Saturday, December 01, 2012

कन्फेशन

बरेच दिवस झाले मनात एक गोष्ट आहे. ती निदान बाहेर तरी येऊ द्यावी म्हटलं. मी शिकागोला आले तेंव्हा वाटलं होतं इकडे जगजीत सिंगच्या कॉन्सर्त होतात म्हणे इकडे. कॉलेज मध्ये असताना गेले होते एकदा शेवटच्या वर्षी. ती रात्र अजूनही आठवते. शेजारी उगाचच प्रत्येक गाण्याला वाह-वाह करत स्वत:च्या तारस्वरात गाणारा एक ग्रुप बसला होता. इतकी चिडचिड झाली होती. पण हलकासा पाउस पडला होता त्यादिवशी. सांगलीत असं थंड वातावरण कमीच पण त्यादिवशी होतं. परत कसे आलो आठवत नाही. पण आकाशाकडे बघत जगजीतचा आवाज ऐकत बसले होते तेच आठवत होतं. तर त्यानंतर परत जायचं होतं. ते काही झालं नाही.
         पण गाणी तर असायचीच सोबत. त्यांनी कधीच साथ सोडली नव्हती. मध्येच एखाद्या संध्याकाळी चुकून ऐकून रडू यायचं. तर कधी 'मरासिम' मध्ये गुलजार जा आवाज ऐकत बसावंस वाटायचं. आमच्या गाडीत MP३ प्लेयर नाहीये त्यामुळे एका सीडी मध्ये १२च गाणी बसायची कशीबशी. त्यामुळे एकदा बसून २-३ सीडी पण बनवून घेतल्या होत्या. त्याच ऐकायचे. संदीप असायचाच शेजारी पण गाण्यात असेल याची शंकाच होती. सानू झाल्यानंतर हे असं सीडी बनवणं बंदच झालं. आणि त्यात् ऑफिस ५ मिनिटांवर. त्यामुळे गाडी सुरु करून गाण्याची सुरुवात होते न होते तोवर पोचून जायचो ऑफिसमध्ये. त्यामुळे गाडीत गाणी ऐकणं बंदच झालं गेले ३ वर्षं तरी. त्या जुन्या सीडी कुठे आहेत काय माहित. एकदा अशीच एक सीडी दिसली गाडीत म्हणून लावलीही होती. तर तेंव्हा माझा आणि संदीपचा विषय झाला की बघू सानू माझी मुलगी का त्याची.:) आणि अगदी त्याचं ऐकून एका गाण्यातच झोपूनही गेली ती. तर तेव्हढाच काय तो संदर्भ गेल्या ३ वर्षातला.
          मध्ये एकदा पिंकीने ती कॉनसर्ट जाऊन आल्याचे स्टेटस टाकले होते फेसबुक वर. तेव्हा हेवा वाटला होता. आणि ती बहुतेक त्याची शेवटची कॉनसर्ट होती. त्यानंतर फक्त बातमीच वाचली RIP म्हणून. आणि खरं सांगू का, ती बातमी कधी आली, काय झाले होते, काहीच वाचलं नाही. फक्त लोकांच्या स्टेटस वर 'लाईक' केले आणि मोकळी झाले. पण मधेच मनात विचार येतात मी इतकी कशी निरस झाले आहे? आय मीन, कुणी 'गेलं' आणि डोळ्यात एक अश्रूही नाही? बरं ते जाऊ दे, त्याच्या आठवणीत एखादं गाणं तरी ऐकावं? ते ही नाही. पाचेक वर्षापूर्वी, बातमी कळली की 'एव्हरी बडी लव्हज रेमंड' मधला त्याचा म्हातारा बाप जो होता तो गेला म्हणून. तर दिवसभर मला चैन पडली नव्हती. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा ती मालिका पहिली त्याची आठवण व्हायची. ज्या म्हाताऱ्याने इतकं हसवलं तो या जगात नाही म्हणून. आणि जगजीतसाठी एक गाणं नाही?
       कधी वाटतं अशी कोरडेपणाने जगत आहे म्हणून इतके दिवस घरापासून लांब राहू शकलेय. असेच राहात असतील का लोक आपल्या घरी परत न जाता, अनेक वर्षं आई-बाबांना न भेटता? कुठेही इमोशनल होऊच द्यायचं नाही स्वत:ला. जरा सेंटी पिक्चर आहे वाटलं की बदलून टाकायचा. पुस्तकं, गाणी असल्या कुठल्याही त्रास देणाऱ्या वस्तू मी गेले ३ वर्षं जवळ बाळगल्याच आठवत नाहीये. अर्थात पोरं हे सगळं करायला आणि विचार करायला क्षणभरही देत नाही हा भाग निराळा. आताही रात्री ३ वाजता बेबी मॉनीटर वर खुसपूस ऐकू येत आहे. असो. परवा बंडूला डेंग्यू झाल्याचं आई फोनवर बोलली आणि पोटात गोळा येतो म्हणजे काय हे जाणवलं. सगळं ढवळून आलं. म्हणजे काय करू काय नको इथे बसून हे कळेना. त्याचं सर्व ठीक होईपर्यंत काहीच सुचलं नाही. त्याचं सर्व नीट झाल्यावर असाच मनात विचार आला, मी निदान जिवंत असण्याचं चिन्हच आहे हे. फक्त परत असल्या परीक्षा नकोत.
         तर जगजीत बद्दल, आज संध्याकाळी परत विचार आला मनात ऐकावं का एखादं गाणं ? पटकन सीडी पण सापडली नाही. पण मनातून भीती वाटतेच. उगाच ऐकत बसायचे आणि अचानक आठवलं तो आता या जगात नाही म्हणून तर? आणि रडू आलं तर काय करायचं? नकोच ते. म्हणून राहून गेलंय. गिल्टी वाटत राहतं पण वाटतं पुन्हा कधीतरी. आज नको. बघू कधी येतंय ते रडू, अजून हिम्मत नाही झालीय. पण लिहून ते मान्य तरी करावं म्हटलं म्हणून हे कन्फेशन.

-विद्या.


4 comments:

Unknown said...

काय विचित्र आपले मन असते.
एखाद्याची प्रकर्षाने आठवण त्यांच्या जाण्यामुळे होते.
एरवी त्यांचे अस्तित्व आपण कळत नकळत गृहीत धरून चालतो.
कदाचित मृत्यू ही संकल्पना अशी आहे की आपले अंतर्मन ढवळून निघते.
जगात रोज लाखो मरतात, पण आपल्या जीवनातील व भाव विश्वातील सर्व चिरंजीव राहावे असेच आपल्याला वाटत असते.

Meghana Bhuskute said...

रडू आलं तर रडावं. असं पुढे ढकलत राहावं तर जेव्हा कधी तोंड द्यावं लागतं, तेव्हा गोष्टी हाताबाहेर जातात. ;-)

भानस said...

मन कसे कसे खेळ करत राहते नं.
कुणाकुणात आपण नकळत जीव गुंतवून बसतो. ना कधी भेट झालेली असते ना बोलणे तरीही वाटते कोणी जीवलगच दुरावलेय.

असे वाटणे साहजिकच, म्हणूनच आठवण आली की बेदम आठवण काढावी. ती आठवण डोळ्यांवाटे पाझरु द्यावी. खूप शांत वाटेल... :)

Vidya Bhutkar said...

आणि नुसतेच जगजीत बद्दल नाही तर मग एकूणच सर्व गोष्टींबद्दल हळवी होईन अशी भीती वाटते म्हणून हा पळपुटेपणा. कळतंय पण वळत नाही असं झालं आहे. :)
-विद्या.