Monday, October 28, 2019

दिवाळी !

        लेक मोठी व्हायला लागली. सणासुदीला तिला तयार होताना निरखून पहायला लागली होती. कधी कपडे निवडतांना सुचवू लागली.  हे चप्पल नको, तुझ्या ड्रेससोबत हे बूट्स घाल असं हक्कानं सांगायला लागली. तर कधी 'कुठल्या काळातले कपडे घालतेस गं आई?' असे टोमणेही मारायला लागली होती. तिच्या वळवून नीट केलेल्या केसांना हात लावून पाहू लागली होती. 'माझेही असेच सेट कर' म्हणून हट्ट करू लागली. कधी तिच्या ओठांना लावलेली लिपस्टिक पाहून, 'मलाही मेकअप करायचा' म्हणून रुसू लागली. आणि हे सगळं ती जवळून पाहतांना तिला मात्र एकच भीती होती.... 

          शाळेत, कॉलेजमध्ये असताना आईनं अनेकदा हे करू नको, असे कपडे नको, असं वागणं नको, बोलणं नको ऐकवलेलं, अडवलेलं. पण हेही आठवायचं की सणासुदीला आवर्जून आई तिला आवरून द्यायची. लांब केसांची छान वेणी घालून द्यायची. गौरी गणपती, सत्यनारायण पूजेला आपल्या आधी तयार करून, कधी आपलीच साडीही नेसवून द्यायची. हळदी कुंकवाला आलेल्या बायकाही, "कसं तुम्ही पोरींचं इतकं छान आवरता' म्हणून कौतुक करायच्या. दिवाळीला फराळाची धावपळ करून ड्रेस शिवायची. आणि हे सगळं असूनही तिला अनेकदा आईशी वाद घालतांना, तिने कशाला नकार दिल्यावर वाटलेलं, "तू मुद्दाम माझं आवरत नाहीस. तुला माझ्यापेक्षा जास्त छान दिसायचं असतं ना?". 

         वाढत्या वयात कधीतरी आपल्याच आईबद्दल वाटलेली असूया आणि राग अनेकदा मनात घोळलेला. तो प्रसंग खरंच घडला की आपण हे केवळ मनातल्या मनातच बोललो हेही आठवत नव्हतं. इतक्यांदा विचार केलेले ते क्षण घडले की तिच्याच मनाचे खेळ होते हेही तिला आठवत नव्हतं. आणि प्रत्यक्षात तोंडातून बाहेर पडले नसले तरीही मनात आतवर रुतलेले. आणि यातून मनात आलेली एकच भीती..... माझ्या लेकीलाही असंच वाटेल का माझ्याबद्दल.               

         हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली हे कळल्यावर गुंगीत तिने एकच वाक्य बोललेलं,"आता आपल्याला तिच्यासाठी ते क्यूट ड्रेस विकत घेता येतील." एक तो दिवस आणि आता? परवा दिवाळीला ती साडी नेसताना, दागिने घालतांना लेक पहात होतीच. म्हणाली, "मलाही लिपस्टिक लावून दे. हे गळ्यातलं घालून दे." "लिपस्टिक वगैरे लावायचं तुझं वय नाहीये अजून" या वाक्यावर लेकीनं तोंड मुरडलं. 'गळ्यात नको घालूस हे. तिथे १५ मिनिटांत माझ्याच हातांत आणून देशील." ती साडीच्या निऱ्या करत बोलली. आणि या वाक्यावर पुट्पुट कानी आली,"मला माहितेय तुला माझ्यापेक्षा छान दिसायचंय." 

         आपण अनेकदा ठरवतो 'हे असं झालं तर मी अशी वागणार. असं बोलणार. अजिबात रडणार नाही. वगैरे वगैरे' . आणि तरीही लेकीचे शब्द ऐकून ती निऱ्या सोडून थबकली. आजवर त्या आईला बोललेल्या/न बोललेल्या वाक्यांचं ओझं डोक्यावर जड झालं. गळा दाटून आला आणि ती बोलली," तुला माहितेय मीही अशीच माझ्या आईला बोलले होते. खूप वाईट वाटलं होतं तिला. आणि मला आजवर वाईट वाटतं की तुझ्या आजीला मी असं बोलले. कारण ती नेहमीच मी छान दिसावं, राहावं म्हणून प्रयत्न करायची. तुझ्यासाठी मीही अनेक गोष्टी करते. तू माझी लेक आहेस. तुला खरंच वाटतं का मला असं वाटत असेल? ". लेक थांबली, मग थोडी शरमली, नरमली आणि हसली. राहील का तिच्या लक्षांत माझ्यासारखंच अनेक वर्ष? काय माहित. पण तिला ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. आईला सांगायची हिम्मत झाली नाही निदान लेकीला तरी सांगू शकली म्हणून. 

विद्या भुतकर.