Tuesday, January 26, 2016

झाड वडाचं

            मागच्या आठवड्यात एका मराठी चित्रपटात मला वडाच झाड दिसलं आणि मी त्या हिरोला सोडून झाडाकडे बघत होते. कारण वडाचं झाड मला फार आवडतं. अगदी शाळेत असल्यापासून. लहानपणी जेव्हा मला कळलं न की त्याची मूळं झाडावर असतात, खूप आश्चर्य वाटलं होतं. कोरेगावात भरपूर वडाची झाडं पाहिली. आजही कोरेगावच्या वेशीतून आत जाताना दोन्ही बाजूनी पारम्ब्यांची कमान घेऊन ही आपल्या सावलीने स्वागत करतात.  गेल्या वर्षात खूप काही बदललं आहे गाव, पण ती माझ्या गावाची खूण आहे माझ्यासाठी न बदललेली. मला एक कळत नाही, त्यांच्या पारंब्या बरोबर अर्ध गोलाकार कशा राहतात रस्त्यावर? गाड्या टेकून त्यांना तसा आकार येतो की कुणी देतं? असो. 
          आम्ही खूप लटकायचो लहानपणी त्याच्या पारंब्यांना. मध्ये सानू आणि स्वनिकलाही एकदा तो खेळ दाखवला. पण माझ्या हाताची कातडी सोलली गेली आणि तेवढा जोर आता अंगात नाही असं नक्की वाटलं. पण पोरांना मजा आली. पुढे सांगली किंवा पुण्यात माझा इतका संबंध नाही आला त्याच्याशी. मुंबईत TCS चं एक ऑफिस होतं, बनियन पार्क. लहान असताना मजेशीर वाटायचं हे नाव, बनियन ट्री असं कुणा झाडाचं नाव असू शकतं का? त्या मुंबईतल्या ऑफिसचं नावंच फक्त बनियन पार्क होतं. झाडं कमीच. अमेरिकेत तर काही कुठे दिसलंच नाही. 
           काय विशेष आहे बरं या झाडाचं ? ते म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व. एखाद्या वृद्ध ऋषीसारखं तेही आपल्या जटा वाढवून बसलेलं, आपली सावली सर्वांना देण्यासाठी. त्याच्या पारंब्याची कल्पना मला एकदम भारी वाटते. मुळातून सर्वच रुजतात, वाढतात पण फांद्यानाही रुजू द्यावं, वाढू द्यावं आणि त्यांनी मूळ बनून अजून फांद्यांना वाढवावं. किती मस्त कल्पना आहे न. कित्येक शिक्षण संस्थांनी आपलं मानचिन्ह म्हणून या झाडाला यासाठीच निवडलं असावं. विद्यार्थ्यांना शिकवावं आणि त्यांनी पुढे जाऊन अजून ज्ञान वाढवावं, पसरावं. आणि त्या संस्थेने अशा सर्व विद्यार्थ्यांना घेऊन या झाडासारख ऋषी बनावं. तीच कथा सावित्रीच्या गोष्टीची. मी कधी वडाची पूजा केली नाही वटपौर्णिमेला. तरी मला वाटतं की माझ्या घराचा वंश असाच वाढावा, पसरावा हे दर्शविण्यासाठी या सारखं दुसरं झाड नाही. फक्त पूजेसाठी कुणी त्याच झाडाच्या फांद्या तोडू नयेत हिच विनंती. 
            गेल्या दोन वर्षात कोथरूड कडून खराडीकडे जाण्याच्या रस्त्यावर मी बरीच वडाची झाडं पाहिली. काही ठिकाणी झाड न तोडता रस्ता रुंद केलेलाही पाहिला. पण बऱ्याच ठिकाणी ही भली मोठी भव्य बुंध्याची झाडं अगदी छाटून टाकली होती. अशी बोडकी झाडं पाहायला फार कसंतरी वाटलं. किती तरी वर्षं पुढे त्यांनी सावली, हवा आणि वारा दिला असता. खूप वाईट वाटलं. पण साधारण २-३ महिन्यांनी पाहिलं तर त्या छाटलेल्या बुंध्याला कुठेतरी कोपऱ्यात पानं आली होती. एकाद्याची पारंबी अगदी जमिनीला टेकली होती. कितीही लुटलं, पडलं तरी पुन्हा जिद्दीने उभं राहणं याला म्हणावं. तेव्हापासून मी वडाची अजूनच मोठी fan झाले आहे. 
अशा एक ना अनेक कारणामुळे प्रिय असलेलं हे झाड, वडाचं.
-विद्या.

No comments: