मराठीच्या शिलेदारांचं परवा जोरदार भांडण झालं. खरंतर मला 'self -declared' शिलेदार असं म्हणायचं होतं पण पटकन मराठीत शब्दच सापडेना. यु नो, गेल्या वीस वर्षात मराठीत विचार करुन इंग्लिशमध्ये भाषांतर करायची सवय मोडून गेली. त्यामुळे 'self declared' ला 'स्वयंघोषित' हा शब्द सापडायला जरा वेळच गेला.तर काय सांगत होते, मराठीच्या शिलेदारांचं कडाक्याचं भांडणझालं. मी आपली शनिवारी संध्याकाळी बीयर पीत सोफ्यावर बसले होते. पण अचानक लिविंग रूममध्ये गर्दी झाली. ज्ञानेश्वर, तुकाराम,सावरकर, फुले दाम्पत्य वगैरे त्यांनी कशी मराठीची सेवा केली हे सांगू लागले. आता मी कुठे त्यांच्याशी वाद घालणार? ज्ञानेश्वरी कुठे आणि मी कुठे? शिवाय, हे ओव्या, अभंग यातलं मला फारसं काही कळत नाही. हां, दोन-चारशें वर्षांनंतरही त्यांचं नाव मला माहित आहे म्हणजे त्यांनी मराठीसाठी नक्की काहीतरी केलं असणारच.
तितक्यात फुले बाई म्हणाल्या, “आमच्यामुळे हे तू मराठी,इंग्रजी वगैरे मध्ये लिहीत आहेस, कळलं ना?”. आमचे सातारचे कर्वेआण्णाही होतेच दुजोरा द्यायला त्यांना. म्हटलं, "बरोबर आहे तुमचं. नाहीतर मी कुठेतरी, नऊवारी नेसून डोक्यावर पदर घेऊन,'नमस्कारकरते हां सासूबाई' म्हणत घरात बसले असते". मी बोलले तर आईचिडलीच. म्हणे, शिकलीस म्हणून मोठ्यांना नमस्कार करण्यात कायचूक आहे? म्हटलं, बरोबर आहे तुझं. पण तू मला नऊवारी नेसायला कुठे शिकवलीस?
आईशी वाद घालत होते तितक्यात मधेच टिळक आले कुठूनतरी. मला बीयर नक्की चढली असणार. ते म्हणे, “हे तुमच्या रेडमंडच्या राजाचं जे काही कौतुक चालू आहे ना, ते काय आपल्याला पटत नाही बुवा”.
म्हटलं, “का? उलट तुम्हाला तर आनंद व्हायला हवा मराठी भगवा अटकेपार लागल्यावर?”
तर म्हणे, “ते जोरजोरात ढोल, लेझीम, बुलेटवर नऊवारी नेसून, गॉगल घालून जाण्याऱ्या बायका-पोरी, हीआपली संस्कृती नव्हें.”
म्हटलं, “आता पोरींनी नऊवारी नेसली तरीप्रॉब्लेम? भारतात लोकं मरतायंत या ढोल-ताशांच्या आवाजामुळे. त्यापेक्षा रेडमंड बरं नाही का? “. पण टिळकांना ते काही पटत नव्हतं. ते आपले सारखं, ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?' म्हणून संतापात फेऱ्या मारत होते.
त्यांना शांत करायला लागले तर मध्येच न्यू इंग्लंडमराठी मंडळातून एकाने मला झापलं, “हे तुम्ही रेडमंड मराठी, बॉस्टन मराठी असे हजारो मराठी ग्रुप करुन ठेवता गावागावांत. मग एकी कुठून येणार मराठी माणसांत?”.
म्हटलं, “बरोबर आहे, पण मग प्रत्येक मराठी माणसाला, त्याच्या पोरांना विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम कसा करता येईल, गणपती, दिवाळी, पाडव्याला? शिवाय ते संक्रांतीचं हळदी-कुंकू आणि वाण द्यायला पण सोपं पडतं ना?” यांवर, सासूबाई खूष झाल्या. त्यांना आपली सून परदेशात जाऊनही हळदी-कुंकू वगैरे कार्यक्रम पार पाडते याचं फार कौतुक वाटलं. मी ही आईला लगेच एक सरकास्टिक लुक दिला.
मी माझं आजवरचं मराठी मंडळातलं सहकार्य आणि सहभाग यावर सर्व सेल्फी आणि ग्रुप फोटोंचा पुरावा दिला आणि आता जरा गर्दीकमी होतेय असं वाटत होतं इतक्यात पुलं आले समोर. म्हटलं आज काय आपल्याला चढू देत नाहीये कुणी.
त्यांचं म्हणणं असं की,”अभंग, ओव्या, टिळक हे सर्व ठीक आहे पण मराठी साहित्याचा वारसा कुणी पुढे नेला माहितेय का? “. म्हटलं हो, “तुम्हीच तर आम्हाला पुणेकर, नागपूरकर आणि मुंबईकरांची नव्याने ओळख करून दिलीत”.
इतक्यात बहिणाबाई चिडल्याच. आता मी त्यांना कधी आयुष्यात पाहिलं नव्हतं पण त्यांच्या हाताला भाकरीचे चटके पाहून कळलं की याच त्या, ‘अरे संसार संसार’ वाल्या. त्यांच्यासोबत ना धो महानोर देखील. का तर, मराठी साहित्य फक्त पुणे मुंबई इतपतच मर्यादित का? असं त्यांचं म्हणणं होतं. मी त्यांना सर्वाना 'हो हो'म्हणून मान डोलावली. शांता शेळके, विजयाबाई, लतादीदी वगैरे कोरस मध्ये काहीतरी गात होत्या. बहुतेक,'भय इथले संपत नाही' म्हणत असणार. माझं तरी नक्कीच संपत नव्हतं.
अचानक, ८-१० मध्यमवयीन स्त्री पुरुषांचा घॊळका जमा झाला. यातले मात्र काही चेहरे ओळखीचे होते. त्यांना आधी त्यांच्या मराठीब्लॉगमधून आणि नंतर फेसबुकवर पाहिलेलं. 'वय झालं बिचाऱ्यांचं'माझ्या मनांत विचार आला. त्यांचं म्हणणं की ‘आधुनिक जगात मराठी टिकवून ठेवली ती आम्हीच’. मग मला त्यातले काही मजेशीर,काही भांडखोर तर काही विचार करायला लावणारे पोस्ट आठवले. खरंच प्रयत्न केला त्यांनीही मराठी टिकवण्याचा. नाही कसं म्हणणार त्यांना? मीही त्यातलीच एक ना. मग आम्ही प्रत्येकानं शेवटची पोस्ट कधी लिहिलेली यावर गप्पा मारल्या. शिवाय मराठी सीरिअल्सचा खालावलेला दर्जा ‘बिग बॉस मराठीने’ कसा उंचावला, कुठली नवीन नाटकं पाहिली, मराठी मुव्हीमध्ये आजकाल गाण्यांतही इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा प्रभाव यावर सविस्तर चर्चा झाली. गुरु ठाकूर, वैभवजोशी, संदीप खरे यांनी त्यांवर माना डोलावल्या.
चांगल्या गप्पा रंगल्या होत्या इतक्यात आमच्या पोरीच्या शाळेतल्या मराठीच्या बाई नवऱ्याला ओरडतांना दिसल्या. तोही हात मागे घेऊन ऐकून घेत होता. बाय द वे, आम्ही अमेरिकेत राहत असलो तरी आम्ही पोरांना नियमित मराठी शिक्षण देतो बरं का, दर रविवारी तीनतास आमची पोरं मराठी आणि मराठी संस्कृती यांचं शिक्षण घेतात. तिथेही त्यांना मदतीला अनेकजण वैयक्तिक वेळ घालवून या पोरांना शिकवायला येतात. बरंय त्यांना जमतं ते. मला नाही बाबा तीन तास लष्करच्या भाकरी भाजायला जमत. असो.
तर सान्वीच्या बाई तिचीतक्रार करत होत्या. “मराठींत बोलायला एकदम चुणचुणीत आहे सान्वी पण अजून तिला मराठीत तिचं नावही लिहिता येत नाहीये.” नवरा शांतपणे ऐकून घेत होता. मी असते तर लगेच ऐकवलं असतं, “अहो, भाषा- बोली महत्वाची की लिखित? आमच्या दोन्ही पोरांना मराठीतले सर्व शब्द कळतात, वापरता येतात. अगदी मूर्ख, बावळट,बिनडोक सुद्धा. स्वनिकने तर अख्खा डोशाच्या गाडीवरचा मराठी मेनू वाचून दाखवलेला”.
अजून काय पाहिजे सांगा बरं मराठीला सपोर्ट करायला? असा विचार करत होते तर आई परत आली, म्हणे,”अगं नुसतं लिहिणं, वाचणं, नाटकं, गणपती म्हणजे मराठी का? रोज पोरांना ते पिझा पास्ता करून घालतेस त्याचं काय?”.
म्हटलं हे बघ, “ हे मी अजिबात ऐकून घेणार नाही, आजवर मी जितका ठेचा बनवून खायला घातलाय ना लोकांना, मी मेल्यावरही ते माझा ठेचाच आठवतील माझ्याऐवजी. शिवाय तू बनवतेस तसं झणझणीत चिकनपण पोरांना बनवून खायला घालते. मिसळ, पुरणपोळी, अजून काय हवंय?'. यावर सासूबाई म्हणाल्या, “नुसतं खायचं बघा. त्यापेक्षा ते चातुर्मास, श्रावणी सोमवार, आषाढी, अथर्वशीर्ष, सत्यनारायण वगैरे केलंस तर जरा बरं होईल.'” म्हटलं “हो सासूबाई”. या सगळ्यांना'हो हो' करून माझ्या सांताक्लॉज व्हायची वेळ आली.
अख्खा सिक्स पॅक संपला तरी हे लोक मला काही मराठीच्या शिलेदारांच्या यादीत घ्यायला तयार नाहीत. अगदी ‘आमची पोरगी ट्रिपला जाऊन आल्यावर वरण भातच मागते’ असं सांगूनही त्यांना काही पटत नव्हतं. म्हटलं आपल्या पुढच्या पिढीला चांगल्या मराठी चारगोष्टी मी शिकवल्या याचं काही कौतुक नाहीच. तेही अमेरिकेत. प्रत्येकाला त्यांचीच लाल करायची होती. यावर स्वनिक मला 'नक्की काय लाल करायची' असं विचारु लागला. मी त्याला १० वेळा जोडाक्षरं लिहायला पाठवून दिलं आणि सोफ्यावर कोपऱ्यात बसून राहिले सर्वांचे भांडण बघत. शेवटी ज्ञानेश्वर आले आणि त्यांनी 'जो जे वांछिल तो तें लाहों' असं म्हणत सी-हॉक्स ला फर्स्ट सीड देऊन टाकलं आणि पार्टी डिसमिस झाली.
-विद्या भुतकर
No comments:
Post a Comment