Saturday, April 14, 2018

स्विमिंग

     आज या सिझनची पहिली रेस, ५K. माझी नाही, मी बरी असते तर माझीही. संदीप गेला रेसला, कधीतरी पहाटे एकटाच. आणि इतक्या दिवसांत आपल्याला पळता येत नसल्याचा सर्वात जास्त त्रास झाला. आयुष्यात काय गमावलं हे कळलं की जास्त त्रास होतो. तर एरवी आम्ही दोघेही जाणार असू तर ही रेस म्हणजे नुसतं पळणं नसतं. आदल्या दिवशी ठरवून ठराविक एक भाजी, पोळी, वरण भात जेवायला बनवणं, रेसचे बिब उद्या घालायच्या कापडयांना लावून ठेवणं, मुलांचं काय करायचं त्यानुसार त्यांना कुणाकडे सोडून येणं आणि तिथे रेसच्या जागेपर्यंत पोहोचणं हाच एक मोठा प्रवास आणि प्रत्येकाने एकदा तरी घ्यावाच असा अनुभव असतो. हे सगळं करु शकत नाहीये याचं वाईट वाटतंय. बाहेर हजारो लोक पळत असतील आता. संदीप पळायला गेला आणि मी घरात निवांत झोपलीय, यात काय मजा? असो. 
         गेल्या काही दिवसात बाहेरची थंडी कमी व्हायला लागली आणि माझ्या पायाला खाज सुटायला लागली. बाहेर पळणारे लोक पाहून आपणही क्षणात शूज घालून, जोरात पळत सुटावं असं वाटू लागलं. जीव तोडून, धाप लागेपर्यंत, श्वास थांबेपर्यंत  पळावं वाटू लागलं. पण तीन महिन्यापूर्वीची अजून एक गोष्ट आठवली. जेव्हा काहीच जमत नव्हतं, तेव्हा वाटायचं 'फक्त नीट चालता येऊ दे'. बाकी काही नाही जमलं तरी चालेल. पण मग मिळालंय त्यात समाधान मानलं तर माणूस काय ना? असो, हाफ मॅरॅथॉन नाही तर निदान १० किमी तरी नक्की जाईन पुढच्या वर्षीपर्यंत असं ठरवलंय. बघू काय होतं. 
          या दरम्यान अजून एक गोष्ट सुरु झाली. डॉक्टरांनी पाठीसाठी पोहायला जायला सांगितले. मी पोहायला वयाच्या २६ नंतर शिकले. गावात कधी शिकायचं प्रश्नच आला नाही. जेव्हा शिकले तेव्हाही खूप काही चांगलं येत नव्हतंच. मग पुण्यात असताना एका ठिकाणी क्लास लावला. रोज सकाळी ५.३० चा क्लास. एकतर उठणं अवघड आणि त्यात जाऊन थंड पाण्यात डुंबायचं म्हणजे अजून चिडचिड. पण सलग २१ दिवस एकही क्लास न बुडवता जेव्हा तिथे गेले तेव्हा पोहायला येण्यापेक्षा आपण रोज तिथे पोहोचलो याचंच कौतुक जास्त होतं. तर पोहायला पुण्यात परत शिकले. मजा आली होती. 
        त्या शिकण्याचा आता फायदा झाला. खूप भारी नाही निदान कामापुरतं तरंगता येतं. पाठीच्या सर्जरीनंतर पायातली ताकद जवळजवळ गेलीच होती. एरवी १० किलोमीटर निवांत पळू शकणारी मी १ किमी नंतरच दमत होते. साधं चालताही येत नव्हतं इतकं सलग. त्यामुळे परत पायातली ताकद वाढवण्यासाठी पोहायला जात आहे गेले काही दिवस. आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे, केवळ पळणंच असं नाही, मला हे पोहोतानाही खूप भारी वाटत होतं. दोन-तीन वेळा वॉटर ऐरोबिक्स च्या क्लासला गेले होते. सगळ्या ६० वर्षाच्या पुढील स्त्रिया तिथे होत्या. त्या क्लासमध्येही खूप मजा आली होती. एकतर मोठ्याने लावलेली गाणी आणि त्या आवाजात केलेला व्यायाम. आणि सर्वात मुख्य म्हणजे घरात सोफ्यावर बसून टीव्ही न बघता आणि इथे चार लोकांसोबत येऊन त्या ग्रुपचा एक हिस्सा बनलोय हे जास्त आवडलं होतं. 
        पहिल्या आठवड्यात पायाची वाट लागली होती. अगदी साधे व्यायाम केले पोहोण्याचे तरी पायांना ते झेपत नव्हतं. हळूहळू करत पायांची हालचाल वाढली, अंतर वाढवत आता पूर्ण लॅप सलग पोहता येऊ लागलंय. धाप लागते, हात पाय दुखतात, घरी आल्यावर दमायला होतं. पण आपण तिथे जातोय आणि जे काही आपल्याला जमत नाहीये त्यासाठी प्रयत्न करत राहतोय ही कल्पना खूप भारी वाटते. रोज काहीतरी नवीन ध्येय असतं पुढे पोहचण्याचं. आणि ते पार पडलं की आपण जग जिंकल्याचा आनंद होतो. याच पोहोण्यातून बरं होऊन परत पळायला लागायचंय. आपल्या त्रासाच्या दिवसांत याच स्विमिंगने मदत केली होती हे विसरणार नाही. :) बरेच दिवस लिहायचं होतं. आज रेसच्या निमित्ताने जमलं. :) 
तुमचं रोजचं ध्येय काय असतं? 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

1 comment:

Anonymous said...

Ase kadhi na kadhi ghadatech...
har ghadi badal rahi hai rup jindagi !!
Je karatiyes te netane ani anandane ! wachun hi manala ubhari aali, tula te karatana nakkich te watat asel !

Anek shubhechha!
Anagha