Tuesday, January 15, 2013

खुसपूस, कुई-कुई आणि भोकाड

         जुन्या पोस्ट वाचताना लक्षात आले की माझ्या पोस्ट माझं त्या-त्या वेळचं आयुष्य रिफ्लेक्ट करतात. आणि ते योग्यच असाव कारण तोच तर या ब्लॉगचा हेतू आहे. आणि माझी सध्याची फेज ही मुलं सांभाळून नोकरी अशी आहे असं वाटतंय. कारण ही पोस्ट त्याबद्दलच आहे. रोज रात्री दहा वाजेपर्यत मुलांना झोपवून एक तासभर तरी टी व्ही पहायला मिळवणे हे एकच ध्येय असतं संध्याकाळी घरी आलं की. रात्री १० वाजेपर्यंत ते झोपले की अगदी जग जिंकल्याचा आनंद होतो. मग जरा फेसबुक, मेल, डील्स, टी व्ही या सगळ्या गोष्टींना निवांत पणा मिळतो. पण हा सर्व आनंद सकाळीही चेहऱ्यावर असेलच असं नाही.
         घड्याळ्यात बारा वाजल्याशिवाय डोळे मिटायचे नाहीत हा आमचा दोघांचा अलिखित नियम. डोळ्याच्या खाचा झाल्या तरी चालतील मग. तर आम्ही असे बारा वाजता जाऊन टेकतो आणि झोप काय लगेच लागतेच. निजेला  खरंच मला धोंडासुद्धा चालेल इतकी दमलेली असते मी. आणि लोक जे म्हणतात ना की आई झाल्यावर मुलाच्या आवाजाने जाग येतेच, कान हलके होतात, इ, इ हे सर्व एकतर खोटं आहे किंवा संदीप आमच्या मुलांची 'आई' आहे. तर साधारण साडेबारा-पाऊण च्या दरम्यान  स्वनिकची हालचाल सुरु होते. मी झोपलेलीच. संदिपच उठून दूध आणतो त्याला देतो आणि दोघेही झोपून जातात. ही झाली बेस्ट केस. त्याला स्टेप वन म्हणू.
          तर बेस्ट केस नसली तर मात्र, स्टेप वन मुळे थोडा वेळ हालचाल थांबते. पाच दहा मिनिटांनी खुस-खूस सुरु. अशा फालतू खुस-खुशीला कुणी लक्ष देत नाही. जो पर्यंत ही खुस-खूस बारीक रडण्यात आणि बारीक रडण्यावरून 'भोकाड' या टीपेला जात नाही तोवर कुणीही लक्ष देणार नसतं. हे ओळखून स्वनिकही लगेच वरची टीप धरतोच. अर्थात हे सर्व संदीपलाच ऐकू येत असतं. त्याचे रडगाणे जोरात सुरु झाल्यावर काहीतरी करणं मग भाग पडतंच. संदीप मग त्याच्या उशीजवळ पडलेला पॅसिफायर शोधायला लागतो. गादीवर गोल गोल फिरून तो स्वनिकाने कुठे टाकलेला असेल हे सांगता येत नाही. आणि अगदी स्वत:च्या डोक्याजवळ असलाच तरी तो लगेच मिळेल असं नाही. तर एकूण नशीब चांगले असेल तर पॅसिफायर लगेच मिळतो आणि स्वनिकला तोंडात तो देऊन सर्व परत बेक टू झोप. आता ही झाली सेकंड बेस्ट केस.
            दुध झाले, पॅसिफायर झाला. तरीही खुस-खूस संपत नाही. पाच दहा मिनिट शांतता आणि परत भोकाड चालूच. बराच वेळ झाला आवाज बंद का होत नाही म्हटल्यावर 'आई' म्हणणाऱ्या मला काहीतरी त्रास व्हायला लागतो कानाला. मी,'काय रे, काय झालं. अजून का झोपत नाहीये? ' . 'पोटात दुखत असेल का?' संदीपचा प्रश्न. मग त्याला ग्राईप वॉटर द्यायचे की इथे एक Infant Gas Relief औषध मिळते ते द्यायचे त्यावर निर्णय घ्यायला लागतो. दोन्ही पैकी काहीतरी एक देऊन त्याला झोपवायाचा प्रयत्न करतो आणि आम्हीही तसेच आडवे पडून जातो. यात माझा सहभाग फक्त स्वनिकला पकडणे इतकाच असतो. बाकी औषध आणणे, ते स्वनिकला देणे, तो रडत असताना तोंड पकडून तोंडात घालणे, इ. संदिपकडेच. नशिब चांगले असेल तर जे काही त्याला दिले आहे ते काम करते आणि आम्ही सर्व सकाळपर्यंत डाराडूर.
          पण कधी त्यानेही फरक पडत नाही. मग अजून तासाभराने खुसपूस, कुई-कुई आणि मग भोकाड या स्टेजेस येतात. आता मात्र मी वैतागते. आणि खरंच काहीतरी गडबड आहे असं म्हणून सूत्र माझ्या हातात घेते. एकतर रात्री थंडी असेल तर आम्ही मस्त गरम पांघरूण घेऊन झोपलेलो असतो आणि स्वनिक तसाच. त्यामुळे त्याला थंडी वाजत असेल का? किंवा उन्हाळ्यात गरम होता असेल का असे प्रश्न आम्ही एकमेकांना विचारतो. एक मात्र नक्की असतं. जे काही त्याला होत आहे याच्या एकदम उलट माझं तंत्र असतं. तर आम्ही त्याला काय होत असेल हे बोलत असताना रडण्याचा आवाज आता अशक्य मोठा झालेला असतो. त्यात मग शेजारच्या रुममध्ये झोपलेली सानू उठते की काय म्हणून अजून भीती.
आणि जसा आवाज वाढेल तसा संदीपला अस्वस्थ होऊन गरम व्हायला लागते. मग तो हळूहळू ती-शर्ट काढ, ए-सी लाव असे प्रकार सुरु करतो.
          कधी डायपर बदलून बघतो. तर कधी अजून एखादा कपडा घालतो थंडी वाजत असेल म्हणून. तर कधी खांद्यावर घेऊन झोपवतो, कधी मांडीवर घेऊन बसतो. जसा झोपेल तसा, ज्या कुशीवर असेल तसे. कधी मग ताप तर नाहीये ना रे? म्हणून थर्मामीटर आणून चेक करतो. तर कधी कान दुखत असेल का म्हणून त्याला दुध देऊन बघतो. (कान दुखत असेल तर मुलं काही प्यायला नको म्हणतात. कारण गिळताना कान दुखतो.) कधी त्याला अगदीच बरं वाटत नाहीये असं वाटलं तर मध्यरात्रीच उद्या सुट्टी कुणी घ्यायची ऑफिसमध्ये यावर बोलून घेतो. या सगळ्यात नक्की कशाने त्याला फरक पडला असेल हा विचार करायला सवड कुणाला असते? तो जर झोपलाच परत तर पटकन आम्हीही गुडूप होऊन जातो.
        सकाळी उठल्यावर हे महाशय एकदम ताजेतवाने आणि आमचे तारवटलेले डोळे. काल रात्री काय झालं होतं विचार करायालाही वेळ मिळत नाही की सकाळची धावपळ सुरु होते. मग पुन्हा तेच चक्र.  हे सर्व एकाच रात्रीत होते असे नाही किंवा रोजच असेही नाही. पण दोघंच असं मुलांना सांभाळणं म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या निर्णयापर्यत सर्वच करायचं म्हटलं की ही अशी रोजची कसरत सुरु असते. त्यात असे रात्री झोपलेल्या अवस्थेत योग्य निर्णय घेतोच असेही नाही. घरात कुणी मोठं माणूस असलं की किती फरक पडत असेल असं वाटतं कधी. घरी नंतर फोन करून किंवा इन्टरनेटवर असताना हे सर्व सांगितलं की घराचे सूचना द्यायला लागतात. आणि मग आमच्यासारखे 'शिकलेले' म्हणवणारे लोकही मग नेटवरून आईकडून पोरांची दृष्ट काढून घेतात. :)
-विद्या.

6 comments:

भानस said...

अगदी अगदी! रात्रीच्या या रोजच्या लढाईवर निरनिराळी उपाय योजना करतच राहायची. जो बाण लागेल तो आपला. मग ते ग्राईपवॉटर असू दे की दृष्ट. :)

विद्या, येतेस का विकांताला माझ्याकडे. तुला थोडासा निवांतपणा द्यायचा प्रयत्न करुयात. मनापासून सांगतेय गं...:)

Parag said...

Masta lihilays !! Sadhya amhihi hyach phase madhun jatoy.. :)

Chaitanya Joshi said...

खूप ब्लॉगर्सच्या(वाचा- ताई-दादा ब्लॉगर्स)मुलांच्या खोड्या-काळजी-मस्ती-इत्यादी अशा पोस्ट्स वाचतो...वाचताना गम्मत वाटते आणि आपल्याला अजून हे सगळं करायला अजून वेळ आहे हे लक्षात येउन बरं वाटतं ;)...मस्त पोस्ट!

Manasi said...

"जुन्या पोस्ट वाचताना लक्षात आले की माझ्या पोस्ट माझं त्या-त्या वेळचं आयुष्य रिफ्लेक्ट करतात. आणि ते योग्यच असाव कारण तोच तर या ब्लॉगचा हेतू आहे."
Well said! And nice post as usual Vidya!

Marathi Blog KattaOnline said...

Very realistic description of early days in parenthood :)

rohinivinayak said...

khup chhan lihile aahe, post aavdali :) dolyasamor chitra ubhe rahile.