Monday, July 31, 2017

कारण काय? तर मुलं !

         मागच्या आठवड्यात मुलं आणि नवरा भारतात आले आणि मी एकटीच बॉस्टनमध्ये. दोन आठवड्यानी मी येणारच होते. सुरुवातीला हे असं बुकींग केलं तेंव्हा मनात बरेच मनोरे रचले होते. आता 'आई' म्हणून ते समोर मांडले की त्यावर टीकाही होऊ शकते पण दोन आठवडे एकटीच असताना भरपूर टीव्ही पाहायचा, मनोसक्त आराम करायचा आणि बरेच लिखाण पूर्ण करायचे असं ठरवलं होतं. मुलं घरातून गेली आणि घर एकदम शांत झालं. रविवारी बरीचशी कामे पूर्ण केली. तरीही भरपूर वेळ उरला. पण लिहिण्याची मात्र अजिबात इच्छा होत नव्हती. मन एकदम सुन्न झालं होतं. तिसऱ्याच दिवशी तिकीट बदलून घेतलं आणि चार दिवसांत घरी पोचले.
         मुलांच्या शाळा, क्लास आणि सर्व असूनही मी नियमित लिखाण करत होते आणि रनिंग वगैरेही. ते नसताना मात्र टीव्ही किंवा आळसात खूप वेळ घालवला आणि कामाचं असं काहीच केलं नाही. अगदी आम्ही दोघे असतानाही पूर्वी असंच व्हायचं. धक्का मारायला कुणीही नसल्याने सर्व कामं रेंगाळत व्हायची. आता हे सांगायचं कारण असं की अनेकदा आपल्याला वाटतं की मुलांच्या मुळे अनेक गोष्टींना वेळ मिळत नाही. साध्या साध्या गोष्टी म्हणजे, एखाद्या मैत्रिणीला अनेक दिवस किंवा महिन्यांत फोन होत नाही. कारण काय? तर मुलं ! एखाद्याला म्हणावं की 'अरे ये भेटायला' तर नकार, कारण काय तर, मुलगा. तो खूप धडपड करतो, त्याला बरंच नाहीये किंवा अजून काही.
       अर्थात हे कारण मीही काही वेळा सांगितलं आहे. पण खरंच इतका मोठा बाऊ का केला जातो? आपली जवळची मैत्रीण आहे ना? मग पाच मिनिट बोलायला वेळ काढू नाही शकत? एखाद्या ट्रिप ला जायचं आहे. पण ती आजारीच पडेल ना किंवा अजून काही तत्सम कारण. अगदी साधं कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्यावरही हेच कारण ऐकायला मिळतं. व्यायाम करायला वेळ मिळत नाही किंवा एखादी कला जोपासायला वेळ मिळत नाही. कारण? मुलं !! कधी वाटतं आपण त्या गोष्टीची सवय तर लावून घेत नाहीये ना हे पुन्हा एकदा प्रत्येकाने चेक केलं पाहिजे.
        मुलं सोबत असल्यावर आपण बरीचशी कामे पटकन उरकून घेतो असं मला वाटतं. साधं उदाहरण देते. मी भाज्या आणायला ग्रोसरी स्टोरला जाते. मुलांच्या सोबत गेलं की ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या मनात किंवा पेपरवर यादी करून ठेवलेल्याच असतात. पटकन त्या त्या ठिकाणी जायचं आणि पटकन घरी यायचं. नाहीतर दोघे मिळून दुकानात काही ना काही मागत बसतात त्यामुळे जास्तीत जास्त १५-२० मिनिटांत हवं ते सामान घेऊन मी घरी आलेली असते. याउलट मी एकटी गेले की एकदम भरकटल्यासारखं होतं. उगाच नको असलेल्या वस्तूही घेऊन येते. कुणीही मागे कटकट करत नसल्याने उगाच फिरलं जातं आणि एक तास फिरूनही बरेच वेळा हवी असलेली वस्तू घ्यायची राहूनच जाते.
        सुट्टीच्या दिवशीही पूर्वी तासनतास रात्री जागत बसायचो आणि उशिरा उठून काहीही प्रोडक्टीव्ह केलं जायचं नाही. आता मात्र सकाळी ते दोघे उठतात त्यामुळे नाईलाजाने उठावं लागतच. त्यांचे क्लास असतील काही तर बाहेर जावं लागतंच. त्यामुळे मग उगाच फालतू जागरण न करता सकाळी उठून पळायला जाणं इ होऊन  जातं. अशा एक ना अनेक गोष्टी किंवा घटना आहेत. अगदी बाहेर पडायच्या वेळी कपडे काय घालायचे. यासाठीही उगाच तासभर विचार केला जायचा. आता घाईत आवरायचं म्हणून तेच काम ५ मिनिटांत होतं.
       एकूण काय की मुलांना आपल्या आवडत्या गोष्टी न करण्याचं कारण बनवायचं थांबवलं पाहिजे. मुलांसोबत बराचसा वेळ जात असल्याने उलट उरलेल्या वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करून घेतला पाहिजे. आपण एखादी गोष्ट करत नसू तर त्याचं कारण केवळ आपण स्वतः आहे. बाकी कुणीही नाही. याचा नुकताच ताजा अनुभव येऊन गेल्याने आवर्जून लिहिले आहे. :) तुम्हाला काय वाटतं?

