Friday, April 04, 2008

हुरहूर

रविवारी संध्याकाळी रश्मीला बाय करून, जड मनाने दोघं गाडीत बसलो. कोलंबसमधे दोन दिवस कसे गेले कळलंच नाही. पहिले पाच मिनिटं जरा शांततेतच गेले. रश्मी नसल्याने अजूनच शांत वाटत होतं. May be I was already missing her.
मग मीच म्हटलं ,'येताना शिकागोहून निघाल्या दिवशी खूपच ट्र्यफिक होती, तेव्हढी दिसत नाहिये, होय ना? बरं झालं उशीराच निघालो तिच्याकडून, तेव्हढाच वेळ सोबत घालवता आला.'
तोही मग, ' हो ना. काल पण म्युझियमला गेलो ते बरं झालं. एकतर बंदिस्त असल्याने थंडीचा त्रास नाही आणि एका दिवसात होण्यासारखंही होतं.'
माझाही होकारच त्याच्या बोलण्याला. मध्येच मला आठवण येते, 'आता परवा जाऊन भाज्या आणायला लागतील सर्व.' इ.इ.
आणि मग पुढचे ५-६ तासही असेच गेले दोन दिवस आठवण्यात घालवलेले नाहीतर मग घरात काय मागे सोडून आलोय त्याची चर्चा.
तसं हे नेहमीचंच. आमची मग कपिल-सोनालीची एक दिवसाची भेट असो की ४-५ दिवसांची ट्रीप. मित्र-मैत्रिणींना भेटल्यावर सर्व विसरून रमून गेलेले आम्ही परतीच्या प्रवासात जणू गेल्या दिवसांचा आढावा घेत राहतो. आणि विसरलेल्या घराचीही ओढ लागायला लागते. पण त्या ओढीतही कसली तरी हुरहूर असते. कदाचित गेला तो दिवस किती चांगला होता आणि परत तेच रुटीन असा नकोसा वाटणारा विचार असेल किंवा आता त्याच लोकांना परत कधी भेटणार याची हुरहूर. की चला इतके दिवस धावपळ करून केलेली ही ट्रिप संपली, तीही सुरक्षितपणे आणि आता धावपळ नाही याचं समाधान? नक्की काय असतं माहीत नाही पण गाडीत बसल्यावर म्हणा किंवा परतीच्या प्रवासाला लागल्यावर म्हणा, ती पहिली पाच मिनिटं दोघंही शांत असतो एकेक विचार मनातल्या मनात करत आणि गेलेले क्षण डॊक्यात बंद करत. आमच्या घरी तर आई-दादा दोघंच, ते किती गोष्टींचा असा विचार करत असतील नाही? असो.
बरं हे ट्रिपचच असं नाही. दीडेक वर्षापूर्वी अर्णवचा पहिला वाढदिवस साजरा केला इथे. संध्याकाळी क्लब हाऊस मधून सर्व सामान आणायला आम्ही बरेच लोक मदतीला होतो योगिता आणि जी.टीं.च्या. एकेक करत सफाई करून क्लब हाऊसचा ताबा सोडला आणि घरी परतून सर्व जण योगिताकडे बसलो काही वेळ. पुन्हा तीच शांतता. :-) मी, आमचे अजून एक शेजारी, योगिता,जी.टी. सर्वच आपापल्या परीने काहीतरी विचार करत होते.
मग कोणीतरी बोललंच,' तरी बरेच लोक आले, नाही? ५०-६० तरी असतील.'
मग कुणी,' बरं झालं सर्वांनी मदत केली ते, नाहीतर सफाई करून वेळेत हाल परत देणं अवघड होतं'.
तर एकजण, 'सही झाला बरंका योगिता कार्यक्रम.'
आणि अशा या गोंधळात आणि नवीन भेट म्हणून आलेल्या खेळण्यांना सोडून जुन्या चेंडूशी खेळणारा अर्णव अजूनही आठवतो आणि त्याचा क्यूट ड्रेस पण.कसला भारी दिसत होता. :-) असो. तर हे असं नेहमीचंच, आढावा घेणं आणि मनातल्या मनात एक हुरहूरही, की संपला तो दिवस अखेर ज्यासाठी गेले कित्येक दिवस पळापळ चालली होती.
या सगळ्या तर अगदीच छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. Imagine लग्न घरात कसं होतं ते. विशेषत: मुलीकडे. वर्र्हाड गेल्यावर एका कार्यालयच्या कुठल्यातरी एका खोलीत त्या पांढऱ्या गादय़ांवर पडलेल्या अक्षता, फुलांच्या पाकळ्या, आणि आहेराचं आलेलं सामान, त्यासर्वांच्या मधे सर्व मंडळी बसलेली असतात. त्यात जरा जास्त चांगली नटलेली पण रडण्याने डॊळे सुजलेली ती मुलीची आई कुणाशी तरी बोलत असते, 'बाळ ने काही खाल्लं की नाही?'
तर हा 'बाळ' त्या लग्नात अगदी सर्व कामे पार पाडणारा मुलीचा कष्टकरी भाऊ असतो. त्याला कुणीतरी ताट लावून देतं. मग जेवता-जेवताच तो लोकांना काय-काय कसं आवरायचं, कार्यालय कधी सोडायचं, फुलं वाल्याला किती पैसे द्यायचे हे सांगत असतो.आणि मधेच एखादी मामी/ काकू बोलते, 'तो सूट मधे आलेला माणूस कोणं होता ओ?, त्याची बायकॊ पण अगदी भारी साडी नेसून आली होती'.
कुणाला आहेर चांगला झाला की नाही यावर बोलायचं असतं तर कुणाला मुलाच्या खडूस, भांडखोर काकाबद्दल.
एखादा मामा मधेच बोलतो,'त्या मुलाचा काका जेवताना नाटकच करायला लागला होता. त्याला म्हणे जिलेबी हवी होती आणि कुणी पटकन आणली नाही. बरं झालं शेवटी शांतपणे निस्तरलं. माझं डॊकंच फिरलं होतं. कुणा-कुणाचं बघायचं इथे?'.
तर अशा शंभर गोष्टी. गप्पा मारत-मारत तास-दोन तास कधीच निघून जातात. आणि शे-पाचशे लोकांनी भरलेलं कार्यालय एकदम भकास झालेलं असतं. आता घरी जाऊन बरीच कामंही निस्तरायची असतात त्यांची आठवण यायला लागते. सगळ्या गोंधळात का होईना शेवटी लग्न छान झालं ना याचं, तर कधी, पोरगी चांगल्या घरात गेली हो! याचं समाधान मनात असतं.सगळं झाल्यावरही, पोरीचा घरी पोचल्यावर फोन येईल ना याची हुरहूर असतेच...
-विद्या.