटीपासून सुरुवात होते आणि आपण मरेपर्यंत काही ना काही आपलं मन पकडून ठेवतंच. आणि ते असणंच आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं, नाही का? 

विद्या भुतकर.
      

Tuesday, January 03, 2017

घर 'आपले'

        दहा दिवसांच्या सुट्टीनंतर घरी निघत असताना विमानातच स्वनिकची कुरबुर सुरु झाली. 'मला शाळेत नाही जायचंय, तिथे कुणी माझ्याशी नीट बोलत नाही', 'मला शाळा आवडत नाही', इ. इ. त्यावरून कळतंच होतं की त्याला आता घरी जायची इच्छा होत नाहीये. अर्थात सुट्टीनंतर कुणालाही ते वाटणारच. पण घरी पोचलो आणि सर्वात पहिली आश्चर्याची प्रतिक्रिया मुलांची होती. दोघेही, "homey I missed you !!" म्हणून ओरडत होते. थोडे दिवस झाले की सर्वांनाच घराची ओढ लागतेच, कुठेही असो. मोठे म्हणून आपल्याला जाणवते ते ठीकच पण मुलांनाही ते इतक्या तीव्रतेने वाटते हे पाहून आनंद वाटला. There is no place like home. :) आपलं घर कितीही लहान असो किंवा साधं असो, शेवटी ते 'आपलं' असतं. तर सुट्टीनंतर घरी आल्यावर आम्हीही जेवण करून दुपारी मस्त झोपून गेलो. अगदी दहा दिवस काहीही धावपळ ना करताही घरी आल्यावर एक झोप काढूनच काम करायला हुरूप आला. 
        कुठेही गेल्यावर घरी कुणी नसलं तरीही आपलं घर आपली वाट पहात आहे असं वाटतं. जिथे कुठे असू तिथे मन रमेनासं होतं. मलाच काय, आमच्या आईंनाही (म्हणजे सासूबाईंना) अनेकवेळा पुण्यात राहात असल्यावर घराचे वेध लागलेले पाहिले आहे. घरी आल्यावर, आपल्या ओळखीच्या भांड्यात, नेहमीच्या सवयीने पटकन खिचडी करून खाण्यातही मजा असते. कधी कधी भारतातून आल्यावर त्रास होतो. एकटेपणा किंवा सर्वाना सोडून आल्याचं दुःख असतं. मुख्य म्हणजे तिथलं घरही मागे सोडून आल्याचं जास्त वाईट वाटत असतं. आपण त्याला आता कधी बघणार हा विचार मनात येत राहतो. पण घरी येऊन रुटीन सुरु झालं की आपलं घर हळूहळू त्या एकटेपणाला भरून काढतंय असं वाटतं. त्याच्या आपलेपणाच्या उबेत सामावून घेत राहतं. 
        हे सर्व विचार करताना लक्षात आलं की अशा छोट्या सुट्ट्या संपल्यावर घरी परत तरी जाता येतं. पण अनेकवेळा असंही झालंय ज्या घरात अनेक वर्षं राहिलेय ते सोडून नवीन ठिकाणी जावं लागलंय. मग ते शिकागोतून पुणे असो किंवा पुण्यातून बॉस्टन. एखादं घर असं कायमचं सोडायचं म्हणजे किती अवघड आहे? तिथून पुढे नवीन ठिकाणी गेल्यावर महिन्याभरातच त्या जुन्या घराची अनेकवेळा आठवण यायची पण ते तिथं नसायचंच पुन्हा जाण्यासाठी. अशा परतता  न येणाऱ्या घराच्या आठवणीतून बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागलाय प्रत्येकवेळा. पुढे जाऊन नवीन ठिकाणी घर बनवलंच तरीही जुने घर कधी विसरले गेले नाही. त्या त्या घरांमध्ये साजरे केलेले सण, मुले झाल्यावर त्यांची बारसे, साजरे केलेले वाढदिवस सर्व सर्व आठवत राहतं. 
        आता विचार करा हे सर्व आम्ही नवीन संसार मांडलेले, पुण्यातले किंवा नवीन नोकरीच्या ठिकाणी घेतलेले घर होते. आम्ही दोघांनी मिळून उभे केलेले, नवीन-जुन्या वस्तू मांडून सजवलेले, प्रत्येकवेळी तितक्याच उत्साहाने. आणि नवीन ठिकाणी गेल्यावरही आम्ही दोघेच होतो. लग्नानंतर अमेरिकेतच राहिल्याने कधी माहेर सोडून सासरी गेलीय असे झालेच नाही. त्यामुळे मी मागे काही सोडून जातेय असं वाटलं नाही. मला हे सासर-माहेर वेगळं असं वाटत नाही, वाटलं नाही माझ्यासाठी तरी. पण तेच एखादी मुलगी लग्नानंतर आई-वडिलांचे घर सोडून सासरी येते तेव्हा? निघताना तिला अनेकांनी सांगितलेलं असतं 'आता तू सासरचीच झालीस'. पुढे सासरच्या घरी आल्यावर नवीन सर्व लोकं तर असतातच शिवाय मागे सोडलेले माहेरचे लोकंही असतात. मी विचार करत होते, अशा मुलीला सासरचे घर हे 'माझे घर' आणि 'आईचे घर'असे कधी होत असेल? थोड्या दिवसांनी माहेरच्या लोकांसोबत घराची आठवण आल्यावर कसे वाटत असेल? किती काळ जात असेल नवीन घराला 'आपले' मानण्यात? आणि त्यातही त्या नवीन घरावर हक्क दाखवणारे लोक आधीच तिथे असताना? आजही मला सासरचे म्हणजे,'संदीपचे घर' आणि माहेरचे म्हणजे 'माझे घर' असे वाटते. पण अनेक मुली, मैत्रिणी मी पाहते त्या, सासरच्या घराला 'आमचे घर' म्हणतात आणि दुसरे 'आईच घर'. असे करणे किती अवघड आहे नाही? निदान माझ्यासाठी तरी. 
       त्या सर्व मुलींच्या धाडसाचे, हिंमतीचे आणि सामावून जाण्याच्या स्वभावाचे कौतुक वाटते मला. कदाचित स्त्रीच्या या स्वभावामुळेच पुढे जाऊनही त्या तितक्याच सहजतेने सामावून जातात आणि घेतातही. मी इथे अमेरिकेत अनेक आई-बाबांना आले असताना पाहिलं आहे. आई किंवा सासू जितक्या आपलेपणाने किंवा मुलाच्या-मुलीच्या घरात राहतात तितके बाबांना जमत नाही. अनेकवेळा तर यातले बाबा ठरलेल्या तारखेच्या आधीच भारतात परत जातात. त्याचं मुख्य कारण मला वाटतं की या बाबांना आपल्या घरातून बाहेर सामावून घेणं जमतच नाही. आपलं घर जिथे आपला हक्क आहे, आपलं राज्य आहे तिथून दुसऱ्याच्या (मग ते स्वतःच्या मुलाचे किंवा मुलीचे का असेना) तिथे राहणं जमत नाही. पण तेच मुलीकडून, सुनेकडून किंवा बायकोकडून किती सहजपणे अपेक्षित असते? 
     हा घराचा विषय कुठून कुठे गेला ना? पण खरंच आपलं घर सोडून थोड्या वेळासाठी बाहेर राहणेच किती अवघड असते, अशावेळी कुणी मुलगी आपले घर कायमचे सोडून आल्यावर तिला कसे वाटत असेल याची कल्पनाही करवत नाही. एक स्त्री म्हणून त्या सर्वांचे मला मनापासून कौतुक वाटते आणि अभिमानही. आता सासरी जाण्याची प्रथा बदलणे नजीकच्या भविष्यात तरी शक्य वाटत नाही. पण निदान त्या मुलीबद्दल थोडा समजूतदारपणा, आपलेपणा नवीन घरच्या लोकांनी दाखवला तर ती ते 'घर' आपले मानायला वेळ लावणार नाही हे नक्की.
        
विद्या भुतकर.

