Thursday, January 21, 2016

डोसा इडली आणि मी

           मला खायची खूप हौस आहे. :) आता यात वेगळं काय? प्रत्येकाला असते. असो. मला दोन दिवसापूर्वी झालेल्या पार्टीमध्ये खूप खाल्ल्यामुळे दोन गुलाबजाम कमी खावे लागले याचं दुख: होतं. तेही ऑफिसच्या कुठल्यातरी मीटिंग मधे. तर कधी फेसबुक वरच्या फोटो मध्ये बघून आजच ही डिश ट्राय करायचीच असं मी ट्रेनमध्ये बसून ठरवते. मग त्यासाठी सामान आणावं लागलं तरी चालेल. माझ्या या उत्स्फूर्त स्वयंपाकाला काट मारतात ते म्हणजे डोसा आणि इडली. यांनी मला खूप काही शिकवलं आहे. काहीही हं. खरंच. :) 
             मला वाटतं डोसा आणि इडली ची आवड आईकडून आली आहे. आई म्हणे आम्हाला घेऊन सांगली मध्ये एका ठिकाणी मोठा पेपर डोसा खायला न्यायची. प्रत्येकवेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत सांगलीला गेल्यावर. :) तेवढाच काय तो आमचा लहानपणीचा संबंध. पण गरम गरम सोनेरी रंगाचा डोसा, चटणी खायला किती भारी वाटते. किंवा मस्त मऊ गरम गरम इडल्या, चटणी आणि तिखट सांबर. विचार करून पण पाणी सुटतं तोंडाला. तसे मला मेदू वडा, उत्तपम आणि आप्पे पण आवडतात, पण मी त्यांच्या नादाला लागत नाही. :) मला वयाच्या २५-२६ वर्षांपर्यंत माहीत नव्हते की केरळी, तमिळ, तेलगु आणि कन्नड असे ४ वेगळे प्रांत आहेत आणि त्यांच्या भाषा आणि जेवणही वेगळं असतं. माझ्यासाठी सर्व इडली डोसा होते. 
              कोरेगाव मध्ये मी कधी हॉटेल मध्ये खाल्ले नाही. का माहित नाही पण त्यामुळे डोसा आणि इडली खाणार कुठे हा प्रश्न होता. मी ७-८ वी मध्ये असताना आम्हाला ते कोरड्या पीठाचे पाकीट मिळते असे कळले. पण त्याला नॉनस्टिक तवा पण लागतो. आता तेव्हा निर्लेप नुकताच बाजारात येत होता. मग एकदा ते पाकीट आणि तो तवाही आला. पण डोसा कुणाला येत होता? मग मी आणि आईने एक गंमत केली. पीठ पातळ करून तव्यात टाकायचे आणि तवाच गोल फिरवायचा. पीठ परसले की गोल डोसा तयार. आणि ही माझी रेसिपी मी पुढचे १५ वर्षे वापरली. :) तरीही मनासारखा डोसा यायचा नाही. बरेच वेळा पीठ तव्यालाच लागून राहायचे. मला वाटायचे मला का नाही जमत मस्त घरी पीठ बनवून डोसा करायला? म्हणजे किती खाता येतील. :) इडलीचे मात्र बरे होते. कधीतरी आईने काटदरेंचे इडली पीठ आणले आणि बास, एकदम भारी इडल्या व्हायच्या. त्यात आपण ते घरी करू शकतो वगैरे विचार पण मनात आला नाही. कॉलेजमध्ये असताना टपरीवर खायचे तर पुण्या-मुंबईत उडपी हॉटेल मधे. 'वाडेश्वर' आणि 'पृथ्वी'ला खूप डोसे आणि इडल्या खाल्ल्या मी. वैशाली आणि रुपाली काही जास्त आवडले नाही. 
           शिकागोला आल्यावर मात्र माझी स्वत: इडली डोसा बनवायची इच्छा खूप वर येऊ लागली. डोसा पातळ पिठाचा आणि इडल्या MTR च्या. मला तर आधी हे पण माहित नव्हतं की रवा आणि तांदूळ अश्या दोन वेगळ्या प्रकारच्या इडल्या करू शकतो. मैत्रिणींच्या घरी बनवलेल्या मस्त इडल्या आणि डोसे बघून फार त्रास व्हायचा. मी एक दोन वेळा तयार घरगुती बनवलेले पीठ आणून पाहिले डोसा करायला. पहिले १-२ खराब यायचे नंतर मस्त झाले डोसे, पण खूपच थोडे व्हायचे. मग एकदा ठरवलेच की घरी करायचे सर्व. गुगल होतेच मदतीला. डाळ तांदूळ भिजवले आणि दुसऱ्या दिवशी बारीक करायला घेतले. तेव्हा कळले की दोष माझ्या अमेरिकन मिक्सर मध्ये आहे. त्यात नीट बारीकच व्हायचे नाही. मग मी नवीन मिक्सर आणला. तो बराच चांगला निघाला. पण त्यात ती मजा नव्हती. एकदा भारतात गेले असताना मग बजाज चा मिक्सर घेऊन आले. यात साधारण ३-४ वर्षं गेली असतील. सानू जिथे दिवसभर राहायची त्या सांभाळणाऱ्या बाई तेलगु. दर शुक्रवारी मी आणि संदीप तिथे गेलो की खाल्ल्याशिवाय निघायचोच नाही. बर स्पीड म्हणावा की काय? माझी इच्छा तीव्र आणि आत्मविश्वास कमी होत होता. 
          साधारण ७-८ वर्षात हळूहळू माझे डोसे सुधारले. इडली मात्र मला जमत नव्हती. मध्ये २ वर्षे भारतात होते तर नेहमी खालून तयार पीठ आणायचे, स्वयंपाक करणारी बाई इडल्या लावून सांबारची तयारी करून द्यायच्या. मला बराच आराम होता. गेल्या ८-९ महिन्यात मी परत विडा उचलला चांगल्या इडल्या बनवायच्याच. दाल-तांदळाचे माप थोडे बदलले पण त्याने काही फरक पडला नाही. २-४ वेळा घट्ट गोळा झालेल्या इडल्या मला स्वतालाच गेल्या नाहीत. शेवटी मागच्या महिन्यात भारतातून 'वेट ग्राईनडर' आणला. त्यात दोन दगडाच्या मधून पीठ बारीक होते, तासभर. मला जर अस्वस्थ होत होते की किती वेळ चालू ठेवायचे मशीन. पण परवा पीठ मस्त झाले एकदम आणि इडल्याही. शनिवारी सकाळी मनासारखी इडली, चटणी गरम गरम खाण्यासारखे सुख नाही. 
          पण त्यासाठी मला आधी ठरवून वेळेत डाळ तांदूळ भिजवावे लागतात, मेथ्यासहित. आठवणीने ते बारीक करावे लागतात आणि गरम जागेत ठेवावे लागते. हे सर्व झाले तर ते करायची वेळ पण जमली पाहिजे. शनिवार किंवा रविवार सकाळ. जास्त दिवस बाहेर राहूनही चालत नाही, नाहीतर पीठ आंबते. किती ते नाटक. तरीही ते सर्व करायची इच्छा मला दर १५ दिवसांनी होतेच. आता कळले आहे की डाळ तांदूळ कसे भिजवायचे, किती वेळ ठेवायचे. मेथ्या घालायच्याच. तवा गरम असेल तर पाणी शिंपडून घ्यायचे. चपाती-डोसा करायला एकच तवा वापरायचा नाही. तूप घातले की डोशाला जरा वेगळी चव येते. चटणी पावडर (साउथ इंडियन शब्द आणि चटणी) वरून घातली तर डोसा परतायचा नाही, नाहीतर चटणी जळून धूर होतो. आणि सर्वात शेवटचे म्हणजे, कितीही झाले तरी तुमचे डोसे श्रीदेवी इतके फास्ट आणि चांगले होणार नाहीत. त्यामुळे ती बोलली की लगेच खाऊन घ्यायचे, लाजायचे नाही.
         आज काल, खाण्यापेक्षा सर्व मस्त जमून आले आणि एकदम छान बनले याचाच आनंद जास्त होतो. शिवाय पोरांना पण हे आवडते याचा आनंद वेगळाच. मी आता पीठ बनवले की इडल्या करते. मग दुसऱ्या दिवशी त्याचाच डोसा. उरले तर पीठ फ्रीजमध्ये ठेवते आणि एकटी असताना मस्तपैकी करून खाते. :) जसे आज केले होते. आमच्या घरातली डोसा आणि इडली घरी बनवणारी पहिली मीच बरंका.  :) तर जसं मी म्हटलं या इडली डोसा ने मला खूप काही शिकवलं. कितीही वर्षे गेली तरी हवं ते मिळवायचा, शिकायचा प्रयत्न करत राहायचं, आणि आलं की त्याचा आनंद घ्यायचा. 
अरे हो, त्याच्यासोबत लागणारी खोबऱ्याची चटणी, शेंगदाणा चटणी, सांबर यांच्याबद्दल पुन्हा कधीतरी. :) 

विद्या.

No comments: