Tuesday, July 18, 2017

बात निकलेगी तो.....

      खूप दिवसांनी काल रात्री जगजीत सिंगच्या गझल ऐकत बसले होते. आजकाल त्या वळणावर जायचं टाळतेच. एकदा का नाद लागला की मग थांबत नाही. वाटतं सर्व काम सोडून फक्त ऐकत बसावं. मग घरात काय चाललंय, पोरांना काय हवंय, स्वयंपाक, आवरणं सगळं मागे पडतं आणि कान फक्त त्याच्या आवाजाकडे लागून राहतात. शेवटी नाईलाजाने सर्व बंद करून झोपले. सकाळी मात्र गाडीत बसल्यावर लगेचच सुरु केली आणि एका पाठोपाठ गाणी सुरु झाली. कितीही वर्ष झाली असू दे ऐकून, गाणं सुरु झालं की आपोआप शब्द ओठांत येऊ लागतात आणि ते भाव मनात. त्यात आज पाऊसही होता सोबतीला. मग काय आहाच....

        यावेळी एक गोष्ट लक्षात आली जी याच्या आधी कधी डोक्यात नव्हती ती म्हणजे या सर्व गजलांचे कवी कोण असतील. खरंतर व्हायचं काय की जगजीत सिंगच्या आवाजात ते शब्द इतके पक्के डोक्यात बसायचे की हे मुळात लिहिलं कुणी असेल असा विचार करायला सवडच मिळायची नाही. यावेळी मात्र एकेक गझल उचलून त्यांच्या कवींची नावं इंटरनेट वर शोधायला सुरुवात केली. आणि मग त्या नादात कितीतरी वेळ गेला. आपण हे सगळं आधी कसं दुर्लक्षित केलं या विचाराने स्वतःवरच रागही आला.

       तर त्यातली पहिली गझल म्हणजे 'बात निकलेगी तो दूर तलख़ जायेगी'. माझी एकदम आवडती. मी नेटवर त्या कवींची माहिती शोधू लागले. "कफ़ील आज़र अमरोहवी" या नावाच्या कवींबद्दल मी कधीच ऐकलं नव्हतं. खूप शोधूनही अगदी थोडकीच माहिती मिळाली. तेही त्यांच्या अजून काही गझल आहेत त्याबद्दलच. त्यांची वैयक्तिक माहिती कुठेच मिळाली नाही. 

         मग पुढे शोधलं ते म्हणजे "मैं नशें में हूँ' या गझल बद्दल. 'शाहिद कबीर' असं त्या कवींचं नाव. त्यांच्या बद्दल थोडी माहिती वाचायला मिळाली आणि कळलं की ते महाराष्ट्रातील एक उर्दू कवी होते. एक मराठी व्यक्ती असूनही मला अशा कवींबद्दल काहीच माहित नाही हे वाईटच ना? तर त्यांना महाराष्ट्रातील उर्दू अकेडमी चा पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांचा जन्म नागपूरचा. केंद्र सरकारच्या नोकरीत दिल्ली मध्ये असताना त्यांची ओळख तिथे काही कवींशी झाली आणि त्यांनी गजल लिहायला सुरुवात केली अशी माहिती वाचली. त्यांच्या अनेक गझल मान्यवर गायकांनी गायिलेल्या आहेत. अर्थात हे सर्व केवळ नेटवर मिळालेल्या माहितीमधून सांगत आहे. या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याबद्दल आणि त्यांचं काम हे सर्व वाचलं पाहिजे, समजलं पाहिजे असं खूप वाटलं आज.

        पुढची गझल म्हणजे 'कोई ये कैसें बतायें के वो तनहा क्यों है'. या गाण्यांत जे शब्द आहेत ना त्याने ते एकदम मनाचा ठाव घेतं.
"तुम मसर्रत का कहो या इसे ग़म का रिश्ता 
कहते हैं प्यार का रिश्ता हैं जनम का रिश्ता 
हैं जनम का जो ये रिश्ता तो बदलता क्यों है ? " 

किती सरळ प्रश्न आहे? जे प्रेम इतकं जवळचं होतं, कायमचं आहे असं एकेकाळी वाटलं होतं, ते बदलू शकतं? या ओळींच्या कवीचा शोध मला 'कैफी आझमी' यांच्यापर्यंत घेऊन गेला. चला निदान मी त्यांचं नाव तरी ऐकलेलं होतं. त्यांच्यावर माहिती वाचताना त्यांचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील कारकिर्दीची माहितीही मिळाली. त्यांची मुलगी म्हणजे 'शबाना आझमी' मुळे त्यांचं नाव जास्त लक्षात राहिलं असेल. त्यांच्यावर अख्खी एक वेबसाईट आहे आणि बरंच काही वाचण्यासारखं. त्यांच्या बाकी गझलही मला समजून घ्यायच्या आहेत. पण मला आज अनेक लोकांवर माहिती हवी होती त्यामुळे थांबणं शक्य नव्हतं.

      'हजारों ख्वाहिशें ऐसी' या गझलने मात्र जीवाचा ठावच घेतला आहे. जगजीत सिंगच्या आवाजात 'ख्वाहिशें' हा शब्द जरी ऐकला तरी खरंच 'जीव ओवाळून टाकावा' असं वाटतं. मी या गझलेचं लाईव्ह शो मधील रेकॉर्डिंग ऐकलं आहे आणि त्यात त्यातील एकेक मिसरा त्यांच्या शब्दांत समजून घेतानाही खूप छान वाटत होतं. अर्थात या सगळ्या गझल मी याआधीही खूप वेळा ऐकल्यात आणि तरीही त्या नव्याने ऐकत राहते. या गझलेचे कवी म्हणजे 'मिर्झा गालिब'. गालिबचे अनेक शेर अनेक हिंदी चित्रपटांतून ऐकले आहेत. पण त्यांच्याबद्दल माहिती वाचण्यासाठी कधी प्रयत्न केले नव्हते. मुघलांच्या काळातील उर्दू आणि पर्शियन कवी ते. मला सर्वात जास्त आवडलेली त्यांच्याबद्दलची माहिती म्हणजे ते चांगले पत्र-लेखकही होते. 

       खरं सांगायचं तर जावेद अख्तर आणि गुलज़ार या दोघांचीच गीतं आणि गझल इतक्या वेळा ऐकले आहेत की बाकी कवींची कधी ओळख करूनच घेतली नाही. विचार करा, वर मांडलेल्या सर्व कवींच्या अशा अनेक गझल, कविता असतील. जगजीत सिंगमुळे, त्यांच्या आवाजामुळे या सर्व लोकांचे मोजके का होईना शब्द कानावर पडले. या सर्व कवींबद्दल जर खरंच वाचायला, शिकायला आणि त्यांचं कार्य समजून घ्यायला मिळालं तर किती मोठा खजिना मिळेल. मला कधी कधी खूप भारी वाटतं, आपण इतके नशीबवान आहोत याचं. केवळ जगजीत सिंग ऐकायला मिळावं हेच मुळात नशीब, पुढे जाऊन त्या गझलेचा अर्थ समजावा, तो मनात रुतावा यासारखं सुख काय? माझ्या मुलांना कदाचित ही संधी नाही मिळणार.मला हे करायला मिळतंय हे कमी आहे का? 
        मला तर पुन्हा एका कॉलेज मध्ये जाऊन हिंदी आणि उर्दू शिकण्यासाठी ३ वर्षं तरी घालवावी असं वाटू लागलं आहे. माझे आजोबा संस्कृत शिकवत. त्यांना कालिदासाचं शाकुंतल इतकं का प्रिय होतं आणि एखादा नवीन श्लोक शिकल्यावर आनंद का व्हायचा हे आज मला जाणवत आहे. माझे आजोबा, वडील यांनी वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक गोष्टींचं शिक्षण घेतलं आहे. मलाही आता ते करावंसं वाटत आहे.त्याची सुरुवात केली ती म्हणजे या सर्व गाण्यांच्या मागे जाऊन त्यांचे कवी कोण हे शोधून. आता पुढचा टप्पा, त्यांच्या अजून गझल वाचणे...... :) तुम्ही कुणी या गझलांचा खोलवर जाऊन अभ्यास केला आहे का? कुणी केला असेल तर जरूर सांगा माहिती. 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: