Showing posts with label Feelings. Show all posts
Showing posts with label Feelings. Show all posts

Friday, April 20, 2007

एक किराणामालाची यादी

'आज-उद्या करत शेवटी जिम लावली एकदाची. आळस नाही हो, थंडी हा माणसाचा मोठा शत्रू आहे मग मी तरी काय करणार.तर आता इतक्या दिवसांनी व्यायामशाळेत आल्यावर मी धड राहिले तर नवलच.मेले हातपाय पण माझ्यासारखेच आहेत जरा काही बदल झाला की किरकिर करायला लागतात. पाठ आणि पोट तर पहिले चार दिवस ना हसू देत होते ना रडू. उठता-बसता त्या ट्रेनरला शिव्या घातल्या आणि स्वतः:लाही(नको ते उद्योग करायची सवयच आहे मला). असो. संध्याकाली ऑफिसातून परत आल्यावर कसाबसा चहा घ्यायचा आणि व्यायामाला पळायचे. मग परत येताना जी भूक लागते, कुठलाही खाद्यपदार्थ आठवून त्रास होतो. घरी पोचल्यावर इतका कंटाळा आलेला असतो की जेवण बनवणे ही अशक्य गोष्ट असते. मग सर्वात लौकर आणि कमी कष्टात जे काही बनविता येईल ते बनविण्याकडे माझा कल असतो. :-) मागच्या आठवड्यात भाजी आणायलाही वेळ मिळाला नाही, ना बाकी काही मसाले. शेवटी आज वेळ काढून भारतीय किराणामालाच्या दुकानात आम्ही गेलो. आणि......
गेल्यागेल्या तिथल्या समोशाच्या वासाने माझी भूक चाळवली गेली. :-( समोसा?....तेल, बटाटे.... क्यालरीज सगळं आठवून मी स्वतः:ला आवरलं.लगेचच माझी सामानाची खरेदी सुरू झाली. ती अशी:
१. सकाळी नाश्त्याला चहाबरोबर बिस्किटे,टोस्ट, खारी, केक रस्क. चहा, साखर तर काय लागतंच.
२. डाळी, पिठं, इ. जास्त घेऊन तसेच पडून राहतात, त्यामुळे जरा लहानच पाकिटे घ्यावी.
३. पुढचा माझा आवडता विभाग होता. तयार भाजण्या,पिठे.
इडली मिक्स, डोसा मिक्स,रवा इडली मिक्स, रवा डोसा मिक्स,खमण ढोकळा मिक्स, बरेच दिवसांत दही वडा खाल्ला नव्हता, त्यामुळे वडा मिक्स. आजकाल भजी साठी पण एक मिक्स मिळतं, ते मागच्या वेळी ट्राय केलं पण विशेष आवडलं नाही, ते cancel.
केप्रची थालीपीठ भाजणी.केप्रचीच उपवासाची भाजणी.अरे हो पाहुणे येणार असले की MTR चं पायसम मिक्स,गिट्सचं बासुंदी मिक्स.फारच कष्ट करायची इच्छा असेल तर गुलाबजाम मिक्स. :-)
४. पुढचा अतिशीत (फ्रोझन) विभाग:
दीप कंपनीचे आलू पराठे,साधे पराठे,मेथी पराठे,यावेळी 'बाजरा रोटी' ही घेतली आहे, बघू कशी लागते ती.भरलेले(स्टफड) पराठे आणि हो विसरलेच....पुरणपोळी. मागे एकदा मला वाटलं होतं की पुरणपोळी करावी पण जर २ मिनिटांत मला गरम-गरम पोळी मिळणार असेल तर मी एव्हढे कष्ट करावे का? आणि का करावे? :-)अतिशीत समोसे.काही कच्चे तर काही नुसते ओव्ह्नमधे गरम करणारे पण मिळतात. त्यांना तळायचीही गरज लागत नाही.अतिशीत ढोकळा,त्याची चटणीही सोबत असते.मांसाहारी लोकांसाठी कबाबही मिळतात. एकदा मी मोती कबाब आणले होते. काय असेल बरं ते? साबुदाण्याचे वडे. तेही बरे होते म्हणायचे.
आमचे दक्षिण भारतीय बंधू यातही मागे नाहीत बरं. या विभागातही डोसा,इडली,उत्तपम,त्यांची चटणी,सांबारही मिळते.
प्रत्येक पराठ्याची दोन-दोन पाकिटे घेतली की १-२ महीने सहज जातात. बाकी चटपटीत खाण्यातील ३-४ पाकिटे तर घेतलीच जातात.
५. अतिशीत विभागाच्या जवळच चिरलेल्या अतिशीत भाज्या मिळतात. त्यात पावटा, कारली(क्वचितच), ओलं खोबरं, शेवग्याच्या शेंगा, घेवडा या काही आपल्याकडील नेहमीच्या गोष्टी ज्या इथल्या दुकानांत मिळत नाहीत.चिरलेल्या मिक्स भाज्य़ाही भातात, सांबारमध्ये चांगल्या लागतात आणि कष्टही फार वाचतात.
६.एव्हढे सर्व होऊनही सटर-फटर खाण्याचे पदार्थे लागतातच.हल्दिरामचे आलू भुजिया,मूंगदाल,मटरी, मसालेवाले शेंगदाणे.स्वादची पाणीपुरी,भेलपुरी(यामध्ये चटणीही तयार असते),चितळ्यांचा मक्याचा चिवडा, यापैकी २-३ पाकिटे.
७. जेवतानाही नौरचे सूप आणि आठवड्यात कधीतरी लागतेच म्हणून मॅगी (देव त्यांचं भलं करो).तसे खूप साऱ्या 'रेडी टू ईट' भाज्याही मिळतात पण मला त्या आवडल्या नाहीत त्यामुळे Cancel.
८. सर्वात शेवटी मी मसाल्यांच्या विभागात जाते. सांबार मसाला, पावभाजी मसाला, किचनकिंग मसाला, बिर्याणी मसाला, परंपराचा पनीर माखनवाला मसाला, कोल्हापुरी मटन मसाला( परंपराच्या मसाल्यात तर तेल वगैरेही असते.फक्त दह्यात घालून चांगले एकजीव करायचे आणि भांड्यात टाकले की रस्सा तयार.
हे सर्व कमी आहे म्हणून की काय, मी काल मोड आलेली कडधान्ये, घरगुती इडली पीठ, पेढे, जिलबी सारखी मिठाई माझी वाट बघत असतात. :-( हुश्श.....हे सर्व घेईपर्यंत माझं बिल साधारण १०० डॉलर होतंच आणि घरी जाऊन पटकन काहीतरी खावं म्हणून मी तिथले रोज ताजे(?) बनवलेले समोसे/ढोकळे/कचोरी घेऊन घरी पळते. ही होती भारतीय किराणामालाची यादी,त्यातही काही पदार्थ राहून गेले असतील. इथल्या दुकानांत मिळणाऱ्या केक मिक्स,कुकी मिक्स,पास्ता सॉस, अतिशीत पिझ्झा याबद्दल पुन्हा कधीतरी......
मी विचार करतेय बऱ्याचवेळा अमेरिकेतले लोक काय खात असतील यावर आमची चर्चा होते. किती तयार अन्न खातात हे. काहीही घरी बनवत नाहीत असं म्हणणाऱ्या मला कोण काय म्हणेल? माझी आई मी काही सांगितले तर आता फक्त हसते. तिलाही कळलंय हिच्यासमोर डोकं फोडण्यात काही अर्थ नाही. इंटरनेटवर विविध पाककृती प्रसिद्ध करणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो मला माफ करा. या सर्व तयार वस्तू मी रोजच वापरेन असं नाही पण दिवसांत कधी ना कधी एखादा का होईना पदार्थ वापरला/खाल्ला जातोच. यासर्वांतून मी किती प्रिझर्वड अन्न पोटात घालते हे मलाही माहीत नाही पण जिमला जायला वेळ मिळण्यासाठी माझा आटापिटा चालूच राहतो.
-विद्या.

भित्री भागुबाई

काल आमच्या सोसायटीमध्ये चोरी झाली. तेही गेल्या चार दिवसांतील दुसरी चोरी. दोन्हीमध्ये एक गोष्ट सारखी होती. दोन्हीही घरे भारतीय माणसाची होती आणि त्यांचे सर्व सोने चोरीला गेले. काल तर जिथे चोरी झाली तिथली बाई लॉन्ड्रीरुमध्ये गेली होती, ती परत आली तेव्हा टॊयलेटमधील फ्लशचा आवाज आला. तिला वाटले तिचा नवराच दुपारी परत आलाय आणि तेव्हढ्यात एक काळा (अफ्रिकन अमेरिकन) माणूस बंदूक घेऊन समोर आला आणि त्याने तिला 'सोने कुठे आहे?' असे विचारले. तिने आतल्या खोलीत आहे असे सांगताच तो आत गेला आणि संधी साधून ती बाई बाहेर पळून आली. मग तिच्या शेजाऱ्यानेच पोलिसांना फोन केला. ....त्यांचे पुढे काय झाले माहीत नाही पण मला मात्र रात्री लवकर झोप आली नाही. चार वेळा दार बंद केले आहे ना याची खात्री करून घेतली. :-) तेव्हाच माझ्या मनात इतके विचार येत होते, म्हटलं आता लिहूनच काढावेत.
गेले एक वर्ष मी एकाच गावात, एकाच ऑफिसात जातेय. पण त्याआधी जवळ-जवळ ७-८ महिने मी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकटी राहिलेय. माझं सुदैवच म्हणायचं की तेव्हा मी सुखरूप राहिले.त्यासाठी घरी आणि बाहेरही खूप कौतुक करून घेतलं त्याबद्दल. "एकटी कशी राहलीस गं? बोअर नाही का झालं? भीती नाही वाटत? एअक्ट्यासाठी जेवण बनवणं किती कंटाळवाणं आहे, इ.इ." पण बाहेरून मी कितीही शूरवीर दिसले तरी खरं काय ते माझं मलाच माहीत होतं. तेच आज लिहायचा प्रयत्न करतेय.
खरंतर मी तोपर्यंत ६ वर्षे तरी घराबाहेर राहिले होते पण नेहमी कुणीतरी रूममेट होतीच.पण २००४ साली काही महिने अमेरिकेत काम केले आणि त्यानंतर पुढचा प्रोजेक्ट टोरोंटो (क्यानडा) चा मिळाला. तिथे गेल्यावर कळलं की जवळ-जवळ सगळीच टीम कलकत्त्याची आहे. थोड्या फार ज्या स्त्रिया होत्या त्या एकट्या राहणार होत्या किंवा कुटुंबीयासोबत. आणि मुलांसोबत राहणे मला अवघड गेले असते.हॉटेलवर राहून बाहेरचं खाणं तरी किती दिवस खाणार? Paying Guest च्या ही काही जाहिराती मी पाहिल्या पण तिथे स्वयंपाक घर मिळणार नव्हतं. पुन्हा एकदा दुसऱ्याच्या हातचे/बाहेरचं खाणे मला अशक्य होतं. बरं चांगले अपार्टमेंट घ्यायचे तर १-२ वर्षाचा करार करावा लागणार होता. मला तर फक्त ६ महीनेच राहायचं होतं. त्यामुळे लगेचच घर शोधायचे तर, एकटी राहण्याशिवाय मला पर्याय नव्हता. बरीच घरे पाहिल्यानंतर एका मराठी कुटुंबाकडे तळघरात राहण्याचा निर्णय मी घेतला.
ते लोक बोलायला चांगले होते आणि खूप दिवसांनी मराठी बोलणारं कुणीतरी भेटल्यामुळे मला आनंदही झाला होता. ते घर तसे माझ्या ऑफिसापासून बरेच दूर होते. लवकरच मी बसचा मार्ग वगैरे शोधला, पण कळले की २ बस बदलूनही शेवटी १० मिनिटे चालत जावे लागते. थंडीचे दिवस होते, साधारण वजा १०-१५ तापमान असायचे तेव्हा. पहिल्या दिवशी मी परत येताना बसमधून उतरले आणि त्या अंधारातून जाताना इतकी भिती वाटत होती. नवीन आल्यामुळे अजून मोबाईलही नव्हता. मी पटापट चालत चालले होते. सगळ्यात भितीदायक गोष्ट म्हणजे बर्फातून त्यांच्या घराच्या मागून जिन्याने खाली जायचे. त्या तळघरात कोंडल्यासारखे वाटायचे. आणि तळघराची खिडकी वरच्या बाजूला असते ना, त्यामुळे असं वाटायचं कुणी वाकून घरात बघत असेल तर?दोन दिवस तर काढले पण रात्री परतत असताना खूप भिती वाटायची. आणि इथे तर रस्त्यावर माणसंही नसतात आणि काळी कुत्रीही.ना रिक्षावाले, ना किराणा मालाची दुकाने ना फोन बूथ. एकदा माझ्याशेजारी एक गाडी येऊन थांबली तरी मी सरळच जात होते, नंतर मला कळलं की आमचे घरमालकच होते आणि मला लिफ्ट देणार होते. :-)
इंटरनेट हाच काय तो आधार होता रात्री मला.एकदा मी माझ्या एका मित्राशी गप्पा मारताना त्याला कळले की मी एकटीच आहे आणि घाबरत आहे, तर तो मला म्ह्नाला, 'मागे बघ ना तुझ्या....काय आहे.....कुणीतरी उभं आहे....' असंच काहीतरी. मी इतकी घाबरले, त्या मित्राशी पुढचे काही महीने तर मी बोलले नव्हते. तळघरातही मी ज्या रूममध्ये राहायचे ती एका टोकाला होती आणि आजू बाजूला कुठेही आवाज झाला तरी माझे कान टवकारलेले असत. १० दिवसातच मी त्या अंधारकोठडीला कंटाळले आणि दुसरीकडे एक घर शोधले. तेही असेच एका भारतीय माणसाचे होते आणि तळघरातच होते. पण एक चांगले होते की जरी घराचा प्रवेश तळघरासारखा होता तरी मागून ते जमिनीलगतच होते. त्यामुळे दिवसभर पूर्वेकडून छान उजेड यायचा. एकदा नक्की केल्यावर मी एका तळघरातून माझ्या प्रचंड मोठ्या ब्यागा आणि १० दिवसात जमविलेले सामान (गादी, सफाईचे सामान, खाद्यपदार्थ,भांडी) सगळं कसंबसं बाहेर काढलं. दुसरं मोठं काम म्हणजे ते पुन्हा एकदा तळघरात न्यायचं. शेवटी तर मी ब्याग जिन्यावरून घसरत नेल्या. :-( वाटलं चला आता सुटले.पण...
त्या नवीन घरात दोन खोल्या होत्या ,किचन आणि बाथरुम. मी एक मोठी खोली व्यापली, पण त्या घराचे Heating (Central heating) घरमालकाकडे होते, त्यामुळे साहेबांनी त्यांना हवं तसं सेट केलं होतं. तळघर मुळातच थंड असतं त्यामुळे रात्रभर मी काकडत काढली. दुसरं म्हणजे आता माझी खोली जमिनीलगत होती त्यामुळे डोकं खिडकीकडे केलं तर कुणी चोर आला तर कसं कळणार? आणि खिडकीकडे पाय केले तर ती खिडकी सारखी डोळ्यासमोर राहणार. :-( अजून एक रात्र मी रडत,कुडकुडत काढली होती. दुसऱ्या दिवशी दुकानात जाऊन मोठ्या चादरी घेऊन आले, तरी थंडी जाईना. मग घरमालकांना सांगितले, तर त्यांनीही लाइट बिलाचं कारण सांगितलं. जेवण बनवायला उभं राहणंही अशक्य होतं. शेवटी वैतागून मी किचनमधल्या सगळ्या शेगड्या चालू ठेवल्या आणि पांघरूण घेऊन बसून राहिले.
माझे जुने घरमालक मराठी तरी होते, हे लोक बिहारी होते आणि आमचा संवाद काही फारसा प्रेमळ नव्हता. मग मी त्यांच्याशी बोलून तात्पुरते त्यांचे इंटरनेट वापरण्याचा करण्याचा प्रयत्न केला पण तेही होत नव्हते. त्यामुळे घरी आले की जेवण बनविणे आणि काहीतरी गाणी लावून झोपणे हेच करत होते.रात्रभर तो laptopचालू ठेवायचे की त्याच्या आवाजात झोप तरी लागेल. ७-८ दिवसांत नवीन इंटरनेट कनेक्शनचा अर्ज दिला, मोबाई फोनही शोधला. आणि साधारण १० दिवसांत माझा बाहेरच्या जगाशी संपर्क आला. मला तोपर्यंत वाटायचे, मला खाली काही झाले तर काय करणार, कुणाला फोनही नाही करता येणार ना मेल. टीव्ही तर मी कित्येक वर्षात पाहिला नव्हता.
नवीन घर ऑफिसापासून खूप जवळ होते. बसने साधारण ७-१० मिनिटे लागत. पण आता कामही जोरात सुरू झाले होते. रात्री ७-८ नंतर बसस्टॊपपासून घरापर्यंत यायला ५-७ मिनिटे लागत. आणि तिथे एकदा त्या कॊलनी मध्ये आलं की कुठेही माणूस दिसत नसे. मी जवळ-जवळ पळतच घरी यायचे. कुणी मागून चालत येतंय असं वाटलं तरी मागे न बघता चालत राहायचे. बरेचदा चालताना मी मित्र-मैत्रिणींना कुणाला तरी फोन करायचे.आणि शेवटी दरवाज्यातून आत जाऊन पटापट सर्व लाइट्स सुरू करायचे. एकदा पळापळीत जिन्यावरून घसरून पाठही मोडून घेतली. :-(रोज रात्री मी २-३ वाजेपर्यंत जागी राहायचे आणि भारतात असणाऱ्या मित्र-मैत्रिणींशी बोलायचे. बरेचदा कुणीतरी रात्री मला याहू वर मेसेजही पाठवायचं आणि मी मध्यरात्री उठून त्यांना उत्तरही द्यायचे.कधीकधी आरशात पाहताना वाटायचं मागून कुणाचा चेहरा दिसला तर? (हे सगळे भयानक चित्रपट आणि कादंबऱ्या वाचण्याचे परिणाम. :-) )
पण एक-दोन महिन्यांत उन्हाळा सुरू झाला आणि सूर्यास्त उशिरा होऊ लागला. मग जरा ओळखीही वाढल्या तोपर्यंत आणि मी जरा भटकून घेतलं. टोरोंटो मला खूपच आवडलं,डाऊनटाऊन(?), ओंटारिओ तळं(की समुद्र? ),तळ्याच्या मध्ये असलेलं छोटंसं बेट, बस-ट्रेनची व्यवस्था, विविधता, सगळंच. एका ट्यूलिप फेस्टिव्हललाही जाऊन आले. नायगारा तर तिथून फारच जवळ असल्याने दोन वेळा बघितला.तीन दिवसांची, मॊन्ट्रियाल,ओटावा, क्युबेकची ट्रीपही केली. छान वाटलं.पाच महिने कसे पटकन संपून गेले. माझी माझ्या घरमालकांशीही चांगली ओळख झाली. आम्ही मग खाद्यपदार्थांची , पाककृतींची देवाण-घेवाणही केली. मी त्यांना मग वेबक्यामेरा कसा वापरायचा, कुठल्या साईटवर हिंदी गाणी मिळतात, अशी शैक्षणिक माहितीही दिली. :-)
शेवटच्या महिन्यात माझे घरमालक भारतात आले होते काही दिवसांसाठी. त्यांनी मला जाताना सांगितलं, "हे emergency contact numbers आहेत. मी माझ्या एका नातेवाईकाला सांगितलं आहे दर थोड्या दिवसांत फेरी मारायला."
एकतर ह्या मालकाची पाच अपत्ये होती. त्यांचा दिवसभर चालणारा गोंधळ एकदम बंद झाला होता आणि त्यात त्यांचा हा नातेवाईक कधी येणार-जाणार माहीत नाही. त्याच्याऎवजी दुसराच कुणीतरी आला तर? तोच माणूस खाली आला तर? त्यांनी घराची विद्युत सुरक्षाही केली होती पण ती मध्येच बंद पडली तर? इथे मालक नसलेलं घर लगेच कळतं, त्यामुळे त्यांची सर्व पत्रे मी माझ्याकडे जमा करून ठेवली. मला घर सोडून एक वर्ष होऊन गेलं होतं. आता लवकरच परत जायला मिळेल याची उत्सुकता होती, त्यात उगाचच हे टेन्शन. कसेबसे दिवस काढत मी महिना घालवला. रोज घरी नेण्यासाठी सामान आणायचं, ब्यागेत ठेवायचं, आधी आणलेलं सामान पुन्हा काढून नीट लावायचं. मी १५ दिवस आधीच कपडे घड्या घालून ठेवले होते. :-)
अखेर तो दिवस आला होता, घरी जायचा. ६ तास आधीच मी विमानतळावर जाऊन बसले होते. कंटाळवाण्या,लांब प्रवासानंतर आई-बाबांना भेटल्यावर अश्रू आले नसते तरच नवल होतं. त्यानंतर चार महिने भारतात राहून मी परत अमेरिकेत आले होते. दोन महिने एका हॉटेलवर राहिले आणि भीती, एकटेपणा हे पुन्हा एकदा अनुभवलं होतं. खूप वेळा भारतात, नातेवाईकांना,मित्र-मैत्रिणींना,भाऊ-बहिणींना भांडताना पाहिल्यावर मला ते एकटे दिवस आठवतात, जेव्हा कुणाशी तरी बोलण्यासाठी-भेटण्यासाठी मला २-२ दिवस वाट पाहायला लागायची. एकटं खाताना, घरची आठवण यायची. आणि त्यात भरीला माझ्या मनाचे भित्रे कोपरे तर कधीच मला सोडायचे नाहीत. ते आठवलं की माणसांची, आपल्या माणसांची किंमत कळते. आजारी असताना, स्वतः:च सगळं करताना रडायलाही यायचं आणि कशाला हे सगळं हवंय, कुणी सांगितलंय इथं राहायला,असंही वाटायचं. पण आज वाटतं त्याच दिवसांनी मला स्वत:चा वेळ स्वत:साठी आनंदात कसा घालवायचा हे शिकवलं. ते अनुभव आयुष्यभर माझ्या सोबत राहणार आहेत याचाच आनंद आहे. . :-)
-विद्या.

Friday, April 13, 2007

कुणीतरी हवं असतं.....

मी Engg साठी बाहेर पडल्यानंतर घरी २-३ दिवसांत तरी फोन व्हायचाच. एरवी मी आईशी कितीही बोलले तरी परिक्षेच्या वेळी मात्र दादांशी आधी बोलायचे. का? कारण मी अभ्यास करत नाही, नुसती भटकंती करते, आणि पूर्वीसारखे मार्कही मिळत नाही याबद्दल आईकडे कितीही तक्रार केली तरी माझ्याशी फोनवर बोलताना ते प्रेमाने नेहमीच्या सूचना देतच असत. "कशाचं जास्त टेन्शन घेऊ नकोस. ज्या प्रश्नांच उत्तर येतं ते आधी लिही, मग बाकीच्यांचा विचार कर, आधीच्या पेपरचाही विचार करु नकोस. इ.इ....." आजही कधीतरी घरी फोन करून सांगितलं ना की काम खूप आहे, कामाचा कंटाळा आला आहे, इथं रहावंस वाटत नाही, की ते म्हणतात, त्रास होत असेल तर नको राहूस तिकडे. निघून ये परत. आपल्याला काही नोकरीवाचून अडलं नाहीये. कधीतरी ते असंही म्हणाले होते की, "तुला काय वर्षाला एखादं ज्वारीचं पोत पुरेसं होईल, कशाला तो नोकरीचा त्रास? " :-) आता माझं एका ज्वारीच्या पोत्याने भागणार असतं तर किती बरं झालं असतं. पण केवळ बोलल्यामुळेही किती बरं वाटतं. असंच कुणीतरी हवं असतं.....
कितीतरी वेळा सगळी गणित चुकत जातात आणि मागे फिरून ती दुरुस्त करणंही अशक्य होऊन जातं.बरेच वेळा सर्व प्रयत्न करुनही आपल्या हातात काहीच नसतं. मग तेव्हा कुणीतरी हवं असतं आपल्याला सांगणारं,समजावणारं, "सर्व काही ठीक होईल". दोघांनाही माहीत असतं की सगळं ठीक होणं अवघड आहे, तरी त्या शब्दांनी जो धीर मिळतो तो वेगळाच. कधी वाटतं, झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करून धीर देण्याइतकं प्रेम कुणी आपल्यावर कसं करु शकतं? ते फक्त आई-बाबाच करु शकतात किंवा आपले खरे मित्र-मैत्रिणी.नाहीतर माझ्यासारखे लोक आधी, 'बघ, मी सांगितलं होतं.....' या वाक्यानेच सुरुवात करतात. :-) कुठल्याही अडचणीत असताना, उपाय शोधायचं सोडून ती चूक तुझ्यामुळे झाली की माझ्यामुळे यावरच वाद घालत बसतात आणि मग नंतर साथ न दिल्याचा पश्चाताप करतात. जित्याची खोड....! मी कशीही असले तरीही मी निराश असताना सांभाळणारं, समजावणारं कुणीतरी हवंच असतं......
-विद्या.

Friday, March 16, 2007

मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे !

इंजिनीयरींगच्या दुसऱ्या वर्षाची गोष्ट, एका रविवारची. माझ्या जीवलग मैत्रिणी माझ्याकडे येवून मला म्हणाल्या की आम्ही Sorry म्हणायला इथे आलो आहोत. मला कळत नव्हतं की हे कशावद्दल? तर त्या म्हणाल्या, 'आम्ही तुला सोडून सिनेमाला गेलो होतो,ते ही तुला खोटं सांगून.' (आज विचार करता मला हसू येतं की तेव्हा आपण किती बावळट होतो आणि किती छोट्या-छोट्या गोष्टीही 'महाभयंकर' वाटायच्या तेव्हा. :-) ) हा किस्सा आजही मला आठवतो म्हणजे मी हे सांगायला नको की मला किती वाईट वाटलं होतं त्यादिवशी.त्यानंतर पुढची ३ वर्ष आम्ही हसत-खेळत,भांडत,मजा करत काढली. आम्ही सगळ्याजणी आजही तितक्याच प्रिय आणि जवळ आहोत एकमेकींच्या.
खरंतर माझ्या मैत्रिणींनी मला त्या दिवशी सांगितलं नसतं तर मला कळलंही नसतं आणि माझ्या मनात ते राहिलंही नसतं.पण मग त्यांनी ते सांगायला हवं होतं की नको?सांगितल्यामुळे आम्ही अजूनच दूर गेलो असतो तर? किंवा न बोलल्याने मनातली अढी अजूनच वाढते , तसे आम्हीही दुरावलो असतो तर? की बोलल्यामुळेच मनातंलं सगळं बाहेर येऊन मनही आभाळासारखं निरभ्र होतं?असे अनेक प्रश्न मनात येतात. त्या एकाच बाबतीत नाही, तशाच अनेक घटना घडल्यात, घडतात आणि हा प्रश्न पुन्हा सामोरा येतो.
माझं म्हणाल तर, मला काहीही मनात ठेवता येत नाही. चूक माझी असेल तरी किंवा समोरच्याची एखादी गोष्ट पटली नाही तरी. ती व्यक्ती प्रिय असेल तर अजिबातच नाही. मग मी लवकरात लवकर सगळं सांगेपर्यंत डोक्यातून विचार जात नाहीत. पण कधीकधी होतं काय की समोरच्या माणसाने सहज बोललेली गोष्ट आपल्याला लागते (त्याच्या नकळतही) त्यामुळे त्याने असं बोलण्याचा काय हेतू होता हे कळत नाही आणि ते कळलं नाही तर गैरसमजामूळे मन अजूनच दुखावतं. बरं स्पष्ट सांगायचं तरी त्यात 'तुला असं वाटलंच कसं' असं बोललं की आपणच चुकीचा विचार केल्याचा त्रास. :-( मला वाटतं की तुम्ही जर आपलं मत समोरच्या माणसाला स्पष्ट सांगू शकत नसाल तर ते नातं मनमोकळं होईल का? मग तुमच्या ऒफिसातल्या साहेब/सहकाऱ्यापेक्षा हे नात वेगळं होईल का?
दोघंही आपल्या जागी बरोबर असतात. मग चुकतं कुणाचं आणि त्याचा नात्यांवर होणारा परिणाम टाळायचा कसा? Love makes people do crazy things.:-) मला वाटतं एकमेकांबद्दलचं प्रेम,नात्याबद्दलचा आदर, समजून घेण्याची (बरेचदा माफ करण्याचीही) इच्छा असेल तर हे नक्कीच होऊ शकतं. कधीकधी स्वाभिमानही आडवा येतो तर कधी तो नुसताच अहंकार असतो. तेव्हा डोळे बंद करून त्या व्यक्तीबरोबर घालवलेले आनंदाचे,दु:खाचे,प्रेमाचे क्षण आठवले ना, मग सगळं मनातलं मळभ दूर होतं. राहते ती फक्त इच्छा पुन्हा एकदा नातं होतं तसं करण्याची. मग जे वाट्लं ते स्पष्टपणे सांगून मोकळं व्हायचं. स्वीकारायचं, सोडून द्यायचं की मनावर घ्यायचं हे सारं समोरच्यावर सोडायचं. खरंच जर ते नात जवळंच असेल तर तो फक्त एक क्षण बनतो एकमेकांना अजूनच जवळ आणणारा. मग अशीच अडथळ्यांची शर्यत पार करुन नात्यांची वीण अजूनच घट्ट होते. :-) होय ना? या बाबतीतच 'मरासिम' अल्बममधील गुलजार साहेबांनी म्हटलेली ही काही वाक्ये. मला खूपच आवडतात.
"मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे !
अक्सर तुझको देखा है की ताना बुनते
जब कोई टूट गया या खत्म हुआ
फ़िर से बांध के और सिरा कोई जोड के उस्मे
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने मैं लेकीन
एक भी गांठ गिरह बुंतर की
देख नही सकता है कोई
मैने तो एक बार बुना था एक ही रिश्ता
लेकीन उस्की सारी गिरहें साफ़ नजर आती हैं मेरे यार जुलाहे !
मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे !"
-विद्या.

Tuesday, March 06, 2007

एक अर्धी पोस्ट...

रात्री ११ वाजता सिनेमा संपला आणि आम्ही दोघं घरी येण्यासाठी गाडीत बसलॊ. आम्ही प्रत्येकवेळी घरी जाताना आमचा वाद व्हायचा एका कारणावरून. परत यायला त्या थिएटरकडून दोन रस्ते होते, एक आम्ही डोळे झाकूनही घेऊ शकतो असा आणि दुसरा फक्त अस्तित्वात आहे हे माहीत होतं. त्यामुळे रात्री ११ नंतर माहीत नसलेल्या रस्त्यावरून जायची माझी इच्छा नसायची आणि त्याला तो रस्ता कसा आहे तो पहायचाच होता. आज तर पाऊसही पडत होता. शेवटी माझं न ऎकता त्याने दुसऱ्या रस्ता पकडला. मग थोडे अंतर गेल्यावर काहीतरी चुकतंय असं वाटून त्याने मला गाडीतला नकाशा काढायला सांगितला. मग मी आपण सध्या कुठे आहे,कुठे जायचे आहे हे पहात चुकत, धडपडत जवळ जवळ दीड तासाने घरी पोहोचलो.मी त्या दिवशी बराच वाद घातला(नेहमीप्रमाणे :-) ) की नेहेमीचा रस्ता असताना नवीन शोधायची काय गरज आहे हे कळत नव्हतं.
मला वाटतं माझ्यासारखेच कितीतरी लोक मी आजू बाजूला पाहते आहे.बहुतेक, आयुष्य खूपच सरळ, सोपं झालंय.(Touch wood :-) ) अर्थात ते सरळ होणं ही इतकं सोप्पं नव्हतं पण गेलं एक वर्ष आरामात गेलंय आणि हात खरंच सोन्याचे झालेत की काय असं वाटतंय. कधी काहीतरी करायची, वेगळं करायची इच्छा असते तर कधी-कधी तो नुसता सिनेमाचा 'After effect' असतो. पण होतं काहीच नाहीये. चार लोक चालतात त्याच सरधोपट मार्गाने चालायचं, पैसे मिळवायचे आणि आपले सोन्याचे हात अजूनच जपायचे.पुढे जाताना जरा कुठली वेगळी वाट समोर दिसली की पुन्हा एकदा मागे जायचे आणि अजून एक जुनीच वाट शोधायची. एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा, ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत झटत राह्यचं आणि त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करायचे असं आज-काल का होत नाही याचा विचार करतेय.
"तुटण्याचा फुटण्याचा,
देहाला छंद हवा.
सोन्याच्या हातांना
घामाचा गंध हवा !"
-माधव मुतालिक


माझ्या जुन्या डायरीमध्ये ही नोंद सापडली मला.मी कॊलेज मध्ये असताना एक कविसंमेलन नियोजित केलं होतं आणि माधव मुतालिक यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं.त्या समारंभानंतर मी माझी ती डायरी त्यांच्या स्वाक्षरीसाठी घेऊन गेले होते. तेव्हांची ही नोंद. मला आठवत नाहिये मला त्यांच्या या ओळींचा अर्थ किती समजला होता आणि हे ही माहित नाही की कुठल्या अर्थाने त्यांनी त्या ओळी लिहील्यात.पण आज त्याच वाचताना बरेच विचार डोक्यात येत आहेत आणि आता तरी ते लिहणं जमत नाहीये.
जाऊ दे. आज एव्हढंच.
-विद्या.

Monday, February 26, 2007

मनातलं

स्वप्नांची फुले चुरगाळून टाकण्याऱ्या
नियतीला आज मी पाहिलं
आणि प्रथमच मला
हसण्याचं भय वाटलं.
उद्ध्वस्त झालीत ती स्वप्नं
जी पाहताना ह्सले होते
अगदी मनभरून...
हातातल्या चांदण्यांचे काटे झालेत
अन कधीतरी हव्याहव्याशा वाटण्याऱ्या,
रात्रीच्या एकांतात ते टोचू लागलेत.

कशी विसरू ती स्वप्नं?
आणि कशी सामोरी जाऊ
या भयाणं वास्तवाला?
दैवावर हवाला ठेऊन बसले होते,
त्यानेच दगा दिल्यावर,
येणाऱ्या परिस्थितीचा सामान करायचा
तो तरी कशाचा आधारावर ?

वाटतंय, स्वीकारायला हवी प्रत्येक गोष्ट
माझ्या मनाच्या,बुद्धीच्या ताकदीवर,
आणि ठेवायला हवा विश्वास
फक्त स्वत:च्या प्रयत्नांवर.
पण कशासाआठी सारं?कशाची ही शिक्षा?
स्वप्नं पाहण्याचीच असेल तर
ती भोगायला मी तयार आहे.

पाहीन अजूनही खूप सारी स्वप्नं
अन कधीतरी खरीही करून दाखवीन.
ती भंगल्यावर त्याचे काटेही बोचून घेईन.
कारण स्वप्नांची फुले माझी नसली तरी
काटे माझे असतील.
साऱ्या संकटातून पार झाल्यावर
कधीतरी....माझेही दिवस येतील.

-विद्या.

Tuesday, January 30, 2007

आंघोळ

चार दिवसांचा कंटाळवाळा अभ्यास, परिक्षेचं टेन्शन या सर्वानंतर संध्याकाळी घरी आल्यावर गरम पाण्य़ाने आंघोळ केली आणि बरं वाटलं. तीन-चार दिवसांचा थकवा, मनातले विचार , होणारा त्रास सगळे पाण्याबरोबर जणू वाहून जात होते. आजच नाही, बरेचदा मला असा अनुभव आला आहे.रडून एखादी रात्र घालवावी आणि सकाळी आंघोळ झाल्यावर वाटावं जणू गेली रात्र गेली, नवा दिवस उगवलाय. एखाद्या मस्त ट्रेकवरून आल्यावर, निसर्गसौदर्याची, प्रवासाची, पावसाची आठवण काढत आलेला शीण एकदम पळून जातो. आता हे सगळं खरं असलं तरी घरी असलं की आईचे नियम, जेवायच्या आधी आंघोळ करा, आज पूजा आहे घरी आंघोळ करा, पाहूणे येणार आहेत आवरून घ्या हे ऎकलं की चिडचिड होते. सुट्टी,विषेशता: रविवार हा या असल्या कामांसाठी नसतोच मुळी. अरे?? आंघोळीची स्वछता हा भाग सोडून बाकीची सगळी कारणं फक्त Logical च आहेत ना?: -)
अगदी दिवाळीचं 'अभ्यंगस्नान' ही. पहाटे-पहाटे,कडक थंडीत, कुडकुडत, उटणं लावून घेवून गरम्म्म्म पाण्याने आंघोळ करणं म्हणजे दिवाळीची खरी सुरुवात. मी असं ऎकलंय की पूर्वी साधारण वर्षाच्या या काळात शेतकरी आपले धान्य घरी आणत त्यामुळे कष्टाने थकलेलं शरीर साफ करून मग आलेल्या धान्याचा, संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी हा सण साजरा करत.हे झालं एक कारण, अशी बरीच आहेत. मला पडलेला प्रश्न म्हणजे, वर्षभराच्या कष्टानंतर हे अभ्यंगस्नान खरंच त्यांना शुद्ध करत असेल काय?
तसेच अजून एक म्हणजे, गंगास्नान. मी आजपर्यंत गंगा नदी पाहीलेली नाहिये, पण अनेक चित्रपटात त्याचा उल्लेख मात्र जरूर पाहिलाय. तिथे जाऊन म्हणे आजपर्यंत केलेली सगळी पापं धुवून निघतात.आतापर्यंत इतक्या लोकांनी तिचं पाणी दुषित केलं असेल, मग उतारवयाला लागल्यानंतर आपण केलेल्या पापांची जाणीव होऊन तिथेपर्यंत गेलेल्या एखाद्या वॄदधाची पापं धुवून निघत असतील काय?असो.
आपल्याकडे एखादया मॄत व्यक्तीला अग्नी देऊन आल्यानंतर कशालाही न शिवता लोक आंघोळ करतात. मला कुणीतरी याचं शास्त्रीय कारण सांगितलं होतं. मॄतव्यक्ती एखाद्या आजारपणाने गेली असेल तर त्या व्यक्तीभोवती असलेल्या विषाणूची बाधा बाकी लोकांना होऊ नये म्हणून ही खबरदारी. आपली प्रिय व्यक्ती कायमची दुरावल्यावर तिचे अंतिमसंस्कार करून झाल्यावर, त्या आंघोळीने तिच्या आठवणीही, ती गेल्याचं दु:ख, सगळं धुवून जात असेल काय?
परवा मी अर्णवला(आमच्या शेजारांचा सव्वा वर्षाचा मुलगा) बाथटब मध्ये आंघोळ करताना पाहिलं. इतका गोड दिसत होता तो. :-) दोन्ही हातानी पाणी उडवण्य़ाचा त्याचा खेळ चालू होता. त्याचा तो निरागस चेहरा पाहून वाटलं, रोज आंघोळ करताना आपलं निरागसपण, तो आनंद आणि ते सुखद बालपण या पाण्याबरोबर हळूहळू धुवून जात असेल काय?
-विद्या.

Friday, January 12, 2007

माझी झोप

आजपर्यंतचं आयुष्य सगळं फुकट गेलं, म्हणजे झोपेत गेलं. आता हे मला निम्मं आयुष्य संपल्यावर का आठवलं? तर त्याचं असं झालं, गेले काही दिवस मी एक Computer based training session ऐकतेय. हो, ऐकतेय, त्या Session मध्ये स्क्रिन वर एका कोपयात एक माणूस येऊन बोलत राहतो आणि बाजूला प्रेझेंटेशन चालू राहतं. तर हे ट्रेनिंग सुरु झालं की १५ मिनिटांत मी गार, गाढ झोपेत. ४-५ वेळा तरी असं झालंय आणि मी वैतागलेय याला. हो ना, वाटलं होतं की कधीतरी हे दुष्टचक्र थांबेल. पण नाही, शाळा, कॊलेज झाले, नोकरी लागली तरी झोपेच हे दुष्टचक्र चालूच आहे.

शाळेत प्रत्येक तासाला झोप यायची, अगदी असह्य व्हायची, मग कधी पेंगुळलेल्या डोळ्यांना फळ्यावरची अक्शरं दिसली नाहीत तर कधी बाई काय सांगतात याची शुद्ध रहायची नाही. आश्चर्य म्हणजे घंटा वाजली रे वाजली की झोप गायब. वाटायचं घरी जाऊन तरी वाचू काय शिकवलं होतं ते, पण तिथेही तसंच, पुस्तक हातात घेतलं की झोप येणारच. कशी-बशी शाळा उरकली, कोलेजात तर काय, रुमवर पडून राहण्यातच दिवस गेला, झोप यायची नाही ती रात्री, भटकताना, गप्पा मारताना, पिक्चर पाहताना. :-) तेंव्हा तर अभ्यास फक्त शेवटचे २५-३० दिवस करायचा असायचा,त्यात पण माझी आणि झोपेची लढाई! उपहासाची गोष्ट म्हणजे परिक्शा संपल्यावर मात्र कधी पेपरला उशीरा गेलो, कधी नापास झालो तर कधी वेगळ्याच विषयाचा अभ्यास करून गेलो असली भयानक स्वप्नं पडतात. असो.

वाटलं नोकरी लागल्यावर आपल्याला थोडेच लेक्चर ऎकावे लागतात. तिथे तरी आपण काहितरी मोठे करू, अगदी दिवस रात्र कष्ट करू. आणि आता मला कळलंय की तेही शक्य नाहीये. मला मिटींगमध्ये झोप येते, दुपारी काम करताना झोपअ येते, सकाळी उठायचा कंटाळा कारण झोप येते. कुणाला वाटेल किती आळशी बाई आहे ही. पण संध्याकाळी घरी आल्यावर मात्र मला काहीही काम सांगा मी लगेच तयार.

कधी-कधी वाटतं नकॊ हा झोपेचा त्रास, धुडकावून ध्यावी ती झोप आणि पटापटा सगळी कामं संपवून टाकावी.सकाळी सहा वाजता उठावं, नाहीच जमलं तर ७ वाजता का होईना उठावं, मस्त Gym मध्ये जावून यावं, ८.३०-९ ला ओफिसात पोहोचावं.आता मी तसे प्रयत्नही केले लवकर उठण्याचे,बरेचसे सफलही झाले, पण मग दुपारी अशी असह्य झोप येते की काही केल्या आवरत नाही. :-(( कधी वाटलं झोपून घ्यावं जितकं हवं तितकं, अगदी मनसोक्त की परत झोपेच नाव नको डोळ्यात. होतं काय की मी मला कितीही झोप दिली तरी कमीच. फार कमी वेळा असं झालंय की मला झोपच येत नाहीये. अगदीच अडचणीची वेळ असणार ती नक्की.

पण आज-काल अमेरीकन च्य़नेल्स वर झोप न येणार्या लोकांसाठी खास ऒषधे, वेगळे डिसाईन केलेले 'बेड्स' यांच्या जाहीराती पाहिल्यावर वाटतं की निद्रादेवीची कृपा माझ्यावर अशीच राहो.जाऊ दे, जास्त बोलून तरी काय होणार? आजपर्यंत मी केलेले एवढे निश्चय मातीस मिळाले, अजून एक करून तरी काय होणार आहे? माझे 'झोपपुराण' आता मी थांबविते आणि पडी टाकते.

-विद्या.

Saturday, January 06, 2007

कातरवेळ

शनिवार अगदी नेहमीप्रमाणे उशीरा सुरू झाला. मग आवराआवरी, आठवड्याची सफाईची कामे पण झाली. नुकताच संध्याकाळचा चहा झालाय, म्हटलं चला जरा वाचत बसू. वाचण्यात काही लक्ष लागत नाहीये. ही वेळच तशी असते ना, कातरवेळ. मग 'कातरवेळ'च्या खूप आठवणी, एक प्रकारच्या उदास भावना मनात येत राहिल्या. आजपर्यंत अशा कित्येक संध्याकाळी मला अस्वस्थ करून गेल्यात,वाटलं काहीतरी लिहावं त्याबद्दल. शाळेत एक धडा होता आम्हाला 'कातरवेळ' नावाचा. त्याच्याबद्दल मला काही विशेष आठवत नव्हतं म्हणून मी Google वर गेले. मला भली मोठी यादी मिळाली 'कातरवेळ' या शब्दावर. ती यादी वाचून मला हसू आलं कारण यावर मी लिहिण्यासारखं काही नव्हतच. :-)) प्रत्येकाने ही अस्वस्थतेची भावना अनुभवलेली दिसतेय. असो.माझी संध्याकाळ या शब्दावर मिळालेल्य़ा blog वर जाण्यात आणि ते वाचण्यात संपून गेलीय. :-) तेव्हा यावरचं लिखाण पुन्हा कधीतरी !

-विद्या.

Thursday, October 12, 2006

ऊन-पावसाचा खेळ

रात्री शाळेत जायच्या चिंतेने झोपी जावं आणि सकाळी पऱ्याच्या राज्यात जागं व्हावं तसं वाटत होतं. सकाळी ९ वाजता(हो, कुणी उठवायला नसेल तर अजून उशीरा :-) ) मैत्रीणीचा फोन आला 'अगं बाहेर बघ Snow fall होतोय'. मी अविश्वासाने धडपडत उठले आणि पडदा उघडून पाहीले तर खरंच पांढरे कापसाचे कण भुरभुरत जमिनीवर येत होते. :-) It made my day ! ओक्टोबर मध्ये हिमवर्षाव? अवेळीच होता तो. कारण साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसांमध्ये कधीतरी पडणारा हा पाऊस एक महीना आधीच आला होता.असो. मी घाईघाईने आवरू लागले. १५-२० मिनीटानी मी पुन्हा एकदा बाहेर पाहीलं. गवतावर सफेद चादर पसरली होती. मी आनंदाने पाहत राहीले. आणि तेव्हाच, तेव्हाच कोवळ्या उन्हाची एक तिरीप माझ्य़ा बाल्कनीत दिसली. :-)) हिमकणांच्या त्या चादरीवर कोवळे ऊन फारच सुरेख दिसत होते. मी पटकन एक फोटो काढला.
ओफिसमधे जाणे गरजेचे होते. बाहेरच्या उन्हामुळे मलाही गाडी बाहेर काढायचा हुरूप आला. आवरून बाहेर पडले आणि वाटले रोज तळपणारा सूर्य थंडीत किती असहाय्य, असमर्थ वाटतो. गाडीवरचे बर्फ काढण्यासाठी काहीच नव्हते. मग कसातरी हातानेच तो बाजूला सारला. हिमवर्षाव थांबला होता आणि ऊन बिचारे बाकीच्या गाड्य़ांवरचा, गवतावरचा, रस्त्यावरचा बर्फ वितळवण्याचा प्रयत्न करत होते. मी गाडी काढली. एक-दोन सिग्नल आरामात गेले. अचानक ऊन गायब झाले होते. हिमकण जोरजोरात गाडीच्या काचेवर येऊ लागले. एकदम दूरचे दिसणे बंद झाले. पुढची पाच मिनीटे मी अंदाजेच जात होते. ३-४ सिग्नल गेले आणि परत ऊन पडले होते. हा खेळ अजून किती वेळ चालणार होता ऊन-पावसालाच माहीत. मी मात्र त्यांना पाहण्याचा आपला मूड आवरत ओफिसमध्ये पळत गेले. दिवसभर त्या दोघानी काय गोंधळ घातला तेही मला माहीत नाही. पण मी त्यांचा फायदा घेत, लवकर घरी निघून आले. :-)
(वरच्या चित्रात माझ्या बाल्कनीमधून काढलेला एक फोटॊ. गवतावरच्या बर्फावर पडलेले कोवळे ऊन ! )
-विद्या.

Wednesday, October 11, 2006

माझी चित्रकला- कला?

गेल्या ४-५ दिवसांपासून हे चित्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. आणि आज ते झालंय. :-) तसं पाहीलं तर बर्यापैकी जमलंय पण त्या पुस्तकात होतं तसं नाही. ते पहाताना माझ्या मनात विचार आला, 'मी चित्र काढलं म्हणजे काय तर पुस्तकात होतं ते पाहून माझ्या वहीत उतरवलं. याला कला म्हणता येईल का?' उत्तर होतं 'नाही'. ज्या माणसाने हे मूळ चित्र काढलं त्याला कला म्हणतात.मी एकदा प्रवास करत असताना माझ्या शेजारी एक माणूस बसला होता. तो जागेवर बसल्यावर ५ मिनीटात त्याने आपली वही काढली आणि काहीतरी रेखाटू लागला. त्याच्या हातात 'कला' होती. केवळ कल्पनेने/ आजूबाजूला पाहून काढलेली ती रेखाटने खूपच सुंदर होती.
मी काही पुस्तकेही आणली ज्यामध्ये काही टिप्स दिल्या आहेत, चेहरा काढण्यासाठी, स्थिरचित्रे काढण्यासाठी, इ. पण शेवटी ते पण नक्कल करणेच झाले ना? कधी विचार करायला लागले की फार नाराजी येते.मला माहीतेय की मी आता तरी अशी(काल्पनिक) चित्रे नाही काढू शकत, क. नुसते पुस्तकात पाहून तरी कितीदा काढणार?मला कळत नाहीये की मग करायचे तरी काय?
-विद्या.

Tuesday, September 26, 2006

आरंभशूर??



होय, आरंभशूर! आजकाल मला वाटते मला जर दुसरे नाव देता आले तर ते म्हणजे आरंभशूर!आता या लिखाणाचीच गोष्ट घ्याना. मला लिहायला सुरुवात करून ५-६ दिवस झाले असतील. तुम्ही माझा पहिला ब्लोग वाचला असेल तर कळेल की मी किती उत्साही होते रोज काहीतरी लिहायला. मी पहिले २ दिवस तर धड स्वैपाक पण केला नाही. आणि आज मला वाटले खरेच लिहायची इच्छा आहे का? :-) आता उत्तर काय असेल याचा अंदाज आलाच असेल. असो. मी लिहायला सुरुवात केल्याने आजचा दिवस तरी मी माझा शब्द ठेवला आहे.
या माझ्या आजाराची कहाणी आजची नाही. याची सुरुवात खूप वर्षापूर्वी झालेली आहे. शाळेत असताना मी आईकडे हट्ट केला कई मला स्कोलरशिपची परीक्शा द्यायची आहे. आणि का तर, सर्व जण शाळा सुटल्या नंतर ज्यादा तासाला बसायचे. :-) फारतर आठवडा भर माझा अभ्यासाचा उत्साह टिकला असेल.नंतर बिचारी आई अभ्यास कर म्हणून मागे लागून दमली. त्यानंतर सायकल शिकताना पण असेच, शिकेपर्यंत पडुन-धड्पडून ,शाळा बुडवून शिकले. नंतर त्याचाही उत्साह राहिला नाही. अरे हो, carrom शिकतानाही वेगळी गोष्ट नव्हती. आई दादानी सर्व इच्छा कशा पूर्ण केल्या हे त्यांनाच माहीत.
माझा थोड्या दिवसांपूर्वीचा छंद म्हणजे चित्रकला. तसे मी ८-९ पेन्सिल स्केचेस काढली आणि बरीच चांगली आली.त्यासाठी मी नवीन वह्या,पेन्सिल, काही पुस्तके पण आणली. खरं सांगते ती काढताना मी खूप मन लावून काढली. प्रत्येकवेळी २ चित्रांमधे २ महीन्यांचे तरी अंतर असेल. हा ब्लोग सुरु झाल्यापासून तर सारे साहीत्य असेच पडून आहे. आज हे सर्व सांगताना मला अपराधी वाटत आहे आणि अजून एकदा अपूर्ण राहीलेल्या गोष्टी पूर्ण करण्याचा निश्चय करतेय. :-) आजच्यासाठी एवढेच. आणि हो..माझ्या चित्रकलेचा एक नमुना.... वरच्या चित्रात......!!

-विद्या.

Friday, September 22, 2006

गाणे रडवणारे

हिंदी गाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य बनले आहेत( खर तर आताच नव्हे पहिल्यापासून आहेतच).जसे जसे आपण आयुष्याची एकेक पायरी चढतो, तसे तसे वेग-वेगळी गाणी आपल्या सोबत आठवण बनून राहतात.एखादे गाणे ऐकले की वाटते मी १०-१२ च्या परीक्शेचा अभ्यास करत आहे, तर कधी कोलेजच्या मैत्रिणींबरोबर, रुम वर पडून आहे.तर एकूण काय की प्रत्येकाचे आपले एक हसवणारे, रडवणारे,खुलवणारे, उदास करणारे, प्रेमात पडल्यावरचे असे गाणे असतेच.
परवाच कुठेतरी मी, मला रडवणारे गाणे पुन्हा एकदा ऎकले आणि वाटले काहीच फरक नाहिये. तोच आवाज, ते शब्द आणि तोच परिणाम.:-(( पण तरीही ते माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.ते म्हणजे 'प्रेमरोग' या चित्रपटातील, लताजींच्या आवाजातील, पद्मिनी कोल्हापुरे वर दर्शविलेले गाणे.......'ये गलियां ये चौबारा' !!!
तसे पाहिले तर हे गाणे फार आनंदात असलेल्या एका मुलीवर आहे आणि तरीही मला रडू येतं. आता मला शिक्शणासाठी नंतर नोकरीसाठी बाहेर पडून ९-१० वर्षे झाली आणि घरातून बाहेर राह्ण्याची, एकटी राहण्याची सवयही झालीय. पण मी पहिल्यांदा जेंव्हा घर सोडलं, तेंव्हा मला जाणवला काही शब्दांचा अर्थ.
'देख तू ना हमे भुलाना, माना दूर हमें है जाना. मेरी अल्हड सी अटखेलियां सद पलकों मे बसाना'.
किती खरी!!
त्यानंतरची ४ वर्षे पट्कन गेली आणि पुन्हा एकदा ते गाणं आलं. कोलेजच्या शेवटच्या वर्षी, नोकरी मिळाल्याचा आनंद, नवीन जागी जाण्याची उत्सुकता तर होतेच. तरीही तिथून जाताना मात्र काही शब्द आठवत होते.
'कल भी सूरज निकलेगा, कल भी पंछी गायेंगे. सब तुझको दिखाई देंगे, पर हम ना नजर आयेंगे. '
नवीन ठिकाणी, जुन्या दिवसाची, त्या मित्र-मैत्रिणींची किती आठवण झाली काय सांगू? परत कधीतरी कोलेज वर गेल्यावर असं वाटलं....
'अब हम तो भये परदेसी, की तेरा यहा कोई नही.....' खरच कोणी आपलं नव्हतं.

असो. अजूनही कधीतरी एकटं असताना हे गाणं ऐकलं की अस्वस्थ होतं. असं हे माझं रडवणारं गाणं. तुमचंही आहे काय?