Monday, January 02, 2017

संकल्प

काल एकीशी बोलत होते, आता महिनाभर तरी जिम मध्ये ढिगाने गर्दी असेल. आणि फेब्रुवारीपर्यंत पुन्हा रिकामे होतील. मुख्य म्हणजे रोज खरंच नेटाने जाणाऱ्या लोकांना किती चिडचिड होत असेल अशा लोकांच्या गर्दीची? मला वाटतं, प्रत्येकाच्या संकल्पाच्या यादीत,'जिमला नियमित जाणे', 'वजन कमी करणे', 'वेळेत जेवण करणे',' तब्येतीची काळजी घेणे' यातील एकतरी वाक्य असेलच. आणि ते गेले कित्येक वर्षं असेल दरवर्षीच्या यादीत. मला खरंच कळत नाही की स्वतःची तब्येत सांभाळणे हे अचानक इतके मोठे काम का झाले आहे? भूक लागली की जेवतो, झोप आल्यावर झोपतो, कंटाळा आल्यावर टीव्ही बघतो. बाकी गोष्टींसारखे हेही आपण एकदम सहजरित्या का करू शकत नाही? असो.
          आजचा मुद्दा थोडा वेगळा आहे. नवीन वर्षासाठी एखादा संकल्प करणे हे आजकाल एक हास्यास्पद काम झाले आहे. संकल्प करायचाच मोडण्यासाठी असेही म्हणतात. नवीन वर्षात किती लोकांनी किती संकल्प केले हे पाहणारे आणि त्यातले किती लोकांचे कोलमडून पडतील हे पाहणारेही अनेक लोक असतात आजूबाजूला. मग त्यावर टोमणे मारायचा चान्स कोणीही सोडत नाही. अशावेळी मला वाटतं की कुठलीही गोष्ट ठरवणे यासाठीही त्यामागचा विचार असतोच. मग त्यांना पाठिंबा देण्यापेक्षा त्यांच्या फेल होण्याची वाट का बघायची?
         नवीन वर्ष हे खरंतर निमित्त असतं काहीतरी नवीन सुरु करण्यासाठी. आणि ते अगदी योग्य निमित्त आहे असं मला वाटतं. एकतर आख्ख वर्ष हा एक मोठा काळ आहे तो संपला याची जाणीव आपल्याला होते ३१ डिसेंबरच्या दिवशी आणि १ तारखेला पुढे काहीतरी नवीन करायला तितकंच मोठं कारणही मिळतं, नवीन वर्ष सुरु झाल्याचं. नाहीतर विचार करा, रोजचा दिवस आल्यासारखाच चालला आहे, कुठेही सुरुवात नाही, शेवट नाही. रुटीन तर काय असतंच. अशा वेळी काहीतरी नवीन सुरु करायला उत्साह तरी कुठून येणार? एखादा रविवार असतो म्हणूनच सोमवारी काम करायची हिम्मत होते. शाळा सुरु होते तेंव्हाही,  मोठी सुट्टी संपल्यावर नवीन वर्ष सुरु होतं म्हणूनच तो उत्साह असतो. नाहीतर सलग रोज शाळेत जायचं असतं तर नवीन कशाची तरी सुरुवात करायला जोर कुठून येणार?
        अर्थात ज्यांना काही करायचं असतं ते नवीन वर्ष सुरु होण्याची वाट बघत नाहीत. पण आता सुरु झालेच आहे तर एखादे मागे पडलेले काम सुरु करण्यास किंवा अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यास आणि एखादा नवा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी नवीन वर्षासारखा चांगला मुहूर्त नाही. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार न करता संकल्प करायचेच, ते पार पाडण्याच्या पूर्ण प्रयत्न करायचा आणि एखादा नाहीच जमला तर पुन्हा वर्षीच्या यादीत जोडायचा.  :) कारण रोजचे रोज तर काय जगतच असतो, काहीतरी वेगळं करायची सुरुवात करायला आजच्यासारखा दिवस नाही. त्यामुळे मीही आज दोन महिन्याच्या ब्रेकनंतर पुन्हा रनिंग सुरु करतेय, तुम्हीही करा. :)

विद्या भुतकर.