Wednesday, April 11, 2018

बॉस्टन

आजूबाजूला पाहिलं की जाणवतं सगळं रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्हला मराठी शब्द आठवत नाहीये आज. तर म्हणत होते, रिलेटिव्ह म्हणजे काय, की प्रत्येक वस्तू, व्यक्ती, जागा, यांत खरं काय असतं? समजा, समोर संत्रं धरलं, आंबा धरु, आजकाल पुण्यात आंब्याचे जोक खूप एक्स्पोर्ट होऊन इकडे येत आहेत. तर एक आंबा हातात धरुन म्हटलं की 'हा आंबा आहे' . ते सत्य. पण ती वस्तुस्थिती सोडली तर बाकी सगळं संदर्भावर असतं. त्याचे गुणधर्म वगैरे ठीक आहे. पण तो कधी खाल्ला, कुणासोबत खाल्ला, त्याने काय झालं याच्या गमती जमती यात सगळं असतं, नाही का? 
        गेल्या १४ वर्षात वेगवेगळे देश आणि तिथली शहरं पाहिली. काही जवळून तर काही दुरूनच. गेले तीन वर्षं झाली मुक्काम बॉस्टनमध्ये आहे. खरंतर पुण्यात दोन वर्षं राहून इकडे आल्यावर सुरुवातीला इथलं काहीच आवडत नव्हतं. ऑफिससाठी रोज करावा लागणारा लांबचा प्रवास, बस-ट्रेनमधून जाणे, त्यासाठी होणारी पळापळ, त्यात थंडीत बर्फ आणि उन्हाळ्यात दमट वातावरण. एकूणच कंटाळवाणं वाटायचं. मध्ये थोडे दिवस घराजवळच ऑफिसला जात होते. आता सोमवारपासून नवीन नोकरी सुरु झाली. पुन्हा एकदा बॉस्टन डाउनटाउनला जायला सुरुवात केली आणि खूप काही जाणवलं. एखादं शहर आपल्याला आपलंसं कधी करुन घेतं कळत नाही, खरंच.
         सोमवारी सकाळी मुलांना शाळेत सोडून स्टेशनकडे जायला निघालो आणि नेहमीच्या गर्दीची जाणीव झाली. त्यातून काढायचा रस्ता, डोळ्यांवर येणारं ऊन आणि एकाच ठिकाणावरुन दिसणारी बॉस्टनची स्कायलाईन. ट्रेनमध्ये बसण्यासाठी जिन्यावरुन पळत जाणं. तिथेच कुठलं ना कुठलं वाद्य वाजवत असलेला माणूस. ट्रेनच्या अनाऊन्समेंट आणि आत बसल्यावर तिथले सीट, त्यांच्यावर बसणारे लोक, त्यांचे निरनिराळे वास, त्यांच्या हातातील फोन्स, कानाला लावलेल्या वायरी, हातातले पेपर, किंडल्स, पुस्तकं तर कुणाच्या हातात कधीतरी दिसणारं भरतकाम-विणकामही. आपणही मग आपल्या कानांत गाणी अडकवून बसणं, पायात बॅग, डब्याची पिशवी सांभाळणं. हे सगळं सोमवारच्या एका दिवसांत डोळ्यांसमोर आलं. 
         सगळ्यांत महत्वाचं म्हणजे एका स्टेशनवरुन दिसणारी केम्ब्रिज आणि बॉस्टनची स्कायलाईन. १६०० साली कधीतरी ब्रिटिशांनी हे गाव वसवलं. त्याच्याशेजारचेच केम्ब्रिजही. या दोन शहरांना वेगळं करते ती मध्ये असलेली चार्ल्स नदी. नदीवरच्या पुलावरुन ट्रेन जाताना दोन्ही बाजूला ही शहरं दिसतात. त्या स्टेशनवर आल्यावर आपण इतके दिवस काय मिस करत होतो हे जाणवलं आणि तो व्ह्यू पाहून दिवस सुखावला एकदम. पुलावरच बाजूला पादचारी मार्ग आणि गाड्यांचाही रस्ता आहे. त्या पादचारी मार्गावरुन हमखास कुणी ना कुणी पळत असतंच. ते आणखी एक खास वैशिष्ट्य. कितीही थंडी, पाऊस असो असा पळतांना कुणी पाहिला की आपणही पळायची इच्छा होते. इथे आल्यापासून अनेकदा, बर्फ, थंडीमध्ये लोकांना बाहेर पळतांना पाहिलंय. कदाचित त्यामुळेही हे शहर जास्त आवडलं असेल. जिथे तिथे दिसणारे पार्क्स आणि त्यातून पळणारे लोक. असो. 
        स्टेशनमधून बाहेर पडल्यावरही बॉस्टन कॉमन्सचं पार्क किंवा ठराविक साच्यातल्या जुन्या इमारती, त्यांत असलेली छोटी छोटी रेस्टॉरंट्स आणि ऑफिसच्या कपड्यांमध्ये झपाझप एका वेगाने जाणारी गर्दी. त्यातून येणारे कॉफीचे वास. हे सगळं पाहून सकाळचा आपलाही वेग आपोआप वाढतो. हीच गर्दी दुपारी निरनिराळ्या फूड ट्रक्सवर जेवताना दिसते. ते फूड ट्रक्सही खासच, रोज वेगवेगळे. कधी कधी ऑफिसमध्ये असताना दुपारी मी उगाच खिडकीतून बाहेर बघत बसायचे, अजूनही बसते. या शहराचं रूप बघायला. ऊन, बर्फात तर कधी पावसांत. प्रत्येकवेळी निराळं. 
         तर हे असं सगळं रिलेटिव्ह. 'बॉस्टन' नावाचं एक शहर आहे ही वस्तुस्तिथी झाली. पण त्यातून मला काय दिसतं, वाटतं, त्या काळात मी कुठलं गाणं ऐकते, कुठे बसून मी काय जेवते, तिथे कोण माझे मित्र मैत्रिणी आहेत, तिथल्या थंडीत कुठले कपडे घालते, इथे राहताना मी कुठल्या महत्वाच्या घटनांतून जाते आणि हे सगळं करत असताना हे शहर मला कसं दिसतं यावर माझ्यासाठी 'बॉस्टन' म्हणजे काय ते ठरतं. अर्थात प्रत्येक गावाचं तसंच असतं म्हणा, आज या निमित्ताने तेही लक्षात झालं. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

1 comment:

Anonymous said...

Hi...relative cha Marathi Shabd sapeksh asa ahe.... Chhan...keep it up...