Tuesday, February 13, 2018

पेन-प्रेम

    काल संध्याकाळी एका अपॉइंटमेंट नंतर नवऱ्याची वाट बघावी लागणार होती. मग शेजारीच असलेल्या मेडिकल स्टोअर मध्ये गेले. इथले मेडिकल स्टोअर म्हणजे अख्खा बिग बझारच म्हटले पाहिजे. कॉस्मेटिकपासून दूध,ब्रेड अंडी आणि शिवाय औषधे असं सर्वच मिळतं. असो. त्या दुकानात गेले तर व्हॅलण्टाइन डे चे मोठाले बुके समोरच मांडलेले होते. त्याच्यापलीकडे मग ग्रीटिंग्ज वगैरे. आता या सगळ्या वस्तूत मन रमत नाही. त्या पलीकडे होती ती स्टेशनरी. आजपर्यंत डॉलर स्टोअर पासून आर्टस् स्टोअर पर्यंत सर्व ठिकाणाहून सर्व प्रकारचे पेन, पेन्सिल, रंग, कॅनवास उचलून आणल्या आहेत. तरीही पेन, पेन्सिल, रंगीत स्केचपेन असं दिसायला लागलं की मी तिथंच थांबते. त्यात मी एकटीच होते दुकानात, सोबत मुलं नाहीत म्हणजे अजून निवांतपणे बघायला मिळालं.
       तिथेच मला दिसलं,"फाऊंटन पेन". त्यासोबत रिफिलची नळीही होती. एक उचलून घेतला. त्या आनंदात असतानाच मला अजून एक पेन दिसलं,"Pilot" लिहिलेलं. त्या पॅकेटमध्ये दोन पेन होते. मग तेही एक घेतलं. नवरा पोहोचला आणि मला निघावं लागलं. मुलांच्या क्लासला जायचं होतं. तर वाटलं, आता कधी मिळणार हे पेन उघडायला?  मग त्यांच्या क्लासच्या बाहेरच एक पेपर घेतला आणि ते फाऊंटन पेनचं पाकीट उघडलं. त्या पेनमध्ये शाई घालण्यासाठी काही नव्हतं. ती शाई असलेली नळी फक्त पेनात बसवायची. नळी बसवून थोडं झटकायची सूचना दिली होती पाकिटावर. मी आपलं नाजूक हातानी झटकत होते, नवऱ्याने मस्त जोरात झटकला आणि 'हे घे' म्हणून हातात दिला. पेनातून शाई कागदावर उतरली आणि कित्येक वर्षाच्या आठवणी जाग्या झाल्या. :)  
      तिसरीत असताना आई रोज पुस्तकातलं एक पान वहीत लिहायला सांगायची. आता मुलांची अक्षरं पाहता, तिने तसं का केलं असावं याचा अंदाज येतो. तेव्हा राग यायचा कधी कधी, पण एकदा तंद्री लागली की उगाच लिहीतही बसायचे. शाळेत असताना पेन्सिल जाऊन पेनने लिहायला कधी सुरुवात झाली ते आठवत नाही. पण हे नक्की आठवतं की शाईपेनची सुरुवात साधारण सातवीत झाली. आजोबांनी घेऊन दिलेलं. मोठं जाड शाईपेन मिळायचं ना, तसलं. खूप भारी वाटायचं. शाळेत जाताना पेनात शाई आहे ना हे पाहणं एक महत्वाचं काम होतं. नाहीतर ऐनवेळी शाई संपली की लोकांकडून उधार पेन मागावे लागायचे, तेही मिळाले नाहीत तर बसा तसेच. तर शाई भरण्यासाठीचे स्किल येण्यासाठीही बराच काळ गेला. ते ड्रॉपरने शाई भरून हात खराब न होऊ देणे फार जिकिरीचं काम होतं. शाईपेनने लिहिण्याची सवय लागल्यावर बाकी सर्व पेन फिके वाटू लागले होते. अगदी बाकी सर्वांकडे रेनॉल्डचे पेन आले ना तेव्हाही. फक्त एक प्रॉब्लेम होता, काही कागदांवर शाई पसरायची. मग त्यासाठी खास रेनॉल्डचे पेन वापरायचे. त्यातही ती नळी संपली की परत उधारी आलीच.
      मला आवडायचं ते रात्री कधी लाईट गेली तर मेणबत्तीच्या उजेडात शाईपेनाने लिहिताना, चमकणारी अक्षरे. उगाचच एरवीपेक्षा जास्त सुंदर वाटायचं अक्षर. माझ्या वडिलांची त्यांच्या शाळेतील एक छोटी डायरी तेव्हा आम्हाला मिळाली होती, त्यात त्यांचे सुंदर अक्षरांत लिहिलेले सुविचार वगैरे होते. ते पाहिलं की आपणही असंच अक्षर काढावं असं वाटायचं. तर त्यांनी ते बहुदा बोरुच्या पेनाने लिहिले होते. म्हणजे लाकडी कोरीव टोक असलेली  लाकडी लेखणी. अनेकदा मग तसेच पेन बनवून लिहिण्याचाही प्रयत्न केला होता. एकूण काय तर ते शाईपेनवरचं प्रेम फारच. आठवीत असताना एक माझा आवडता पेन हरवला आणि कित्येक महिने सापडला नाही. नवीन पेन आणला तरी त्या जुन्या पेनची आठवण यायची. तो परत सापडला पण त्यातली शाई सुकल्यामुळे त्याचे निब गंजले होते. मग पुन्हा तो कधी पूर्वीसारखा लिहिता झाला नाही. असो.
     कॅम्लिनचे जाड मोठे निब असलेले पेनने लिहिणे म्हणजे कसरतच असायची. निब तुटले की ते आणून पुन्हा बसवणे हेही अवघड काम. त्यात हात खराब होणे ठरलेलं. मग एखादा चुकून ड्रेसला लागला तर झालंच. शिवाय शाई पेनाच्या टोकापर्यंत येण्यासाठी कितीतरी वेळा झटकावा लागायचा. असेच अनेकदा पेन झटकून शेजारच्या मुलं-मुलींच्या अंगावर शाई उडाली आहे. निबच्या आजूबाजूला कधी घाण अडकत असे, (कदाचित कागदाची असावी, माहित नाही), तर ती काढण्यासाठी वडलांच्या दाढीच्या ब्लेडचा वापर सर्रास व्हायचा. आता विचार केला तर किती मोठं 'सेफ्टी हॅझार्ड' होतं ते. असो. तेव्हा ते कधी वाटलं नाही. पुढे ते कॅम्लिनच्या मोठ्या निबचे पेनच्या जागी एकदम फक्त टोक दिसणारे, बाहेरून छान चकचकीत असलेले हिरोचे शाईपेन आले. त्यात शाई भरणेही सोपं होतं. पेनाच्या आतली नाली फक्त शाईच्या बाटलीत घालून ड्रॉपरसारखी वापरायची. सोपं काम होतं. त्यातही मला माझ्यापेक्षा माझ्याएका मैत्रिणीचं अक्षर तसल्या पेनाने छान येतं असं वाटायचं. आजही तिचं ते पेन आणि अक्षर आठवतं. दहावीच्या परीक्षेच्या वेळी वडिलांनी पायलट पेन घेऊन दिला. क्रीम कलरचा पेन, एकदम टोकदार असलेली निब आणि त्यातून येणारं सुरेख अक्षर.आवडलं होतं तेही. १०-१२ चे पेपर त्यानेच लिहिले. मधेच सोबतीला शाईपेन असायचंही.
       शाळेत असताना अनेकदा वाटायचं, मैत्रिणीसारखं पेन असेल तर आपलं अक्षर किती भारी येईल. तिच्या पेनाचा आणि अक्षराचा हेवा वाटायचा. आजही त्या सर्व मैत्रिणीचं अक्षर ही त्यांची डोक्यात बसलेली एक जुनी ओळख आहे. तेव्हा एक पेन असताना दुसरा मागणं म्हणजे 'उधळपट्टी' होती. पोरं इकडे तिकडे वाटेल तसे पेन पेन्सिल टाकताना पाहिलं की आई-वडिलांचा व्हायचा तसाच माझाही संताप होतो. वडिलांच्या, आजोबांच्या पेनाला हात लावण्यास मनाई होती. काल नवीन पेन आणल्यावर मुलाने हात लावला, आणि मीही त्याला ताकीद दिली,"माझ्या पेनला हात लावलास तर बघ'. :) चित्र रंगवण्यासाठी म्हणून काही रंगीत जेलपेन घेऊन आलेय तेही मुलांनी एकेक करुन वापरायला सुरुवात केली आणि मग ते इकडे तिकडे पडू लागले. तेव्हा कळू लागलं की मोठ्यांच्या पेनांना हात लावायची मनाई का होती. :)
       कविता,प्रेमपत्रं वगैरे लिहीपर्यंत नियमितपणे पेन वापरला जायचा. मध्ये अनेक वर्षं ते बंद झालं होतं. दीडेक वर्षांपूर्वी पेनाने कविता एका डायरीत लिहायला सुरुवात केलीय आणि तेव्हापासून हे पेन-प्रेम पुन्हा  बळावत आहे. अगदी काहीवेळा छान लिहितेय म्हणून एखाद्या कॉन्फरन्सला देतात ते पेनही घरी घेऊन आलेय आणि अजूनही कधीमधी त्याने लिहिते. हात पूर्वीसारखा वळत नाहीये, तरीही इच्छा जात नाही. काल पायलट पेन आणि शाईपेन दोन्हीही एका दुकानात मिळाले तर इतकं भारी वाटलं. कालच लगेच कॅम्लिनचे होते तशा पेनचीही ऑर्डर दिली. पूर्वी एखादा पेन घ्यायची इच्छा असताना घेता यायचा नाही, आता परवडते तर का नाही घ्यायचे? काही दिवसांपूर्वी एक पेन हरवला आहे, घरातच, पण तो सापडत नाही म्हणून बेचैन व्हायला होतं. अशावेळी वाटतं की अजूनही पूर्वीचं काहीतरी आहे माझ्यात. कदाचित सर्वच काम लॅपटॉप वर असल्याने मला  पेनचं आकर्षण वाटत असावं. बाकी क्षेत्रातील लोक अजूनही वापरत असतीलच की पेन. असो. उगाच नॉस्टॅल्जीक पोस्ट लिहायच्या नाहीत असं ठरवलं तरी, काल पेन पाहून जे वाटलं ते शब्दातीत होतं. त्यामुळे सगळं उतरवून काढलं आणि त्यांचे फोटोही शोधून पाहिले. हे काही डाऊन्लोड केलेले फोटो. 
आणि हो, ते हँडमेड पेपर, डायऱ्या, रंगीत कागद यांच्यावर पुन्हा कधीतरी. :) 


विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: