Thursday, March 22, 2018

मला पडणारे प्रश्न

        लहानपणी मला अनेक प्रश्न पडायचे. म्हणजे गाणी ऐकताना फक्त बाई किंवा पुरुषाचाच आवाज का असतो? असं विचारल्यावर आई म्हणाली, मग दुसरा कुणाचा असणार? मी मला माहीत असलेले सर्व सजीव विचार करुन पहिले. मग लक्षात आलं की, "अरे, खरंच, स्त्री आणि पुरुष सोडले तर बाकी सारे प्राणीच आहेत. दुसरा प्रश्न म्हणजे,"भाषा कुणी निर्माण केली?". तेव्हा तर फक्त मराठीच माहित होती. त्यामुळे विचार फक्त मराठीचाच करायचे. उदाहरणार्थ, "स.... र...... ळ...." ही तीन अक्षरे आहेत. ती तशीच का लिहायची? बरं, 'स' हे एक चित्र आहे, 'र...  -...  ।...  ' हे तीन आकार जोडून काढलेलं. ते चित्र म्हणजेच 'स' कशावरुन? आणि त्याचा उच्चार 'स' असाच करायचा हे कुणी ठरवलं?  मग अशी प्रत्येक अक्षरे एकत्र करुन 'स र ळ' हा शब्द बनणार. आता या तीन अक्षरांनी बनलेला शब्द आणि त्याचा अर्थ कुणी ठरवला? 'सरळ' म्हणजे 'सरळ', हे कधी ठरलं? 
आता हा एका भाषेतील एक शब्द झाला. अशा प्रत्येक भाषेतला प्रत्येक शब्द, त्यांची रचना. कितीतरी गोष्टी. हे सर्व कुणी ठरवलं? आणि आपण जन्मलो तेव्हा हे सर्व आधीच तयार होतं. म्हणजे आपण किती उशिरा जन्मलो आहे. 
       हे असले अनेक प्रश्न मूळ मानवजातीबद्दल अजूनच चौकस करायचे. गेली अनेक वर्षं माझ्या डोक्यात एक चित्र उभं राहतं. एक घोळका एका प्राणिसंग्रहालयाचा फेरा मारत आहे. एक मोठा काचेचा बॉक्स आहे. प्रचंड मोठा. त्यात एक घर आहे, बाहेर छोटी कृत्रिम बाग आहे. झाडं, फुलं आहेत. बाहेरुन पाहणारा घोळका कशाचा आहे माहित नाही. कुठलातरी नवीन प्राणी असावा. कारण काचेच्या आत जो प्राणी ठेवला आहे ते म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष आहेत. जसे आपण दोन वाघ, कधी हत्ती, जिराफ, झेब्रा वगैरे बघतो ना? तसेच. एकटेच. बाहेरच्या घोळक्याला फक्त त्या आतल्या प्राण्याची माहिती दिली जात आहे. 'माणूस' नावाच्या प्राण्याची. त्यात मग स्त्री आणि पुरुष हे नर-मादी आहेत. त्यांचं प्रजनन कसं व्हायचं वगैरे. त्यांची जीवनशैली, राहणीमान हे सर्व बाहेरुन कुणीतरी त्या घोळक्याला सांगत आहे. 
       आता पुढे जाऊन विचार यायचा तो म्हणजे, आत असणाऱ्या या माणूस नावाच्या प्राण्यांच्या डोक्यात काय चालू असेल? तो पुरुष, एकटाच सगळीकडे फिरत आहे, तिकडे ती स्त्री काहीतरी काम करत आहे, उगाच. कारण त्यांना जगण्यासाठी काही कष्ट तर घ्यायचे नाहीयेत. ज्यांनी हे प्राणिसंग्रहालय चालवलं आहे ते त्या दोघांची काळजी घेतात. त्यांना नियमित जेवण, पाणी वगैरे वेळेत दिलं जातं. ते जेवणही ते बाहेरचे प्राणी केवळ हा मनुष्य प्राणी खातो म्हणूनच बनवत असतील. फक्त आला दिवस संपवणे इतकंच काम आहे त्यांना. आता हे स्त्री आणि पुरुष एकमेकांशी बोलत असतील का? माहित नाही. कारण त्यांची भाषा वेगळी असू शकते. दोन निरनिराळ्या देशातून, जागेतून शोधून आणलेले हे प्राणी असू शकतात. त्यांना एकमेकांबद्दल काही प्रेम वाटत असेल का? कारण एकमेकांचा काही संबंध नाहीये. केवळ एका प्राण्याच्या जातीतले म्हणून एकत्र आलेत. बरं असंही असू शकतं की त्यांचं वय कमी जास्त आहे. पुरुष ६५ वर्षाचा म्हातारा आहे तर स्त्री २५ वर्षाची.(इथे मी पाचच्या पाढ्यातीलच आकडे का घेतले माहित नाही.) किंवा याच्या उलट. समजा त्यातला एक जण उद्या मेला तर? मग त्या बॉक्समध्ये फक्त त्या जमातीचा एकच प्राणी शिल्लक राहील. त्या मागे राहिलेल्या प्राण्याच्या डोक्यात काही विचार येत असतील का? अशा वेळी मग तिथले व्यवस्थापक शेवटी उरलेल्या प्राण्याची किती काळजी घेतील? आणि मुळात त्या एकट्या जीवाला अजूनही जगायची इच्छा असू शकेल का? 
       तर हे असं सगळं अनेकदा माझ्या मनात येऊन गेलंय. पण कधी लिहिणं जमलं नव्हतं. परवा सुदानमधल्या जगातल्या शेवटच्या ऱ्हायनो च्या मृत्यूची बातमी वाचली तेव्हा पुन्हा एकदा हे विचार डोक्यात आले. माणूस जातीचा शेवटचा प्राणी जेव्हा असा बॉक्समध्ये जाईल तेव्हा काय वाटेल? याचा कधी विचार केलाय? असंच उगाच. :)

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: