Wednesday, November 13, 2013

मी कुठली ?

       मोठ्या उत्साहाने पुण्यात  आले. तिथल्या अनेक आठवणी होत्याच पण स्वत:चं घरही होतं. पंधरा-वीस दिवस झाले आणि मला शिकागोची आठवण येऊ लागली. तिथल्या सगळ्याच गोष्टींची, घर, गाडी , ऑफिस, फ्रेंडस, हॉटेल्स, आवडत्या खायच्या गोष्टी, कपड्यांची दुकानं आणि पुणं आपलं वाटेनासं झालं. कारणं बरीच होती, संदीपला  यायला होणारा उशीर , मग एकट्याने संध्याकाळी केलेली धावपळ, इथे बरेच मित्र असले तरी गाडीअभावी शून्य झालेलं 'सोशल लाईफ'. 
         एकदा कुठेतरी वाचलं होतं की एखादी जागा, शहर आपलं वाटणं म्हणजे तरी काय? तिथे एखादं रुटीन असणं, एखादं ऑफिस जिथे एक दिवस नाही गेलं तर कुणी विचारेल 'सगळं ठीक?' , एखादं हॉटेल जिथे महिन्यातून एकदा का होईना जायचंच आणि गेल्यावर तिथे कुणी ना कुणी ओळखेल, एखादी भाजी, फळ जे तिथल्या ठराविक ऋतूमध्येच मिळतं आणि एखादा ऋतू जो सुरु होण्याची चाहूल लागताच त्या ऋतूच्या कित्येक वर्षाच्या आठवणी जाग्या होतील. हे सगळं मला आठवत होतं पण शिकागो मधलं.
        म्हटलं बघावं तरी पुण्यात सुरुवात करून. आता आठ वर्षं एका ठिकाणी राहिल्यावर असं होणारंच. इथेही प्रयत्न करून पाहायला हवा.  म्हणून शुक्रवारी घराजवळच्या डॉमिनोज मध्ये मुलांना घेऊन चालत गेले बरेचदा. पण तिथल्या थंड प्रतिसादाने परत जायची इच्छा होईना त्यात पावसाळा लागून गेला मग तेही राहीलं. एक दिवस मी ऑफिसमधून निघाले आणि कोपऱ्यावर एक रिक्षावाला म्हणाला 'मैडम वारजे ना?' . पुढे मग दोन तीन वेळा तोच आला.  मला वाटले अरे वा हे रुटीन चांगल आहे. पण नंतर नंतर मला कळले की त्याला तिकडे यायचेच नहिये. म्हटले जाऊ दे. आम्ही पूर्वी एका हॉटेल मध्ये जायचो म्हटले चल जाऊ तिकडे एकदा. तिथे गेल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या पण पहिल्याच भेटीमध्ये मला जाणवलं की तिथल्या खाण्यामध्ये किती रंग मिसळला होता ते. मुलीच्या ड्रेसवर सूप सांडलं तर त्याचा नारंगी डाग दिसू लागला. आणि  खाण्यावरून मन उडालं. 
      अशातच गणपती आले. मस्त वाटलं सणाला इथे राहायला, खूप दिवसांनी अनुभवायला. सोसायटी मध्ये अनेक कार्यक्रम झाले मुलांना मजा आली. आम्ही पण उत्साहाने फोटो काढण्याची जबाबदारी घेतली. पाच दिवसात फोटो संपले आणि सर्व पुन्हा आपल्या मार्गाला लागले. तिथल्या आपापसात होणाऱ्या गप्पांमध्ये आपण परके वाटतोय याची जाणीव असायची.  सहा महिने होऊन गेले तरी मला पुणं आपलंसं वाटत नव्हतं. अशातच शिकागोला महिनाभर जायचा प्लान ठरला आणि मला लक्षात आले की मी परत जायला जास्त उत्सुक होते. लगेच मैत्रीणीना फोन करून सांगितले कि मी येतेय त्यांनीही आनंद व्यक्त केला. काही लागलं तर सांग म्हणाल्या. मीही निर्धास्त होते. काही लागलेच तर निदान बाहेर जाऊन घेऊन यायला दुकाने तरी माहीत होती. मुलांच्या शाळेतूनही होकार आला एक महिना ठेऊन घ्यायला. तेही वाट बघत होते मुलांना भेटायला. 
       शिकागोला पोचल्यावर अजूनच भारी वाटलं अगदी घरी परत आल्यासारखं. कशाची काळजी नाही, एकटेपणा नाही की कंटाळा नाही. अगदी ऑफिसमधेही सर्वांनी उत्साहाने स्वागत केले. जेवणं ठरली, भेटायच्या वेळा ठरल्या, कार्यक्रमाची आमंत्रणं आली. गेले सहा महिने इथे नव्हतो असं वाटतच नव्हतं. अगदी रोजच्यासारखे रुटिन होते. पहिले दोन आठवडे तर नुसत्या भेटि घेण्यातच गेले. शॉपिंग, बाहेर खाणे, संध्याकाळी घरी लवकर परत येणे , मुलांना वेळ देणे, आणि सोशल लाईफ सर्व परत मिळालं होतं. मनात कणभरही शंका राहिली नाही की दोन वर्षांनी आपण परत इकडे यायचेच.
        तिसऱ्या आठवड्यात मुलाचा वाढदिवस होता तेव्हा मात्र घराची आठवण झाली. वाटलं त्याला आजी-आजोबा, मामा-मावश्या पाहिजेत लाड करायला. थोडाफार साजरा करून तो दिवस असाच निघून गेला. तिथल्या Organized social gathering च्या मर्यादा जाणवल्या. एखाद्याने आपल्या रोजच्या रुटिन मधून बाहेर काही करणं किती दुर्मिळ आहे असं वाटलं. ऑफिसच्या दिवशीही २०-२५ किमी प्रवास करून भाच्यांना भेटायला येणाऱ्या मामा-मावशीची आठवण झाली. दोन दिवसात दिवाळीही आली. तेव्हा गणपतीला केलेल्या सोसायटीमधील कार्यक्रमाची आठवण झाली. लोकांचा उत्साह आठवला. शिकागोमध्ये करून करून  काय करणार तर  मुलांना तयार करून पूजा करणार, मंदिरात जाणार आणि पॉटलक करून लोकांना भेटणार. एखादा सण साजरा करण्यासाठी तिथे असलेली केवळ चार भिंतीची मर्यादा अजून एकदा जाणवली. वाटलं पुण्यात असायला हवं होतं. 
          अशातच तिथे थंडी अजून वाढली आणि दे-लाईट सेविंग मुळे वेळही बदलली. संध्याकाळी ५ वाजता बाहेर पडले आणि एकदम अंधार दिसला. रस्त्यावर लोकांचं दर्शन दुर्मिळ झालं. घरी येऊन मुलांना थंडीत बाहेर नेणंही जमत नव्हतं . तेव्हा मला माझ्या पुण्याच्या रुटीनची आठवण झाली. पाच वाजता बाहेर पडलं की रहदारी, लोकांचा, गाड्यांचा आवाज, घरी गेलं की नेहेमी दार उघडं असलेले शेजारी, मग संध्याकाळी मुलांना खाली खेळायला नेणं, हे सर्व आठवलं. पुण्यातल्या घराचीही आठवण येऊ लागली होति. शनिवार-रविवारी मिळणारा निवांतपणा, घरात येणारं ऊन, उजेड, वारा, त्यांच्या सोबतीला चहा. कामाला येणाऱ्या मावशींच्या मदतीने सुखकारक होणारा सुट्टीचा दिवस, शनिवारी भाज्या आणणं, त्याही ठराविक व्यक्तीकडूनच. मग त्यांनी मुलांना खायला हातात दिलेले  वाटाणे, यांची आठवण येत होती. शेवटचा आठवडा वाट पहाण्यात संपून गेला. 
           घरी परत आले आणि कसं मस्त वाटलं. मुलांना आजी-आबा, काका-काकू, मामा भेटले. त्यांच्याकडे पाहून कळत होते कि त्यांनाही सर्वांची आठवण येत होती. कामाला येणाऱ्या मावशीही अगदी वेळेत आल्या आम्ही आल्यावर. घर छान स्वच्छ करून दिलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले तर तिथेही सर्वांनी चौकशी केली, आठवण काढली. बिल्डींगमध्ये सर्वांनी प्रेमाने विचारपूस केली. मुलांना 'मिस' केलं म्हणाले दिवाळीला. अगदी सोसायटीच्या दिवाळीच्या कार्यक्रमात फोटो काढायलाही आमची आठवण झाली म्हणे. :) पहिल्या दिवशी ऑफिसमधून परत येताना नवीन रोजचा रिक्षावाला उभा होता. मी आले कोपऱ्यावर की तो सीट झटकून रिक्षा सुरु करून थांबला. मला कुठे जायचंय हे सांगायची गरजही नव्हती. :) मी पुण्याची होतेय हे तिथून बाहेर गेल्यावर कळलं होतं. :)
 
विद्या. 

5 comments:

भानस said...

हाहा! हे असं तिकडे गेलं की इकडची आठवण आणि इकडे आलं की तिकडची ओढ... ठरलेलंच गं!मात्र मायदेशी असलेली आपली प्रेमाची माणसं इथं नाहितच. त्यामुळे सगळे असूनही काहिच नसल्यासारखे वाटत राहते.. !

आता पुण्याला रमशील! :)

Manasi said...

मस्त लेख. माझा भारतभेटीचा असाच अनुभव आहे.
अमेरिकेतून पुण्यात गेलं की सुरुवातीला अमेरिकेतली स्वच्छता, शिस्त, सर्व गोष्टी वेळच्या वेळी विनासायास होणं, लाईट-पाणी कधीही न जाणं, चकाचक रस्ते, मोठया गाडया, निसर्गसौंदर्य, नीटनेटकी मॉल्स - वगैरे आठवून अमेरिकेशिवाय जीव तळमळतो. पण शेवटी पुणं ते पुणंच! काही दिवसातच इतकं छान वाटायला लागतं पुण्यात की अमेरिकेत परत जाण्याची फ्लाईट रद्द करावीशी वाटायला लागते. :)
कर्वे रोडवर भर ट्रॅफिकमध्ये पोल्युशनशी मुकाबला करत स्कार्फने चेहरा झाकून इंच-इंच स्कूटर पुढे सरकवण्यात जी गंमत आहे तिची सर camry नाहीतर malibu मधून अमेरिकेतल्या स्वच्छ scenic रस्त्यावर प्रवास करण्याला नाही. पण हे कळायला पुण्यापासून दूर जावं लागतं हे खरं!

jayu said...

avadala..........nice

Vidya Bhutkar said...

Thank you Gals for the nice comments. :)

Vidya.

sadashivpotadar@yahoo.com said...

Nice. Ghar he gharach aste.