विद्या भुतकर.
       

Thursday, July 27, 2017

गिलहरियां....

       मला निसर्ग कविता फार कमी आवडतात. कदाचित सर्व प्रकारच्या उपमा प्रत्येक गोष्टीला आणि व्यक्तीला देऊन झाल्याने नवीन काही शिल्लक आहे असं आता वाटत नाही. सिलसिलाच्या 'ये पत्तियों की है सरसराहट....' वाल्या डायलॉग ला लै भारी वाटते हो अजूनही. आणि तितकीच लहान असताना 'हिरवे हिरवे गार गालिचे' आवडली होती. ती आता इतकी आवडते की नाही माहित नाही. मध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधलं एक गाणं ऐकलं होतं,'सूरज की बाहो में'. अगदीच बोर वाटलं होतं. त्यामुळे दंगल मधलं हे गाणं ऐकलं तेव्हा एक वेगळाच आनंद मिळाला.
       आता याला कवितेचं रसग्रहण म्हटलं तरी चालेल. पण त्यातलं काय काय आवडलं हे इथे लिहितेय. एकतर त्या गाण्यात 'जॉनीता गांधी' चा आवाज इतका सुंदर आहे आणि तितकंच संगीतही सुरेल. त्यामुळे त्यात दिसत राहतात ते शब्द. प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात येत राहतो. आणि एकदा ठेका धरला की गाणं तोंडात घोळत राहतं. ऐकताना हे गाणं कुणा मुलीनं मुलाच्या प्रेमात पडल्यावर म्हटलेलं वाटतं. पण प्रत्यक्षात ते पाहून अजून आनंद झाला. कारण घराच्या बाहेर पडून नवं विश्व अनुभवणारी ती मुलगी इतकी छान वाटते. वाटतं आपणही कॉलेजला जाऊन येतोय तिच्या सोबत. जीवनाच्या, तिच्या स्वातंत्र्याच्या आणि स्वतःच्या प्रेमात आहे ती मुलगी. त्याचं सादरकरणही सुंदर केलंच आहे. एकूणच ते गाणं बघायला आणि ऐकायला एक सुखद अनुभव आहे.
         आता राहिले शब्द. इथे तो निसर्ग कवितेचा संदर्भ येतो. उन्हाचं, गुलमोहराचं, जमीन आणि आकाश यांचे संदर्भ इतके छान दिले आहेत. माझं मत या शब्दांबद्दल काय आहे हे मांडत आहे. कदाचित तुम्हाला हे वाचायला कंटाळवाणं वाटेल. पण या गाण्यातल्या प्रत्येक ओळीचा अर्थच इतका सुंदर आहे की तो शब्दात मांडायचाच होता मला. असो. हे गाणं तुम्हीही पुढच्या वेळी ऐकाल तेव्हा जरूर लक्ष द्या.  अर्थात ते चुकीचं असूही शकतं. पण त्यातुन येणारा अनुभव नक्कीच खोटा नाहीये. असो. मी मुद्दाम त्याचे शब्द इथे देत आहे.
"रंग बदल बदल के क्यों चहक रही है
दिन दुपहरियां"
या शब्दांनी दुपारचं उन्हंही अगदी सुखद वाटायला लागतं. दुपार जणू 'सकाळ' झाली आहे. आणि पहाटेच्या पक्षांसारखं चिवचिवाट करत आहे. किती सुंदर.
"क्यूँ फुदक फुदक के धड़कनो की
चल रही गिलहरियां
मैं जानू ना जानू ना जानू ना"
सध्या इतक्या खारुताई बघत असते घरापाशी. हे वाचून तर खरंच माझंही मन त्या खारीसारखं उड्या मारू लागतं. 'धड़कनो की गिलहरियां' किती सुंदर उपमा आहे. खूप आवडली मला.
"क्यूँ ज़रा सा मौसम सरफिरा है
या मेरा मूड मसखरा है
मसखरा है
जो ज़ायका मन -मानियो का है
बोल कैसा रस भरा है"
मनाप्रमाणे वागायला मिळत आहे या विचारानेच ती किती खूष झाली आहे. तिचा मूड एकदम बदलला आहे या सगळ्या नव्या अनुभवाने.
"एक नयी सी दोस्ती आसमां से हो गयी
ज़मीन मुझसे जलके
मुँह बना के बोली
तू बिगड़ रही है"
या नव्या विश्वात ती जणू आकाशात तरंगत आहे आणि त्यामुळे जमीन तिच्यावर चिडलीय.  गंमत वाटते ना या विचाराची? आणि नुसती चिडली नाहीये तर तिला सांगतेय तू बिघडली आहेस म्हणून. 
"ज़िन्दगी भी आज कल
गिनतियों से ऊब के
गणित के आंकड़ों
के साथ एक आधा
शेर पढ़ रही है"
त्या जुन्या आयुष्याला, गणिताला त्यातल्या रुक्षपणाला ती कंटाळली आहेच. पण म्हणून 'एक आधा शेर"?  कमी शब्दांत किती जास्त व्यक्त होतं.  रुक्षपणाकडून काव्यात्मक आयुश्याकडे तिचं होणारं स्थित्यन्तर.
याच्या पुढच्या ओळी माझ्या सर्वात आवडत्या आहेत.
"मैं सही ग़लत के पीछे
छोड़ के चली कचहरियांं"
खरंच, वाटतं कॉलेजमध्ये असताना मनाप्रमाणे वागताना कोण काय बोलतंय याचा विचार केलाच नाही. तो 'योग्य-अयोग्य' विचार मागे टाकता येणं किती आनंददायी असतं? तिलाही तसंच वाटत आहे. 
"क्यूँ हज़ारो गुलमोहर सी
भर गयी है ख्वाहिशों की टहनियाँ
मैं जानू ना जानू ना जानू ना"
आणि नुसतं ती योग्य अयोग्य विचार मागे टाकत नाहीये तर तिच्या मनात अजून नव्या आकांक्षा निर्माण झाल्या आहेत. आणि त्याला त्या 'गुलमोहराच्या बहरलेल्या फाद्यांची' दिलेली उपमा तर मला खूप आवडली.
हे गाण्याचं शेवटचं कडवं. ते संपेपर्यंत आपणही तिच्यासोबत तिच्या स्वप्नाच्या गावात हरवून जातो.
नक्की ऐकून बघा. 
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, July 25, 2017

दिसतं तसं नसतंच.... पण किती???

डिस्क्लेमर: लिहिताना माणूस कुठल्या टोन मध्ये बोलत आहे हे कळत नसल्याने अनेक गैरसमज होऊ शकतात. तसे झाले तरी ते स्वतःजवळच ठेवावेत. या पोस्टमधून कुणालाही दुखवण्याचा काडीमात्रही हेतू नाहीये. माझ्या चिकित्सक स्वभावामुळे पडणारे प्रश्न मोठया व्यासपीठावर मांडण्याचा हा छोटा प्रयत्न आहे इतकंच. 

       आयुष्यात (मला एकदा माझ्या किती पोस्ट 'आयुष्य' या शब्दाने सुरु होतात ते पाहिलं पाहिजे. असो. पुन्हा कधीतरी.) तर सामान्य माणूस म्हणून माझ्या आयुष्यात अनेक गैरसमज होते. त्यात अनेक वेळा प्रसारमाध्यमं टिव्ही किंवा सिनेमा यांनी भरच घातली होती. ते हळूहळू दूर होत राहिले.  काही अजूनही प्रश्न म्हणून डोक्यात येत राहतातच. त्यातले अनेक गैरसमज 'झोपण्याबद्दल' आहेत. म्हणजे झोपणे या क्रियेबद्दल. उगाच त्यात गैरसमज नको. 

       मला नेहमी वाटायचं की चित्रात, सिनेमात एक प्रेमी जोडपं एकमेकांना किती छान गुरफटून झोपलं आहे. अगदी चादरही दोघांच्या अंगावर कशी समान वाटलेली आहे. इथे एक पांघरूण पुरत नाही. आणि मुळात एखाद्याला कमी जाड दुसऱ्याला जास्त जाड हवं असेल तर?  बरं, घेतलं अगदी एकच आणि खूप मोठं असलं ते तरी, एकाला तोंडावर हवं असतं, तर दुसऱ्याला हाताखाली. मग काय करायचं? त्यात पोरं असली तर ती मध्ये येऊन त्याच पांघरुणावर झोपली की बोंबच. दोन्ही बाजूला आम्ही काकडणारे. अर्थात मी माझं पांघरूण कितीही केलं तरी सोडत नाही असं मला अनेकवेळा सांगितलं आहे. त्यामुळे मी तरी सुटले. बिचारा नवरा. 

       ते झालं पांघरुणाचं. दोघांनी अगदी ठरवलं की नाहीच येऊ द्यायचं पोरांना किंवा समजा नसतील मुलं. पण त्या घोरण्याचं काय? दोघांपैकी एखादा तरी घोरणारा नक्की असतोच. मग दुसऱ्याने काय, कानांत बोळे घालून झोपायचं? शिवाय, विक्स, झेंडूबाम यांचे वास असतातच. मुळात मला तरी वाटतं की हे असं इतक्या जवळ झोपून एकाच्या नाकातून बाहेर पडणारा कार्बन डाय ऑकसाईड दुसऱ्याच्या नाकात नसेल का जात? माझं जीवनशास्त्र एकदम पक्कं असल्याने मला असे प्रश्न पडत असतील कदाचित. 

        पुढचा मुद्दा म्हणजे या केसांचा. 'आपकी जुल्फोंकी छाँव' म्हणे. डोंबल. आता सर्वांचेच केस लांब नसतात, मग बाकीच्यांचं काय? आणि समजा बायकोचे केस कितीही मोठे लांब , सुंदर आणि दाट असले तरी तिच्या केसांना गोंजारत बसणारा कुणी भेटला तर मला बघायचा आहे. एकतर त्यात तिचे केस किती तुटतील याची चिंता मला असतेच. शिवाय त्याला तसं झोपून दम घुसमटत नाही का? हाही प्रश्न पडतो. आणि हो एखादा त्याच्या तोंडात गेला तर? ईईईई... जाऊ दे. बायकोने अगदी साईडला ठेवून दिले केस त्याला झोपण्यासाठी तर सकाळी उठेपर्यंत त्यातले किती तिच्या डोक्यावर असतील आणि किती गळलेले काय माहित. आहे ते केस जागेवर ठेवायला किती कष्ट करावे लागतात. त्यामुळे एखादीच्या डोक्याला मेंदीचा, अंडयाच्या, दही, आणि अनेक प्रकारची तेलं या सर्वांचे वास असतीलच. ते येणार नाहीत का त्याला? 

      बरं आता केस आणि मिठी हे सर्व धरून दोघे झोपले प्रेमाने. सकाळी त्यातला एकजण उठून दुसऱ्याच्या चेहऱ्याकडे बघत बसत असेल यावर माझा काडीभरही विश्वास नाहीये. उलट मी तर म्हणते दुसरा उठेपर्यंत आपणही झोपायचं सोंग करणारे अनेक जण असतील. कोण पहिलं उठून आंघोळ करणार सांगा? आणि हे असं चेहऱ्याकडे बघत बसायला आपलं तोंड तरी असतं तसं? पिक्चर मध्ये एकदम आताच मेकअप रूममधून बाहेर आलेल्या हिरोईन बेडवर पडलेल्या असतात. त्यांच्याशी आपली काही तुलना तरी आहे का? उगाच म्हणजे तोंड बघत बसायचं. इतका अवतार असतो की त्याने ते बघत बसावं असं मी मुळी सांगणारही नाही. असो. 

      हे हिरो लोक नुसते गर्लफ्रेंडकडे बघत नाहीत, स्वतः उठून ब्रेकफास्ट बनवून बेडमध्ये आणून देणारेही असतात. मला आजपर्यंत कळले नाहीये की हे असं बेडमध्ये ब्रेकफास्ट करण्याचं प्रयोजन काय? एकतर सकाळी उठून आधी तोंड धुतलं पाहिजे. निदान बाथरूमला तरी जावंच लागणार ना? म्हणजे तेही नाही करायचं? डायरेकट खायचंच? त्यातही मला ते असे काटे, चमचे, दूध, कॉफी, ज्यूस गादीवर म्हणजे डेंजरच वाटतं. नाही का? उगाच जरा धक्का लागायचा आणि आख्खी गादी चिकट. म्हणजे काही सांडलं तर एकतर घाईत उठलं पाहिजे, बेडशीट काढून घ्यायचं. त्याच्यावरच राहिलं तर ठीक. ते धुता तरी येतं. गादीमध्ये आत गेल्यावर काय? ती कशी धुणार? 

      एकूण काय तर दिसतं तसं नसतंच पण किती खोटं? काय मर्यादा आहे की नाही? अजून बरेच मुद्दे आहेत ज्यावर मला असे अनेक प्रश्न पडतात. सुरुवात केली तेंव्हा सर्वच लिहिणार होते. पण झोपेचेच इतके मुद्दे होते की बाकी लिहायला वेगळा लेख लिहावा लागेल. :) तोवर तुम्हीही तुमचे मुद्दे सांगून ठेवा. :) 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, July 19, 2017

Tuesday, July 18, 2017

बात निकलेगी तो.....

      खूप दिवसांनी काल रात्री जगजीत सिंगच्या गझल ऐकत बसले होते. आजकाल त्या वळणावर जायचं टाळतेच. एकदा का नाद लागला की मग थांबत नाही. वाटतं सर्व काम सोडून फक्त ऐकत बसावं. मग घरात काय चाललंय, पोरांना काय हवंय, स्वयंपाक, आवरणं सगळं मागे पडतं आणि कान फक्त त्याच्या आवाजाकडे लागून राहतात. शेवटी नाईलाजाने सर्व बंद करून झोपले. सकाळी मात्र गाडीत बसल्यावर लगेचच सुरु केली आणि एका पाठोपाठ गाणी सुरु झाली. कितीही वर्ष झाली असू दे ऐकून, गाणं सुरु झालं की आपोआप शब्द ओठांत येऊ लागतात आणि ते भाव मनात. त्यात आज पाऊसही होता सोबतीला. मग काय आहाच....

        यावेळी एक गोष्ट लक्षात आली जी याच्या आधी कधी डोक्यात नव्हती ती म्हणजे या सर्व गजलांचे कवी कोण असतील. खरंतर व्हायचं काय की जगजीत सिंगच्या आवाजात ते शब्द इतके पक्के डोक्यात बसायचे की हे मुळात लिहिलं कुणी असेल असा विचार करायला सवडच मिळायची नाही. यावेळी मात्र एकेक गझल उचलून त्यांच्या कवींची नावं इंटरनेट वर शोधायला सुरुवात केली. आणि मग त्या नादात कितीतरी वेळ गेला. आपण हे सगळं आधी कसं दुर्लक्षित केलं या विचाराने स्वतःवरच रागही आला.

       तर त्यातली पहिली गझल म्हणजे 'बात निकलेगी तो दूर तलख़ जायेगी'. माझी एकदम आवडती. मी नेटवर त्या कवींची माहिती शोधू लागले. "कफ़ील आज़र अमरोहवी" या नावाच्या कवींबद्दल मी कधीच ऐकलं नव्हतं. खूप शोधूनही अगदी थोडकीच माहिती मिळाली. तेही त्यांच्या अजून काही गझल आहेत त्याबद्दलच. त्यांची वैयक्तिक माहिती कुठेच मिळाली नाही. 

         मग पुढे शोधलं ते म्हणजे "मैं नशें में हूँ' या गझल बद्दल. 'शाहिद कबीर' असं त्या कवींचं नाव. त्यांच्या बद्दल थोडी माहिती वाचायला मिळाली आणि कळलं की ते महाराष्ट्रातील एक उर्दू कवी होते. एक मराठी व्यक्ती असूनही मला अशा कवींबद्दल काहीच माहित नाही हे वाईटच ना? तर त्यांना महाराष्ट्रातील उर्दू अकेडमी चा पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांचा जन्म नागपूरचा. केंद्र सरकारच्या नोकरीत दिल्ली मध्ये असताना त्यांची ओळख तिथे काही कवींशी झाली आणि त्यांनी गजल लिहायला सुरुवात केली अशी माहिती वाचली. त्यांच्या अनेक गझल मान्यवर गायकांनी गायिलेल्या आहेत. अर्थात हे सर्व केवळ नेटवर मिळालेल्या माहितीमधून सांगत आहे. या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याबद्दल आणि त्यांचं काम हे सर्व वाचलं पाहिजे, समजलं पाहिजे असं खूप वाटलं आज.

        पुढची गझल म्हणजे 'कोई ये कैसें बतायें के वो तनहा क्यों है'. या गाण्यांत जे शब्द आहेत ना त्याने ते एकदम मनाचा ठाव घेतं.
"तुम मसर्रत का कहो या इसे ग़म का रिश्ता 
कहते हैं प्यार का रिश्ता हैं जनम का रिश्ता 
हैं जनम का जो ये रिश्ता तो बदलता क्यों है ? " 

किती सरळ प्रश्न आहे? जे प्रेम इतकं जवळचं होतं, कायमचं आहे असं एकेकाळी वाटलं होतं, ते बदलू शकतं? या ओळींच्या कवीचा शोध मला 'कैफी आझमी' यांच्यापर्यंत घेऊन गेला. चला निदान मी त्यांचं नाव तरी ऐकलेलं होतं. त्यांच्यावर माहिती वाचताना त्यांचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील कारकिर्दीची माहितीही मिळाली. त्यांची मुलगी म्हणजे 'शबाना आझमी' मुळे त्यांचं नाव जास्त लक्षात राहिलं असेल. त्यांच्यावर अख्खी एक वेबसाईट आहे आणि बरंच काही वाचण्यासारखं. त्यांच्या बाकी गझलही मला समजून घ्यायच्या आहेत. पण मला आज अनेक लोकांवर माहिती हवी होती त्यामुळे थांबणं शक्य नव्हतं.

      'हजारों ख्वाहिशें ऐसी' या गझलने मात्र जीवाचा ठावच घेतला आहे. जगजीत सिंगच्या आवाजात 'ख्वाहिशें' हा शब्द जरी ऐकला तरी खरंच 'जीव ओवाळून टाकावा' असं वाटतं. मी या गझलेचं लाईव्ह शो मधील रेकॉर्डिंग ऐकलं आहे आणि त्यात त्यातील एकेक मिसरा त्यांच्या शब्दांत समजून घेतानाही खूप छान वाटत होतं. अर्थात या सगळ्या गझल मी याआधीही खूप वेळा ऐकल्यात आणि तरीही त्या नव्याने ऐकत राहते. या गझलेचे कवी म्हणजे 'मिर्झा गालिब'. गालिबचे अनेक शेर अनेक हिंदी चित्रपटांतून ऐकले आहेत. पण त्यांच्याबद्दल माहिती वाचण्यासाठी कधी प्रयत्न केले नव्हते. मुघलांच्या काळातील उर्दू आणि पर्शियन कवी ते. मला सर्वात जास्त आवडलेली त्यांच्याबद्दलची माहिती म्हणजे ते चांगले पत्र-लेखकही होते. 

       खरं सांगायचं तर जावेद अख्तर आणि गुलज़ार या दोघांचीच गीतं आणि गझल इतक्या वेळा ऐकले आहेत की बाकी कवींची कधी ओळख करूनच घेतली नाही. विचार करा, वर मांडलेल्या सर्व कवींच्या अशा अनेक गझल, कविता असतील. जगजीत सिंगमुळे, त्यांच्या आवाजामुळे या सर्व लोकांचे मोजके का होईना शब्द कानावर पडले. या सर्व कवींबद्दल जर खरंच वाचायला, शिकायला आणि त्यांचं कार्य समजून घ्यायला मिळालं तर किती मोठा खजिना मिळेल. मला कधी कधी खूप भारी वाटतं, आपण इतके नशीबवान आहोत याचं. केवळ जगजीत सिंग ऐकायला मिळावं हेच मुळात नशीब, पुढे जाऊन त्या गझलेचा अर्थ समजावा, तो मनात रुतावा यासारखं सुख काय? माझ्या मुलांना कदाचित ही संधी नाही मिळणार.मला हे करायला मिळतंय हे कमी आहे का? 
        मला तर पुन्हा एका कॉलेज मध्ये जाऊन हिंदी आणि उर्दू शिकण्यासाठी ३ वर्षं तरी घालवावी असं वाटू लागलं आहे. माझे आजोबा संस्कृत शिकवत. त्यांना कालिदासाचं शाकुंतल इतकं का प्रिय होतं आणि एखादा नवीन श्लोक शिकल्यावर आनंद का व्हायचा हे आज मला जाणवत आहे. माझे आजोबा, वडील यांनी वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक गोष्टींचं शिक्षण घेतलं आहे. मलाही आता ते करावंसं वाटत आहे.त्याची सुरुवात केली ती म्हणजे या सर्व गाण्यांच्या मागे जाऊन त्यांचे कवी कोण हे शोधून. आता पुढचा टप्पा, त्यांच्या अजून गझल वाचणे...... :) तुम्ही कुणी या गझलांचा खोलवर जाऊन अभ्यास केला आहे का? कुणी केला असेल तर जरूर सांगा माहिती. 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, July 10, 2017

आयुष्यात एक इरफान खान हवा

        काही दिवसांपूर्वी 'हिंदी मिडीयम' पाहिला. खूप आवडला. त्याचा शेवट कसा असला पाहिजे वगैरे मुद्दे सोडून अगदी नुसत्या इरफान खान साठी आवडला. त्यातला तो बारका पोरगा होता ना सुरुवातीला त्या मुलीसाठी तिच्या आवडीचा ड्रेस शिवणारा तोही आवडला. आजकाल होतं काय? कुठलेही चित्रपट पाहिले तरी त्यात तो व्यक्ती दिसत राहतो. म्हणजे शाहरुख खान, सलमान किंवा अक्षय कुमार वगैरे. कथा कशीही असो त्यात कथेतला नायक दिसत नाही, फक्त 'हिरो' दिसत राहतो. आणि त्या गोष्टीचा मला भयंकर कंटाळा आला आहे. 
        तर या हिंदी मिडीयम मध्ये इरफान आवडला तो त्याच्या ऍक्टिंग पेक्षा एक व्यक्ती म्हणून. एक सामान्य माणूस आपल्या बायकोच्या खुशीसाठी अगदी जमेल ते करायला तयार आहे. आणि ते दाखवण्यासाठी कुठेही एक्सट्रा प्रयत्न करून शॉट्स घेतले नाहीयेत. म्हणजे याच मूव्हीमध्ये शारुख असता तर त्याचे गट्टे पडलेले हात एकदम झूम करून, मग हिरोईन त्याच्या हातावर फुंकर मारणार, मग तो तिच्याकडे प्रेमाने बघणार, तेही एकदम झूम करून. किंवा सलमान असता तर हिरोईन ला त्रास होतोय म्हणून उगाच तिला उचलून वगैरे धरणार, हे सगळं अतिरंजित बघायला लागलं असतं. नवरा संडासातून ओरडत आहे म्हणून पाणी शोधणारी ती आणि दमलेला पाय तिच्या पायावर टाकून झोपणारा तो, किती साधे तरीही गोड. उगाच त्यासाठी तिने त्याचे पाय चेपलेच पाहिजेत असं नाही. 
        तर मला वाटतं आपल्यासारख्या सामान्य आयुष्यातही हे असे सामान्यच प्रसंग घडत असतात. त्यात कुठेही झूम करायला किंवा पाय चेपायला, उचलून धरायला कुणी नसतं. १४ फेब ला गुलाबाची फुलं देऊन त्याचे फोटो 'विथ माय लव्ह' असे टायटल टाकून अपलोड करणारा नवराच हवा असं नाही. पाहुणे गेल्यावर तीही दमलीय तर स्वतःच पटापट आवरून घेणारा किंवा अगदी वाढदिवसाला हॉटेलमध्ये जाणं परवडत नसलं तरीही घरी येताना फॅमिली पॅक आईस्क्रीम आणणारा पाहिजे. 'मी बसतो नंतर, तू आधी खाऊन घे' म्हणत पोराला हातात धरणारा पाहिजे. तसंच मंगळसूत्र, जोडव्या घातल्या नाहीत तरी पदोपदी त्याच्यासोबत उभी राहणारी बायको हवी.प्रेम अनेक गोष्टीतून दाखवता येतं आणि दिसणाऱ्याला ते कळतंही. रोजचं आयुष्य इतकं सामान्य असतं की  त्यात या अनेक छोट्या गोष्टीही एकदम हिरो सारख्या वाटू लागतात. 
         आता ही केवळ उदाहरणं आहेत. अशी अनेक सांगता येतील. पण उगाच 'मदर्स डे' किंवा 'ऍनिव्हर्सरी' लाच प्रेम उफाळून येणाऱ्या लोकांपेक्षा रोज कुठेही नोंद न करता आपल्या वाट्याचं काम मन लावून करणाऱ्या साऱ्या नवऱ्यांना माझा सलाम. मला तरी दिखाव्याच्या शाहरुखपेक्षा तो इरफानच आवडला बाबा. :) 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/