Thursday, June 02, 2016

हिम्मत- लघुकथा एका आयुष्याची

"                                                                                                                                    दि. १२ जुलै १९७०
  
प्राणप्रिय तुम्हाला, 
  स.न. वि. वि. 
       तुम्ही म्हणत असाल, पत्रातही तुमचं नाव घेण्यास मी लाजते आहे की काय? तशी तुमच्या नावापुढे मी काय संबोधने लावावीत याचा बराच विचार करून थोडे लाजल्यासारखे झाले खरे. परंतु या पत्रामुळे तुमची बदनामी होऊ नये याची खबरदारी घेणे हे एक मुख्य कारण आहे. पत्रास कारण की, आपल्या कॉलेज बाहेर झालेल्या भेटीची वार्ता मोठ्या दादांनी वडिलांना सांगितली आहे. तसे घाबरण्याचे कारण नाही, मी सुखरूप आहे. परंतु,"पुरे झाले मुलीचे शिक्षण, आता चांगला मुलगा बघून उरकून घ्या" असे आईचे फर्मान आल्याने माझी नजरकैद सुरु आहे. माझे कॉलेजमध्ये येणे काही दिवस तरी स्थगित होईल असे दिसते.  
        "मी डोळे मिटण्याआधी हीचे दोनाचे चार झालेले बघावं" अशी इच्छा आजीनेही जाहीर करून टाकली आहे. तिला दोष देऊन काय उपयोग? आजीची प्रकृती तशी नाजूकच आहे सध्या. आजोबा गेल्यापासून त्यांच्या आठवणीत ती झुरतेच आहे. तिला पाहिल्यावर अतिशय वाईट वाटते. असेच मला तुमच्याशिवाय आयुष्य काढावे लागले तर माझे काय होईल असा भंयकर विचारही मनात क्षणभर येऊन गेला. तेव्हांच देवाकडे मी साकडं घातले आहे की या जगातून नेशील तर मलाच आधी न्यावे. तुमच्याशिवाय हे आयुष्य क्षणभरही जगणे मला असह्य आहे.
           कदाचित गेले काही दिवस तुम्ही न भेटल्यामुळे अशा वाईट विचारांनी माझ्या मनात गर्दी केली असावी. तुम्हाला पाहिल्यावर मात्र माझ्या मनातील सर्व वाईट विचार नाहीसे होऊन जातात आणि मनाला शांती मिळते. तुमच्या बाहुपाशातच माझा स्वर्ग सामावला आहे हेच खरे. तुम्हाला भेटण्याचा तो अभूतपूर्व क्षण कधी माझ्या पदरात पडेल याची मी आतुरतेने वाट पहात आहे. त्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करत आहे. 
          तुमच्या सांगण्यावरून घरी आलेली सलू  भेटल्यावर मला देवदूतच भेटल्याचा आनंद झाला आहे. तिच्याकडून मिळालेल्या तुमच्या पत्रामुळे आपल्या प्रेमावरील माझा विश्वास अजूनच दृढ झाला आहे. वडिलांनी मुंबईहून आलेल्या एका स्थळाची आईशी चर्चा करताना कानी पडले तेव्हापासून मनाची थोडी अस्वस्थता वाढली आहे खरी. तुमच्या प्रेमावर काडीमात्रही संशय नसल्याने खूप काळजी नक्कीच नाहीये. परंतु येणाऱ्या संकटाची चाहूल लागल्यावर वेळीच पाऊले उचलणे योग्य ठरेल असे वाटते, म्हणून हा पत्रप्रपंच.
          तुमच्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे. तुम्ही लवकरच वडिलांना भेटायला येऊन मला मागणी घालावीत ही प्रार्थना. आपल्या घरची थोरली सून होण्याचे माझे स्वप्न लवकरच पूर्ण कराल अशी माझी खात्री आहे. परंतु देव न करो, अशी आणीबाणीची परिस्थिती उद्भवलीच तर विष पिऊन जीव देण्याचा ठाम निर्णय मी घेतला आहे.
           हे पत्र सलुसोबत पाठवत आहे. या पत्राची पोचपावती आणि उत्तर जरूर कळवावे. तुमच्या मार्गाला डोळे लावून बसले आहे.
                                                                                                      तुमची आणि फक्त तुमचीच, 
                                                                                                      वैजयंती. " 

         तिने ते पत्र पुन्हा एकदा वाचलं. डोळ्याचा चष्मा काढून डबीत घालून ठेवला. डोळे पदराने पुसले. पत्र नीट पाकिटात ठेवलं. पत्रासोबत ट्रंक मध्ये एक फोटोही होता,  ब्लाक व्हाईट फोटो त्या दोघांचा. दोघांच्या गळ्यात हार घातलेला. तो फोटो पाहून ती जरा हसली. घरातून पळून जाऊन केलेल्या लग्नाची ती एकुलती एक आठवण होती. ती तरुणाई, ते प्रेम आणि तो दिवस पुन्हा एकदा डोळ्यात उतरले होते. आणि त्यापुढची सुखी संसाराची २० वर्षही डोळ्यासमोर तरळली.  'तुमच्याशिवाय क्षणभरही जगू शकणार नाही' म्हणणारी वैजू गेली २५ वर्ष त्याच आठवणींवर जगतेय. त्या २५ वर्षात हजारवेळा तरी जीव देण्याचा विचार तिने केला होता. पण तो विचार पूर्ण करण्याची हिम्मत मात्र तिची झाली नव्हती. जीव देण्याची हिम्मत झाली नाही म्हणून स्वत:वरच कितीतरी वेळा चिडली होती ती ! तिला कुठे ठाऊक होतं? हिम्मत मरायला नाहीलागत. हिम्मत लागते ती जगायला त्याच्यामाघारी !
         
विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: