Tuesday, December 03, 2019

दों प्रकार के लोग

       इस दुनियामें दों प्रकार के लोग होते हैं ! असं म्हणून लोकांचे कितीतरी प्रकार आजवर ऐकलेत. तसे मला विचाराल तर माझ्याकडेच हजारेक प्रकार सांगता येतील. म्हणजे, परीक्षेच्या वेळी रात्री जागून अभ्यास करणारे, तर काही पहाटे उठणारे. खरेदीला गेल्यावर पटकन दोन चार वस्तू घेऊन टाकणारे तर तासंतास घेऊन एकही कपडा न निवडणारे. कसंही जेवायला दिलं तरी आनंदाने खाणारे(नवऱ्यासारखे), तर माझ्यासारखे चार वेळा गरम करावं लागलं तरी मनाला हवं तसंच खाणारे. असो तर एकूण काय की असे अनेक प्रकार. या दिवाळीत फराळ करताना लक्षांत आलं या जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक शब्दश: रेसिपी आहे तशीच अंमलात आणून पदार्थ बनवणारे आणि दुसरे माझ्यासारखे नको तिथं स्वतःचं डोकं लावणारे. 
           दर दिवाळीत फराळ बनवायला सुरुवात केली की मी सर्व रेसिपीज बघून घेते. नव्याने ठरवते की यावेळी जसं लिहिलंय तसंच डिट्टो करायचं. पण होतं काय रव्याच्या लाडूंचं अगदी एक दोन वाट्यांचंच माप दिलेलं असतं. मला वाटतं अरे इतके कमी कसे करणार. मग तेच माप मी चारपट वाढवते. प्रमाण वाढवलं की त्यात साखरही एकदम ८ कप वगैरे होते. आता एकदम आठ कप साखर टाकायला नको वाटतं. त्यामुळे जे काही प्रमाण दिलंय त्याच्यात मी थोडी काटछाट करते. त्यामुळे मग पाक पातळ होणार किंवा कमी तरी होणार. असं करुन त्या लाडवांचं बिनसतंच. मग वैतागून मी आईला फोन करते. आईच्या हातचे रव्याचे लाडू म्हणजे एक नंबर. आई मात्र तिच्या ठरलेल्या वाट्यांचं प्रमाण मला सांगते. आणि माझी अजूनच चिडचिड होते. ते मापाने केलं असतं तर कशाला ना? रव्याचे लाडूच कशाला? बाकीच्या फराळाची पण तीच गत असते. चकली, चिवडा, शंकरपाळ्या. माझ्या दोनेक वर्षांपूर्वीच्या माझ्या चुकलेल्या शंकरपाळ्यांवर मला अनेक सूचना आल्या होत्या कमेंटमध्ये. पण मी ऐकेल तर ना? अनेक मैत्रिणी इतका छान फराळ बनवतात. कसं बनवतेस म्हटलं की डायरेक्त प्रमाणच सांगायला लागतात. आता त्यांना काय बोलणार? 
          फराळाचं जाऊ दे, माझ्या आईची ३० वर्षांपूर्वीची केकची रेसिपीही अजून तीच आहे. त्याच मापाने, त्याच भांड्यात, त्याच चवीचा भारी केक बनतो, अगदी जसा आमच्या प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी बनायचा तसाच. हे माप प्रकरण बेकिंगच्या बाबतीत अजून जास्त त्रासाचं. मला अनेकदा ते पावभाजीचे पाव बनवून बघायचे होते. दरवेळी मी उत्साहाने सुरु करणार, मग त्यात बटर/यीस्ट काहीतरी कमी जास्त होणार. किंवा ते किती वेळ ठेवायचं वगैरे चुकणार. असं करुन मी तीन चार वेळा ते कणकेचे गोळे फेकून दिले. पण हे असं इतक्या वेळा चुकल्यावर एकदम रागाने मी अगदी दिलीय तशीच रेसिपी बघून केले आणि चक्क झाले ना राव, पाव ! लई भारी वाटलं. पण त्याचवेळी दोन डॉलरच्या पावसाठी मी इतका वेळ आणि कष्ट घालवू शकत नाही असंही वाटलं. चांगले पाव बनवल्याची ती पहिली आणि शेवटची वेळ. तर मुद्दा काय की हे बेकिंग वगैरे मधे खासकरुन दिलेलं प्रमाण आणि कृती जास्तच मन लावून पाळावी लागते. 
         लहानपणी आईला विचारलं मिठाचं प्रमाण सांग वगैरे तर म्हणायची मला नाही सांगता येत, अंदाजाने घालायचं. हे अंदाजपंचे धागोदर्शे कसं करायचं हे अनेक वर्षं कळलं नाही. पण आता सान्वी तेच प्रश्न विचारते आणि कळतं की एखादी रेसिपी बरोबर लिहिणं, सांगणं किती अवघड असतं. समोरच्या माणसाला काहीही येत नाही असं समजून प्रत्येक घटक, प्रत्येक कृती लिहून द्यायची. आणि ते सर्व जसंच्या तसं करुन समोरचाही एकदम बरोबर तसाच पदार्थ बनवणं. हे किती अवघड आहे आणि त्यांत margin of error किती आहे याची कल्पना आहे का? हे म्हणजे मी एखाद्या प्रोजेक्टसाठी स्पेसिफिकेशन लिहिणे आणि डेव्हलपरने ते तसंच्या तसं कोड करुन तो एकदम हवा होता "तसाच" सॉफ्टवेअर प्रॉडक्ट बनवणे याच्याइतकं अवघड आहे. बरोबर ना? मला असा एकदम शोध लागला की खूप आनंद होतो. तर एकूण काय की रेसिपी लिहिणे आणि त्या पाळणे हे कठीणच काम. पण हे पाळणाऱ्या माणसांचं किती बरं असतं. चुका कमी आणि चव एकसारखी प्रत्येकवेळी. 
         तर लेकीला अनेकदा पाहताना वाटतं ही का नियम पाळत नसेल? मी एखादी गोष्ट सांगतेय म्हणजे अनुभवातूनच सांगतेय ना? बाकी सगळे एखादी गोष्ट जशी सांगितलीय तशीच करत असताना, का तिला स्वतःलाच हवंय तसं करायचं असतं? सर्व माहिती दिलेली असतांना फक्त झापडं लावून, लिहून दिलेली गणितं करणं का हीला अवघड वाटतं? अशावेळी कधीकधी मला अशी नियम न पाळता स्वतःच्या मनाला योग्य वाटेल तशीच रेसिपी वापरुन पदार्थ बनवणारी मी आठवते. मग त्यात चुका होणारंच हे ठरलेलंच. नाही का? कधीतरी त्या चुकांतून धडे घेऊन तीही मान्य करेल की नियम पाळलेच पाहिजेत. किंवा तिला एखादी नवीन स्वतःची रेसिपी मिळेल. नाही का? असो. 
बाय द वे, तुम्ही कुठल्या प्रकारात मोडता? 

विद्या भुतकर. 

No comments: