Wednesday, June 06, 2018

आज पुन्हा एकदा

        लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी नवऱ्यासाठी कौतुकाने एक कीबोर्ड विकत घेतला. वाटलं त्याला गिटार शिकायची होती, ते जमलं नाही, हे तरी शिकेल. आपण किती बावळट होतो हे पुढे गेल्यावरच कळतं, नाही का? पुढची १२ वर्षं तो कीबोर्ड सर्व ठिकाणी आमच्यासोबत फिरत राहिला आणि शेवटी यावर्षी स्वनिकने शिकायला सुरुवात केल्यावर त्याला मुहूर्त लागला. नवरा नाही निदान पोराने तरी हौस पूर्ण केली असं वाटलं. आमच्या घरात मला असलेली गाण्यांची आवड आणि तितकीच नवऱ्याची उदासीनता. त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की पोरांकडे गाण्याचे काही गुण आले तर ते माझ्याकडूनच येतील. यात माझा ओव्हरकॉन्फिडन्स कारण आहेच. :) असो. 
        आता हे सर्व सांगायचं कारण म्हणजे आज त्याच्या पियानोच्या क्लासमध्ये गेले. चारच पोरं. तिथे शिकवणाऱ्या शिक्षिका वयस्कर आणि तरीही अतिशय उत्साही आहेत. पोरांसोबत आईवडीलांनाही कामाला लावतात. मुलं वाजवत असताना पालकांनाही समोरच्या शीटमध्ये प्रत्येक नोटवर बोट ठेवायला सांगितलं. आता गेले तीन महिन्यात पहिल्यांदाच जात असल्याने मला त्यातलं काहीही कळत नव्हतं. एकदा तर बाकी मुलं पुढे गेली तरी मी चुकीचेच नोट्स स्वनिकला दाखवत होते. :) तो चिडलाच. इतके दिवस त्याच्यासोबत बाबा येत असल्याने त्या दोघांना सर्व माहित झालेलं, काय कसं करायचं. आणि माझी पाटी कोरीच. आणि इथेच माझ्या अजून एका विश्वासाला तडा गेला. मला कितीही आवड असली तरी त्याचा सराव वगैरे यात माझा भाग नव्हताच त्यामुळे मला कितीही संगीत आवडलं तरी त्याच्या त्या शिकण्यात काहीही मदत करू शकत नव्हते.
        हेच नाही अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे मला एक पालक म्हणून मी आपल्या मुलांना काय चांगलं देईन याचा मला विश्वास होता आणि त्याला वेळोवेळी तडा गेला आहे. अगदी घरी बाबा आणि आजोबा शिक्षक होते त्यामुळे मलाही वाटायचं की आमच्या मुलांचा अभ्यास मीच घेईन. पण पोरांना एकेक गोष्ट शिकवेपर्यंत माझा संयम संपून जातो. तिथेच  नवऱ्याचा संयम कामी येतो. अगदी स्वयंपाक करतानाही वाटतं की मुलांना चांगलं शिकवेन बारीक सारीक गोष्टी, चव, वास, अशा अनेक गोष्टी. पण वेळ येते तेव्हा माझे नियम नडतात. हे असंच करायचं, हे तसंच करायचं. आणि शिकवायचं सोडून मीच पटकन बनवून घेते. 
        हे असे किस्से झाले की मला प्रश्न पडतो की आपण आपल्याबद्दल अनेक मत बनवून ठेवलेली असतात. अगदी आपल्याला काय चांगलं येतं आणि आपण काय चांगलं शिकवू शकतो याबाबतीतही. त्या गोष्टी प्रत्यक्षात येताना मात्र काही वेगळंच चित्र असतं. मग त्या अशा क्षणी  मागं जाऊन आपल्या मतांबद्दल विचार करणं गरजेचं होतं. आणि स्वतःबद्दलही. आज पुन्हा एकदा तो प्रश्न पडलाय.

विद्या भुतकर.