Thursday, October 18, 2012

पाच किलोमीटर आणि बरेच काही...2

       'मला वाटतय त्या शामचाच काहीतरी हात असणार बघ', म्हणत मी रात्री सोफ्यावर बसले. एक तीस मिनिटांची हिंदी मालिका बघायची आणि मेल, फेसबुक चेक करायचे आणि झोप हाच काय तो दिवसभरात स्वत:साठी मिळालेला वेळ.  तेही सानू आणि स्वनिक झोपल्यावर. नाहीतर मग रहाटगाडगं चालूच. बरं बसावं म्हटल टीव्ही लावून  पोरं जागी असताना तर ते झोपल्यावर बघून अपराध्यासारखं वाटत  की  तेव्हढाही वेळ दिला नाही म्हणून त्यांना.  तर हे असं होणारच होतं. त्यातही  मी जेव्हा स्वत: साठी दुपारी का होईना वेळ काढुन पळायला जायला लागले तेव्हा सही वाटलं. आणि ५किमी पळाल्यावर तर अजूनच भारी वाटत होतं. 
         पुढचा आठवडा उगवला आणि मग ते मोटिवेशन राहिलंच नाही. ५ किमी ची रेस  संपली होती.मग उगाचच मनात विचार यायला लागले, 'अजून जास्त पळाले तर?  अजून किती पळू शकते? इ. इ.' तीन मैल पळूनच मला दम लागायचा. माझ्या टीममध्ये एका मुलगी होती ती जायची रोज पळायला. म्हणे ७-८ मैल जाते रोज. कधी  कधीतर घरून पळतंच यायची ऑफिसला. तर वाटले ती जाते काही मेरेथोनला, आपण पण जावं का? पण पूर्ण मेरेथोन म्हणजे २६.२ मैल.  मी मरूनच गेले असते. सो ओउट ऑफ क्वेश्चेन.मग पाहिले अर्धी मेरेथोन ट्राय करावी. ती तरी थोडी आहे का? १३.१ मैल. २१ किलोमीटर. त्यात माझे ५ कसे पुरायचे? 
        राहवत नव्हतं बघितल्याशिवाय, म्हणून म्हटलं माहिती तरी काढू आधी. तसे पळायला  काही ग्रुप जातात एकत्र क्लास पण लावतात.  पण आयुष्यात शिकवणी  कधी लावली तर ना. स्वत:च माहिती काढायला सुरुवात केली.  एकदा डोक्यात घुसलं ना  की ते जात्तच नाही. मग पहिली हाफ मेरेथोन पळायला काय काय लागतं ते बघितलं. आधी पासून पळत असला पाहिजे, किमान ५ किमी तरी. म्हटले अरे वाह. हे तर झालं. बरेच प्लान मिळाले नेटवर. सर्वच मला योग्य नव्हते. पण सर्व मिळून एका प्लान बनवला. आणि एकदम सोपाही वाटला. तर करायचं काय? 
        आठवड्यातून फक्त ४ दिवसच जिमला जायचे एकूण. त्यातही  एक दिवस क्रॉस ट्रेनिंग ला जायचे. म्हणजे अएरोबिक्स वगैरे. नशिबाने आमच्या ऑफिसमध्ये १० आठवड्यांचा एका क्लास सुरु होत होता. एरोबिक्सचा. म्हटले तो करावा सोमवारी. मग एक दिवस ब्रेक. बुधवार, गुरुवार ३-४ किमी पळायचे, मग शुक्रवारी ब्रेक. आणि शनिवारी 'लोंग रन'. म्हणजे, ३,४,५,६,७,८...असे दर शनिवारी एक एक मैल अंतर वाढवायचे १२ मैलपर्यंत. म्हणले  बरे आहे, शनिवारी गेले म्हणजे जास्त वेळ मिळेल आणि रविवारी विश्रांतीही  आणि सोमवारी परत सुरु एरोबिक्स. तर असा  फंडू साधा प्लान होता. आणि शिकागो हाफ मेरेथोन ९ सप्टेंबर ला होती आणि आमचा अजून मे च चालू होता. म्हणजे वेळही होता पुरेसा.  त्यांचं रजीष्ट्रेशन  ही १५ ऑगस्ट पर्यंत होते बहुतेक. तर  आधी पळून बघू नाहीच झाले तर राहू दे असे ठरवले.
          सोमवारचा क्लास सुरु झाला. १ तास एरोबिक्स, बाप रे. माझे सर्व सांधे, हाडे आणि अवयव जागृत झाले होते. पहिला क्लास बरा वाटला पण दुसरा झाल्यावर चार दिवस सरळ चालताही येत नव्हते, पळते कुठली? तरी पैसे दिलेत तर क्लास चालू ठेवणे भाग होते. पण हळू हळू त्याचीही सवय व्हायला लागली. :)instructor  ने ५० abs सांगितले  की  मी ४० काढूनच गार. बाकी काउंट मध्येही  फेराफार चालायचीच. क्लासमुळे दुखणारे अवयव जरा ठिक  होतात तर बुधवार आणि गुरुवारचा रन. आता इतके दिवस पळते म्हणून पळायचा वेग तरी वाढला का? नाही !! कितीही जीव खाऊन पळाले तरी वेग काय ४-५ मैल तासाला. तुम्ही म्हणाल की वेगाचं  काय ते? त्यालाही कारण होतं. 
          शिकागो हाफ मेरेथोन ला वेगाचं बंधन होतं. १३ मिनिटात एक मैल वेगाचं.  आणि मी आपली पहिले ३ मैलच १३ मिनिटांनी पळत असेन तर १३ मैल कसे त्याच वेगाने पळणार? किती प्रयत्न केले पण काही वेग वाढला नाही. बर त्याचं  जाउ दे. पुढे आला शनिवार चा 'लॉंग रन'.  ५ किमी च्या अनुभवावरून कळले होते की  बाहेर पळणे आणि जिम मध्ये यात फरक पडतो. म्हणून जवळच्या पार्क मध्ये पळायला जायचे ठरवले. त्यासाठी अजून एक गोष्ट बघणं आलंच मग. शनिवारी हवामान कसं आहे? शिकागोच्या बिन-भरवश्याच्या हवामानाचा अंदाज मी गुरुवारीच घ्यायला लागले. थंड असेल तर जरा उशिरा गेले तर चालेल. गरम असेल तर सकाळ इ. किती वाजता किती आहे तापमान हे बघा, इ,इ. 
          शनिवारच्या पळण्यासाठी नुसती हवामानाचीच नव्हे तर आमचे रुटीन बदलायचीही गरज होती. शुक्रवारी रात्री लोकांना भेटा, उशीरपर्यंत टीव्ही बघा, मग उशिरा उठा हे सर्व बंद करायला लागणार होतं.  अगदी  बाहेर  खायला जाणंही. का तर, वेगळ काही खाऊन पोट बिघडायला नको. हे सर्व बंद करूनही  शुक्रवारी रात्री झोप यायला हवी ना? आणि आलीच तर शनिवारी सकाळी कुणी ६ वाजता उठलंय का? पण ते ही केलं. इरवी ७-७.३० उठले तरी शनिवारी निदान ६.३० ला तरी उठले. पार्कमध्ये २ मैलाचा एक राउंड होता. मग आधी २ पासून सुरु केले. ४,५,६ मैल अंतरावरही पोचले. पण पळताना प्रत्यके मिनिटाला हेच विचार की किती मैल राहीले, किती वेळ झालाय, मग वेग किती आहे, १३ मैल कसे पळणार आणि किती वाजलेत. कधी वाटलं  नाही की किती मस्त हवा आहे, लोक चालत आहेत, मासे पकडत आहे की  सायकल चालवत आहे. काही नाही. फक्त गणित मनातच.  बावळट मी !!
          वाटलं सर्व मस्त चाललं आहे बरं का ७ मैल झाले आहेत. कसंलं काय? नको तेच घडलं. एका शनिवारी बाहेर पाउस पडतोय म्हणून जिम मध्ये पळायला गेले. ७.५ मैल !!! (किती हे डेडिकेशन ???) आणि दोन दिवसात गुढगे दुखायला लागले. बुधवारी २ मैल गेले कशी तरी. मग बंदच. म्हटले जरा ब्रेक घेऊच म्हणून पुढचा आठवडा गेलेच नाही.  तरी परत तेच. जरा पळाले  की उजवा गुढगा दुखायचा. खूप काही वाचले, कसले व्यायाम केले पाहिजेत ते बघितले. नवीन शूज आणले. सर्व झाले तरी  काही फरक पडत नव्हता. आणि माझा धीर आणि उत्साह  दोन्ही जरा कमी व्हायला लागले होते...

क्रमश: 

-विद्या.

1 comment:

अपर्णा said...

वॉव....बराच सराव इ. करताय सही....

माझ्या नवर्‍याचा एक मित्र ही मॅरेथॉन पळाला होता...मला वाटतं २००६ की ०७ मध्ये...एकंदरीत पळणं आपलं काम नाही हे खूप आधीच लक्षात आल्याने मी प्रत्येक पळणार्‍याला शुभेच्छा देत असते....सो शुभेच्छा..:)