Thursday, November 30, 2017

रुंबा

    काल आमच्या घरी एक नवीन मशीन आलं, iROBOT Roomba. गेल्या दोनेक वर्षांपासून ऐकलं होतं आणि लोकांकडे पाहिलंही होतं. खरं सांगायचं तर कॉलेजपासून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हा माझा आवडता विषय. माणसाचा मेंदू एका सेकंदात किती विचार करतो आणि किती निर्णय घेतो याचा अंदाज AI शिकताना येतो. समजा, तुम्ही गाडी घेऊन एका चौकात उभे आहात, आता तुमचा ग्रीन सिग्नल लागणार पुढच्या पाच सेकंदांत, समोरच्या बाजूचे लोक अजूनही जात आहेतच, शेजारी उभा राहिलेला गाडीवाला नुसता पेटलाय कधी एकदा रस्ता पार करतोय यासाठी, तुम्ही त्याच्याकडे, त्याच्या मागे असलेल्या मुलीकडे, समोर उभ्या असलेल्या काकूंकडे बघता. आता सिग्नल ग्रीन झाल्यावर आपण गाडी दामटेपर्यंत अनेक निरीक्षणं करुन, गाडी किती वेगात सुरु करायची आणि कुठून काढायची, तिथून निघून पुढे जिथे जायचं आहे तिथे पोहोचायला किती वेळ लागेल इथंपर्यंत सर्व विचार एका सेकंदात होऊ शकतात. 
        आता हेच सर्व एका मशीनला करायचं असेल तर? प्रत्येक शक्यता पडताळून, आजूबाजूचं अंतर मोजून, बाजूच्या लोकांच्या वेगाचा अंदाज घेत एक सिग्नल पार करण्यासाठी एक मशीन बनवायचं झालं तर त्यात लाखो, करोडो शक्यता त्या मशीनला फीड कराव्या लागतील आणि त्यासर्वांतून त्याने योग्य ती सिलेक्ट करुन पुढे जावं लागेल. हे मशीन बनवण्यासाठी किती वेळ लागेल माहित नाही(गूगलला विचारावं लागेल त्यांच्या 'मॅनफ्री' कार बद्दल. तर एकूण काय की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खायचं काम नाहीये. 
       आता गोल गोल फिरणारं चक्रासारखं जमिनीवरचा कचरा साफ करण्यासाठी असलेलं हे मशीन जे आमच्याकडे फायनली घेतलं त्याचंही असंच आहे. त्याला घरातल्या पसाऱ्याचा, वस्तूंचा आणि खुर्ची वगैरेचा अंदाज घेऊन साफ करायला एक तासभर लागतो, त्यातही मधेच तो आपली लाईन सोडून वाकडा चालत जाऊन दुसऱ्या खोलीत घुसतो आणि माझ्यातल्या थोड्याफार 'शिस्तप्रिय' व्यक्तीला त्याचा त्रास होतोच. एक रूम आधी कर ना ! सारखे माझे विचार गप गिळावे लागतात. आज माझी एक काळी मेटलची क्लिप गिळून अडकून बसल्यावर तक्रार केलीच. चार वेळा रीसेट करुनही का चालत नाही म्हटल्यावर ती चेक केलं तर क्लिप मिळाली. ती क्लिप मीच उचलायची तर मग हे मशीन कशाला ना? या असल्याचं कारणांनी आजवर तो घेतला नव्हता. असो. 
       शेवटी आणलाच आहे. आता तो आल्यापासून आमच्या घरात मी सोडून तीन वक्ती जरा जास्तच उत्साहात आहेत, कोण ते सांगायला नकोच. नवऱ्याने त्याचा लगेच फोनवर, वायफाय वर सेटअप केला तर मुलं स्वतःच तो उचलून उचलून त्यांना हव्या त्या ठिकाणी तो ठेवत आहेत. आपणच त्याच्या मागे फिरत कचरा उचलतो की नाही बघत आहेत. या सर्वात माझी चिडचिड एका गोष्टीवर होत आहे ती म्हणजे मुलांची त्या मशिनप्रती वागणूक. ते जणू आपल्या घरातील पाळीव प्राणीच आहे असं वागत आहेत. तेच कशाला काल मीही नवऱ्याला म्हणाले की,"त्याला आता तिकडच्या खोलीत नेऊन सोड'. आज मुलीने शाळेत सांगितलंही, आमच्याकडे नवीन 'पेट' आणलं आहे रुंबा नावाचं.

       नजीकच्या काळात रोबॉट, किंवा उत्तर देणारी मशिन्स, प्रोग्रॅम्स वाढलेत आणि ते वाढतच राहतील. हळूहळू त्यांची 'इंटरऍक्टिव्ह' असण्याची शक्ती वाढेल तसे लोकांशी बोलणं, वगैरे वाढत जाईल. आजवर काही बेसिक गोष्टी होत्या, उदा: पूर्वी अलार्म क्लॉक होतं, आता फोन किंवा मायक्रोवेव्ह सारखी उपकरणं असतात. त्यांच्याशी बोलणारे लोक पाहिलेत मी. आमचा मायक्रोवेव्ह किंवा वॊशिंग मशीन एकदा काम झालं की दर मिनिटाला ओरडत राहतो, मीही वैतागून 'गप रे !' म्हणते. हे बघून माझी मुलगीही एकदा अशीच सकाळी ओरडली होती मायक्रोवेव्ह वाजला तेव्हा. पुढे एका मित्रांकडे गेलो तर तिथे 'ऍलेक्सा' होती.ती म्हणजे, अमेझॉनचं तुमच्याशी बोलणारं मशीन. 'ऍलेक्सा, किती वाजलेत?' म्हटलं की ते सांगणार. मुलांनां सुरुवातीला त्याचं कौतुक वाटलं पण नंतर त्यांनी, 'अलेक्सा' म्हणून खेकसून बोलायला सुरुवात केली. खूप चिडले होते मी ते पाहून. 

      पुढे अशाच काही ठिकाणी अनुभव आले जिथे मशीनवर खेकसून बोललं जाताना पाहिलं. त्यामुळे ते घरात नकोच असं वाटलं. एकदा मुलाने मला विचारलं होतं,'आई व्हाय डू यु हेट सीरी? ती तुझ्यापेक्षा स्मार्ट आहे म्हणून का?" त्याला काय उत्तर द्यावं कळलं नाही. :) कारण माझ्यापेक्षा हुशार लोक मला आवडत नाहीत हे त्याने कुठून जाणलं असेल याचा विचार मी करत होते. :) असो. तर एकूणच आपल्याला उलट उत्तर न देणाऱ्या वस्तूवर, व्यक्तीवर वाढलेला उद्धटपणा मला अजिबातच आवडला नव्हता आणि नाहीये. हेच त्यांचं मी प्राण्यांच्या बाबतीतही पाहिलं आहे, बरीच मुलं पाळीव प्राणी हवाय म्हणतात पण घरी असल्यावर त्याला त्रासही देतात. किंवा ऑर्डर सोडल्यासारखे बोलतात,"डॉगी सिट!" वगैरे. हा उद्धटपणा वाढतच जातो कारण ते प्राणी उलटून उत्तर देत नाहीत. पुढे जाऊन सांगायचं तर घरात कामाला येणाऱ्या मावशी किंवा घरकामासाठी कायमस्वरुपी ज्यांच्याकडे लोक असतात त्यांची मुलं त्या लोकांशीही अशीच वागताना पाहिलीत. आम्हालाही मुलांना मावशींशी नीट बोलण्यासाठी रागवावे लागले आहे. आई-वडील घरातील एकाद्या मोठ्या व्यक्तीला मान देत नसतील तर मुलंही तशीच वागतात हेही पाहिलं आहे. 

       मुलं मोठी होईपर्यंत हे मशीन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेली उपकरणं वाढतच जाणार आहे.  लहान असताना, मोठ्यांशी आदराने वागायचं, उलट उत्तर द्यायचं नाही हे शिकवलं जायचं.आजच्या पिढीतल्या मुलांना या गोष्टी शिकवणं अजूनच अवघड जाणार आहे. व्यक्तीचा आदर, पाळीव प्राण्यांना योग्य वागणूक वगैरे तर शिकवावं लागेलच . शिवाय आता ही मशीन्सही. टेक्नॉलॉजि वापरु नये असं मी म्हणणार नाहीच, पण त्यातून मुलांवर होणारे संस्कार बदलत नाहीयेत ना हे नक्कीच पाहायला हवं. हे मीच नाही तर इथे अनेक लोकांचं निरीक्षण आहे. आपल्या घरात अशा गोष्टी आणतांना या सर्व गोष्टींची जाणीव आपण ठेवावी लागेल. मुलांच्या वागण्यात थोडाफार जरी फरक जाणवला तर योग्य तेंव्हा त्यांनाही त्या गोष्टींची जाणीव करुन दिली पाहिजे. असो. त्यासाठी मलाही आमच्या घरातल्या मायक्रोवेव्हवर ओरडणं बंद करायला लागेल. :) आणि तुम्हालाही 'प्लिज होल्ड द लाईन' म्हणणाऱ्या ऑटोमेटेड आवाजाला "नाही करणारा जा" म्हणणं बंद करावं लागेल. 

https://media.tenor.com/images/4f6c04229c827878f82c3b786ca31e9e/tenor.gif

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

1 comment:

Anonymous said...

Nice article...