Sunday, June 11, 2017

गप्पा, न संपणाऱ्या.....

       शुक्रवारी कॉलेजमधल्या एका मैत्रिणीचा मेसेज आलेला होता व्हाट्स ऍपवर,"ओळखलंस का म्हणून?". इतक्या वर्षांनी फायनली तिचा मेसेज आला आणि संपर्क झाला म्हणून एकदम खूष होते. म्हणाली,"ओळखशील की नाही शंका होती.". म्हटलं,"बावळट, तुला किती शोधलं, म्हणजे ऑनलाईनच, पण शोधलं ना? कुठे होतीस?". शेवटी फोन करायचा ठरलं तर माझ्याकडचे पाहुणे, तिचे कार्यक्रम असं करत शनिवारी फोन लागला आणि बोलणं सुरु झालं. आता जवळची मैत्रीण म्हटल्यावर पोरं-सोरं बाजूला ठेवून बोलत बसलो बराच वेळ. म्हणजे दोनेक तास तरी. शेवटी मागे पडलेली कामं होतीच. जायला तर लागलंच. पण खूप वर्षांनी बोलून मन मोकळं झालं. विषय एकच असं नाही, विषय पाहिजेच असं नाही. फक्त 'पुढे काय बोलायचं?' किंवा  'मग काय विशेष?' असे प्रश्न पडले नाहीत. 
       तर या अशाच गप्पा, न संपणाऱ्या कितीतरी व्यक्तींसोबत केलेल्या, झालेल्या, न संपलेल्या सगळ्या आठवल्या. खूप दिवस झाले असं बोलून. त्या त्या व्यक्ती, गप्पा सगळं वेगळं पण नातं मात्र खासच. ती नाती कधीच विसरली जात नाहीत, कदाचित भेटी होत नाहीत, पण मनात नक्कीच राहतात. शाळेत असताना, जवळच्या मैत्रिणींसोबतच्या गप्पा. ११-१२ ला दिवसभर सोबत असून परत कोपऱ्यावरून वेगळं होताना तिथेच चौकात उभे राहून मारलेल्या गप्पा. परत दुसऱ्या दिवशी भेटणार आहे हे माहित असूनही. आणि मधेच एखादं कारण काढून लँडलाईन वरून केलेला फोन. पुढे कॉलेजमध्ये रात्री रूममेट्स सोबत गप्पा मारून परत भूक लागली म्हणून दोन वाजता चिवडा खात अजून मारलेल्या गप्पा. मित्रांसोबत रस्त्यावरून फिरत आणि नंतर बिल्डिंगच्या खाली उभे राहून मारलेल्या गप्पा. यातली एकूण एक व्यक्ती खास होऊन जाते. 
           नुसते मित्र-मैत्रिणीच असं नाही लग्नाला, माहेरी किंवा आजोळी गेल्यावर रात्री सगळ्या बायका आडव्या झाल्या की आळस देत मारलेल्या गप्पा, त्याला थोडं 'गॉसिप' वळणही असतं बरं का ! :) अगदी झोप ग, उशीर झालाय म्हणत पुन्हा एखादीने विषय काढायचा आणि सगळे परत सुरु. मधेच कुणी ऐकू नये म्हणून आपोआप बारीक होणारा आवाजही असतोच एखाद्या खास विषयावर बोलताना. सगळ्यात जास्त मजा असते ती एखादा कार्यक्रम संपला की त्यानंतर सगळं आवरण्यासाठी मागे राहिलेली मंडळी, शेवटच्या पंगतीत बसलेली खास लोकं आणि त्यांच्या गप्पा या वेगळ्याच असतात. कार्यक्रम चांगला झाला, एखादा घोळ झाला किंवा एखादया पाहुण्याला कसा सांभाळला यावर चर्चा घडत राहते. समोरचं ताट रिकामं होतं, हात सुकून जातात आणि मनही थोडं उदास झालेलं असतं आतून. तरीही या गप्पानी एक वेगळीच ऊर्जा मिळते. 
         एखादं असं जोडपंही असतं, नवरा-बायको आपले अगदी खास दोस्त. दिवस-रात्र तिथे राहूनही घरातून निघतानाही दारातच तासभर गप्पा होतात. दोघांनाही माहित असतं निघायचं आहे, उशीर झालाय तरीही दारातल्या गप्पा संपत नाहीत. 'चल बाय म्हणत बोलतच राहतो'. 'आता उशीर झालाय तर राहूनच जा' असंही होऊन जातं मग. दारातल्या गप्पांवरुन आठवलं, आमच्या शेजाऱ्यांशी मारलेल्या गप्पा. दोघीही 'खूप काम पडलंय' म्हणत दारातच उभं राहून बोलत राहायचं. यासारखी मजा नाही आणि शेजारही नाही. यातही गम्मत तीच. रोजच भेटायचं, तेच रुटीन, तेच लोक तरीही गप्पा मात्र संपत नाहीत. अशात गरम गरम चहाही मिळाला की मंग काय बासच. शेवटचं म्हणजे हे प्रेमातल्या गप्पा. रस्त्याने चालत, तर कधी बाईकवरून मारलेल्या, फोनवरून, पत्रातून आणि पुन्हा एकदा चार तासातच भेटून मारलेल्या गप्पा. किती वेगळ्या असतात ना? 
        या सगळ्यात काय असतं माहितेय का? तिथे तुम्ही मनातलं सगळं मोकळेपणाने बोलू शकता, उद्या एखादं गुपित बाहेर फुटेल या भीतीने काही राखून ठेवलं जात नाही. उलट कधी मनातलं साचलेलंही बाहेर पडून जातं.  कुणी माझ्याबद्दल काय विचार करेल, असं मनातही आणायची गरज वाटत नाही. जे आहे ते आहे, असं स्पष्ट बोललं जातं. मघाशी म्हटलं तसं, प्रत्येकाचे विषय वेगळे, काळाचे संदर्भ निराळे, तरीही या सर्व प्रकारातील एखादी तरी खास व्यक्ती आठवेलच तुम्हालाही, ज्यांच्यासोबत तुम्हीही अशा मनमोकळ्या गप्पा मारल्यात किंवा अजूनही होतात, अशाच कधी फोनवरून, कधी खूप वर्षांनी भेटल्यावर तर कधी कुणाच्या कार्यक्रमात. बरोबर ना? 

विद्या भुतकर. 
          
         

No comments: