Tuesday, June 07, 2016

अमानुष

         कधी आपण मोठे होतो आणि कधी हे असे मनातले विचार ओठांवर न येता मनातल्या मनात मरून जातात हे कळत नाही, होय ना रे? आणि कित्येक वेळा हे असे विचार किती काळे असतात याला काहीच मर्यादा नसते रे ! कधी असतात ते हावरे. म्हणजे सख्खे सोबत वाढलेले भाऊ संपत्तीसाठी दुसऱ्याच्या खुनाचा विचार करतात तर काही बहिणीला घरातून घालवून देण्याचा. आई वडिलांना घरी न ठेवून घेण्याचा.
           येत असेल कुणाच्या मनात स्वार्थी विचारही, आपल्याच मुलांमध्ये आवडतं-नावडतं निवडण्याचा. लग्न करताना, हा बरा की तो याचा? अगदी केल्यानंतरही अनेक वर्षांनी, तेव्हा काय करायला हवं होतं याचा. तिकडे कितीही बायकोवर प्रेम असलं तरी शेजारीण जाताना नकळत डोक्यात टपकणारा, असतोच एखादा विचार.
       कधी असतात घाबरवणारेही, आपलं जवळचं माणूस नाही राहिला सोबत तर? तो नसताना मी कशी राहीन किंवा राहीन का तरी? किंवा संपला हातातला पैसा तर? पैसा संपला म्हणून त्याला सोडून जाता येईल का याचेही? किंवा उधळली पोराने इज्जत समाजात तर आपले काय होईल याचे? किंवा पोराचं काही का होईना, आपल्याला आधी मिळत होता तो मान आता मिळाला नाही तर काय म्हणूनही.
        किती किती ते काळे विचार, मनाच्या आत कुठेतरी येणारे. हे सगळे तर नुसते उदाहरण झाले. शब्दांत उतरणारही नाहीत असे अनेक लाखो करोडो विचार. प्रत्येक नात्यात, प्रत्येक कार्यात येणारे विचार. सर्वांना गाडून टाकायला किती कष्ट पडत असतील? कदाचित नसतीलही कष्ट पडत. काहीच नसल्यासारखं आपण रोज जगत राहतो. ज्यांच्या मनातले हे विचार खरंच बाहेर येतात ना ते मात्र 'अमानुष' म्हणवले जातात आणि त्यांच्याच बातम्या रोज पहात आपण विचार करतो,"कसा हे असा विचारही करू शकत असतील?".

विद्या भुतकर.  

No comments: