सकाळी शार्प नऊ वाजता हॉटेलच्या एका कॉन्फरन्स रुममधे नाष्टा होता. सकाळी उठल्यावर ग्रुपवर पाहिलं तर दोन नवीन फोटो आले होते. गिऱ्या, वीरेन, प्रज्ञा आणि गार्गीचे पहाटे भुर्जी पावाचे. त्यावर अजून दोन चार जणांनीं रात्रीचे सेल्फी टाकले. त्यावर कमेंट सुरु झाल्या तशा अनिरुद्धने परत एकदा सर्वांना दटावलं,"चला आवरा, नाष्टयाला आले की बोलू", म्हणून. कॉन्फरंस रुममधे एकेक करुन सगळे साडेनऊ पर्यंत जमले. जे आले नव्हते त्यांना अनिरुद्धने स्वतः फोन करुन 'लवकर या' म्हणून झापलं होतं. गार्गी, प्रज्ञा पोचल्या तर त्यांच्यासाठी वीरेनने टेबलवर जागा पकडून ठेवली होती. तिथे बसल्यावर चौघांना एकदम 'देजा वू' सारखं काहीतरी झालं. चार वर्ष कँटीन, हॉटेल, बस, रिक्षा जिथे गरज लागली तिथे चौघांनी एकमेकांची जागा पकडून ठेवली होती. समोर एक मोठा पडदा होता त्यावर प्रोजेक्टर सुरु केला होता अनिरुद्धने. त्याने माईक हातात घेतला तसे,"मित्रहो!!" असे सगळे जण एकसुरात जोरात ओरडले आणि तो ओशाळला.
"याची मॉनिटर व्हायची हौस अजून गेली नाहीये", गिऱ्या हळूच बोलला.
" घाबरु नका, जास्त नाही बोलणारे मी. तुम्हा सर्वांकडून बोलून काही फोटो मागवून घेतले होते. कॉलेज सुरु झालं तेव्हा पासून आजपर्यंत म्हणजे साधारण २४ वर्ष झाली आपल्या सर्वांची ओळख होऊन. आपल्या वयाच्या निम्म्यापेक्षा जास्त वर्ष. आता मागे वळून त्या फोटोंकडे पाहताना कसं वाटेल म्हणून ते मागवले. आपल्याकडे प्रत्येकाकडे तेव्हा कॅमेरे तसे नव्हतेच, काही होते त्यांनी इमेज स्कॅन करुन पाठवल्या. घरुन मागून घेतल्या. ते सगळे फोटो एकत्र करुन त्यांचं प्रेझेंटेशन बनवलं आहे. एंजॉय!", म्हणून त्याने माईक खाली ठेवला आणि प्रेझेंटेशन सुरु केलं.
पहिल्या वर्षी त्यांची ट्रिप गेली होती त्यातले काही फोटो होते. प्रत्येक फोटोला त्याने चांगला अर्धा मिनिट गॅप ठेवला होता. मधेच स्लाईड थांबवून कोण कुठे दिसतोय यावर चर्चा चालू होती. मग प्रत्येकाचे प्रोजेक्टचे फोटो, कुणाचे गॅदरिंगचे फोटो, मुलींचे सारी-डे चे फोटो, कुणाच्या वाढदिवसाच्या पार्टीला असलेल्या ७-८ जणांचे फोटो, रुमवर एकमेकांच्या अंगावर पडून घेतलेले फोटो, असे येत राहिले. कुठले फोटो, कुठल्या वर्षीचे हेही आठवून झालं, कोण एखाद्या ग्रुप फोटोमध्ये का नव्हतं यावर बोलून झालं, त्यावरुन एखादं भांडणही झालं. पण एक मात्र होतं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं, २०-२४ वर्षापूर्वीचे आपण कसे होतो ते पाहून. सगळे मागे जाऊन परत आले होते. त्यात एक फोटो होता गार्गी, प्रज्ञाच्या ग्रुपसोबत अजयचा. तो पाहून एकदम सगळं पब्लिक शांत झालं.
पुढचा फोटो, होळीला अंगभर रंग माखलेला आल्याने सर्वजण सुटले. त्या होळीच्या फोटोत एकाचं म्हणून तोंड नीट दिसत नव्हतं. त्यादिवशी कुणाला किती रंग लावला, हॉस्टेलवर पाणी झालं म्हणून रेक्टर किती ओरडला यावरही बोलणं झालं. वीरेन-गिऱ्याला तर पोलीस पकडून घेऊन गेले होते रंगाची पोती गाडीवरुन घेऊन जात होते म्हणून. पोलिसांच्या गाडीत बसलेल्या गिऱ्याचा रडवेला चेहरा आठवून गार्गी हसू लागली, जोरजोरात.
"किती घाबरला होतास. तुझ्याऐवजी मीच जाऊन आले असते जेलमध्ये.", गार्गी बोलली.
"तू काय गं, डॅशिंगच होतीस. जाऊन आली असतीस तरी चाललं असतं. मेसवर जेवणही मिळालं नाही. किती भूक लागली होती माहितेय का?", गिऱ्या नाराजीने बोलला.
"मग ते बाहेर पडल्यावर दोन थाळ्या जेवण जेवलास ना?", प्रज्ञा हसून बोलली.
नाश्ता करुन पोट आणि मन दोन्हीही भरलं होतं. सगळे जण अनिरुद्धचे मनापासून आभार मानत होते. सर्वांचा पुन्हा एकदा ग्रुप फोटो काढून घेतला. सर्वांचे सेल्फी वगैरे काढून झाले, कुणाचे अपलोड झाले. जेवेपर्यंत ब्रेक होता मध्ये.
सगळे बाहेर पडले, कुणी खरेदी करणार होतं, कुणी अजून कुणाला भेटून येणार होते. प्रज्ञाला खरेदी करायची होती परत जायची, त्यामुळे ती आणि गार्गी खरेदीला जाणार होत्या. इतक्यात वीरेनने मागून हाक मारली तिला,"गार्गी". ती थांबली. प्रज्ञाने, "मी वर जाऊन पर्स घेऊन येते गं", म्हणून पटकन कल्टी दिली.
तो आणि गार्गी मग हॉटेलच्या लॉबीमध्ये एका टेबलजवळ जाऊन बसले.
"बहोत अच्छा लग रहा है.", वीरेन बोलला.
"I know, I am glad I came too!", ती बोलली.
"कैसी है तू?", त्याने विचारलं.
"ठीक हूं.", गार्गी.
"गार्गी, I am still your friend. You can talk to me.", वीरेन बोलला.
इतका जवळचा मित्र ज्याच्याजवळ आजतागायत तिने मन मोकळं केलं होतं. तिला एकदम भरुन आलं. मोठ्या मुश्किलीनं रडू आवरुन तिने सांगितलं, "I am done with him yaar".
"चल अच्छा है. अब तू अपनी जिंदगी अराम से जी बस. हम है ना, अब सब?", त्याने विश्वासाने तिला विचारलं.
ती डोळे पुसत 'हो' म्हणाली.
प्रज्ञा खाली आली आणि त्याला बाय करुन दोघी बाहेर निघाल्या.
"काय झालं, काय म्हणत होता तो?", तिने रिक्षात बसतांना विचारलं.
"तेच गं जे टाळत होते.", गार्गी.
"का पण? हे बघ तुला सांगू का तुम्ही ठरवलं ना तेंव्हाच मला माहित होतं असं काहीतरी होईल म्हणून. तू सांग आपल्या ग्रुपमध्ये कुणाला तरी तो ठीक वाटायचा का? आम्ही तुला बोलतोय असं वाटलं तर तू आम्हांला तोडायला निघालीस. मग शेवटी आम्हीच त्याला स्वीकारलं. पण मला कधीच नाही आवडला तो. किती शिष्ठ आहे. काल आल्यापासून फक्त 'हाय' केलं त्याने मला. तुझ्याशी बोलला तरी का?", प्रज्ञा आज स्पष्ट बोलत होती.
गार्गीने 'नाही' म्हणून मान हलवली.
"त्याचं स्वतःच्या विश्वात राहणं, तू अशी इतकी सोशल. शक्यच नव्हतं तुमचं जमणं.", ती म्हणाली.
"मी खूप प्रयत्न केले गं. आई-बाबा इथे, बाबांची तब्येत ठीक नव्हती. मला सारखं ये-जा करावं लागत होतं मुंबईतून. पण याची काहीच मदत नाही. मी म्हटलं त्याला इकडे शिफ्ट होऊया. तर म्हणाला, माझा भाऊ इथेच असतो. आई बाबा आहेत, तर का तिकडे जायचं?", गार्गीने शेवटी बोलायला सुरुवात केली.
"गेले दोन वर्ष मी प्रत्येक वीकेंडला ये-जा करत होते. तर शेवटी म्हणाला मला, 'मुलांकडे दुर्लक्ष करते' म्हणून. गरज होती तेंव्हा त्यांच्यासाठी घरी राहिले. आता त्याने नको बघायला थोडं? प्रत्येक वेळी मी पुण्याला येताना भांडण, परत गेलं कि भांडण. मध्ये एक महिना सलग इकडे राहावं लागलं तर इतके वाद झाले. मीही म्हटलं नाही येणार, काय करायचं ते कर. मुलांना घेऊनच इकडे येणार होते. पण त्यांची शाळा अशी मध्ये सोडताही येणार नाहीये. आज चार महिने झाले, फक्त मुलांशी बोलतेय. त्यांची एकदा परीक्षा झाली की भांडून त्यांना इकडे घेऊन येणार आहे. काल खूप इच्छा झाली होती त्यांच्याबद्दल विचारायची, पण परत उलट बोलला तर अजून नाटक झालं असतं लोकांसमोर. ज्याला काय म्हणायचं ते म्हणू दे. मी नाही बोलणार त्याच्याशी काही. ", गार्गीने निर्धार केला होता.
----------
अजय, अभ्या, दिपक रुमवर आले.
"मस्त होता ना शो. भारीय अन्या पण.",अभ्या बोलला.
"कसले फोटो होते एकेक. काय बावळट होतो आपण", दिपक हसून बोलला.
"चला रे मी आंघोळ करुन येतो, अन्याने मला बोलायला सांगितलं आहे दुपारी", अजय म्हणाला.
"तू काय बोलणारेस?", अभ्यानं विचारलं.
"माझे अनुभव नोकरीतले", अजयने सांगितले.
"तुम्ही काय बाबा मोठी माणसं. व्हीपी, बीपी.", अभ्या म्हणाला.
"ते जाऊ दे रे. तू आधी बस आणि सांग तुझं आणि गार्गीच काय चाललंय? अभ्या तू पण सांग रे याला. नुसता विचार करत बसलाय. ", दिपकने मूळ मुद्द्याला हात घातला.
"काही नाही रे. तिचं म्हणणं आम्ही इकडे पुण्याला येऊन राहावं. तिचे आईबाबा इथेच असतात. गेली दोन वर्ष झाली हेच नाटक चाललंय. सारखी ती आपली इकडे पळते. मी तिच्या माघारी मुलांना सांभाळतो. मध्ये तर सरळ महिनाभर तिकडे जाऊन राहिली. इथे पोरांची परीक्षा आहे, आजारी पडलेयत, काही नाही त्याचं.", अजय वैतागून बोलला.
"घराचं कर्ज घेतलेलं. त्यात हिचे इतके हेलपाटे, त्यामुळे तिचीही नोकरी थाऱ्यावर नाही. मधे तर घरात इतका गोंधळ चाललेला, माझीच नोकरी गेली असती. जरा वर चढायला लागलं की बाकी लोकांना त्रास होतो. माझी धावपळ होतेय बघून काड्या टाकतात. हिला समजायला नको का थोडं तरी? जातीस तर जा म्हंटलं. काल पण बघ की पोरांबद्दल एका शब्दाने तरी बोलली का? ते बिचारे रोज विचारतात तिला कधी येणार म्हणून, ही रोज नवीन तारीख सांगणार. म्हटलं नकोच येऊस. ", अजय रागाने बोलला.
दिपक विचार करत होता.
"तुला आम्ही सांगितलं तर पटलं नसतं तेव्हा. पण ती अशीच आहे अरे, हट्टी. तू इतका वेद झाला होतास तेव्हा प्रेमात की आम्ही 'नाही' म्हटलं तरी ऐकलं नसतास. शेवटी गप्प बसलो आम्हीही. ", अभ्या म्हणाला.
"जाऊ दे रे, उगाच नको तो विषय. हे बघ अज्या नीट विचार करुन काय ते कर. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस असा. मी काही तिच्या इतका जवळ नव्हतो कधी त्यामुळे तिच्याशी तसा बोलू शकत नाही. तू बघ इथे आहेस तर बोलून." दिपक त्याला समजावत होता.
"ती नाही ऐकणार रे. मघाशी पण त्या वीरेनच्या टेबलवर बसली होती. यायचं होतं ना आपल्या टेबलावर.", अजय म्हणाला.
"आता त्यांचा ग्रुपच आहे ना तो. पण तुमच्या लग्नाला किती मारामारी केली होती आम्ही. कसलं टेन्शन तिच्या बाबांशी बोलतांना. तुझी तर फाटली होती. आम्ही होतो म्हणून वाचलास, नाहीतर मारच खाल्ला असतास त्यादिवशी. ", अभ्या हसत म्हणाला.
"हो बरका. आम्हाला ढाल बनवून गेला होतास त्या दिवशी. ", दिपकलाही तो प्रसंग तसाच्या तसा आठवत होता.
अजयही ते आठवून थोडं हसला. त्याला हसताना पाहून बरं वाटलं दोघांना.
"अरे पण तिचे आई बाबा कुठे गावात राहायचे ना? मग इकडे कसे आले?", दिपकने विचारलं.
"तिच्या भावाने घर घेतलं आहे इथे, तेव्हा आले. पण तो आता गेला ऑनसाईटला. ते इथेच आहेत. ", अजयने सांगितलं.
"तिचा तो छोटा भाऊ का रे? आपल्या रुमवर आला होता ना एकदा?", अभ्याने विचारलं.
"हो तोच. ", अजय.
"कसला बावळट होता रे तो. तू फुल त्याला अगदी लहान बाळासारखा सांभाळत होतास. मी तर म्हणत होतो त्याची रॅगिंग घेऊ, तर नको म्हणालास. ", अभ्याने आठवण करुन दिली.
"हो ना, चांगली मजा घेतली असती. बरं तो नाही का परत येणार इकडे मग?",दिपक बोलला.
"माहित नाही रे मला त्याचं काय आहे ते. मी काही कुणाशी बोलत नाही त्यावर. ", अजय बोलला आणि आंघोळीला जायला निघाला.
तो बाथरुममध्ये गेला आणि दोघे अभ्याला फुंकायचं होतं म्हणून ते दोघे बाहेर पडले.
क्रमश:
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
No comments:
Post a Comment