Sunday, November 26, 2017

स्वप्नपूर्ती

       हा वीकेंड मध्ये अमेरिकेतील खरेदीचा मोठा इव्हेन्ट म्हणजे 'ब्लॅक फ्रायडे' होता. तो खरंतर इथल्या 'थँक्स गिव्हिंग' या सणाच्या (गुरुवारच्या) दुसऱ्या दिवशी असतो(अर्थातच फ्रायडे कम्स आफ्टर थर्सडे !). पण झालंय काय, इथल्या मोठं मोठ्या रीटेल दुकानांच्या सेलच्या जाहिरातींमुळे मुळात खास घरातील जवळच्या माणसांबद्दल असलेला हा सण गर्दी, पैसे आणि खरेदीसाठी असलेल्या लांबलचक रांगांमध्ये हरवून गेलाय. गुरुवारी खरंतर अनेक लोक आपल्या घरी/गावी परत जातात, मोठाली पंगत होते, जे कोणी आदरातिथ्य करत आहे ती व्यक्ती सर्व जेवण बनवते, वगैरे. 
        आता हा गुरुवारचा दिवस संपला की शुक्रवारी खरेदी असेल तर समजूही शकतो. पण लोकांनी आजकाल गुरुवारी संध्याकाळपासूनच दुकानं उघडी ठेवायला सुरुवात केलीय. त्यात बंपर सेल्स लावलेत. त्यामुळे, यातील अनेक मध्यमवर्गीय लोक समजा मॉल मध्ये काम करत असतील तर त्यांना बिचाऱ्यांना घरातील लोकांसोबत जेवण करुन लगेच कामावर जावे लागणार किंवा जो घरी राहण्याचा आनंद आहे तो घ्यायचा असेल तर खरेदीला मुकावं लागणार. एकूण काय तर १५ ऑगस्टला पावसाळी सेलसाठी गर्दी करण्यासारखा हा प्रकार. असो. 
          आम्ही अमेरिकन नसल्याने कुठलेही बंधन नसून, अगदी गुरवारपासूनच खरेदीला जायचो पूर्वी. त्यात मग एखादी वस्तू स्वस्तात मिळाली की खूप आनंद मिळायचा. हे सगळं हळूहळू कमी होत गेलं. याला दोन कारणं, बरेचसे सेल खरेतर लोकांना फसवणारे असतात. त्यापेक्षा कमी किमतीत तीच वस्तू आधी किंवा नंतर मिळू शकते. उदा: थंडी संपल्यावर स्वेटर्सचा असणारा सेल. आणि दुसरे म्हणजे केवळ सेल आहे म्हणून उगाचच नको आहेत त्या गोष्टीही खरेदी केल्या जातात. मग उगाच सोमवारी पैसे खर्च केल्याचा पश्चाताप होतो. त्यामुळे अगदी खरेच हवे असेल काही आणि खरेच त्याची किंमत एरवीपेक्षा कमी असेल तरच ते घ्यायचं असं अगदी ठरवून, ठराविकच गोष्टी घेतल्या. 
         आता हे सर्व पारायण ऐकवण्याचं कारण म्हणजे, अनेकवेळा मागे वळून बघते तेव्हा 'लहानपणापासून पाहिलेली स्वप्नं' हा आयुष्याचा एक मोठा भाग दिसतो. पुढे जाऊन त्यातील काही स्वप्नं खरंच पूर्ण झाली हा विचार केला तर अजून आनंद वाटतो. त्यामध्ये इतक्या ठराविक गोष्टी होत्या. उदा: शाळेत असताना शेजारच्या मुलीचं आहे तसलंच दप्तर आपलंही असावं किंवा एखादा तेंव्हा मिळणारा कंपास बॉक्स किंवा ठराविक ब्रँडची सायकल. तेंव्हा माझ्या मैत्रिणीकडे एक सोन्याची अंगठी होती. मला खूप आवडायची. पुढे कॉलेजला गेल्यावर आईने अंगठी घेऊन दिली तेंव्हा मी अगदी त्याच टाईपची अंगठी घेतली आणि गेले वीस वर्षं ती घालत आहे. ती अंगठी माझं एक स्वप्नं पूर्ण झाल्याची निशाणी आहे. :) 
        कॉलेजमध्ये असताना एक मॅडम बायॉलॉजि शिकवायच्या. प्रत्येकवेळी त्या एखादी नवीन साडी नेसून यायच्या. अगदी चापून चोपून नेसलेली असायची ती. एकदा असंच गंमत म्हणून त्या एखादी साडी परत केव्हा नेसतात हे पाहिलं होतं. कमीत कमी एक महिनाभर तरी त्यांची साडी परत नेसली जायची नाही. मोजून ५-६ ड्रेस असण्याचे दिवस ते.  वाटायचं मी मोठी झाले की अशाच खूप साड्या घेणार विकत आणि अजिबात रिपिट करणार नाही महिनाभर तरी. आता ते आठवलं तर हसू येतं कारण आता इथे साड्या नेसणं होत नाही त्यामुळे वर्षातून मोजून २-३ साड्या घेतल्या जातात आणि अगदी तितक्याच वेळा नेसल्या जातात. आणि भारतात असताना नेसल्या तरी त्यासाठी लागणार वेळ, मुलांचं आवरायचं, कुठेही पोहोचायला झालेला उशीर हे पाहून सोपा मार्ग अवलंबला जातो, ड्रेस घालण्याचा. :) 
       पूर्वी ड्रेससाठीही वेगवेगळ्या दुकानांत फिरणे, मटेरियल आवडलं तरी ओढणी न आवडणे किंवा व्हाईस वर्सा प्रकार झाले आहेत. त्यात सर्वात हौसेचा ड्रेस होता तो म्हणजे, 'हं दिल दे चुके सनम' च्या स्टार वाल्या ओढणीचा. स्वप्न पुरं झालं खरं पण एका धुण्यातच त्या ओढणीचं लक्तर झालं होतं.पुढे कुणाचे तरी बघून मला कॉटनचे ड्रेसेस घालण्याची फार आवड निर्माण झाली. नुकतीच नोकरी लागली होती तेंव्हा. त्यामुळे ड्रेस बाहेरुन इस्त्री करूनही घ्यायचे. भारी वाटायचं स्टार्च वाली ओढणी घेऊन कडक ड्रेस घालून जायला. त्यात मग लखनवी ड्रेसची हौस झाली. सलग वेगवेगळ्या रंगाचे लखनवी ड्रेसेस घेऊन झाले. तरीही एक मात्र स्वप्न आहे जे अजून पूर्ण झालं नाहीये किंवा त्याला मुहूर्त लागला नाहीये. एक लाईट पिंक कलरची कॉटनची लखनवी साडी घ्यायची आहे. ते या भारतवारी मधेही पूर्ण नाही झालं. आता पुढच्या वेळीच. 
         अमेरिकेत आल्यावर वेगळीच वेडी स्वप्नं होती. उदा: एका कॉफी शॉपमध्ये एकटंच बसून कॉफी प्यायची. :) आता विचार केला तरी हसू येतं.  कदाचित 'दिल चाहता है' च्या तन्हाई गाण्याच्या इफेक्ट असेल. पण कॅनडा मध्ये असतांना जवळजवळ महिनाभर अशी एकटी बसून कॉफी प्यायचे. (कॉफी कुठली, हॉट चॉकलेट, इथली कडू कॉफी झेपायला १२ वर्षं गेली.) अजूनही डाऊनटाऊन मध्ये बाहेर बघत एकटक कॉफी प्यायला मिळाली तर भारी वाटतं.
       दुसरं स्वप्न म्हणजे, एअरपोर्ट वर लॅपटॉप घेऊन बसायचं. आता स्मार्ट फोन आल्यामुळे हे अगदीच येड्यागत वाटत असेल. पण एकटं स्टाईलमध्ये एअरपोर्ट लॅपटॉप घेऊन बसायचं होतं एकदा मला. ते पहिल्यांदा जेव्हा केलं ना? खूप भारी वाटलं होतं. एकूणच भारतात जाताना मोठ्या विमानप्रवासात झालेले आईवडिलांचे, मुलांचे हाल यामुळे त्यातली मजा आता गेली आहे. :) आता कदाचित 'बिझनेस क्लास' मध्ये बसायला मिळणे हे फारतर लिस्टवर टाकू शकते. आणि हो, एखाद्या सेलेब्रिटीला भेटणे. म्हणजे, आपण बसलोय आणि शेजारच्या सीटवर अमिताभ बच्चन येऊन बसलाय वगैरे. :) 
        अमेरिकेत आल्या आल्या तिसरं स्वप्न होतं ते म्हणजे लाल रंगाची कन्व्हर्टिबल स्पोर्ट्स कार घेणे. तेंव्हा बजेट मध्ये बसेल अशी साधी 'बेज' रंगाची कार घेतली. अर्थातच तिच्यासमोरही उभे राहून मोठ्या अभिमानाने फोटो काढला होता. कारण आयुष्यातील पहिली कार होती ती. पुढे इथे राहायला लागल्यावर बजेट आणि उपयुक्तता हे सर्व विचार करूनच कार घेतली गेली. पण आल्या आल्या एका मुलीचा वेडेपणा म्हणून वाटणारं जे स्वप्न होतं ते अजूनही अपूर्णच आहे. 
        कॉलेजमध्ये माझ्या रूममध्ये स्टीव्ह आणि मार्क वॉ असलेलं एक पोस्टर लावून ठेवलं होतं. टाईम्स ऑफ इंडियाच्या रंगीत पुरवणीत पीटर इंग्लंड च्या जाहिरातीचं होतं बहुतेक ते. त्यात ते दोघे उभे आहेत आणि मध्ये एक भारी वॉर्डरोब आहे ज्यात निरनिराळ्या रंगाचे सूट, टाय, वगैरे ठेवले आहेत. मी म्हणायचे असा वॉर्डरोब नवऱ्याचा असेल तर माझा किती भारी असेल. :) अर्थात तसा तो कधी मिळेल की नाही माहित नाही. कारण त्यासाठी तेव्हढे कपडे, आणि ते ठेवण्यासाठी लागणारं कपाट असणारं घर अजूनतरी केवळ स्वप्नांतच आहे. आणि हो, पूर्वी वाटायचं, खूप भारी उंच टाचेचे चप्पल घ्यावेत वगैरे. आता पाठदुखते म्हणून मुकाट्याने एकच सूट होईल अशी सपाट चप्पल घातली जाते.  त्यामुळे कदाचित तिथंपर्यंत जाऊ की नाही हेही माहित नाही. 
       तर ही अशी अनेक स्वप्नं. अगदी खूप  प्रकारच्या रंगाचं कलेक्शन (रंगपेटी, ब्रश), हँडमेड पेपर्स, एखादी घरात असावीशी लायब्ररी आणि हो तिथे बसून वाचण्यासाठी एक आरामखुर्ची, बाहेर पडणारा पाऊस, हातात पुस्तक आणि कॉफीही. कुणाचं काय तर कुणाचं काय.  एखाद्याला मित्रासारखी बाईक हवी असते, कुणाला साडी तर कुणाला अभिमानाने मान ताठ करता यावी अशी मुलं. आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर वेगवेगळी स्वप्नं पाहिली. त्यातली काही खरी झाली, मागे वळून पाहताना काहींवर हसू आलं तर कधी डोळ्यांत पाणी, कधी पैसे हाती आल्यावर गरजेचं वाटेनासं झालं आणि कधी जे हवं होतं ते मिळाल्याचं समाधानही मिळालं. अर्थात प्रत्येक स्वप्न भौतिक गोष्टींबद्दल असतंच असंही नाही. 
         वर त्या शॉपिंगबद्दल लिहिलं होतं ना? त्यात ही अशी स्वप्नं बसत नाहीत. त्यामुळे कदाचित खरेदी करुनही तो आनंद मिळत नाही. वीकेंडला खरेदीसाठी समोर अनेक गोष्टी येऊनही टाळल्यामुळे जुन्या काही स्वप्नांची पुन्हा आठवण झाली. आता पुढची काय आहेत ते एकदा विचार करुन, लिहून ठेवली पाहिजेत, कारण स्वप्नपूर्तीची मजा बाकी कशातच नाही. :) 

विद्या भुतकर. 

No comments: