Thursday, October 12, 2006

ऊन-पावसाचा खेळ

रात्री शाळेत जायच्या चिंतेने झोपी जावं आणि सकाळी पऱ्याच्या राज्यात जागं व्हावं तसं वाटत होतं. सकाळी ९ वाजता(हो, कुणी उठवायला नसेल तर अजून उशीरा :-) ) मैत्रीणीचा फोन आला 'अगं बाहेर बघ Snow fall होतोय'. मी अविश्वासाने धडपडत उठले आणि पडदा उघडून पाहीले तर खरंच पांढरे कापसाचे कण भुरभुरत जमिनीवर येत होते. :-) It made my day ! ओक्टोबर मध्ये हिमवर्षाव? अवेळीच होता तो. कारण साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसांमध्ये कधीतरी पडणारा हा पाऊस एक महीना आधीच आला होता.असो. मी घाईघाईने आवरू लागले. १५-२० मिनीटानी मी पुन्हा एकदा बाहेर पाहीलं. गवतावर सफेद चादर पसरली होती. मी आनंदाने पाहत राहीले. आणि तेव्हाच, तेव्हाच कोवळ्या उन्हाची एक तिरीप माझ्य़ा बाल्कनीत दिसली. :-)) हिमकणांच्या त्या चादरीवर कोवळे ऊन फारच सुरेख दिसत होते. मी पटकन एक फोटो काढला.
ओफिसमधे जाणे गरजेचे होते. बाहेरच्या उन्हामुळे मलाही गाडी बाहेर काढायचा हुरूप आला. आवरून बाहेर पडले आणि वाटले रोज तळपणारा सूर्य थंडीत किती असहाय्य, असमर्थ वाटतो. गाडीवरचे बर्फ काढण्यासाठी काहीच नव्हते. मग कसातरी हातानेच तो बाजूला सारला. हिमवर्षाव थांबला होता आणि ऊन बिचारे बाकीच्या गाड्य़ांवरचा, गवतावरचा, रस्त्यावरचा बर्फ वितळवण्याचा प्रयत्न करत होते. मी गाडी काढली. एक-दोन सिग्नल आरामात गेले. अचानक ऊन गायब झाले होते. हिमकण जोरजोरात गाडीच्या काचेवर येऊ लागले. एकदम दूरचे दिसणे बंद झाले. पुढची पाच मिनीटे मी अंदाजेच जात होते. ३-४ सिग्नल गेले आणि परत ऊन पडले होते. हा खेळ अजून किती वेळ चालणार होता ऊन-पावसालाच माहीत. मी मात्र त्यांना पाहण्याचा आपला मूड आवरत ओफिसमध्ये पळत गेले. दिवसभर त्या दोघानी काय गोंधळ घातला तेही मला माहीत नाही. पण मी त्यांचा फायदा घेत, लवकर घरी निघून आले. :-)
(वरच्या चित्रात माझ्या बाल्कनीमधून काढलेला एक फोटॊ. गवतावरच्या बर्फावर पडलेले कोवळे ऊन ! )
-विद्या.

1 comment:

Sandeep Padhye said...

chan lihita , keep writing.