माणसाला कधी आपण किती क्षुद्र आहोत हे जाणवून घ्यायचं असेल ना तर त्याने रिज्युम लिहिला पाहिजे. मग तुम्ही नवीन कॉलेजमधून बाहेर पडलेले तरुण असा किंवा कितीही वर्षांचा अनुभव असलेले. एक कागद आपल्याला किती पटकन वास्तवात आणू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपला रिज्युम. आजवर मी इतके प्रकारे आणि इतक्या तऱ्हेने, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर रिज्युम लिहिलेले आहेत की फक्त रिज्युमच्या फॉरमॅटचंच एक पुस्तक छापून झालं असतं. (ही जरा अतिशयोक्ती झाली म्हणा, तरीही.) प्रत्येकवेळी मला वाटायचं की, 'अरे आपण नवीनच आहोत अजून. काहीतरी चुकतंय, काहीतरी कमी पडतंय.' पण परवा '१७ वर्षं' लिहितानाही तसंच वाटलं आणि म्हटलं हे दुखणं काही जाणार नाही, ते आता कायमचंच.
खरंच, इथे ब्लॉग, गोष्टी वगैरे लिहिण्यापेक्षा रिज्युम कसा लिहायचा हे शिकले असते तर पोटापाण्याचा प्रश्न मिटला असता. सिरियसली, आपलं आख्ख आयुष्य दोन-चार पानांतच कसं काय लिहिणार? बरं तेही असं की समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे की 'अरे काय भारी आहे रे हा माणूस! आपल्याला अशाच माणसाची गरज आहे कंपनीत.' दुसऱ्या माणसाच्या हातातले ते पहिले पाच सेकंद ठरवणार आपलं आख्ख दोन चार पानांवर लिहिलेलं आयुष्य चांगलं कि वाईट?
बरं प्रयत्न करायला हरकत नाही, काहीतरी भारी लिहिण्याचा स्वतःबद्दल. इकडून, तिकडून ढापून लिहा हवं तर. पण या दुखण्याचं मुख्य लक्षण हे की तुम्ही दुसऱ्या कुणाचा रिज्युम पाहिलात की तो एकदम भारी वाटेल. आणि तोच, तसाच आपला लिहिला तर एकदम फालतू. खरं सांगायचं तर कॉलेज मध्ये , किंवा त्यानंतर पहिले काही वर्षं रिज्युम लिहिला तेंव्हा कदाचित इतका विचार करायचे नाही मी. कदाचित आपण आपल्याबद्दलचे गैरसमज वागवत फिरत असतो ते सर्व आपोआप त्या कागदावर उतरत जातात. पण जसं वय वाढेल तसं 'आपल्यापेक्षा जगात कितीतरी भारी लोक आहेत.' हे कळलं की संपलं ! कितीही चांगली technology, certifications, college, नोकऱ्या सगळं एका कागदावर मांडलं तरीही जे त्यांत नाहीये याची जाणीव वयासोबत आलेली असते. मग ती कॉलेजमधली आक्रमकता आपोआप कमी होते आणि अजूनच क्षुद्र वाटायला लागतं.
कधी वाटतं की नुसत्या कागदावर कसं कळणार तो माणूस कसा आहे ते? आपण किती बदलत गेलेले असतो, कॉलेजपासून वय वाढेल तसे. मग मी काय करते एकदम कोरी पाटी करते. ब्रँड न्यू डॉक्युमेंट ओपन करायचं आणि मोठ्या जोमाने सुरुवात करायची. आणि तिथंच सगळं चुकतं. स्वतःबद्दल पहिल्या दोन ओळी लिहितानाच हात थांबून जातो. 'मी काय आहे?', 'मी कोण आहे?', 'माझं आयुष्यात ध्येय काय आहे?' असे गहन प्रश्न पडायला लागतात. म्हणजे एखाद्याला ध्यानधारणा करुनही असले प्रश्न पडणार नाहीत जे त्या पहिल्या दोन ओळी लिहिताना पडतात. मग पुढे येते 'स्किल्स समरी'. शाळेपासून आजवर इतकं शिकलो, इतका अभ्यास केला, निरनिराळे उद्योग केले. पण 'स्किल' म्हटलं की वाट लागते. वाटतं आपल्यापेक्षा कितीतरी हुशार लोक आहेत या क्षेत्रात, मग आपलं स्किल ते काय?
जसं जसं प्रोजेक्टबद्दल लिहायला लागू तसं एकदम स्मृतीभंश झाल्यासारखं होतं. कितीतरी वेळा उशिरापर्यंत थांबून, शनिवार-रविवारी, कधी रात्री सपोर्टचे कॉलही घेतले असते. पण हे सगळं 'चांगल्या' शब्दांत कसं लिहिणार? उशिरापर्यंत थांबलात म्हणजे कोडिंग येत नव्हतं की प्लॅनिंग चुकलं होतं? की स्कोप बरोबर नव्हता?आयला हजार भानगडी. मुख्य म्हणजे जसं वय वाढेल तसं पानांची संख्या वाढायला लागते. तेही चालत नाही. सगळं दाटीवाटीने दोनेक पानांत बसलं पाहिजे. मग शब्द शोधा, त्यांचे अर्थ शोधा, ते योग्य जागी वापरा. आणि हे सगळं करुन समोरच्या माणसाला ते कळायलाही हवं आणि तरी भारी वाटायला हवं. इतक्या त्या अटी. गंमत म्हणजे, शाळा, कॉलेज आणि ज्यात ऍडमिशन मिळवण्यासाठी, पास होण्यासाठी मारामारी केलेली असते ते सगळे दिवस फक्त एका ओळीत संपून जातात. पहिली नोकरी, त्यातले मित्र-मैत्रिणी, अनुभव, प्रत्येक ठिकाणचा पहिला दिवस, शेवटचा उदास दिवस, या सगळ्या फक्त तारखा बनून जातात आणि नावांच्या पाट्या.
तर असा हा रिज्युम. बरं हा फक्त नोकरीसाठीचा झाला. लग्नाच्या कागदावर यातले संदर्भ अजूनच फिके होत जातात. तिकडे दुसऱ्याच गोष्टींना महत्व दिलं जातं. तिथे नोकरी म्हणजे फक्त एक आकडा असतो आणि फारतर लोकेशन. एकूण काय सर्व हिशोब हे असे कागदावर मांडायचे म्हणजे घोळच नुसता. ते सिमेटरी मध्ये लिहितात ना प्रत्येकाच्या नावासमोर, 'Daughter of, Wife of , Mother of' ती शेवटची समरी आयुष्याची आणि जन्म व मृत्यूची तारीख. या दोन तारखांच्या मधलं आयुष्य कुठे लिहिणार?
विद्या भुतकर.
1 comment:
The casino floor is filled with slot machines, including blackjack and
At the Hard Rock Hotel & 논산 출장안마 Casino Las Vegas in Las 여주 출장마사지 Vegas 영주 출장마사지 Strip, a video gaming 김뿡 얼굴 platform is available. 여수 출장샵 Guests can choose from a variety of games.
Post a Comment