Wednesday, September 11, 2013

एक संस्था

         DCH चं वेगळे ठोके असलेलं मुझिक सुरु होतं आणि त्यासोबत नावाच्या पाट्या पडायला लागतात. सिनेमा संपला म्हणून नाईलाजाने उठून कामाला सुरुवात  करावी लागते. पण डोक्यातून तो जात नाही. त्या रेंगाळणाऱ्या दुपारी किंवा संध्याकाळी, तो सोबतच राहतो. तसंच ' जिंदगी मिलेगी ना दोबारा' चंही. 'सुरजकी रांहोमे अब है ये जिंदगी' सुरु होतं , कत्रिना आणि ह्रितिक नाच करीत येतात तरी उगाचच उदास वाटत असतं. या दोन्ही सिनेमांची थीम एकच, जिवलग मित्र, त्याचं जुनं जग मग, झालेली भांडणे आणि मग पुन्हा एकदा भेटणं. या सगळ्यात एक अदृष्य व्यक्तिमत्व असतं जे दिसत नाही पण त्याचा प्रभाव  दिसतो. ती म्हणजे एक संस्था, एक शाळा किंवा कॉलेज जिथे हे लोक भेटलेले असतात, हसतात, रडतात, भांडतात . ती एक कॉमन गोष्ट या लोकांना एकत्रित आणते आणि ठेवतेही.
           परवा भावाच्या पदवीदान समारंभासाठी संदिपसोबत COEP ला गेले. खरंतर तासाभराची सुट्टी घेऊन गेलो होतो  आणि   उशीरही झाला होता त्यामुळे पळत पळतच जात होतो. तरीही जाताना त्या संस्थेचे ठसे मनावर उमटत होते. तिथल्या मुलांकडे पाहून  कॉलेजची आठवण येत होती. त्यांच्याकडे पाहून वाटत होते अरे खरंच आपण वयाने मोठे झालो. ती मिसरूड फुटलेली, खुरटी दाढी, पाठीला पिशवी नाहीतर हातात वह्या, मळकी जीन्स सगळं सारखंच. मुलींच्या कपड्यांमध्ये थोडा बदल होता पण तीच सडसडीत अंगकाठी, चेहऱ्यावरचे कोवळेपण, बोलण्यात उत्साह, चालण्याची लकब सर्व तसंच, कॉलेजच्या मुलींसारखं. त्यांच्यामधून धावत गेलो तर प्रवेशद्वाराजवळ गार्ड म्हणाला, 'पेरेंट?' मोठे दिसत असलो तरी 'पेरेंट म्हटल्यावर वाईट वाटलं. असो.पुढे संदीपने दाखवलं 'हे आमचं डिपार्टमेंट', 'ही लायब्ररी', ' हे कम्पुटर डिपार्टमेंट, आमचा कधी संबंध नाही आला', इ.  काही ठिकाणी ' अरे? हे असं केलंय? ', 'हे बदललंय ' अशी उद्गारचिन्हही ! त्याच्या बोलण्यातून त्याच्या त्या संस्थेचा अभिमान दिसत होता. त्याच्या जागी मी  कॉलेजमध्ये गेले असते तरी असंच काही तरी झालं असतं, 'तेच गणपती मंदिर, माझं डिपार्टमेंट, मी न फिरकलेल डिपार्टमेंट, हॉस्टेल, कॅन्टिन. तोंडात रुळलेले काही शब्द, काही ग्रुप. लोकलाईट, हॉस्टेलाईट, सातारचे, सोलापूर, कोल्हापूरचे. या सगळ्यांची वेगळी ओळख तर मैत्रीची सरमिसळ. सगळीकडे सारखंच.
           होतं काय, की हे सिनेमे बघताना हे सगळं अनुभवल्यासारखं वाटतं, त्यांच्या हसण्या-बोलण्यात आपणच दिसतो, त्यांच्यासोबत पुन्हा भेटण्याचं स्वप्नही बघतो. ते स्वप्नं सिनेमासोबत संपून जातं आणि वास्तवात आल्यावर उदास व्हायला होतं. कारण एखादं भांडण अजून मिटलेलं नसतं, एखादा मित्र अजून तुटलेलाच असतो आणि एखादी मैत्रीण एका गावात असूनही संसारात अडकून पडलेली असते. तर अशा या सगळ्या मनांमध्ये 'ती संस्था' मात्र अजूनही त्याच लोकांसोबत तिथल्या आठवणींसोबत तशीच असते आणि अशा सिनेमांमधून दिसत राहते. अजूनही कधी कुणी भेटलं की म्हटलं जातं , 'अरे तू वालचंदची का? मी पण.' :)

-विद्या.